आता तुम्ही म्हणाल या माणसाला सतत खाण्याचेच सुचते कधी जिलेबी , कधी पेढे नाहीतर मावा केक आज बहुदा बदल म्हणून जरा तिखट आयटेम दिसतोय !
नै तस्से अजिबात कै नै ! ही पोष्ट काही ‘खाण्याच्या’ पदार्थावर नाही. मग म्हणाल मग हे ‘हरे भरे ए वन कटलेट ‘ खाण्याचे नाही तर दुसरे काय?
सांगतो सगळे बैजवार…
मधुमेहीं साठी काही तपासण्या (टेस्ट्स) अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्या नेहमी , नियमीत पणे कराव्या लागतात. या तपासण्यां वरून तर कळते की मधुमेह म्हाराज कसे आहेत , त्यांचा रंग काय आहे, नूर काय आहे.
मधुमेह आपल्या शरीरातल्या जवळजवळ सर्वच अवयवांवर घातक परिणाम करत असतो याला ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स मधुमेहाची गुंतागुंत ! ’ म्हणतात. यात डोळे, हृदय, किडनी आणि पाय ह्या अवयवांना क्षती (कै च्या कै शब्द्प्रयोग आहे की नै?) पोहोचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मधुमेही व्यक्तीला ही ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स सुरु झाली आहेत का? असल्यास त्यांचा प्रवास कसा सुरु आहे हे जाणून घ्यावेच लागते आणि त्या प्रत्येका साठी खास अशा टेस्टस असतात. अनेक निष्काळजी मधुमेही या अशा टेस्ट्स करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग एके दिवशी डोळे , हृदय, किडनीज आणि पाय हे अत्यंत महत्वाचे अवयव गमावून बसतात , ह्रदयाच्या बाबतीत दुर्लक्ष झाले तर चक्क जीवावर बेतू शकते!
त्यामुळे ही ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स’ होऊच नयेत असेच प्रयत्न करणे शहाणपणाचे नाही का? मुळात ही ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स’ होतात ती रक्तात वाढलेल्या साखरे मुळे त्यामुळे रक्तातल्या साखरेचे प्रमाण सुरक्षीत पातळीवर सातत्याने ठेवता आले तर ही सर्व ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स’ टाळता येतील किमान त्यांची सुरवात होण्याला विलंब करता येईल किंवा अशी ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स’ ची सुरवात आधीच झाली असेल तर त्यांची प्रगती रोखता येते आणि काही बाबतीत या ‘डायबेटीक कॉम्प्लीकेशन्स’ ना थांबवून त्यांच्या मुळे झालेले नुकसान काही अंशी का होईना भरून काढता येते.
म्हणजे प्रत्येक मधुमेह्याने आपल्या रक्तात किती साखर आहे याची अगदी नियमीत तपासणी करणे अत्यावश्यक असते. मी असे मधुमेही रुग्ण पाहीले आहेत जे सहा सहा महीन्यात रक्तातली साखर तपासत नाहीत ही एक फार मोठी घोडचूक त्या व्यक्ती करत आहेत. खरेतर रक्तातल्या साखरेची तपासणी शक्य झाले तर रोज केली पाहीजे किमान आठवड्यातून काही वेळा केली पाहीजे. पण जवळजवळ 95% मधुमेही रुग्णांना एकतर हे माहीती नसते किंवा ह्या तपासण्या किती आवश्यक आहेत हे कोणी सांगीतले / समजावले नसते किंवा सारे कळून सवरुन देखील चार पैसे वाचवण्याचा खुळचट / आचरट नादात अशा तपसण्या केल्या जात नाहीत !
रक्तातली साखर अशी अगदी नियमीत तपासणे आणि त्या आधारे आपल्या आहार (पथ्य), व्यायाम, औषधे ठरवून , वेळप्रसंगी त्यात आवश्यक ते बदल करून रक्तातळी साखर शक्य तितकी आदर्श पातळी वर ठेवणे हे अत्यंत जरूरीचे आहे.
रक्तातल्या साखरेची तपासणी अगदी सहज, सोपी आणि घरच्या घरी करण्या सारखी असते त्या साठी दरवेळेला पॅथॅलॉजी लॅब मध्ये जाऊन रक्त देण्याची आवश्यकता नसते. आज रक्तातली साखर तपासायचे यंत्र ज्याला ‘ग्लुको मीटर’ म्हणतात ते अवघ्या रु 250 ला बाजारात उपलब्ध आहे! आणि एक चाचणी करायचा खर्च अवघा रु 12 आहे ! ( तुलनेत पॅथॅलॉजी लॅब मध्ये एका रक्त शर्करा चाचणीचा खर्च सुमारे रु 50 आहे !)
अर्थात पॅथॅलॉजी लॅब मध्ये केलेली रक्त शर्करा चाचणी अधिक अचूक आणि विश्वासार्ह्य असली तरी घरच्या घरी ग्लुकोमीटर वर केलेली चाचणी अगदीच चुकीची असते असे ही नव्हे. घरी केलेल्या टेस्ट चे आकडे थोडे फार कमी – जास्त नक्कीच असतात पण किमान आपल्याला सध्या आपल्या रक्तात साखरेची पातळी किती आहे याचा खूपच चांगला अंदाज ( रेंज) यातून नक्कीच मिळू शकतो आणि बर्याच वेळा असा अंदाज ही आपल्याला पुरेसा असतो. अधूनमधून (तीन एक महीन्यातून एकदा) आपण पॅथॅलॉजी लॅब मध्ये रक्त शर्करा चाचणी करून खातरजमा करून घ्यायची म्हणजे झाले.
आपल्या रक्तात साखर किती आहे हे आपण तपासतो पण त्यात ही काही प्रकार आहेत. रक्तातली साखर अनेक वेळा तपासावी लागते कारण ती सतत बदलत असते अगदी मिनिटा मिनिटाला बदलत असते ! त्यासाठी सध्या बाजारात ‘कंटीन्युअस ग्लुकोज मॉनिटरींग CGM’ उपकरण उपलब्ध आहे , ते आपल्या शरीराला जोडले जाते आणि मग हे उपकरण आपल्या रक्तातली साखर दर पंधरा मिनीटाला एक सँपल या पद्धतीने मोजत राहते . अर्थात हे उपकरण महागडे आहे (पण हे उपकरण काही काळासाठी भाड्याने मिळण्याची सोय ही उपलब्ध आहे! आहे ना सोय !) त्यामुळे काही खास केसेस मध्ये (ज्यांची रक्तातली साखर सतत फार मोठी वर खाली होते असते , ज्यांचा मधुमेह गुंतागुंतीचा आहे, मधुमेहाची कॉम्प्लीकेशन्स सुरु झालेली आहेत इ) , इतर सर्व मधुमेही व्यक्तींना इतक्या तपासण्या करायलाच पाहीजेत असे नाही पण केलेल्या चांगल्या हे वेगळे सांगायला नको, जितक्या वेळा रक्त शर्करा तपासली जाईल तितका तुमचा मधुमेह तुम्हाला चांगला समजेल आणि त्यावरची उपाययोजना देखील अधिक चांगली आणि परिणाकारक होऊ शकते.
सामान्यत: रक्त शर्करा खालील वेळी / परिस्थितीत तपासली जाणे चांगले असते:
१) सकाळी उठल्या बरोबर , अनशी पोटी. किमान आठ तास तरी काहीही न खाता –पिता (पण बारा तास उपाशी राहून केलेली तपासणी उत्तम) याला ‘फास्टींग ब्ल्ड शुगर’ असे म्हणतात.
२) जेवणा नंतर दोन तासांनी (पहीला घास घेतल्यानंतर दोन तास) केलेली रक्त शर्करा तपासणी Post Prandial Blood Sugar
पण या जोडीला आणखीही काही वेळा रक्त तपासणी केलेली चांगली त्यामुळे तुम्हाला तुमचा मधुमेह कसा आहे ते अधिक चांगले लक्षात येईल.
३) व्यायामाला सुरवात करण्या साठी
४) व्यायाम झाल्या झाल्या लगेचच
५) व्यायाम थांबवल्या नंतर एक तासाने
६) व्यायाम तासाभरापेक्षा जास्त वेळ चालत असेल तर व्यायाम सुरु केल्या नंतर अर्ध्या तासाने
७) सकाळचा नाष्टा घेत असाल तर नाष्टा घेण्या पुर्वी
८) नाष्टा घेतल्या नंतर दोन तासांनी
९) जेवण (सकाळचे / रात्रीचे) सुरु करण्या पुर्वी
१०) जेवण (सकाळचे / रात्रीचे) सुरु केल्या नंतर म्हणजे पहीला घास घेतल्या नंतर बरोबर एक तासाने
११) जेवण (सकाळचे / रात्रीचे) सुरु केल्या नंतर म्हणजे पहीला घास घेतल्या नंतर बरोबर तीन तासांनी
१२) रात्री झोपण्या आधी (रात्रीचे जेवण आणि झोपी जाणे यात चार तासां पेक्षा जास्त अंतर असेल तर)
१३) रात्री किंवा पहाटे म्हणजे चक्क 3 AM वाजता !
बापरे! रोज इतक्या वेळा रक्त तपासायचे ? अगदी असेच केले पाहीजे असे नाही पण यांचे एक वेळापत्रक करुन आलटून पालटून या टेस्ट करत राहणे हितावह ठरेल. म्हणजे बघा , फास्टींग ब्लड शुगर अगदी रोजच तपासली पाहजे असे नाही , आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशी चाचणी करणे पुरेसे आहे.
तुमच्या व्यायामाची वेळ आणि व्यायामाचा प्रकार यात फारसा बदल होत नसेल तर रोज व्यायामाच्या आधी आणि नंतर रक्त शर्करा चाचणी केलीच पाहीजे असे नाही अधून मधून केव्हातरी किंवा व्यायामाची वेळ , व्यायामाचा प्रकार , व्यायामाची तीव्रता (इंटेन्सीटी) यात मोठे बदल करणार असाल तर त्यावेळी एकदा अशा तपासण्या करणे चांगले. तसेच रात्रीची 3 वाजताची टेस्ट काही खास केसेस (ज्यांची फास्टींग शुगर सातत्याने 150 च्या वर असते) मध्येच करावी , रोज रात्री घड्याळात गजर लावून तीन वाजता उठून रक्त तपासणी करत बसायचे नाही. या खास तपासणी बद्दल मी नंतर सविस्तर लेख लिहणार आहे (च),
थोडक्यात ज्याला आपला मधुमेह म्हणजेच रक्तातली साखर चांगली नियंत्रणात ठेवायची आहे त्यांनी आठवड्यातून
१) फास्टींग शुगर किमान दोन दिवशी
२) जेवणा नंतर दोन तासांची शुगर किमान दोन दिवशी
अशा एकंदर चार टेस्ट्स प्रत्येक आठवड्यात केल्याच पाहीजेत , याहून जास्त वेळा टेस्ट केल्या तर चांगलेच !
असो .
……………
“अण्णा”
“काय रं सद्या?”
“नाय म्हणजे हे सगळे चांगलेच सांगताय तुम्ही पर त्ये ‘हरा भरा कबाब’ का काय त्या बद्दल काहीच बोल्ला नै “
“सद्या लेका हिथे मी यकदम शिरेस टापीक वर बोल्तोय आणि तुला खाण्याचे आठवतयं , ओँ “
“नाय , तस नाय अण्णा, पर स्टार्टींग ला तुम्हीच म्हणाला होता ना ‘हरा भरा कबाब’ म्हणून विचारले , चुकी झाली माझी”
“असे नाय रे नाय सद्या , त्या ‘हरा भरा कबाब’ बद्दल सांगणार आहेच पण फुढच्या भागात कसे? “
“आण्णा तुमचे हे न्ह्येमीचेच आहे, लोक्स ना असेच टांगून ठेवायचे आन..”
“आता त्याला काय करणार , माझी स्टाईल हाये ती त्याला विलाज नाय, त्ये जौदे , पुडी काढ पयला , हिकडे बोलून बोलून तोंड दुखायला लागले माझे , लेका”
“अण्णा…”
……………
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
धन्यवाद सुहासजी
धन्यवाद श्री संदिपजी
सुहास गोखले