ज्योतिषविद्या अत्यंत कष्टसाध्य आहे, केवळ एखादा तीन- सहा महिन्याचा क्लास करुन किंवा फुकट ज्योतिष शिकवणारा एखादा व्हिडिओ कोर्स करुन किंवा भाराभर पुस्तके वाचून, नियमांची घोकंपट्टी करुन ज्योतिषशास्त्र अवगत होत नाही. अक्षरश: अनेक वर्षांची (अनेक वर्षांची’ याला अंडरलाईन करून घ्या !) ढोर मेहेनत त्या मागे असावी लागते. इतके करूनही ही विद्या सगळ्यांनाच अवगत होईल असे ही नाही! जसे चित्रकला, गायन वादन नृत्यादी कला, लेखन, अभिनय हे सारे गुण मूळात अंगातच असावे लागतात, रक्तात, जीन्स – क्रोमोसोम्स पातळीवरच असावे लागतात तसेच या शास्त्रात पारंगत होण्यासाठी काही विषीष्ट गुण मूळातच अंगात असतील तर आणि तरच तरच ह्या सार्या मेहेनतीचा, प्रशिक्षणाचा योग्य तो लाभ मिळवता येतो.
ज्यांना एक पत्रिका धड सोडवता येत नाही की एखादे भाकीत आत्मविश्वासाने करता येत नाही अशा असंख्य तथाकथित ज्योतिषशास्त्री, नक्षत्र शिरोमणींना मी आजवर पाहिले आहे. असे अनेक स्वयंघोषीत विद्वान बघितले आहेत की जे दिसेल त्या प्रत्येक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वर अगम्य भाषेतल्या लांबलचक पोष्टस चा पाऊस पाडत, बडबड करत, पोपट पंची करत फिरत असतात, आव असा आणला जातो की खरे ज्योतिषशास्त्र काय आहे हे फक्त त्यांनाच समजले! (आणि बाकेचे सारे अभागी अंधारात चाचपडत आहेत!) पण मजा म्हणजे इतकी सारी बोलबच्चन गिरी करणार्या या तथाकथित फेसबुक शास्त्रींनी कधी एक पत्रिका सोडवून दाखवलेली दिसत नाही हे कटू वास्तव आहे. त्यांची ही बडबड फेसबुक पोष्ट पुरतीच असते, नुसती ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’!
या शास्त्राचा आकृतीबंधच वेगळा आहे. इतर अनेक शास्त्रे आपल्याला ‘अ + ब = क’ अशा सरळ समीकरणात (फॉरम्युल्यात) बसवता येतात पण ज्योतिषशास्त्र हे अशा समीकरणांच्या भाषेत बसवता येणार नाही. हे एक अत्यंत ‘अॅबस्ट्रॅक्ट’ असे शास्त्र आहे (याला शास्त्र म्हणणे ज्यांना पटणार नाही त्यांच्या साठी ‘बॉडी ऑफ़ नॉलेज’ म्हणू ) , म्हणूनच समोर आलेली प्रत्येक पत्रिका हे एक नवे आव्हान असते, रोज नवी लढाई खेळावी लागते. काल वापरलेले आणि पडताळा देऊन गेलेले नियम, अडाखे आज सपशेल नापास होताना दिसतात असे काहीसे विचित्र आहे इथे.
हे सारे बारकावे समजाऊन सांगणारा एखादा ‘गुरू’ भेटला तर त्या सारखे दुसरे चांगले भाग्य नाही, पण आजच्या काळात असा गुरू सगळ्यांनाच भेटेल असे नाही त्यामुळे अभ्यासकाला नाईलाजाने का होईना अन्य माध्यमां कडे म्हणजेच पुस्तकां कडे (किंवा आजच्या जमान्यात यु ट्यूब व्हिडीओज, गुगल बाबा इ) वळावे लागते.
आज बाजारात या शास्त्रावरचे अनेक चांगले ग्रंथ उपलब्ध आहेत नाही असे नाही आणि त्यांच्या अध्ययनातून नक्कीच लाभ होऊ शकतो हे पण खरे आहे. पण असे असले तरी या सगळ्या ग्रथां मध्ये एक मोठी उणीव प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे त्या ग्रंथातून जे काही लिहले आहे ते सगळे प्रत्यक्षात कसे व केव्हा वापरायचे हे त्या ग्रंथांतून शिकवलेच जात नाही! नुसती थिअरी, प्रॅक्टीकल चा लवलेश सुद्धा नाही! सगळ्या लंकेतल्या सोन्याचा वीटा!
एका बड्या ज्योतिषाने ‘विवाह’ या एकाच विषयावर १२५ पानाचे पुस्तक लिहले आहे पण त्या लेखकाने ‘विवाह कधी होईल याचा कालनिर्णय‘ काही करुन दाखवला नाही, एकही उदाहरण दिलेले नाही, नुसती ग्रहयोगांची जंत्री देऊन पुस्तकाची पाने भरवलीत बाकी काही नाही! (आणि मजा म्हणजे याच पुस्तकातल्या या अशा तैयार याद्यांंची कॉपी करत आज अनेक फेसबुक शास्त्रींची दुकाने चालू आहेत!)
या पुस्तकात असंख्य पत्रिका दिल्या आहेत पण त्या समजाऊन सांगीतलेल्या नाहीत. नुसते गुरू दशमात आहे , रवी चतुर्थात अशी ग्रहस्थिती (जीे साध्या डोळ्यांना पण दिसते हो, पुन्हा लिहून कशाला दाखवायचे ?) लिहून काढली की झाले यांचे पत्रिकेचे विश्लेषण! त्या १२५ पानांत ‘हा सुर्य हा जयद्रथ’ असा एकही दाखला दिलेला नाही, त्या १२५ पानांच्या पसार्यात ‘कालनिर्णय’ कसा करावा हा अत्यंत मह्त्त्वाचा भाग लाजेकाजेस्तव अवघ्या दीड (हो अक्षरश: मोजून दीड) पानात गुंडाळला आहे हो ! आज कोणत्याही ज्योतिषाला विचारा, ‘विवाह कधी होणार?’ असा प्रश्न विचारायला आलेल्या जातकांची संख्या सर्वात जास्त (जवळजवळ ७०%) असते असे असताना उणीपुरी ५० वर्षे ज्योतिषाच्या प्रांतात घालवलेल्या या मातब्बर लेखकाला ‘विवाह कधी होईल असा प्रश्न विचारणार्या जातकाची पत्रिका कशी अभ्यासली, कोणते घटक तपासले, काय गृहीतके वापरली, कोणते नियम अडाखे वापरले, कालनिर्णयाची कोणती रीत अवलंबली आणि हे सगळे करुन झाल्या नंतर समोर आलेल्या तीन – चार पर्यांयातून योग्य पर्यायाची निवड कशी केली असे सारे खुलासेवार, स्टेप बाय स्टेप, पटेल अशा भाषेत सांगणारी एक ही केस स्ट्डी देता आली नाही, एक ही नाही? कमाल आहे! आपल्या ५०+ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अशा शेकडो / हजारों केसीस हाताळल्या असतील ना? त्या शेकडो केसीस राहू द्या बाजूला त्यातल्या किमान दहा तरी केस स्ट्डीज द्यायला हव्या होत्या ना? पण नाही, “A picture is worth a thousand words” असे म्हणतात तसे एक अशी खुलासेवार केस स्ट्डी विद्यार्थ्यांना किती उपयोगाची ठरली असती ना? अशी एक केस स्ट्डी कितीजणांना आत्मविश्वास देऊन गेली असती ना? पण हे होणे नव्हते, एकही केस स्ट्डी न देऊन त्यांनी या कालनिर्णया सारख्या मुद्द्याला चक्क बगल दिली आहे! का त्यांना कालनिर्णय करता येत नाही याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे?
ते काहीही असो, या अशा एका मातब्बराच्या बहुचर्चित अशा या पुस्तकाची ही कथा असेल तर बाकीच्यांच्या पुस्तकां बाबतीत काय बोलायचे?
असो.
पुस्तके वाचा अथवा क्लास ला जा, शेवटी स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही हेच अंतिम सत्य आहे! या शास्त्राचा अभ्यास आपला आपल्यालाच करावा लागतो आणि त्याला पर्याय नाही की एखादा शॉर्ट कट!
आता हा अभ्यास कसा करता येईल किंवा कसा करावा?
पुस्तके वाचून पाण्यात पोहायला येईल का? नाही ना? त्या साठी पाण्यात उडीच मारली पाहिजे, नाका तोंडात पाणी हे गेलेच पाहीजे ना? इथे ही तसेच आहे. जे काही शिकला आहात ते प्रत्यक्ष पत्रिकेवर चालवूनच पाहीले पाहिजे त्या शिवाय दुसरा कोणात उपायच नाही. म्हणजेच एक नाही दोन नाही शंभर नाही तर चक्क हजाराच्या घरात पत्रिका सोडवल्या पाहीजेत, ताळा – पडताळा घेत राहीले पाहिजे तेव्हा कोठे या शास्त्राची जराशी (जराशी या शब्दाला अंडरलाईन करून घ्या!) ओळख होऊ शकेल.
ज्योतिषाचा अभ्यास करायला सुरवात केलेल्यां पैकी ९०% विद्यार्थी नेमके ह्याच पायरीवर कच खातात!
मिळेल तिथून अधाशा सारखे हे ‘ज्योतिषीय ज्ञानाचे आंबोण’ बकाबका फक्त गिळत राहतात (गिळत ह्या शब्दाला अंडरलाईन करून घ्या!) आणि स्वत:ला अजिर्ण करुन घेतात. यालाच इंग्रजीत Information Overload म्हणतात किंवा देसी भाषेत शुद्द आयुर्वेदीक ‘ज्योतिषीय बद्धाकोष्ठ!
पत्रिका सोडवत राहून आपला पाया भक्कम करायचे बाजूला ठेवून हे सारे एका वेड्या स्वप्नाच्या मागे धावत राहतात आणि ते स्वप्न म्हणजे – ‘ ह्या पुस्तकात नाही तर त्या पुस्तकांत तरी ‘हमखास , १००% अचूक भविष्या सांगण्याचा फॉर्म्युला गवसेल’! ‘
आणि त्या नादात आज हे पुस्तक परवा ते पुस्तक, आज हा क्लास परवा तो क्लास, आज ह्यांचे व्हिडिओ, परवा त्या ‘ताईंचे’ व्हिडीओ, आज हा फेसबुक ग्रुप परवा तो फेसबुक ग्रुप असे धावत सुटतात ! क्षेत्र कुडलीचा काही उपयोग नाही, नवमांशा कडेच वळले पाहीजे, पारंपरीक मध्ये दम नाही, नक्षत्र पद्धती बेस्ट, नाही तर अष्टकवर्गा कडे नाही तर साडेतीन , चार , साडेपाच , सहा , साडेसात स्टेपस वाल्या पद्धती कडे, अशी सारी फरफट करुन घेत, मृगजळाच्या मागे धावत राहतात, इतकी सारी धावधाव करून शेवटी हातात काहीच पडत नाही. एक पत्रिका धड सोडवता येत नाही की एखादे भाकीत आत्मविश्वासाने करता येत नाही! हां, यातून काही निष्पन्न झालेच ते एकच – नवा ‘बोल बच्चन’ किंवा ‘ज्योतिष पोपट’!
मग, गोखले बुवा तुम्ही तरी सांगा ‘आम्ही अभ्यास कसा करायचा ते?”
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ?
सांगतो अगदी बैजवार सांगतो, पण या लेखाच्या पुढच्या भागात..
क्रमश:
शुभं भवतुु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020