प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे ,
२०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.
आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !
कोणते मुद्दे आहेत हे ?
L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध
A : Appropriate सुयोग्य
M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा
P : Positive सकारात्मक
P : Personal वैयक्तिक
O : Objective वस्तुनिष्ठ
S : Sincere तळमळीचा
T : time bound समय बद्ध
या लेखमालेच्या पहिल्या दोन भागात वर दिलेल्या मुद्द्यां पैकी पहिले दोन महत्त्वाचे मुद्दे “ L = Legitimate कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध “ आणि “ O = Objective सापेक्षता” आपण तपासले ,
या लेखमालेतले पहिले दोन भाग इथे वाचता येतील:
आजच्या या तिसर्या भागात आपण तिसरा मुद्दा तपासू तो म्हणजे:
” P : Personal वैयक्तिक”
जातकाने विचारलेला प्रश्न वैयक्तीक म्हणजेच जातकाच्या स्वत: पुरता आहे का नाही. प्रश्नाचे उत्तर मिळण्याची तळमळ वाटावी अशी जातकाची स्वत:ची काही शारीरिक, मानसिक , भावनिक किंवा आर्थिक गुंतवणूक त्या प्रश्ना बाबतीत असलीच पाहीजे.
“श्री नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद मिळणार का?”
“भारत वर्ड कप जिंकेल का?”
“विजय मल्ला , नीरव मोदी हे लोक भारतात परत येतील का?
“श्री अण्णा हजारे आपले पुढचे उपोषण कोणत्या मुद्द्यावर करतील, केव्हा , कुठे ?”
“येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजप ला बहुमत मिळेल का ?”
हे प्रश्न वैयक्तीक नाहीत. श्री. राणे किंवा भारताच्या टीम बाबत आपल्याला आत्मियता असली तरीही “मला नोकरी मिळेल का?’ हा प्रश्न जितका वैयक्तीक आहे. तितका श्री. राणे यांच्या बाबतचा प्रश्न माझा स्वत:चा (वैयक्तीक) होऊ शकत नाही . असे प्रश्न एकतर केवळ ‘उत्सुकता’ म्हणून विचारले जातात किंवा त्यात ‘जुगार / बेटींग’ सारखा काही स्वार्थ असतो.
“मला केद्रिय मंत्रीमंडळात स्थान मिळेल का ?” असा प्रश्न श्री नारायण राणेंनी स्वत:च विचारला तरच तो वैयक्तीक होईल अन्यथा नाही.
निवडणूकीचे निकाल, क्रिकेट मॅच चे निकाल , ‘सारेगमप’ सारख्या स्पर्धांचे निकाल, असे सार्वजनिक स्वरुपाचे प्रश्न तसेच “पंतप्रधान श्री. मोदींच्या जीवाला धोका आहे का?” अशा सारखे प्रश्न याच गटात मोडतात, श्री. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटणे स्वाभाविक आहे पण म्हणून कोणा तिर्हाईताला हा प्रश्न विचारता येणार नाही. पण हाच प्रश्न जर श्री. मोदींनी स्वत: विचारला असेल तर त्याला अर्थ आहे , गांभीर्य आहे.
काही वर्षा पूर्वी अहमदाबाद च्या एका केपी ज्योतिषाने आपल्या ई मॅगेझीन मध्ये सुश्री सोनिया गांधी यांची हत्या होईल का?” असा स्वत:च प्रश्न विचारुन त्याचे उत्तर केपी पद्धतीने दिले होते ! जर सुश्री सोनिया गांधी स्वत: आपल्या कडे येऊन असा प्रश्न विचारत असल्या तर आपण समजू शकतो पण उगाचच एका व्यक्तीबद्दल स्वत:च प्रश्न उपस्थित करुन त्याची उत्तरे मिळवणे कितपत योग्य आहे ? मुळात एखाद्याच्या मृत्यू (तेही ‘हत्ये’ सारख्या भीषण घटने द्वारे!) चे भाकीत करणे ज्योतिषशास्त्राच्या आचारसंहितेत न बसणारी बाब आहे मग ती व्यक्ती कोणीही असो.
प्रश्नकुंडली त्या व्यक्तीच्या वैयक्तीक प्रश्नासाठीच वापरावी , सार्वजनिक स्वरुपाच्या प्रश्नांसाठी नाही.
शेजार्याच्या मुलीचे/ मुलाचे लग्न केव्हा होईल ? किंवा शेजार्याच्या मुलाला केव्हा नोकरी लागेल? असे प्रश्न त्या मुलाच्या / मुलीच्या पालकांनी विचारावे हे बरे. त्या शेजार्याच्या मुला / मुलीला आपण अगदी पोटच्या पोरा सारखे मानत असला आणि त्या काळजी पोटी त्यांच्या बद्दल प्रश्न विचारावासा वाटला हे मान्य केले तरीही असे प्रश्न त्या मुला/मुलीच्या पालकांनी किंवा स्वत: त्या मुला / मुलीने विचारावेत.
शक्यतो ज्याच्या प्रश्न त्याचा त्यानेच विचारावा हे नैतिकतेच्या दृष्टीने आणि प्रश्नशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेला सुसंगत असे ठरेल.
शक्यतो अशा दुसर्याच्या वतीने विचारलेल्या प्रश्ना बाबत , ज्याला इंग्रजीत ‘प्रॉक्झी ‘ म्हणतात, उत्तरे देऊ नयेतच. पण काही वेळा वेळ , काळ, परिस्थिती पाहून अशा प्रश्नांची उत्तरे द्यायला हरकत नाही पण असे करताना काही काळजी / सावधगिरी बाळगणे जरूरीचे असते.
आई-बापाने मुला/ मुली , जावई / सुने बाबत , नवर्याने बायको बद्दल, भावाने बहीणी बद्दल, जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा ही खात्री करुन घ्या की असा प्रश्न विचारायला त्या संबधीत व्यक्तीने परवानगी दिली आहे का?
ही दुसरी व्यक्ती मग ती जातकाचा मुलगा /मुलगी/भाऊ/बहिण/जावई/सून/मित्र असला तरी त्या व्यक्तीच्या परवानगी शिवाया त्याच्या आयुष्यातल्या खाजगी गोष्टी जाणून घ्यायचा कोणाला काय अधिकार आहे ? भारतात असे शिष्टाचार पाळले जात नाहीत किंवा त्याकडे तितकेसे गांभिर्याने बघितले जात नाही पण परदेशात याला ‘एनव्हाशन ऑफ प्रायव्हसी’ म्हणतात व हा एक मोठा दखलपात्र गुन्हा मानला जातो.
आता ही काही उदाहरणे पाहा:
मुलगा अमेरिकेत स्थायिक आहे, विवाहित आहे, पण नोकरी स्थिर नाही सतत नोकर्या बदलाव्या लागत आहेत हे असे का ? हा प्रश्न त्या अमेरिका स्थित मुलाने स्वत:च विचारला तर ठीक पण हा प्रश्न त्याच्या वडिलांनी विचारु नये. मुला बाबत वाटणारी काळजी आपण समजू शकतो पण वयाच्या तिशीत आलेल्या, स्वतंत्र पणे राहणार्या/विचार करणार्या/ स्वत:चे निर्णय स्वत:च घेणार्या मुलाच्या खासगी आयुष्यात त्याच्या आई – वडीलांनी लक्ष घालायचे कोणतेच प्रयोजन नाही, ही मुला बाबतची काळजी असली तरी ती चक्क मुलाच्या आयुष्यात / खासगीपणात ढवळाढवळ मानली जाते.
एकदा एका विवाहीत मुलीच्या आईने प्रश्न विचारला होता “ माझ्या नुकत्याच लग्न झालेल्या मुलीला पुढे शिकायचे आहे पण सासरचे लोक ‘संतती’ चा आग्रह धरुन आहेत , संततीच्या मागे लागले तर शिक्षण होणार नाही, आणि शिक्षण पूर्ण होई पर्यंत पाळणा लांबवला तर घरचे लोक नाराज तर होतीलच शिवाय तो पर्यंत मुलीचे वय वाढल्याने त्या वाढलेल्या वयात संतती होणे घोकादायक ठरु शकते”
हा प्रश्न मुलीच्या आई ने का बरे विचारावा? आता आई म्हणून मुलीची काळजी असणे रास्त असले तरी मुलीने ने पुढचे शिक्षण घ्यावे का का संतती ? हा प्रश्न पूर्णपणे त्या मुलीचा आणि तिच्या नवर्याचा आहे , मुलगी एकदा सासरी नांदायला लागल्या नंतर मुलीच्या आईने तिच्या संसारात व खासगी आयुष्यात लुडबुड करायचे काही एक कारण नाही.
या उदाहरणांतल्या व्यक्तींची आपल्या अपत्यां बद्दल / नातेवाईका बद्दलची काळजी आपण समजू शकतो पण असे ही असु शकते की आई वडिल ज्याला समस्या मानताहेत त्या मुळातच त्यांच्या अपत्यांच्या दृष्टीने समस्या नसतील ही, माता पित्यांना उगाचच (अपुर्या माहीतीच्या आधारावर) काळजी वाटत असते. वरील उदाहरणांत जेव्हा’ती’ व्यक्ती स्वत: असा प्रश्न विचारतील तेव्हाच त्याचे उत्तर देणे संयुक्तिक ठरेल.
माझ्या प्रश्नाची मला जेव्हढी आच असते तेव्हढी आच, तळमळ दुसर्या व्यक्तीला असू शकत नाही. ती व्यक्ती मला सहानुभुती दाखवू शकते पण माझे दु:ख व वेदना मला जितक्या प्रकर्षाने जाणवतील , अनुभवास येतील तितक्या त्या दुसर्या व्यक्तीला जाणवणार नाहीत. माझी दाढदुखी ही माझी आणि फक्त माझीच असते. माझ्या दुखण्यावर औषध मीच घेतले पाहीजे, दुसर्याने औषध घेऊन मला गुण येणार नाही.
या बाबतीतला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रश्न विचारणार्याला दुसर्याच्या खासगी बाबतीत डोकावण्याचा काय अधिकार आहे? आणि तेही त्या दुसर्या व्यक्तीच्या नकळत असेल तर तो मोठा गुन्हा ठरु शकतो ! याला काही मोजके अपवाद असू शकतात, हरवलेल्या व्यक्ती बाबत विचारलेला प्रश्न इथे हरवली व्यक्ती स्वत: “मी हरवलोय / हरवलेय, कधी सापडेन ?” असा प्रश्न विचारायला कशी येईल! गंभीर आजाराने रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेली व्यक्ती स्वत: येऊन प्रश्न विचारु शकणार नाही.
काही वेळा एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्ती बाबत काही गैर हेतुने विचारण्याची शक्यता असते, आपण केलेल्या भाकिताचा गैरवापर होण्याची शक्यता असतो. असे प्रकार होऊ नयेत म्हणून प्रथम प्रश्न विचारणारी व्यक्ती आणि ज्याच्या बद्दल प्रश्न विचारला जात आहे ती व्यक्ती यात नेमका काय संबंध आहे, प्रश्नाचे स्वरुप खासगी माहीती जाणून घ्यायचा आहे का? प्रश्नच मुळात खासगी स्वरुपाचा आहे का? याची पूर्ण खातरजमा करुन घ्यावी.
जेव्हा आई-वडील आपल्या मुला/मुली बद्दल प्रश्र विचारतात तेव्हा मी गमतीने त्यांना उलट प्रश्न विचारतो: “ का हो तुमचा हा मुलगा / मुलगी बाथरुम वापरताना आतून कडी लावून घेते का? “जर तुमचा मुलगा / मुलगी बाथरुम वापरताना आतून कडी लावून घेत असेल तर ती मोठी , स्वतंत्र व्यक्ती मानली जाते आणि त्या व्यक्ती बाबतचे प्रश्न आता त्या व्यक्तीनेच विचारावेत हे चांगले !
मी स्वत: हे नियम कसोशीने पाळतो, पण असे करणारे अगदी मोजकेच , हाताच्या बोटावर मोजता येतील इतके ज्योतिषी असतील , बाकी सारे , जातकाने प्रश्न विचारला कोणतीही चौकशी न करता , नीतीमत्त न बाळगता उत्तरें ठोकून देतात. त्या बद्दल न बोलणेच चांगले…
असो
या लेखमालेच्या पुढच्या भागात आपण आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार करू..
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020