या लेखमालेतला हा शेवटचा भाग असल्याने जरा बदल म्हणून ‘मेदूवड्याचे’ चित्र टाकले आहे , मला मेदूवडा फार फार आवडतो हे वेगळे सांगायला नकोच !
असो.
प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.
आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !
कोणते मुद्दे आहेत हे ?
L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध
A : Appropriate सुयोग्य
M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा
P : Positive सकारात्मक
P : Personal वैयक्तिक
O : Objective वस्तुनिष्ठ
S : Sincere तळमळीचा
T : time bound समय बद्ध
वर दिलेल्या मुद्द्यां पैकी “ L = Legitimate कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध “ , “ O = Objective सापेक्षता”, ‘P “ Personal – वैयक्तीक’ , “S (Sincere/ Serious)” “T (Time bound)” , आणि ‘सुसंगत’ Appropriate’ या सहा मुद्द्यांचा उहापोह आपण या लेखमालेच्या पहिल्या सहा भागांत केला आहे ,
या लेखमालेतले पहिले सहा भाग इथे वाचा:
आज या लेखमालेच्या सातव्या आणि अखेरच्या भागात आपण आणखी काही मुद्दे तपासू आणि ते म्हणजे:
“M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा”
” लग्न / नोकरी / घर ‘ या संदर्भातल्या प्रश्नांना निश्चित उत्तरे असू शकतात , काही प्रश्नांची उत्तरे केवळ ‘हो’ किंवा ‘नाही’ अशी पण असू शकतात आणि या सार्यांचा ताळा-पडताळा ही सहजतेने आणि निर्विवादपणे घेता येतो, अगदी ‘हा सूर्य हा जयद्रथ’ पद्धतीने.
पण काही वेळा जातक असे काही प्रश्न विचारतात की ज्याच्या उत्तराचा कोणत्याही प्रकारे पडताळा घेता येत नाही.
“देव आहे का?” हा
असाच एक प्रश्न. आता या प्रश्नाचे ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर असू शकते पण उत्तर बरोबर हे कसे ठरवणार ? ताळा – पडताळा कसा घेणार? कोण घेणार?
“चांगली नोकरी मिळेल का?”
या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ‘चांगली नोकरी’ म्हणजे काय हे आधी स्पष्ट होणे गरजेचे आहे, कारण चांगल्या नोकरीची व्याख्या व्यक्तीगणिक बदलत असते. कोणाला भक्कम पगार तर कोणाला अधिकार पद , कोणाला मोठे नाव असलेली कंपनी तर कोणाला घराजवळ ऑफिस तेव्हा एकदा का हा खुलासा झाला की मग उत्तराचा पडताळा घेण्यासाठी काय निकष वापरायचे हे ठरवता येते. अशाच प्रश्ना बाबत जातकाने चांगल्या नोकरीची व्याख्या ‘मला काम करायला समाधान , मिळेल अशी नोकरी’ या पद्धतीने केली होती आता ‘समाधान’ हे काही किलो/ लीटर/ फूट या एककात मोजता येणार नाही ! मग त्याचा पडताळा कसा घ्यायचा?
‘संसार सुखाचा होईल का?”
हा असाच एक प्रश्न, याचा ताळा-पडताळा कसा घेणार ?
प्रश्नाच्या उत्तराचा पडताळा घेता आलाच पाहिजे. ज्या प्रश्नाचे उत्तर काहीही दिले तरी त्याचा ज्याचा पडताळा कधीच मिळणार नाही अशा प्रश्नांची उत्तरें देण्यात कशाला वेळ घालवायचा?
म्हणून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्या आधी त्याचे उत्तर काय असू शकेल याचा प्रथम अंदाज घ्या, कदाचित त्या प्रश्नाची अनेक संभाव्य उत्तरे असू शकतील, हरकत नाही पण प्रत्येक उत्तर हे ज्याला आपण व्हेरीफिकेबल – पडताळा येण्याजोगे असले पाहिजे.
एकदा एका जातकाने मला ‘छ. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कचाट्यातून नेमके कसे निसटले , मिठाईच्या पेटार्यातून का अन्य कोणत्या मार्गाने” असा प्रश्न विचारला होता!
असो.
आता आपण पुढचा मुद्दा तपासू :
P: Positive: सकारात्मक
आता इथे ‘पॉझिटिव्ह- सकारात्मक’ हा मुद्दा आहे याचे दोन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे अभद्र विचार , पराभूत मन:स्थिती, पलायनवादी विचार, दुसर्याचे वाईट व्हावे किंवा दुसर्याचे वाईट होऊन माझे चांगले व्हावे ही इच्छा अशा अर्थाचे प्रश्न जरी विचारले तरी त्यांची उत्तरें देण्याचे नाकारावे. कारण हा सरळसरळ नैतिकतेचा विषय आहे आणि आपल्याला या शास्त्राचे पावित्र्य जपायचे आहे.
“आत्महत्या ”
“दुसर्याच्या मुला / मुली पेक्षा माझ्या मुला/मुलीला अधिक चांगले यश मिळेल का?”
“त्या अमुक व्यक्तीने भ्रष्टाचार केला आहे का?”
“त्या तमुक मुलाचा/मुलीचा प्रेमभंग होईल का / ठरलेला विवाह मोडेल का? “
असे प्रश्न साधारण या गटात मोडतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण असे प्रश्न विचारणारे जातक माझ्याकडे येऊन गेले आहेत.
Positive म्हणजेच सकारात्मतेचा दुसरा भाग म्हणजे ‘प्रयत्न’, जातकाने विचारलेल्या प्रश्ना बाबतीत जातकाचे काही प्रयत्न चालू असले पाहिजेत कारण ज्योतिषशास्त्र प्रयत्नवादाचा पुरस्कार करते. जिथे प्रयत्न तिथे यश असे साधे समीकरण आहे. अर्थात केवळ ग्रहमान अनुकूल आहे म्हणजे घटना घडणार असे अजिबात नाही, अनुकूल ग्रहमाना चा लाभ उठवण्या साठी प्रयत्न केले माहीत तर काहीच होणार नाही.
पावसाळ्यात शेतकरी शेतात पेरणी करतो कारण हजारो वर्षांच्या अनुभवातून हे लक्षात आले आहे की पावसाळयात बी पेरले तर दिवाळीत पीकपाणी हातात पडण्याची शक्यता जास्त असते , इतर वेळी पेरणी केली तर बी रुजणार सुद्धा नाही. पण केवळ पावसाळा आला बी पेरले आता दिवाळीच्या काळात पीकपाणी हातात पडणार अशा भ्रमात पण राहता येणार नाही कारण मध्यंतरीच्या काळात काहीही घडू शकते, पेरणी केल्यानंतर पावसाने ओढ दिली तर बी रुजत नाही, पीक करपू शकते , रोगराई , कीड यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, पुढे अकाली गारपीटी मुळे उभ्या पिकाचे नुकसान होऊ शकते , टोळधाड येऊ शकते अशी अनेक कारणे आहेत.
बी पेरणे हा प्रयत्नाचा एक भाग आहे , हे बी योग्य वेळा पेरणे हा योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांचा भाग आहे आणि असे प्रयत्न यशाची शक्यता वाढवतात पण यशाची खात्री देणार नाहीत हे लक्षात ठेवायचे.
जिथे प्रयत्न नाहीत , प्रयत्न करावे लागतात याची जाणीव नाही, प्रयत्न करायची तयारी नाही अशा स्थितीत कितीही तळमळीने प्रश्न विचारला गेला तरी ज्योतिषाने त्याची उत्तरे देऊ नयेत कारण त्यात कोणताही सकारात्मक उद्देश नाही. त्यामुळे जातकाने त्याने विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भात काय प्रयत्न केले आहेत , त्याची त्या प्रश्ना बाबतची भूमिका सकारात्मक आहे का हे नीट तपासून घ्या.
काही वेळा जातक ‘अशुभ’ मनात धरूनच प्रश्न विचारतात , ‘प्रतिकूल घडेल तेच गृहीत धरून चालावे’ ही उक्ती काही बाबतीत योग्य ठरत असेल ही. पण म्हणून सतत ही अशी नकारात्मक विचारसरणी मनात असणेही चांगले नाही. नेहमी ‘चांगले होईल’ असाच आशावाद ठेवावा.
“घटस्फोटाची शक्यता आहे का?”
हा प्रश्न एखाद्या विवाह झालेल्या व्यक्तीने विचारला तर आपण समजू शकतो पण अजून विवाहच झालेला नाही अशा स्थितीत असा ‘घटस्फोटा’ चा नकारात्मक विचार मनात तरी का यावा?
“द्विभार्या योग आहे का?”
हा पण असाच एक प्रश्न , हा प्रश्न अविवाहित व्यक्तीने विचारणे जितके गैरलागू तितकेच एखाद्या विवाहिताने विचारणे पण गैरलागू कारण त्यात कोठेतरी पहिल्या पत्नीचे निधन / घटस्फोट होईल असे अशुभ आहे.
LAMP POST मधले सगळे मुद्दे आपण विचारात घेतले आता आणखी काही मुद्द्यांचा पण विचार करू.
Finer details : अवाजवी बारकावे:
ज्योतिषशास्त्राच्या कुवतीचा अंदाज नसल्याने जातका या शास्त्राबद्दल भलत्याच कल्पना घेऊन प्रश्न विचारतात , ज्योतिषाने फार तपशीलावार, अनेक बारकाव्यां सहीत सांगोपांग उत्तर द्यावे अशी चुकीची अपेक्षा धरली जाते.
काही वेळा या शास्त्राबद्दलचे अज्ञान आणि बर्याच वेळा अनेक गल्लाभरू ज्योतिषांनी केलेल्या चुकीच्या प्रसाराने हा गैरसमज निर्माण झालेला दिसतो. प्रत्यक्षात असे फार तपशीलवार किंवा सूक्ष्म बारकाव्यांनिशी उत्तर देणे या शास्त्राच्या कुवती बाहेरचे आहे.
‘इंफोसीस मध्ये नोकरी मिळेल का”
आता ज्योतिषशास्त्रात याला उत्तर नाही, ‘नोकरी मिळेल का ?” या प्रश्नाचे उत्तर देता येईल किंवा “मी इंफोसीस मध्ये इंटरव्हू दिला आहे त्यात यश मिळेल का?’ हा देखील वैध प्रश्न होऊ शकेल पण अजून कशात काही नाही आणि एकदम ‘इंफोसीस मध्ये नोकरी मिळेल का “ असा प्रश्न होऊ शकत नाही .
‘तीन बेडरूरुमचा फ्लॅट होईल का?”
इथेही असेच , “स्वत:चे घर होईल का?” या प्रश्नाचे उत्तर देता येईल पण हे घर दोन बेडररूम चे असेल का तीन बेडरूमचे , कोथरुड ला मिळेल का खराडीला , इस्ट फेसींग अएल का नॉर्थ फेसिंग़ , असे सुक्ष्म तपशील पुरवण्याच्या बाबतीत हे शास्त्र असमर्थ आहे.
“घर होईल का?” हा मूळ प्रश्न आहे त्याचे जे काही उत्तर असेल ते देऊन थांबावे, फार तपशील देण्याच्या फंदात पडू नये ,
“मुंबईत वेस्टर्न सबर्बन चा सेंट्रल सबर्बन मध्ये राहणारा नवरा मिळेल’
‘माझ्या होणार्या पती / पत्नीचे वर्णन’
“परीक्षेत 90% पेक्षा जास्त मार्कस मिळतील का?”
हे पण असे प्रश्न आहेत की त्यात अपेक्षीत असलेला बारकावा हे शास्त्र देऊ शकत नाही.
एका जातकाने मला “मी कोणता व्यवसाय केला तर त्यात १००% यश मिळेल” असा प्रश्न केला होता! आता त्याला काय उत्तर द्यायचे?
Medical / Health Related Questions: आरोग्य विषयक प्रश्न:
मुळात ज्योतिष शास्त्र आरोग्य विषयक बाबीं बाबत कमालीचे तोकडे आहे, त्याची आजच्या काळातली अत्यंत प्रगत अशा वैद्यकीय शास्त्राशी बरोबरी कदापिही होणार नाही. एखादा रक्त चाचणी अहवाला किवा सोनोग्राफी अहवाला दहा ज्योतिषांना पुरून उरेल !
आरोग्य विषयक बाबतीत हे शास्त्र फक्त शरीराचा कोणता भाग / अवयव कमकुवत असेल किंवा एखादी व्यक्ती कोणत्या रोगाला बळी पडण्याची शक्यता आहे या बाबत अत्यंत स्थूल स्वरूपाचे / मोघम असे भाष्य करू शकते, आणि असे भाकीत करणे ‘मेडीकल अॅस्टॉलॉजी’ चा खास अभ्यास केलेल्या तज्ञ ज्योतिषालाच थोडे फार जमू शकेल. एक दोन चोपडी वाचून ज्योतिषशास्त्री बनलेल्यांचे हे काम नव्हे.
मुळात पत्रिकेचा अत्यंत सखोल अभ्यास करून जे काही सांगता येते ते जातकाला आधीच माहिती असते. जेव्हा एखादा जातक ‘आरोग्य विषयक प्रश्न विचारत असतो तेव्हा त्याला आपल्याला काय आजार झाला आहे हे माहिती असतेच मग तेच त्याला सांगण्यात काय अर्थ?
‘कोणता आजार झाला आहे’ याचे उत्तर पत्रिकेच्या माध्यमातून कितपत अचूक मिळेल? नऊ ग्रहांच्या माध्यमातून हजारों- लाखों आजारांचा वेध कसा काय घेता येऊ शकेल?
‘आजार केव्हा बरा होईल’ या प्रश्नाचे उत्तर देखील देता येत नाही.
तेव्हा ज्योतिषशास्त्राच्या या मर्यादा मान्य करा आणि अशा आरोग्य विषयक प्रश्नांना शक्यतो हात घालू नका. गंभीर स्वरूपाचे शारीरिक / मानसिक आजार, मोठ्या शस्त्रक्रिया या संदर्भातल्या प्रश्नांना उत्तर देऊ नये, ज्योतिषशास्त्राच्या आधारे रोगनिदान करू नये, मृत्यू बद्दल बोलू नये, काही बाही उपाय वा तोडगे सुचवून रुग्णाचा जीवाशी खेळू नये, असे प्रश्न तज्ञ वैद्यकीय व्यावसायिकांकडे सोपवलेलेच बरे.
सिझेरियन प्रसूती साठी मुहूर्त द्या अशी विचारणा मला बर्याच वेळा झाली आहे, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे एखादा तुरळक अपवाद वगळता बहुतांश प्रसुती या मी काढून दिलेल्या मुहूर्त वेळेच्या आधी किंवा नंतर झाल्या आहेत. कधी अचानक आणीबाणीची परिस्थिती उदभवल्याने वेळे आधीच तातडीने सिझेरियन शल्यक्रर्म करावे लागले तर कधी विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने प्रसूती अर्धा तासाने पुढे ढकलावी लागली. एका केस मध्ये डॉक्टर ट्रफिक जॅम मध्ये अडकल्याने तासभर उशीरा आले !
एका जातकाने मला ‘मी होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यावी का अॅलोपॅथी ‘ असा प्रश्न विचारला जातो तेव्हा हसायला आले!
Dual : एकाच प्रश्नात दोन प्रश्नांची उत्तरें मिळवण्याचा प्रयत्न:
काही जातक जरा जास्तच चलाख असतात , आवळा देऊन कोहळा काढण्यात पटाईत असतात.
असे जातक साळसूदा सारखे एकच प्रश्न विचारतात पण प्रत्यक्षात ते दोन किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे उत्तरें मिळवू पाहतात, “
मी नोकरी बदलली तर मला परदेशी जाण्याची संधी मिळेल का?”
या प्रश्नात जातकाने चलाखीने :
नोकरीत बदल होईल का?
परदेशी जाण्याची संधी मिळेल का?
असे दोन प्रश्न विचारले आहेत !
“मी घर विकत घेतले तर भविष्यात त्याला चांगली किंमत मिळेल का?”
इथेही “घर होईल का? “ , “ते विकायचै वेळ येईल का?” , “ते विकले जाईल का? “ , विक्री फायद्याची ठरेल का” असे चार – पाच प्रश्न समाविष्ट आहेत.
मतलबी प्रश्न / आडवळणाने विचारलेले प्रश्न:
प्रेम विवाह का ठरवलेला विवाह “ हा एक अगदी लोकप्रिय प्रश्न ! आणि हा प्रश्न विचारणारी व्यक्ती बहुदा कोणाच्या प्रेमात पडलेली असते आणि हे प्रेम देखील एकतर्फी असण्याची शक्यता जास्त असते. प्रश्न विचारून ‘आपल्या प्रेमपात्राशी विवाह होईल’ हा खुंटा बळकट करायचा असतो. मुळात हे असले प्रेम बेगडी असते कारण सच्चा प्रेम करणारा जगाचा विरोध पत्करून विवाह करून मोकळा होतो, कोणा ज्योतिषाचा दरवाजा ठोठावत नाही.
इतर ही काही मुद्दे आहेत त्या संदर्भात जसा वेळ मिळेल तसे लिहीत जाईन, सध्या इथेच थांबतो.
लेखमाला समाप्त.
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020