(माहीती ऐकीव आहे , तपशीलात चूक असण्याची शक्यता आहे हे गृहीत घरुन ही पोष्ट वाचावी!)

सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री सौ.जयश्रीताई गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या, त्या चित्रपटा साठी त्यांना एक खास , वजनदार गाणे हवे होते, त्यांनी त्या साठी कै. श्री. सुरेश भटांना विचारले. श्री.सुरेश भट म्हणजे एकदम तब्बेतीचे कवी, एक मस्त , कलंदर व्यक्तीमत्व, सिनेमाच्या गाण्यांचा रतीब घालणारे, ऑर्डर प्रमाणे बुंदी पाडून देणारे कोणी ‘नाना’ नव्हते ते! सौ. जयश्रीताईंच्या विनंती मानून श्री. भट असे एखादे गीत लिहण्यास तयार झाले.

“माझी मुंबईत राहण्या खाण्याची सोय करा, म्हणजे मी मुंबईत येऊन तुम्हाला गाणे लिहून देईन”

सौ. जयश्रीताई त्याला तयार झाल्या , कविवर्य मुंबईत दाखल झाले. सौ. जयश्रीताई, चित्रपटाचे कथा आणि पटकथाकार, संगीतकार आणि सुरेशभाऊ यांच्यात काही बैठका झाल्या. आता जयश्रीताई गाणे कधी हातात पडते याची वाट पाहू लागल्या, पण सुरेशभाऊंकडून काही गाणे लिहून होईना , काही दिवस थांबून जयश्रीताईंनी सुरेशभाऊंना आठवण करुन दिली,

“हो जाये गा, मिल जायेगा”

सुरेशभाऊंचे उत्तर आले. बाईंनी विचार केला मोठे कवी आहेत, थांबू काही दिवस, पण असेच आणखी काही दिवस गेले, गाणे काही भेटेना. ईकडे त्या गाण्यासाठी चित्रिकरण खोळंबले , स्टुडिओच्या तारखां बद्दल प्रश्न निर्माण व्हायला लागले. सौ. जयश्रीताईंचा धीर सुटला , आता सुरेश भाऊंना तगादे चालू झाले. पण …

“हो जाये गा, मिल जायेगा”

हेच उत्तर मिळत राहीले. इकडे गाणे न मिळाल्याने कामे खोळंबली होती तर तिकडे सुरेश भाऊंचा लॉज व जेवणाखाण्याच्या खर्चाचे बिल दिवसागणीक वाढत होते!

अखेर बाईंनी सुरेश भाऊंना स्पष्ट सांगीतले …

“सुरेश भाऊ आता आपल्याला जास्त वाट पाहाता येणार नाही, नाही गाणे सुचत तर राहू दे , पुन्हा कधी तरी बोलवू आम्ही आपल्याला, आम्ही पुढच्या दोन दिवसाचे लॉजचे सगळे बिल भरले आहे, पण ह्याहून जास्त आपल्याला तिथे राहाता येणार नाही, तेव्हा…”

“ठीक आहे , जशी तुमची मर्जी..” सुरेशभाऊ शांतपणे म्हणाले.

दुसरे दिवशी त्या लॉजच्या मालकांचा सौ. जयश्री ताईंना फोन आला.

“आपले ते नागपूर चे गेस्ट , अगदी आत्ताच खोली खाली करुन गेले. गडबडीत दिसले , दादर ला नागपूरची ट्रेन पकडायची आहे असे काही तरी म्हणत होते ..”

बाईंना आश्चर्य वाटले, कविवर्य रागावले का काय? असे न सांगताच , न कळवताच कसे मुंबई सोडून निघाले , छे , आपल्या बोलण्याने दुखावला वाटतो हा मानी गृहस्थ. असे व्हायला नको होते, त्यांनी तकड दादर स्टेशन गाठले, नागपूर ची गाडी प्लंट्फॉर्म वरच उभी होती, सुरेशभाऊ निवांत खिडकीची जागा पटकावून बसले होते. बाईंनी त्यांना विचारले, त्यांची माफी मागीतली, सुरेशभाऊ नुसतेच हसले , गाडी सुटणार तेव्हढ्यात सुरेश भाऊंनी एक कागद जयश्री ताईंच्या हातात ठेवला ,

“हे घ्या आपले गाणे. आपली व्यवाहारीक अडचण मला समजते जयश्रीताई, पण त्याचे काय आहे, काव्य ही एक दैवी देणगी आहे, प्रतिभेचा हुंकार आहे, याला काळ काम वेगाची बंधने लागू पडत नसतात, सुचले तर आत्ता लगेच नाही तर जेव्हा सुचेल तेव्हा असे हे काम असते. आज भल्या पहाटे हे गाणे सुचले मला, हाता सरशी लिहून टाकले.”

“याच्या मानधनाचा चेक आपल्याला पाठवून देते, लगेच..”

“ताई, त्याची गरज नाही! आपण माझी मुंबईत जी बडदास्त ठेवलीत तीच मला पावली, बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे, परमेश्वरी देन आहे, त्याचे मोल मी काय करणार आणि तुम्ही काय देणार’’

“अहो पण..”

“तुम्ही आता काही बोलू नका, उलट मीच तुमची क्षमा मागीतली पाहीजे ”

एव्हढ्यात गाडी हलली, सौ. जयश्रीताईंना पुढचे काही बोलता आले नाही. घरी परत आल्यावर सौ.जयश्रीताईंनी ते गाणे वाचले मात्र त्यांच्या डोळ्यातून अक्षरश:अश्रूंच्या धारा लागल्या..

काही कारणामुळे सौ. जयश्रीताईंना ते गाणे त्यांच्या त्या चित्रपटात वापरता आले नाही, ते तसेच त्यांच्यापाशी पडून राहीले. पुढे काही वर्षांनी जेव्हा श्री. जब्बार पटेल एक चित्रपट निर्माण करत होते तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर यांना अगदी असेच गाणे हवे होते, कोठून तरी त्यांना त्या सुरेश भटांच्या गाण्याबद्दल कळले, त्यांनी सुरेशभाऊंना विचारले.

“वो गाना ? वो तो अब जयश्रीताई जीं की अमानत है, उन्हीसे बात किजीये..”

सौ.जयश्रीताईंनी त्या गाण्या साठी तसे म्हणले तर बराच खर्च केला होता पण..

“हे गाणे तर परमेश्वरी कृपाप्रसाद आहे, मी याचे पैसे नाही वसूल करणार , उलट पं. हृदयनाथजीं सारख्या संगीतकारा कडे हे गाणे जाते आहे , त्याचे खरोखरीचे चीज होईल, हिर्‍याला कोंदण लाभेल”

असे म्हणत ते गाणे पं. हृदयनाथजीं कडे हवाली केले. अर्थातच पं. हृदयनाथजींनी त्या  हिर्‍याला साजेसे असे  सुरेख कोंदण दिले आणि ते गाणे मराठी चित्रपट सृष्टीच्या ईतिहासात अजरामर केले.

ते हे गाणे:

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

चित्रपट:उंबरठा , गीतकार: श्री. सुरेश भट,  गायिका: लता मंगेशकर ,संगीतकार: पं.ह्रदयनाथ मंगेशकर

माझ्या बाबतीतही बर्‍याच वेळा असेच काहीसे होते.

काही वेळा जातक प्रश्न विचारतो, मानधन जमा करतो पण त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करताना माझी अवस्था श्री. सुरेश भटां सारखीच होते, काही दैवी संकेता साठी मी ही थांबून राहतो.

माझ्या साठी, पत्रिकेचा अभ्यास हे एक यांत्रिकी पद्धतीचे काम नाही, छापखाना नाही , लॉण्ड्री नाही की पिठाची गिरणी नाही, जिथे काम सुरु केले की ठरावीक मुदतीत उत्तर तयार. काही वेळा स्पष्ट संकेत मिळतात, तासाभरात काम पूर्ण होते तर आणि काही वेळा खरच थांबावे लागते. हे असे का ? हे  मला नाही सांगता येणार. कदाचित ह्या माझ्या बुद्धीच्या , आकलन शक्तीच्या मर्यादा असतील.

दिवसाला पंधरा –वीस (काही वेळा त्याहुनही जास्त) पत्रिकांची गिरणी चालवणारे (त्याचा गर्वाने उल्लेख करुन आणि दुसर्‍या ज्योतिषांना ते जमत नाही म्हणून त्यांची कीव करणारे !) काही ज्योतिषी आहेत, ते हे काम कसे करु शकतात / जमवतात याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे. असेल, काहीतरी अलौकिक दैवी शक्ती असेल त्यांच्या कडे किंवा चटावरचे श्राद्ध उरकल्या सारखा काहीसा प्रकार होत असेल. पण माझ्या कडे  असली  अलौकीक दैवी शक्ती नाही आणि असली चटावरची श्राद्धें घालणे  माझ्या कडून होणार नाही.

मी आपला श्री. सुरेशभाऊं सारखा ‘सुचत नाही’ तो पर्यंत थांबणार, त्याला ईलाज नाही.

काही जातक समजून घेतात , काही जण नाही ! काहींचा तगादा सुरु होतो (त्याने परिस्थिती आणखी बिघडते!), जे हे समजून घेऊ शकत नाहीत, त्यांचे जमा मानधन तत्परतेने वापस करणे एव्हढे काय ते मी करु शकतो. आणि ते करायला काही दैवी प्रतिंभा लागत नसल्याने हे काम मात्र तासा दोन तासात पूर्ण होते !

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.