मी माझ्या या आधीच्या एका केस स्ट्डी मध्ये ‘ विधिलिखीत’ या गोष्टीबाबत काही ओझरता उल्लेख केला होता. त्यावर काही वाचकांनी जादा माहीती द्या अशी विचारणा केली आहे. मी या विषयावर एक विस्तृत लेखमाला लिहायचा विचार करत आहे . माझ्या कडे या बाबतीत बरीच माहीती आहे,  या माहितीचे संकलन करुन लेखमाला लिहायला वेळ लागेल म्हणून तत्पूर्वी चटकन काही चार ओळी लिहायचे ठरवले …  या लेखाचा पहिला भाग यापूर्वीच प्रकाशीत झाला आहे:

विधीलिखीत –  १

आज त्या लेखाचा दुसरा आपल्या पुढे सादर करत आहे.

आपल्याला आयुष्यात भोगाव्या लागणार्‍या सर्व सुख- दु:खा मागे ‘कर्माचा सिद्धांत’ आहे. संततीचा अभाव, ज्न्मजात असलेले शारीरीक व्यंग, गंभीर स्वरुपाचे मानसीक रोग या सारख्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते . पण या जन्मात योग्य ती चांगली कर्में करुन पूर्वजन्मात केलेल्या / पूर्वजांनी केलेल्या वाईट कर्मांची काही प्रमाणात भरपाई करता येते.

इथे मी ते खडे , पूजा , यंत्रे याबद्दल बोलत नाही आहे , तसा गैरसमज करुन घेऊ नका. माझा रोख चांगल्या कृत्यांकडे आहे जसे की खरे बोलणे, दुसर्‍याला निरलस पणे मदत करणे, फळांची अपेक्षा न धरता आपले नेमुन दिलेले काम चोखपणे करणे, सत्पात्री दान करणे, सतत सकारात्मक (Positive) विचार करणे , कोणाचेही अशुभ न चिंतणे, रुग्णसेवा करणे, माता पित्यांचा – गुरुजनांचा सन्मान ठेवणे, अनाथ / अपंगां साठी काही चांगले काम करणे , सचोटीने वागणे , समोरच्या व्यक्तीचे / परिस्थितीचे कारण नसताना मूल्यमापन न करणे (non judgmental);  मी या अशा चांगल्या सात्वीक कामां बद्दल बोलतोय.

या अशा चांगल्या कामांनी आपण आपल्या पदरात पडू घातलेल्या वाईट फळांच्या बाबतीत:

 • अशुभ फळे काही प्रमाणात टाळू शकतो.
 • काहींची तिव्रता कमी करु शकतो.
 • काही फळें मिळण्याचा कालावधी, आपल्याला अनुकूल असा मागे-पुढे करु शकतो.

म्हणजेच ‘अशुभ’ फळ अटळ असेलही कदाचित पण ते केव्हा आणि कशाप्रकारे भोगायचे याचा विकल्प आपल्याला मिळालेला असतो. ज्योतिषशास्त्रा द्वारे आपल्याला या बाबतीत मार्गदर्शन मिळू शकते.

जन्मपत्रिकेतले ग्रह आणि गोचरीचे ग्रह आणि प्रोग्रेशन्स ग्रह यांच्या संयोगाने अनेक एनर्जी फिल्ड्स तयार होत असतात. प्रत्येक व्यक्तीची त्या एनर्जी फिल्डस ना प्रतिसाद द्यायची याची स्वत:ची अशी एक खास शैली असते , ती प्रथम जाणुन घेऊन मग त्या सर्व गोचरीचे ग्रह आणि प्रोग्रेशन्स ग्रह यांचा परिणाम त्या व्यक्तीवर कसा आणि किती होऊ शकेल ते ठरवता येते आणि एकदा हे लक्षात आले की  अनुकूल परिस्थितीचा जास्तीत जास्त लाभ कसा उठवता येईल आणि प्रतिकूलतेत कमीतकमी हानी कशी होईल ते बघणे सहज शक्य होते.

पण असे जरी असले तरी जन्मपत्रिकेच्या अभ्यासवरुन या बाबतीत चांगले मार्गदर्शन करणे वाटते तितके सोपे नाही. हे काम पेलायला त्या ज्योतिर्विदाचा अभ्यास , व्यासंगही तितक्याच तोलामोलाचा लागतो. ज्योतिषशास्त्रा च्या अभ्यासा बरोबरच मानसशास्त्र , परामानसशास्त्र या सारख्या विषयांचाही सांगोपांग अभ्यास लागतो. त्याच्या जोडीला इंट्यूईशन ची मदत घ्यावी लागत असल्याने काही आधात्मिक बैठक, गुरुकृपा असणे हे ही आवश्यक असते.  प्रत्यक्षात होते काय, आजकाल कोणीही उठतो आणि स्वत:ला ज्योतिषी म्हणवू लागतो, अभ्यास नाही, व्यासंग नाही, साधना आराधना नाही, गुरुकृपा नाही. त्यामुळे मी जे वर लिहले आहे त्यातले काहीही या असल्या लोकांना सांगता येणार नाही.

आता फसवणूक कोठे होते ते सांगतो ,ज्योतिष आपले प्रारब्धाचे भोग किती आहेत ते सांगते.  प्रारब्ध भोगण्यासाठीच आपला जन्म असतो. भोग हे भोगूनच संपवावे लागतात.हा वळसा बर्‍याच जणांना कळत नाही आणि कळला तरी पेलवत नाही.  रिमोट कंट्रोलच्या जमान्यात आपल्या पुढ्यातल्या समस्या देखील अशाच रिमोट द्वारे दूर व्हाव्यात अशी भ्रामक अपेक्षा धरली जाते.आणि मग अशा उपाय -तोडग्यांचा शोध घ्यायला सुरवात होते.

मात्र जेव्हा लोक शॉर्ट्कट मारायच्या हेतुने त्यावर उपाय विचारतात. तेथेच त्यांची फसवणूक व्हायला सुरवात होते

विधीलिखीतल्या गोष्टी टाळता येत नसतात. त्यामुळे पोथी वाचून, खडे वापरुन, माळा घालून , विधी करुन , यंत्र बाळगून कोणालाही , कोणताही लाभ होत नाही.

मी पुन्हा एकदा लिहतो : या जप , पोथी, खड्यांनी, यंत्रांनी , तंत्रांनी तुमची समस्या आपोआप दूर होणार नाही. ग्रह हे दगड, माती,  खनिजे आणि विषारी वायूंनी भरलेले  गोळे आहेत , ते देव नाहीत त्यांची पूजा केल्याने , त्यांचा जप केल्याने , नक्षत्रांची शांती केल्याने ते प्रसन्न होणार नाहीत!

असे उपाय करुन त्या ग्रहांना  लाच देताय काय?

भविष्य जरुर जाणून घ्यावे आणि त्या नुसार मनाची धारणा थोडी बदलावी. उपाय-तोडग्यांच्या भूलथापांना बळी न पडता , असल्या कोणत्याही भाकड कर्मकांडात न अडकता प्रयत्न चालूच ठेवावेत. असे केले तर फसवणूकीचा प्रश्नच उद्भवत नाही.

उपाय , तोडगे कधीच काम करत नाहीत , त्याचा झालाच उपयोग तर तो थोडेसे मनोबल वाढण्या कडे होतो जसे “आता मी हा उपाय करतोय ना मग माझे सगळे चांगले होईल” .

पण मनाची ही उभारी मुळात आतूनच यायला हवी , या तात्पुरत्या मलमपट्टीने मुळे वेदनेला थोडाफार आराम मिळतो हे जरी काही प्रमाणात (Placebo effect) खरे असले तरी त्याने मूळ दुखापत कधीच बरी होणार नाही.

ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते , ग्रहांचा कानोसा घेऊन प्रयत्नांची दिशा ठरवा पण प्रयत्न हे असलेच पाहीजे , ते अधिष्ठान सुटता कामा नये.

आयुष्याची लढाई आपल्यला एकट्यालाच लढायची असते त्यातले खाचखळगे समजाऊन घ्यायला ज्योतिषशास्त्राची मदत घ्या, उपाय – तोडगे मागण्या साठी नाही. आयुष्याच्या या लढाईत या असल्या कुबड्यांची मदत घेऊ नका , त्याने आज कदाचित तुमच्या पुढच्या समस्या सुटली असे क्षणीक वाटेल ही पण उद्याचे काय?

उपाय – तोडगे (त्याचा उपयोग असो वा नसो ) माणसाला पांगळे करुन टाकतात. मग अडचणीं वर मात करण्यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी व्यक्ती शनी मंदिरात रांग लावते, किंवा एखादा ग्रहाचा जप करत बहुमोल वेळ व संधी वाया घालवते.

ज्योतिषशास्त्र व्यक्तीला वास्तवतेची (Reality) ची जाणीव करुन देते आणि लढाईला केव्हाही , कधीही , कोठेही सामोरे जाण्याची तयारी करुन घेते.

प्रथम आपल्याला ज्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्याची कारणे समजून घ्यावी त्यानुसार कृती करावी. डोक्यावर कर्ज झाले आहे तर ते फेडण्यासाठी उत्पन्नाचे मार्ग वाढवायचे कसे हे पाहावयाचे का ग्रहांच्या पूजा करत आणखी पैसा आणि बहुमोल वेळ दवडत बसायचे ?

काही समस्या तर फक्त थोडा जास्त वेळ धीर धरल्यास आपोआपच सुटणार्‍यातल्या असतात पण इंस्टंट मॅगी नुडल्स सारखे दोन मिनिटांत , सगळे काही कोणतेही कष्ट न करता हवे असल्यानेच सगळा घोळ झाला आहे.

सर्व काही ठीक होईल मात्र योग्य दिशेने, चिकाटीने प्रयत्न जारी ठेवायला हवेत आणि ते कसे ते सांगणे हेच या शास्त्राचा खरा उपयोग आहे.

पण लक्षात कोण घेतो?

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. अमित

  सुहासजी,

  खूप छान माहिती दिलीत. मनुष्याने प्रयत्नशील असावे हे ज्योतिषशात्र सांगते हे पहिल्यांदाच समजले. ऐक वेगळाच पण स्वीकार्य दृष्टिकोन दिल्या बद्दल अनेक आभार.

  0
  1. सुहास गोखले

   श्री.अमितजी

   अभिप्राया बद्दल धन्यवाद.

   ज्योतिषशास्त्र हे शक्याशक्यतेचे शास्त्र आहे (प्रोबॅबीलीटीज) म्हणजेच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या समोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते हे शास्त्र सांगू शकते , त्यातला नेमका पर्याय निवडला जाईल हे सांगणे ह्या शास्त्राच्या कुवतीबाहेरचे आहे. मात्र पर्याय आहेत आणि ते कोणते आहेत हे कळले तरी बरेचसे काम सोपे होऊ शकते. प्रयत्न नेमके कोणत्या दिशेने करावयाचे , केव्हा करावयाचे हे कळले तरी निम्मे काम झाले. आपले आयुष्य हे तडजोडींचे असते , काही तडजोडी अपरिहार्य असतात तर काही आपल्यावर लादल्या जातात. अपरिहार्य तडजोडीं बद्दल काहीही करता येणार नाही पण लादलेल्या तडजोडी बद्दल बरेच काही करता येते हेच ह्या शास्त्राचे खरे बलस्थान आहे. विवाह केव्हा होणार या पेक्षा विवाह सुखाचा होणार का हा प्रश्न किंबहुना विवाह सुखाचा होण्यासाठी मी नेमक्या काय तडजोडी करु शकतो हे कळणे जास्त महत्वाचे आणि हे शास्त्र नेमके हेच सांगत असते.

   धन्यवाद
   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.