एक चेतावणी

१) या लेखमालेतून मी जे काही लिहीत आहे ते माझे स्वत:चे अनुभव आणि इंटरनेट च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचे एक संकलन आहे. या लेखमालेचा हेतू माहितीचे / अनुभवाचे आदानप्रदान आणि काही मनोरंजन असा आणि इतकाच आहे.

२) मी वैद्यकीय व्यावसायिक नाही, माझ्या कडे कोणतीही वैद्यक क्षेत्रातली अर्हता नाही, मधुमेह या विषयावर मी कोणतेही संशोधन केलेले नाही. या लेखमालेतून मी मधुमेह व तत्सम कोणत्याही आजारावर कोणतेही औषध / औषधोपचार पद्धती सुचवत नाही. या लेखमालेत उल्लेख केलेल्या / प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रित्या सुचीत झालेल्या औषधी / औषधोपचार पद्धती या केवळ माहिती साठी आहेत, त्यांची उपयुक्ततता  / परिणामकारकता आणि सुरक्षितता बाबत मी कोणत्याही प्रकाराचा दावा  करत नाही किंवा त्याबद्दल कोणतीही हमी देत नाही.

३) या लेखात दिलेल्या माहितीचा वापर ज्याने त्याने आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर करावा. या लेखातल्या माहिती चा वापर करून झालेल्या कोणत्याही बर्‍या-वाईट परिणामांना , मी एक लेखक म्हणून , कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

४) मधुमेह हा एक कमालीची गुंतागुंत असलेला , असाध्य असा आजार आहे. या लेखमालेतली माहिती वाचून स्वत:वर उपचार सुरू करणे / चालू असलेले उपचार थांबवणे / चालू असलेल्या उपचारांत बदल करणे असे प्रकार अजिबात करू नका, ते आपल्या प्रकृतीला नुकसान पोहोचवणारे ठरू शकेल शिवाय काही वेळा ते प्राणघातक पण ठरू शकेल याची मी आपल्याला स्पष्ट जाणीव करून देत आहे.

५) या लेखमालेतल्या माहितीचा वापर करावयाचा असेल तर तो एखाद्या तज्ञ वैद्यकीय व्यावसायिकाच्या सल्ल्याने आणि अशा तज्ञ व्यक्तीच्या देखरेखी खालीच करावा.

 


या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:  साखरेचे खाणार त्याला भाग – १

काय दुर्दैव आहे पाहा, अगदी काल परवा पर्यंत तुरळकपणे आढळणारा आणि ‘श्रीमंतांचे दुखणे / चोचले’ अशा शब्दात हिणवल्या जाणार्‍या या ‘गोड’ आजाराने अवघ्या काही वर्षांत बघता बघता सारे जग पादाक्रांत केले, ह्या रोगाची वाढ इतकी झपाट्याने होत आहे की अमेरिके सारख्या आरोग्याच्या बाबतीत जागृत आणि अत्युच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध असलेल्या देशातली 50% ( हो आपण बरोबर वाचलेत चक्क 50%) लोकसंख्या एकतर मधुमेही आहे किंवा मधुमेह पूर्व स्थितीत आहे!

भारतात तर आज मितीला सात कोटी मधुमेही असावेत असा अंदाज आहे, अर्थात हा आकडा मधुमेहाचे निदान झालेल्यांचा आहे , प्रत्यक्षात मधुमेह असलेले पण रोग निदान न झालेले आणि मधुमेह पूर्व पातळी वरचे लोक यात जमा केले तर ती एक छाती दडपून टाकणारी संख्या ठरेल. भारतात मधुमेह्यांची संख्या इतकी अमाप आहे की भारताला ‘मधुमेहाची जागतिक राजधानी’ असे संबोधले जात आहे !

काही वर्षां पुर्वी आपल्याकडे लग्न समारंभातल्या जेवणावळीत एखादाच मधुमेही आढळायचा,  ‘मधुमेही’ म्हणून त्याचे काहीसे कौतुक(?) पण व्हायचे आणि हा मधुमेही पण जरा भाव खात आपला मधुमेह कुरवाळण्यात धन्यता मानायचा ! आणि आता, एक आड एक व्यक्ती मधुमेही आहे, कौतुक कोणाचे करायचे , कशाचे करायचे?

ही अशी अचानक मधुमेहाची त्सुनामी आली कशी ? कशामुळे आली , काय कारण आहे या मागे … जगभरातल्या वैद्यक विश्वात आजही याला उत्तर नाही की पटेल असे / पुरेसे स्पष्टीकरण नाही !

जगभरात अब्जावधी रुपये या आजारा वरच्या उपचारावर रोजच्या रोज खर्च केले जात आहेत आणि कदाचित तितकेच पैसे या रोगावरच्या संशोधनात खर्च केले जात असतील पण आजचे वैद्यकशास्त्र फक्त एकच सांगते आहे:

टाईप टू मधुमेह हा गंभीर स्वरूपाचा , जान लेवा, क्रमाक्रमाने वाढत जाणारा (शरीरात पसरणारा) , दुर्धर रोग आहे’ .. बस्स !  और कुछ नही जानी !

“बाबा रे / बाई ग , तुला मधुमेह झालाय , आता सगळ संपले, औषधे घे , इंजेक्शने घे आणि ह्या आजारामुळे होणार्‍या दुर्घटना (complications) ( रेटीनिपॅथी, न्युरोपॅथी, किडनी विकार, हृदय विकार इ.)  जेवढा वेळ लांबवता येतात तेव्हढेच काय ते बघ, आम्ही तरी याहून जास्त काय करू शकतो ?”

गंमत अशी की इकडे सगळे डॉक्टर्स असे एकमुखाने खणखणीत शब्दात कानी कपाळी ओरडून हे सारे सांगत आहेत तर तिकडे तुम्हाला मधमेह आहे हे कळायचा अवकाश एका पेक्षा एक रामबाण उपायांचा मारा तुमच्यावर करण्यात येईल. ‘मधुमेह’ परवडला पण हे उपाय तोडगे नकोत अशी तुमची अवस्था होईल. खरी गंमत अशी की हे उपाय सुचवणारे प्रत्यक्षात मधुमेही नसतात तर त्यांची कोणती तरी लांबची आत्या / काकी , मावसभाऊ, जवळचा मित्र अशा लोकांनी तो उपाय केलेला असतो  आणि त्यांचा मधुमेह तीन दिवसात खात्रीने बरा झाला असे छातीठोकपणे प्रतिपादन केले जाते. एका व्यक्तीने त्याच्या १९६० सालीच मधुमेहानेच खपलेल्या आजोबांची साक्ष काढली होती, त्यांचा मधुमेह असाच कोणत्या तरी जालीम नुस्क्याने आठवड्या भरात बरा झाला होता, नंतर ते ताटभर जिलब्या खायचे म्हणे ! आणि मजा म्हणजे हे आजोबा गेले तेव्हा हे आपले उपाय सुचवणारे महाराज चक्क पाळण्यात होते !

किती ते उपाय ? आयुर्वेदिक , युनानी, निसर्गोपचार , होमिओपॅथी हे नेहमीचे यशवंत – गुणवंत तर असतातच पण  प्राणायाम , आलोम विलोम , भस्त्रीका , कानाच्या मागच्या बाजूला टोचणे, तळहातावरचा एखादा उंचवटा दहा वेळा दाबणे हे पण असते , कोणी काळ्या जादूच्या जवळपास जाणारा तोडगा सांगतो तर कोणी  भिलवडीच्या धनगराच्या औषधाची तोंड फाटे पर्यंत स्तुती करतो पण हा भिलवडीचा धनगर नक्की आहे कोठे याचे उत्तर मात्र ‘शोधा तुम्हीच किंवा भिलवडीत कोणालाही विचारा कोणीही सांगेल’ असे असते. एकाने मला काळ्या मांजराची वार गळ्यात बांधून फिरायला सांगितले तर एकाने एक मंत्र सुचवला, पाण्याच्या बोट बुडवून तो मंत्र म्हणायचा आणि मग ते पाणी प्यायचे – मधुमेह गायब ! एकाने नक्षत्र शांती हाच जालीम उपाय असे ठणकावून सांगितले , एकाने तांबड्या गायीच्या दुधाचा नुस्का सुचवला. एकाने मला हजार दीड हजार रुपयांचा, कोणत्या तरी खास झाडाच्या लाकडाचा पेला विकायचा घाट घातला होता , त्या लाकडी पेल्यात रात्री पाणी भरुन ठेवायचे आणि सकाळी ते ढोसायचे  म्हणे , बरे हा पेला देखील दर सहा महीन्यांनी नवीन घ्यायचा असतो कारण सहा महिन्यां नंतर त्याची पॉवर कमी होते,  आता हा लाकडी पेला इतका गुणकारी असेल तर काही महीन्यात मधुमेह पळून जाईल मग दुसरा पेला विकत घ्यायची गरजच कशी पडेल या माझ्या प्रश्नाला मात्र त्याचे कडे उत्तर नव्हते , माझ्या मधुमेहाशी त्याला काही देणेघेणे नव्हतेच त्याला फक्त तो लाकडाचा दळभद्री पेला माझ्या गळ्यात मारायचा होता!  मला असे अनेक उपाय सुचवले गेलेत की ते इथे लिहिणे ही शक्य नाही. पण काय सुपीक डोकी असतात ह्या लोकांची ! या सगळ्यांचा दावा एकच – हे अमुक करा एका रात्रीत मधुमेह गायब होतो की नाही ते बघा!

रस्त्यात , प्रवासात , समारंभात , बाजारात गाठून मधुमेहा वरचे नुस्के सांगणारे कमी पडले म्हणून की काय ईमेल , फेसबुक , व्हॉटअ‍ॅप , यु ट्युब  च्या माध्यमातून असल्या उपाय तोडग्यांचा असह्य भडीमार होताना दिसतो. २००८ मध्ये फेसबुक , युट्युब , व्हॉटस अ‍ॅप नव्हते पण तेव्हा ‘ईमेल फॉरवर्ड’ खूप जोरात होते, तेव्हाचा ‘कलोंजी + डिंक + , बार्ली ‘ चा’ नुस्का तर कंटाळा येईल इतक्या वेळा येऊन गेला, आणि आजही फेसबुक , व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून तोच नुस्का पुन्हा पुन्हा अवतीर्ण होत असतो तेव्हा हसावे की रडावे हेच कळत नाही. मध्यंतरी त्या ‘खपली गव्हाच्या’ नुस्काने त्राही भगवान करून सोडले होते. किती सांगू? हे उकरावे तेव्हढे थोडेच आहे, आणि यातल्या एकाही नुस्क्यात काडीचाही दम नाही हे वेगळे सांगायला नकोच.

हे झाले नुस्के तर दुसर्‍या बाजूला आयुर्वेदिक औषधवाल्यांनी उच्छाद मांडला आहे, रोज एक नवे जालीम औषध बाजारात अवतिर्ण होते आहे, ना कोणता आगा ना पिछा ना क्लिनिकल ट्रायल्स ना एफडीए ची मान्यता ना घटक पदार्थांचा उल्लेख काही काही नाही, आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडीसिन म्हणाले की सगळे झाकले जाते , असल्या काही औषधां मधून अपायकारक अशा स्टिरॉईडस चा मनसोक्त वापर केल्याचे ही आढळले आहे. घ्या कोणत्यातरी अगम्य पावडरी , मिसळा कसेतरी झाले रामबाण औषध तैयार, ‘मधु अमुक ‘ ‘मधु तमुक’ , डायबी यंव आणि शुगर त्यंव , अशी नावे दिले की झाले ! दुनिया झुकती है …

मी जेव्हा मधुमेहावर एक स्वानुभवा वर आधारीत लेखमाला लिहण्या बद्दल निवेदन दिले तेव्हा ‘लिहा आम्ही वाचतो, वाचायला आवडेल ‘ अशा कॉमेंट्सचा लोकांनी पाऊस पाडला, विषयच तसा आहे ! बहुतेकांना मी लेखमालेतून कदाचित एखादी जालीम जडी बुट्टी सुचवणार असे वाटले असावे , अशी की ते औषध घेतले की मधुमेह तीन दिवसात बरा होणार! पण मित्रांनो, दुर्दैवाने असे कोणतेही औषध, जडी बुट्टी, नुस्का माझ्या कडे नाही जो आपला मधुमेह क्षणात बरा करेल. असे औषध माझ्याकडे तर नाहीच नाही पण या जगात कोणाकडे असेल का ही शंका आहे. कारण आजवर ‘मधुमेहा वरचे जालीम औषध / तोडगा / अक्सीर इलाज / रामबाण उपाय’ म्हणून ज्या ज्या औषधांची /  उत्पादनांची / उपचार पद्धतींची जाहीरात केली जाते / जे मोठे मोठे राणा भीमदेवी थाटाचे दावे केले गेले आहेत ते बर्‍याच वेळा खोटे किंवा तात्पुरता आणि फसवा प्रभाव दाखवणारे ठरले आहेत, काही वेळा तर चक्क फसवणुकीची बाब म्हणून सिद्ध झाले आहेत.

खरा धोका हा आहे की असल्या ‘नुस्क्या’  च्या नादाला लागून , आणि त्या पाठी केलेल्या दाव्यांना भूलून लोक्स काही बाही करत राहतात, आपला मधुमेह बरा झाला ह्या भ्रमात राहतात, चालू असलेली औषधे , पथ्य, व्यायाम सगळे बासनात गुंडालून ठेवतात आणि मग असा हा तथाकथित बरा झाला असे वाटणारा मधुमेह आपले खरे रंग दाखवायला सुरवात करतो तेव्हा फार उशीर झालेला असतो .  

माझ्या अल्पशा अनुभवा नुसार आणि मी जे काही वाचले आहे त्यानुसार , आजच्या तारखेला मधुमेह खात्रीने बरा करेल असे कोणतेही औषध / उपचार उपलब्ध नाही मग ती उपचार पद्धती अ‍ॅलोपॅथी , होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार , अ‍ॅक्युपंक्चर , अ‍ॅक्युप्रेशर , मंत्र – तंत्र – अंगारे – धुपारे , खडे , पोथी, यज्ञ याग , पूजापाठ , दानधर्म, भिलवडीच्या धनगराचे औषध, हिमालयातल्या कोणा बाबाची जडी बुट्टी , प्राणायाम, मंडुकासन  … कोणतीही असो. यातले काहीही उपयोगी पडत नाही, आजाराची लक्षणें तात्पुरती कमी करण्या पलीकडे यातून काहीही साध्य होत नाही.

मोठ्या मोठ्या जाहिराती करून , युट्युब / फेसबुक / व्हॉटअ‍ॅप सारख्या प्रभावी संपर्क माध्यमांचा वापर करून मधुमेहा वरती उपचार करणारी शिबिरे (वर्कशॉप) भरवली जातात , हा  तर एक  फार मोठ्ठा धोका आहे कारण अशा एखाद्या शिबिराला जाऊन मधुमेहाची लक्षणे , म्हणजे रक्तातल्या साखरेचे प्रमाण जरासे कमी झालेले दिसले की मधुमेह बरा झाल्याच्या गगनभेदी आरोळ्या ठोकल्या जातात आणि त्या उन्मादात चालू असलेली औषधे बंद करून कचर्‍यात फेकली जातात , “बघा माझा मधुमेह कसा समूळ बरा झाला ‘ या ईरेसरीने ताटभर जिलब्या (समारंभपूर्वक) खाल्ल्या जातात आणि मग जे व्हायचे तेच होते . शिबिराचा प्रभाव ते शिबिर चालू असे पर्यंतच टिकतो , त्या शिबिरात अत्यंत मोजकेच / उपासमार करणारे / चवहीन . कळाहीन विशिष्ट प्रकाराचे खाणे दिले जाते / चित्र विचित्र आणि कठोर असे व्यायाम जबरदस्ती करवून घेतले जातात, आणि हे सगळे एका मोठ्या समूहात एकाच वेळी  घडत असल्याने त्याचा व्यक्तीवर मानसशास्त्रीय प्रभाव मोठा पडत असते, काहीसा प्लॅसीबो पद्धतीचा आणि म्हणुनच शिबीरात असताना बळजबरीने , काहीशी कृत्रिम रित्या रक्तातली साखर कमी झालेली दिसत ही असेल पण  शिबिरात असे पर्यंत बरा झाला असा वाटणारा मधुमेह शिबिर संपवून घरी परतल्यावर दुप्पट वेगाने उफाळून आल्याची असंख्य उदाहरणें आहेत. ये रे माझ्या मागल्या .. आणि आता खेळी खेळायची वेळ मधुमेहाची असते ! तो मग असा काही डाव टाकतो की बस्स ! आणि म्हणूनच “आप की डायबेटीस की गोली तो इस शिबिर में ही छुडवाऊंगा’ अशी दाढी कुरवाळत , डोळा वाकडा करत गर्जना करणार्‍या कोणा बाबाची कीव करावीशी वाटते!

ही शिबिरे आणि त्यात दिलेली आश्वासने फसवी ठरतात याचे कारण म्हणजे या शिबिरात तीन दिवसात / सात दिवसात मधुमेह बरा करायचा घाट घातला जातो, तीन दिवसात गोळी बंद , सात दिवसात इन्शुलिन बंद अशा वल्गना केल्या जातात हेच मुळात चुकीचे आहे/ अशक्य आहे.

जरा विचार करा, साधी पायाला ठेच लागून जखम झाली , स्वैपाक करताना कापले, भाजले, खरचटले , सर्दी – खोकला अशा किरकोळ गोष्टी देखिल बर्‍या व्हायला तीन – चार दिवस लागतात आणि इथे तर दहा वर्षे हाडीमासीं खिळलेला , त्यातली गेली पाच वर्षे इन्शुलिन वर ठेवलेला मधुमेह असे कोणतेही औषध न वापरता फक्त तीन दिवसात खडखडीत बरा केल्याच्या गप्पा कशा काय मारल्या जात आहेत?  मुळात मधुमेह हा एका रात्रीत . काही दिवसात होणारा आजार नाही, अत्यंत संथगतीने / कूर्म गतीने तो आपल्या शरीरात दाखल होतो आणि अनेक वर्षे तो सुप्तावस्थेत राहून आपले हातपाय पसरवत असतो आणि रोग्याला त्याची सुतराम कल्पना नसते. अशा चंचु पावलाने येणार्‍या आणि आस्ते कदम बळावणार्‍या रोगावर असा कोणता झटपट इलाज असूच शकत नाही, आणि असा समजा असा कोणता उपचार आस्तित्वात असलाच तर तर तो दीर्घकाळ (काही महिने ते वर्ष भर ) करावा लागेल तेव्हा कोठे हा आजार आटोक्यात येऊ शकेल, त्यानेही हा आजार बरा होईल का हे सांगणे आज तरी सांगणे शक्य होणार नाही.

आता हे वाचल्या नंतर मला खात्री आहे काही लोक चवताळून माझ्या अंगावर येतील , स्वाभाविकच आहे !  असे काही लिहून मी अनेकांच्या धोतरांना, पँन्टीना, अगदी सुट बूट , बर्म्युडांना हात घातला आहे ! याचा , त्याचा , त्या अमक्याचा , त्या तमक्याचा मधुमेह या अशाच शिबिराला जाऊन कसा बरा झाला / तो अमुक तमुक नुस्का कसा जालीम आहे याचे  दाखले देतील , हा व्हिडिओ पहा, हा ब्लॉग वाचा , ह्या फेसबुक पेज वर पहा असा मारा करतील. मी या सगळ्यातून गेलो आहे. प्रत्यक्ष अनुभव घेतलेले फार थोडे लोक्स भेटलेत मला बाकी सगळे सांगो पांगी / ऐकीव माहिती वर तावातावाने भांडणारेच निघाले त्यामुळे आता या बाबतीत मला कोणाशीशी वाद घालायची / प्रत्युत्तर देण्याची इच्छा नाही. हे सगळे माझे करून झाले आहे , आता माझ्या दृष्टीने ही एक शिळी कढी आहे त्याला सोसासोसाने ऊत आणण्यात मला स्वारस्य नाही.

या लोकांच्या उपचारात खरोखरीच दम असेल आणि त्यांनी तो सिद्ध करून दाखवला तर त्यांना नोबेल पारितोषीक घरात वाजत गाजत आणुन देतील ना? तसे तर झालेले नाही.

डॉ बेन्टिंग यांना इंशुलिन च्या शोधासाठी नोबेल पारितोषीक मिळाले तसे या तीन दिवसात मधुमेह बर्‍या करणार्‍या या शिबिरवाल्यांना का मिळत नाही ? 

डॉ बेंटिंग़

 

For people with diabetes mellitus, the year 1921 is a meaningful one. That was the year Canadian physician Frederick Banting and medical student Charles H. Best discovered the hormone insulin in pancreatic extracts of dogs. On July 30, 1921, they injected the hormone into a diabetic dog and found that it effectively lowered the dog’s blood glucose levels to normal. By the end of that year, with the help of Canadian chemist James B. Collip and Scottish physiologist J.J.R. Macleod, Banting and Best purified insulin, and the next year it was used to successfully treat a boy suffering from severe diabetes.

The researchers were celebrated and honored for their breakthrough. Banting and MacLeod even shared the 1923 Nobel Prize for Physiology and Medicine for their work. Indeed, they were the “discoverers” of insulin.

 

 

 

डॉ बॅन्टींग आणि डॉ बेस्ट यांनी इन्शिलिन चा वापर करून एका कुत्र्याची रक्त शर्करा कमी करुन दाखवली तो क्षण

 

( डॉ बेंटिंग यांनी ज्या प्रयोग शाळेत इन्शुलिन चा शोध लावला ती जागा !)

उपचार पद्धती / औषधे अशी प्रयोग शाळेत विकसीत होतात आणि सिद्ध करून दाखवली जातात , यु ट्युब वर लेक्चर्स झोडून , शिबिरे भरवून , गप्पा मारून नाही !

ते नोबेल चे जाऊ दे, जर ह्या काही हजार रुपयांच्या या शिबिरातून  / उपचारांनी मधुमेह असा तीन दिवसात बरा होणार असेल तर अमेरिकेतील , युरोपातील लक्षावधी नव्हे कोट्यावधी मधुमेही विमाने भरभरून भारतात दाखल झाले असते , आणि मधुमेहातून मुक्त होऊन परत गेले असते , हे पण होताना दिसत नाही. जर माझ्या कडे मधुमेहावरचा खरोखरीचा एखादा जालीम उपाय असेल तर मला आज मुंबै , उद्या सोलापूर , तेरवा औरंगाबाद ,  कोल्हापूर , जळगाव , मालवण , उस्मानाबाद , पंढरपूर असे गिर्‍हाईके गोळा करत हिंडावेच लागणार नाही , औषधां साठी / उपचारा साठी लोक्स आपण हून माझ्या दारा पुढे रात्रभर क्यू लावून उभे राहतील (आठवा १९८०-९० च्या दशकात पुण्यात नामांकित शाळांच्या अ‍ॅडमिशनचा फॉर्म  मिळवण्यासाठी पालक असे रात्री पासून  क्यू लावून उभे असायचे!) , गोबेल्स च्या प्रचार तंत्रालाही लाजवेल असा बटबटीत प्रचार फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, यु ट्युब, टी व्ही चॅनेल च्या माध्यमातून करायची कोणतीच गरजच पडणार नाही. लोक स्वत: तुमचा पत्ता हुडकत येतील , सिंपल लॉजीक , खरे ना? विचार करा.

मी हे सारे माझे अनुभव लिहीत आहे , भारतातल्या प्रत्येक गावात मधुमेहावर जालीम औषध देणारा कोणीतरी असतोच असतो, त्या सगळ्यांची मला माहिती असणे अशक्य आहे,  एखाद्या कडे असेल ही असा नुस्का त्याने गुण येत असेल पण त्याबद्दल मला काहीही माहिती नाही इतकेच. तेव्हा या मुद्द्यावर कृपया कोणीही वाद विवाद घालू नये.

आता तुम्ही म्हणाल या मधुमेहावर उपाय नाहीच का?  असे ही नाही , कारण याला फक्त एक आणि एकच अपवाद आहे ! हो, एक उपचार आहे ज्याने मधुमेह समूळ बरा होण्याची मोठी शक्यता आहे आणि तो उपचार म्हणजे ‘बॅरीअ‍ॅट्रीक सर्जरी Bariatric surgery’ किंवा Gastric Bypass Surgery! पण हा उपचार अद्याप बाल्यावस्थेत आहे , नक्की काय परिणाम मिळतील या बद्दल मोठ्या साशंकता आहेत शिवाय हा एक कमालीचा खर्चिक आणि तितकाच धोकादायक उपचार आहे.  आणखी एका उपायाची चर्चा वैद्यकविश्वात चालू आहे तो म्हणजे , मधुमेही रुग्णाच्या पोटात एक पतली नळी अशा तर्‍हेने बसवायची की ती नळी अन्नाचे संपूर्ण पचन होण्याच्या आधीच ते अर्धे पचलेले अन्न बाहेर टाकून देईल, याला ‘medically sanctioned bulimia’ असेही म्हणले जात.  हा उपचार देखील अजून प्रयोगावस्थेतच आहे , अर्थातच खर्चिक आणि  धोकादायक ही आहे.  त्यामुळे बॅरीअ‍ॅट्रीक सर्जरी किंवा ‘medically sanctioned bulimia’  असे उपाय सापडले असा डंका इतक्यातच आपल्याला पिटता येणार नाही, दिल्ली अभी बहोत दूर है , जानी !

मी मधुमेहावर काहीतरी उपाय सुचवेन (तो ही अक्सीर रामबाण, बिनखर्ची, विनासायास  इ इ ) या आशेने हा लेख वाचणार्‍यांची मी निराशा करतोय याची मला कल्पना आहे पण सत्य किंवा वास्तव काय आहे तेच मी आपल्याला सांगत आहे.  या रोगावर उपचार नाही असे मी म्हणत नाही तर माझे म्हणणे इतकेच आहे की या आजाराचे समूळ उच्चाटन करणे जवळजवळ अशक्यच आहे.

या सार्‍या कोलाहलात एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे मुळात चूक होते आहे ती या मधुमेहा ला समजून घेण्यात, हा आजार ‘चयापचयाचा ‘ म्हणजेच ‘पचन प्रक्रियेचा आहे म्हणजेच तुमच्या खाण्यापिण्याशी  निगडित असा आहे पण उपचार वेगळ्याच दिशेने चालू आहेत. कॅनेडीयन डॉक्टर जोसेन फंग म्हणतात : “you can’t use drugs [or devices] to cure a dietary disease.”

आणि लोक हो हाच तर आपल्याला गवसलेला आशेचा नवा किरण आहे ! मी पुन्हा एकदा लिहतो हाच आपला आशेचा नवा किरण आहे.

यही है वो असली सोना !

तेव्हा आता आपण या मधुमेहा पुढे शरणागती पत्करुन निराश / अगतिक व्हायचे काहीच कारण नाही, कारण अगदी समूळ उच्चाटन करता आले नाही तरी हा आजार आपण खूप चांगल्या रितीने नियंत्रणात ठेवू शकतो त्या दृष्टीने :

१) आजारावर घट्ट / कडक  नियंत्रण ठेवणे

२) औषधांवरचे अवलंबित्व कमी करणे

३) या आजारामुळे होणारी कॉम्प्लिकेशन्स थांबवणे

४) या आजाराने आत्ता पर्यंत केलेले नुकसान काही प्रमाणात तरी का होईना भरून काढणे

हे तरी आपण नक्कीच करू शकतो. आणि ही साधीसुधी कामगिरी नाही !

तेव्हा पुन्हा एकदा नव्या निर्धाराने या आजाराशी लढायला तैयार व्हायचे आहे, आज आपल्या कडे नवी माहिती आहे त्याचा सुयोग्य वापर करून आपण आपले स्वास्थ पुन्हा मिळवू शकतो आणि याच भरवशावर आपण पुढे जायचे आहे ,

कसे ते आपण पुढच्या काही भागां तून अभ्यासू

क्रमश:

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+12

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

14 प्रतिक्रिया

///////////////
 1. Narendra Jangle

  मधुमेहीच्या प्रवासाचे, त्यावर होणार्या उपचारच्या भडिमारचे यथार्थ वर्णन आपण केले आहे. तुमचे लेख नेहमीच विचारपूवर्क आणि अभ्यासपूर्ण असतात. पुढचे लेख वाचण्याची खूप उत्सुकता आहे. कारण तुम्ही जाणलेच असेल की मी पण येक जुना कट्टर मधुमेही आहे.
  धन्यवाद !

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री तेजराजजी

   आपण पण मधुमेही तेव्हा आपले काही अनुभव असतील तर शेअर करा , तुमच्या नावानिशी / संदर्भा सहीत प्रसिद्ध करेन वाटल्यास आपण स्वतंत्र पणे लिहले तरी चालेल मी आवडीने वाचेन , माझ्या ब्लॉग च्या वेब साईट्च्या माध्यमातून त्याला ही प्रसिद्धी देईन.

   सुहास गोखले

   0
 2. अक्षय

  ताटभर जिलेबी😂😂!!! सर मी असेही वाचले आहे की अमेरिकन सरकार त्यांच्या मेडिकल बिल विषयी खूप चिंतेत आहे. जर त्यांनी मेडिकल बिल कमी केले नाही तर त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का येत्या काही वर्षात बसू शकतो म्हणून. शेवटची ओळ फारच मार्मिक आहे. You can’t use drugs to cure dietary disease. लेख नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!! पुढच्या लेखाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री अक्षयजी

   संपुर्ण वैद्यक विश्वात औषध कंपन्यांची एक जबरदस्त लॉबी वर्चस्व ठेऊन आहे हे उघड गुपित आहे ! त्यांच्या दबावामुळे बरेच काही घडते आहे , बरेच चांगले संशोधन झाकले जाते आहे … त्याबद्दल मी या लेखमालेतून लिहणार आहेच

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.