या लेखमालेच्या पहील्या भागात मी जे लिहले होते ते पुन्हा एकदा लिहतो:

“जे काही शिकला आहात ते प्रत्यक्ष पत्रिकेवर चालवूनच पाहीले पाहिजे त्या शिवाय दुसरा कोणात उपायच नाही. म्हणजेच एक नाही दोन नाही शंभर नाही तर चक्क हजाराच्या घरात पत्रिका सोडवल्या पाहीजेत, ताळा – पडताळा घेत राहीले पाहिजे तेव्हा कोठे या शास्त्राची जराशी (जराशी या शब्दाला अंडरलाईन करून घ्या!) ओळख होऊ शकेल.”

पण हे सुरु करण्यापूर्वी ज्योतिषशास्त्राचा प्राथमिक अभ्यास पूर्ण करावा लागतो.

या प्राथमीक अभ्यासात ग्रह, तारे, राशी, भाव आणि ग्रहयोग, कालनिर्णयाच्या बाबतीत ‘विशोत्त्तरी दशा’ इतका तरी भाग माहितीचा असणे आवश्यक आहे. आता या टप्प्यावर उगाचच नवमांशादी वर्ग कुंडल्या, अष्टकवर्ग या सारखे अनेक विषय बळजबरीने डोक्यात कोंबायचा अट्टाहास धरु नका. म्हणजे हे जादाचे विषय शिकण्याची गरज नाही असे नाही तर सध्याच्या टप्प्यावर त्याची आवश्यकता नाही. असे सगळेच अवगत करतो म्हणालात तर आख्खे आयुष्य पुरणार नाही.

ज्योतिषशास्त्र हे एखाद्या अथांग महासागरा सारखे विस्तीर्ण आणि खोल आहे, आधी सगळे शिकून घेतो आणि मग पत्रिका तपासायाला घेतो म्हणालात तर आयुष्यात एकाही पत्रिकेला हात लावयाला जमणार नाही ! तेव्हा ‘आधी सगळे शिकून घेतो’ ही कल्पना प्रथम डोक्यातून काढून टाका.

मी वरती काय लिहलेय “जे काही शिकला आहात ते प्रत्यक्ष पत्रिकेवर चालवूनच पाहीले पाहिजे : बास तेच धरुन पुढे सरकत राहा. थांबलात तर संपलात!

अनेक नवीन अभ्यासकांशी बोलल्या नंतर माझा लक्षात आले आहे की या सगळ्यांना एकच मोठी भीती असते ती म्हणजे “मी पत्रिका बघून काही भाकीत केले आणि ते चुकीचे ठरले तर?’ आणि केवळ या एकमेव भीतीने ही लोक कधी तोंडच उघडत नाहीत, कसला प्रयत्नच करत नाहीत आणि परिणामस्वरूप वर्षानुवर्षे अभ्यास करत राहूनही यांची पाटी कोरीच राहते!

फार वर्षा पूर्वी मुंबई दूरदर्शन वर ‘कर्ण बघिरां‘ वरती एक सुंदर जाहीरात दाखवली जायची त्यात एक सुंदर संदेश होता:

कानानी बहिरा मुका परी नाही ।
शिकविता भाषा बोले कसा पाही ॥

बिघाड हो त्याच्या केवळ कानात ।
वाचा इंद्रियांत दोष मुळी नाही ॥
शब्द नाही कानी, कशी यावी भाषा ।
मुका नसोनीही गप्प सदा राही

जन सकलांनो सत्य हेच जाणा ।
मुक्याला बोलाया शिकवोनी पाही ॥
बालपणी हेरा त्वरित श्रवणदोष ।
श्रवणयंत्र देता शब्द येई कानी ॥

खूप खूप बोला कर्णबधीरांशी ।
बोलाया कसा तो शिके लवलाही ॥
घटक समाजाचा घडवा समर्थ ।
सौख्य तया द्या हो जोडा ही पुण्याई ॥

हे या नवीन ज्योतिष अभ्यासकांना किती चपखल लागू पडते पहा.
जसे केवळ कानात दोष बहिरेपणा पण वाचेंद्रिये व्यवस्थित, असे असले तरी बोलायलाच येत नाही म्हणून मुका असे का होते? कारण कानाने ऐकूच येत नसल्याने त्या मुलाला कानावर कोणते आवाजच पडत नाही आणि म्हणून भाषाच बोलायला येत नाही. फक्त एका श्रवणयंत्राची आवश्यकता आहे हो इथे! ते दिले की मुलाला सगळे ऐकायला येईल आणि बघता बघता हे ‘मुके’ समजले जाणारे मूल धडाधडा बोलायला लागते!

नव्या अभ्यासकांनी नेमके हेच करायचे आहे! त्यांनाही अशाच एका श्रवणयंत्राची गरज आहे , आणि हे श्रवणयंत्र म्हणजे न घाबरता , न बिचकता पत्रिका सोडवायाला घेणे.

इथे सर्वात प्रथम आपण “केलेले भाकीत चुकीचे ठरले तर?’ या कर्णबधिरत्वावर मात करु !

यावर एकच जालिम उपाय म्हणजे सध्याच्या या टप्प्यावर कोणतेही भाकित करायचे नाही! सिंपल ! ना रहेंगा बास ना बजेगी बासुरी !

आता म्हणाला भाकित करायचे नाही मग पत्रिका कशाला अभ्यासायची? भाकिते करणे म्हणजेच ज्योतिष ना?

हो ते मान्य असले तरी सध्या आपली ती क्षमता नाही आणि ती विकसीत करण्याचे तर प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, सध्या आपण फक्त ‘आधी काय घडून गेले आहे’ त्यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे, भविष्यात काय घडणार आहे या कडे अजिबात बघायचे नाही ! असे केले की भाकित चुकले तर काय ही भितीच शिल्लक रहात नाही !
हेच तुमचे ‘श्रवण यंत्र’ !

नवे अभ्यासकांच्या नेमके हेच लक्षात येत नाही ते आपले घेतली पत्रिका कर भाकित या जाळयात सापडतात, आणि एका पाठोपाठ भाकिते चुकायला लागली की निराश होतात!

‘केलेल भाकित बरोबर येणे’ ही कोणाही ज्योतिषासाठी एक आव्हानच असते, अशी आव्हाने पेलणे आणि त्यात यशस्वी होणे हेच आपले ध्येय असले तरी आत्ता या टप्प्यावर आपल्या दुबळ्या हातांना अशी आव्हाने न पेलणारी असतात हे पण लक्षात घ्या तेव्हा निष्कारण त्याच्या मागे लागून वेळ, पैसा, ताकद कशाला खर्च करायची?

ठीक आहे ? मग आता आपल्याला नेमके काय करायचे आहे?
सर्व माहिती उपलब्ध असलेल्या जातकांच्या पत्रिका अभ्यास करायचा.

इथे सर्व माहिती म्हणजे जातक काय शिकला आहे, कोणता उद्योग धंदा करत आहे , वैवाहिक जीवन कसे आहे , आरोग्य कसे आहे, संतती सुख कसे आहे, पैसा कितपत आहे, सामाजिक प्रतिष्ठा / कीर्ती, मानमरातब, कला- कौशल्ये, काही विचित्र / अद्भुत घटना घडल्या आहेत का इ.
ही माहिती आणि जातकाची पत्रिका घेऊन आता ‘उलट’ अभ्यास करायचा. इथे आपल्याला भविष्य सांगायचे नाही की कोणते भाकीत करायचे नाही त्यामुळे ‘भाकित चुकले तर काय?’ ही भीतीच नाही !

इथे आपल्याला पत्रिकेच्या माध्यमातून जातकाच्या आयुष्याचे सगळे पैलू कसे उलगडता येतात हे पाहावयाचे आहे.

हा अभ्यास आपल्याला अनेक मार्गांनी करता येतो.

प्रथम व्यक्तीचे दिसणे, रंग रुप, बोलणे चालणे, स्वभाव आदी बाबतींचा वेध घ्यायचा असतो. आता व्यक्ती माहीती असल्याने ती उंच आहे का बुटकी, काडी पैलवान आहे का लठ्ठ , बोलका आहे का धुमा, रागीट आहे का प्रेमळ हे माहिती असतेच आता ते फक्त पत्रिकेच्या माध्यमातून बघायचे आहे. व्यक्तीचा आवाज, चेहेर्‍याची ठेवण (उंच कपाळ, सरळ नाक, कुरळे केस, टक्कल, जाड ओठ . बारीक डोळे इ.) असे अनेक घटक विचारात घेत येतील. या सार्‍यां पाठीमागे काही ग्रहांचा, ग्रहस्थितिंचा, ग्रहयोगांचा हात असतोच असतो! तो नेमका काय हेच तर तपासायचे आहे.

एखादी व्यक्ती अत्यंत फटकळ आहे, तिरकस बोलणारी आहे , सतात टिका करणारी अशी असेल तर त्या मागे ‘बुध – मंगळाचे’ योग असण्याची मोठी शक्यता असते असा अनुभव आहे , समोरच्या पत्रिकेत असा योग आहे? काही वेळा बुध – मंगळ नसेल दुसरे काही तरी असेल, घ्या त्याचा शोध, अभ्यास सुरु…

एखाद्याचे डोळे खराब आहे , सतत दातांच्या, कानांच्या तक्रारी चालू असतील तर पत्रिकेतली दात, डोळे , कान दाखवणारे भाव कोणते ते बघा, तिथे कोणी पापग्रह आहे का, त्या भावांवर कोणा पापग्रहांची दृष्टी आहे का? त्या भावांचे भावेश कोण आहेत? कशा स्थितीत आहेत.. डोळे खराब आहेत म्हणजे यातले काहीतरी असलेच पाहीजे ना? त्या शिवाय का डोळे खराब होतील? घ्या त्याचा शोध, अभ्यास सुरु…

समजा एखादी व्यक्ती राजकारणात मोठ्या उंचीवर आहे मग त्याच्या पत्रिकेत असे काय आहे की त्याने हे साध्य केले?

लेखक, कवी , चित्रकार, अभिनेते ,संगीत/गायन क्षेत्रातले कलावंत अशांच्या पत्रिका गोळा करुन त्यांचा अभ्यास करता येतील, याच प्रमाणे उद्योगपती, समाजसेवक, लष्करातले / प्रशासनातले उच्च पदस्थ, न्यायाधीश, पत्रकार, संपादक, प्रकाशक , इंजिनियर, डॉक्टर , बँकर्स, व्यापारी, अन्न पदार्थ . वाहन/ पर्यटन अशा व्यवसायात असलेल्या व्यक्तींच्या पत्रिका घेऊन त्यांनी आपापल्या क्षेत्रात जे यश / नावलौकिक / मानसन्मान कमावला तो कोणत्या ग्रहयोगां मुळे हे आपल्याला तपासता येईल. खूप उशीरा लग्न , घटस्फोटित / विधवा/ विधुर, संतती नाही , मतिमंद / अपंग / व्यंग / मनोरुग्ण, भिक्षाधिश ते लक्षाधीश (किंवा उलट) , गुन्हेगार, विवाह बाह्य संबंध, जुळ्या व्यक्ती , अल्पायुषी / दीर्घायुषी , आत्महत्या केलेले, खून झालेले , व्यापारात दिवाळे, कायमचे परदेशात स्थायिक , आंतरजातीय / आंतरधर्मीय विवाह इ. मधुमेह, सोरायसीस, कॅन्सर असे आजार झालेल्या लोकांच्या पत्रिका गोळा करुन त्यात त्या त्या आजारांच्या दृष्टीकोनातून काही साम्य दिसते का हे तपासता येईल. इथे आपल्याला व्यक्तीला मधुमेह झालेला आहे का हे ओळखायचे नाही तर कोणत्या ग्रहस्थिती मुळे मधुमेह झाला आहे हे हुडकण्याचा प्रयत्न करायचा आहे.

इथे लक्षात ठेवायचे की पत्रिका अश्या व्यक्तींच्या जमवायच्या की त्यांच्या आयुष्यात वर दिलेल्या पैकी काही वैशिष्ट्य आहे.

काही जणांचे आयुष्य अगदी सुता सारखे सरळ जाते , शिक्षण -नोकरी – विवाह – संतती- घर – वाहन – नातवंडे – सेवानिवृत्ती अशा चाकोरीतून जाते, फारसे खळबळजनक त्यांच्या आयुष्यात घडलेलेच नसते ( नाही म्हणायला सदाशिव पेठ ब्रँच मधून नारायण पेठेतल्या ब्रँच मध्ये बदली झाली ते एक केव्हढे मोठे गंडांतर आले होते की ! ) , असे घिसे पिटे आयुष्य जगणार्या लोकांच्या पत्रिकेतून आपल्याला फारसे शिकायला मिळणार नाही तेव्हा अशा पत्रिकांवर वेळ घालवायचा नाही. ज्या व्यक्तींचे आयुष्य हे एखाद्या ‘रोलर कोस्टर ’ प्रमाणे असते त्यांच्या पत्रिका आपल्याला शिकण्यासाठी बराच मसाला उपलब्ध करुन देतात.

ज्यांच्या आयुष्यातल्या ठळक घटना तारखे निशी माहिती असतील त्या पत्रिकांचा ‘जन्मवेळ खातरजमा’ या खास अभ्यासा साठी उपयोग होतो. अशा पत्रिकांच्या अभ्यासातून ज्योतिषशास्त्राची सर्व मूलभूत तत्त्वे जशी स्थानगत , राशीगत , नक्षत्रगत फळे, ग्रहयोगांचे परिणाम पक्की होतात, तसेच ज्योतिषशास्त्रातले कोणते अडाखे बहुतांश वेळा लागू पडतात कोणते नियम – अडाखे कमी वेळा लागू पडतात, व्यक्ती-स्थळ-काल-परिस्थिती सापेक्षता कशी लागू होते अशा बाबींचा ही खुलासा होतो. घटना , तारीख आणि त्यावेळी चालू असलेली गोचर भ्रमणे यांचा अभ्यास केला तर कालनिर्णयातले बारकावे समजतात.

चिकाटीने अशा पत्रिका जमवत राहून , त्यांचा अभ्यास करुन सविस्तर नोंदी ठेवाव्यात , एकाच गटातल्या ( जसे चित्रपट अभिनेते / अभिनेत्री) पत्रिकांत काय साम्य आढळते हे पाहावे.

मात्र हे करताना एक मोठी अडचण असते की सिने सृष्टी, कलावंत, राजकारणी , मोठे उद्योगपती , अन्य सेलेब्रिटी/ प्रसिद्ध व्यक्तींच्या उपलब्ध पत्रिका खात्रीच्या असतीलच असे नाही. कै इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन, ओशो अशांच्या वेगवेगळ्या जन्मवेळेच्या पत्रिका उपलब्ध आहेत यातली कोणती खरी हा संशय असतो. म्हणुनच सेलेब्रिटीज च्या पत्रिका हातात देखील धरु नका असे मी सुचवेन. ज्यांची जन्मवेळच कशाला जन्मतारीख देखील नक्की माहीती नाही अशांच्या पत्रिकांवर का वेळ घालवायचा?

मुळात अंबानी, विवेकानंद यांच्याच पत्रिका कशाला हव्यात? आपल्या आजूबाजूला देखील असे कित्येक लोक असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चांगले काम केले आहे, अंबानींच्या पत्रिका खात्रीची मिळाली तर जरुर अभ्यास करा पण आपल्याच गावातल्या कोट्यवधीची उलाढाल करणार्या व्यक्तीची पत्रिका अभ्यासणे तितकेच उपयोगी पडेल.
इथे गंगापूर रस्त्यावर संध्याकाळी फक्त चार तास पावभाजीची गाडी लावून दिवसाला दहा हजाराच्या घरात कमाई करणार्या व्यक्तीची पत्रिका मी त्याच्या मागे लागून मागून घेऊन तपासली होती.

माझ्या ओळखीत एक जण आहे, त्यांनी नाम के वास्ते शिक्षण पूर्णं केले (नाहीतर कमी शिकलेला म्हणून लग्न जमणार नाही!) पण आयुष्यात एक पैसा ही स्वत:चा कमावला नाही कारण त्यांच्या वडिलांनी बरेच कमावून ठेवले होते त्याच्या व्याजावर ही व्यक्ती सुखात आहे . मी या व्यक्तीची पत्रिका अभ्यासली होती हे जाणून घ्यायला की असे काय आहे या व्यक्तीच्या पत्रिकेत की इकडची काडी तिकडे न करता वैभवात लोळतो आहे ?

ब्लाइंड पत्रिकेचा अभ्यास !

आता हे ‘ब्लाइंड पत्रिका’ म्हणजे काय? एक अशी पत्रिका ज्याचा जन्म तपशील माहिती आहे पण त्या व्यक्तीचे नाव,गाव व इतर कोणतीही माहिती नाही.

आता समोर फक्त पत्रिका आहे ती कोणाची आहे हे माहिती नाही, त्यामुळे कोणताही संदर्भ नाही, कोणतेही क्लूज नाहीत. अशा पत्रिके वरून जातकाचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, वैवाहिक जीवन , शिक्षण , व्यवसाय अशा बाबी बद्दल आपल्याला काय सांगता येईल ? हे अगदी अवघड आहे हे मान्य पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. इथे आपली अनुमाने स्थूल स्वरूपाची असतील उदाहरण एखाद्या कलावंताची पत्रिका असेल तर अगदी ही व्यक्ती एक मोठी कलावंत आहे असे जरी ओळखता आले नाही तरी या व्यक्तीला कला गुण चांगले अवगत असतील / कला विषयांत रुची असेल , कलेचशी संबधीत असलेला व्यवसाय करेल, कलेच्या जोरावर पैसा कमावेल, इतके जरी ओळखता आले तरी खूप मोठी मजल गाठता आली असे म्हणता येईल.

याचा उपयोग आपल्याला कोणतिही पत्रिका समोर आली की एक स्नॅप शॉट प्रेडिक्शन करण्या साठी होऊ शकतो.

या ब्लाइंड रीडिंग चा आणखी एक प्रकार म्हणजे एखाद्या व्यक्तीची पत्रिका आणि त्या व्यक्तीच्या आयुष्या घडलेले काही प्रसंग माहीती आहेत पण त्यांच्या तारखा नाहीत किंवा जातकाच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वाचे घडले याचा तारखा उपलब्ध आहेत पण त्या त्या तारखांना काय घडले आहे हे माहिती नाही, आता आपल्याला जे प्रसंग माहिती आहेत ते केव्हा घडले असतील याचा अंदाज करावयाचा आहे किंवा ज्या तारखा माहिती आहेत त्या तारखांना काय घडले असावे याचा अंदाज घ्यायचा आहे या अभ्यासा साठी साठी एका जोडीदाराची / सहाध्यायाची मदत लागेल. तो / ती तुम्हाला काही पत्रिका पुरवेल आणि तुम्ही त्याला / तिला अशा पत्रिका पुरवेल, नंतर आपण उत्तरे ताडून पाहून शकता.

तुमच्या ज्ञानाची कसोटी लागणार असेल तर ती इथेच ! माझ्या मते हा अभ्यासच तुम्हाला एक ‘तज्ज्ञ’ ज्योतिषी बनवेल !

आपल्या सारख्या तळमळीने अभ्यास करणार्‍यांचा एक लहानसा ग्रुप तयार करा आजकाल फेसबुक सारख्या माध्यमां द्वारे हे सहज शक्य आहे आणि बिनखर्ची पण आहे. फक्त तिथे एकच पथ्य पाळा ‘पत्रिकांचा अभ्यास’ या व्यतिरिक्त जादाचे एक अवाक्षर ही काढायचे नाही, अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच दिसत होता तसा आपल्या समोर ‘पत्रिका, पत्रिका आणि पत्रिका’ इतकेच समोर असले पाहीजे, नक्षत्रांचे / राशींचे स्वभाव, गुरू बदल, साडेसाती, पोथ्या पुराणे, उपाय तोडगे, बुवा बापू स्वामी महाराज, चमत्कार, जपजाप्य, वास्तू , हस्तरेषा, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का, स्वप्नात मला गाढव दिसले त्याचा अर्थ काय हे सगळे बाजूला ठेऊन फक्त पत्रिकांवर बोलायचे! आणि ग्रुप मधल्या प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवलाच पाहीजे अन्यथा ग्रुप मधून हकालपट्टी असा नियमही बनवून टाका, आपल्याला अभ्यासूच सभासद हवेत, फक्त स्वत:च्या व्यवसायाची / क्लासची जाहीरात करण्यासाठीच सभासदत्व घेतलेले, फुकट भविष्याच्या आशेने सभासद झालेले किंवा कुचाळक्या करत टाईमपास करण्या साठी जमलेली भुतावळ आपल्याला नकोय. त्या साठी ग्रुपच्या सभासदांची संख्या ५०/१०० पेक्षा जास्त होऊ देऊच नका आणि सभासदत्व देखील ‘आमंत्रणा नुसार , By invitation only’ असेच असावे, सभासद होण्याची इच्छा असलेल्या कडे एक विषीष्ठ ज्ञानाची / अनुभवाची पातळी असलीच पाहीजे. पत्रिकांचा अभ्यासाला हात घालायचा म्हणले तरी काही पूर्वतयारी ( वाचन , व्यासंग) आवश्यक असते, त्यामुळे अगदीच नवशिके लोक फार नकोत , तसेच ‘छान माहिती’, ‘उपयुक्त माहिती’, ‘सहमत’, ‘वृश्चिक राशीचे पण सांगा’ असल्या फालतू कॉमेंट टाकणार्‍या कोणाही सोम्यागोम्याचा यात शिरकाव होऊ देऊ नका. अशी कडक शिस्त पाळली तरच ग्रुपचे मूळ उद्दीष्ट्य साध्य होईल.

माझ्या संग्रहात एका अमेरिकन ज्योतिर्विदाने लिहलेले पुस्तक आहे, त्याच्या प्रस्तावनेत हा लेखक म्हणतो:

“… a small group was formed among several friends, The Worcester Astrological Study center, In the early 1970 and 1980s this group of two dozen met weekly for almost a decade and proved to be a profound engine of astrological exploration, big enough to self-fund professional teachers from time to time and diverse enough to guarantee widespread interests. From this group emerged theosophist Roger Gemme, lecturer and author Martha Lang-Wescott and several highly capable astrologers Barbaraa Amadei, Mary Hughes and Ruth Gordon. Such gatherings became both a means of launching into many astrological disciplines as well as being a critical sounding board for ideas and practices…. “

मी सुद्धा एकेकाळी अशा काही ग्रुप्स चा सभासद होतो, त्याही ग्रुप मध्ये असेच 50 च्या आसपास मेबर्स असत. आज त्या पैकी सगळेच बडे बडे ज्योतिषी झाले आहेत , अनेकांंनी पुस्तके लिहली आहेत (मीच एकटा असा निघालो की जो फारसे काही करू शकला नाही !) पण आज मला या शास्त्रातले जे थोडे फार समजते ते केवळ आणि केवळ त्या ग्रुप्स मध्ये ज्या पत्रिका सोडवल्या त्यांच्याच जोरावर !

सध्या ही मी अशा निवडक इलाईट ग्रुप्स चा सक्रिय सभासद आहे याचा मला अभिमान आहे.

आजच्या बहुतांश ज्योतिष विषयक फेसबुक / व्हॉटस अ‍ॅप ग्रुप्स वर माजलेली ओंगळवाणी बजबजपुरी पाहता त्यांच्या कडून काही अपेक्षा धरणे व्यर्थ आहे.

अर्थात पत्रिकांचा असा अभ्यास करताना आणखी एक शिस्त पाळा.

समोर आलेल्या प्रत्येक पत्रिकेला एक कोड नंबर द्या , पत्रिकेचे सर्व तपशील वहीत किंवा संगणाकावर एक्स्लेल शीट / डेटाबेस मध्ये नोंद करा , किंबहुना अशी नोंद केल्या शिवाय पत्रिका अभ्यासायला घेऊच नका.

दवाखान्यात जसा रोग्याचा केस पेपर तयार करुन त्यात सविस्तर नोंदी ठेवल्या जातात तसे अभ्यासायला घेतलेल्या प्रत्येक पत्रिक साठी एक केस पेपर तयार करा, आपण जी गणितें कराल, नियम -अडाखे वापराल , कोणत्या घटकांना जास्त महत्व दिले , निष्कर्षां पर्यंत कसे पोहोचलात याच्या जितक्या म्हणुन सविस्तर नोंदी ठेवता येतील तितक्या ठेवा. यात कंटाळा अजिबात नको कारण या अशा सविस्तर नोंदीतुनच तुमचा अभ्यास होणार आहे, आपण केलेल्या भाकितांचा / अनुमानांचा पडताळा आला किंवा कसे त्याच्या ही नोंदी ठेवा, समजा आपले अडाखे / भाकितें चुकली तर कोठे चुकले त्याचा शोध घ्या त्याच्या ही नोंदी ठेवा.

जशा जशा आपण पत्रिकां अभ्यासाल तशी तशी आपली पत्रिका पाहण्याची एक पद्धती तयार होत जाईल, किंबहुना अशी एखादी पद्धतीं तयार करण्या कडे लक्ष द्या, त्याने तुमचा वेळ तर वाचेल शिवाय ‘हे पाहावयाचे राहीले , ते विसरले’ असे होणार नाही.

अशा सुमारे १००० तरी पत्रिकांचा सखोल अभ्यास व्हायला हवा तेव्हा कोठे जरासे पाण्यात पाय भिजतील ! दिल्ली अभी बहोत दूर है ।

आता आठवड्याला दोन-तीन पत्रिका सोडवल्या तर वर्षाला साधारण १५० पत्रिका प्रमाणे १००० पत्रिकांचा अभ्यास व्हायला सहा – सात वर्षे तरी लागतीलच! काही जणांना वेळे अभावी याहूनही जास्त वेळ लागू शकेल! म्हणजे ह्या मागे किती कष्ट आहेत, किती वेळ द्यावा लागेल हे आता तुम्हीच ठरवा.

कोणी कितीही काहीही सांगो, नव्या नव्या झटपट पद्धती समोर आणोत , ज्योतिष हे कष्टसाध्यच आहे , समोर ची प्रत्येक पत्रिका हे एक नवे आव्हान असते , एक नवी लढाई असते , कोणी कसलाही प्रचार केला तरी ज्योतिष अ + ब = क असे सहज सोप्प्या समिकरणात / फॉर्म्युल्यात बसवता येत नाही, कदापीही नाही, मग ते फेसबुक शास्त्री काहीही दावे करोत! एक वेळ डॉक्टर / इंजिनियर होणे सोपे आहे पण चांगला ज्योतिषी बनता येणे कमालीचे अवघड आहे आणि म्हणूनच ‘चांगला ज्योतिषी’ सापडणे देखील कमालीचे दुर्मिळ आहे!

शेवटी पुन्हा एकदा सांगतो:

ग्रह, तारे, राशी, भाव, ग्रहयोग, ट्रान्सिट्स आणि कालनिर्णया साठी एखादी दशा पद्धती हे इतकेच भांडवल सध्या पुरेसे आहे. नवमांश, अष्टक वर्ग आणि हो, ती ‘नक्षत्र पद्धती’ यांची काहीही आवश्यकता नाही. हा भाग पुढे नंतर सवडीने शिकता येईल. वर दिलेले घटक (ग्रह, राशी, भाव. ग्रहयोग इ) हाच तुमचा पाया आहे तो जितका भक्कम कराल तितकी या शास्त्रावरची पकड मजबूत होईल. हेच खरे शास्त्र आहे याच्याशी फारकत घेऊन , ज्योतिषशास्त्रातल्या या अत्यंत पायाभूत (बॅक बोन्स) घटकांना वगळून , अक्षरश: फाट्यावर मारुन उभ्या केलेल्या या बेगडी नक्षत्र पद्धती किंवा अन्य तत्सम नव्या नव्या पद्धतींना मागे धावू नका. त्या भूल भुलैयांना बळी पडू नका. “जपून जपून जपून चाले, पुढे धोका आहे”

या बद्दल आणखी एक सविस्तर लेख मी सध्या लिहीत आहे पण तो पूर्ण होईल तेव्हा होईल, सध्या इतकेच!

तर लागा कामाला ! मान खाली घालून पत्रिका सोडवायला घ्या, न घाबरता, न बिचकता.

समाप्त 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.