“महाराज”

घसा साफ करत श्वेतमुर्ती म्हणाले..

“सत्यम शिवम सुंदरम म्हणजेच ‘The ultimate existential truth is also the extreme of the goodness and the beauty’”

या लेखमालेतले पहीले दोन भाग इथे वाचा:

लाय डिटेक्टरचा किस्सा  – १

लाय डिटेक्टरचा किस्सा  – २

“सत्य हे जगाचे परमतत्व आहे. सत्य नैसर्गिक आहे. सत्य हे शाश्वत आहे, ते अचल आहे, स्वयंप्रकाशी आहे , परमेश्वराचे एक दुसरे रुप आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना सत्य प्रिय असते. आपण स्वत: कितिही खोटारडे पणा करत असलो तरी बाकीच्यांनी आपल्याशी खरेच बोलावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, नव्हे आग्रह असतो. खोटारडेपणा करुन , लांड्यालबाड्या करुन ग्राहकांना हरघडी फसवणार्‍या व्यापार्‍याला त्याच्या नोकराने केलेला खोटारडेपणा मात्र अजिबात सहन होत नाही हे आपण सर्व पाहतो, अनुभवतो”

“सत्य नैसर्गिक आहे आणि असत्य अनैसर्गिक आहे. कोणत्याही प्रकारच्या अनैसर्गिक गोष्टीला आपले शरीर आणि मन दोघांचा कडाडून विरोध असतो. जेव्हा आपण खोटे बोलतो तेव्हाही हा विरोध होतोच होतो, वस्तुत: हा विरोध म्हणजे सत्य आणि असत्य यांचे आपल्या मनात चालू असलेले द्वंद्व असते. त्याचा आपल्या मनावर जबरदस्त ताण पड्तो, खोटे बोलताना व्यक्ति वरवर कितीही शांत वाटली त्याच्या मनात फार मोठी खळबळ माजलेली असते. “

“खोटे बोलताना कितीही निर्विकारपणे, आत्मविश्वासाने, अभिनयनैपुण्य दाखवत बोलले तरी आत मध्ये कोठे तरी व्यक्तीला त्याचे मन सतत बजावत असते – ‘अरे हे खोटे बोलत आहेस तू’ . खोटे बोलण्याला व्यक्ती कितीही निर्ढावलेली असली तरी मनात चालू असलेले हे सत्य-असत्याचे द्वंद्व त्याला थांबवता येत नाही. ‘असत्या’ ला होणार विरोध हा स्वाभाविक असल्याने तो  होण्याचे टाळणेही आपल्या कोणाच्याच नियंत्रणात नसते.”

“ह्या निसर्गत:च निर्माण झालेला विरोधाचे परिणाम आपल्या शरीरावर व मनावर झाल्याशिवाय राहात नाही आणि हे परिणाम अनेक मार्गाने दृगोच्चर होतात”

बर्‍याच वेळा व्यक्ती खोटे बोलते तेव्हा काही बाह्य लक्षणे दिसून येतात. ही लक्षणें म्हणजे:

  • हात , पाय अशा अवयवांना कंप सुटणे, किंवा त्यांची सुक्ष्म का होईना पण अनियंत्रीत अशी हालचाल होणे.
  • अतिरिक्त घाम येणे.
  • डोळ्यांच्या बुबुळांची किंवा काही वेळा पापण्यांची ही विषीष्ठ हालचाल होणे.
  • दुसर्‍याच्या डोळ्याला डोळा देण्याचे अवसान गळल्यामुळे , नजर आपोआपच खाली झुकणे.
  • तोंडाला कोरड पडणे.
  • आवाजात कंप , बोलण्यात अड्खळणे, जीभ चाचरणे क्वचित प्रसंगी बोलण्याची गती वाढणे वा आवाजाचा नैसर्गिक पोत बदलणे.

पण ह्याचवेळी व्यक्तीत इतरही काही बदल होतात जे बाह्य लक्षणांत मोडत नाहीत. याला आपण दुसर्‍या टप्प्यांवरचे बदल म्हणू. हे बदल वरकरणी दिसत नसले तरी उपकरणांच्या साह्याने मोजता येतात, उदा:

  • हृदयाचे ठोके वाढणे
  • श्वासोश्वासाची गती वाढणे किंवा त्यात अनियमितता येणे
  • गॅलव्हॉनिक स्किन रेझिसटन्स मध्ये बदल होणे

“मी केलेल्या संशोधनात माझ्या असे लक्षात आले की, ही बाह्य लक्षणें व दुसर्‍या टप्प्यांवरची अंतर्गत लक्षणे केवळ खोटे बोलतानाच आढळतात असे नाही तर व्यक्ती घाबरलेली असेल, उदास , दु:खी कष्टी, निराश, खंगलेली , उद्वीग्न , भांबावलेली, वैचारीक गोंधळ उडालेली, अंमली पदार्थाच्या प्रभावा खाली, रागावलेली अशी असली तरी सुद्धा बर्‍याच वेळा दिसून येतात”

“म्हणून केवळ अशा बाह्य आणि दुसर्‍या टप्प्यांवरच्या लक्षणांवर खरे खोटे ठरवणे धोक्याचे ठरेल.  त्यासाठी आणखी काही अती सुक्ष्म लक्षणे असू शकतील का याचा शोध मी घेतला तेव्हा माझ्या लक्षात आले कि, बरेच काही सुक्ष्म बदल आपल्या शरीरात विषेषत: मेंदूत होत असतात, खोटे बोलण्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या मेंदूत काही रासायनिक बदल होतात,  हे बदल अत्यंत सुक्ष्म असे असतात ,मी ह्याला तिसर्‍या टप्प्यांवरची लक्षणें म्हणतो.”


“बाह्य लक्षणें व दुसर्‍या ट्प्प्यांवरची लक्षणें मी सांगीतल्या प्रमाणे फसवी असू शकतात, पण ही तिसर्‍या टप्प्यांवरची लक्षणे मात्र हा फरक स्पष्ट करतात. म्हणूनच ती विचारात घेतल्या शिवाय आपल्या ‘खर्‍या –खोट्या’ चा निवाडा करता येणे शक्य होणार नाही आणि म्हणूनच माझे सत्यशोधक यंत्र हे असले अतिसूक्ष्म बदलही अचूक पणे मोजून मगच निर्णय देते”

 

 

 
“जेव्हा साधी , सरळ,  सज्जन, पापभिरु म्हणतात तशा प्रकारातली व्यक्ती जेव्हा खोटे बोलते तेव्हा मी म्हणतो ती सर्व बाह्य ,दुसर्‍या टप्प्यांवरची आणि तिसर्‍या टप्प्यांवरची सर्वच लक्षणे त्या व्यक्तीत दिसतातच. मात्र जी व्यक्ती खोटे बोलण्याला निर्ढावलेली असते ती व्यक्ती मात्र सर्व बाह्य लक्षणे व काही दुसर्‍या टप्प्यांवरची लक्षणें काहीशा सरावाने / प्रयत्नाने दड्वू शकते. पण असे जरी असले तरी, अंतर्मनात चालू असलेला खेळ मात्र कितीही आणि कसाही प्रयत्न केला तरीही थांबवता येत नाही, तिसर्‍या टप्प्यांवरची लक्षणें दडपणे केवळ अशक्य आहे.”

“ह्या अति सुक्ष्म तिसर्‍या टप्प्यावरच्या बदलांचा विचार केला असल्यानेच माझ्या ‘सत्यशोधक’ यंत्रा द्वारे आपल्याला कमालीची अचुकता,  सातत्याने मिळत आली आहे”

“जेव्हा व्यक्ती खरे बोलते तेव्हा हे सत्य-असत्याचे द्वंद्व होण्याचे काहीच कारण नसते त्यामुळे कोणतेही दृष्य परिणाम दिसत नाहीत तसेच मेंदूतही कोणतेही रासायनिक बदल होत नाहीत त्यामुळे तिसर्‍या टप्प्यावरचे सुक्ष्म बदल ही होत नाहीत, आणि असे कोणतेही बदल होत नाहीत म्हणजेच व्यक्ती खरे बोलत आहे”

श्वेतमुर्ती  बोलत होते आणि सारा दरबार स्तब्ध होता..

“एव्हाना  आपल्या लक्षात आले असेल की ,सत्य-असत्याचे द्वंद्व मनात निर्माण झाले तरच मेंदूत काही रासायनिक बदल होतात, अन्यथा नाही, आणि हे द्वंद्व केव्हा निर्माण होईल ? जेव्हा त्या व्यक्तीला हे मनोमन मान्य असेल की ती खोटे बोलत आहे, अन्यथा नाही. एखाद्या व्यक्तीला आपण खोटे बोलतोय ते पूर्णपणे ठाउक असूनही ती लोकांना ते सत्य आहे असे भासवते तेव्हा त्याचे अंतर्मन मात्र ते मान्य करत नाही , त्यातूनच हे सत्य-असत्याचे द्वंद्व निर्माण होते. एखादी गोष्ट सार्‍या दुनियेच्या दृष्टीने खोटे बोलणे असेल पण जर बोलणार्‍यला मात्र मनोमन असे वाटत असेल की तो जे बोलतो आहे ते सत्यच आहे त्या वेळीही सत्य-असत्याचे द्वंद्व निर्माणच होणार नाही.”

“आरोपीने केलेले कृत्य आपल्या सार्‍यांच्या दृष्टीने  एक दिवसा ढवळ्या केलेला निर्घृण खून असला तरी आरोपीला हा खून आहे असे वाटतच नाही, आरोपीला हे मान्य आहे की त्याने केलेल्या चाकूच्या वाराने एक व्यक्ती मृत झाली , त्यामुळे आरोपीच्या दृष्टिने ते सत्यच आहे, पण  ‘मी खून केला नाही” असे तो जेव्हा म्हणत होता तेव्हा ते म्हणणेही त्याच्या साठी एक सत्यच, हो अगदी निखळ सत्यच होते, आणि म्हणूनच त्याच्या मेंदूत सत्य-असत्याचे द्वंद्व मूळात निर्माण झालेच नाही आणि असत्य कथनातून होणारे सर्व बाह्य व दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यांवरचे कोणतेही बदल आरोपीत झालेच नाहीत , परिणामत: आपल्या सत्यशोधक यंत्राने ही तो खरे बोलत असल्याचा निर्वाळा दिला आहे”

म्हणजे एव्हढे बोलून श्वेतमुर्ती रमण महाराजांना म्हणाले,

“महाराज,आपली अनुमती असेल तर मी आरोपीला काही प्रश्न विचारतो.”

“मंजूर”

श्वेतमुर्ती त्या आरोपी जवळ आले, ते सत्यशोधक यंत्र अजूनही आरोपीच्या डोक्यावर होते , ते हलक्या हाताने दुर करुन , श्वेतमुर्ती त्या आरोपीला म्हणाले.

“जाऊ दे यंत्र, आता त्याची काहीही आवश्यकता नाही. आता मी तुला फार नाही त्रास देणार , फक्त एकच एक प्रश्न विचारतो..”

श्वेतमुर्ती नी आरोपीच्या खांद्यावर हलकासा पण आश्वासक हात ठेवत विचारले…..

शुभं भवतु

मूड शिरेस असल्याने ‘चा’ आनी बिडीकाडी, गायछाप सग्ळे कॅन्डसल , आता मंड्ळी जरा धक्क्यातून सावरली की 4 था भाग टाकतू कसे? त्यो बी असाच लगीच घावेल असा , खालच्या अंगाला, ईंजान आनून ठेवलया रुळावर , डब्बं जोडायचा अवकाश गाडी निघालीच म्हणून समजा काय?


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.