प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.

आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !

कोणते मुद्दे आहेत हे ?

L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध

A : Appropriate सुयोग्य

M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा

P : Positive सकारात्मक

P : Personal  वैयक्तिक

O : Objective वस्तुनिष्ठ

S : Sincere  तळमळीचा

T : time bound समय बद्ध

वर दिलेल्या मुद्द्यां पैकी “ L = Legitimate कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध “    “ O = Objective सापेक्षता”  आणि    ‘P “ Personal – वैयक्तीक’ या तीन मुद्द्यांचा उहापोह आपण या लेखमालेच्या पहिल्या तीन भागांत केला आहे.

आज या लेखमालेच्या चौथ्या भागात आपण आणखी एका महत्त्वाचा मुद्दा तपासू आणि तो म्हणजे:

“S (Sincere/ Serious)”

या मुद्द्याबाबत विचार करण्या पूर्वी प्रश्नशास्त्राची मूलभूत संकल्पना पुन्हा एकदा लक्षात घ्या. जातक जेव्हा एखाद्या नेमक्या वेळी, नेमका प्रश्न विचारतो त्या नेमक्या वेळेच्या ग्रहस्थितीतच त्या प्रश्नाचे उत्तर दडलेले असते आणि चांगला ज्योतिर्विद ते फक्त हुडकून काढत असतो म्हणजे जातक त्याच्या प्रश्ना सोबतच त्या प्रश्नाचे उत्तर ही घेऊन आलेला असतो.

पण याचा अर्थ मी कोणताही प्रश्न, केव्हाही विचारेन आणि मला त्याचे बरोबर उत्तर मिळालेच पाहिजे असे नाही. असे म्हणले जाते की ‘प्रत्येक गोष्टी वेळ यायला लागते’ इथेही तसेच आहे, एक सच्चा प्रश्न मनात येणे , तो तीव्रतेने जाणवणे, त्या प्रश्नाचे योग्य उत्तर देणारी व्यक्ती समोर असणे या सार्‍या गोष्टी केवळ योगायोगावर सोडून देता येणार नाहीत. हे सारे जुळवून आणणारी एखादी अज्ञात शक्ती असू शकेल का? मला सांगता येणार नाही!
या समीकरणातला एखादा घटक  कमकुवत असला तर समीकरण फिसकटते आणि मिळालेले उत्तर अर्थातच चुकीचे ठरते. हा असा अनुभव नेहमी येतो.

मी इथे ‘सच्चा प्रश्न म्हणले आहे , ‘सच्चा ‘ म्हणजेच अगदी तळमळीने , गांभीर्याने विचारलेला प्रश्न . पण होते काय , बर्‍याच वेळा जातक प्रश्न विचारतात त्यात कोणतेच गांभीर्य नसते असते ती फक्त उत्सुकता , केवळ खडा टाकून बघावा तसे किंवा  एवीतेवी ज्योतिषी समोर आहे तेव्हा घ्या विचारून दोन चार प्रश्न अशी काहीशी भावना त्या मागे असते. कोणतेच गांभीर्य नसताना ‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली ‘अशा मनोवृत्तीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तरी ती हमखास चुकतात असा माझा अनुभव आहे.

काही वेळा प्रश्न विचारणारी व्यक्ती ‘ज्योतिषाची परीक्षा बघायच्या हेतूने, ज्योतिषाची / ज्योतिषशास्त्राची चेष्टा करण्याच्या हेतूने ‘ प्रश्न विचारते इथे अर्थातच कोणतेच गांभीर्य नसते , बर्‍याच वेळा अशा लोकांनी विचारलेला प्रश्न आणि त्या सोबत पुरवलेली माहिती धादांत खोटी असते, अशा प्रश्नांची उत्तरे दिली तरी ती चुकणारच.

काही वेळा जातक आपल्या प्रश्ना बाबत गंभीर असला तरी तोच  प्रश्न वेगवेगळ्या ज्योतिर्विदांना विचारत फिरत असतो, या मागे आधीच्या ज्योतिषाने दिलेले उत्तर आवडले नसल्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. जातकाला आपल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेच हवे असते , जे चांगले . जे घडावे असे जातकाला वाटत असते तेच ज्योतिषाने सांगावे अशी त्याची अपेक्षा असते आणि त्या नादात एकच प्रश्न घेऊन आज हा ज्योतिषी, उद्या तो ज्योतिषी असे फिरत असतो. या सगळ्यात त्या प्रश्ना मागची तीव्रता कमी होते जाते , मूळ कागदपत्राची पहिली झेरॉक्स प्रत चांगली निघते पण आता त्या झेरॉक्स प्रतीची पुन्हा झेरॉक्स प्रत, त्या झेरॉक्स प्रतीची पुन्हा झेरॉक्स प्रत  असे झेरॉक्स ची झेरॉक्स करत राहिल्यास शेवटी एक काळा कागद हातात पडेल, तसे इथे घडते.

लक्षात घ्या (विश्वास ठेवा अगर न ठेवा !) या प्रश्न शास्त्रा मागे काहीतरी दैवी ज्याला इंग्रजीत ‘डिव्हाईन’ म्हणतात असे काही आहे, ती एक प्रकाराची दैवी मदत आहे असे समजा ,  तुम्ही जेव्हा अत्यंत तळमळीने प्रश्न विचारता तेव्हा ही दैवी मदत तुम्हाला हमखास मिळते पण तोच प्रश्न दुसर्‍यांदा , तिसर्‍यांडा , चौथ्यांदा त्याच किंवा दुसर्‍या ज्योतिषांना विचारायाला गेल्यास ही दैवी मदत मिळत नाही.   ‘लांडगा आला रे आला’ अशी गत होते.

आपला प्रश्न एकदाच विचारा जे काही उत्तर मिळेल त्याने आपले समाधान झाले नाही तरी तोच नियतीचा संकेत आहे असे माना.  तोच प्रश्न आपण दुसर्‍यांदा , त्याच किंवा दुसर्‍या ज्योतिषाला विचारू शकता , नाही असे नाही पण दुसर्‍यांदा तोच प्रश्न विचारण्या पूर्वी :

त्या प्रश्ना संदर्भात काही नव्या , महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या असल्या पाहिजेत

किंवा

पहिल्यांदा प्रश्न विचारला त्याला आता किमान तीन महीने तरी झालेले असले पाहिजेत.

थोडक्यात जातक प्रश्ना संदर्भात पुरेसा गंभीर नसेल तर त्या प्रश्नवेळेच्या ग्रहस्थिती मध्ये त्याचे उत्तर असणार नाही, मग ज्योतिर्विदाने कितीही प्रयत्न केले तरी उत्तर मिळत नाही कारण ते तिथे नसतेच आणि मग जर सोसासोसाने,  मारून मुटकून जे नाही ते दाखवायचा प्रयत्न केला तर दिलेले उत्तर चुकणार यात काय नवल ? जिथे तळमळ नाही , गांभीर्य नाही तिथे प्रश्नकुंडली बरोबर उत्तर देऊ शकणार नाही. ‘चूक जातकाची पण भविष्य चुकल्याचा शिक्का ज्योतिषाच्या कपाळावर’ असे होते. तेव्हा जातकाचा, तो ज्या परिस्थितीत आहे त्याचा , जातकाचा प्रश्न , त्यातले गांभीर्य याचा पूर्ण अभ्यास करा आणि मगच त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

आता जातक त्याने विचारलेल्या प्रश्ना संदर्भात गंभीर आहे का नाही हे कसे ठरवायचे ? याला निश्चित असे काही नियम नाही, इथे त्या ज्योतिर्विदाने व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती नुसार अनुमान बांधायचे असते. जातक हाताळायचा जितका अनुभव जास्त तितके ह्या बाबतचे अनुमान चांगले बांधता येईल हे स्वाभावीकच आहे.

जगप्रसिद्ध होरारी अस्ट्रोलॉजर श्री जॉन फ्रावली म्हणतात “ जातकाला काय उत्तर अपेक्षित आहे हे तपासा आणि अपेक्षित ते घडले नाही तर जातकाची प्रतिक्रिया काय असेल याचाही अंदाज घ्या’ या दोन गोष्टीतून जातक प्रश्नाबाबत कितपत गंभीर आहे त्याचा काहीसा अंदाज निश्चित येऊ शकतो.

‘पती-पत्नी और वो’ या चित्रपटात संजीवकुमार सतत आपल्या बायकोला धमक्या देत असतो ‘ये करो .वरना…” “वो तैयार रख्खो वरना…” एकदा तो अशीच धमकी देतो “नहाने के लिये गर्म पानी चाहिये   वरना..” बायको शेवटी चिडून म्हणाली ‘ये वरना वरना क्या”, उत्तर आले “अगर गर्म पानी नहीं मिला तो मैं थंडे पानी से नहाऊंगा” म्हणजे संजीवकुमार चा त्या ‘वरना ‘या धमक्या फारशा गंभीर नव्हत्या, त्याची धमकी पोकळ होती असेच ना!

जातकाने पुरेशा गांभीर्याने प्रश्न विचारला आहे आहे का? याचे उत्तर बर्‍याच वेळा त्या वेळेच्या प्रश्नकुंडलीतच दडलेले असते! प्रश्नकुंडलीतल्या ग्रहस्थितींचा अभ्यास केल्यास जातक प्रश्ना बाबत गंभीर नाही, प्रश्न चुकीच्या वेळी विचारलेला आहे इ बाबींचा थोडातरी खुलासा प्रश्नकुंडली देतेच. पाश्चात्त्य होरारीत असा अंदाज फार चटकन घेता येतो, नक्षत्र पद्धतीत प्रश्न विचारते वेळीच्या चंद्राच्या स्थितीवरुन पण असा अंदाज बांधता येतो. जातक विचारलेल्या प्रश्ना बाबत पुरेसा गंभीर नाही असा संशय आला तर मग जातकाला प्रश्न विचारून सत्य बाहेर काढणे काही अवघड नसते!

आता काही उदाहरणे पाहा:

‘नोकरीत बदल होईल का?”

“माझे स्वत;चे घर कधी होईल ?”

हे तसे नेहमी विचारले जाणारे प्रश्न. पण बरेच जातक एक खडा टाकून पाहावा अशा हेतूने विचारत असतात, प्रत्यक्षात नोकरीतल्या बदला साठी किंवा घर घेण्याच्या दिशेने त्यांचे कोणताही प्रयत्न  चालू नसतात, त्या संदर्भात गेल्या सहा महिन्यात कोणतीही हालचाल केलेली नसते. किंबहुना ‘नोकरीत बदल का हवा आहे” किंवा ‘कोणत्या प्रकाराची नोकरी हवी आहे’ “घर कसे हवे आहे , बजेट काय “ याचा ही काही विचार केलेला नसतो. ज्या प्रश्ना बाबत जातकाने काहीच विचार केलेला नाही, काहीच हालचाल केलेली नाही, तिथे त्या प्रश्ना बाबत जातक गंभीर आहे असे कसे म्हणता येईल? इथे होते असे की ‘नोकरीत बदल होईल का असे विचारायचे’ आणि ज्योतिषाने ‘हो’ म्हणून सांगितले की मग जरा बूड हालवायचे हा प्रकार योग्य नाही. काहीजण तर ‘नोकरीत बदल होणार’  म्हणून सांगितले आहे ना मग होईलच आपोआप असा भाबडा (किंवा सोयीस्कर) गैरसमज करून  घेऊन नोकरीत बदल होण्याची वाट पाहात स्वस्थ बसतात , जणू काही ग्रह त्याच्या दरवाज्यावरची बेल वाजवून नव्या नोकरीचे नेमणूक पत्रच त्याच्या हातात आणून देणार आहेत!

स्वत: कोणतेही प्रयत्न करावयाचे नाहीत मग ग्रहयोग असून सुद्धा नोकरीत बदल होत नाही दोष मात्र ज्योतिषाच्या कपाळी येतो.

इथे लक्षात ठेवा , ‘नोकरीत बदल होईल / होण्याची शक्यता आहे ‘ असे जेव्हा एखादा ज्योतिर्विद सांगत असतो तेव्हा त्याने बदल घडवून आणू शकणार ग्रहमान नक्कीच हेरलेले असते पण ज्योतिषशास्त्र ही  संकेतांची भाषा (Language of Symbols) आहे त्यामुळे jजे ग्रहमान नोकरीत बदलाचे संकेत देत असते ते नोकरीतल्या बदला व्यतिरिक्त इतर अन्य बाबीही  सूचित करत असतेच. आता जातकाचे खरोखरीचे प्रयत्न नोकरीत बदल करण्याच्या हेतून चालू असतील ( अर्ज करणे , तयारी करून मुलाखतीला जाणे, इ) तर ग्रहमान त्याला नोकरीत बदल करण्यास सहाय्यभूत होईल, पण असे कोणते प्रयत्न केलेच नाही तर मात्र नोकरीत बदल घडवू येण्या ऐवजी त्या ग्रहयोगांनी सूचित होत असलेली इतर फळे मिळतील!

‘मुलीचे लग्न कधी होईल?’ असा प्रश्न विचारण्यात काही गैर नाही पण मुलगी अवघी १६ वर्षाची असताना असा प्रश्न विचारणे निश्चितच चुकीचे आहे. कारण मुळात इतक्या लहान वयात कोणाचे लग्न होत नाही / कायद्याने करता येत नाही. किंवा लग्न कसे जमणार याची काळजी निर्माण होण्यासारखे मुलीचे वय ही वाढलेले नाही, केवळ एक उत्सुकता म्हणून हा प्रश्न विचारला गेला आहे हे उघडच आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देऊ नये.

“सरकारी नोकरी मिळेल का?’  हा असाच एक प्रश्न किंवा ‘ अमुक मुलीशीच / मुलाशीच माझा विवाह होईल का?” हे याच गटात मोडणारे प्रश्न आहेत. ‘जर सरकारी नोकरी नाही मिळाली तर काय करणार ? “, ‘ह्याच मुलीशी / मुलाशी विवाह झाला नाही तर काय करणार ?” असे प्रतिप्रश्न विचारला की जातक प्रश्ना बाबत किती गंभीर आहे याचा खुलासा चटकन होतो.

बायकोने नव्या मोठ्ठ्या LED टिव्हीचा हट्ट धरला पण तो हट्ट पुरवायची ऐपत नाही , मग काय, चला नोकरीच बदलून टाकू असा विचार करुन आलेला जातक ‘नोकरीत बदल होईल का?” असा प्रश्न विचारताना पुरेसा गंभीर आहे असे कसे मानता येईल? बायको, मुले असलेल्या संसारी व्यक्तीला असे मनात आले बदल नोकरी असे करता येत नाही आणि साधारण ४० च्या पुढे वय असलेल्या व्यक्तीला नोकरी बदला साठी बरेच आधी पासुन प्लॅनिंग करावे लागते, नोकरी बदलाच्या संधीही फार कमी उपलब्ध असतात आणि त्यातही काही खास कौशल्ये, अनुभव , रेप्युटेशन गाठीशी असल्या खेरीज या वयात दुसरी नोकरी मिळणे कमालीचे अवघड असते !

एका जातकाने मला त्याच्या दोन वर्षाच्या मुला बद्दल ‘हा इंजिनियर होणार का डॉक्टर का सी.ए.’ असा प्रश्न विचारला होता!

तेव्हा जातकाने प्रश्न विचारला की लगेच त्याचे उत्तर शोधण्याच्या मागे न लागता , तो प्रश्न , त्या मागची पार्श्वभूमी , जातकाची तळमळ ह्या बाबीं नीट तपासून घ्या आणि जातक पुरेसा गंभीर असेल तर आणि तरच  त्या प्रश्नाचे उत्तर द्या.

लेखाच्या पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करू

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Gorakshnath Kale

  Hoy sir, ekhadya adchanibaddal margadarshan milne hi niyatichich iccha aste.
  sir jara parmeshwarabaddal tumcha kay mat aahe te eka lekha maddhe sanga na. please

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री गोरक्षनाथजी . आपण सुचवलेल्या विषयावर काही लिहायचा नक्की प्रयत्न करेन.
   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.