माझ्या कडे येणार्‍या बर्‍याच जातकांच्या समस्या ‘पैसा पुरत नाही’ ‘यश लाभत नाही’ … अमुक मिळत नाही , तमुक मिळत नाही अशा प्रकारच्याच असतात आणि अशा समस्या सांगतानाच बर्‍याच वेळा अगदी उघड मागणी असते की काहीतरी उपाय – तोडगा सुचवा आणि माझे भाग्य पालटवून द्या! 

अर्थात उपाय – तोडग्यांनी तुमच्या समस्या दूर होत नाहीत, उपाय – तोडग्यांनी तुमचे भाग्य बदलू शकत नाही.

ज्योतिषी या बाबतीत काहीच करु शकत नाही. 

प्रामाणीक प्रयत्न करत राहणे हेच त्याचे खरे आणि एकमेव उत्तर आहे पण हे तसे पाहीले तर अर्धसत्यच आहे कारण बर्‍याच वेळा अथक परिश्रम करुन देखिल यश हाती लागत नाही त्याचे काय?

याचे उत्तर आहे नशिब ! काही गोष्टी नशिबात असतील तरच मिळतात,  बॅकेच्या ATM चे मराठीत रुपांतर ‘असत्याल तर मिळत्याल ‘ असेच आहे ना? खात्यात पैसे असतील तरच कार्डाचा उपयोग , पैसे नसतील तर कार्ड कितीही  वेळा मशिन मध्ये सरकवा काही उपयोग होणार नाही.

कल्पना करा की एका मैदानात मध्यभागी एक खांब रोवला आहे आणि त्या खांबाला कासर्‍याने (दोरीने) एक गाय बांधून ठेवली आहे. गायीला बांधुन ठेवलेली असल्याने गाय पळून जाऊ शकत नाही पण तिला अगदीच हालचाल करता येणार नाही असे नाही. दोरीची जेव्हढी लांबी आहे त्या त्रिज्येच्या वर्तुळात गाय फिरु शकते !

 

cow-slide-1

आपल्या बाबतीतही असेच होते , पैसा, प्रसिद्धी, शिक्षण , रंगरुप , शिक्षण, आरोग्य, संतती, वैवाहीक सुख व सर्व सुख आणि दु:ख हे असेच आधीच आखून दिलेले असते , जशी वरील उदाहरणातील गायीला मनात असूनही दोरीची लांबीही वाढवता येत नाही तसेच आपल्याही या आखून दिलेल्या मर्यादेत फारसे बदल करता येत नाही.

पैसा हा तर सगळ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असतो.  त्या बाबतीतही असेच म्हणता येईल की

नशीबात पैसा असेल तरच तो मिळेल,
जितका नशीबात असेल तितकाच मिळेल
आणि महत्वाचे म्हणजे
जेव्हा मिळायचा तेव्हाच मिळेल,
आधी नाही की नंतर नाही,
कमी नाही की जास्त नाही !

‘वक्त के पहीले आणि नसिबसे ज्यादा किसीको कुछ नहीं मिलता’  

असे जे बोलले जाते ते याच मुळे.

आपण मगाचेच उदाहरण पुन्हा घेऊ, 

आता अशी कल्पना करा की त्या मैदानात कोठेतरी गायीला अत्यंत आवडणारे अंबोण, सरकी पेंड, हिरवागार चारा असे बरेचसे ठेवले आहे , ते बघताच गायीच्या तोंडाला पाणी सुटणे स्वाभावीक आहे …………….पण ऊफ्फ !

 

cow-slide-4

ते खाणे इतके लांब ठेवले गेले आहे की गायीला कितीही प्रयत्न केले तरी त्या खाण्याकडे पोहोचता येणार नाही कारण दोरीची लांबी तेव्हढी नाही !

बर्‍याच वेळा आपल्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत याचे कारण हेच असते! आडात नसेल तर पोहोर्‍यात येणार कसे? यालाच ज्योतिषशास्त्रात ‘नाताल प्रॉमीस’ असे संबोधतात. विवाह, संतती, पैसा, आरोग्य, शिक्षण, नोकरी – व्य्वसाय अशा सर्वच बाबतीत एका विषीष्ठ मर्यादेच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही , मग तुम्ही काहीही करा!  

आता अशी कल्पना करा की गायीचे हे खाणे आता असे ठेवले आहे गायीला बांधलेल्या दोरीच्या त्रिज्येत आहे , म्हणजेच की दोरी बांधलेली असताना सुद्धा  गाय चालत जाऊन ते खाणे मटकाऊ शकते … पण पुन्हा ऊफ्फ !

 

cow-slide-2

गायीला ते खाणे मिळालेच नाही !! का? कारण त्या खाण्याकडे गायीचे लक्षच गेले नाही , ते खाणे तिथे आहे हे गायीने बघितलेच नाही , त्यामुळे खाणे ठेवलेले आहे , आवाक्यात आहे पण गायीला त्याची माहीतीच नसल्याने सहज शक्य असून सुद्धा खाणे तिला मिळू शकले नाही.

बर्‍याच वेळा आपल्या नशिबात असते पण आलेल्या संधी कडे दुर्लक्ष केल्याने आपल्या वाट्याचे हक्काचे  फळ असून सुद्धा ते पदरात पडत नाही ! काहीवेळा पत्रिकेत नाताल प्रॉमीस असून ही योग्य तो ट्रीगर (ट्रांसीट्स, ग्रहदशा) योग्य त्या वेळेत उपलब्ध न झाल्याने घटना घडू शकत नाहीत. नाताल प्रॉमीस असे म्हणले तरी ते तशा अर्थाने गॅरंटीड नसते  तर लाभ मिळण्याची शक्यता आहे पण ‘कंडीशन्स अप्लाय’ असेही  बारीक अक्षरात लिहलेले  असते.  

आता अशी कल्पना करा की गायीचे हे खाणे आता असे ठेवले आहे गायीला बांधलेल्या दोरीच्या त्रिज्येत आहे , म्हणजेच की दोरी बांधलेली असताना सुद्धा  गाय चालत जाऊन ते खाणे मटकाऊ शकते, गायीला ते खाणे दिसले देखील , गायीच्या तोंडाला पाणी सुटले पण… पण पुन्हा ऊफ्फ  !

 

cow-slide-3

गायीला ते खाणे मिळालेच नाही !! आता का? कारण ते खाणे तिथे ठेवलेले आहे हे दिसुन सुद्धा , चार पावले चालायचे कष्ट त्या गायीने घेतले नाही ! खाणे आहे , आवाक्यात आहे , दिसले ही आहे पण प्रयत्नच केले नाहीत तर ते कसे तोंडात पडेल?

बर्‍याच वेळा आपल्या नशिबात असते , संधी दारावर ठकठक करते पण आपण करंटेपणा करुन ती संधी काय आहे हे सुद्धा बघायचे कष्ट घेत नाही, संधी गमावली जाते आणि त्याबरोबर मिळू शकणारा चांगला लाभ. म्हणजे सगळे ग्रह योग जुळून आले पण प्रयत्नच केले नाही म्हणून आपल्या वाट्याचे हकाचे फळ असून सुद्धा ते पदरात पडत नाही !  

पत्रिकेत चांगले ग्रहयोग (राज योग , गजकेसरी इ.) असले की चांगली फळें मिळतात असे मानले जाते.  रस्त्यावरच्या भिकार्‍यांच्याही पत्रिकेत राजयोग असू शकतात / दिसतात मग त्या राजयोगांचा त्या भिकार्‍यांना काहीच फायदा होत नाही असे का? याचे उत्तर हेच आहे की ते भिकारी परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेच प्रयत्न करत नाही! त्यांना मेहेनत नको असते , त्यांना वेगळे काहीतरी करायची उमेद नसते , त्यांंना नविन काही शिकायचे नसते, हे असले करण्यापेक्षा लोकां पुढे हात पसरणे हेच त्यांना सोपे वाटते / आवडते म्हणून ते तेच करत राहतात आणि आयुष्यभर भिकारीच राहातात.  

आता अशी कल्पना करा की गायीचे हे खाणे आता असे ठेवले आहे गायीला बांधलेल्या दोरीच्या त्रिज्येत आहे , म्हणजेच की दोरी बांधलेली असताना सुद्धा  गाय चालत जाऊन ते खाणे मटकाऊ शकते, गायीला ते खाणे दिसले , गायीच्या तोंडाला पाणी सुटते , या खेपेला गाय मनाशी पक्के ठरवते की हे खाणे मटकवायचेच ,  गाय ताडकन उभी राहते , तरातरा त्या खाणेच्या दिशेने निघते ….  पण पुन्हा ऊफ्फ ! गायीला ते खाणे मिळालेच नाही !! अरेच्चा आता का नाही ? 

 

cow-slide-5

कारण ते खाणे तिथे ठेवलेले हे दिसले, चार पावले चालायचे कष्ट त्या गायीने घेतले सुद्धा पण नेमके ते प्रयत्न केले गेले ते चुकीच्या दिशेने ! गाय ज्या बाजुने निघाली होती तिथेच जरा पुढे काही अंतरावर एक लांब-रुंद खड्डा  खणून ठेवलेला होता, कितीही प्रयत्न केले तरी त्या गायीला तो खड्डा काही ओलांडता आला नाही.  त्या खाण्यापर्यंत पोहोचायचा मार्ग वर्तुळाकार आहे, गाय डाव्या बाजूने जाण्या ऐवजी , उजव्या बाजुने गेली असती तर या बाजुला खड्डा नसल्याने गाय त्या खाण्या पर्यंत सहज पोहोचू शकली असती, पण गायीने नेमके चुकीच्या दिशेने प्रयत्न केले आणि ते खाणे तोंडात पडले नाही !

बर्‍याच वेळा आपल्या नशिबात असते , संधी दारावर ठकठक करते आपल्या ते लक्षातही येते, आपण प्रयत्न ही करतो पण त्या प्रयत्नांची दिशा चुकते ! चुकीच्या दिशेने, चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केले जातात,  म्हणजे सगळे ग्रह योग जुळून आले पण प्रयत्नच चुकीचे झाले आणि आपल्या वाट्याचे हकाचे फळ असून सुद्धा ते पदरात पडत नाही !

आता या सगळ्यात ज्योतिषशास्त्र काय करु शकते ?

वर दिलेल्या उदाहरणात गायीला बांधलेली दोरी ही त्या गायीची हालचाल करण्याची कमाल मर्यादा , जेव्हढी दोरी लांब तितकी मजल मोठी , म्हणूनच एखादा खेळाडू उत्तम क्रिकेट खेळतो पण रणजी मॅचेसच्या पलीकडे मजल जात नाही, तर कोणी चांगले खेळून ही जिल्हा पातळिवरच्या स्पर्धा पण गाठू शकत नाही,एखाद्याला गुणवत्ता असुनही क्रिकेटची बॅट सुद्धा हातात धरायची संधी मिळत नाही आणि एखादा विक्रमादित्य ‘सचिन तेंडुलकर’ निपजतो!

नैसर्गिक गुणवत्ता (नाताल प्रॉमीस) असावीच लागते त्या शिवाय काहीच होणार नाही, पण केवळे नैसर्गीक गुणवत्ता पुरेशी नाही, तशी गुणवत्ता आहे हे लक्षात यायला लागते, पण हे लक्षात येऊनही उपयोग नाही, त्या गुणवत्तेचे संवर्धन करणे , ती लोकां पुढे आणणे या साठी प्रयत्न करावे लागतात , हे ही पुरेसे नाही, प्रयत्न योग्य दिशेने झाले पाहीजेत, वरील उदाहरणात चांग़ला कोच मिळवणे, चांगल्या क्रिकेट क्लबची मेंबरशीप मिळवणे , मुंबई सारख्या ‘जास्त संधी उपलब्ध’ करुन देणार्‍या , पोषक शहरात असणे / राहाणे,  ओळखी करुन घेँणे , ओळखींचा योग्य तो आणि योग्य तेव्हा वापर करुन घेणे,  एखाद्या ‘गॉड फादर’ ची कृपा प्राप्त करुन घेणे आणि वेळ पडल्यास काही ‘राजकारण’ करुन आपली वर्णी लावून घेणे असे सर्वकश प्रयत्न करावेच लागतात.

ज्योतिषी ही दोरी किती लांब आहे याचा अंदाज लावू शकतो  पण … पण …. त्या दोरीची लांबी वाढवणे त्याच्या हातात नसते ! जगातले कोणतेही उपाय – तोडगे ही दोरीची लांबी वाढवून देऊ शकत नाही. आपल्या हातात असते फक्त दोरीची मर्यादा जाणून घेऊन प्रयत्न करणे.

ज्योतिषी जरी दोरीची लांबी वाढवू शकत नाही तरी आपल्याला कोणत्या संधी आहेत (अंबोण!) , त्या कोठे असू शकतील , त्यांचे स्वरुप काय ह्या बद्दल आपल्याला मार्गदर्शन करु शकतो !

ज्योतिषी आणखी ही काही करु शकतो , ते म्हणजे प्रयत्न कोणत्या दिशेने करावेत हे सुचवू शकतो तसेच आपल्या वाटचालीत कोणते अडथळे येऊ शकतात त्या बद्दल सांगू शकतो, या दोन्हींचा सुयोग्य वापर करुन आपण आलेल्या संधीचा लाभ उठवू शकतो. यश पदरात पाडून घेऊ शकतो.

ज्योतिषी दोरीची लांबी सांगू शकतो याचा अर्थच कोणत्या गोष्टी आपल्या प्राकत्नात आहेत आणि कोणत्या नाहीत त्या बद्दल अंदाज देऊ शकतो , त्याचा वापर करुन आपण प्रयत्न निष्फळ होण्यापासुन वाचवू शकता. हातचे सोडून पळत्याच्या मागे न लागता , जे साध्य आहे , आवाक्यात आहे त्यावरच  लक्ष केंद्रित करुन , सारे प्रयत्न त्या दिशेनेच एकवटून , जे प्राकत्नात आहे ते तरी निश्चितपणे मिळवू शकता.

ज्योतिष शास्त्राचा हाच खरा उपयोग आहे , विवाह कधी , नोकरी कधी हे जरी जिव्हाळयाचे प्रश्न वाटत असले तरी ते काहीसे तात्कालीन आहेत , आयुष्याच्या प्रवासातले फक्त काही मैलाचे दगड आहेत पण प्रवास भलत्याच दिशेने होत असेल किंवा गाडी सुरुच केली नाही तर या मैलाच्या दगडांचा काय उपयोग?

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anand kodgire

  Khup chan analysis kele aahe.
  Jyotishya chya pudhe adhayatma shakti kinva krupa kaam karte
  Ya babat kahi anubhav asalya jaroor sanga
  Prarabdha karma kase kinva nasht hotat ka
  Dhanyavaad

  0
  1. सुहास गोखले

   श्री. आनंद जी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद .

   आपण सुचवलेल्या विषयावर काही लिहायचा नक्की प्रयत्न करेन.
   सुहास गोखले

   0
  1. सुहास गोखले

   श्री. उमेशजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. काही तांत्रीक अडचणीं मुळे कोर्स सुरु व्हायला विलंब होत आहे.

   सुहास गोखले

   0
 2. Anant

  श्री. सुहासजी,

  फार छान उदाहरण व संदर्भासहित स्पष्टिकरण !
  तुमच्या लिहिण्यात एक सफाई आहे, वाचत राहावं वाटत.

  बोस ची खरेदी आवडली. त्याच्या आवाजाला तोड नाही.

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. अनंतजी,
   खरे तर या विषयावर अजूनही बरेच काही लिहायचे आहे, बघू कधी वेळ सापडतो तो.

   ‘बोस’ ची सिस्टीम माझ्या मुलासाठी घेतली आहे, माझ्या मुलाने अभ्यासात चांगली प्रगती दाखवली म्हणून घेऊन दिलेले त्याच्या आवडीचे बक्षिस आहे , त्याला गाणे तर ऐकायचे असते पण माझी मोठी सिस्तीम वापरायाला तो घाबरतो !

   ‘बोस’ हे बडे नाव असले तरी तांत्रीक दृष्ट्या तितकीशी चांगली नाही. माझी २ चॅनेल , कांपोनंट सिस्टीम या ‘बोस’ पेक्षा १०० पट जास्त चांगली आहे (हो पण किंमत ही तशीच म्हणजे ३,५०,००० अशी आहे, एक मारुती मोटार येईल यात ! ).

   मुळात मला ‘साऊंड’ हा जसा रेकॉर्डींग रुम मध्ये वाजला तसा ऐकायचा असतो, जसा आहे तसा , जसा होता तसा…. ते काम ‘बोस’ बापजन्मात करु शकणार नाही. अर्थात ‘बोस’ ही माझ्या सारख्या ज्याला ‘ऑडिओफिले ‘ मानले जाते त्यांच्या साठी नाहीच , ती जरा बरे पैसे राखून असलेल्या ‘कॉमन जो’ साठीच आहे. रुम भरुन टाकणारा मोठा आवाज हेच काय ते ‘बोस’ मध्ये आहे. माझा मुलगा खूष आहे , त्याला ही बिटल्स आवडतात आणखी काय पाहीजे ! जॅझ आणि ब्लूज हे माझे आवडते प्रकार अजून त्याला अपील झाले नाहीत पण ‘हे काय आहे ते जरा विस्क्स्टून सांगा’ किंवा ‘ते अमूक तमूक आर्तीस्ट्चा अल्बम पुन्हा एकदा प्ले कराल का प्लीज’ अशा त्याच्या फर्माईशी येत असतात, ‘इथे नेहमीचा ४-४ चा रिदम न वापरता ४-५ असे का घेतले , काही खास कारण ? ” अशा शंका विचारल्या जाताहेत म्हणजे आज ना उद्या तो पण या जॅझ गंगेत डुव्बकी मारणार हे नक्की. !

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.