गोष्ट तशी जुनी दक्षिण भारतात घडलेली. त्या काळी दक्षिण भारतात ‘रमण’ नामक चक्रवर्ती महाराज राज्य करत होते, त्यांच्या राज्यात श्वेतमुर्ती नावाचे एक अवलिया शास्त्रज्ञ राहात होते , आपण अनेक वर्षे फार मोठे संशोधन करुन एक यंत्र तयार केले आहे , असा त्यांनी दावा केला होता. ( पण त्या यंत्राची मूळ संकल्पना दुसर्या एका ‘ गोपालकृष्ण उर्फ मीना’ नामक शास्त्रज्ञाची होती हे मात्र श्वेतमुर्तींनी कधीच कबूल केले नाही की त्या मूळ संशोधकाला त्याचे थोडेफार का होईना श्रेय द्यायचा दिलदारपणाही दाखवला नाही हा भाग वेगळा!).
श्वेतमुर्तींनी ते यंत्र रमण महाराजांच्या दरबारात सादर केले.
“महाराज, जर आपली आज्ञा असेल तर मी माझे नविन संशोधन आपल्या समोर सादर करावे म्हणतो”
“काय आहे काय हे?”
“महाराज, हे एक सत्यशोधक यंत्र (Lie Detector) आहे, ह्या यंत्राच्या साहाय्याने कोणतीही व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे एका क्षणार्धात ठरवता येते”
“श्वेतमुर्ती , अहो तुम्हाला तर आम्ही शहाणे, विद्वान समजत होतो आणि आज आपण हे काय खूळ घेऊन आला आहात”
“माफ करा महाराज, पण हे खूळ नाही तर माझ्या गेल्या दहा वर्षाच्या परिश्रमाचे फळ आहे”
“अहो पण एखादी व्यक्ती ‘खरे’ बोलते आहे की ‘खोटे’ असे यंत्र कधी ठरवू शकेल का? “
“महाराज, माझ्या मते ते तसे ठरवू शकते, आपण या यंत्राची चाचणी घेऊ शकता, मला खात्री आहे हे यंत्र अचूक पणे सांगेल ‘व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे’, त्यात चूक होणार नाही आणि जर यंत्राने एकदाही जरी चुकीचा संदेश दिला तरी खुशाल मला फासावर लटकवा”
रमण महाराजांचा श्वेतमुर्तीं च्या बोलण्यावर विश्वास बसला नसला तरी श्वेतमुर्ती ही काही चेष्टेवारी नेण्यासारखी साधीसुधी असामी नव्हती. रमण महाराजांनी मग त्या यंत्राची चाचणी घ्यायचे ठरवले.
यंत्र म्हणजे एक प्रकारचे हेल्मेट सारखे होते , ते डोक्यावर ठेवायचे आणि बोलायचे, जर ते यंत्र डोक्यावर असताना कोणी खोटे बोलले तर लगेच त्या यंत्रामधून ‘बीप- बीप’ असा आवाज यायचा आणि आणि जर खरे बोलले तर त्या यंत्रामधून ‘ट्रींग ट्रींग’ असा आवाज यायचा. रमण महाराजांनी काही दरबार्यांना खरे बोलायला आणि काहींना जाणून बुजून खोटे बोलायला लावले पण यंत्राने अगदी अचूक पणे खरे बोलणारे कोण आणि खोटे बोलणारे कोण हे क्षणार्धात ओळखले. यंत्र एकदाही चुकले नाही. सगळे थक्क झाले? आश्चर्यच आहे , काय अजब यंत्र आहे हे , कधी ऐकले नाही, कधी पाहिले नाही.. दरबार्यांत कुजबुज सुरु झाली, गलका वाढला तसा महाराज म्हणाले:
“शांत व्हा, श्वेतमुर्ती म्हणत आहेत तसे हे यंत्र काम करताना दिसते तर आहे पण याच्या आपण अजूनही काही चाचण्या घेतल्या पाहीजेत त्या शिवाय आपल्याला या यंत्राबद्दल ठोस असे काही सांगता येणार नाही”
मग रमण महाराजांनी प्रधानजी, सेनापती, मुख्य न्यायाधिश, शहरातील काही विद्वान, प्रतिष्ठीत अशा लोकांची एक समिती नेमली व त्यांना या यंत्राची कसून चाचणी घेऊन त्याच्या अचुकते बद्दल चा एक अहवाल देण्याची आज्ञा केली.
या समितीने मग महिनोनमहिने चाचण्या घेतल्या , घेतलेल्या हजारों चाचण्यात प्रत्येक वेळी त्या यंत्राने ‘खर्या – खोट्याचा’ अचूक निवाडा केला, यंत्र एकदाही चुकले नाही, अगदी एकदाही चुकले नाही. शेवटी त्या समितीची पुरी खात्री पटली कि हे यंत्र ‘व्यक्ती खरे बोलत आहे का खोटे याचा अगदी बिनचूक निवाडा करते’ आणि तसा अहवाल रमण महाराजांच्या दरबारात सादर केला गेला. महाराज खूष झाला. त्यांनी मग एक अधिकृत घोषणा केली:
“दरबारी जन आणि माझ्या प्रिय नागरिकांनो, परमेश्वरी कृपेने आज आपल्याला हे ‘सत्यशोधक’ यंत्र मिळाले आहे, या यंत्राच्या साह्याने व्यक्ती खरे बोलत आहे का खोटे हे क्षणार्धात कळू शकते. हे यंत्र आता आपण आपल्या न्यायालयात वापरायचे ठरवले आहे. न्यायालया पुढच्या प्रत्येक खटल्यात आता या यंत्राचा वापर सुरु होणार आहे. या यंत्रापुढे आता कोणाचेही खोटे टिकणार नाही, कोणी आता खोटे बोलण्यास बोलण्यास धजावणार नाही. आपण सर्व प्रकारच्या खटल्यांत अचूक न्यायनिवाडा करु शकू. आता आरोपीला तू ‘तू गुन्हा केलास का नाही’ एव्हढेच विचारायचे आणि यंत्र काय संकेत देत हे बघायचे. बस्स, खटल्याचा निकाल काही सेकंदात लागेल. आता जबान्या, साक्षी पुरावे, युक्तीवाद या सार्यांची आवश्यकताच उरली नाही, या यंत्रामुळे आपली न्यायदान प्रक्रिया अत्यंत वेगवान व निष:पक्षपाती होणार आहे. आपल्या न्यायालयांत साचून असलेले हजारों खटले आता झपाट्याने निकालात निघतील, लोकांना वेळेवर न्याय मिळेल आणि ह्या यंत्रापुढे खोटे टिकत नसल्याने , आता कोणी गुन्हे करायलाही धजावणार नाही, खर्या अर्थाने न्यायाचे राज्य प्रस्थापित होणार आहे. श्वेतमुर्तींनी अनेक वर्ष मेहेनत करुन हे यंत्र तयार केले आहे त्याचे मी मोठे कौतुक करतो आणि लवकरच त्यांचा एक जाहीर सत्कार ही करायचे ठरवले आहे”
दुसर्या दिवशीपासून त्या यंत्राचा विधिवत वापर सुरु झाला. आरोपीला न्यायालयात दाखल करायचे, त्याच्या डोक्यावर ते यंत्र ठेवायचे आणि प्रश्न विचारायचे , यंत्र काय आवाज करते ते ऐकायचे , ‘बीप- बीप’ गुन्हा सिद्ध आणि ‘ट्रींग ट्रींग’ आरोपी निर्दोष, झाला न्यायनिवाडा! यंत्राने कधीही दगा दिला नाही..
न्यायनिवाडा असाच अव्याहत काही वर्षे चालू राहीला, तसा तो अजूनही अनेक वर्षे चालू शकला असता म्हणा पण एके दिवशी जे आक्रित घडले ते घडले नसते तर … . त्याचे असे झाले..
(काय आक्रित घडल त्ये बैजवार म्होरल्या भागात सांगतू .. , पावनं जरा त्ये चा च बगशीला का नाय .. लय टायम झाला , कवाधरनं वाट बघतूया मी.. आत्ता चा सांगाल मग चा सांगाल, ल्येको , फुकाट गजाली ऐकाया जमून रायला व्हय रं , लय सोकावलीत बेनीं… ऑ … पयला ते जरा कडक ‘मगदूम चा’ सांगा आन डब्बल साकर टाकून … त्या परास किक नाय येनार ..)
क्रमश: पुढच्या भागात .. खाल्ल्या अंगालाच हाय जनु, लगीच घावल बगा…
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020