फेब्रुवारी 2014 ला आपला हा ब्लॉग चालू  झाला, एका वर्षाच्या आत 25,000 पेज हिट्स मिळतील असे वाटले नव्हते आणि पेजहिट्स वाढाव्या यासाठी मी काही खास प्रयत्नही केले नाहीत. हळूहळू का होईना माझा ब्लॉग व त्यावरचे माझे विचार लोकांपर्यंत पोहोचताहेत यातच मला समाधान आहे. पेजहिटस पेक्षा, माझ्या ब्लॉगची म्हणून अशी काही ठळक वैषिष्ट्ये मला जपायची होती त्यात मी थोडाफार यशस्वी झालो हेच माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचे आहे.

माझ्या लिखाणात सातत्य आहे , जे इतर मराठी ज्योतिष ब्लॉग्ज वर आढळणार नाही. ‘सुरु झाला आणि ढेपाळला’ असे माझ्या ब्लॉगच्या बाबतीत होऊ देणार नाही. सुमारे 150 पोष्टस साठीचे विषय , शिर्षकें, महत्वाच्या मुद्द्यांची टाचणे माझ्या कडे तयार आहेत , आगामी काळात दरमहा किमान 8 तरी पोष्ट लिहायचा माझा संकल्प आहे. जेव्हा जेव्हा आपण या ब्लॉग ला भेट द्याल तेव्हा तेव्हा आपल्याला काहीतरी  नवीन वाचावयास मिळेल असा माझा प्रयत्न राहील.

‘ज्योतिष’ हा मूळ गाभा कायम ठेऊनच पण विविध अंगाने केलेले लिखाण हे माझ्या ब्लॉग चे सर्वात मोठे वैषिष्ट्य आहे असे मी मानतो! हा ब्लॉग सुरु करण्याच्या  आधी मी अनेक मराठी / हिंदी / इंग्रजी भाषेतल्या ज्योतिष विषयक ब्लॉग्जना भेटीं देऊन तिथे कोणत्या प्रकारचे लेखन असते याचा तौलनिक अभ्यास केला होता, माझ्या ब्लॉगवर त्या सर्वांपेक्षा काहीतरी वेगळे असावे हे धोरण ठेऊन ह्या ब्लॉगची व त्यावरच्या लिखाणाची आखणी झाली आहे.

माझ्या ब्लॉगवर आहेत तशा अत्यंत विस्तृत केस स्टडीज इतर ब्लॉग्ज वर तर सोडाच पण आजतागायतच्या प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही मराठी / इंग्रजी / हिंदी के.पी. ग्रंथ / मासिकां मध्येही वाचावयास मिळणार नाहीत. ज्योतिष विषयक ग्रंथ परिक्षणे असलेला माझा एकमेव मराठी ब्लॉग आहे, विविध विषयावरच्या लेखमाला, अनेक संदर्भ सूच्या, विनोद, बोधकथा , तात्पर्य कथा इ. विविध , विस्तृत आणि आशयघन असे लिखाण तुम्हाला इतर ज्योतिष ब्लॉग्ज वर सहसा वाचायला मिळणार नाही.

‘फुकट ज्योतिष’, ‘राशी भविष्य’. ‘साडेसाती’, ‘उपाय आणि तोडगे’ अशा  गल्लाभरु गोष्टी माझ्या ब्लॉग वर नाहीत. तसे करायचे असते तर  एकट्या साडेसाती वर किंवा ‘गुरु’ बदला वरच हजारों पेज हिट्स मला मिळवता आल्या असत्या!

माझ्या लिखाणाचे विषय सुद्धा वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेऊन निवडलेले आहेत, माझा ब्लॉग वाचणारे सर्वच जण काही ज्योतिषी अथवा ज्योतिषाचे अभ्यासक नसतात, सगळ्यांनाच ‘सबलॉर्डस’ माहीत असतीलच असे नाही, ‘तुळेचा मालक शुक्र ‘ हे कित्येक जणांच्या गावी ही नसते, अशा मायबाप वाचकांवर ज्योतिषातल्या अगम्य, जडजंबाल शब्दांचा (‘Jargon’) मारा करायचा नाही आणि अपरिहार्यच असेल तेव्हा त्याचे प्रमाण कमीतकमी ठेवायचे याचे भान मी नेहमीच राखले आहे. माझे लेखन हे ज्योतिषी, ज्योतिषाचे अभ्यासक, ज्योतिष विषयात रुची असणारे , ज्योतिष आहे तरी काय अशी उत्सुकता असणारे आणि ज्योतिषावर टीका करणारे अशा सर्वांसाठी सर्वसमावेषक असे ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. या प्रत्येक गटातल्या वाचकाला माझ्या ब्लॉग वर वाचायला काही ना काही सापडेलच!

कोणाला माझी भाषा ठाम , सडेतोड, रोख़ठोक वाटते, तशी ती आहे जरुर पण, एक नक्की,  ती कधीच अश्लील, गलिच्छ , शिवराळ, हेकट , तुसडी, फटकळ , माजोर्डी अशी नाही. काही ज्योतिष ब्लॉग वरचे लिखाण स्त्रीयांनाच काय पण पुरुषांनासुद्धा शरमेने मान खाली घालावी लागेल अशी भाषा वापरुन केलेले असते.

माझे लिखाण हे माझे स्वत:चे विचार आहेत, ज्योतिष विषयावरच्या एखाद्या ग्रंथातले उतारें उतवरुन काढून ब्लॉग भरवणे अगदी सोपे आहे, काही ज्योतिष ब्लॉग वर असले प्रकार बघायला मिळतील. असला प्रकार करणे मला अगदि सोपे आहे, आणि असे केलेले कोणाला कळणार सुद्धा नाही अशा दुर्मिळ पोथ्या व ग्रंथ माझ्या संग्रहात आहेत.

ब्लॉगवर लिहताना ‘‘ जे जे आपणासीं ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करुन सोडावे । सकळ जन’ असा कोणताही आव मी आणलेला नाही. ज्योतिषावर लिहताना अनेक पथ्यें पाळावी लागतात, फार खोलात जाउन लिहता येत नाही आणि ‘वर वर ‘ पद्धतीची अर्धवट माहीती धोकादायक ठरु ठरते. याबाबतीत , ‘सिंहेतल्या गुरु ‘ वरच्या लिखाणाचा गुरुवर्य श्री. वसंतराव भटांना आलेला अनुभव वाचण्यासारखा आहे.  फार काळजी घेऊन जबाबदारीने लिहावे लागते.

वाचकांची मागणी असूनही काही विषयांवर लिखाण करणे मी आवर्जुन टाळले आहे याचे कारण म्हणजे, ज्योतिषशास्त्रातले बरेचसे नियम हे खुप खोलात जाऊन समजाऊन घ्यावे लागतात, ते असे वर वर वाचून समजत नाहीत. या शास्त्रात   ’21 दिवसात फाड फाड इंग्लिश‘ असला प्रकार नाही. काही गोष्टीं तर साक्षात गुरु मुखातूनच शिकायच्या असतात कारण काही गुह्य तंत्रे असतात ती षट्कर्णी होऊन चालत नाहीत, ती सांगण्यापूर्वी विद्यार्थ्याची पात्रता कसून तपासून घ्यावी लागते ,  येईल त्या कोणालाही खिरापती सारखे वाटण्या सारखे हे शास्त्र नाही.

माझ्या कडे एक ‘नाडी ज्योतीषशास्त्रा’ वरची पोथी आहे , त्याचा अभ्यास एकाद्या गुरुच्या मार्गदर्शना खालीच करावा असे स्पष्ट लिहले असताना , मी आगाऊपणा करुन ती अशीच (गुरुंच्या मार्गदर्शना शिवाय) वाचायचा काही वेळा प्रयत्न केला असता प्रत्येक वेळी न चुकता, वाईट आणि वाईटच अनुभव आल्याने ते वाचन वेळीच आवरते घ्यावे लागले आहे , हा एक अनुभवच सर्व सांगून जातो. अर्धवट ज्ञान व अपात्री दान हे अत्यंत घातक असते हे आपल्याला वेगळे सांगायला नकोच.

अगदी खरे सांगतो, ब्लॉग सुरु करण्याचा मूळ आणि मुख्य हेतू माझ्या ज्योतिष विषयक सल्ला सेवेची माहीती लोकांना करुन देणे हाच आहे आणि राहील. अगदी साध्या  भाषेत बोलायचे तर ’ग्राहक गोळा करण्यासाठी!  हो , ते अगदी तसेच आहे , उगाच ‘ताकाला जाऊन भांडे लपवण्यात ‘ काही अर्थ नाही. पण स्वत: च्या व्यवसायाची सभ्य आणि सनदशीर मार्गाने जाहीरात करण्यातही काही वावगे नाही.

हा ब्लॉग सुरु करण्या मागचा दुसरा हेतू, हे ज्योतिष शास्त्र नेमके काय आहे व त्याचा आपल्याला कसा आणि किती उपयोग होऊ शकतो हे मला जसे समजले, उमगले तसे ते लोकांसमोर मांडण्याचा. मी कोणी शास्त्री पंडित नाही की या क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती नाही. पण गेल्या काही वर्षाच्या अभ्यासातून, मला आलेले अनुभवच आपल्या समोर ठेवायचा माझा प्रयत्न आहे.

( मी डिसेंबर 2014 मध्ये बेंगलोरला काही ज्योतिष अभ्यासकां समोर केलेल्या  मूळ इंग्रजी संवादातील काही मुद्द्यांचा हा  संक्षिप्त मराठी अनुवाद, याच संवादातले ‘ज्योतिष व मानसशास्त्र’, ‘ ज्योतिष आणि कर्मवाद’  हे मुद्दे विस्तृत असल्याने ते स्वतंत्र लेखां द्वारे आपल्यासमोर सादर करेन )

या शास्त्राच्या बाबतीत बर्‍याच लोकांच्या मनात अज्ञान आहे, अनेक प्रकारचे गैरसमज आहेत, या शास्त्राकडून अनेक अवाजवी अपेक्षा ठेवल्या जात आहेत आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की निष्कारण ज्योतिषशास्त्रा ला नावे ठेवणे , ज्योतिषाला संधी मिळेल तिथे झोडपणे चालू आहे. आज ह्या शास्त्राच्या बुरख्या आडून लोकांना लुबाडायचे अनेक प्रकार राजरोसपणे चालू आहेत, अर्धवट आणि बर्‍याच वेळा चुकीच्या माहीतीच्या आधारे अनेक नवशिके या प्रांतात ज्योतिषी म्हणून मिरवत आहेत. ह्या शास्त्रात अनेक आलतु फालतु गोष्टीचीं अवडंबरे होऊन बसली आहेत, बांडगुळे माजली आहेत, संशोधनाच्या नावाखाली काहीही थोतांड लोकांच्या माथ्यावर मारले जात आहे.

पत्रिकेतला मंगळ आणि साडेसाती यांनी निर्माण केलेली दहशत कमी पडली म्हणून की काय ‘काल सर्पा’ चा विळखा अनेकांचा गळा आवळतोय त्यानेही कदाचित भागणार नाही म्हणून आता ‘गुरु चांडाल’ योगाचे भूत उभे करायचे प्रयत्न चालू आहेत ! ‘के.पी.’ वालेही काही फार मागे नाहीत, त्यांचाही ‘सप्तमाचा सबलॉर्ड बुध’ हा एक राक्षस पार्टी तितकाच धूमाकूळ घालत आहे ! अरे, कुठे नेऊन ठेवलेत या आपल्या पवित्र ज्योतिष शास्त्राला !! या असल्या अनेक भंपक गोष्टींबदल मला सविस्तर लिहायचे आहे.

मानसशास्त्र, कर्माचा सिद्धांत, निर्णय स्वातंत्र्य (फ्रि विल) , ग्रह योग, ग्रहणांचा प्रभाव , जबरदस्त ताकदीची नवमांश कुंडली, कांपोझीट चार्ट्स, प्रोग्रेशनस, रिटर्नस या सगळ्या सगळ्यांना फाट्यावर मारणार्‍या कृष्णमुर्ती पद्धतीने तर शास्त्राच्या कुवती बाहेरचे दावे करुन , ‘इव्हेंट प्रिडिक्शन’ ला अतिरेकी महत्व देऊन , कळत न कळत का होईना पण भारतीय ज्योतिषशास्त्राचे मोठे नुकसान केले आहे. के.पी. – खरे काय आणि खोटे काय हे  मला एकदा लिहायचे आहे.

काही मोजके अपवाद वगळता या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध असलेली बहुतांश ग्रंथसंपदा कुचकामी आहे, चुकांनी बरबटलेली आहे. ज्योतिष अभ्यासवर्गां (क्लास) बद्दल तर काही न बोलणे हेच उत्तम! म्हणून आता मीच ज्योतिष टेक्स्ट बुक्स ची निर्मीती करण्याच्या आणि शास्त्रशुद्ध अभ्यास वर्ग सुरु करण्याच्या तयारीत आहे.

या शास्त्राचे रितसर प्रमाणिकरण  (Standardization) झालेले नाही, या शास्त्रा संदर्भात एकच एक अशी ‘नियामक / शिख़र संस्था’ आस्तित्वात नाही जी ह्या क्षेत्रातल्या अपप्रवृत्तीवर लक्ष ठेऊ शकेल. मागच्या पिढीतल्या दिग्गज ज्योतिषांनी हे काम करायला हवे होते पण त्यांनी स्वत:च्याच गल्ली बोळातल्या संस्था उभ्या करण्यातच धन्यता मानली , प्रत्येकाची वेगळी चूल , वेगळा कंपू ! एक साधा सर्वमान्य असा ‘ज्योतिष शास्त्राचा’ चा अभ्यास क्रम (Syllabus) निश्चीत करता आला नाही की ‘ज्योतिषा ची आचारसंहिता’ (Code of conduct – Ethics) निर्धारित केली नाही. हे एकट्या दुकट्याचे काम नाही, जर इतर ज्योतिषांची  सक्षम साथ मिळाली तर हे ही काम मला करायचे आहे.

एके काळी ज्योतिषाशास्त्राला मान होता , राजाश्रय होता आज ती परिस्थिती राहीली नाही. ज्योतिष विषयक सल्ला ही एक फुकट मिळणारी गोष्ट आहे किंबहुना तो फुकटच मिळाला पाहीजे अशी अवाजवी अपेक्षा अगदी चांगले , सुस्थितीतले, गाड्या-बंगले वाले लोक ठेवतात तेव्हा हसावे का रडावे हेच कळत नाही.  ‘Insurance is subject matter of solicitation’ असे विमा कंपन्यांच्या जाहीरातीत असते तसे ‘Astrology is subject matter of free predictions’ असा एक हास्यास्पद भ्रम लोकांच्या मनात आहे. पैसे मागायला सुरवात केली की दारासमोरची (फुकट्या) जातकांची तुडुंब गर्दी एका क्षणात कशी पांगते याचा विदारक अनुभव मी स्वत: घेतलाय !

एखादी गोष्ट फुकट मिळाली की लोकांना त्याची किंमत राहात नाही आणि  ‘फुकटच तर सांगायचे आहे’ अशी मनोधारणा असल्याने सांगणार्‍याला सुद्धा त्याचे गांभिर्य राहात नाही. हा सगळाच मामला मग ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली’ या पद्धतीचा बनतो. पण या असल्या लुटुपूटीच्या खेळात शास्त्राची नाहक बदनामी होते त्याचे काय?

हे शास्त्र आणि ह्या शास्त्राचे सच्चे अभ्यासक या अशा अनेक कारणांमुळे हेटाळणी आणि कुचेष्टेचे धनी होत आहेत. ‘मागता येईना भिक तर निदान ज्योतिष तरी शिक ‘ असे म्हणण्या इतक्या खालच्या पातळीवर नेले गेले आहे हे पवित्र शास्त्र !

मी जेव्हा ज्योतिषी म्हणून व्यवसाय चालू केला तेव्हा मला सुद्धा या प्रकाराला सामोरे जावे लागले आहे. मी जेव्हा माझी ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख करुन देतो तेव्हा लोकांच्या कपाळ्यावर ज्या आठ्या पड्तात किंवा क्षणात लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो (‘काल परवा तर तू चांगला होतास की, आणि मग अचानक ही कसली दुर्बुद्धी सुचली तुला !’ ) त्यावरुनच हे लक्षात येते की हे शास्त्र आणि ज्योतिषी ही जमात किती बदनाम झाली आहे !

पण गंमत अशी की हे ‘आठ्या पाडू’ लोक मग वेळ आली की निर्लज्जपणे, अगदी रात्री बेरात्री सुद्धा ज्योतिष विचारण्यासाठी माझा दरवाजा ठोठावतात हा  अनुभव मला कैक वेळा आला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या चळवळीतला एक  कार्यकर्ता , असाच ‘माझा अजिबात विश्वास नाही, थोतांड आहे हे सारे, पण काय करणार, माझा वडिलांची इच्छा / आग्रह / आज्ञा मोडता येत नाही ना.. “ असे म्हणत माझ्या कडे ज्योतिष विचारायला येऊन गेला आहे , आणि मी वर्तवलेले भविष्य 100% बरोबर येऊन सुद्धा ते मान्य करण्याचा ‘खिलाडू’ पणा त्याला दाखवता आला नाही, यावरुनच काय ते समजा!

हमको जो ताने देते हैं, हम खोए हैं इन रंगरलियों में
हमने उनको भी छुप छुपके, आते देखा इन गलियों में
ये सच है झूठी बात नहीं, तुम बोलो ये सच है ना
कुछ तो लोग कहेंगे …

(‘अमर प्रेम’ या चित्रपटातले कै. आनंद बक्षी यांचे हे गीत या बाबतीत अगदी समर्पक आहे.)

ज्योतिष शास्त्र , ज्योतिषी तर सोडाच पण ज्योतिषाचा सल्ला घेणार्‍याला सुद्धा अशाच प्रकाराच्या हेटाळ्णीला सामोरे जावे लागत आहे , ज्योतिष विचारणे म्हणजे जणू काही स्वत:चा कमकुवतपणाची कबूली देणेच आहे असे लोकांना वाटू लागले आहे. लोकांना आपल्या समस्यांसाठी डॉक्टर, वकिल , मॅरेज कौंसेलर , करियर गायड्न्स ब्युरो, टॅक्स कंसलटंट  अगदी फर्टिलिटी सेंटर यांच्याकडे जाण्यात , त्याबद्दल चर्चा करण्यात कोणताही कमी पणा वाटत नाही पण ज्योतिषा कडे गेलो होतो किंवा ज्योतिषावर विश्वास आहे हे सांगायला सुद्धा लोक कचरतात असे विषारी वातावरण तयार झाले आहे.

काहीतरी समस्या असेल तर आणि तरच ज्योतिषाकडे जायचे किंवा ‘सुखी माणूस सोनाराकडे आणि दु:खी माणुस ज्योतिषा कडे ‘ असे निव्वळ गैरसमजा पोटी बोलले जाते. ही मोठी चूक होत आहे.  खरे पाहीले तर कोणताच  ज्योतिषी तुमचे दु:ख , दैन्य, समस्या दूर करु शकत नाही. समस्या सुटतात त्या केवळ आपल्या आणि आपल्याच प्रयत्नांतून!

सुचवल्या गेलेल्या कोणत्याच उपायात, तोडग्यात, खड्यात, रत्नात, माळेत, पूजेत , जपात , यंत्रात, तंत्रात, पोथीत समस्या आपोआपच दूर करण्याची कोणतीही ताकद नाही.  काही उपायांचा लाभ होतोय असे वाटलेच तर तो निव्वळ ‘प्लॅसेबो इफेक्ट’ आहे असे खुषाल समजावे. त्यापलीकडे ह्या गोष्टीत काहीही नाही. खरा (आर्थिक) लाभ होतो तो त्या उपाय सुचवणार्‍याला!

ज्योतिषशास्त्राची खरी ताकद किंवा खरा उपयोग सध्याच्या काळातल्या भारतीयांना कळलाच नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. आज आपण काहीही झालेले नसताना केवळ एक दक्षता म्हणून जसा ‘संपूर्ण मेडीकल चेकअ‍प’ करुन घेतो, त्यासाठी दुनियाभराच्या टेस्ट्स करुन घेतो, अगदी तसेच ज्योतिषशास्त्र तुम्हाला एक चेक अप रिपोर्ट देऊ शकते, याची अनेकांना माहीतीच नसते. ‘लग्न कधी होईल’ , ‘नोकरी कधी लागेल’ अशा प्रश्नांची उत्तरें शोधण्यासाठी हे शास्त्र नाहकच राबवले जाते आहे, डास मारायला तोफ वापरली जाते आहे !

हे कोठे तरी बदलायला पाहीजे, माझ्याकडे येणारे फिरंगी जातक या शास्त्राचा ‘Strategic Planning Tool ‘  सारखा अगदी सुयोग्य वापर करुन घेताना पाहून मला कमालीचे कौतुक वाटते,  असा ‘Awareness’ आपल्याकडेही आणण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न  चालू आहेत.

चांगले लोक या क्षेत्रात अगदीच कमी आहेत आणि बाहेरचे चांगले लोक या क्षेत्रात येण्यास उत्सुक नाहीत. जे कोणी येताहेत त्यातले बरेचसे ‘हौशे-गवशे-नवशे’ प्रकारातलेच. काहीतर चक्क एक टाईमपास करायचे साधन हाताशी असावा म्हणून! आज चांगला , व्यावसायिक ज्योतिषी व्हायचे असेल तर किमान सात-आठ वर्षाची कसून मेहेनत आवश्यक आहे, गुरुचे प्रत्यक्ष मार्गदर्शन ही तितकेच आवश्यक आहे, केवळ पुस्तके वाचून शिकण्याचे हे शास्त्र नाही. किमान हजार एक पत्रिकांचा सखोल अभ्यास झालेला असला पाहीजे , त्यानंतरही एखाद्या गुरुच्या हाताखाली वर्ष दोन वर्ष उमेदवारी केलेली असली पाहीजे.  नुसते ज्योतिषशास्त्र नव्हे तर त्या जोडीला मानसशास्त्र, ह्युमन अ‍ॅनॉटॉमी, अस्ट्रोनोमी, व्यवस्थापन शास्त्र, टाइम मॅनेजमेंट, संख्याशास्त्र, लॉजीक, फिलॉसॉफी , योगशास्त्र , पिपल स्कील्स  अशा अनेक पुरक विषयांचा अभ्यासही करावा लागतो ! उत्तम दर्जाचा संगणक, लायसेंसड सॉफ्ट्वेअर, आवश्यक ते ग्रंथ  (हे सारे स्वत: विकत घेतलेले, चोरुन डाऊन लोड केलेले चालणार नाही) या सार्‍यासाठी लाखभराची गुंतवणूक आहे.  आता  हे एव्हढे करायला लागणारा वेळ , पैसा, चिकाटी, मेहेनत घ्यायची तयारी किती जणांकडे असू शकते? कोणाची असल्यास मी मदत करायला तयार आहे.

ज्योतिष हे गणित व तर्कशास्त्र यावर आधारित आहे असा एक फार मोठा गैरसमज अगदी ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांच्यात सुद्धा आहे , अचुक भविष्य वर्तवण्यासाठी ज्योतिषाला ‘इंट्यूईशन’ चे वरदान असणे अत्यावश्यक असते. ऊठसुठ रुलिंग प्लॅनेटस चे कोंबडं कापणार्‍या के.पी. वाल्यांना तर याची सर्वात जास्त जरुरी आहे ! गणिताच्या जोरावर अचूक जन्मपत्रिका बनवण्यापर्यंत मजल मारता येऊ शकेल पण हे ‘इंट्यूईशन’ जर नसेल तर केवळ पोकळ पोपटपंची पेक्षा जास्त काही हाताला लागणार नाही.  ह्या शास्त्रात दैवी मदतीचा फार मोठा वाटा आहे, ही दैवी मदत मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी नित्य नियमाने साधना – आराधना करावी लागते, यम -नियम सांभाळावे लागतात, आचरण शुद्ध ठेवावे लागते, हे जमणे  कर्मकठिण !!

चांगला ज्योतिषी होणे अत्यंत कष्टसाध्य आहे आणि म्हणूनच चांगला ज्योतिषी सापडणे हे देखिल तितकेच दुर्मिळ आहे !!

आज जरी ज्योतिषशास्त्राला अवकळा आल्या सारखी वाटत असली तरी मला तरी हे काही काळजी चे लक्षण वाटत नाही. हे शास्त्र वाहत्या प्रवाहासारखे आहे याचे अजूनही साठलेले डबके झालेले नाही. ‘नेहरुं नंतर कोण?’ हा प्रश्न भारतातल्या राजकारण्यांना कोणे एकेकाळी सतावत होता, नेहरु गेले तरी काही अ‍डले नाही, त्यांचीही जागा भरली गेली. राजकारणाचा आणि देशाचा गाडा ओढला जातो आहेच. अगदी तसेच ज्योतिषशास्त्राला पुन्हा एकदा मानाचे दिवस लाभतील, या शास्त्रात नवनविन संशोधन होईल,  मानवी जीवन  सुखी करण्यासाठी हे शास्त्र प्रभावी पणे वापरले जाईल , आपल्या सार्‍यांच्या जीवनशैलीचा ते एक अविभाज्य घटक बनेल याबाबत माझ्या मनात तरी कोणताही संदेह नाही.

अच्छे दिन जरुर आनेवाले हैं ।

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

5 प्रतिक्रिया

///////////////
 1. abhijit sagvekar

  अभिनंदन
  लेख फार छान ,खूपच आवडला
  ज्योतिष शास्राची खरीखुरी ओळख लवकर आम्हाला करुन द्यावी हि विनंती

  धन्यवाद
  लोभ असावा
  अभिजित सागवेकर

  0
 2. Subhash chandrabhan Ghuge

  Atishay chhan asaa lekh lihila ahe sir apan.mi samparka form bharun dila hota sir don vela pan replay nahi milala mala

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद सुभाषजी, मी आपल्याला आता पर्यंत दोन वेळा उत्तरे पाठवली आहेत , मला वाटते आजच ( 20 जानेवारी, सकाळी) एक लेल पाठ्वली होती, आपल्या जंक मेल बॉक्स तपासून पाहा. किंवा suhas—–dot—-astro—at—gmail—dot—-com या आयडि वर मेल पाठवा .

   शुभेच्छा

   सुहास

   0
 3. swapnil kodolikar

  खूप छान मते मांडली आहेत आपण . खूप छान मते मांडली आहेत आपण .its Fact Sir …!!!

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.