श्री. उदयजी, नाशकातल्या एका बड्या उद्योगातले वरिष्ठ अधिकारी. व्ही.आर.एस. चे वारे आता त्यांच्या कंपनीतही वाहू लागले होते. पहिल्या एक दोन फेर्‍यात बर्‍याच कामगार वर्गाची ‘हकालपट्टी’ झाली आणि आता मिडल मॅनेजमेंट मधल्या लोकांवर ही त्सुनामी येऊन आदळली होती!

उदयजी उत्साही होते, हुषार होते, आपल्या कामात चलाख होते,सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे होते , ते स्वत:ला खास मॅनेजमेंट्च्या आतल्या गोटातले समजतही होते. “मी सेफ आहे, मला कोण हात लावतेय!” असे म्हणणार्‍या उदयजींच्या दारावर पण एक दिवशी ‘गोल्डन हॅंडशेक’ ची थाप पडली आणि उदयजींचे अनेक भाबडे गैरसमज दूर झाले! ज्या कंपनीची गेली पंधरा वर्षे इमाने ईतबारे सेवा केली त्या कंपनीला आता आपली जरुरी राहीली नाही, आपण नकोसे झालो आहे, अडगळ झालो आहे, हे विदारक सत्य पचवणे उदयजींना भलतेच जड गेले.अरे, हे कसे काय शक्य आहे हा प्रश्न उदयजींनी स्वत:लाच हजार एक वेळा तरी विचारला असेल .

तसे पाहीले तर उदयजींची अजून दहा वर्षे तरी नोकरीची आहेत , त्या दहा वर्षातल्या संभाव्य उत्पन्नाची भरपाई हे व्ही.आर.एस. चे पॅकेज थोडीच करणार होते?  व्ही.आर.एस घेऊन तरी पुढे काय? उदयजींचे वय ही असे आडनिडे की या वयात दुसरी नोकरी ती ही नाशकातच आणि त्याच तोलामोलाची मिळणे जवळजवळ अशक्य होते.  मोठ्या मुलीच्या लग्नाचे बघायचे होते, धाकट्या मुलाचे शिक्षण अजून चालू आहे, घराचे हप्ते अजून काही वर्षे भरायचे आहेत, या सर्वांचा विचार करता गेला बाजार पुढची किमान पाच-सात वर्षे तरी नोकरी टिकणे / नोकरी करणे उदयजीं साठी अत्यावश्यक होते.

व्ही.आर.एस. ची तशी उघडउघड सक्ती नव्हती पण एक गर्भित धमकी जरुर होती ती म्हणजे ‘तुम्ही आम्हाला नकोसे झाले आहात तेव्हा आत्ता गोडीगुलाबीत जे काही व्ही.आर.एस. चे पॅकेज मिळतेय ते घ्या आणि बाहेर पडा , उशीर केलात नोकरीही नाही आणि पॅकेजही नाही अशी अवस्था होईल , बघा बुवा!’

त्यातही दबाव तंत्राचा एक भाग म्हणून व्ही.आर.एस. ची ऑफर स्विकारायची की नाही याचा निर्णय घ्यायला अगदी अपुरा वेळ दिला गेला होता. उदयजींना काय करावे ते सुचत नव्हते. अशा भांबावलेल्या अवस्थेत असताना नेमके ज्योतिषशास्त्र उपयोगी पडते. आगामी काळातले ग्रहमान तपासून काय होऊ शकते याचा अंदाज मिळतो, त्यानुसार साधकबाधक निर्णय घेणे काहीसे सोपे जाते. प्रयत्न कोणते व कोणत्या दिशेने करावयास लागतील याचा चांगला अंदाज मिळतो.

उदयजी त्याच साठी माझ्याकडे आले होते. पण उदयजींची जन्मवेळ अचूक नव्हती, दुपारी दोन ते तीन या वेळात केव्हातरी जन्म झाला असावा असा त्यांचा अंदाज (?) होता. त्यामुळे मी जन्मकुंडलीच्या फंदात न पडता प्रश्नकुंडली द्वारे उत्तरे शोधण्याचे ठरवले. एरवीही या अशा प्रकारच्या प्रश्नांना जन्मकुंडली पेक्षा प्रश्न कुंडलीवरुनच जास्त चांगले मार्गदर्शन करता येते असा माझा अनुभव आहे.

उदयजींनी दिलेल्या ‘145’ या क्रमांका नुसार तयार केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे.

प्रश्नकुंडलीचा तपशील:

दिनांक: 07 सप्टेंबर 2014, रवीवार: वेळ: 15:43:52 स्थळ: देवळाली कॅंप, नाशीक होरारी क्रमांक : 145

अयनांश: न्यू के.पी. 23:58:19 सॉफ्टवेअर: के.पी. स्टार वन

प्रश्न: व्ही.आर.एस. घ्यावी का?

कितीही मुलामा चढवला तरी व्ही.आर.एस. म्हणजे एक प्रकारची सक्तीची सेवानिवृत्तीच. नेहमीच्या सेवानिवृत्ती किंवा नोकरी सुटणे/ सोडणे आणि व्ही.आर.एस. यात एक लहानसा फरक आहे तो म्हणजे व्ही.आर.एस. योजनेत नुकसान भरपाई म्हणून जादाची काही रोख रक्कम हातात पडते (ही नेहमीच्या प्रॉविडंट फंड, ग्रॅच्युईटी पेक्षा वेगळी असते) . व्ही.आर.एस. घेणे म्हणजेच नोकरी जाणे + थोडासा आर्थिक लाभ.ह्या अंगाने प्रश्नाचा विचार करायचा असल्यास प्रश्नकुंडलीतली खालील स्थाने पाहावी लागतील:

नोकरीच्या विरोधातली स्थानें:  1, 3, 5, 9
नोकरी / व्यवसाया संदर्भातले प्रमुख स्थान : 10
आर्थिक लाभाची स्थाने (ही स्थाने व्ही.आर.एस. आहे या साठी): 2,6,11
शिक्षा , मन:स्ताप , गुप्त शत्रु, कामावरुन काढून टाकणे (बडतर्फी):  8, 12

यात दशम भाव (10) हा मुख्य (Principle) भाव मानायचा.

प्रश्न कुंडली आहे आणि जातक समोरच बसला आहे, प्रश्न विचारता क्षणाची कुंडली मांडली आहे , तेव्हा हा चंद्र काय म्हणतो ते प्रथम पाहूयात.

(ग्रह अनेक भावांचा कार्येश होऊ शकतो, त्या कार्येशत्वात अ ( प्रथम दर्जा ) ते फ (कनिष्ठ दर्जा) असे प्रकार असू शकतात . म्हणून ग्रहाचे कार्येशत्त्व ‘अ‍ / ब / क / ड’ अशा पद्धतीने लिहले आहे, त्यामुळे एखादा ग्रह कोणत्या भावांचा कार्येश होतो आहे आणि त्याचा दर्जा काय हे चटकन लक्षात येते. अर्थात ‘अ’ दर्जाचे कार्येशत्व सर्वोत्तम हे वेगळे सांगावयास नको)

चंद्र: त्रितीयेत (3), चंदाची कर्क राशी लुप्त आहे , चंद्र मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ लग्नस्थानी (1), धनेश (2) , षष्ठेश (6) आणि सप्तमेश (7) म्हणजे चंद्राचे एकंदर कार्येशत्व असे असेल .

चंद्र: 1 / 3 / 2 , 6 , 7  / —

जातकाने जर प्रश्न खर्‍या तळमळीने विचारला असेल तर चंद्र जातकाच्या मनातले विचार कसे नेमकेपणाने दाखवतो ते पाहा.

लग्न (1) व त्रितीय (3) स्थाने नोकरीच्या विरोधातली तर नोकरी / आर्थिक लाभाची द्वितीय (2) व षष्ठ (6).

उदयजींच्या मनात सध्या कोणते प्रबळ विचार चालू आहेत याचा दाखलाच या चंद्राने दिला आहे. खरोखर चंद्राला मनाचा आरसा म्हणतात ते अगदी पटते. चंद्र जातकाचे मन व प्रश्नाचा रोख अगदी तंतोतंत दाखवत असल्याने ही प्रश्नकुंडली रॅडिकल आहे , प्रश्नाच्या उत्तरा पर्यंत जाण्यास ती निश्चीत मदत करेल यात शंकाच नाही.

आता पुढचा टप्पा.

या प्रश्नकुंडलीत दशमाचा (10) सब लॉर्ड आहे शुक्र. शुक्र स्वत: वक्री नाही आणि शुक्र केतुच्या नक्षत्रात असल्याने ‘प्रश्नाच्या संदर्भातल्या प्रमुख भावाच सबलॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा’ हा नियम पाळला जातो आहे.

शुक्र दशमात (10) आहे, शुक्र व्ययेश (12) , लग्नेश (1) आणि अष्टमेश (8) आहे. शुक्र केतु च्या नक्षत्रात आहे, केतु पंचमात (5) आहे.

शुक्र: 5 / 10 / – / 1 , 8 ,12.

शुक्र रवीच्या युतीत आहे म्हणजे रवीचे कार्येशत्व पण शुक्राला मिळणार आहे रवी दशमात (10) , दशमेश (10), रवी शुक्राच्या नक्षत्रात , शुक्र दशमात (10), शुक्र व्ययेश (12) , लग्नेश (1) आणि अष्टमेश (8) , म्हणजे

रवि: 10 / 10 / 1, 8, 12 / 10

दशमाचा सब शुक्र अशा प्रकारे 5, 1,8,12 च्या माध्यमातून सरळ सरळ पणे सांगतो आहे की उदयजींची नोकरी जाणार. त्यातही व्ही.आर. एस. पेक्षा  8,12 (शिक्षा) च्या उपस्थिती मुळे त्यांना सक्तीने राजीनामा देणे भाग पाडले जाईल अशी शक्यताच जास्त वाटते.

आता दशा –अंतर्दशा- विदशा तपाऊन ठरवूया की ह्या ‘व्ही.आर.एस.’ च्या त्सुनामीत उदयजी बचावतात का नाही.

 

प्रश्न विचारते वेळी मंगळाची महादशा चालू आहे, ती 7 जुलै 2019 पर्यंत आहे, जवळपास पाच वर्षाचा बराच मोठा कालावधी आहे हा. ही व्ही.आर.एस. ची प्रकरणे ज्या सफाईने व झटपट हाताळली जातात ते पाहता आपण फार मोठ्या कालखंडाचा विचार करायचा नाही, साधारण तीन ते सहा महिने एव्हढीच टाइम फ्रेम डोळ्यासमोर ठेऊन आपण दशा – अंतर्दशा- विदशा पाहूयात.महादशा स्वामी मंगळाचे कार्येशत्व असे आहे: मंगळ लग्नात (1) , धनेश (2) व षष्ठेश (6) व सप्तमेश (7), मंगळ गुरु च्या नक्षत्रात , गुरु भाग्यात (9) , त्रितीयेश (3) व पंचमेश (5).

मंगळ : 9 / 1 / 3, 5 / 2, 6, 7

मंगळ नोकरीच्या विरोधातल्या सर्वच म्हणजे 1,3,5,9 या स्थानांचा कार्येश होत आहे, मंगळ धन (2) व षष्ठम (6) या दोन नोकरी व आर्थिक लाभाच्या स्थानांचा पण कार्येश होतो आहे.

मंगळाचा सब राहु आहे. राहु लाभात (11), राहु मंगळाच्या नक्षत्रात आहे, मंगळ लग्नात (1) , धनेश (2) व षष्ठेश (6) व सप्तमेश (7), राहुच्या नक्षत्रात ग्रह नाहीत म्हणजे राहु ज्या ज्या भावांचा ‘सब लॉर्ड’ आहे त्या सर्व भावांचा तो प्रथम दर्जाचा कार्येश होणार. राहु त्रितीय (3), सप्तम  (7) या भावांचा सबलॉर्ड आहे म्हणजे या सर्व भावांचे अतिरिक्त कार्येशत्व (तेही प्रथम दर्जाचे) राहुला लाभले आहे.

राहु: 1, 3, 7 / 11 / – / 2 , 6 , 7

या शिवाय राहु बुधाच्या युतीत आणि बुधाच्या राशीत आहे म्हणजे राहु बुधाचे प्रतिनिधित्व करणार, बुध लाभात (11), लाभेश (11) आणि भाग्येश (9) , बुध चंद्राच्या नक्षत्रात आहे, चंद्र त्रितीयेत (3) .

बुध: 3 / 11 / — / 11, 9

बुधाच्या ह्या भावांचे कार्येशत्व ही राहुला मिळणार. एकंदर पाहता ‘नोकरी जाणे + धनलाभ’ या दृष्टिकोनातून राहु व्ही.आर.एस. ला अनुकूल आहे. हे सर्व धडधडित नोकरी जाण्याचेच संकेत आहेत, व्ही.आर.एस. किंवा अन्य मार्गाने !

2 , 6 ,11 ची उपस्थिती काही आर्थिक लाभही सुचवत आहे. कदाचित सध्याची नोकरी जाईल पण नंतर दुसरी मिळेल (2, 6, 10, 11) असेही असेल. तसे पाहीले तर मंगळाची महादशा अजून पाच वर्षे असणार आहे. पहीली नोकरी जाऊन , दुसरी मिळणे असेही योग असू शकतील. पण आपल्या पुढ्यातला प्रश्न ” सध्याच्या नोकरीचे काय होणार ? ” हा आहे तेव्हा आपण त्यावरच लक्ष केंद्रित करुयात. आधी घटस्फोट होतो का ते पाहू मग दुसरे लग्न कधी ते पाहायचे ना?

मंगळ महादशेचा कालावधी मोठा आहे तेव्हा नेमका कालावधी (येत्या तीन ते सहा महिन्यांतला) पाहण्यासाठी आपल्याला अंतर्दशा – विदशा तपासणे भाग आहे.

प्रश्न विचारते वेळी गुरुची अंतर्दशा चालू आहे ती 27 नोव्हेंबर 2014 पर्यंत असेल त्यानंतर शनीची अंतर्दशा सुरु होईल ती 5 जानेवारी 2016 पर्यंत चालेल. आपण फक्त काही महिन्यांच्या कालावधीचाच विचार करणार आहोत त्यामुळे ह्याच्या पुढच्या अंतर्दशा पाहायची गरज नाही.

पहिली अंतर्दशा गुरुची. गुरु भाग्यात (9) , त्रितीयेश (3) व पंचमेश (5), गुरु बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध लाभात (11), लाभेश (11) आणि भाग्येश (9). म्हणजे

गुरु: 11 / 9 / 11, 9 / 3, 5

गुरु चा सब आहे बुध , बुधाचे कार्येशत्व आपण आधी पाहीलेच आहे 3/ 11 / – / 11, 9. म्हणजे गुरु अंतर्दशेत व्ही.आर.एस. होऊ शकते. पण आपल्या नेहमीच्या प्रथे प्रमाणे पुढची शनीची अंतर्दशा काय म्हणते आहे ते ही एकदा पाहून घेऊयात म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही.

शनी व्ययात (12) , शनीची मकर रास लुप्त आहे , कुंभ रास चतुर्थ भावावर आहे (4), शनी गुरुच्या नक्षत्रात , गुरु भाग्यात (9) , त्रितीयेश (3) व पंचमेश (5), म्हणजे

शनी: 9 / 12 / 3, 5 / 4.

शनीच्या नक्षत्रात ग्रह नाहीत म्हणजे शनी ज्या ज्या भावांचा ‘सब लॉर्ड’ आहे त्या सर्व भावांचा शनी प्रथम दर्जाचा कार्येश होणार. शनी धन (2), पंचम (5), अष्टम (8) आणि लाभ (11) या भावांचा सबलॉर्ड आहे म्हणजे या सर्व भावांचे अतिरिक्त कार्येशत्व (तेही प्रथम दर्जाचे) शनीला लाभले आहे.

शनी: 2, 5, 8, 9 / 12 / 3, 5 / 4

शनीचा सब आहे आहे बुध , बुधाचे कार्येशत्व आपण आधी पाहीलेच आहे 3/ 11 /- /11, 9.

गुरु आणि शनी दोन्ही अंतर्दशा नोकरी घालवणार्‍या आहेत , त्यामुळे हे निश्चित आहे की मंगळ दशा – गुरु अंतर्दशा किंवा मंगळ दशा – शनी अंतर्दशा या काळात उदयजींची नोकरी संपुष्टात येणार.

आता या पैकी कोण?

पण जरा बारकाईने विचार करता हे लक्षात येते की जरी गुरु आणि शनी दोघेही नोकरी घालवणार असले तरी त्यात फरक आहे . शनी कडे 5, 8,12 चे  कार्येशत्व आहे जे गुरु कडे नाही. 5, 8, 12 ही शिक्षेची , मन:स्तापाची स्थाने,  म्हणजे जर शनीच्या अंतर्दशेत नोकरी समाप्त झाली तर ती शिक्षेच्या / बडतर्फी च्या रुपात आणि जर ती गुरुच्या अंतर्दशेत झाली तर ती गोडि गुलाबीत, व्ही.आर.एस च्या रुपात.

आता जरा ट्रांसीट तपासू. आपली साखळी मंगळ – गुरु किंवा मंगळ – शनी अशी असू शकेल. म्हणजे:

मंगळाची रास – गुरु चे नक्षत्र
मंगळाचे नक्षत्र – गुरु ची रास
मंगळाची रास – शनी चे नक्षत्र
मंगळाचे नक्षत्र – शनी ची रास

या चार पैकी कोणते कॉम्बिनेशन आपल्याला अपेक्षित असलेल्या कालवधीत मिळते ते पहायचे. आपला अपेक्षित कालावधी एक वर्षाच्या आतला असल्याने रवी चे गोचर भ्रमण तपासायचे. प्रश्न विचारला होता 7 सप्टेंबर 2014 रोजी. या वेळी रवी रवीच्या सिंहेत आहे, रवी आपल्या साखळीत नाही. रवी 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या काळात बुधाच्या कन्येत असेल , बुध आपल्या साखळीत नाही. रवी 18 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या काळात शुक्राच्या तुळेत असेल , शुक्र आपल्या साखळीत नाही.

रवी 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या काळात मंगळाच्या वृश्चिकेत असेल , वृश्चिकेत गुरु आणि शनी दोघांचीही नक्षत्रें आहेत.म्हणजे घटना घडली तर ती:

17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर (मंगळाची रास – गुरु चे नक्षत्र)
20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर (मंगळाची रास – शनी चे नक्षत्र)

याच काळात.

याच काळात येणार्‍या दशा – अंतर्दशा – विदशा पाहील्यात तर हे लक्षात येईल की:

17 नोव्हेंबर 2014 ते 27 नोव्हेंबर 2014 या काळात मंगळ – गुरु – राहु अशी साख़ळी आहे.
28 नोव्हेंबर 2014 ते 3 डिसेंबर 2014 या काळात मंगळ – शनी – शनी अशी साखळी तयार होते आहे.

या पैकी ‘मंगळ – गुरु – राहु’ ही साखळी व त्याला जुळणारे ट्रांसिट फक्त 17 ते 19 नोव्हेंबर या काळात उपलब्ध आहे . ‘मंगळ – शनी – शनी’ ही साखळी व त्याला जुळणारे ट्रांसिट 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2014 या काळात उपलब्ध आहे.

‘मंगळ – गुरु – राहु’ ही साखळी नोकरी घालवेल पण ती व्ही.आर. एस. च्या मार्गाने.

‘मंगळ – शनी – शनी’ ही साखळी नोकरी घालवेल पण ती शिक्षेच्या मार्गाने , सक्तीचा राजीनामा – बडतर्फी च्या मार्गाने .

आता निवड उदयजींना करावयाची आहे!

उदयजींनी व्हि.आर.एस घ्यावी ती ही अशी की त्यांची सेवा समाप्ती 17 ते 19 नोव्हेंबर या काळात व्हावी. व्ही.आर.एस. हा काही तडका फडकी दिलेला राजीनामा नाही, त्यामुळे नोकरी समाप्तीची तारीख ठरवणे काहीसे आपल्या हातात असते, अशी एखादी (रिझनेबल) तारीख ठरवली व त्या तारखेला सेवा मुक्त करा असे कंपनीला सांगीतले तर कंपनी ही त्याबाबतीत काही खळखळ करणार नाही. त्याचा फायदा घेऊन  17 ते  19 नोव्हेंबर हा कालावधी सेवा मुक्ती साठी ठरवणे अत्यंत योग्य आहे  कारण त्याच काळात रवी मंगळाच्या वृश्चिकेत – गुरुच्या नक्षत्रात व राहुच्या सब मध्ये असेल आणि  त्याच वेळी मंगळाची दशा- गुरु अंतर्दशा – राहु  विदशा असेल ! राहु 11, 2 , 6 चा कार्येश आहे !

पण हे जमले नाही तर काय होईल ?  रवी 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या काळात वृश्चीक राशीतच पण शनीच्या नक्षत्रात असेल, त्याच वेळी , मंगळाची दशा- शनी  अंतर्दशा – शनी  विदशा असेल ! या कालवधीत नोकरी जाणारच जाणार, शनी 5,8,12 चा कार्येश असल्याने सक्ती, बळजबरी, शिक्षा असे प्रकार होऊन नोकरी जाण्याची फार मोठी शक्यता आहे !

मी उदयजींना सांगीतले:

 

“आपली नोकरी काही टिकत नाही , तुम्ही व्ही.आर.एस घेतली नाही तरी काहीतरी कारण दाखवून , दबाव आणुन तुम्हाला नोकरी सोडणे भाग पाडले जाईल (5, 8,12) यात शंकाच नाही. तेव्हा व्ही.आर.एस घ्या, सध्या सगळे गोडीत चालले आहे त्याचा लाभ उठवा ,  वाटाघाटी करुन जास्तीत जास्त आर्थिक लाभ पदरात पाडून घ्या आणि सेवा समाप्ती 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या दोन तीन दिवसात होईल असे बघा ,  कारण नंतर मानहानी व मन:स्तापा शिवाय दुसरे काहीच मिळणार ही”

 
ज्योतिषशास्त्रा च्या आधारे मी केलेले “ व्ही.आर.एस. घ्या नाहीतर सक्तीने घरी पाठवतील…” असे मार्गदर्शन उदयजींना पटले नाही !

ते माझ्या तोंडावरच म्हणाले:

“मी व्ही.आर. एस होऊ नये म्हणून धडपडतोय , ती टळावी म्हणून काहीतरी उपाय सुचवाल म्हणून तुमच्या कडे आलो पण तुम्ही तर  चक्क व्ही.आर.एस. चा मुहुर्त काढून दिलात..”

“उदयजी, आपली समस्या मी समजू शकतो. पण उपाय तोडग्यांनी समस्या सूटत नसतात. मी काही  झाले तरी शास्त्राशी प्रतारणा करणार नाही, ग्रह जे सांगतात तेच मी बोलणार. मी ग्रहमानाचा अभ्यास करुन आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केले आहे. ते आपल्याला पटत नाही त्याला मी काय करणार , आता काय करायचे ते तुम्ही ठरवा..”

बर्‍याच  वेळा जातक जेव्हा प्रश्न विचारायला येतो तेव्हा त्याला अनुकूल असेच भविष्य ऐकायचे असते, थोडक्यात ‘जे व्हावे / घडावे ‘ असे त्याने मनात ठरवले असते तेच ज्योतिषाने सांगावे अशी त्याची अपेक्षा असते. हे म्हणजे कोणते औषध मिळाले पाहीजे हे अगोदरच ठरवून डॉक्टरला भेटायला जाणे!

काही ‘चलाख (?)’ ज्योतिषी जातकाचा कल ओळखून जातकाच्या मनातलेच, त्याला जे ऐकायला आवडेल तेच भविष्य म्हणुन सांगतात ! जातक खूष होतो आणि ज्योतिषी ‘लई भारी’ ठरतो !! आणि त्यातच ज्योतिषाने काही ‘पैसे उकळू’ उपाय – तोडगे सुचवले तर मग काय बघायलाच नको… लई लई भारी !!

पण शास्त्राशी प्रामाणिक ज्योतिषी असे कधीच करणार नाही , तो पत्रिकेचा सांगोपांग अभ्यास करेल व पत्रिकेच्या अभ्यासातून जे दिसेल तेच तो सांगेल , केवळ जातकाला बरे वाटावे म्हणून किंवा जातकाला खूष करण्यासाठी काही खोटेनाटे तो कधीच सांगणार नाही. माझे मार्गदर्शन असेच प्रामाणिक असते , पण मला भेटणार्‍या जातकांत ‘उदयजी’ प्रकाराचेच जास्त, त्याला आता काय करणार?

पडताळा:

 

उदयजींनी व्ही.आर.एस. ची ऑफर धुडकावून लावली. त्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर  या तीन महिन्यात काहीच झाले नाही, सगळी कडे सामसूम होती. उदयजींना वाटले हे व्ही.आर.एस. चे संकट आपोपापच टळले,  त्या उन्मादात , त्यांनी चक्क फोन करुन मला खिजवले सुद्धा ,

“वा रे व्ही.आर.एस. चा मुहुर्त काढून देणार, बघा मी अजुनही नोकरीत आहे,  कसली  व्ही.आर.एस आणि  कसचे काय …”

पण  हा आनंद फार काळ टिकला नाही ! नोव्हेबर च्या अखेरीस कंपनीतल्या एका कामगाराने ‘उदयजींनी शिवीगाळ केली’ अशी (खोटी) तक्रार मॅनेजमेंट कडे केली, एव्हढेच नव्हे तर त्याने ती घटना बघितल्याचे दोन (खोटे) साक्षीदार ही उभे केले!!  (टॉप मॅनेजमेंटनेच हा सगळा बनाव घडवून आणला होता अशी कुजबुज आहे! ) ह्या तक्रारीची तत्परतेने दखल घेऊन , चौकशीचे नाटक करुन उदयजींना समजावले (?) गेले :

“हे पहा , उदयजी, प्राथमिक चौकशी अंती आणि साक्षीदारांच्या जबानी वरुन , कामगाराच्या तक्रारीत तथ्य आहे असे दिसते, त्यामुळे कंपनीच्या नियमांनुसार आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, आपल्याला चौकशी पूर्ण होई तो पर्यंत निलंबित केले जाईल, कदाचित प्रकरण पोलीसांत जाईल,  प्रेसवाले , मिडियावाले येतील, या सगळ्याची जाहीर वाच्यता होईल , तुमची नाहक बदनामी तर होईलच पण त्याच बरोबर आपल्या कंपनीची पण बदनामी होईल. तुम्ही कंपनीचे जुने , अनुभवी , प्रतिष्ठीत कर्मचारी आहात, तुमची प्रतिष्ठा तीच आमची प्रतिष्ठा , तेव्हा कशाला प्रकरण वाढवता.. त्यापेक्षा आपण सरळ राजीनामा टाकून बाहेर पडा, आम्ही त्या तक्रार करणार्‍या  कामगाराला समजावतो , त्याला तक्रार मागे घ्यायला लावतो , प्रकरण मिटवतो…..तेव्हा…”

1 डिसेंबर  2014 उदयजींच्या नोकरीचा शेवटचा दिवस ठरला.

(हे सर्व मला उदयजींनीच सांगीतले , माझी माफी मागायला आणि दुसरी नोकरी केव्हा लागेल ते विचारायला आले होते तेव्हा !)

त्यावेळी रवी मंगळाच्या राशीत , शनी च्या नक्षत्रात , गुरु च्या सब आणि शनी च्या सब-सब मध्ये होता, मंगळ महादशा – शनी अंतर्द्शा – शनी विदशा – शनी सुक्ष्म दशा चालू होती. शनी  ने द्यायचे ते  5, 8, 12 चे  फळ दिले , ग्रहांनी आपले काम कसे चोख बजावले पहा!

उदयजींनी व्हि.आर.एस च्या वाटाघाटी करुन ती स्विकारली असती तर त्यांना नोकरी समाप्ती गुरुच्या अंतर्दशेत  करुन घेता आली असती आणि त्यांना व्ही.आर.एस. चा धनलाभ झाला असता पण शनी च्या अंतर्द्शेत  नोकरी समाप्ती (अशा तर्‍हेने) झाल्यामूळे नोकरी ही गेली आणि धनलाभ ही गेला.

या ठिकाणी मला ज्योतिषातला एक महत्वाच्या बाबी कडे आपले लक्ष वेधून घ्यायचे आहे , ती म्हणजे ‘free Will – निर्णय स्वातंत्र्य’ जे प्रत्येकाला जन्मजातच मिळालेले असते आणि हरघडी आपण त्याचा कळत नकळत का होईना वापर करत असतो.

‘आपल्या कपाळी भविष्य लिहलेले असते ते अटळ असते त्यात बदल होत नाही’ अशा अर्थाचे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो पण ते अर्ध सत्य आहे. कपाळी काहीतरी लिहलेले असते हे निश्चित पण ते साधारण ‘बहु पर्यायी’ स्वरुपाचे असते. आपल्या आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेच्या बाबतीत ती घटना कशी आणि केव्हा घडावी या बाबतीतले बरेच ‘पर्याय / ऑप्शन’ आपल्याला उपलब्ध असतात, त्या पैकी एकच एक काहीतरी घडणार असते आणि ते आपणच आपले निर्णय स्वातंत्र्य वापरुन निवडत असतो.

पण प्रत्यक्षात होते काय , आपल्या समोर असे कोणते ऑप्शन आहेत हेच आपल्याला कळत नाही, मग काय निवडणार? पण ज्योतिष शास्त्राच्या मदतीने आपण विधिलिखितातले उपलब्ध ऑप्शन वाचू शकतो व त्यातून योग्य तो पर्याय निवडू शकतो. ज्योतिषशास्त्र भविष्यातल्या घटनां नाही तर नाही तर ‘शक्याशक्यता – प्रोबॅबीलिटीज ’ सांगते , अशा अनेक पर्यायां बद्दल भाष्य करते, प्रत्यक्षात नेमके काय होईल हे त्या जातकाच्या ‘निर्णय स्वातंत्र्या’ वर अवलंबून असते.

वरील केस स्ट्डी मध्ये , उदयजींची नोकरी जाणार हे काहीसे अटळ असे विधीलिखित होते , पण नोकरी बदनामी कारक रित्या जाऊ द्यायची किंवा थोडा आर्थिक फायदा करुन घेऊन जाऊ द्यायची असे दोन पर्याय त्यांच्यापाशी उपलब्ध होते व ज्योतिषशास्त्राद्वारे त्यांची आगावू कल्पना ही त्यांना मिळालेली होती. पण उदयजींनी या माहीतीचा योग्य तो वापर करुन घेतला नाही आणि त्याचे मिळायचे ते अशुभ फळ त्यांच्या पदरात पडले.

‘दैव देते आणि कर्म नेते’ , उदयजींच्या बाबतीत अगदी असेच झाले !

शुभं भवतु

     हमसे का भूल हुई जो ये सजा हमका मिली

अब तो चारों ही तरफ बंद हैं दुनिया की गली

दिल किसी का न दुखे हमने बस इतना चाहा

पाप से दूर रहें , झूट से बचना चाहा

उसका बदला ये मिला उल्टी छुरी हम पे चली

हमपें इल्जाम ये हैं चोर क्यू चोर कहा

क्यू सहीं बात कहीं , काहे न कुछ और कहां

ये हैं इंसाफ तेरा , वाह रे दाता की गलीं

अब तो इमान धरम की कोई किंमत ही नहीं

जैसे सच बोलने वालों की जरुरत ही नहीं

ऐसे दुनिया से तो दुनिया तेरी विरान भलीं

ठोकरें हमको कुबुल राह किसी को मिल जाये , हम हुए जख्मी तो क्या दुजे का गुल्शन खिल जाये

दाग सब हम को मिले यार को सब फुल मिलें

जिंदगी की समां बुझ के अगर रह जायें, ये समज लेंगे की हम आज किसी काम आये,

ज्योत अपनी जो बुझी यार के जिवन में जले

चित्रपट: जनता हवालदार (1977)

गायक: अन्वर हुसेन

गीतकार: मजरुह सुलतानपुरी

संगीतकार: राजेश रोशन

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. swapnil kodolikar

  छान स्पष्टीकरण आणि पुन्हा एकदा कृष्णमुर्ती पद्धतीची अचूकता सिद्ध .

  0
 2. Gaurav Borade

  नेहमीप्रमाणे खूप सुंदर लेख….! मस्त स्पष्टीकरण… हा लेख जास्त आवडला कारण ‘आपल्या कपाळी भविष्य लिहलेले असते ते अटळ असते त्यात बदल होत नाही’ हे वाक्य मला खूप दिवसांपासून त्रास देत होते …. ! पण ते अर्ध सत्य आहे हे आज(या लेखामुळे ) तुमच्यामुळे समजलं.. धन्यवाद सर.. ! 🙂

  0
  1. सुहास गोखले

   गौरवजी,
   धन्यवाद.
   आपण माझे सर्व लेख वाचता आणि आवर्जुन , वेळातवेळ काढून अभिप्राय देता या बद्दल मन:पूर्वक आभार.
   ज्योतिसः , विधीलिखीत या वर अजून एक लहानसा लेख तयार आहे लौकरच तो प्रकाशीत करत आहे.

   शुभेच्छा

   सुहास

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.