मेसेज होता..
…….. विन्सर हॉटेल धडाडून पेटले आहे, प्रचंड आग आहे , त्वरीत निघा….

या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा ..

Evangeline Smith Adams – 4

Evangeline Smith Adams – 3

Evangeline Smith Adams – 2

Evangeline Smith Adams – 1

सेंट पॅट्रीक डे ची परेड मोठी दिमाखदार होती. ती बघायला रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती. विन्सर हॉटेलाच्या पुढील बाजुच्या सर्व  खिडक्यांतुन हॉटेल मध्ये वास्तव्य करणारे अतिथी ही परेड पाहात होते.

दुपारचे अडीच वाजले असतील , पहिल्या मजल्यावरुन परेड पाहणार्‍या एका गेस्ट ला सिगरेट प्यायची तलफ आली, तो पहिल्या मजल्याच्या पार्लर मधून बाहेर आला आणि पॅसेज मधून फ्लोअर च्या मागच्या बाजुला आला, त्याने सिगरेट पेटवली आणि ती जळती आगकाडी त्याने निष्काळजी पणाने मागच्या खिडकीतुन बाहेर भिरकावली, त्यावेळी जोराचा वारा वाहात असल्याने ही जळती काडी खाली जायची ती वर गेली आणि दुसर्‍या मजल्यावरच्या खिडक्यांना जे नाजुक, लेस चे पडदे लावले होते त्यावर जाऊन पडली. त्या पडद्यांनी झपाट्यांनी झपाट्याने पेट घेतला. दुसर्‍या मजल्यावरच्या ज्या खोलीचे हे पडदे होते ती खोली रिकामी होती कारण तिचे नुतनीकरणाचे काम चालू होते , आत मध्ये लाकूड, कार्पेटस , लाकडाला लावायच्या पॉलिशचे डब्बे असा बराच ज्वालाग्रही माल होता.  मग काय बघता बघता आग भडकली , खिडकीतुन काळ्या धुराचे लोट उठले , आगीच्या ज्वाळा इतक्या मोठ्या होत्या की की क्षणार्धात आगीने दुसरा मजला व्यापायला सुरवात केली , विन्सर हॉटेलच्या कर्मचार्‍यांंनी ‘आग लागली’ अशी सुचना देणार्‍या घंटा वाजवायला सुरवात केली तो पर्यंत आगीने हॉटेलचा तिसरा मजला गाठला होता,  आगीच्या महाभयंकर ज्वाळा आता चौथ्या मजल्याकडे झेपावत होत्या.

रस्त्यावर परेड पाहात असलेल्या लोकांना हे धुराचे लोट आणि पाठोपाठ आगीच्या अक्राळविक्राळ ज्वाला दिसताच एकच हलकल्लोळ उसळला, पळापळ सुरु झाली .
(नशीब तेव्हा आजच्या सारखे मोबाईल फोन नव्हते नाहीतर लोक ‘सेल्फी विथ फायर अ‍ॅट विन्सर हॉटेल’ घेण्यात रंगले असते!)

पहील्या मजल्यावरच्या आपल्या खोलीत विश्रांती घेणार्‍या बाईंना प्रथम दिसला तो काळ्या धुराचा लोट, हा काय प्रकार आहे हे पाहण्या साठी बाई खिडकीत आल्या , एव्हाना ‘आग लागली’ असा सुचना देणार्‍या घंटा वाजवायला सुरवात झाली होती आणि रस्त्यावर पळापळ सुरु झाली होती. आग लागली आहे आणि ती आपल्याच हॉटेलात हे लक्षात यायला बाईंना वेळ लागला नाही, टेबला वरच्या बॅगेत भराभर वस्तु कोंबुन बाई बॅगे सह रुमच्या बाहेर आल्या , बाहेरच्या पार्लर मध्ये पळापळ सुरु झाली होती, खाली जाणार्‍या जिन्यात एकच झुंबड उडाली होती, त्या चेंगराचेंगरीतुन कसाबसा मार्ग काढत बाई रस्त्यावर आल्या , रस्ता ओलांडून  त्या सुरक्षीत जागी आल्या , सुटकेचा नि:श्वास टाकत त्यांनी हॉटेल कडे पाहीले .. समोर हॉटेल विन्सर धडाडून पेटले होते.

पहीले फायर इंजीन घटनास्थळी पोहोचले तेव्हा आगीने आख्खे हॉटेल पादाक्रांत केले होते, तळमजळा आणि पहील्या मजल्या वरचे बरेचसे लोक बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते.

फायर ब्रिगेड चे जवान कामाला लागले तेव्हा तिसर्‍या आणि चौथ्या मजल्या वरचे लोक खिडकीतून धाड धाड खाली उड्या मारत होते (त्यातले फार थोडे वाचले)  , दुसर्‍या मजल्या वरच्यांना काहीच करता आले नाही. पाचव्या , सहाव्या मजल्या वरच्यांना जिना जळल्या मुळे ना खाली उतरता येत होते आणि नाही खिडकीतुन उडी मारायचे धाडस होत होते. फायरब्रिगेड वाल्यांनी खाली जाळे अंथरुन त्यातल्या काहींना ऊडी मारायला लावले,  त्यांचा जीव वाचू शकला , बाकीचे आगीत भस्मसात झाले.

या हॉटेल मध्ये आपत्कालीन सुटकेचा मार्ग म्हणून तळमजला ते टॉप मजला असे सलग , आरपार, गोल आकाराचे  एक माणुस मावू शकेल असे भोक (Escape well – विहीर) होते आणि त्यात एक भक्कम दोरखंड होता, त्या दोरखंडाला धरुन खाली उतरायचे आणि जीव वाचवायचा. पण याचा उपयोग थोड्याच जणांना करता आला, एक व्यक्ती वरच्या मजल्यावरुन घसरत खाली आली पण या प्रवासात हात सोलवटल्या मुळे ती मध्यावरच आरडाओरड करत राहीली, ना खाली ना वर! यात मौल्यवान वेळ वाया गेला आणि आगीने तो दोरखंड जाळून टाकला,  बचावाचा उरला सुरला मार्ग ही नष्ट झाला. वरच्या मजल्यां वरचे जीवाच्या आकांताने सैरावैरा धावणारे लोक आगीत होरपळुन कोळसा झाले.

फायर ब्रिगेडच्या बहादुर जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन आपला जीव धोक्यात घालून अनेकांना वाचवले पण तो दिवस त्यांचा नव्हता, अग्नीदेवता त्या सगळ्यांना पुरुन उरली.

केवळ काही तासां पुर्वी मोठ्या दिमाखात उभे असलेले ‘विन्सर हॉटेल’ पूर्ण बेचिराख झाले तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. अवध्या दोन तासात होत्याचे नव्हते झाले , आता उरला होता राखेचा धुमसणारा प्रचंड ढिगारा आणि त्यातुन डोकावणारे विन्सर हॉटेलचे काही अवशेष.

(वाचकांना एक सात मजली इमारत अशी दोन तासात भस्मसात होणे हे अशक्य कोटीतले वाटेल. पण हे झाले याचे कारण म्हणजे अमेरिकेतल्या बहुतांश इमारतीचे बांधकाम हे मुबलक लाकूड आणि आधाराला स्टील बीम्स वापरुन केले जाते अगदी आजच्या काळातही. आपल्या कडे म्हणजे भारतात सिमेंट कॉन्क्रीट , दगड – वीटांचे चे काम असते तसे तिथे नसते, म्हणूनच 9/11 ला शंभर+ मजली ट्वीन टॉवर कोसळायला तास भर सुद्धा लागला नाही )

या अग्नीकांडात एकूण ८६ मृतदेह सापडले पण पुर्ण जळून केलेले अवशेष पाहता मृतांची संख्या याहुनही जास्त असावी असा अंदाज केला जातो. जखमींच्या यादीत एकूण ५२ नावे होती. घटना घडली तेव्हा हॉटेल मध्ये होते अशी शंका असलेले पण जिंवत किवा मृत अशा अवस्थेत सापडले नाहीत असे एकंदर २० , या लोकांचा पत्ता कधीच लागला नाही त्यांना ‘मिसिंग’ असे घोषीत केले गेले.

वॉरेन ने स्वत: आगीत उडी घेऊन अनेकांना वाचवले , किरकोळ दुखापती सहीत वॉरेन वाचला पण सहाव्या मजल्यावरच्या त्याच्या फॅमीली स्युईट मध्ये वास्तव्यास असलेल्या त्याच्या पत्नीला आणि  लाडक्या मुलीला तो वाचवू शकला नाही.

वॉरेन च्या ‘हेलेन’ या अवध्या २० वर्षाच्या मुलीने आगीला घाबरुन प्राण वाचवण्या साठी चक्क सहाव्या मजल्यावरुन उडी मारली अर्थातच ती वाचली नाहीच.

वॉरेन ची पत्नीला फायर ब्रिगेड नी वाचवले पण ती वाचली नाही , दुसर्‍याच दिवशी तिचे हॉस्पीटल मध्ये निधन झाले.

अग्नीकांडाच्या दुसर्‍या दिवशी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत धाय मोकलून रडत वॉरेन ने कबुली दिली होती..

इव्हांजेलीन अ‍ॅडॅमस नी  मला एक दिवस आधीच माझ्या वर इतकी मोठी आपत्ती कोसळणार आहे, मी व माझे कुटुंबिय, माझी मालमत्ता धोक्यात आहे असे भविष्य सांगीतले होते , दुर्घटनेच्या दिवशी ही त्यांनी मला याची आठवण करुन दिली होती, मी ती गोष्ट हसण्यावारी नेली … त्यांचे ऐकले असते तर..”

आता या ‘जर-तर’ ला आता काहीच अर्थ नव्हता , व्हायचे ते नुकसान झाले होतेच !

“हो आपली मालमता , आपण स्वत: आणि आपले कुटुंब धोक्यात आहे”

ही बाईंची भविष्यवाणी अशी तंतोतंत खरी ठरली.

वॉरेन च्या बाबतीतले केलेले  हे अशुभ भाकित असे प्रत्यक्षात उतरेल याची बाईंना सुद्धा कल्पना नव्हती ,

घडलेल्या घटने वरुन कोणी ही मान्य करेल…  ‘काय अचुक भविष्यवाणी होती”

पण थांबा, बाईंनी वर्तवलेल्या भाकिताचा दुसरा पडताळा अजुन पुढेच आहे आहे ..

वॉरेन ला बसलेला धक्का कल्पनेच्या पलीकडचा होता.  या धक्क्यातुन वॉरेन सावरलाच नाही, मानसिक दृष्ट्या तो इतका  खचला की तो चक्क ‘वेड’ लागण्याच्या सीमारेषे पर्यंत पोहोचला. निमित्त अपेंडीसायटसचे  (Appendicitis) झाले आणि या अग्नीकांडा नंतर बरोबर १८ दिवसांनी म्हणजे ४ एप्रिल १८९९ रोजी या नव-कोट नारायण वॉरेन लेलँड चे  दु:खद निधन झाले!

हॉटेल विन्सर चे अग्नीकांड अजुनही न्युयॉर्क शहराच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग बनून राहीले आहे.

न्युयॉर्क मधल्या यच्च्यावत वृत्तपत्रांनी बाईंच्या तंतोतंत खर्‍या ठरलेल्या भाकिताला अमाप प्रसिद्धी दिली.

एका रात्रीत बाई  अमेरिकेतील सार्‍या घराघरात पोचल्या!

या विन्सर हॉटेलच्या लॉबीत पाय ठेवता क्षणी बाईंना एक प्रकारचे ईंटीईश्युन आले होते:

“I entered respectfully the portals of the great building which was destined to bring me sudden fame…”

त्याचा हा असा पडताळा आला! कदाचित “ sudden fame…”  हा शब्द प्रयोग जो बाईंनी आत्मचरित्रात केला तो घटना घडल्याच्या सुमारे  वीस-पंचवीस वर्षां नंतर त्यामुळे तो ‘बायस्ड’ आहे हे उघडच आहे पण  “हे हॉटेल आपली भरभराट करणार ’ अशा अर्थाचे त्यांना काहीतरी वाटले हे महत्वाचे.

बाईंनी त्यांना देऊ केलेली पाचव्या मजल्यावरची सुंदर रुम नाकारुन पहील्या मजल्यावरची रुम पसंत केली हा पण एक मोठा दैवी संकेत नाही का? जर बाईंनी पाचव्या मजल्या वरची रुम घेतली असती तर त्या आगीने त्यांचा ही बळी घेतला असता ! त्या या दुर्घटनेतून वाचाव्यात आणि त्यांच्या हातुन ज्योतिषशास्त्राची सेवा घडावी ही साक्षात नियतीचीच ईच्छा असावी!

हॉटेल विन्सर  बेचिराख झाले खरे पण त्या राखेतुनच अमेरिकन ज्योतिष जगतात पुढे तब्बल ३० वर्षे तळपणारा तारा उदयास आला ………….. ‘इव्हांजेलीन अ‍ॅडॅमस!

(सोबत दिलेला फटू हा या आगीची ‘न्युयॉर्क टाईम्स’ मध्ये आलेली बातमी)

पुढच्या भागात वाचा

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sudhanva Gharpure

  Oh, what a tragedy for one and opportunity for another one. Although Warren Layland received intimation before hand, he could not save himself and his family. What conclusion should we draw out of this ?

  0
  1. सुहास गोखले

   श्री सुधन्वाजी

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपल्या आयुष्यात घडणार्‍या काही घटनांं ‘प्रयत्नाधीन’ असतात म्हणजे काय घडू शकेल याचे आपल्याकडे चार – पाच पर्याय असतात आपण प्रयन करुन / अथवा न करुन त्यातला एक पर्याय कळत/ न कळत स्विकारत असतो. ‘दैव देते आणि कर्म नेते’ असे आपण म्हणतो ते याच अर्थाने .

   आणि काही घटना या ‘दैवाधीन’ असतात. तिथे आपल्यला काही करायला वाव ठेवलेलाच नसतो , जे प्राकत्नात आहे ते घडतेच. विन्सर हॉटेलच्या मालकाच्या आयुष्यातली ही घटना अशीच दैवाधीन होती म्हणुनच या दुर्घटनेची पूर्वसुचना मिळून ही त्याने त्याचा काहीही उपयोग करुन घेतला नाही (किंवा तशी बुद्धी त्याला झाली नाही) आणि जे व्हायचे ते झालेच.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.