Lamp Post म्हणजे दिव्याच्या खांब, जो आपण रस्त्याच्या कडेला नेहमीच पहात असतो.
आता या लँप पोष्ट चा ज्योतिषा शी काय संबंध? संबंध नाहीच ! पण हा L-A-M-P-P-O_S-T असा आठ अक्षरी जुळवलेला शब्द आहे.
अभ्यास करताना एखाद्या विषयावरचे / टॉपीक मधले महत्त्वाचे मुद्दे चटकन लक्षात ठेवण्या साठी केलेली ही युक्ती आहे आणि मला खात्री आहे आपल्या पैकी बर्याच जणांनी ही युक्ती (ट्रिक) केव्हा ना केव्हा वापरली असेल.
जसे ‘तानापिहिनिपाजा’ या अर्थहीन शब्दातल्या प्रत्येक अक्षरा मधून आपल्याला इंद्रधनुष्यातला प्रत्यक रंग त्याच्या क्रमाने लक्षात ठेवता येतो:
ता: तांबडा
ना: नारिंगी (केशरी)
पि: पिवळा
हि: हिरवा
नि: निळा
पा: पारवा
जा: जांभळा
असो.
प्रश्नशास्त्रा बद्दल या पूर्वी मी बरेच लिहिले आहे , २०१४ मध्ये मी माझ्या ब्लॉग वर याच विषयावर एक मोठी लेखमाला लिहिली होती, त्यातलेच काही ठळक मुद्दे घेऊन हा लेख तयार केला आहे.
आणि हे ठळक मुद्दे लक्षात ठेवण्यासाठीच मी हा ‘LAMP POST’ हा शब्द तयार केला आहे. या शब्दातले प्रत्येक अक्षर या प्रश्नशास्त्रातला एका महत्त्वाच्या मुद्द्याची आठवण करून देते. एकदा का ह्या ‘LAMP POST’ मधल्या प्रत्येक अक्षराशी जोडला गेलेला मुद्दा समजावून घेतला की नुसते LAMP POST आठवले की आपल्याला हे आठ ही मुद्दे क्षणात आठवतील, विसरायला होणार नाही !
कोणते मुद्दे आहेत हे ?
L : Legitimate कायदा आणि नीतीमत्ते च्या दृष्टीने वैध
A : Appropriate सुयोग्य
M : Measurable मापता येण्या जोगा , पडताळा घेता येण्याजोगा
P : Positive सकारात्मक
P : Personal वैयक्तिक
O : Objective वस्तुनिष्ठ
S : Sincere तळमळीचा
T : time bound समय बद्ध
ज्योतिषाकडे येणार्या बहुतांश जातकांना ज्योतिषशास्त्र कसे काम करते, त्याच्या मर्यादा काय आहेत किंवा प्रश्न कोणता आणि कसा विचारायचा या बद्दल काही कल्पना नसते किंबहुना बर्याच जातकांचा या बाबतीत मोठा गैरसमज झालेला असतो, ज्योतिषशास्त्राबद्दल फार अवाजवी किंबहुना चुकीच्या अपेक्षा ठेवून जातक येत असतो आणि त्यातूनच अनेक गैरलागू , वेडेवाकडे प्रश्न विचारले जातात , जातकाने अज्ञानापोटी काहीबाही विचारणे हे जरी स्वाभाविक असले तरी कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आणि कोणत्या प्रश्नाचे नाही याची जबाबदारी ज्योतिष्यावरच असते. प्रश्नकुंडली मांडून दिलेले उत्तर असो किंवा जन्मकुंडली वरून केले जाणारे मार्गदर्शन, ज्योतिषाने ज्योतिषशास्त्राच्या मर्यादेतच राहून काम करणे इष्ट. केवळ चार पैसे मिळतात किंवा समोर बसलेल्या जातकाला नाराज कसे करावयाचे म्हणून प्रत्येक जातकाच्या प्रश्नाचे किंवा विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिलेच पाहिजे असे कोणतेही बंधन नाही. जातकाने विचारलेले सगळेच प्रश्न उत्तर देण्या योग्य नसतात. काही प्रश्न हे ज्योतिषशास्त्राच्या कक्षे बाहेरचे असतात तर काही प्रश्नांची उत्तरे देणे नैतिकतेच्या दृष्टीने किंवा अन्य कारणांमुळे देणे इष्ट नसते, काही प्रकारच्या प्रश्नांच्या बाबतीत कायद्याचे बंधन आहे. काही वेळा विचारलेला प्रश्न रास्त असला तरी प्रश्न ज्याने विचारला आहे किंवा ज्या परिस्थितीत विचारला आहे ते ज्योतिषशास्त्राच्या मूलभूत संकेतांच्या / गृहीतकांच्या विरुद्ध असते.
जातकाचा प्रश्न समजावून घेणे ही पहिली पायरी असते. काही जातक आपला प्रश्न अत्यंत सुस्पष्ट आणि नेमके पणाने मांडतात पण सगळ्यांनाच हे जमते असे नाही, बर्याच वेळा मनात एक असते आणि प्रश्न भलताच किंवा मोघम स्वरूपाचा विचारलेला असतो. अशा वेळी जातकाला बोलते करून नेमका प्रश्न काय आहे किंवा नेमकी दुखरी सल काय आहे हे कौशल्याने जाणून घ्यायचे असते. जातकाचा प्रश्न समजावून घेण्यात चूक झाली तर ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशी गत होऊन पुढचे सगळे समुपदेशन चुकण्याची शक्यता असते.
जातकाच्या प्रश्नाचा नेमका खुलासा झाला की नंतरची पायरी असते ती म्हणजे जातकाने विचारलेला प्रश्न वैध आहे का? उत्तर देण्या जोगता आहे का. हे ठरवण्यासाठी काही निकष वापरायचे असतात, असे कोणते निकष वापरायचे ? एक भली मोठी यादी होईल पण त्यातल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक मुद्द्यांची चर्चा आज या लेखात आपण करणार आहोत.
आपल्या ‘L A M P P O S T’ मधले पहिले अक्षर आहे :
‘L’
या ‘L’ वरून बोध घ्यायचा तो : प्रश्न ‘लेजीटीमेट’ म्हणजेच ‘ वैध’ आहे का नाही.
जातकाने विचारलेला प्रश्न ‘लेजिटीमेट – Legitimate’ असावा म्हणजेच तो कायदा आणि नैतिकतेच्या दृष्टीने वैध असावा. विचारलेला प्रश्न जातकाच्या दृष्टीने योग्य / कळकळीचा असेलही, त्याचे उत्तर पण देता येईल पण असे उत्तर देणे कायदा किंवा नैतिकतेच्या नियमात बसते का हे सर्वप्रथम तपासले पाहिजे.
उदाहरणेंच द्यायची झाली तर:
“एखाद्या गर्भवती महिलेला मुलगा होईल का मुलगी?”
गर्भलिंग निदान करणे कायद्या नुसार गुन्हा आहे. गर्भलिंग निदान सोनोग्राफी वा तत्सम वैद्यकीय पद्धतीने करा अथवा ज्योतिषशास्त्रा द्वारे , तो गुन्हा आहे आणि त्याला कायद्याद्वारे कडक शिक्षा होऊ शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. मुळात मुलगा होईल का मुलगी हे ज्योतिषशास्त्रा द्वारे ठरवणे अशक्य आहे पण असा प्रयत्न करणे / अंदाजपंचे सांगणे हे देखील गुन्ह्यात मोडते हे पक्के लक्षात ठेवा. असा प्रश्न कायद्याच्याच दृष्टीनेच नव्हे तर मानवता आणि नैतिकतेच्या दृष्टीने सुद्धा गुन्हा ठरतो त्यामुळे अशा प्रकाराच्या प्रश्नांना स्पष्ट आणि खणखणीत शब्दात नकार द्यावा. याला कोणताही अपवाद करू नये.
“कोर्टात उभ्या असलेल्या खटल्याचा निकाल काय लागेल , कधी लागेल?”.
अशा प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे ‘कंटेम्प्ट ऑफ दी कोर्ट – न्यायालयाची अवज्ञा’ होऊ शकते, त्याला ताबडतोब शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अशा प्रश्नाचे उत्तर देऊ नका.
“मृत्यू कधी?”
अशा प्रश्ना बद्दल भाकीत करणे ज्योतिषशास्त्रा द्वारे शक्य असले तरी असे उत्तर देणे नैतिकतेत बसत नाही. नैतिकतेचे हे भान ज्योतिर्विदाने सतत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबतीत अगदीच काही सांगावे लागलेच तर “ काळजी वाढेल, चिंताजनक कालखंड’ अशी सूचक वाक्यरचना वापरता येईल, पण शक्यतो अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळावे हेच बरे.
व्यक्तीगत बदनामी, जुगार, अनैतिक किंवा राष्ट्र / समाज विरोधी कृत्ये यांना साहाय्य / प्रोत्साहन मिळू शकेल असे प्रश्न टाळावे. याची उदाहरणेंच द्यावयाची तर: “त्या अमक्या व्यक्तीचे काही अनैतिक संबंध / लफडी / अफेअर चालू आहेत का?”, “त्या अमक्या तमक्याने मिळवलेली संपत्ती गैरमार्गाने / भ्रष्टाचाराने मिळवली आहे का?”, “येत्या आयपीएल च्या हंगामात मी या खेळाडू / टीम वर बेटिंग करू का त्या दुसर्या?”
रेस, लॉटरी, जुगार, अनैतिक संबंध या बाबी मुळातच सदा सर्वकाळ निषिद्ध मानल्या गेलेल्या असल्याने त्या विषयांवरच्या प्रश्नांची उत्तरें देऊ नयेत.
थोडक्यात विचारलेला प्रश्न जर कायदा आणि नैतिकेच्या दृष्टीने वैध असेल तरच त्याचे उत्तर द्यावे अन्यथा असे अवैध प्रश्न मग ते कोणीही , कितीही गांभीर्याने , कळकळीने , पैसे देण्याची तयारी दाखवून विचारले असले तरी त्याला ठामपणे नकार द्यावा.
या नंतरचा निकष तपासायचा तो म्हणजे Objective ‘सापेक्ष….
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
yogya, ayogya kai aahe he sangitlybaddal dhanywad
धन्यवाद श्री गोरक्षनाथजी
सुहास गोखले