अगदी खरे सांगतो, मी जेव्हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालू केला होता तेव्हा अगदी ‘मंदार’ इतका बावळट नसलो तरी माझी अवस्था काहीशी या ‘मंदार’ सारखीच होती म्हणा ना !
आणि आज अनेक वर्षांच्या परिश्रमां नंतर आणि तो ‘तजुर्बा’ का काय म्हणतात तो काहीसा आल्यानंतर जेव्हा असा एकादा ‘मंदार’ भेटतो तेव्हा काही वेळा मी ही गंमतीने या आमच्या प्रकाश भाऊं च्या रोल मध्ये येतो बर्का ! अर्थात ती केवळ सौम्य थट्टा असते, नंतर मात्र माझ्या सारखा उत्तम शिक्षक या अशा ‘मंदार’ ला हुड्कून सुद्धा सापडणार नाही हा भाग वेगळा!
एकाद्याची पत्रिका बघता क्षणीच मी काही झटपट आडाखे बांधू शकतो (तजुर्बा!), पण मंदारला हे जमत नाही, व. दा. भटांची अथवा सुरेश शहासनेंची आख्खी ग्रंथसंपदा पालथी घातली तरी मला जे समजले नाही ते या गोखले गुर्जींना एका क्षणात कसे समजले? ‘चतुर्थातला मंगळ’ मी सहज बोलून जातो, झालं हे मंदार साहेब लगेच निघाले या मंगळाचा वास घ्यायला! पण होते काय, दुसर्या एखाद्या पत्रिकेत ‘चतुर्थात ‘मंगळ’ असून देखील त्या व्यक्तीला मात्र वेगळीक फळें का मिळाली? मंदार ला प्रश्न पडतो !
मी जेव्हा चतुर्थातला मंगळ ,पंचमातला राहु ,धनातला शनी, सिंहेतला गुरु बघून काही विधाने करतो तेव्हा ती केवळ या ग्रहांच्या विवक्षित स्थितिवरुन केलेली नसतात, मी त्याच वेळी तो ग्रह कोणत्या राशीत आहे, अंशात आहे, कोणत्या नक्षत्रात आहे,त्याची अवस्था काय आहे, म्युच्यल एक्क्स्जेंज आहे का , त्या ग्रहाचे इतर ग्रहांशी कोणते योग होत आहेत , या ग्रहाचा भावेश कोण आहे, तो भावेश कोणत्या परिस्थितीत आहे इ. सार्या सार्यांचा बारकाईने विचार केलेला असतो, माझा हा रोजचा व्यवसाय असल्याने म्हणून किंवा गेल्या काही वर्षात हजारोंनी पत्रिका डोळ्या घालून गेल्या मुळे ही असेल, अशी निरिक्षणें मी विजेच्या गतीने करु शकतो, पण समोरच्या ‘मंदार’ ला वाटते मी फक्त एका ग्रहाचे पत्रिकेतले स्थान बघून फटकन अभिप्राय दिला, हम तो सिर्फ सुंघ के बताते है ! ज्योतिष एव्हढं सोपे नाही, म्हाराजा!
पारंपरिक ज्योतिषाला फाट्यावर मारणारे ‘के.पी.’ वाले तर अगदी हुकमी ‘मंदार’ मटेरियल ! पुरेपुर मंदार !! सप्तमाचा ‘सब’ विवाहाची सर्वच म्हणजे 2,7,11 ही स्थाने देत असताना , योग्य त्या दशा येऊन गेल्या असताना सुद्धा व्यक्ती चाळीशीतही अविवाहीत कशी , पंचमाचा ‘सब’ 2,5,11 देता असताना, योग्य त्या दशा येऊन गेल्या असताना सुद्धा व्यक्ती नि:संतान का? हे खास ‘मंदार’ स्टाईल प्रश्न मला आठवड्यात एकदा तरी विचारले जातातच ! आता काय सांगायचे या ‘मंदार’ लोकांना? अलीकडच्या काळातला (भाजपा चा) दाखला देत “कोठे नेऊन ठेवलेत पत्रिकेतल्या ग्रहयोगांना’ असे ह्या के.पी. मंदारांना विचारावेसे वाटते.
के.पी. वरची उपलब्ध ग्रंथ संपदा बघता किंवा के.पी, ज्योतिषवर्गातले अर्धेकच्चे शिक्षक आणि तिथे दिले जात असलेले तितकेच अर्धेकच्चे शिक्षण बघता, अशी अर्धवट माहीती देऊन (अर्धी हळकुंडे वाटून !) पुढच्या पिढीत असे ‘मंदार’ मोठ्या संख्येने तयार होत राहतील याची पुरेपुर काळजी घेतली जात आहे असे खेदाने म्हणावे लागेल.
पारंपरीक मध्ये ही काही कमी मंदार नाहीत ! नुसत्या ‘गोचर भ्रमणा’ वरुन कालनिर्णय करता येत नाही , विशोत्तरी दशांच्या पलीकडे ही जाऊन काही तरी आहे हे ह्या ‘मंदार’ लोकांच्या पचनी पडणे अवघडच ! आपल्या पारंपरिक पद्धतीचीच ‘निरयन’ कुंडली मांडून, आपलेच अयनांश वापरुन, आपलेच पारंपरिक अष्टकवर्ग वापरुन आणि कहर म्हणजे आपल्याच विशोत्तरी दशा वापरुन, भविष्य चुकले तर पैसे दामदुपटीने परत करण्याची लेखी हमी देणारा एक फिरंगी ज्योतिषी या भूतलावर कालपरवापर्यंत हयात होता, आहात कुठे? पण तो ज्योतिषी आपल्याच चंद्राचा भ्रमणकालावधीवर आधारित प्रोग्रेशन्स वापरुन हे सर्व करु शकत होता हे किती जणांना माहीती आहे, आता विशोत्तरी,अष्टोत्तरी, गुरु सातवा आणि शनी बारावा असा ‘वास’ घेत बसलेल्या या मंदार ला जागे कोण करणार?
आणि या के.पी. वाल्यांना जरा आवरा रे.. त्यांची ती के.पी.ची खिचडी पकायला ‘इंटिश्यून’ ची जबरद्स्त देणगी लागते, हे सांगा रे कुणीतरी त्यांना. माझे एक मित्र आहेत , ज्योतिषाचा अभ्यास करतात, हे पुस्तक चांगले आहे का, कोणते सॉफ्ट्वेअर असे मला काही बाही विचारत असतात, काही सुचवले की लगेच ‘गुगल’ करुन त्या पुस्तकाची / सॉफ्ट्वेअर ची पायरेटेड व्हर्जन मिळते याची शोधाशोध चालू, बरे ही व्यक्ती ही अशी की स्वत:चे दोन बेडरुम्सचे दोन दोन फ्लॅट्स, दारात मारुती, स्वत:ला चांगली नोकरी, मुलगा चांगला कमावतोय , पण 300 रुपयाचे पुस्तक विकत घ्यायला परवडू नये? कहर म्हणजे ह्याच व्यक्तीने मी वापरत असलेल्या रु 25,000 रुपयाच्या लायसेंस्ड सॉफ्ट्वेअर ची कॉपी करुन देणार का अशी निर्लज्ज विचारणा केली होती, अशा चोरट्यांना, निर्लज्ज भिकार्यांना कसे काय ‘इंटिश्यून’ लाभेल ? रुलींग प्लॅनेट्स ही दैवी मदत आहे ती अशीच दावणीला बांधलेली गाय थोडीच आहे की कोणीही एर्यागैर्याने यावे आणि दूध पिळुन घ्यावे ? ‘रुलिंग प्लॅनेट्स’ ची मदत हवी असेल तर आचरण शुद्ध आणि पवित्र नको? हे कृष्णमुर्ती सांगायचे विसरले बहुदा, शहासने, हसब्यांनी पण सोयिस्कर मौन पाळलेले दिसते. त्यांनी तर असा आव आणला आहे (किंवा आजच्या भाषेत बोलायचे झाले तर हवा केली आहे) ‘मनात आले ,घे रुलिंग प्लॅनेट; सोडव प्रश्न ‘ ‘यक्षिणीची कांडी’ म्हणे ! सोप्पे आहे नै का! “हिरा है सभी के लिये” अशी एक जाहीरात टि.व्ही. वर नेहमी दिसते ती जितकी खोटी तितकीच ही ‘रुलिंग प्लॅनेट’ ची मदत खोटी , ती सगळ्यांनाच लाभत नाही , आणि म्हणूनच आजचे हे ‘रुलींग प्लॅनेट’ वाले मंदारभाऊ पावला पावला ठेचकाळताहेत, तोंडघशी पडताहेत !
सब लॉर्ड किंवा गोचर भ्रमणाचा वास घेत बसलेल्या मंदारच्या हे लक्षातच येत नाही वरतुन ‘नवमांशा’ चे किंवा ‘सब सब लॉर्ड’ चे किंवा ‘कस्पल इंटरलिंक’’ चे सरसुचे तेल थापण्याचा सल्ला आहेच!
किती लिहू ? अजुनही बरीच काही उदाहरणे आहेत , सुरस किस्से आहेत ,पुरी पिक्चर अभी बाकी है… पण भाग 3 मध्ये , म्होरल्या टायमाला …
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
गोखले साहेब, आपल्या व्यवसायात अनेक प्रकारच्या व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे असे अनेक किस्से आपल्या गाठी असणार ..खूपच रोचक आणि मनुष्य स्वभावावर प्रकाश टाकणारे आहेत .. एखाद्या गोष्टीचा निर्णय करताना कितीएक गोष्टींचा विचार करायला लागतो हे नुसता अभ्यास नाही तर अनेक वर्षांच्या तपश्चार्येन आणि डोळस अनुभवानीच जमत हे नक्की. सर्व काही व्यवस्थित असूनही फुकट गोष्टींची अपेक्षा करणारे किंवा पुस्तकांवर अगदी दोन पाचशे खर्च करण्यास नाखूष असणारे अनेक महाभाग पहिले आहेत ..त्यामुळे हा आपला अनुभव फारच भावला.. असेच लिहित रहा…