प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे ,
२०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.
आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !
कोणते मुद्दे आहेत हे ?
L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध
A : Appropriate सुयोग्य
M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा
P : Positive सकारात्मक
P : Personal वैयक्तिक
O : Objective वस्तुनिष्ठ
S : Sincere तळमळीचा
T : time bound समय बद्ध
वर दिलेल्या मुद्द्यां पैकी पहिला महत्त्वाचा मुद्दा “ L = Legitimate कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध “
आपल्या या लेखमालेच्या पहिल्या भागात तपासला ,
लेखमालेचा हा पहीला भाग इथे वाचा: लँप पोष्ट – १
आजच्या या भागात आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा तपासूया तो म्हणजे “ O = Objective सापेक्षता”
आता Objective निरपेक्ष (सापेक्ष नाही असा) , म्हणजे ज्या प्रश्नाला निश्चित असे उत्तर असू शकते आणि ते उत्तर व्यक्ती , स्थळ , काळ, परिस्थिती, भावा-भावना यांच्या नुसार बदलण्याची नसते / असल्यास ती कमी असते , तसेच ज्या प्रश्नांच्या उत्तरांची व्याख्या करणे शक्य असते , उत्तरांचे मोजमाप करणे शक्य असते अशाच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.
सापेक्ष म्हणजेच इंग्रजीत ज्याला ‘Subjective’ म्हणतात अशा प्रश्नांची उत्तरे देऊ नये. उदाहरणे घ्यायची तर काही जण विचारतात:
“मी सुखी होईन का?”
“मी आनंदी होईन का?”
“मी समाधानी होईन का?”
“मी श्रीमंत होईन का?”
हे सारे सापेक्ष / सबजेक्टीव्ह प्रश्न आहेत, यांना नेमके असे उत्तर नाही, अमुक एक झाले म्हणजे ‘सुखी / आनंदी / समाधानी ’ असा कोणताही सर्वमान्य निकष नाही कारण सुखाची / आनंदाची व्याख्या व्यक्तीगणिक बदलत असते इतकेच नव्हे तर अशी व्याख्या स्थळ , काल, परिस्थिती सापेक्ष असते.
आजची सुखाची व्याख्या उद्या असेलच असे नाही. ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतें” असे श्री. प्रशांत दामले यांनी गायलेले गाणे आहे, तसे सुख म्हणजे नक्की काय, ते कोणत्या युनिट मध्ये मोजायचे (किलो, मीटर, लीटर ?) ह्याचा पत्ता भल्या भल्या संत महात्म्यांना देखिल लागलेला नाही तिथे आपण सामान्य माणसे काय ठरवणार? आज ज्या गोष्टी (पैसा , प्रसिद्धी, अधिकार) आपल्याला सुखाच्या वाटतात त्या तशाच पुढच्या काळातही असेच सुख देत राहतीलच असे नाही. हजार रुपये असताना , दहा हजाराची ओढ लागते , ते मिळायला लागल्या वर पंचवीस हजारावर नजर बसते, मग पुढे लाख आणि कोटी! हे थांबणार नाही. ‘सुख’ , ‘आनंद’ या मनाच्या भावना आहेत (Status of Mind) त्याच्या बाह्य जगाशी किंवा ज्याला आपण ‘Material / Creature comfort’ म्हणतो त्याच्याशी काही एक संबंध नसतो. वर्ल्ड कप फायनल आहे, 60 इंची LED Screen आहे, मित्रांचे टोळके आहे, गुबगुबीत सोफा आहे, ए.सी. चा थंडावा आहे., खाण्या – पिण्याची (?) रेलचेल आहे आणि रविवारची सुट्टी आहे, मग तर सुखी ना ? अहो कसचे सुख आणि कसचा आनंद , ठणाणा दाढदुखी आहे, सणसणीत ताप भरलाय , कानाला आवाज आणि डोळ्याला उजेड सहन होत नाहीय, रविवार असल्याने दवाखाने पण बंद आणि जवळच्या केमीस्टच्या दुकानालाही सुट्टी ! घ्या , झाला ना त्या सुखाचा सत्यानाश !
बर्याचवेळा अडचणींनी गांजलेल्या जातकाला आपल्या समस्या या अशा गोळीबंद प्रश्नांच्या स्वरूपात मांडता येत नाहीत, त्यामुळे त्याने विचारलेले प्रश्न बहुदा असेच ‘सापेक्ष’ किंवा ‘ओपन एंडेड’ स्वरूपाचे असतात किंवा तसे ते प्रथमदर्शनी वाटतात.
“माझ्या आर्थिक अडचणीं कधी दूर होतील?”
“नोकरीत फार त्रास होत आहे, तो कधी थांबेल?”
“दुसरी चांगली नोकरी मिळेल का”
“कोणत्याच कामात यश मिळत नाही”
“घरात पैसा टिकत नाही ”
असे प्रश्न वरकरणी सापेक्ष वाटतात हे खरेच पण तसे ते नसतात. याचे कारण जातकाला आपल्या प्रश्नाची नेमकी मांडणी करता आलेली नसते. यावेळी अशा जातकाला बोलते करून नेमकी परिस्थिती आहे, नेमकी समस्या काय आहे. हे समजावून घेणे जरुरीचे आहे.
आता ‘आर्थिक अडचण ‘ म्हणजे नेमके काय? आपण आर्थिक अडचणीत आहोत असे जातकाला का वाटत आहे याचा शोध घेतला पाहिजे. काही वेळा जातकाच्या बाबतीत मिळकत आणि खर्च यांच्यात मेळ बसत नसतो किंवा अनपेक्षित खर्चाचा प्रसंग ओढवला असल्याने कर्ज / उसनवार करावी लागली आहे किंवा जातक फार मोठी . त्याच्या सध्याच्या आवाक्या बाहेरची (आर्थिक) स्वप्ने पहात जातक झटपट श्रीमंत व्हायचा उपाय हुडकत आहे’
“घरात पैसा टिकत नाही काय करू” हा असाच एक प्रश्न. मुळात हा ज्योतिषशास्त्राच्या दुष्टीने प्रश्न नाही. ‘पैसे टिकत नाहीत म्हणजे काय होते? पैसे काय आपोआप हवेत विरून जात नाहीत म्हणजे ते पैसे जातकच खर्च करत असतो आणि उत्पन्न आणि खर्च यांच्यात ताळमेळ नसल्यानेच आलेला पैसा संपून जात असतो. जातकाला हे कळत असते पण वळत नाही असे म्हणावे लागते. ‘ज्योतिषशास्त्र’ फारसे काही करू शकत नाही. ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिषी जातकाच्या घरावर पैशाचा पाऊस पाडू शकत नाही. अशा प्रश्नांच्या बाबतीत उत्तर असलेच तर ते जातका कडेच असते! पण हे कटू सत्य सांगणारा माझ्या सारखा ज्योतिषी वाईटपणा घेतो.
‘नोकरीत त्रास होतो म्हणजे नेमका काय आणि कसा त्रास होतो आहे’ किंवा ‘चांगली नोकरी म्हणजे नेमके काय – जास्त पगार / अधिकार पद / ब्रॅड नेम / घराजवळ‘असा नेमका खुलासा करून घेतल्या शिवाय प्रश्नाला हात घालणे चुकीचे असते.
“कोणत्याच कामात यश मिळत नाही” हा असाच एक प्रश्न , मुळात ‘यश मिळत नाही म्हणजे नेमके काय” हे नक्की माहिती नसते, अनाठायी अपेक्षा, अपुरे किंवा चुकीचे जागीचे प्रयत्न, आळस, धरसोडवृत्ती अशी अनेक कारणें त्या मागे असू शकता. पण त्याचा शोध न घेता ज्योतिषाने उपाय सुचवावा अशी अपेक्षा घरलेली असते.
या बाबतीत बर्याच वेळा असे लक्षात येते की प्रश्नाचे उत्तर जातका पाशीच असते, त्याची उकल करायला कोणा ज्योतिषाची गरज नसते, समोरच्या प्रश्नांची सुसंगत मांडणी करणे , प्रश्नाच्या मुळाशी जाणे (root cause), उपलब्ध पर्यायांचा आणि शक्याशक्यतेचा साधकबाधक विचार करून , प्रयत्नांची दिशा ठरवणे अशा प्रकारचे समुपदेशन पुरेसे होते, प्रश्नकुंडली मांडायची आवश्यकता भासतच नाही!
हे असे सापेक्ष प्रश्न मी याच प्रकाराने हाताळले आहेत आणि ते करताना ‘शेळी जाते जिवानिशी खाणारा म्हणतो वातड ‘ असा काहीसा अनुभव मला आलेला आहे . पण त्याबद्दल नंतर कधीतरी..
असो.
या लेखाच्या पुढच्या भागात आपण या ‘L A M P P O S T’ मधल्या तिसर्या मुद्दाच्या विचार करू.
जाता जाता ‘मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतें” हे श्री. प्रशांत दामले यांनी गायलेले गाणे तर पाहून ध्या … (सौजन्य : यु ट्यूब , व्हिमिओ, प्रिझम )
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
aayushyach koda bhalya bhalyana nahi sutla tyamule kadachit samanya manushya gangrun jato…. thoda sambhalun ghet ja, tumchya mrgdarshanane aaushya surala lagate….
lekh chhan aahe
Thanks
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले