(हा एक वैयक्तिक अनुभव आहे, यात माझी फुशारकी मारायचा / आत्मस्तुती करण्याचा कोणताही हेतु नाही)

 

गेल्या आठवड्यात पुण्याहून श्री. आनंद दळवी नामक तरुणाचा फोन आला.

“सुहास गोखले बोलताय का?”

“हो, मी सुहास गोखलेच बोलतोय”

“मी आनंद दळवी”

मी डोक्याला ताण दिला खरा पण काही केल्या हे आनंद दळवी कोण माझ्या लक्षात आले नाही, त्यांच्या आवाजावरुन पण काही तर्क करता आला नाही,…

“क्षमस्व, पण मी तुम्हाला ओळखल नाही, आपण कोण?”

“अहो, कसे लक्षात राहणार? पंचवीस वर्षे झाली की”

“माझ्या अजुनही लक्षात येत नाही दळवीजी”

“ते सांगतो गोखले, पण सगळ्यात पहील्यादा मी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन करतो!”

“अभिनंदन?  का? कशासाठी?”

“सांगतो ना…पण मी नाही माझे डॅड आपल्याशी बोलतील..”

आनंद च्या डॅड म्हणजे सिनियर दळवींनी सांगायला सुरवात केली…

त्याचे असे झाले होते…

१९९२ मध्ये मी माझी प्रोपायटरी सल्ला सेवा चालवत होतो, ‘प्रॉडक्ट डिझाईन’ ही माझी खासीयत असल्याने माझ्या कडे नवीन उत्पादनांचे डिझाईन करणे, सध्याच्या उपकरणांत सुधारणा करणे अशा प्रकाराची कामे असायची. मी ही कामे ‘टर्न की ‘ बेसीस वर करायचो, म्हणजे ग्राहक आपली गरज सांगायचा, त्याच पूर्ण अभ्यास करुन मी प्रॉडक्ट (इंस्ट्रूमेंट ) डिझाईन करायचो, त्याचे प्रोटॉटाईप ( नमुना) बनवायचो, ग्राहक त्याची चाचणी घ्यायचा, सर्व कसोट्यांना ते प्रोटोटाईप उत्तीर्ण झाले की की सर्व तंत्रज्ञान ज्यात हार्डवेअर , सॉफ्टवेअर, बिल ऑफ मटेरियल, मॅन्युफॅक्चरींग मॅन्युअल, सर्विस मॅन्युअल, टेस्ट प्लॅन , स्पेशल जीगस  आणि फिक्चर्स इ. सह संपूर्ण तंत्रज्ञान (know how)  ग्राहका कडे सोपवायचो आणि माझी ठरलेली (भक्कम!) रक्कम घेऊन मोकळा व्हायचो. अर्थात तंत्रज्ञान हस्तांतर केल्यानंतर सहा महीन्याची वॉरंटी असायची ज्यात मी मोफत ऑन साईट सपोर्ट देत होतो आणि सहा महिन्यां नंतर सुद्धा सशुल्क सपोर्ट असायचा. पण ९०% केसेस मध्ये कोणताच सपोर्ट द्यावा लागला नाही. किंबहुना असा सर्व्हिस सपोर्ट द्यावा लागू नये अशा तर्‍हेनेच डिझाईन मी करत असे.

ह्या श्री. दळवींनी १९९२ च्या सुरवातीला माझ्याशी संपर्क केला होता, माझ्या एका ग्राहकाने माझ्या बद्दल अगदी भरभरुन शिफारस केली होती त्यांच्याकडे. श्री दळवी तेव्हा मशीन टुल्स ला लागणार्‍या  फ्रॅक्शनल हार्स पॉवर मोटर्स चे उत्पादन करत होते आणि त्या मोटार्स चे टेस्टींग करण्यासाठी त्यांना एक पूर्ण पणे ऑटोमेटीक अशी टेस्टींग सिस्टीम हवी होती. त्यावेळी बाजारात अशी रेडीमेड सिस्टीम उपलब्ध नव्हती आणि ज्या कंपन्या अशी सिस्टीम ऑर्डर प्रमाणे बनवून देऊ शकत होत्या त्यांची किंमत अवाच्या सवा तर होतीच शिवाय त्यासाठी वर्षभर थांबावे लागणार होते. अशी सिस्टीम अगदी अर्जंट हवी होती म्हणून (नाईलाजाने का होईना !) श्री दळवी मला भेटले, मला त्यांची गरज समजाऊन सांगीतली, मी मागत असलेली (जराशी जास्त) रक्कम पण द्यायचे कबूल केले.

मी माझे काम सुरु केले. सुमारे तीन महीने अथक परिश्रम घेऊन ही ‘ऑटोमेटीक टेस्टींग सिस्टीम’ मी तयार केली. पुढच्या महीन्यात त्याच्या सर्व चाचण्या होऊन , श्री दळवींनी ती सिस्टीम वापरायला सुरवात केली. ही सिस्टीम अगदी पहील्या दिवसा पासुन विनाखंड , उत्तम रित्या चालायला लागली, कोणत्याही प्रकाराची समस्या म्हणून आली नाही. मला माझ्या डिझाईन बद्दल आत्मविश्वास होताच (म्हणून तर भली मोठी रक्क्म मागीतली होती आणि ती मिळाली देखील होती !).  श्री दळवी कमालीचे खुष झाले, सिस्टीम बसवल्याला सहा महीने होऊन झाले,  सगळे इतके चांगले चालू होते की मला श्री. दळवींच्या कारखान्यात कधी जावेच लागले नाही. त्यानंतर मी एकदाच तिथे गेलो ते माझ्या पेमेंट्चा शेवटचा १०% हिस्सा घेण्यासाठी , तेव्हा मी माझ्या पेमेंटचा १०% भाग वॉरंटी पिरियड संपल्या नंतरच घेत असे. ग्राहकाचे पूर्ण समाधान व्हावे हाच त्या मागचा हेतु होता.

श्री दळवी इतके खुष होते की त्यांनी माझा १०% चा चेक तर दिलाच शिवाय एक सुबक आणि मौल्यवान भेटवस्तु हातात ठेवली. ते होते ओरिजीनल , व्हींटेज, पार्कर व्हॅक्युमेटीक फाऊंटन पेन जे श्री दळवींचे आजोबा वापरत होते ! हा अमोल ठेवा आजही मी अगदी जपून ठेवला आहे!

(श्री दळवींशी बोलताना कधीतरी माझ्या व्हिंटेज फौटन पेन्स च्या आवडीचा उल्लेख आला असावा ते त्यांनी लक्षात ठेवले होते म्हणायचे !)

बघता बघता १९९२ साल संपले, १९९३ संपले , भितींवरचे ‘कालनिर्णय’ दरवर्षी बदलत गेले. श्री दळवीं साठी तयार केलेली सिस्टीम बिनतक्रार चालूच होती. मी अधून मधून श्री. दळवींना फोन करत होतो, सिस्टीम कशी चालू आहे, काही समस्या आहेत का? सुधारणां हव्यात का? इत्यादी , पण सगळे ठीक चालू असायचे . श्री दळवींच्या रेकमेंडशन नी मला इतर कारखान्यां कडून काही नवीन कामेही मिळाली होती. पण नंतर १९९६ च्या सुमारास आलेल्या औद्योगीक मंदी ने सगळेच बदलले , प्रोपायटरी सल्ला सेवा चालू ठेवणे दिवसेंदिवस अवघड होत गेले शेवटी नाईलाजाने मी माझा हा ‘कनसलटंसी’ व्यवसाय बंद करुन आय.टी. इंडस्ट्रीत पूर्ण वेळाची नोकरी स्विकारली.

त्या नंतर लगेचच मी प्रथम मुंबई आणि नंतर लगेचच अमेरिका असे स्थलांतर केले, अमेरिकेत ७ वर्षे राहुन मी २००६ मध्ये मी पुण्यात परत आलो. आता पुणे बरेच बदलले होते, मी ही सॉफ्टवेअर क्षेत्रात पार बुडून गेलो होतो. नव्वद च्या दशकातले माझे जुने क्लायंट, त्या वेळचे माझे पीसीबी डीझाईनर्स, कॅबीनेट व्हेंडर्स, कांपोनंट व्हेडर्स,जॉब वर्क करणारे अधून अधून भेटायचे , जुन्या आठवणीं जाग्या व्हायच्या. मी पुण्यात परत आलो हे कळताच माझे काही जुने क्लायंट्ना माझ्या मागे लागले,  ‘सुहास, बरे झाले पुण्यात आलास, आमचे दोन तीन प्रोजेक्ट आहेत आणि तुझ्या शिवाय दुसरे कोण ते करु शकेल? चल आपण पुन्हा काम सुरु करु” ! पण आता ते शक्य नव्हते, एकतर मी आता नोकरीत होतो आणि या हार्डवेअर , प्रोटोटायपिंग विश्वा पासून मी आता फार दूर गेलो होतो, सगळेच आता मला परके झाले होते. आता काही करायचे पुन्हा शुन्या पासून सुरवात करावी लागली असती इतके तंत्रज्ञान बदलले होते.

ह्या सगळ्यात श्री. दळवींशी मात्र कधी संबंध आला नाही.

२००९ मध्ये मी नोकरी सोडून नाशकात आलो आणि पुण्याचा संबंध अधिकच विरळ होत गेला.

इकडे कालमाना नुसार श्री दळवींच्या कारखान्यात , ते करत असलेल्या उत्पादनांत बरेच बदल झाले, श्री दळवींचा मुलगा ‘आनंद’ पण आता बापा च्या खांद्याला खांदा लावून व्यवसायात उभा होता, त्यांचा फ्रॅक्शनल हार्स पॉवर मोटर्स चा व्यवसाय अजूनही चालू होता, आणि खास त्या साठीच १९९२ मध्ये डिझाईन केलेली माझी ‘सिस्टीम’ २०१७ मध्येही अव्याहत चालू  होती, विनाखंड , विनातक्रार ! एक नाही दोन नाही तब्बल पंचवीस वर्षे! ही ‘सिस्टीम’ ना कधी बंद पडली,  ना कधी चुकली. श्री दळवींना या यंत्रणेचे नुसते कौतुक नव्हते तर एक मोठा अभिमान होता!

गेल्या खंडे नवमीला यंत्रांची , हत्यारांची पूजा करताना , मी डिझाईन केलेल्या सिस्टीमची ही पूजा झाली. श्री. दळवी आपल्या मुलाला आनंदला म्हणाले , बघितलेस असे दर्जेदार उत्पादन पाहीजे, आपण जर्मन , अमेरिकन , जपानी मालाच्या दर्जा बद्दल , गुणवत्ते बद्दल कौतुक करतो , पण इथे आपल्या पुण्यातल्या एका तरुण इंजिनियर ने त्या जर्मन  / जपान्यांच्या  तोंडात मारेल अशी डिझाईन केलेली ही सिस्टीम गेले २५ वर्ष  अव्याहत,  विना खंड चालू आहे , ना दुरुस्ती, ना मेंटेनन्स”

श्री. दळवींचा मुलगा म्हणाला

“डॅड , खरेच , अप्रतीम , बुलेट प्रुफ डिझाईन आहे हे , २५ वर्षे बिनतक्रार काम करणारे डिझाईन करणे जोक नाही, मला वाटते आपण या डिझाईनरना बोलवून त्यांचे कौतुक केले पाहीजे, त्यांंना ही बरे वाटेल”

“पण आता हे डिझाईनर सापडणार कोठे”

त्या सिस्टीमच्या डिझाईनचे काम (जे मी तेव्हा माझ्या राहत्या घरातूनच करत होतो) चालू असताना,  श्री दळवी एकदा ट्रायल्स बघायला माझ्या तेव्हाच्या घरी आले होते , ते त्यांना पुसटसे आठवत होते, खात्री करुन घेण्यासाठी श्री.दळवींनी मोठ्या कष्टाने २५ वर्षा पुर्वीची बिले / इनव्हाईस तपासून , माझा तेव्हाचा कोथरुडचा पत्ता हुडकून काढला.

श्री. दळवी आणि त्यांचा मुलगा , कोथरुड ला धडकले,  पण श्री. दळवी चक्रावलेच कारण  एव्हाना कोथरुड कल्पनेच्या बाहेर बदलले होते, त्यावेळची  मी रहात असलेली अपार्ट्मेंट बिल्डिंग रिडेव्हलप होऊन त्या जागी एक चकाचक टॉवर उभा होता!

श्री. दळवींनी त्या टॉवर मध्ये रहाणार्‍यां कडे माझ्या बद्दल चौकशी करायला सुरवात केली, माझे त्यावेळेचे बरेचसे शेजारी अजूनही त्या टॉवर मध्ये रहात आहेत पण कोणालाच माझा ठावठिकाणा माहीती नव्हता. सुदैवाने त्यावेळचे सोसायटीचे सेक्रेटरी श्री कदम काका (यांचा उल्लेख माझ्या काहीसे अमानवी भाग -३  या लेखात आला आहे) श्री. दळवींना भेटले. पण त्यांनाही मी कोठे आहे हे माहीती नव्हते (कसे असणार?) पण तेव्हा माझ्या कडे नेहमी येणारे  . श्री.सावर्डेकर नामक टेक्निशियन (हे माझ्या कडे , सोल्ड्रींग , वायरींग , मेकॅनिकल फिटिंग ची कामे करायला नेहमी येत असत) ह्या कदमकाकांचे नातेवाईक होते, हे श्री.सावर्डेकर कोथरुडलाच किनारा हॉटेल समोरच्या अलकापुरी सोसायटीत रहात होते . या श्री सावर्डेकरां कडे कदाचित माझा ठावठिकाणा असेल त्यांना विचारा असे श्री. कदमांनी सुचवले.

श्री.कदमांचे आभार मानून दळवी पिता-पुत्र , श्री. सावर्डेकरांकडे पोचले, पण त्यांनाही माझा सध्याचा ठावठिकाणा माहीती नव्हता. पण श्री सावर्डेकर २००७ मध्ये कर्वेनगर ला माझ्या घरी एकदा आले होते,  तो पत्ता त्यांना माहीती होता. श्री. दळवी आता कर्वेनगर ला पोहोचले, २००६ – २००९ या काळात मी कर्वेनगर ला अलंकार पोलिस चौकी जवळच्या एका बंगल्यांचा सोसायटीत (भाड्याची जागा) रहात होतो. दळवी ‘ त्या’  बंगल्या पर्यंत पोहोचले , पण मी ती जागा २००९ मध्ये सोडली होती आणि तिथे आता दुसरेच कोणीतरी रहात होते. त्यांना माझा पत्ता अर्थातच माहीती नव्हता, त्या बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यातल्या श्री काटें कडे चौकशी झाली, या श्री. काटें कडे माझा मोबाईल नंबर होता. ती जागा सोडताना माझा  नंबर त्यांना देऊन ठेवला होता, जर कोणी माझी चौकशी करत आले तर बिनधास्त त्यांना माझा नंबर  द्या असे सांगीतले होते.

श्री.काटेंनी श्री. दळवींची चौकशी करुन माझा मोबाईल क्रमांक त्यांना दिला.

श्री. काटेंच्या समोरच श्री. दळवींनी माझा नंबर पंच केला आणि माझ्या कडे रिंग़ वाजली…

“सुहास गोखले बोलताय का?”

“हो, मी सुहास गोखलेच बोलतोय”

“मी आनंद दळवी”

 

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. संतोष

  सुहासजी,

  Great work
  म्हणून तुमच ज्योतिष analysis खूप detail मध्ये असतं 🙂

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   श्री संतोषजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   आपण म्हणता त्यात तथ्य आहे . इंजिनियरींग ची डिग्री, संशोधन- विकास ह्याच क्षेत्रात 30 वर्षाची कार्ककिर्द, अमेरिकेत 7 वर्षाचे वास्तव्य , नोकरीत अगदी सुरवातीच्या काळात भेटलेले चांगले ‘बॉस’ यांचा प्रभाव माझ्या कामावर पडला नसत तरच नवल ! अनेक विसःअयांचे वाचन, संगीत – कला यात कमालीची रुची आणि प्रत्येक काम सर्वोत्कृष्ट करायचा ध्यास ह्यामुळे ही काम चांगले होते.

   सुहास गोखले

   0
 2. Rakesh

  Suhas ji tumhi all rounder ahat..kharatar tumchich kundli study sathi taka ekda….barach shikayla milel, babajin sarkhe anubhav pan tumhala alet, tumcha career pan farach change hot gela, ekda jamla tar takach tumchya kundlicha analysis. ani tya machine cha ek photo pan takach.Thank you!

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.