ब्लॉग ने   १,००,००० वाचन संख्येचा पल्ला गाठला!

one-lakh-page-hits

ब्लॉगच्या विश्वात ‘एक लाख वाचन संख्या’ गाठणे तसे काही फार मोठे कर्तृत्व नाही,  जिथे अनेक ब्लॉग्जनी हा टप्पा अवघ्या काही महीन्यांंत ओलांंडला आहे तिथे आपल्या ब्लॉगला जवळपास तीन वर्षे लागली. असू दे , अगदी कासवाच्या गतीने का होईना आपल्या ब्लॉगने लाखाचा पल्ला गाठला याचेच मला मोठे अप्रुप आहे !

ज्योतिष विषयावर मराठीतले ब्लॉग्ज तसे कमीच आहे माझ्या माहीती प्रमाणे दहा-बारा च्या आसपास, त्यात वाचन संख्येच्या हिशेबात आपला ब्लॉग तिसर्‍या क्रमांका वर आहे पण अगदी महीना दीड महीन्यात  आपला ब्लॉग दुसर्‍या क्रमांकावर पोहोचेल कारण आजच्या घटकेला दुसर्‍या क्रमांका वरचा ब्लॉग आणि आपला ब्लॉग यात अवघा साडे तीन हजार वाचन संख्येचाच काय तो फरक आहे.

लेखनातले सातत्य हा निकष लावला तर आपला ब्लॉग प्रथम क्रमांकावर आहे,  महीन्याला ८ च्या सरासरीने नव्या पोष्ट सातत्याने आल्या आहेत, इतर ब्लॉग्ज वर ही सरासरी  अर्धी पोष्ट / महीना अशी सुद्धा नाही. काही ब्लॉग्जवर तर सहा सहा महिन्यात एकही नविन पोष्ट येत नाही.

विषयांचे वैविध्य हा निकष लावला तर आपला ब्लॉग प्रथम क्रमांकावर आहे. या ब्लॉग वर अनेक विषयावर लेखन केलेले आहे. केस स्ट्डीज तर ह्या ब्लॉगचे सर्वात मोठे आकर्षण आहेत. ह्या ब्लॉग वर आहेत तश्या विस्तृत,  सखोल आणि रंजक भाषेत लिहलेल्या केस स्ट्डीज मराठीच काय पण हिंदी , इंग्रजी भाषेतल्या कोणत्याही ब्लॉग्ज, मासीके, पुस्तके यात सुद्धा सापडणार नाहीत हे मी अगदी खात्रीने सांगतो. माझ्या कडे अजुन ५०+ केस-स्ट्डीज लिहून तयार आहेत पण अशा केस स्ट्डीज चे पुस्तक प्रकाशीत करण्याचा विचार असल्याने त्या आता ब्लॉग च्या माध्यमातून देणे शक्य होणार नाही. ग्रंथ परिक्षणें ही या ब्लॉग ची आणखी एक खासीयत. ज्योतिषशास्त्रावर असंख्य पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत पण कोणते चांगले , कोणते संग्राह्य ही माहीती नसते, त्यामुळे बर्‍याच वेळा पदरचे  पैसे खर्च करुन अनावश्यक , सुमार दर्जाची पुस्तके गळ्यात पडण्याची मोठी शक्यता असते. ही गैरसोय दूर करण्याच्या हेतुने मी अनेक उत्तमोत्तम ग्रथांचा वाचकांना परिचय करुन दिला. श्री. व.दा. भटांनी लिहलेली पुस्तके वगळता आणखी काही वाचलेले नाही अशा असंख्य ज्योतिष अभ्यासकांना बरेच नवे ग्रंथ माहीती झाले (जे त्यांना माहीती असणे काहीसे अवघडच होते). तात्पर्य कथा हा प्रकार फक्त आपल्याच ब्लॉग वर वाचावयास मिळेल. माझ्या ब्लॉग चे वाचक सगळेच काही ज्योतिषी किंवा ज्योतिषाचा अभ्यास करणारे असतील असे मी कधीच गृहीत धरले नाही त्यामुळे ब्लॉग ला भेट देणार्‍या सगळ्यांना इथे काही ना काही इंटरेस्टींग वाचावयास मिळेल असे बघितले गेले आहे, अद्भूत / अतर्क्य , अमानवी  अनुभव पासुन ते विनोद, कॉकटेल्स, पाककृत्या असे अनेक विषय मी हाताळले आहेत.

आणखी एका बाबतीत आपला ब्लॉग प्रथम क्रमांकावर आहे आणि ती म्हणजे या ब्लॉग वर वापरली गेलेली सभ्य , सुसंस्कृत भाषा! अश्लिल , स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा मान खाली घालावी वाटेल असा मजकूर, स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली गर्विष्ठ, तुसडी, उद्दाम, शिवराळ , अगदी ज्याला कमरे खालची म्हणता येईल अशी भाषा असलेले बरेच ब्लॉग आहेत, कमाल म्हणजे ते तसले लिखाण मिटक्या मारत वाचणारा , त्याचे कौतुक करत ,   ‘वा, xx , तुमची भाषा आवडते बुवा आम्हाला, असेच लिहीत जा!’ अशा कॉमेट्स देणारा वाचक वर्ग(?)  पण त्या तसल्या ब्लॉगला लाभतो हे विशेष !! आपला ब्लॉग ह्या असल्या गलिच्छ पातळीवर कधी गेला नाही आणि कधीही जाणार नाही हे मी निक्षून सांगतो,  एक वेळ ब्लॉग बंद होईल पण असले गलिच्छ लेखन ब्लॉग वर येणार नाही !

या ब्लॉग वर आपल्याला ‘राशी भविष्य’ (ते देखील दुसरी कडुन उचलेगिरी केलेले) , उपाय-तोडगे, साडेसाती, मंत्र-तंत्र, वास्तू, गुरु-बदल, कोठल्या बुवा-महाराज-स्वामी चा उदोउदो , व्यवसायाची उथळ जाहीरात करणारा मजकूर, फुकट भविष्याची लालूच असला तद्दन गल्लाभरु मजकूर आढळणार नाही. काही ब्लॉग्ज वर आढळते तसे कुठल्याशा ज्योतिषाच्या चोपड्यातला मजकूर किरकोळ बदल करुन स्वत:चे लेखन म्हणून ब्लॉग वर खपवणे तर फार सोपे! असले काही लिहणे तर माझ्या डाव्या हातचा मळ ठरेल पण असला चीप , फालतुपणा करण्यापेक्षा लेखन बंद करणे मी पसंत करेन!

आत्मप्रौढीच्या दर्पोक्ती ने ओसंडून वाहणार्‍या आणि दुसर्‍याला हीन लेखणार्‍या मजकुराने भरलेल्या पोष्ट्स आपल्या ब्लॉग वर दिसणार नाहीत. मी एक दर्जा राखलाय आणि तो तसाच जपला जाईल. सभ्यता, सुसंस्कृतपणा , उच्च अभिरुची आणि अत्युच्च दर्जाची नितीमुल्ये माझ्या लिहण्या-बोलण्यातून दिसतातच, त्यासाठी मला कोणत्याही स्वामी समर्थाचा पदर धरावा लागत नाही![

माझ्या बहुतांश पोष्ट्स मोठ्या असतात. माझ्या केसस्ट्डीज तर तीन तीन भागात प्रकाशीत कराव्या लागतात इतक्या मोठ्या असतात. आजचेच उदाहरणच द्यायचे तर आत्ता तुम्ही वाचत आहात हा लेख पहा , तब्बल चार पृष्ठांचा आहे , मी लेखाच्या लांबीची फुशारकी मारत नाही, जरा  मांडणी, विचार आणि निर्मीतीमूल्ये पण पाहा, आहे या तोडीचा लेख इतर ज्योतिषविषयक मराठी ब्लॉग वर ? उगाचच ‘बर्‍याच  दिवसांत ब्लॉग वर काही लिहता आले नाही’ अशी भाषा वापरत टीनपाट, लंगोटी एव्हढ्या पोष्ट्स मी ब्लॉग वर टाकणार नाही. माझी प्रत्येक पोष्ट वाचकांना काहीतरी देऊन गेली पाहीजे असा माझा प्रयत्न असतो.[/su_column]

या ब्लॉगची आणखी काही खास वैषीष्ट्ये या ब्लॉगच्या नियमीत वाचकांच्या लक्षात आली असतील……

ब्लॉग ची मांडणी , सरळ , साधी, सिनेमास्कोप स्वरुपाची आहे, त्यासाठी इतर ब्लॉग च्या मुख्य पृष्ठा वर  नेहमी दिसणारी डावी – उजवी पॅनेलस मी माझ्या ब्लॉग वरुन काढून टाकली , जेणे करुन फक्त मुख्य मजकूरच वाचकांच्या समोर राहील, साईड पॅनेल्स मधल्या स्टॅटीक मजकूराने लक्ष विचलित होऊ नये हा त्यामागचा हेतु. ३५ mm फिल्म आणि सिनेमास्कोप यात जो एक मनोवेधक फरक जाणवतो तोच इथे दिसतो.  ब्लॉग च्या रचनेत व्हाईट स्पेस चा अतिशय कलात्मक वापर केलेला आहे. रंग हे अत्यंत प्रभावी माध्यम असले तरी रंगाची अतिरेकी उधळण, बटबटीत , अंगावर येणारी ग्राफिक्स मी कटाक्षाने टाळली आहेत.

ब्लॉग वरचे हेडर चित्र (जे ब्लॉग उघडल्या क्षणी  दिसते) , त्याची निवड सुद्धा अत्यंत चोखंदळपणे केली जाते. ब्लॉग चे हे हेडर नियमीत पणे बदलले जाते, एकच एक भडक, उथळ, कळकट आणि रुचीहीन हेडर वर्षानुवर्षे लोकांच्या माथी मारण्याचा करंटेपणा माझ्याच्याने कधीच होणार नाही. माझ्या वर ‘अ‍ॅपल’ च्या ‘स्टीव्ह जॉब्स’ चा कमालीचा प्रभाव असल्याने , या हेडर मध्ये मी दोनच रंगाचा ठळक वापर करतो, चित्र आणि मजकूर यांचे प्रमाण सांभाळत, अत्यंत ‘मिनिमलॅस्टीक’ मांडणी केली जाते. मी प्रामुख्याने काळे – पांढरे हे कॉम्बीनेशन ९५% चित्रात वापरले आहे. आज जे रंगीबेरंगी हेडर चित्र दिसते आहे ते केवळ ‘सेलेब्रेशन’ चा भाग म्हणून काही दिवस राहील , नंतर पुन्हा आपला काळा-पांढरा खेळ चालू !  मी बर्‍या पैकी फोटो काढतो, मला चित्रकलेची , रंग, पोत आणि कॉम्पोझिशनची उत्तम जाण आहे आणि एक लहानसा आर्किटेक्चर चा कोर्स हौस म्हणून केलेला असल्याने त्यांचा प्रभाव कोठे ना कोठे दिसणारच !

या ब्लॉग चे आणखी एक छुपे वैषीष्ट्य आहे ! काही चाणाक्ष वाचकांनी मला तसे प्रत्यक्ष विचारले देखील! ते म्हणजे या ब्लॉगवर इतर ज्योतिष विषयक ब्लॉग्ज वर हमखास आढळणारे महाराज, स्वामी, बुवा, बापू , नाना, तात्या, अण्णा, फकिर. अवलिया, राणा, साई, ताई, माई, अक्का, माँ, देवी असे कोणीही दिसत नाहीत! ‘गणपती’ सुद्धा नाही ! गेला बाजार साधे ‘श्री’, ‘ओम’,  ‘स्वस्तीक’ सुद्धा नसते. ह्या ब्लॉगवरच नाही तर मी जे रिपोर्ट माझ्या जातकांना पाठवतो त्यावर ही असले काही नसते! याचा अर्थ मी नास्तीक आहे असा नाही फक्त माझ्या परमेश्वरा बद्दलच्या संकल्पना काहीशा वेगळ्या आहेत इतकेच! परमेश्वरा बद्दलच्या माझ्या ज्या संकल्पना आहेत त्या अशा उथळ , बटबटीत पद्धतीने प्रदर्शीत करणे, त्याचा टेंभा मिरवणे , त्याचे अवडंबर माजवणे मला मान्य नाही. एकीकडे उठसुठ ‘स्वामी समर्था’ चे नाव घ्यायचे, अमुक तमुक स्वामीची आपल्यावर कशी कृपा आहे याची फुशारकी मारायची आणि दुसर्‍याच क्षणी गलिच्छ , अश्लिल , शिवराळ लिखाण करायला लेखणी (कि-बोर्ड) सरसावयाची असल्या बेगडी , दुटप्पी घाणेरडेपणा पेक्षा माझ्या ब्लॉग वर असले काहीही नसणे  हेच अधिक प्रामाणीक आणि निखळ , अंतिम सत्याच्या जास्त जवळ जाणारे आहे!

या ब्लॉग वर च्या लिखाणाला मोठ्या संख्येने (एक हजार+)  प्रतिक्रियां (कॉमेंट्स) मिळाल्या आहेत या बाबतीतही आपला ब्लॉग प्रथम क्रमांकावर आहे. माझ्या ब्लॉग ला फार मोठा वाचकवर्ग लाभलेला नाही हे मान्य , पण जे मुठभर मायबाप वाचक आहेत , ते चोखंदळ आहेत , सभ्य आणि सुसंस्कृत आहेत आणि म्हणूनच इतर कोणत्याही ब्लॉग पेक्षा माझ्या ब्लॉग वर आलेल्या कॉमेंट्सची संख्या कितितरी पटीने जास्त आहे! अशा वाचकांंच्या प्रतिक्रिया हा मी लिहलेले वाचकांना कितपत रुचते हे कळायचा एकमेव मार्ग आहे. वाचकांंच्या ह्या प्रतिक्रिया म्हणूनच बहुमोलाच्या आहेत, त्यामुळेच मी वाचकांच्या प्रतिक्रियांंची ताबडतोब दखल घेतो, त्या जास्तीतजास्त लौकर प्रकाशित होतील याकडे आवर्जुन लक्ष देतो , कोणातीही कॉमेंट ताटकळत ठेवत नाही. आलेल्या सर्वच सर्व कॉमेंटसना माझ्या कडुन व्यक्तिश: पोहोच मिळतेच. बाकी ब्लॉग्ज वर पाहा , वाचकांनी आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियांंना , कौतुकाच्या चार शब्दांना पोहोच देण्याच्या साधा शिष्टाचार सुद्धा पाळला जात नाही. माझ्या ब्लॉग वर आत्तापर्यंत आलेल्या सर्व कॉमेंट्स मी प्रकाशीत केल्या आहेत अपवाद केवळ हाता वरच्या बोटांवर मोजता येतील इतक्या मोजक्या प्रतिक्रियांचा, त्यातल्या बराचश्या विषयाला धरुन नसलेल्या आणि काही मनोविकृतीने शिविगाळ (का कोणास ठाऊक?) करणार्‍या होत्या!

ब्लॉग वर लेखन करणे एक खूप वेळ खाणारी प्रक्रिया असते , विषय निवडणे, लिखाणाचे मुद्दे काढणे, आवश्यक ती माहीती गोळा करणे, प्रत्यक्ष लिखाण करणे , त्याचे संपादन करणे ह्यात काही तासांचा वेळ मोडतो. त्यामुळे मनात विषय घोळत असताना सुद्धा बर्‍याच वेळा वेळे अभावी लिहणे जमत नाही. मायबाप वाचकांनी ही अडचण समजून घ्यावी अशी नम्र विनंती. त्यातही ज्योतिषशास्त्रा वर लिखाण करताना येणार्‍या अडचणीं वेगळ्या असतात.  फार तपशीलात जाऊन लिहता येत नाही कारण तसे लिहले तर त्यातला क्लिष्ट भाग `ज्योतिषाचा अभ्यास नसलेल्यांना समजणार नाही, काही वेळा ब्लॉग सारख्या सार्वजनिक वाचनाच्या माध्यमातून असे काही लिहणे योग्य नसते, काही झाले तरी ज्योतिष ही गुप्तविद्याच आहे आणि त्यातला बराचसा भाग प्रत्यक्ष गुरु मुखातुन शिकावयाचा असतो आणि  गुरु ने देखिल शिष्याची पूर्ण पारख करुन , पात्र आणि सक्षम व्यक्तींनाच ही विद्या द्यावयाची असते. ह्याचे भान सुटून चालणार नाही.

मी काही लेख मालिका अर्धवट सोडल्या अशी बर्‍याच जणांची तक्रार आहे पण त्यामागे ही कारणें आहेत:

 • काही वेळा असे लिखाण फार कमी जणांनी वाचले असे लक्षात आले म्हणून त्या पद्धतीचे लिखाणात वेळ कशाला वाया घालवायचा म्हणुन त्या लेखमाला मला आवरत्या घ्याव्या लागल्या.
 • काही लेखमाला (उदा: ग्रहयोगांवरची लेखमाला ) मी सुरु केल्या पण नंतर त्याच विषयावर पुस्तक लिहायचे ठरले, त्यामुळे तोच विषय आता लेखमालेतुन लिहणे म्हणजे आगामी पुस्तकाचा खप कमी करणे असे होईल सबब त्या स्वरुपाच्या लेखमाला  बंद केल्या (क्या करु, पापी पेट का सवाल हय!).
 • काही  बाबतीत  चक्क माझा आळस कारणीभूत ठरला आहे.
 • ज्या लेखमाला अर्धवट राहील्या आहेत त्यातल्या किमान काही लेखमाला तरी मी आगामी काळात नक्कीच पूर्ण करणार आहे. खास करुन श्री. बाबाजींवरील लेखमालेचे उर्वरीत भाग आणि ज्योतिषांचे अनुभव!

ज्यांना ज्योतिष शिकायचे आहे अशां साठी मी लौकरच माझे ऑनलाईन पद्धतीचे क्लासेस सुरु करत आहे , त्याची बरीचशी तयारी पूर्ण होत आली आहे. योग्य वेळ येताच त्याबाबतची घोषणा मी याच ब्लॉग च्या माध्यमातून करत आहे , काही काळ वाट पहावी लागेल इतकेच.

माझ्या या ब्लॉग ला , ब्लॉग वरच्या लिखाणाला भरभरुन प्रतिसाद दिलात , कौतुकाचे चार शब्द लिहलेत , मौलीक सुचना दिल्यात , काही हट्ट धरलात तर काहीजण चक्क रागावले माझ्यावर …

या सार्‍या सार्‍या साठी मी आपले आभार मानतो.

लाखाचा पल्ला गाठला तरी इथेच थांबायचे नाही, अजुन बरेच लिहायचे आहे …

फक्त आपला लोभ असाच कायम राहावा ही विनंती.
शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

12 प्रतिक्रिया

///////////////
 1. Suresh vanapalli

  Suhasji,
  Pratham diwalichya shubheccha..!!

  Blogchya yashabaddal ani pudhil vatchalisathipan shebheccha!!

  Baaki ya postbaddal mhanal tar case study ani pustake yabaddal sampoorna sahamat.
  Sadhya baryach diwasaat case studies alya nahit so ekhadi post tyavar takach!

  Itar blogvar shivigaal ani asabhya bhasha vaparali geliye he matra khara…apala rokh konakade hota he kalale ani te satyahi ahe…

  Baaki babajiche anubhav lekhmala tar poorna karach kahihi zale tari….hallichya samajaat ase lok bhetne jawalpaas durapastch tyamule ase satya anubhav aikayala nakkich awadel…

  Baaki likhan suru thevach…baryach diwasaat jyotish vishayavar post ali nahi…

  0
  1. सुहास गोखले

   श्री. सुरेशजी ,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   ब्लॉगला म्हणावे तितके वाचक भेटलेले नाहीत ही खंत आहे , लिखाण जरी थांबणार नसलो तरी मधल्या काळात अनेक व्याप मागे लावून घेतले आहेत की मनात असूनही लिहायाला वेळ भेटत नाही, ‘लक्षाधीश’ लेख महिन्या पूर्वीच लिहून ठेवला होता त्यामुळे तो ‘लाखाची संख्या ‘गाठताच लगेच प्रकाशीत करता आला. बाकीचे लहान लेख मी ऑडिओ रेकॉर्डिंग केले आणि नंतर माझ्या मुलाने टायपिंग इ सोपस्कार करुन प्रकाशीत केले. सध्या दोन नव्या तात्पर्य कथा ९०% पूर्ण आहेत बाकीचा भाग लौकरात लौकर पूर्ण करुन त्या प्रकाशीत करण्याचा विचार आहे.

   आपल्या सारखे काही वाचक आहेत त्यांच्या प्रतिसादाच्या जोरावर तर हे लेखन चालू ठेवतोय तेव्हा असेच प्रोत्साहन देत राहा , मला त्याची गरज आहे.

   सुहास गोखले

   0
 2. Anand kodgire

  Sri Suhasji
  Abhinandan
  Barech lekh khup aavadle.
  Tumche vishay allrounder aahet. Uttamottam kalecha aasvad get asta tumhi.

  Aamhala suddha protsahan milte.

  Khas karun music che aaple lekh khup kahi sangun jatat.

  Asech changlya chitrapata (english)baddal pan liha arthat aaplyala chitrapat aavadat aslyas.

  Dhanyavaad

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. आनंदजी,

   म्युझीक (संगीत) या विषयावर मी कितीही लिहू शकतो पण असा विषय सोदाहरण सांगावा लागतो. आता उदाहरण देणे म्हणजे ऑडीओ देणे पण कॉपी राईट मुळे तसे करता येत नाही. त्यात माझे आवडते (आणि ज्यातले मला थोडेफार कळते असे) संगीत भारतीय शास्त्रीय संगीत, पाश्चात्य शास्त्रीय संगीत , जॅझ , ब्लूज आणि बिटल्स हे प्रकार ऐकणारे फार कमी असतात , बर्‍याच जणांची मजल हिंदी फिल्म संगीत आणि गजल च्या पलीकडे जात नाही. तरी मी प्रयत्न करेन . इंग्रजी चित्रपट मी बरेच पाहीलेत (हल्ली नाशकात आल्या नंतर मात्र हे जमत नाही) त्यावर काही जरुर लिहता येईल, बघू कसा वेळ मिळतो ते.

   खरे सांगू , नुसत्या ज्योतिषावर पोट भरत नाही (मी उपाय – तोडगे सांगत नाही किंवा अन्य मार्गाने फसवणूक / लुबाडणूक करत नाही म्हणून असेल कदाचित !) त्यामुळे पोटापाण्या साठी इतर उद्योग करावेच लागतात , त्यात बराच वेळ जातो, मनात खूप असते हे लिहावे – ते लिहावे पण सलग वेळ असा भेट्त नाही . अनेक लेख अर्धवट लिहून तयार आहेत , ते आता प्रथम पूर्ण करतो .

   सुहास गोखले

   0
 3. प्राणेश

  लक्षवाचनप्राप्त्यर्थं, सुचारुलेखनाय च।
  ज्योतिर्विदः सुहासस्य,
  लेखकस्याभिनन्दनम्।।

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्राणेशजी,

   आपण आवर्जुन शुभेच्छा दिल्यात त्याही देववाणी तून हे पाहून धन्य वाटले, माझे संस्कृत चे ज्ञान अगदी तोकडे आहे त्यामुळे मी आपल्याला मराठीतून उत्तर देत आहे.

   सुहास गोखले

   0
 4. Anant

  श्री. सुहासजी,

  अभिनंदन !
  आपला ब्लॉग लक्षाधीश वरून लवकरच कोट्याधीश होवो ही शुभेच्छा !!

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   धन्यवाद. आपल्या सारख्यांंच्या शुभेच्छा असताना कोटीचा पल्ला गाठणे काही अवघड नाही.

   सुहास गोखले

   0
 5. माधुरी लेले

  आपला ब्लॉग लक्षाधिश झाल्याबद्दल अनेक हार्दिक शुभेच्छा..

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.