चला तर पाहुयात , संजू बाबाची ईच्छा पूर्ण होते का नाही ?

या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:

संजुबाबा चे उड्डान ! (भाग – १)

‘संजुबाबा’ च्या ‘परदेश गमन’ या प्रश्ना साठी केलेली कुंडली पुन्हा एकदा देत आहे …

 

 

कुंडलीचा (टाईम चार्ट)  तपशील:

दिनांक: ०७ जुन २०१६ , मंगळवार
वेळ: १९:४२:३८
स्थळ: गंगापुर रोड , नाशिक
अयनांश: न्यू के.पी. २३:५९:४७

लगे हाथ ,  ग्रहांच्या कार्येशत्वाच टेबल आणि भावांच्या कार्येश ग्रहांचे टेबल पण  पाहून घेऊ.

 

संजुबाबा परदेशी जाणार का नाही हे आपल्याला व्यय स्थानाचा (१२‌) सब सांगणार आहे.

प्रश्नकुंडली (किंवा प्रश्नासाठी केलेली ‘समय कुंडली’ ) बघताना , चंद्राची साक्ष घेतल्या नंतर पुढच्या पायरीवर  प्रश्नाच्या संबधीत प्रमुख भावाचा सब तपासायचा असतो. मात्र इथे एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची म्हणजे हा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा. तो सब स्वत: वक्री असला तरी चालेल. (हा नियम फक्त प्रश्नकुंडली साठीच आहे, जन्मकुंडली साठी हे सारे करण्याची आवश्यकता नाही)

जर मुख्य भावाचा सब वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर प्रश्ना मध्ये अपेक्षित असलेली घटना घडणार नाही. मग पुढे जाऊन पत्रिकेचे  विश्लेशण करायची आवश्यकता नाही. केस इथेच बंद करायची.

पण अपेक्षीत घटना घडणार नाही म्हणजे ती जातकाच्या आयुष्यात कधीच घडणार नाही असा अर्थ अजिबात नाही. प्रश्नकुंडली साधारणे पणे तीन ते सहा महीन्या पर्यंतचा वेध घेऊ शकते त्यामुळे येत्या तीन – सहा महीन्यात घटना घडणार नाही असा याचा अर्थ घ्यायचा.

अपेक्षित घटना कदाचित सहा महिन्यानंतर घडू ही शकेल पण त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही इतकेच.

प्रश्न विचारते वेळी जर प्रमुख भावाचा सब स्वत: वक्री असेल तर ? अशा वेळी हा सब मार्गी झाल्या शिवाय घटना घडणार नाही (जर घटना घडणार असेल तर!)

आत्ताच्या पत्रिकेत व्ययस्थानाचा (१२) सब बुध आहे, बुध स्वत: मार्गी आहे आणि तो रवीच्या नक्षत्रात आहे , रवी कायमच मार्गी असल्याने , बुध वक्री ग्रहाच्या नक्षत्रात पण नाही.

बुध: पंचमात (५), बुधाच्या राशीं सप्तम  (७‌) आणि दशम (१०‌) स्थानी, बुध रवीच्या नक्षत्रात, रवी षष्ठात  (६), रवी नवमेश (९)  म्हणजे बुधाचे कार्येशत्व असे असेल .

बुध:   ६ / ५  / ९ / ७ , १०

प्रश्ना संबधीत मुख्य भावाचा सब बुध मार्गी आहे , तो मार्गी ग्रहाच्या नक्षत्रात आहे आणि तो प्रश्नाच्या संदर्भातल्या नवम (९‌) आणि सप्तम (७) स्थानाचा कार्येश आहे.  संजुबाबा जपानला जाणार आहे ते कराटेच्या अ‍ॅडव्हांस ट्रेनिंग साठी , म्हणजे स्पोर्ट्स ! बुध खेळा साठीच्या पंचम (५) भावाचा पण कार्येश आहे !!

या जोरावर आपण पुढे जाऊ शकतो.

अर्थात प्रश्ना संदर्भातल्या मुख्य भावाचा सब अनुकूल आहे म्हणजे घटना घडणारच असे मात्र नाही. घटना घडण्यासाठी योग्य त्या ग्रहांच्या दशा- अंतर्दशा – विदशा असायला हव्यात आणि ही साख़ळी वेळेत पूर्ण व्हायला हवी. आता वेळेत म्हणजे , प्रश्नकुंडली साठी सामान्यता: आपली जी टाईम फ्रेम आहे घेतो ती म्हणजे ‘तीन ते सहा महीने’ .

तेव्हा आता या टाईम फ्रेम मध्ये येणार्‍या दशा –अंतर्दशा- विदशा तपाऊन ठरवूया की हे संजु बाबा कराटे ट्रेनिंग ला जपानला जाणार की असेच नाशकात बुलेट फिरवत राहणार !

तेव्हा एक नजर दशा – अंतर्दशा – विदशांच्या तक्त्यावर.

 

 

प्रश्न विचारते वेळी गुरु ची महादशा चालू आहे, ती २३ ऑगष्ट २०२४ पर्यंत आहे, पूर्ण आठ वर्षे आहेत ! बराच मोठा कालावधी आहे हा.

महादशा स्वामी गुरुचे कार्येशत्व पाहुया:

गुरु: गुरु नवमात  (९) , लग्नेश (१) आणि चतुर्थेश (४), गुरु  शुक्राच्या नक्षत्रात , शुक्र षष्ठात (६) , षष्ठेश (६‌) आणि लाभेश (११) .

गुरु: ६ / ९ /  ६ ,११ / १, ४

महादशा स्वामी गुरु दूर अंतरावरच्या प्रवासाचा म्हणजेच नवमाचा (९)  कार्येश आहेच शिवाय इच्छापूर्ती च्या म्हणजे लाभ स्थानाचा (११) पण कार्येश होत आहे. शिवाय शिक्षणासाठीच्या चतुर्थ (४) स्थानाचा कार्येश आहे.

दशा स्वामी गुरु अनुकूल आहे पण दशास्वामीचा ‘सब’ काय म्हणतोय? गुरु स्वत:च्याच म्हणजे गुरुच्याच सब मध्ये आहे, प्रश्नच मिटला!

गुरु महादशा स्वामी असा शिक्षणा (ट्रेनिंग) साठी परदेश गमनाला अनुकूल आहे.

हा गुरु नेपचुनच्या अंशात्मक प्रतियोगात आहे , नेपच्युन त्रितीय  भावात आहे, त्रितिय भावातला नेपच्युन नेहमीच परदेश गमनाचे योग देतो!

आता या गुरु महादशेतल्या अंतर्दशा पाहावयाच्या.

प्रश्न विचारते वेळी गुरुच्या महादशेत , केतु ची अंतर्दशा चालू आहे आणि ती ५ जुलै २०१६ ला संपणार  आहे  म्हणजे  प्रश्न विचारलेल्या दिवसापासुन अवघ्या एक महिन्याच्या आत, इतक्या कमी वेळात संजुबाबाचे परदेशगमन घडणे केवळ काहीसे अवघडच त्यामुळे ही केतु च्या अंतर्दशेचा आत्ताच विचार करायला नको.

केतु नंतरची  अंतर्दशा येणार ती शुक्राची , ती ६ मार्च २०१९ पर्यंत राहणार आहे. हा साधारण पावणे तीन वर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे अपेक्षीत घटना घडणार असेल तर ती ह्याच शुक्राच्या अंतर्दशेत.

प्रश्नकुंडलीचा ‘अटेंशन स्पॅन’ ३ ते ६ महीनेच ठेवावा, त्यापुढील कालावधीचा सहसा विचार करु नये, या ३ ते ६ महिन्यांत योग नसल्यास तसे जातकाला स्पष्टपणे सांगून , सहा महिन्यानंतर पुन्हा प्रश्न विचारण्या साठी सुचवावे.

शुक्राचे कार्येशत्व असे आहे, शुक्र षष्ठात  (६), षष्ठेश (६) आणि लाभेश (११),  शुक्र मंगळाच्या नक्षत्रात, मंगळ लाभात (११) , पंचमेश (५)  आणि व्ययेश (१२).

शुक्र: ११ / ६ / ५, १२ / ६, ११.

या शिवाय शुक्र हा रवीच्या अगदी अंशात्मक युतीत आहे, त्यामुळे शुक्र रवीचीही फळे देणार आहे.रवी षष्ठात (६) , नवमेसह (९) , रवी चंद्राच्या नक्षत्रात , चंद्र सप्तामात (७) आणि अष्टमेश (८)

रवी:  ७ / ६ / ८ / ९

अंतर्दशा स्वामी शुक्र परदेश गमना साठीच्या मुख्य भावाचा म्हणजेच व्ययस्थानाचा (१२) कार्येश आहे , रवीच्या युती मुळे नवम (९) व सप्तम (७) या स्थानांचाही कार्येश आहे, तसेच तो लाभस्थानाचा (११) कार्येश आहे , तसेच शुक्र खेळा साठीच्या पंचम (५) भावाचा पण कार्येश आहे, म्हणजे शुक्राची अंतर्दशा स्पोर्ट्स ट्रेनिंग साठी परदेश गमन या घटनेला ला एकदम अनुकूल आहे.

शुक्राचा सब मंगळ आहे,  मंगळ लाभात  (११) , पंचमेश (५)  आणि व्ययेश (१२), मंगळ गुरुच्या नक्षत्रात, गुरु नवमात  (९) , लग्नेश (१) आणि चतुर्थेश (४).

मंगळ: ९ / ११ / १ , ४ / ५ , १२

म्हणजे अंतर्दशा स्वामी शुक्राचा सब मंगळ ही परदेश गमनाला ( ९, १२) अनुकूल आहे.

शुक्राची अंतर्दशा ५ जुलै २०१६ ते ६ मार्च २०१९ अशी साधारण पावणे तीन वर्षाची आहे. नेमका कालनिर्णय करण्यासाठी आपल्याला या शुक्राच्या अंतर्दशेतल्या विदशा तपासल्या पाहीजेत.  शुक्राची अंतर्दशा अजून चालू झाली नसल्याने, शुक्राच्या अंतर्दशेत येणार्‍या सर्व विदशा तपासणे ओघानेच आले.

महादशा स्वामी गुरु आणि  अंतर्दशा स्वामी शुक्राचे कार्येशत्व पाहीले तर एक लक्षात येते ते म्हणजे परदेश गमना साठी आवश्यक असलेले ९ आणि १२ हे भाव आपल्याला मिळालेले आहेत पण आणखी महत्वाचा भाव, त्रितिय (३) तो मात्र या दशा आणि अंतर्दशेच्या साखळीत आलेला नाही, म्हणजे शुक्राच्या अंतर्दशेत अशी एक विदशा निवडायला पाहीजे जी या त्रितिय (३) भावाची प्रथमदर्जाची कार्येश असेल.

आता कोणता ग्रह या त्रितीय स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे?

त्रितिय भावात केतु आहे, भावेश शनी आहे. केतुच्या नक्षत्रात ग्रह नाही. आणि शनीच्याही नक्षत्रात ग्रह नाही. म्हणजे त्रितीय भावाचे कार्येश:

त्रितिय भाव:  —- / केतु / —– / शनी

म्हणजे  शुक्राच्या अंतर्दशेत केतु किंवा शनी या दोनच ग्रह त्रितिय (३) भावाचे कार्येश असल्याने , या दोन ग्रहांच्या विदशांचाच विचार आपल्याला करावा लागेल.

प्रथम या दोन ग्रहांचे कार्येशत्व तपासू.

केतु  त्रितिय भावात (३), केतुला भावेशत्व नसते, केतु गुरुच्या नक्षत्रात, गुरु नवमात  (९) , लग्नेश (१) आणि चतुर्थेश (४).

केतु:  ९ / ३ / १ , ४ / —

केतु वर गुरुची दृष्टी आणि केतु शनीच्या राशीत म्हणजे केतु , गुरु आणि शनीची पण फळें देणार !

गुरुचे कार्येशत्व आपण आधीच पाहीले आहे: गुरु: ६ / ९ /  ६ ,११ / १, ४.

आता शनीचे कार्येशत्व पाहुयात.

शनी व्ययात (१२), धनेश (२) आणि त्रितियेश (३) , शनी बुधाच्या नक्षत्रात बुध पंचमात (५), बुधाच्या राशीं सप्तम  (७‌) आणि दशम (१०‌) स्थानी
शनी: ५ /  १२ / ७ , १० / २ , ३

शनी मंगळाच्या युतीत ,  मंगळ: ९ / ११ / १ , ४ / ५ , १२

म्हणजे केतुचे एकत्रित कार्येशत्व असे असेल:

केतु:  ९ / ३ / १ , ४ / —

दृष्टी गुरु: ६ / ९ /  ६ ,११ / १, ४.

राशी स्वामी शनी:  ५ /  १२ / ७ , १० / २ , ३

केतु शनीच्या सब मध्ये आहे. म्हणजे केतु परदेश गमना साठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे.

आपण विचारत घेणार आहोत ती दुसरी विदशा शनीची आहे , शनीचे कार्येशत्व आपण पाहीलेच आहे: शनी:  ५ /  १२ / ७ , १० / २ , ३ , युती मंगळ: ९ / ११ / १ , ४ / ५ , १२

शनी केतु च्या सब मध्ये. म्हणजे केतु प्रमाणेच शनी पण परदेश गमना साठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. त्यातच शनी हा मंगळाच्या युतीत आहे , मंगळ हा मैदानी खेळाचा कारक असल्याने शनी अपेक्षित घटने साठी आणखी अनुकूल दिसत आहे.

संजुबाबा स्पॉन्सर शीप घेऊन जपानला जाणार आहे , त्यासाठी २ व ११ हे भाव हवेत ,   शुक्र हा लाभाचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे आणि तो इथे अंतर्दशा आणि विदशा स्वामी म्हणून येत आहे. शनी आणि केतु दोघेही द्वीतीय (२) स्थानाचे प्रथमदर्जाचे कार्येश आहेतच. म्हणजे संजुबाबाला स्पॉन्सर मिळणार , कोणतेही अडथळे न येता तो जपानला कराटे ट्रेनिंगला जाणार.

पण आता या शनी आणी केतु पैकी कोण?

शुक्राच्या अंतर्दशेत शनीची विदशा आहे ती २२ मार्च २०१८ ते २४ ऑगष्ट २०१८ आणि केतु ची विदशा ९ जानेवारी २०१९ ते ६ मार्च २०१९ !

म्हणजे प्रश्न विचारल्या वेळे पासुन सुमारे दोन वर्षां नंतर या दोन्ही विदशां येणार आहेत. प्रश्नकुंडलीचा आवाकाच सहा महीन्याच्या आत बाहेर असल्याने आपल्याला इतक्या दूरवरच्या विदशांचा विचार  करता येणार नाही.

आता काय करायचे?

इथे आता एकच विचार होऊ शकतो , तो म्हणजे शुक्राच्या अंतर्दशेत , शुक्राचीच विदशा निवडायची आणि ह्या शुक्राच्या विदशेत केतु किंवा शनीची सुक्ष्मदशा निवडायची !

शुक्राची विदशा ५ जुलै २०१६ ते १५ डिसेंबर २०१६ अशी आहे. हा कालावधी प्रश्नकुंडलीच्या आवाक्याच्या दृष्टीने सुयोग्य आहे. म्हणजे संजु बाबा परदेशात गेलाच तर याच  कालावधीत.

आता प्रश्न हा आहे की शनी आणि केतु दोघेही परदेश गमना साठीचे अत्यंत प्रबळ कार्येश आहेत. यातला कोण?  छाया ग्रह (नोड्स) हे नेहमीच फळ देण्याच्या बाबतीत बलवान असतात.  त्यामुळे केतु चा प्राधान्याने विचार करायला हरकत नाही.

इथे एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात ठेवायची की दशा – विदशा इ. अनुकूल असल्या तरी प्रत्यक्ष घटना घडेलच असे नाही !!

घटना घडण्यासाठी एक ट्रीगर  लागतो. जसे दारु गोळा कितीही मजबूत असला तरी तो पेटवायला एक ठिणगी आवश्यक असते तसेच.

हा ट्रीगर / ठिणगी देण्याचे काम गोचर भ्रमणें (ट्रॅन्सीट्स)  करतात. गोचर भ्रमणाचा कौल नसेल तर अनुकुल दशा – विदशा आल्या तरी घटना घडत नाहीत.

म्हणजे आता गोचर भ्रमणें (ट्रॅन्सीट्स)  तपासायला हवीत.

आपले अपेक्षीत कालावधी असे आहेत:

शनी सुक्ष्मदशा: १८ आक्टोबर २०१६ ते १२ नोव्हेंबर २०१६

केतु सुक्ष्म दशा: ५ डिसेंबर २०१६ ते १५ डिसेंबर २०१६.

आपली  दशा – अंतर्दशा- विदशा- सुक्ष्मदशा साखळी अशी होऊ शकते:

गुरु – शुक्र – शुक्र – शनी

गुरु – शुक्र – शुक्र – केतु

अपेक्षीत घट्ना सहा महीन्याच्या काळात घडणार असल्याने आपण रवी भ्रमण तपासले पाहीजे.

म्हणजे रवी :
१) गुरु च्या राशीत शुक्राच्या नक्षत्रात

किंवा

२) शुक्राच्या राशीत , गुरुच्या नक्षत्रात

भ्रमण करेल तेव्हा घटना घडेल.

प्रश्न करते वेळी रवी शुक्राच्या वृषभेत आहे पण तो अवघ्या सात दिवसात बुधाच्या मिथुनेत जाणार त्यामुळे याचा आपल्याला काही उपयोग नाही.

रवी नंतर बुधाच्या मिथुनेत , चंद्राच्या कर्केत , रवीच्या सिंहेत , बुधाच्या कन्येत भ्रमण करेल. रवी ,बुध, चंद्र आपल्या साखळीत नसल्याने , या भ्रमणांचा आपल्याला उपयोग नाही.

रवी  १७ आक्टोबर २०१६ ला शुक्राच्या तुळेत दाखल होईल.  तुळ राशीत गुरुचे नक्षत्र आहे म्हणजे शुक्राची रास आणि गुरुचे नक्षत्र अशी साखळी होऊ शकते!

रवी, तुळेत गुरुच्या नक्षत्रात, साधारण पणे  ६ नोव्हेंबर २०१६ ला दाखल होईल आणि तो १६ नोव्हेंबर २०१६ पर्यंत गुरुच्या नक्षत्रात असेल (त्यानंतर रवी तुळेतुन वृश्चिकेत जाईल)

आपले इच्छित कालावधी

शनी सुक्ष्मदशा: १८ आक्टोबर २०१६ ते १२ नोव्हेंबर २०१६

केतु सुक्ष्म दशा: ५ डिसेंबर २०१६ ते १५ डिसेंबर २०१६.

असे आहेत , म्हणजे रविच्या भ्रमणाचा विचार करता, घटना  शनीच्या सुक्ष्मदशेत , ६ नोव्हेंबर २०१६ ते १२ नोव्हेंबर २०१६ याच काळात घडणार हे नक्की!

या कालवधीत दशा स्वामी गुरु, अंतर्दशा स्वामी शुक्र, सुक्ष्मदशा स्वामी शनी सर्व मार्गी आहेत.

हा दहा दिवसाचा कालावधी पुरेसा आहे, फार खोलात जायची आवश्यकता नाही. अयनांशातला फरक, सॉफ़्टवेअरची कमी अधीक अचुकता, राऊंडींग एरर असे अनेक फॅक्टर्सं आहेत त्यामुळे या पेक्षा अधीक खोलात जाण्या पेक्षा साधारणा आठवडाभराचा कालावधी सांगावा , तो पुरेसा असतो.

मी संजुबाबा ला म्हणालो,

“सायबां, जाणार , तू नक्की जपानला ट्रेनिंगला जाणार”

“काय सांगता? कधी?”

“याच वर्षी नोव्हेंबर च्या दुसर्‍या आठवड्यात! ”

संजुबाबाने हाताच्या बोटांवर काही गणिते केली ..

“काय सांगता अंकल !  अहो ह्या सिजनची पहीली बॅच १५ नोव्हेंबरलाच तर चालू होतेय! म्हणजे , अगदी टायमात जमतयं की सगळे. थॅक्यू अंकल ..तुमचे मागचे पण अगदी बरोबर आले होते, हे पण तसेच बरोबर ठरणार मला खात्री आहे. बॅग भरायलाच घेतो आता!”

कर्ण कर्कश आवाज करत (वाईल्ड बोअर सायलेंसर!) संजुबाबा ची बुल्लेट गेली, इकडे मी संजुबाबाने दिलेले कोरे करकरीत – एटीम फ्रेश (चक्की फ्रेश आटा असतो ना अगदी तस्से!) गांधीबाबा गल्ल्यात टाकले.

संजुबाबा ११ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री जपानला रवाना झाला!

केतु सारख्या जबरदस्त कार्येशाने आपला प्रभाव सोडला नाही ! घटना घडली तेव्हा रवी शुक्राच्या राशीत, गुरुच्या नक्षत्रात , केतुच्या सब मध्ये होता !

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. प्राणेश

  छानच,

  अनेक ‘जातकांसाठी’ व माझ्यासारख्या ‘चातकांसाठी’ ही उपयुक्त माहिती आहे. Cast studies वरील तुमच्या पुस्तकाची व Online Course ची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहे.

  0
 2. प्राणेश

  सर, ‘मंगळ लाभात आहे’ असे वाक्य आपल्या या लेखात आले आहे. पण मंगळ तर व्ययात आहे ना? (चू.भू. दे. घे.)

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   मंगळ लाभातच आहे. कृष्णमुर्ती पद्धती मध्ये भावचलित कुंडली वापरली जाते , त्यानुसार लाभ स्थान तुळ ९:५९ वर चालू होते आणि वृश्चिक ६:२३ वर संपते , (व्ययस्थान अर्थातच वृश्चिक ६:२३ वर चालू होणार), मंगळ वृश्चिक २:२५ वर असल्याने तो लाभस्थाना तच असणार.

   आपण बहुदा भावचलित आणि साधी क्षेत्र कुंडली असा गैरसमज करुन घेतला आहे. क्षेत्र कुंडलीत राशी = भाव असे साधे सरळ सुत्र असते जन्मलग्नाची राशी = प्रथम भाव, त्याच्या पुढची राशी = धनस्थान अशा पद्धतीचे . क्षेतर कुंडलीच्या हिशोबाने मंगळ वृश्चिकेत असल्याने व्ययात असेल पण आपण भावचलित कुंडली वापरत असल्याने तो लाभात आहे.

   मला वाटते आपल्याला आता खुलासा झाला असावा , काही शंका असल्यास अवश्य विचारा.

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.