बाई रुम मध्ये जरा स्थिरावत आहेत तोच रुम च्या दरवाज्यावर  टकटक झाले ..

“येस, कम ईन”

दारात हॉटेलचा मालक ‘वॉरेन लेलँड’ उभा होता…

पुढे चालू …

या लेखमालेतले पहीले भाग इथे पहा ..

Evangeline Smith Adams – 2

Evangeline Smith Adams – 1


पली उंच हॅट डोक्यावरुन काढून ,कमरेत वाकून वॉरेन ने बाईंना अभिवादन केले.

“गुड इव्हिनिंग मॅडम’

“गुड इव्हिनिंग मि. लेलँड”

“सॉरी आपल्या विश्रांतीत जरा व्यत्यय आणतोय”

“हरकत नाही , मी आपल्या साठी काय करु शकते?”

“तुम्ही माझी पत्रिका उद्या तपासणार म्हणाला होता”

“तपासेन ना काय गडबड आहे , उद्या दुपारी वेळ काढते चालेल  ?”

“माझी आपल्याला विनंती आहे की उद्या ऐवजी आजच पत्रिका बघता नाही का येणार”

“मि. वॉरेन , तुम्ही बघताय , मी किती दमले आहे ते”

“मला कल्पना आहे मॅडम, म्हणूनच मी आपल्याला आग्रह नाही करत पण विनंती करतो आहे”

“पण उद्या पत्रिका पाहीली तर नाही का चालणार , आजच का?”

“ उद्या शुक्रवार आहे आणि शुक्रवार मला अशुभ असतो, म्हणून आपण आजच माझी पत्रिका बघावी”

बाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे:
“in his jovial way, tomorrow will be Friday, a bad-luck day. You better give me a reading now!”

तसे पाहीले तर बाई खूप दमल्या होत्या पण वॉरेन सारख्याच्या ह्या विनंती ला नकार देणे त्यांना अवघड गेले.

बाईंना ‘वॉरेन लेलँड’  बद्दल बरीच माहीती होती, हा वॉरन लेलँड नुसता हॉटेलवाला शेट्टी नव्हता, पिढीजात श्रीमंत होता, हॉटेल्स बरोबरच त्याचे अनेक उद्योग होते , पण त्याची खरी ओळख होती ती शेअर बाजारात अमाप पैसा मिळवणारा म्हणूनच.

वॉरेन सारखा एक बलाढ्य नव कोट नारायण बाईं ना  विनंती करत उभा होता.  त्याने पुढे केलेले कारण हास्यास्पद असले तरी वॉरेन सारख्याला नाराज करणे बाईं ना परवडणारे नव्हते, या वॉरेन चे अमेरिकेतल्या उद्योग जगतात, हॉटेल व्यावसायीकांत, शेअर बाजारातल्या अब्जाधीशांच्या क्लबात, स्टील आणि रेलरोड कंपन्यांत, राजकीय वर्तुळात उठबस होती, त्याचा मोठा वट होता, अशी व्यक्ती पुढे जाऊन बाईंच्या व्यवसायाची चालती बोलती जाहीरात ठरणार होती हे न कळण्या इतक्या बाई मुर्ख नव्हत्या!

चेहेर्‍यावर उसने हसू आणत बाई म्हणाल्या…

“आता आपला इतका आग्रह असेल तर मला नाही म्हणता येणार नाही, मला थोडा वेळ द्या मी आपली पत्रिका तयार करते , तुम्ही असे करा या नोट पॅड वर आपले जन्म तपशील लिहून द्या.”

बाईंनी बॅगेतून आपली भावसाधनाची, ग्रहस्थितींची टेबल्स असलेली पुस्तके बाहेर काढली आणि वॉरेन ची पत्रिका तयार करायला घेतली. या कामात बाई इतक्या तरबेज होत्या की वॉरेन ची पत्रिका , गोचर पत्रिका इ तयार करायला त्यांना फार वेळ लागला नाही.

इकडे वॉरेन अगदी उतावळे पणाने बाई आता काय सांगणार या कडे कान टवकारुन खुर्चीच्या टोकावर बसुन चुळबुळ करत होता.

बाईंच्या चेहेर्‍यावरचे काळजीचे भाव बघताच, वॉरेन चे काळीज लक्ककन हलले …

“काही अशुभ आहे का मॅडम”

“अशुभ? महाअशुभ म्हणा”

“बापरे म्हणजे नेमके काय?”

“महाभयंकर आपत्ती कोसळणार आहे आपल्यावर आणि मी चुकत नसेल तर अगदी आज उद्याच”

“आज उद्या आपत्ती? ती कोणती “

“आपत्ती येणार आहे हे सांंग़ू शकते पण नेमकी कोणत्या प्रकाराची हे सांगण्यासाठी अजून जरा अभ्यास केला पाहीजे , त्याला वेळ लागेल आणि ते काम मी उद्याच करु शकेन”

वॉरेन एखाद्या पुतळ्या सारखा गारठला…

बाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे:
“So I took out one of my blank charts, entered the day and hour and place of his birth, and began to calculate the positions of stars. Suddenly, I saw something which made me hesitate. The man was under one of the worst possible combinations of planets – conditions terrifying in their unfriendliness.

I remember telling him that the danger was so imminent that it might overtake him on the morrow. …”

वॉरेन क्षणात सावरला आणि त्याही अवस्थेत काहीसे हसत म्हणाला..

“आपत्ती ? असेल ही , त्यातल्या त्यात एक बरे आहे  ते म्हणजे ही आर्थिक आपत्ती नक्कीच नसणार! “

“अरे वा इतका आत्मविश्वास?”

“मॅडम यात आत्मविश्वास कसला ,  आपण म्हणता तशी ती आपत्ती आज – उद्याच येणार असेल तर आर्थिक आपत्ती नक्कीच नसेल,  कसे  तेे बघा,  उद्या शुक्रवार ‘सेंट पॅट्रीक्स डे’ म्हणून शेअर बाजार बंद आणि नंतर शनीवार – रवीवार  साप्ताहीक सुट्टी  म्हणून शेअरबाजार बंदच राहणार,  शेअर बाजार कोसळणे हीच माझ्या साठी मोठी आर्थिक आपत्ती ठरेल पण ते या तीन दिवसांत होणार नाही , तेव्हा मला घाबरायचे काहीच कारण नाही”

ईतकी अशुभ बातमी ऐकून सुद्धा , शेअर बाजार कोसळणार नाही याच कल्पनेत आनंद मानणार्‍या वॉरेन कडे बाई आश्चर्याने पहात  राहील्या ! ‘पैशाची नगरी न्युयॉर्क’ आणि तिथले हे असले ‘लक्ष्मीदास’ लोक ‘ या बद्दल बाई ऐकून होत्या पण न्युयार्क मध्ये पाऊल ठेवताच त्याचा असा तात्काळ पडताळा येईल असे त्यांना वाटले नव्हते !

“मि वॉरेन हे प्रकरण शेअर बाजार किंवा तत्सम आर्थिक बाबीं संदर्भात नसावे, कारण ग्रहयोग वेगळेच संकेत देत आहेत”

“मग काय असु शकते”

“आपली मालमता आणि कदाचित आपले कुटुंब”

“क्काय ?”

“हो, आपली मालमता , आपण स्वत: आणि आपले कुटुंब घोक्यात आहे”

“आपल्याला खात्री आहे?”

“१००%”
“म्हणजे स्टॉक मार्केट बद्दल काही अशुभ नाही”

बाई काही बोलल्या नाही.

बाईंनी आपल्या आत्मचरित्रात लिहले आहे:
“A great speculator and even when he learned that the unfavorable conditions affected not only him but his entire family, his mind reverted to the stock market”

वॉरेन ने चाचरत चाचरत विचारले ..

“आपण पुन्हा एकदा पत्रिका तपासुन पाहता का?”

“त्याने काही फरक पडणार नाही, दुसर्‍यांदा कशाला आणखी दहा वेळा जरी ही पत्रिका तपासली तरी मी जे सांगीतले त्यात काहीही फरक पडणार नाही”

“मॅडम गैरसमज नसावा, आपण सगळा अभ्यास करुनच हे सांगत आहात यावर माझा पुर्ण विश्वास आहे पण मघाशी तुम्हीच म्हणालात की ‘अजून जरा अभ्यास केला पाहीजे’ … म्हणून मी विचारले”

खरे तर आता बाई कंटाळल्या होत्या , पुन्हा पुन्हा तीच पत्रिका तपासून नवे काही निष्पन्न होणार नाही हे बाईं ना पक्के माहीती होते पण तरी ही ब्याद निदान आज पुरती तरी टळावी आणि आपल्याला शांतपणे विश्रांती घेता यावी या हेतुने त्या दुसरे दिवशी सकाळी वॉरेन च्या पत्रिकेचा पुन्हा एकदा अभ्यास करायला तयार झाल्या.

“ठीक आहे , तुम्ही म्हणता म्हणुन मी उद्या पुन्हा तपासते तुमची पत्रिका , पण आत्ता नको”

“चालेल, आपल्याला जे सोयीचे वाटते तसे होऊ दे”

“मग उद्या भेटू यात आपण”

वॉरेन जरासा घुटमळला ..

“अजुन काही काम आहे का?”

“हो पण तुम्हाला कसे सांगू , धाडस होत नाही”

“काय ते , सांगा मोकळेपणाने “

“त्याचे असे झाले आहे की आज आमच्या हॉटेलात दोन बडे उद्योगपती अतिथि आहेत, माझे अगदी जवळचे मित्रच आहेत . मघाशी त्यांच्याशी बोलताना सहज मी त्यांना आपल्या बद्दल सांगीतले, ते दोघेही ज्योतिषाचे मोठे चाहते आहेत आणि तुम्हाला भेटायला उत्सुक आहेत”

“मला त्यांना भेटायला निश्चित आवडेल पण घड्याळात पाहा ना जरा किती वाजले ते”

“मला कल्पना आहे म्हणूनच आपल्या पाशी हा विषय काढायला जीभ रेटत नव्हती “

“मी त्या दोघांना उद्या भेटते , चालेल”

“ते दोघे ही उद्या पहाटे चेक आऊट करणार आहेत, पुन्हा कधी न्युयॉर्क ला येतील सांगता येणार नाही”

बाईं ना प्रश्न पडला काय करायचे , पण लगेचच बाईंचा बिझनेस सेन्स जागा झाला!

न्युयॉर्क मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या अशा बड्या असामी जातक म्हणून समोर येणे ही एक देवदुर्लभ संधी आहे , आत्ता यांना नाही म्हणले तर असा योग पुन्हा कधी येणार ?

“ठीक आहे , बड्या असामी आहेत , आपले चांगले मित्र आहेत , मला नाही म्हणता येणार नाही, द्या त्यांना पाठवून , पण त्यांना जास्त वेळ देता येणार नाही मला, प्रत्येकाला साधारण तासभर इतकाच, चालेल ना”

“मॅडम आपला आभारी आहे मी,  आपण माझा शब्द खाली पडू दिला नाहीत , मी त्यां दोघांना तुमच्या कडे पाठवून देतो, आणि ठरल्या प्रमाणे आपण उद्या दुपारी भेटूच , गुड नाईट मॅडम”

“गुड नाईट”

त्या दोन बड्या असामींचे भविष्य बघून झाले तो पर्यंत रात्रीचे चक्क बारा वाजत आले होते.

बाईंनी बिछान्यावर अंग टाकले . बिछान्यावर पडल्या पडल्या बाई विचार करु लागल्या …

काय दिवस होता म्हणायचा आजचा…

दिवस उजाडला तो बोस्टन – न्युयॉर्क या खडतर , त्रासदायक प्रवासात

नंतर न्युयॉर्क मध्ये एका पाठोपाठ हॉटेल्स मध्ये मिळणारा नकार आणि अपमान

देवा सारखा धाऊन आलेला वॉरेन

दमलेल्या , थकलेल्या अवस्थेत , वॉरेनची पत्रिका पाहावी लागणे आणि इतकी अशुभ भविष्यवाणी तोंडातुन निघावी ..

आणि शेवटी

त्या दोन बड्या असामीं कडून मिळालेले घसघशीत मानधन आणि भविष्यात मोठा बिझनेस मिळण्याची लागलेली चाहूल.

या विचारात केव्हा डोळा लागला ते बाईंना कळले सुद्धा नाही..

बाईंना अशी चटकन, अल्लाद झोप लागली हे एका अर्थाने बरेच झाले, कारण उद्याचा दिवस किती भयानक ठरणार आहे याची ना बाईंना कल्पना होती ना त्या वॉरेन ला !

पुढच्या भागात वाचा

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. आण्णासाहेब गलांडे

  मनोरंजक कथा
  वाट पाहायला लावू नका जी!

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अण्णासाहेब

   इतर कामांच्या व्यापा मुळे लेखन करायला वेळ मिळत नाही पण मी प्रयत्न करेन
   सुहास गोखले

   0
 2. Anand Kodgire

  very eager to read ahead. sir please lavkar liha.
  tumhi mhanje dynanacha khajina aahat
  asech dnyan vaatat chala
  dhanyavaad

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.