सतीश.. मला भेटला त्यावेळी तीन वेळा हातातोंडाशी आलेली परदेशगमनाची संधी हुकल्यामुळे निराश अवस्थेत होता…

माझा बेंगलोरचा ट्रेनिंग प्रोग्राम चालू असतानाची ही कथा.

ट्रेनिंगच्या दरम्यान एक सुटटीचा दिवस होता,सणसणीत नाष्टा हादडून मी नुकताच पेपर उघडला तोच ….

“गुड मॉर्नींग सर..” सतीश ,  ट्रेनिंग प्रोग्रामचा विदयार्थी, पुण्याचा , एकदम स्मार्ट, तल्लख , ट्रेनिंग मन लावून ऐकणारा.

“सतीश, आज सुटटीचा दिवस, विश्रांतीचा दिवस, आज अभ्यास नाही ,  डिफिकल्टीज नाही..”

‘नाही सर, मी त्या साठी नाही आलोय, मला तुमच्या कडून दुसरीच मदत हवी आहे”

“कोणती मदत?”

“सर तुम्ही ज्योतिष बघता असे मला ‘सप्तथी राजू’ म्हणाला”

“‘सप्तथी राजू’ , येस,माझा हैद्राबाद च्या कोर्सचा विदयार्थी, पण तो तुझ्या कसा ओळखीचा?”

“तो पूर्वी विप्रो मध्येच होता, आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा”

“ओके, बोल काय मदत हवी आहे”

“सर, गेले दोन वर्षे मी परदेशी जाण्यासाठी धडपडतोय, माझ्या बरोबरच्या सर्वांना चान्स मिळाला, मीच एकटाच मागे राहिलोय, तसा माझ्या परफॉरमन्स उत्तम आहे, तीन वेळा सिलेकशन झाले, पण ऐन वेळी कुठे माशी शिंकली कोण जाणे, प्रत्येक वेळी हाता तोंडाशी आलेला घास हिसकावला गेला”

“होते असे बर्‍याच वेळा, त्यात तुझा दोष नाही, पण ती वेळ ही यायला पाहिजे ना?”

“तिच वेळ कधी येणार ते जरा सांगता का?”

“तुझी जन्मतारीख, जन्मवेळ , जन्मगाव सांग म्हणजे पत्रिका मांडता येईल?

“सर पण जन्मवेळेचा मोठा घोळ आहे”

“तो निस्तरता येईल, पण त्यात वेळ जाईल, तेव्हा आपण प्रश्न कुंडलीच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर शोधु , चालेल?”

“सर, तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे, माझा तुमच्यावर विश्वास आहे, सप्तथी राजू बरेच सांगत होता तुमच्या बददल”

“सतीश तु जरा शांतपणे तुझा प्रश्न मनात घोळवून एक संख्या मला सांग जी १ ते २४९ मधील असली पाहिजे, पण जी संख्या सहज सुचेल, तीच सांग, तुझा लकी नंबर , गाडीचा नबर असे नको”

सतीश ने क्षणभर विचार केला व नंबर दिला: १२२.हया नंबरवर आधारित एक प्रश्नकुंडली बनवली ती खाली छापली आहे.

प्रश्नकुंडली चा डेटा:
होरारी नंबर: १२२
वेळ: ०९:०९:४१ सकाळ
दिनांक: ०७ सप्टेंबर २०११
स्थळ: बेंगलोर
अयनांश: कृष्णमुर्ती २३ :५५: ४

कोणतीही प्रश्नकुंडली सोडवताना सर्वप्रथम बघायचे ते जातकाची पश्नाची उत्तर जाणुन घ्यायची तळमळ. सहज (कॅज्युअली), आपलं दिसला  ज्योतिषी मार टप्पल अशा पदधतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरें बरोबर येत नाहीत, प्रश्न खरोखरीच तातडीचा असावा, प्रश्नकर्ता त्यात गुंतलेला असावा. उगाचच ज्याच्याशी आपला काही संबंध नाही असे प्रश्न विचारू नयेत.

प्रश्नकुंडली तयार होताच सर्वात प्रथम बघायचा तो चंद्र. हा चंद्र कोणत्या घरात आहे, कोणाच्या नक्षत्रात आहे यावरून जातकाच्या मनात काय घोळते आहे ते कळते, प्रश्नाचा रोख बरोबर आहे का ते ठरवता येते.

सतीशच्या प्रश्नकुंडलीत चंद्र ३ र्‍या घरात, चंद्र लाभेश (११), शुक्राच्या नक्षत्रात,  शुक्र व्ययात (१२) धनेश (२) व भाग्येश (९). म्हणजे चंद्र ३,११,१२,२,९ या भावांचा कार्येश!

मंडळी बघा सतीश ने प्रश्न किती तळमळीने विचारला होता ते, परदेशगमनासाठी लागणारी सर्व म्हणजे ३,९,१२ यात आलीच शिवाय २,११ ही अर्थलाभाची भककम स्थानें पण आहेत (नाहीतरी सतीश परदेशात नोटा छापायला जाणार का काय झाडू मारायला जाणार?)

“चला, इथे पहिला टप्पा पार पडला, प्रश्न जुन्युइन आहे, मनापासुन, कळकळीने विचारला आहे. जर चंद्र भलतीच कोणती स्थाने दाखवत असेल तर? असे होते बर्‍याचवेळा, जातकाच्या मनात दुसरेच  काहीतरी घोळत असते, प्रश्न तिसराच कोणतातरी विचारलेला असतो, चंद्र हा गोंधळ दाखवतोच. अशा वेळी प्रश्नाचे उत्तर देउू नये, जातकाला काही वेळा नंतर, मनातले ईतर विचार बाजुला करून , फकत समोरच्या पश्नावरच मन केंद्रित करायला सांगून त्याच्या कडून दुसरा नंबर घ्यावा.

आता पुढचा टप्पा. परदेशी जायचे मनात तर आहे, पण जायला मिळेल का? याचे उत्तर १२ व्या स्थानाचा सबलॉर्ड देणार. हा सबलॉर्ड जर परदेशगमनासाठी लागणार्‍या म्हणजेच ३,९,१२ यापैकी एकाचा तरी कार्येश असावा.(त्यातही ९ व्या स्थानाचा जे लांबचा, अनोळखी मुलखातला प्रवास दर्शवते). चला बघूया सतीशचा हा १२ व्या घराचा सबलॉर्ड काय म्हणतो आहे ते.

हा सबलॉर्ड आहे  बुध, जो लाभात (११) असुन लग्नेश (१) व दशमेश (१०) आहे, बुध केतुच्या नक्षत्रात असुन केतु भाग्यात (९) आहे. चला म्हणजे बुध केतुच्या माध्यमातुन ९ व्या स्थानाचा कार्येश होतो, म्हणजे १२ व्या स्थानाच्या सब ने ‘हिरवा झेंडा’ दाखवला आहे.

पण सतीश जाणार तर केव्हा जाणार , हयाचे उत्तर दशा अंतर्दशा विदशा स्वामी देणार, आगामी काळातल्या दशा अनुकुल असायला हव्या नाहीतर सगळेच मुसळ केरात!

प्रश्नवेळी कुंडलीत शुक्र महादशा चालू होती ती १८ आगष्ट २०२१ पर्यंत. आता या दशेत सतीश जाणार का? बघुया. शुक्र व्ययात (१२), धनेश (२) व भाग्येश (९) शुक्र स्वत:च्याच नक्षत्रात म्हणजे ‘पोझिशनल स्टॅटस’, आणि काय पाहिजे, परदेश गमनासाठी शुक्राचा सणसणीत होकार. पण शुक्राचा सबलॉर्ड पण बघितला पाहिजे, बाप्पु, नाहीतर ओम फस्स ! शुक्राचा सब आहे केतु , जो आपण आधीच बघितला आहे, म्हणजे शुक्र महाराज प्रसन्न आहेत, ते सतीशला परदेशात धाडणारच. पण केव्हा?

चला आता शुक्रच्या दशेतल्या अंतर्दशा कोणत्या अनुकुल आहेत ते पाहू.

प्रश्नकाळी राहू महाराजांची अंतर्दशा १९ अॅकटोबर २०११ पर्यंतचालु होती, राहु ३ र्‍या (३) स्थानात , बुधाच्या नक्षत्रात , तसे म्हणले तर राहु अनुकुल आहे तरी राहु एवढा भककम वाटला नाही जो सतीशला विमानात बसवेल शिवाय त्यापुढची गुरुची दणकेबाज अंतर्दशा मला जास्त आश्वासक वाटली.म्हणजे राहु अंतर्दशा सोडावी लागणार. आता पुढची अंतर्दशा गुरू महाराजांची, काय म्हणताहेत गुरू महाराज?

गुरू अंतर्दशा १६ जून २०१४ पर्यंत, गुरू सप्तमात (७), सुखेश (४) आणि सप्तमेश, गुरू शुक्राच्या नक्षत्रात जो १२, २,९ चा कार्येश आहे. गुरूचा सब चंद्र आहे, जो स्वत:च १२,३,९,२,११ चा कार्येश आहे. म्हणजे गुरु महाराज अनुकुल आहेत. ते सतीशला विमानात बशिवणारच!

पण गुरू अंतर्दशा १६ जून २०१४ म्हणजे तब्बल तीन वर्षे शिल्लक आहेत, एवढा मोठा कालावधीत सतीश जाणार हे नककी पण हे फारच स्थूल भाकित झाले नाही का? चला आता जरा सुक्ष्मात जावू. गुरू अंतर्दशेत गुरू विदशा २६ फेब्रुवारी २०१२ पर्यंत, गुरू इतका छान आहे की त्याची विदशाच सतीश ला परदेशात धाडणार, म्हणजे २६ फेब्रुवारी २०१२ , येत्या पाच महिन्यात सतीश  विमानात !

हंगाश्शी  आता जरा आवाकयातले वाटते ना ! पण आम्ही पडलो के,पी, वाले, एवढयावरच थांबणार, शक्यच नाही! चला गुरू विदशेतली सुक्ष्म दशा पाहू.

सुक्ष्म दशा पाहताना मी (३) भावाचा जास्त विचार करायचे ठरवले, ३ रा भाव घरापासून दूर वास्तव्य दर्शवतो. पहिली सुक्ष्म दशा गुरूचीच होती, पण गुरु ३ र्‍या भावाच्या तसा विरोधातच आहे कारण तो स्वत: ४ थ्या भावातच आहे, त्यामुळे
गुरू सुक्ष्म दशा सोडावी लागेल.

पुढची सुक्ष्म दशा शनी महाराजांची,  २६ नोव्हेंबर २०११ पर्यंत, शनी महाराज व्ययात (१२), पंचमेश (५) व षष्ठेश (६)  , शनी चंद्राच्या नक्षत्रात म्हणजे (३, ११), शनीचा सब शुक्र परत (१२,९) म्हणजे म्हणजे शेवटी शनी महाराज सतीश ला परदेशी नेणार तर!

हा कालावधी येतो ५ नोव्हेंबर २०११ ते २६ नोव्हेंबर २०११!

आता एवढयावर भागलं असते , पण नेमका दिवस काढायची जरा जास्तच खुमखुमी तेव्हा चला आणखी सुक्ष्मात जावू!

आता पुढच्या प्रत्यंतर दशांचा विचार न करता मी सरळ रवी चे भ्रमण बघायचे ठरवले. ५ नोव्हेंबर २०११ ते २६ नोव्हेंबर २०११ या कालावधीत रवी तुळ व  वृश्चिकेत असतो, आपली दशा, अंतर्दशा, विदशा, सुक्ष्मदशा साखळी ही शुक्र गुरू गुरु शनी अशी आहे. तुळेत मला हे नेमके कॉम्बीनेशन मिळाले! रवी तुळेत (शुक्र),  गुरू च्या नक्षत्रात , शनीच्या सब मध्ये बरोब्बर ९ व १० नोव्हेंबर ला असतो.म्हणजेच सतीशराव ९ -१० नोब्हेंबर ला उडान भरणार हे नककी!!

तसे मी सतीश ला सांगताच त्याने माझे पायच धरले!  मी म्हणालो “जा आता तयारीला लाग, भाग्योदय आता फार लांब नाही”.

५ ऑकटोबर ला सतीश फोन आला

“सर, माझे ऑनसाईट चे सिलेक्शन झाले…”

२२ ऑक्टोबर ला सतीशचा फोन  “सर तिकीट कन्फर्म  झाली, १० नोव्हेंबरची आहे फ्लाईट ”

नोव्हेंबरला सतीशचा फोन

“सर, विमानतळा वरूनच बोलतोय, तुमचे भविष्य १००%  नाही तर २००% बरोबर!”

सतीशला प्रवासाच्या शुभेच्छा देतानाच म्हणालो ..

“अरे , धन्यवाद मला कशाला , आमच्या गुरुजींना कृष्णमुर्तींना दे, त्यांच्या के.पी, ला दे..”

त्या वेळची ग्रहांची स्थिती पहा जरा. दशास्वामी शुक्र,  शनी (सुक्ष्म दशा स्वामी)  च्या नक्षत्रात, गुरूच्या (अंतर्दशा व विदशा स्वामी) सब मध्ये. बुध शुक्र युती मध्ये अगदी पूर्ण अंशातच, गुरू स्वत: केतुच्या नक्षत्रात, शनीच्या सब मध्ये, शनी बुधाच्या राशीत शुक्राच्या सब मध्ये, रवी शुक्राच्या राशीत, गुरूच्या नक्षत्रात, शनीच्या सब मध्ये, चंद्र शुक्राच्या नक्षत्रात गुरुच्या सब मध्ये, बुध शनीच्या नक्षत्रात  गुरुच्या सब मध्ये आणि वार होता गुरूवार!

ज्योतिष हे थोतांड आहे म्हणणार्‍यांनो हा काय निव्वळ योगायोग असू शकेल?

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  Excellent case study!

  1) पण “गुरु ३ र्‍या भावाच्या तसा विरोधातच आहे कारण तो स्वत: ४ थ्या भावातच आहे, त्यामुळे गुरू सुक्ष्म दशा सोडावी लागेल.” असे आहे तर आपण गुरूच्या अंतर्दशेचा विचार का केला?
  2) हे लिहिण्यासाठी आपल्याला वेळ लागला असेल, पण हे भाकित पाच-एक मिनिटांत आपण वर्तवले असेल ना?
  3) आजकाल तुम्ही कृष्णमूर्ती पद्धती वापरत नाहीत का?
  4) कृपया आणखीन कृष्णमूर्ती केस स्टडीज् लिहाव्यात ही विनंती.

  धन्यवाद,
  प्राणेश काशीकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी ,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   दशा – अंतर्दशा- विदशा- सुक्ष्मदशा – प्राणदशा यांचा विचार वेगवेगळा करावा लागतो. अंतर्दशा निवडायचे निकष वेगळे असतात तर सुक्ष्म्नदशा निवडायचे नियम पण वेगळे अस्तात. ग्रह एकाच वेळी अनेक भावांचा कार्येश असतो, तो ग्रह महादशा स्वामी आहे का अंतर्दशास्वामी आहे की विदशा स्वामी आहे या प्रमाणे त्या ग्रहाच्या कार्येशत्वातल्या कोणत्या घटकाला जास्त महत्व द्यायचे ते ठरते. या केसस्ट्डी मध्ये गुरुच्या कार्येशत्वाचा असाच विचार केला आहे , गुरु जेव्हा अंतर्दशा स्वामी म्हणूण विचारात घेतला तेव्हा त्याच्या कार्थेशत्वातले १२,९ हे घटक जास्त प्राधान्याने विचारत घेतले गेले पण सुक्ष्मदशा पाहताना १२ , ९ पेक्षा ३ स्थानाच्या भक्कम कार्येशाची गरज होती, निकष बदलले होते त्यामुळे आता गुरु पेक्षा दुसरा कोणता तरी ग्रह सुक्ष्मदशा स्वामी म्हणून निवडावा लागला.

   मी पारंपरीक, कृष्णमुर्ती , पाश्चात्य , युरेनियन असा अनेक पद्धती वापरतो , जशी गरज असेल तसे. एकाच पद्धतीचा आग्रह धरलेलेआ नाही.

   वेळ मिळाला तर काही नविन लिहिन.

   कळावे,
   सुहास गोखले

   +2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.