बाईंना अशी चटकन, अल्लाद झोप लागली हे एका अर्थाने बरेच झाले, कारण उद्याचा दिवस किती भयानक ठरणार आहे याची ना बाईंना कल्पना होती ना त्या वॉरेन ला !

पुढे चालू …

 

या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा ..

Evangeline Smith Adams – 3

Evangeline Smith Adams – 2

Evangeline Smith Adams – 1


१७
मार्च १८९९! आजचा दिवस होता ‘सेंट पॅट्रीक्स डे’ , देशभर साजरा होणार उत्सवी दिवस. सार्वजनिक सुट्टी ,  निम लष्करी सेवा दले, पोलिस , अग्निशामक दले यांच्या परेडस , खास हिरवे कपडे घालून धार्मिक गाणी गात चालणारे भावीक असा मोठा नयनरम्य सोहळा गावागावांतुन साजरा होत असे.

न्युयॉर्क शहर तरी त्याला अपवाद कसे असेल?

रात्री बारा पर्यंत ज्योतिषाचे काम करुन बाई थकून भागून झोपल्या होत्या खर्‍या पण शांत झोपेचा आनंद काही फार वेळ मिळाला नाही, दिवस उजाडताच सुरु झालेली ‘सेंट पॅट्रीक्स डे’ ची वर्दळ त्यांची झोपमोड व्हायला पुरेशी होती.

बाईंनी सगळे आवरले , ब्रेकफास्ट झाला  आता आज दिवसभरात काय काय करायचे याची बाई नी एक उजळणीं केली. आज वॉरेन पुन्हा एकदा त्याच्या पत्रिके बद्दल येणार तेव्हा ते काम पहीले हाता वेगळे करायचे ठरवून बाईंनी त्यांच्या पत्रिकेचा काही काळ अभ्यास केला , काल जे भाकित केले होते त्यात काहीही बदल नाही उलट ती आपत्ती अगदी आजच येणार या बद्दल त्यांना तीळमात्र शंका राहीली नव्हती.

वॉरेन ची पत्रिका बाजूला ठेऊन बाई शांतपणे खिडकीतून दिसणारा नजारा न्याहाळत होत्या इतक्यात …  दार वर टकटक !

“येस, कम ईन”

दारात  ‘वॉरेन लेलँड’ उभा होता…

“गुड मॉर्निंग आणि हॅप्पी सेंट पॅट्रिक्स डे मॅडम’

“गुड मॉर्निग मि. लेलँड आणि सेंट पॅट्रिक्स डे च्या शुभेच्छा”

“धन्यवाद मॅडम, आज आपण खुप प्रसन्न दिसताय, झोप चांगली झाली असावी आणि आमच्या हॉटेलचा ब्रेकफास्ट देखील आपल्याला पसंत पडला असेल”

“येस, तुमचे हॉटेल अगदी सुखदायक आहे आणि ब्रेक फास्ट चे म्हणाल तर इतका चांगला ब्रेकफास्ट मी गेल्या कित्येक वर्षात खाल्ला नसेल. आमच्या ईस्टेट वरच्या कुक ला  (आचारी) तुमच्या कडे ट्रेनिंग ला पाठवले पाहीजे”

“धन्यवाद मॅडम तुम्हाला आमची सेवा पसंत पडली”

“मि लेलँड , आज मी आपल्या साठी काय करु शकते?”

“हे आपले कालचेच, पत्रिका , ती आपत्ती इ इ. पण खरे सांगू का, मी या असल्या बाबींना  घाबरत नाही. जे व्हायचे ते होऊ दे , घाबरुन जाऊन कामेधामे बंद ठेवणार्‍यातला मी नाही. माझा स्टॉक मार्केट मधला इंटरेष्ट आपल्याला माहीती आहेच , मला त्या बाबतीतच जरा सखोल मार्गदर्शन पाहीजे”

“म्हणजे नेमके काय?”

“पुढच्या आठवड्यात मी शेअर्स मध्ये बरीच मोठी गुंतवणूक करणार आहे, या गुंतवणूकी साठी कोणता सेक्टर जसे कॉटन, ऑईल, रेलरोड , स्टील, शिपिंग, इलेक्ट्रीसिटी, बांधकाम , पर्यटन इ. तेजीत राहील हे कळले तरी मला पुरेसे आहे”

“मि वॉरेन असे जर हमखास सांगता आले असते तर आज मी तुमच्या जागी नसते का?”

“मी समजु शकतो मॅडम, अगदी अचूक भाकित मिळावे अशी अपेक्षा ही नाही पण साधारण कल कळला तरी पुरेसा आहे मला”

“नेमका कोणता सेक्टर वर जाणार कोणता कोसळणार हे सांगणे अवघड आहे कारण तो मंडेन (mundane)  अ‍ॅस्ट्रॉलॉजीचा भाग आहे त्यामुळे या बद्दल मी आपल्याला फारशी मदत करु शकणार नाही. स्पेक्युलेटीव्ह पद्धतीची गुंतवणूक आपल्याला लाभदायक ठरत आलेलीच आहे तेव्हा तो ही प्रश्न नाही.  फक्त कोणत्या सेक्टर मध्ये केलेली  गुंतवणूक लाभदायक ठरेल या अंगाने आपल्या पत्रिकेचा अभ्यास करता येईल”

“ते तरी सांगा”

“ठीक आहे , मी नक्की प्रयत्न करते पण मला जरा वेळ द्या. “

“इतके जरी मार्गदर्शन मिळाले तरी आभारी राहीन मी आपला”

“ते आभाराचे राहू दे बाजूला पण मला आश्चर्य वाटते , मी आपल्याला काल काय सांगीतले होते ते लक्षात आहे ना? मला त्याचीच जास्त काळजी वाटते , मला वाटते ते भाकित आपण फारसे गंभीरपणे घेतले नसावे”

“नाही नाही असे कसे  ?”

“मला असे वाटले कारण त्या भाकिता बद्दल काही न विचारता आपण अजुनही शेअर बाजारातच घुटमळत आहात”

“शेअरबाजार तर माझा प्राण आहे “

“ते ठीक आहे मि लेलँड , काल ठरल्या प्रमाणे मी आज पुन्हा आपली पत्रिका तपासली , मी आपल्याला काल जे  काही सांगीतले  त्यात कोणताही बदल नाही. काल मी घटना केव्हा घडेल याची नेमकी गणीतें केली नव्हती ती आज केली आणि त्या आधारावर सांगते , आपत्ती घोंघावत आपल्या दिशेने येत आहे नव्हे आपण स्वत:हून या आपत्तीत प्रवेश करत आहात”

बाई आपल्या आत्मचरीत्रात लिहतात:

“My mind was still so filled with the horror which was hanging over this kindly, hospitable man that I forced myself to consult his chart again. There could be no doubt of the accuracy of my first reading. The danger which confronted him was so clearly indicated and so imminent that it seemed as if the man in front of me was being pushed at that very moment into the very depths of disaster. I tried to be calm and professional in my warning, but I could not control the chills which ran through my body”

( पुढे तब्बल ७५ वर्षां नंतरच्या एका हिंदी सिनेमातला : “मौत तुम्हारे सर पर खेल रहीं है कालिया नजर उठाकर देख लो” असा डॉयलॉग जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा तेव्हा मला ‘देजा वू’ चा फील  येतो!)

“ठीक आहे , आपण आराम करा मॅडम, मी निघतो आता “

“ठीक आहे, पुन्हा भेटूच”

वॉरेन जाताच बाईंनी एक प्रदीर्घ सुस्कारा टाकला, हा माणूस आत्ता आपल्या डोळ्या समोरुन गेला खरा पण पुन्हा भेटेल का? या कल्पनेनेच त्यांना कापरे भरले.  शेवटी काही झाले तरी बाई एक व्यावसायीक ज्योतिषी होत्या,  जातक आणि त्याच्या साठी केलेल्या भाकितां पासुन स्वत:ला अलिप्त कसे ठेवायचे हे त्यांना चांगले ठाऊक होते.

स्वत:ला सावरत खिडकीतून दिसणारी सेंट पॅट्रीक्स डे ची परेड बघण्यात बाई गुंग झाल्या. मध्येच त्यांनी  रुम सर्व्हिस ला कॉल करुन दुपारचे जेवण मागवून घेतले.

दुपारी बारा एक च्या सुमारास वाजता सेंट पॅट्रिक्स डे ची मुख्य (सरकारी) परेड चालू  झाली, बरीच धुमधाम होती, काही वेळाने बाईंना त्याचा कंटाळा आला पण या परेडच्या धुमधडाक्याने त्यांना क्षणभर देखील विश्रांती मिळू दिली नाही.

(बघा म्हणजे १८९९ साली न्युयॉर्कात ‘डीजे’ होते म्हणायचे! तिथे काय वाजवत असतील ? ‘मुन्नी’ तिथेही बदनाम होत असेल का? आणि तिथल्या ‘शीला की जवानी’ चे काय ? अमेरिकन ‘शांता बाय’ कशी असेल आणि ‘पारु ?’, तिथेही ‘शिट्टी वाजली , गाडी सुटली ‘चे अमेरिकन भावंड असेल का ? जाऊ दे भलताच विषय आहे नै!)

…..

दुपारचे तीन वाजले असतील , सेंट पॅट्रिक्स डे ची मुख्य परेड उरकून फिफ्थ अ‍ॅव्हेन्यु आणि 46 वा स्ट्रीट च्या फायर स्टेशन मधले कर्मचारी जरा विसावले होते , काहींच्या अंगावर परेडचा खास पोषाख अजुनही होता, कोणाच्या हातात कॉफी चा वाफाळलेला मग होता तर कोणी चिरुट शिलगावून पेपर चाळत होता.

फायर स्टेशन दणाणून टाकणार कर्कश्य आवाजातला  ‘फायर अलार्म’ वाजला तेव्हा दुपारचे बरोब्बर ३:१४ वाजले होते. मॅनहट्टन न्युयॉर्क च्या फायर ऑफिस मधून मेसेज होता..

अवघ्या दोन मिनिटांत ६५ क्रमांकाचे फायर एंजीन सायरनचा कर्णकटू आवाज करत बाहेर पडले.

न्युयॉर्कच्या बिझनेस डिस्ट्रीक्ट च्या पंचक्रोशीतल्या सर्वच फायर स्टेशन्स मध्ये कर्कश्य आवाजात ‘फायर अलार्म’ वाजत होते आणि एका पाठोपाठ एक अशी २२ फायर इंजिन्स, ६ उंच शिड्या असलेली वाहने, अग्निशमन दलात नुकतीच सामील झालेला ‘वॉटर टॉवर’ अशी यच्चयावत उपलब्ध वाहने सायरन वाजवत सुसाट वेगाने बाहेर पडत होती ..

मेसेज होता..
…….. ५७५, फिफ्थ अ‍ॅव्हेन्यु वरचे ‘विन्सर हॉटेल’ धडाडून पेटले आहे, प्रचंड आग आहे , त्वरीत निघा……. 

पुढच्या भागात वाचा

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
  1. Sudhanva Gharpure

    सुहासजी,

    खूपच उत्कंठावर्धक अनुभव आहे.

    पुढील भाग लवकर पाठवावा.

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.