हा एक काल्पनिक किस्सा आहे, भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा माझ्या नित्यपूजेत असते, या लेखाद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही.

फार पूर्वी एका ज्योतिषीबुवांकडून मी हा किस्सा ऐकला होता. नुकतेच एका जातकाला ग्रह-तारे , त्यांचा अन्वयार्थ कसा लावला जातो याबद्द्ल सांगत असताना अचानक मला या किश्श्याची आठवण आली. …

श्रीकृष्ण आपल्या बाललीलांनी आख्ख्या गोकुळाला वेड लावून राहीले  होते . एका अवतारी बालक म्हणून बाळकृष्णाची कीर्ती सर्वदूर पसरु लागली  होती, ती एका प्रकांड पंडीत ज्योतिषाच्या कानावर पडली, ज्योतिषी महाराजांचे कुतूहल जागृत झाले , एकदा गोकुळाला भेट देऊन या बालकाला पाहावयाचे , जमल्यास त्याच्या पत्रिकेचा अभ्यास करायचे असे ठरवून , तो गोकुळात दाखल झाला , गोकुळात आल्या बरोबर त्याने तडक नंदाचा राजवाडाच गाठला.

रीती प्रमाणे महाराज नंदांनी त्याचे आगतस्वागत केले. जोतिषाने स्वत:ची ओळख करुन दिली आणि श्रीकृष्णाची जन्मपत्रिका बघायला मागीतली. महाराज नंदांना देखिल एव्हढे मोठे प्रख्यात ज्योतिषी आपणहून दारात येऊन आपल्या बाळकृष्णाचे भविष्य पाहणार आहेत हे पाहुन आनंद झाला. त्यांनी श्रीकृष्णाची जन्मपत्रिका त्यांच्या समोर ठेवली.

ज्योतिषाने बराच वेळ त्या पत्रिकेचा अभ्यास केला, पण जसेजसे ज्योतिषीबुवा त्या पत्रिकेचा अभ्यास करायला लागले तसे तसे त्याच्या चेहर्‍यावरचे भाव झरझरा पालटायला लागले, त्यांच्या कपाळावरच्या आठ्या वाढू लागल्या, त्याच्या चेहर्‍यावरचे हे गंभीर भाव पाहून महाराज नंदांच्याही काळजाचा ठोका चुकला..

“गुरुवर्य, सर्व ठीक तर आहे ना..”

त्यावर त्या ज्योतिषाने श्रीकृष्णाची पत्रिका एखादे झुरळ झटकावे तशी दूर लोटली , पंचाग बाजूला केले, एक दीर्घ उसासा टाकून ज्योतिषीबुवा बोलते झाले …

“नंद महाराज,  मला जे दिसते ते मी  प्रामाणीकपणे सांगतो, राग मानु नका, पण खरे काय ते मला सांगीतलेच पाहिजे, तेव्हा मन घट्ट करून मी काय सांगतो ते ऐका.”

“या बालकाच्या दिसण्यावर , बाळलीलांवर जाऊ नका, या गोंडस, निरागस चेहेर्‍यामागे एक महाभयंकर रूप आहे. हे बालक अत्यंत अशुभ, अपशकुनी आहे, हा तुमचा कुलदिपक नाही तर कुलबुडव्या ठरणार आहे. असले पापी, अधम बालक तुमच्या पोटी जन्माला यावे हे तुमचे मोठे दुर्दैवच म्हणायचे.”

“हे बालक जन्माला येतानाच महा भयंकर संकट घेऊन आलेले आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणु नका की अमानवी ताकदींनी घातलेले थैमान, तुम्ही कधी बघितला नसेल, ऐकला नसेल असा प्रचंड महाभयंकर सर्प तुमच्या यमुनेत डोहात येऊन सार्‍या गोकुळावर दहशत बसवेल, ढगफुटी होउून महाजलप्रलय येईल, सगळ्या गोकुळाची धूळदाण करण्याच्या हेतुने महासंहारक वादळे, वावटळी येतील, १०० वर्षे ताठ मानेने उभे असलेले महाकाय वृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतील,  विचित्र, हिडीस, अक्राळविक्राळ पिशाच्चें गावात थैमान घालतील. माझ्या बोलण्यावर जाऊ नका, आपल्याला एव्हाना असे अनुभव यायला सुरवात देखील झाली असेल.”

“या बालकाची कोणतीच लक्षणें ठीक दिसत नाहीत, सतत हुडपणा करेल, विद्याभ्यास करणार नाही, गुरूजनांना त्रास देईल, बरोबरच्या विद्यार्थांना शिकू देणार नाही, सतत मित्रांचे टोळके जमा करुन गावभर उंडारत फिरुन सगळया गावाला त्राही भगवान करून सोडेल, याच्या बद्दल तक्रार येणार नाही असा दिवस जाणार नाही.”

“उनाडक्या आणि चोर्‍यामार्‍या करण्यात तर याचा हात कोणी धरणार नाही. भुरटया चोर्‍यांपासुन ते मोठया मोठया मौल्यवान वस्तुं पर्यंत हा सतत चोर्‍या करत राहील, लहान वयातच नव्हे तर अगदी मोठेपणीही सतत याच्या वर चोरीचे आळ येत राहणार!”

“बायकांचा जरा जास्तच नाद म्हणा किंवा काय , पण सतत बायकांच्या गराडयात राहणार हा,  प्रेमप्रकरणेंही होतील, लहान म्हणू नका, मोठी म्हणू नका, लग्न झालेली म्हणू नका, बायकांना कसली भुरळ पाडणार आहे हा , कोण जाणे! “

“तसे पाहिले तर एक महापुरूष होण्याचे योग आहेत याच्या पत्रिकेत पण हा शेवटी करंटाच निघणार. राजमहाल, दासदासी सगळे वैभव याला मिळेल पण ते त्याने स्वत: मिळवलेले नसेल, म्हणुनच याला कोणी राजा म्हणणार नाही, याचा कधी राज्याभिषेक होणार नाही की सम्राट्पद मिळणार नाही, हा कायमच दुय्यम स्थानी असेल.”

“सर्व वैभव मिळेल याला पण लक्षणे  भिकार्‍याची  हो,  हा दुसर्‍यांच्या घरची हलकी कामें करत फिरेल,  कपाळकरंटेपणा म्हणतात ते ह्यालाच.”

“खोटे बोलणे, लावालाव्या करणे हे तर ह्याच्या डाव्या हातचे काम! देवाने उत्तम बुध्दिमत्ता दिलीय पण हा त्याचा उपयोग उलटाच करेल, भांडणे मिटण्या ऐवजी ती वाढतील कशी हेच तो बघेल, दोघांच्या भांडणात शिष्टाई करायला म्हणुन जाईल आणि एका भीषण महायुध्दाची ठिणगी पाडुन येईल!  वर शेवटी ते महायुध्द मोठया चवीने बघुन ‘मी नाही काही केले ’ म्हणत नामानिराळा होईल.“

“खरे तर यादवां सारख्या महापराक्रमी कुळातला जन्म याचा , पण त्या कुळाला हा काळिमा फासणार , हा पळपुटा निघणार, आयुष्यात एक युध्द सरळ लढाई करुन जिंकु शकणार नाही, हा सतत दुसर्‍याचा हातुन साप मारायचा प्रयत्न करणार, लढाईची वेळ आली की हा एकतर पळून जाईल किंवा दुसर्‍या कोणाच्या मागे लपून बसेल अगदी वेळ पडली तर आपल्या बायकोच्या पदराआड लपायला देखील कमी करणार नाही. शेवटी ‘पळपुटा’ हा शिक्का  कायमचा कपाळीला मिरवावा लागणार याला.”

“हा लग्नें तर अनेक करेल, अधिकृत अशा आठ बायकां असतील पण अशीच लावलेली लग्ने हजारो असतील, जगाच्या इतिहासात एवढी लग्नें कोणी करणार नाही, शेवटी एव्हढी लग्नें करूनही डोळया देखत निर्वंश झालेला बघायचेच ह्याच्या नशिबात आहे.”

“तसा आहे हा दिसायला देखणा, रुबाबदार आणि त्यात बोलणे मधाळ, लोक ह्याला भुलणार , ह्याच्या भजनी लागणार, कुळाचा, जमातीचा , देशाचा भाग्यविधाता, तारणहार म्हणुन ह्याच्या कडे बघणार पण ह्याला त्याचे काहीच नाही. आपल्या डोळ्यां समोर कुळाचा क्षय होताना पाहुन सुद्धा हा काहीही करणार नाही. “

“हा, केव्हा तरी याला थोडी सुबुद्धी सुचेल आणि अंगच्या बुद्धीमत्तेचा वापर  करुन  एखादा ग्रंथ लिहेल, नाही असे नाही, तसे योग आहेत याच्या पत्रिकेत आणि ते भांडवल पुरेल त्याला आयुष्यभर , पण ते तेव्हढेच हो, बाकीच्याचे काय ?”

“नंद महाराज , हे असे सगळे सांगायला माझीही जीभ रेटत नाही,  पण कितीही कटू असले तरी हे सत्य आहे. याच्या पत्रिकेतले ग्रहमानच तसे आहे त्याला मी तरी काय करणार. उगाच आपल्याला खुष करण्यासाठी काही खोटेनाटे सांगणे म्हणजे शास्त्राशी प्रतारणा करण्या सारखे आहे.”

“माझा आपल्याला एकच सल्ला आहे, नव्हे कळकळची विनंती आहे, या बालकाचा शक्य जितक्या लौकरात लौकर त्याग करा , याला जलाशयात जलसमाधी दया किंवा जंगलात कोल्हया, गिधाडांच्या स्वाधीन करा, काहीही करा पण हे बालक तुमच्या पासुन दुर लोटा. त्यातच तुमचे व तुमच्या यादव कुलाचे हित आहे.”

आता कोणीही म्हणेल काय हा भंपक ज्योतिषी असले कसले चुकीचे भविष्य सांगीतले , नशीब याच्या ह्या असल्या भविष्यवाणी वर विश्वास ठेवून नंदामहाराजांनी श्रीकृष्णाला जलसमाधी दिली नाही कि जंगलात कोल्हया, गिधाडांच्या स्वाधीन केले नाही!

पण तसे पाहीले तर तो ज्योतिषी  कमालीचा निष्णात , तज्ञ ज्योतिषी होता हेच यातून सिद्ध होते आहे !

दचकलात ना ?

त्या ज्योतिषाने सांगीतलेले एकूणएक भविष्य तंतोतंत खरे ठरले आहे हे मान्यच करावे लागेल !!  ते कसे काय?

“हे बालक जन्माला येतानाच महा भयंकर संकट घेऊन आलेले आहे, नैसर्गिक आपत्ती म्हणु नका की अमानवी ताकदींनी घातलेले थैमान, तुम्ही कधी बघितला नसेल, ऐकला नसेल असा प्रचंड महाभयंकर सर्प तुमच्या यमुनेत डोहात येऊन सार्‍या गोकुळावर दहशत बसवेल, ढगफुटी होउून महाजलप्रलय येईल, सगळ्या गोकुळाची धूळदाण करण्याच्या हेतुने महासंहारक वादळे, वावटळी येतील, १०० वर्षे ताठ मानेने उभे असलेले महाकाय वृक्ष क्षणार्धात उन्मळून पडतील, विचित्र, हिडीस, अक्राळविक्राळ पिशाच्चें गावात थैमान घालतील. माझ्या बोलण्यावर जाऊ नका, आपल्याला एव्हाना असे अनुभव यायला सुरवात देखील झाली असेल.”

कालीयासर्प , पुतनामावशी, तृणावर्त असूर, गोवर्धन उत्सवाच्या वेळी ढगफुटी होऊन आलेला महाप्रलय.

“या बालकाची कोणतीच लक्षणें ठीक दिसत नाहीत, सतत हुडपणा करेल, विद्याभ्यास करणार नाही, गुरूजनांना त्रास देईल, बरोबरच्या विद्यार्थांना शिकू देणार नाही, सतत मित्रांचे टोळके जमा करुन गावभर उंडारत फिरुन सगळया गावाला

त्राही भगवान करून सोडेल, याच्या बद्दल तक्रार येणार नाही असा दिवस जाणार नाही.”

श्रीकृष्णाच्या लहानपणीच्या लीला बघितल्या तर वर्तवलेले भविष्य चुकीचे असे कोणीच म्हणू शकणार नाही. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात पेंद्याच्या साथीने श्रीकृष्णाने बराच व्रात्यपणा केल्याची वर्णने पुराणांत आहेत. मथुरेच्या बाजाराला जाणार्‍या गोपींची वाट अडवणे, त्यांची दुधा-दह्याची मटकी फोडणे आणि त्याबद्दल यशोदे कडे तक्रारी येणे ही तर रोजचीच बाब होती ना?

“उनाडक्या आणि चोर्‍यामार्‍या करण्यात तर याचा हात कोणी धरणार नाही. भुरटया चोर्‍यांपासुन ते मोठया मोठया मौल्यवान वस्तुं पर्यंत हा सतत चोर्‍या करत राहील, लहान वयातच नव्हे तर अगदी मोठेपणी ही सतत याच्या वर चोरीचे आळ येत राहणार!”

माखनचोर नंदकिशोर असे का बरे म्हणले जाते? पुढे जाऊन ‘रोज सोने निर्माण करणार्‍या’ स्वयंतक मण्याची चोरी केल्याचा आरोप श्रीकृष्णावर झाला होताच ना?

स्वयंतक मणी राजा सत्यजीत कडे होता, कृष्णाने त्याला सल्ला दिला तो स्वयंतक मणी सुरक्षित राहण्यासाठी महाराज उग्रसेना कडे देण्यात यावा, सत्यजीत चा भाऊ प्रसेन तो मणी घेऊन निघाला पण वाटेत शिकारीच्या नादात असताना एका सिंहाने हल्ला करुन प्रसेनला ठार केले , मणी त्या जंगलात हरवला आणि तो जांबुवंताला सापडला.

इकडे मणी काही उग्रसेना कडे पोहोचला नाही, सत्यजीतला वाटले श्रीकृष्णाने काहीतरी डाव करुन मणी गायब केला, तो सतत श्रीकृष्णावर मणी चोरल्याचा आरोप करत राहीला, त्याला कंटाळून शेवटी श्रीकृष्णाने मण्याचा शोध घ्यायचा ठरवून प्रसेन ज्या मार्गाने गेला होता तो सगळा भाग पिंजून काढला, तेव्हा कळले की मणी जांबुवंता कडे आहे . पण जांबुवंत कसला खट , तो मणी परत करायला तयार होईना , मग श्रीकृष्ण – जांबुवंत युद्ध झाले. युद्ध २८ दिवस चालले , शेवटी मांडवली झाली!

जांबुवंताच्या मुलीशी जांबुवंतीशी श्रीकृष्णाचा विवाह, मणी सत्यजीत कडे वापस, सत्यजीत खुष आणि त्या आनंदा प्रित्यर्थ सत्यजीतच्या मुलीशी म्हणजेच सत्यभामेशी श्रीकृष्णाचा विवाह , विवाहात आहेर म्हणून मणी परत श्रीकृष्णा कडे ! हाय काय आन नाय काय !

“बायकांचा जरा जास्तच नाद म्हणा किंवा काय , पण सतत बायकांच्या गराडयात राहणार हा,  प्रेमप्रकरणेंही होतील, लहान म्हणू नका, मोठी म्हणू नका, लग्न झालेली म्हणू नका, बायकांना कसली भुरळ पाडणार आहे हा , कोण जाणे! “

रासक्रिडा प्रकरण काय होते ? गोपींची छेड कोण काढत होते? राधा तर चक्क विवाहीत होती !

“तसे पाहिले तर एक महापुरूष होण्याचे योग आहेत याच्या पत्रिकेत पण हा शेवटी करंटाच निघणार. राजमहाल, दासदासी सगळे वैभव याला मिळेल पण ते त्याने स्वत: मिळवलेले नसेल, म्हणुनच याला कोणी राजा म्हणणार नाही, याचा कधी राज्याभिषेक होणार नाही की सम्राट्पद मिळणार नाही, हा कायमच दुय्यम स्थानी असेल.”

श्रीकृष्णाला कधीच राजेपद, सम्राट्पद मिळाले नाही, तसे पाहीले तर यादव कुलातल्या कोणालाच सम्राट होता आले नाही. त्याकाळचे सम्राट्पद होते मगध नरेश जरासंधाकडे ! बलराम मोठा भाऊ असल्याने श्रीकृष्णाला बर्‍याच बाबतीत दुय्यम भूमिका स्विकारावी लागली होती.

“सर्व वैभव मिळेल याला पण लक्षणे  भिकार्‍याची  हो,  हा  दुसर्‍यांच्या घरची हलकी कामें करत फिरेल,  कपाळकरंटेपणा म्हणतात ते ह्यालाच.”

पांडवांच्या राजसूय यज्ञाच्या सांगता समारंभाच्या जेवणावळीची उष्टी – खरकटी , अर्जुनाच्या रथाचे सारथ्य, अर्जुनाच्या रथाच्या घोड्यांचा खरारा; श्रीकृष्णाने अक्षरश: हे सगळे केले आहे.

“खोटे बोलणे, लावालाव्या करणे हे तर ह्याच्या डाव्या हातचे काम! देवाने उत्तम बुध्दिमत्ता दिलीय पण हा त्याचा उपयोग उलटाच करेल, भांडणे मिटण्या ऐवजी ती वाढतील कशी हेच तो बघेल, दोघांच्या भांडणात शिष्टाई करायला म्हणुन जाईल आणि एका भीषण महायुध्दाची ठिणगी पाडुन येईल वर शेवटी ते महायुध्द मोठया चवीने बघुन ‘मी नाही काही केले ’ म्हणुन नामानिराळा होईल. “

श्रीकृष्ण शिष्टाई अयशस्वी ठरली. महाभारत युद्धात सगळी यादवसेना , सात्यकीच्या नेतृत्वाखाली लढत होती, श्रीकृष्ण मात्र स्वत: न लढता अर्जुनाचा रथ हाकीत होता.

“खरेतर यादवां सारख्या महापराक्रमी कुळातला जन्म याचा , त्या कुळाला हा काळिमा फासणार , हा पळपुटा निघणार, आयुष्यात एक युध्द सरळ लढाई करुन जिंकु शकणार नाही, हा सतत दुसर्‍याचा हातुन साप मारायचा प्रयत्न करणार, लढाईची वेळ आली की हा एकतर पळून जाईल किंवा दुसर्‍या कोणाच्या मागे लपून बसेल अगदी वेळ पडली तर आपल्या बायकोच्या पदराआड लपायला देखील कमी करणार नाही. शेवटी ‘पळपुटा’ हा शिक्का कपाळीला कायमचा मिरवावा लागणार.”

‘रणछोडदास’ कोणाला म्हणतात? सम्राट जरासंधाने असंख्य वेळा गोकुळ आणि जवळच्या प्रदेशांवर स्वार्‍या केल्या, त्रास दिला पण त्याचे पारिपत्य श्रीकृष्णाला करता आले नाही की आपले चातुर्य वापरुन जरासंधाशी तह करता आला नाही. शेवटी जरासंधाच्या स्वार्‍यांना कंटाळून राजधानीच पार दूर गुजराथेत द्वारकेला हलवण्याची वेळ आली! जरासंधाला शेवटी भीमाने मारले तेव्हा मात्र युद्ध कसे करावे , जरासंधाला कसे मारावे हा सल्ला द्यायला  श्रीकृष्ण तिथे उपस्थित! श्रीकृष्ण – कालयवन लढाई हाता बाहेर गेली, पळापळ  झाली , शेवटी मुचकुंदाच्या हस्ते कालयवनाला संपवण्यात आले. नरकासुरावर केलेल्या स्वारीच्या वेळी, नरकासुराचा वध श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने केला.

“तसा आहे हा दिसायला देखणा, रुबाबदार आणि त्यात बोलणे मधाळ, लोक त्याला भुलणार , ह्याच्या भजनी लागणार, कुळाचा, जमातीचा , देशाचा भाग्यविधाता, तारणहार म्हणुन ह्याच्या कडे बघणार पण ह्याला त्याचे काहीच नाही, आपल्या डोळ्यां समोर कुळाचा क्षय होताना पाहुन सुद्धा हा काहीही करणार नाही “

शेवटी काय झाले ? हेच ना ? यादवकुलातील हे सर्व खंदे वीर दारुच्या नशेत असताना थट्टा मस्करीला भलतेच वळण लागले, सगळ्यांचाच तोल सुटला (दारुच्या नशेत तो आधीच सुटला होता म्हणा!) आणि मग आपापसातच तुंबळ लढाई करुन एकजात सगळे मारले गेले, तेव्हा श्रीकृष्ण  हा सारा कुलनाश उघड्या डोळ्यांनी हताशपणे बघत होते!

“हा अनेक लग्नें करेल, अधिकृत अशा आठ बायकां असतील पण अशीच लावलेली लग्ने हजारो असतील, जगाच्या ईतिहासात एव्हढी लग्नें कोणी करणार नाही, शेवटी एव्हढी लग्नें करूनही डोळया देखत निर्वंश झालेला बघायचेच ह्याच्या नशिबात आहे.”

खरेच श्रीकृष्णाचे अधिकृत असे ८ विवाह झाले होते:

‘रुक्मीणी, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, मित्रविंदा, नग्नजीती, भद्रा, लक्ष्मणा’

त्या शिवाय नरकासुराच्या कैदेतुन सोडवलेल्या १६१००स्त्रियांशी कागदोपत्री का होईना विवाह झालेच होते ! एव्हढी सारी लग्ने होऊन सुद्धा शेवटी वंश पुढे चालवायला कोणी कर्तृत्ववान शिल्लक राहीला नाही हे ही खरेच आहे!

“हा, केव्हा तरी याला थोडी सुबुद्धी सुचेल आणि अंगच्या बुद्धीमत्तेचा वापर  करुन  एखादा ग्रंथ लिहेल, नाही असे नाही, तसे योग आहेत याच्या पत्रिकेत आणि ते भांडवल पुरेल त्याला आयुष्यभर , पण ते तेव्हढेच हो, बाकीच्याचे काय ?”

श्रीमद्भगवद्गीता

आता तुम्ही विचाराल ह्या किश्श्याचे तात्पर्य काय ?

( ए आरं,  आत्ता नको गाय छाप, तुला काय येळ काळ काय ते कळतो  का नाय ,  आरं द्येवा धर्माचे चाल्लेय हिथे  आनं तु गाय छाप ची पुडी काय सरकिवतो माझ्या कडे , ऑ , नंतर बघु… तर मंडळी , मी काय सांगत होतो…)

ज्योतिष ही तसे पाहीले तर एका ‘संकेतांची’  भाषा आहे. प्रत्येक ग्रह, पत्रिकेतले बारा भाव, बारा राशी, नक्षत्रें ,  ग्रहां मधले होणारे योग हे सारे काही संकेत आहेत. या सार्‍या संकेतांचा अर्थ लावून ज्योतिषी भविष्य वर्तवत असतो.

नेहमीचे व्यवहारातले उदाहरण द्यायचे तर रस्त्यावरचे ट्रॅफिक चे दिवे ! हे दिवे हाही एक संकेतच आहे ना? ‘लाल दिवा’ म्हणजे ‘थांबा’ आणि हिरवा दिवा म्हणजे ‘जा’. इथे दिवे दोनच आहेत आणि अर्थ ही दोनच आहे त्यामुळे या दिव्याच्या संकेताचा अर्थ लावताना गोंधळ उडत नाही की चूक होत नाही. पण ज्योतिषात असे असंख्य घटक (ग्रह, भाव, राशी, नक्षत्र, योग इ. ) आहेत आणि त्या प्रत्येक घटकाला शेकडो संकेत आहेत त्यामुळेच तर घोटाळा होतो.

आपल्याला हे चटकन लक्षात येणार नाही म्हणून वानगी दाखल एका ग्रहस्थिती पहा:

‘गुरु , चतुर्थात , कर्केत , आश्लेशा नक्षत्रात, सप्तमातल्या , तुळेतल्या , स्वाती नक्षत्रातल्या मंगळाच्या केंद्र योगात ‘.

या इथे आपल्याला गुरु चे कारकत्व, चतुर्थ स्थानाचे कारकत्व आणि कर्केची खासीयत आणि आश्लेशा नक्षत्राचा प्रभाव या घटकांचा विचार तर करावयाचा आहेच शिवाय हा गुरु मंगळाच्या केंद्र योगात असल्याने आपल्याला आता मंगळाचे कारकत्व, सप्तम स्थानाचे कारकत्व आणि तुळेचा स्वभाव  आणि स्वाती नक्षत्राचे गुण याचाही विचार करायचा , एव्हढेच नव्हे तर होणारा योग हा केंद्र योग आहे त्याचे ही खास काही  संकेत असतात , ही झाली जन्मवेळेची ग्रहस्थिती , याचा सध्या आकाशात असलेल्या ग्रहस्थितीशी (ट्रांन्सीट्स) मेळ घालायचा आणि मग या सार्‍याच्या एकत्रिकरणातून (Synthesis) एकच एक असा निष्कर्ष काढायचा आहे!

नुसते गुरु चे कारकत्वच बघायचे तर तब्बल ५०० इन्ट्रीज आहेत माझ्या डेटाबेस मध्ये! (ह्या पोष्ट च्या तळाला नमुन्या दाखल ‘गुरु’  च्या कारकत्वा च्या काही इन्ट्रीज दिल्या आहेत…) म्हणजे या सार्‍यांची लक्षावधी पर्म्युटेशन्स / कॉम्बीनेशनस होऊ शकतात. पण जातकाच्या आयुष्यात त्यातले ‘नेमके’ एखादेच कॉम्बीनेशन फलस्वरुप होईल.  त्यामुळे घटनेचा रोख लक्षात येतो उदा: बदल , वेदना, आनंद इ पण नेमकी घट्ना कोणती हाचा अंदाज लावणे महाकठीण काम असते. उदा: ग्रहयोग बदलाचे संकेत देत असतील पण हा बदल नेमका कोठे / कोणत्या बाबतीत आणि त्याचा प्रभाव / परिणाम जातकावर किती / कसा होईल  याचा अंदाज लावणे काहीसे अवघड असते.

ग्रहांनी एक विषीष्ठ संकेत जरी दिला असली प्रत्यक्ष घटना कोणती व कशी घडेल हे त्या स्थळ ,काल, व्यक्ती, परिस्थिती सापेक्ष असते. त्यातच कर्माच्या सिद्धांताचा प्रभाव ही विचारात घ्यावा लागतो. एव्ह्ढेच नव्हे ती संभाव्य घटना जातक कशी स्विकारेल (perceive) करेल याचा ही मानसशास्तीय दृष्टीकोनातून अंदाज घ्यावा लागतो.

उदा: समजा माझ्या आणि श्री. मुकेश अंबानींच्या च्या पत्रिकेत एकाच दिवशी धनलाभ योग होता,   त्याप्रमाणे त्या दिवशी मला खरेच १००० रुपये मिळाले , मला आनंद  झाला, वा धनलाभ झाला, भविष्य अगदी बरोबर आले. श्री. मुकेश अंबानींना ही त्याच दिवशी १००० रुपये मिळाले , आता श्री. मुकेश अंबानीं “वा धनलाभ झाला!” असे म्हणतील का? नाही . हे  १००० रुपये श्री. मुकेश अंबानींच्या खिजगणतीस ही नाहीत, त्यांच्या दृष्टीने ही रक्कम इतकी लहान आहे की असे १००० रुपये आले काय आणि गेले काय , त्यांच्या लक्षातही येणार नाही. भविष्य दोन्ही बाबतीत खरे ठरले आहेच पण एकाला ते पटले , दुसर्‍याला अशी घटना घडल्याचे कळले सुद्धा नाही ! व्यावाहारीक दृष्ट्या धनलाभाची व्याख्या व्यक्ती गणिक बदलते , एव्हढेच नव्हे तर एकाच व्यक्तीच्या बाबतीत ती त्या व्यक्तीच्या तत्कालिन आर्थिक स्थितीवर ठरते, एके काळी १००० रुपये मोठे असतील पण नंतरच्या काळात त्याची एव्हढी मोठी मातब्बरी राहणार नाही आणि काय सांगावे उद्या खराब दिवस आले तर १००० रुपये काय १०० रुपये जरी मिळाले तरी हर्षवायू होईल!

थोडक्यात सांगायचे म्हणजे या सगळ्या संकेतांचा अर्थ लावताना काही  बरेच संदर्भ आणि  पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागते , या सापेक्षतेचा मेळ कुंडलीतल्या घटकांशी आणि त्यांच्या  संकेताशी घालायचा असतो. समोरची वस्तु तीच असते पण वेगवेगळ्या रंगांच्या चष्म्यातुन पाहीले तर तीचा रंग वेगळा दिसतो, वस्तू बदलली नाही , चष्मा बदलला आहे. ज्योतिषाच्या बाबतीत, ग्रहाचे संकेत तेच असतात /  राहतील , बदलेल तो ‘सापेक्षतेचा’ चष्मा! भविष्य सांगताना कोणता चष्मा वापरायचा ते ठरवता आले पाहीजे, नुसते ‘सब लॉर्ड’ एके ‘सब लॉर्ड’ घोकत किंवा ‘नाभस – राजस योगांची पाठांतरे ‘ करुन हा आवाका येणार नाही.

चुका होतात त्या इथेच, आता हे उदाहरण पहा :

घटना १ :

“त्याने कोणतीही दयामाया दाखवली  नाही , सरळ   बंदूक उचलली , धाड- धाड दोन गोळ्या झाडल्या आणि समोरच्या व्यक्तीला ठार मारले”

घटना २ :

“त्याने कोणतीही दयामाया दाखवली  नाही , सरळ  बंदूक उचलली , धाड- धाड दोन गोळ्या झाडल्या आणि समोरच्या व्यक्तीला ठार मारले”

पहील्या घटनेतल्या व्यक्तीला खूनाच्या गुन्हा खाली फाशीची शिक्षा झाली तर दुसर्‍या घटनेतल्या व्यक्तीला शौर्यपदक मिळाले…हे असे का?

दोन्ही घटना तर अगदी एक सारख्या  आहेत , दोन्ही घटनेत निर्दयपणे हत्यार चालवले गेले आहे आणि दोन्ही घटनेत एकेका व्यक्तीचा जीव गेला आहे असे असताना सुद्धा एकाला फाशी आणि दुसर्‍याला शौर्यपदक ?

कारण पहिल्या घटनेला बंदूक चालवणारा एक अतिरेकी होता त्याने निर्दयतेने एका निष्पाप नागरीकाला ठार मारले होते तर दुसर्‍या घटनेतला बंदूक चालवणारा आपल्या देशाचा शूर जवान होता आणि त्याने सीमेवरच्या शत्रुचा वध करुन देशाच्या सीमेचे रक्षण केले होते. अतिरेक्याने नि:संशय खून केला होता तर  सीमे वरच्या जवानाने आपले कर्तव्य निभावले होते.

फरक संदर्भाचा, पार्श्वभूमीचा आहे.

आता या सैनिकाची  पत्रिका बघितली असता समजा त्यात त्याच्या हातून एक मनुष्य हत्या होणार आहे असे दिसले असते तर :

“तू पुढे मागे कोणाचा खून करशील, लोक तुला खुनी म्हणतील,  तुला फाशी  नाही तर गेला बाजार जन्मठेप तरी होणारच ..”

असे भविष्य सांगायचे का?

नाही , असे सांगणे चूक ठरेल कारण याच्या हातुन एक हत्या होणार आहे हे जरी अट्ळ असले तरी त्या हत्ये मागची स्थळ काळ परिस्थिती  समाज  यांची सापेक्षता तपासूनच निष्कर्ष काढणे योग्य नाही का?

समजा  त्या व्यक्तीच्या पत्रिकेत लष्कर, पोलिस, निम-लष्करी दले  अशा प्रकारच्या नोकरीचे योग दिसले तर हेच भविष्य कसे पालटेल बघा:

“तू पुढे मागे खूप शौर्य गाजवशील,  मातृभूमीच्या रक्षणाचे पवित्र काम तुझ्या हातून होणार आहे,  लोक तुझा जयजयकार करतील, राष्ट्रपतींच्या हस्ते तुला पदक मिळेल..”

पत्रिकेतल्या घटकांचे संकेत जसेच्या तसे वापरले तर अनर्थ  होऊ  शकतो , पण जो ज्योतिषी नुसत्या त्या संकेतांवर न जाता  त्या संकेतां मागची स्थळ काळ परिस्थिती  समाज  यांची सापेक्षता तपासूनच निष्कर्ष काढेल तोच अचूक भविष्य सांगू शकेल ना?

गोकुळात आलेल्या ज्योतिषीबुवांनी ग्रहांचे संकेत अचूक उचलले पण त्यांचा अर्थ लावताना ते चुकले आणि भलतीच भविष्यवाणी  त्यांनी उच्चारली !

असो

पोष्ट्च्या सुरवातीला दिलेली पत्रिका श्रीकृष्णाची आहे असे मानले जाते !

शुभं भवतु

गुरु चे कारकत्व:
” Abundance, Achievements, Administrators, Advertising, All places connected with higher learning, All religious books like Vedas., Ambassador, Apology, Arbitration between countries, Assessors, Bankers, Benefactors, Beneficiaries, Benevolent social awareness, Birth rate in country, Bonds, Brokers, Business in general, Buying and selling, Cabinet members and officers, Capitalism, Capitalistic force and finance, Cashiers, Casinos, Castles, Chancellors, Charitable institutions, Chivalry, Churches, Civil service, Clergy, Commerce in general, Construction of houses by the government for its own employees and construction of school and colleges and universities, Counselors, Cultural and moral traditions of the nation and it’s ruler, Dealers in clothes, Deeds of virtue, Defendants at law, Diabetes, Digestive organs, Diplomats, Doctors, Donations, Editors, Educational institutions, Embassies, Embezzlement, Emperors, Enemy, Enterprises, Enthusiasm on a national scale, Espionage, Espionage, Exchequers, Expansion schemes of the government for the construction of the educational institution and charitable institutions, Expansion schemes of the government involving huge expenditure on big projects (like hospitals, educational institutions, banking and insurance construction of schools and colleges, universities, charitable institutions and on reforms). Expansion schemes of the government relating to big projects. Expansion, Exports, Finance and commerce, Finance of the national revenue department, Financial gains, Financial speculation, Financiers, Foreign affairs and trade, Foreign countries,Foreign relations, Foreign representatives, Foreign Service, Foreign trade, Foreigners, Formal peace offerings, Friends, Fruitfulness, Funerals, Gains in gambling, Government officials, Government schemes for upkeep of temples and other religious institutions. Government’s expansion schemes pertaining to judiciary, Great fame or national importance, Guardians, Heart diseases, High and respectable classes, Higher education, Horse racing, Hospitality, Hospitals, Idealist, industrialists, Influences in support of order, Inheritances, Institutions and their heads, Integrity, Interest rates, International cooperation, Judges, Judicial world, Judiciary, Large ceremonies, Large vehicles, Law and order, Law and science, Lawyers, Legal affairs, Legal arbitration, Legislation, Legislators or legislative branches, Libraries, Literature of higher thought, Loans, Long journeys, Long travel, Lotteries, Loyalist, Luck factor including awards, Maintenance of religious institutions, Memorials,Merchandise, Merchants, Metallurgical engineers, Milliners, Millionaires, Ministers, Ministry of foreign affairs, Monasteries, Mosques, National revenue department, Naval strength, Nobility, Officials in general, One’s code of honor and ethics, Ordinance, Passport, Penal institutions, Pension, People of high statues, Place of entertainment, Places and practitioners of law, Places and practitioners of religion, Politics, Prayers, Preaching, Precedents in rank, Prizes, Proclamation, Prohibition of alcoholic beverages, Prophets, Prosperity and peace, Protector’s law and order, Protectors, Public expression of opinion etc, Published writing of intrinsic value such as religion, Published writings of intrinsic value such as on religion and philosophy, Publishers, Publishing houses,  Radio talks for public consumption, Religion and philosophy, Religious, Renovation of temples, Rights, Royalty, Schools and colleges, universities, Scientific and philosophic writers and philanthropic movements, Scientific and philosophic writers and writings publications, Search warrants, Secret, Secret enemy, Secret negotiations, Self-indulgence, Senate, Senators, Shipping, Shops, Shrines or other religious places pilgrimage, Social gatherings, Spendthrifts, Spirituality, Sports activities, State or officials assemblies, Statesmen, Statutes, Strangers, Success, Supremacy, Supreme Court, Tax collectors treasurer, Teaching, Temples, Textile workers, The public on a large scale, Titles, Trade and foreign affairs, Travel to foreign countries, Traveling salesman, Treaties with foreign countries, Treaties with foreign nation, Tribunals, Truth, Tumors, Wealth, Wholesale dealers, Woolen merchants, Writers for publication, Writings which are published….”

( Complied from KPZine  Navaratan Mala Part 1 ,  Rulership book _ Rex Bill and many other internet resources.)

वर दिलेली  यादी पूर्ण  नाही  …प्रत्यक्षात सुमारे २००० इन्ट्रीज आहेत. विस्तारभयास्तव सगळ्या इथे देऊ शकत नाही.


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

18 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anant

  श्री. सुहासजी ,

  एकदम १०० नंबरी गोष्ट सांगितली –
  जो ज्योतिषी नुसत्या त्या संकेतांवर न जाता त्या संकेतां मागची स्थळ काळ परिस्थिती समाज यांची सापेक्षता तपासूनच निष्कर्ष काढेल तोच अचूक भविष्य सांगू शकेल ना?

  असे ज्योतिषी फार दुर्मिळ आहेत – बहुतेक ठिकाणी लेखातील प्रकारचे ज्योतिषी जास्त असतात. जातकाच्या पोटात भविष्य ऐकून गोळाच आला पाहिजे.

  नेहमीप्रमाणे सुंदर लेख !

  धन्यवाद,
  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आजकाल कोणीही एकादे चोपडे वाचतो (किंवा ना वाचताही) आणि ज्योतिषाच्या धंद्यात उतरतो, या लोकांना ज्योतिष सांगाअय्चे नसतेच , त्यांना ‘उपाय – तोडगे’ या मार्गाने जातकंना लुटायचे असते , त्यासाठी आधी जातका च्या मनात भिती उत्पन्न झाली पाहीजे ना? म्हणून प्रथम हे असले अशुभ भविष्य सांगायचे आणि मग सावज जाळ्यात फसले की कापायचे!
   हे कमी की काय म्हणून ‘सब लोर्ड ‘ वाले के.पी. नक्षत्र शिरोमणीं ! पुण्यात सध्या एका क्लास ची जाहीरात चालू आहे , नाव नोंदणी चालू आहे , १३ (प्रत्येकी एका तास) लेक्चर्स मध्ये के.पी. ज्योतिष ! अरे काय चेष्टा आहे ही ! १३ वर्षे घातली तरी A-B-C-D वर अडखळायला होते तिथे हे १३ तासात के.पी. तज्ञ तयार करणार ?
   असो.

   आपला
   सुहास गोखले

   0
   1. उमेश साळवी

    नमस्कार सुहासजी
    आपला blog उत्तम आहे. ज्योतिष विषयी माहिती उत्तम. मी स्वत पारपारिक ज्योतिष शिकलो अाहे. तुमच्याकडे ज्योतिष शिकायचे आहे.
    मला आपल्या कडून व्यवसाय बाबत ज्योतिष मार्गदर्शन हवे आहे.
    आपले मानधन सागावे. बाकीची माहिती email आली की सागेन.
    आपला वाचक
    उमेश साळवी

    0
    1. सुहास गोखले

     श्री. उमेशजी,

     मी आपण दिलेल्या umeshsalvi2015@gmail.com या ईमेल पत्त्यावर मेल पाठवली होती पण ईमेल बाऊंस झाली , undelivered म्हणुन , आपण आपला इमेल पत्ता तपास लिंवा दुसारा एखादा ईमेल पत्ता द्या किंवा आपला दूरध्वनी क्रमांक कळवा.

     धन्यवाद

     आपला

     सुहास गोखले

     0
   2. उमेश साळवी

    नमस्कार सुहासजी
    मे पण ३ते४ email sent केले. ते पण बाउंस झाले . कृपया या नंबर वर सर्पक केला तर आपला आभारी राहीन.
    मो न ९९७००९२०४६
    आपला
    उमेश साळवी

    0
    1. सुहास गोखले

     श्री. उमेशजी,
     आपल्या स्र्व ईमेल मला मिळाल्या आहेत , मी आपल्याला उत्तर हि पाठवले आहे. दुसरा एखादा ईमेल आय-डी वापरुन पहा.

     आपला

     सुहास गोखले

     0
 2. Gaurav Borade

  😀 भारी आहे … मजा आली… मस्त लेख.. खूप काही clear होत आपले लेख वाचून… धन्यवाद..
  आणि
  जय श्रीकृष्ण..! 🙂

  0
  1. सुहास गोखले

   जय श्रीकृष्ण , गौरवजी,

   आपला अभिप्राय वाचून समाधान वाटले, आपण माझ्या ब्लोगचे नेहमीचे वाचक आहात आणि आवर्जुन अभिप्राय देता. खरे तर इतके चांगले लिहुन ही ब्लॉग चा वाचक वर्ग मर्यादित आहे, त्यात जेव्हढी वाढ अपेक्षित होती तो होत नाही , म्हणून मी लेखन कमी / बंद करायचे ठरवले होते पण आपल्या सारखे काही चांगले वाचक आहेत त्यांच्या साठी का होईना लिखाण चालू ठेवत आहे.

   असाच लोभ राहूद्या

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. Gaurav Borade

  सुहास सर,
  खर तर आम्हीच तुम्हाला धन्यवाद म्हणायला हव.. कारण
  तुम्ही ज्याप्रमाणे लेख लिहिता त्याची पद्धत खूप चांगली आहे , ज्योतिष शास्त्राविषयीचा दृष्टीकोन खूप clear होतो… “केस studies ” या तर तुमच्याप्रमाणे कुणीच explain करू शकत नाही.. तुम्ही संपूर्ण logic खूप detail मध्ये सांगता … जे कि कुणीच सांगत नाही..,
  आणि अभिप्राया बद्दल म्हणाल तर .. जर तुम्ही १००-२०० ओळी आमच्यासाठी लिहू शकता तर आम्ही निदान ४ ओळीची प्रतीक्रिता तर देऊ शकतो… 🙂

  तसेच वाचकांच्या संखेविषयी म्हणाल तर माझ्यामते जर लोकांना समजलच नाही कि इतका चांगला blog अस्तित्वात आहे तर ते येणार कसे ? तुमचा लेख एकदा वाचल्यावर तो पुन्हा पुन्हा या blog वर येईल यात शंकाच नाही .. पण त्यासाठी तो एकदा तर यायला हवा ….. हे माझ मत आहे..
  बाकी आपले लेखन असेच सुरु ठेवा … 🙂 आणि
  आपलाही आमच्यावर असाच लोभ राहूद्या ..

  0
 4. Himanshu

  So all the planets are either exalted or in their home signs…..how many years does it take to repeat this (including nakshatra and pada placement)?….I read somewhere that 6th house is best position for Saturn as it keeps check on 6,8,12. Anyway, thanks for one more great post.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. हिमांशुजी,

   एखादी विषिष्ट ग्रहस्थिती पुन्हा येण्यासाठी लक्षावधी वर्षे लागतील. शनी, सहाव्या घरात चांगला हे काहीसे स्थूल मानाने म्हणता येईल, एखाद्या ग्रहाचे केवळ तो एका विषिष्ट स्थानात आहे एव्हढ्यावरच मूल्यमापन करता येणार नाही, पत्रिकेतले इतर घटक पण पाहीले पाहीजेत, हे एका क्रिकेट्च्या टीम सारखे आहे, केवळ एकादा बॅट्समन चांगला असुन चालत नाही , बॉलिग, फिल्डिंग, विकेट किपिंग पण तितेकेच चांगले लागते. हे सर्व असले तरी जिंकलो असे नाही ! पिच कसे आहे, हवामान अनुकूल आहे का , प्रतिस्पर्धी टिमा ची काय तयारी आहे, अंपायर कोण आहेत हे पण महत्वाचे , हे ही जमले तर जिंकलो का? नाही सगळ्यात शेवटी ‘बेटिंग – मॅच फिक्सिंग’ चा कल कोणत्या बाजूला आहे हेच निर्णायक ठरते ना?

   अभिप्राया बद्दल धन्यवाद

   आपला

   सुहास गोखले

   0
 5. Prashant

  Dear Suhasji,
  Saprem Namaskar,
  Very informative article. This should be a must read for all the ‘Jyotish Bhushans’ who with their half knowledge can potentially misguide people.
  Kalave lobh asava,
  Aapla,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद प्रशांतजी,

   ही सारी माझ्या गुरुंची (कै. श्रीधरशास्त्री मुळ्ये) कृपा. त्यांनी ‘ज्योतिष शिकवण्या पेक्षा , ज्योतिष कसे शिकायचे ‘ ते समजावले ! ते म्हणायचे “नियमांची घोकंपट्टी करुन काहीही होणार नाही, पुस्तकातले नियम व्यावहारीक पातळी वर कसे वापरायचे ते आधी शिकून घे..नियम काय एखादे पुस्तक उघडले की ढीगभर सापडतील पण हे नियम कसे वापरायचे याचे तंत्र मात्र या पुस्तकांतून दिलेले नसते ते प्रथम अवगत करुन घे… Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime… अशी त्यांची फिलॉसॉफी होती.

   अभिप्राया बदल धन्यवाद

   आपला

   सुहास गोखले

   0
 6. ओमकार जामसंडेकर

  Superrbbbbb guidance sir, श्रीकृष्णाच्या सामाजिक-आर्थिक-तत्कालीन परिस्थितीनुरूप कुंडलीचे विश्लेषण करत नव्या ज्योतिषांना ही दर्जा एक क्रमांकाचे guidance दिले आहे.
  आणि मुख्य म्हणजे तुमच्या ब्लॉगची मांडणी ही सुटसुटीत व आकर्षक आहे. धन्यवाद

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.