(हे कथा परिक्षण आहे, मूळ कथा ” धुंद रवी ” यांची आहे, लेखकाचा प्रताधिकार मान्य केला  आहे, हा लेख लिहण्याचा हेतू या कथेची व लेखकाची माझ्या ब्लॉगच्या  वाचकांना ओळख करुन देणे ईतकाच आहे.)

लुंगी सारखी एक साधी रोजच्या वापरातली वस्तू , पुरुषांनी वापरायची आणि पुरुषांनी खरेदी करायची वस्तू पण एक लुंगी खरेदि करायला बाहेर पडलेल्या हया गृहस्थाला , पुण्यासारख्या ठीकाणी चक्क दहा तासापेक्षा जास्त वेळ लागावा…?

सुरवात तर अगदी साधी होती …

“मला फक्त एक लुंगी घ्यायची होती हो… माझ्या विशेष अपेक्षा, आवड-निवड, निकष असलं काहिही नव्हतं… किती वेळ लागायला हवाय एक लुंगी घ्यायला? १० मिनिटं ? मलाही असंच वाटलं होतं. एका दुकानात जायचं, लुंगी मागायची आणि पैसे देऊन यायचे…. १० मिनिटं ! ….पण सुमारे १० तास लागले आणि दुकानं…. डझनभर ! “

अगदि झट्पट होईल असे वाटणार्‍या या साध्यासुध्या खरेदिची सुद्धा कशी नाट लागते ते पहाच..

“दुकानात मालक एकटेच कान कोरत बसले होते. मी काही बोलायला लागणार इतक्यात त्यांचा चेहरा इतका वाकडा व्हायचा की माझं धाडसंच व्हायचं नाही. एकशेतीस ग्रॅम मळ बाहेर काढल्यानंतर त्यांनी हात झटकला आणि पुन्हा खोदकाम चालु केले.”

चला दुसर्‍या दुकानात!

“सेल्समन : ही बघा… एकदम लेटस्ट डिझाईन…. अजुन बाजारात असा प्रकार यायचाय… (असं म्हणुन त्यानी मला प्लेन हिरवी लुंगी दाखवली.)

मी : कुठाय डिझाईन ?

सेल्समन : डिझाईन सोडा… रंग बघा साहेब… मोराकडे पण असा हिरवा रंग मिळायचा नाही. एकदम फ़्रेश… बाहेर पडलात तर वळुन वळुन पाहाणार लोकं..”

पुढचे दुकान…

“सेल्समन : हे घ्या… हे सोडुन काहिच नाही आपल्याकडे… एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग…. (असं म्हणुन त्यानी एक लुंगी टेबलावर आपटली.) खरंच एकदम लेटेस्ट डिझाईन आणि रंग… मी तरी कुठे पाहिला नव्हता…. काय वर्णन करु त्या लुंगीचं…

‘ आम्रखंडात शेजवान नुडल्स मिसळुन ते मिश्रण पालकाच्या गर्द हिरव्या पातळ भाजीत बुडवुन खाऊन पिवळ्या कापडावर जर एखादं आजारी मांजर ओकलं ‘ तर कसं दिसेल, अशा डिझाईन आणि रंगाची ती लुंगी होती.”

चला आणखी पुढे…

“एका दुकानात शिरलो तर तिथला माणुस म्हणाला की १ वाजलाय.

मी : मग ?

तो : काय नविन आहात काय पुण्यात ?

मी : काय संबंध ?

तो : हे विचारताय म्हणजे नविन आहात. १ वाजता आमचं दुकान बंद होतं. ४ ला परत उघडतं.

मी : का ?

तो : आम्ही माणसं आहोत. आम्हाला जेवायला लागतं.

मी : तीन तास ?

तो : वामकुक्षी…….

मी : दुपारच्या वेळेला ?

——-(एक हिडीस हास्य) ———“

आता समस्येची तिव्रता वाढायला लागते.. दुकान क्रमांक ?

“मी : नाही, वर नाही…. मी खालीच बांधेन… नेहमीसारखी… साडीसारखी गोल गोल…. पण वरती पदर वगैरे घेणार नाही.

दुकानदार : मग खाली मोठ्ठी झालर देऊ का… ब्राईट निळ्याला खाली केशरी रेंगाची ? आणि चंदेरी रंगाची पट्टी असेल एकदम बारीक खाली….

….

“मी : नाही हो… असलं काही नको. एकदम साधी. पांढरी आणि सोबत बरा रंग.. चेक्स वगैरे दाखवा किंवा…

दुकानदार : चालेल आणि एक काम करु… .एक काम करु…. ….खालुन चुण्या घेऊन घट्ट बांधु आणि वर ओपनच ठेऊ… असा व्ही शेप….”

 

दुकान क्रमांक ?

“मी खचलोच. मला पडलेले यक्षप्रश्न असे –

 

१. मला पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम हवा जरी असता तरी मी कपड्यांच्या दुकानात का येईन ?

२. कपड्यांच्या दुकानात आलोच तर माझ्या पोटाकडे हात दाखवुन ड्रम का मागेन ?

३. मी चेह-यावरुन एमएसईबीचं बील द्यायला आलोय, असं वाटतं का ?

४. काही बायकांचे आवाज पुरषांसारखे का असतात…. ?

५. काही पुरुष मंडळी, मराठी किंवा हिंदी न येणा-या बायकांना दुकानावर का बसवतात ?”

 

शेवटी व्हायचा तो कडेलोट झालाच … खून चढला  डोळ्यात …

” काय समजता तुम्ही मला…. ? एमएसईबीची बीलं वाटणारा शिपाई ? नालायकांनो… गि-हाईक म्हणजे मातापिता. पण त्यांच्यासमोर एकेकटे कोकम पिता तुम्ही ? १ नंतर दुकान बंद ठेवता…. ५ नंतर पंखा बंद ठेवता होय…. एका लुंगीसाठी १२-१२ दुकानं फिरवता काय मला ? १२ उठाबशा काढा आणि स्वतःभोवती १२ वेळा फिरा….”

” गलिच्छ माणसांनो… तुमच्या जन्माच्या वेळेस त्या नर्सनी आंघोळ घातल्यानंतर कधी कान धुतला होता का नाही तुम्ही? त्या तुमच्या घाणेंद्रियात गोम कशी घुसत नाही ? लाज वाटली पाहिजे तुम्हाला दुपारी झोपताना… आणि खबरदार जर बायकोला मराठी येत नसताना दुकानात बसवाल तर…. ड्रम मध्ये कोंबुन मारेन… केरसुणीने झोडपेन…. सतरंजीसकट धुवुन काढेन तुम्हाला…. अरे… अंडरवेअर आणि शेरवीनी ठेवता येते तुम्हाला पण लुंगी नाही काय… भामट्यांनो…. “

“…भिकारी समजता तुम्ही आम्हाला…. १२.५५ दुकान बंद करता आणि एक वाजलाय म्हणता…. एकेकटे कोकम पिता….. गुटखा खाऊन तोंडावर उडवता…. “

 

अखेरिस काय झाले , मिळाली का (एकदाची) लुंगी”? ते प्रत्यक्षच वाचा ना …

 

माझी लुंगी खरेदी – पुण्यातल्या दुकानातुन…..

लेखक: धुंद रवी

प्रकाशन: 8 January, 2010

संकेत स्थळ:

http://www.maayboli.com/node/13195?page=5

 

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.