मी ‘फेसबुक’ च्या माध्यमातून चालवलेल्या काही  प्रतिष्ठीत ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ग्रुप्स चा सभासद आहे, तिथे  नुकत्याच  एका सभासदाने  विचारलेल्या प्रश्नाला मी  उत्तर दिले  आहे.  प्रश्न अगदी काल-परवाच विचारलेला आहे त्यामुळे त्याचे काय झाले हे अजून समजायचे आहे. माझ्या भाकिता प्रमाणे त्याला अजून दीड-वर्ष तरी लागणार  आहे. त्यामुळे ही  पोष्ट ‘केस स्ट्डी’ या अर्थाने लिहालेली  नाही  तर  ‘वेस्टर्न होरारी अ‍ॅस्ट्रोलॉजी’ ची आणखी थोडी ओळख माझ्या ब्लॉगच्या वाचकांना करुन द्यावी त्याच बरोबर के.पी. च्या माध्यामातून अशा प्रश्नांची उकल कशी करतात याचे ही एक उदाहरण आपल्या समोर ठेवणे असा त्या मागचा हेतु  आहे.

या केस बाबतीत मी वर्तवलेले भाकित बरोबर आले अथवा  नाही हे आगामी काळच ठरवेल पण अशा पद्धतीच्या केसेस सोडवताना काय तर्कशास्त्र वापरायचे, कोणते घटक विचारात घ्यावे लागतात, कोणते नियम वापरावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पत्रिका सोडवायची एक रीत असते , ती कोणती याची थोडीफार कल्पना वाचकांना येईल अशी आशा आहे.  भविष्य बरोबर येणे / न  येणे हा (कळीचा) मुद्दा बाजूला ठेवला तरी वर्तवलेले भविष्य ‘काहीतरी  तर्कट / अगदीच हवेतुन काढलेले / कल्पनेचा खेळ ‘ असे  काही नसुन (निदान माझ्या बाबतीत तरी) त्यामागे ही काही विचार आहे, शास्त्र आहे , आडाखे आहेत, सिद्धांत आहेत आणि मेहेनत ही आहे, एव्हढे जरी वाचकांच्या लक्षात आले तरी भरुन पावले.

जातकाचा प्रश्न तळमळीचा असल्यास आणि प्रश्नाच्या सोडवणूकी साठी जातकाचे प्रयत्न आधी पासूनच चालू असल्यास (च)  ‘होरारी’  ने  अचूक उत्तरें मिळू शकतात असा माझा नेहमीचा अनुभव आहे. उगाच ‘खडा टाकून’ बघायच्या हेतुने प्रश्न विचारला असता अचूक उत्तर मिळत नाही  हा पण  नित्याचा अनुभव आहे. होते काय, लोक आधी ‘नोकरीत  बदल  आहे का’  असे विचारतात आणि होकारार्थी उत्तर आले की मग नव्या नोकरी साठी हालचाल करायला सुरवात करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. ‘होरारी’ ही दैवी मदत आहे. ती तितक्याच जबाबदारी ने  वापरावी लागते,  प्रश्नाच्या संदर्भात आपले स्वत:चे आटोकाट प्रयत्न चालू असतील तर आणि तरच  ही मदत उपलब्ध होते. उठसुठ प्रश्न विचारत  राहीले तर ‘लांडगा आला रे ‘ सारखी गत होते.

तर  हा  तो जातकीने विचारलेला प्रश्न:

Will I receive my back pay from the VA (military)?

I left in 1981 and was entitled to disability from them, but they told me I wasn’t. When I finally applied in 2010, they failed to show my service-connection was granted in 1981 and I’ve been fighting to have it corrected since. So far, they have played games. I keep fighting because I know they owe me.

 

जातकीने ह्या प्रश्नासाठी  तयार केलेला होरारी  चार्ट.

 

Entangled money

जातकीने प्रश्न विचारताना , त्यावेळचा होरारी  चार्ट दिला असल्याने मी परत वेगळा चार्ट तयार केला नाही. जो चार्ट दिला आहे तोच वापरला आहे.

चला , बघुया ,  पैसे परत मिळायची काही शक्यता आहे का ते..

प्रश्नकर्ता (ह्या उदाहरणात प्रश्नकर्ती) नेहमीच Ascendant लग्न भाव  असतो. ह्या चार्ट मध्ये  ‘धनु लग्न’ आहे म्हणजे ‘गुरु’  प्रश्नकर्तीचे प्रतिनिधीत्व करणार. प्लुटो हा लग्न भावातच असल्याने तोही एक प्रतिनिधी असेल, त्याशिवाय चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्याला ही गँग मध्ये सामिल करुन घ्यावे लागेल.

प्रश्न ‘अडलेल्या पैशा’ बद्दलचा आहे, हे पैसे ‘डिसेबिलिटी बेनेफीट’ च्या स्वरुपातले असल्याने ही काही पगाराची थकबाकी नाही किंवा पुरवलेल्या सेवेचा मोबदला नाही.  हे साधारण पणे ‘विमा, नुकसान भरपाई, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन’  या गटात मोडते. अशा प्रकारच्या धनप्राप्तीसाठी अष्ट्मस्थान ( ८) बघितले जाते.

अष्टमस्थानावर चंद्राची कर्क रास आहे म्हणजे ‘चंद्र’ ह्या ‘अ‍डकलेल्या पैशा’ चे प्रतिनिधित्व करणार. त्याचबरोबर अष्टमात गुरु, मंगळ व शुक्र असल्याने तेही प्रतिनिधी मानले पाहीजेत. चंद्र जातकीचा  आणि तिचा अडकलेला पैसा असा दोघांचाही प्रतिनिधी होत असल्याने , अशा वेळी हा disputed planet प्रतिवादीला बहाल करतात , या न्यायाने चंद्र अडकलेल्या पैशाचे प्रतिनिधीत्व करेल. गुरु हा या आधीच जातकीचा प्रतिनिधी झाला असल्याने त्याला आता ‘अडकलेल्या पैशा’ चा प्रतिनिधी म्हणून मानायचा नाही. सप्तमस्थानारंभी बुधाची मिथुन रास असल्याने, बुध , त्या सरकारी आस्थापनेचा प्रतिनिधी असेल, शुक्र अष्टमात असला तरी  शुक्राची तुळ रास दशमावर असल्याने शुक्र असल्याने त्या सरकारी  आस्थापनेच्या मुख्य (निर्णय घेणारी  व्यक्ती, मंजुरी देणारी , स्वाक्षरी करणारी व्यक्ती) अधिकार्‍याच्या प्रतिनिधी म्हणून काम बघेल.

चार्ट किती  बोलका आहे ते पहा:

‘गुरु’  प्रश्नकर्तीचा प्रतिनिधी स्वत:च अष्टमात आहे.  शुक्र जो ‘पैसा-अ‍डका / दाग-दागीने’  यांचा नैसर्गिक प्रतिनिधी तोही अष्ट्मातच आहे. ज्या सरकारी खात्यात हे प्रकरण प्रलंबित आहे ते VA – Military , त्याचा नैसर्गीक प्रतिनिधी मंगळ  हा पण अष्टमातच  आहे, एव्हढेच  नव्हे तर खुद्द ‘फॉर्चुना’  ही  अष्टमातच आहे!

वक्री नेपच्युन जो गोंधळ , भ्रम, फसवणूक, भूल अशांचा कारक ग्रह, तो जातकीच्या धनस्थानात (२)  आहे,  अडकलेल्या पैशा बाबतीत जातकीची सध्याची मन:स्थिती (वैताग, त्रागा, फसवणूकीची, अन्यायाची भावना… ) कशी असेल याचेच हे  द्योतक आहे.

पण ही परिस्थीती अशीच फार काळ  राहणार नाही  कारण…

चंद्र नुकताच नेपचुन च्या केंद्र योगातुन बाहेर पडला आहे (२ अंश), तसेच गुरु ही नेपचुनच्या प्रतियोगातून (४ अंश) बाहेर पडला आहे , हे चांगले संकेत आहेत ,  नेपचुन द्वितीय स्थानात आहे , द्वीतीय स्थान हे पैसा-अडका (बँक बॅलन्स) चे स्थान म्हणजे या अडकेल्या पैशा बद्दल जे काही गोंधळ, संभ्रम होते  ते आता दूर व्हायला सुरवात होणार असा हा संकेत आहे. हा वक्री नेपच्युन मार्गी होऊन त्रितिय स्थानाकडे प्रवास सुरु करेल तेव्हा ‘कागदपत्रे / फाईल ‘ पुढे सरकवायला मदत करेल.

बुध त्या आस्थापनेचा प्रतिनिधी  आहेच शिवाय तो कागदपत्रे , करार , संदेश , बोलणे , वाटाघाटी यांचा नैसर्गीक कारक आहे. तो सध्या वक्री असल्याने सध्याच्या त्याच्या नवमस्थाना कडून अष्टमा कडे वाटचाल करत आहे , हा पण एक चांगला संकेत आहे, कदाचित जातकीच्या अर्जाचा प्रवास आता योग्य त्या टेबला कडे सुरु झाला असावा, अडकलेले पैसे मोकळे होण्याच्या दृष्टीने हा एक शुभ शकुन मानावा लागेल.

आस्थापनेच्या प्रमुखाचा प्रतिनिधी  आणि पैशा-अडक्याचा नैसर्गिक कारक ‘शुक्र’ चा लौकरच चंद्राशी लाभ योग ( १६ अंशात) होणार आहे. पत्रिकेतल्या दशमस्थानावर (१०), शुक्राचीच तुळ रास आहे, दशमस्थान हे ‘वरिष्ठ अधिकारी / बॉस ‘ दाखवते , याचा अर्थ असाही असू शकतो की त्याकाळात (शुक्र – चंद्र लाभ योग),  जातकीच्या अर्जाला कार्यालयातल्या सक्षम वरिष्ठ अधिकार्‍याची मंजुरी मिळेल.  हे १६ अंश , कालगणनेच्या हिषेबात ‘१६ आठवडे’ किंवा  ‘१६ महीने ‘ असे रुपांतरीत होऊ शकतात.

प्रश्न आहे जातकाचे पैसे कधी परत मिळतील, त्यासाठी जातकीचा प्रतिनिधी आणि अडकलेल्या पैशाचा प्रतिनिधी यांच्यात कोणता ना कोणता ग्रहयोग व्हायला हवा ( हा योग युती, लाभयोग, केंद्र योग, नवपंचम योग किंवा प्रतियोग यापैकी कोणतातरी असायला हवा)

गुरु (जातकी)  आणि चंद्र (अडकलेला पैसा)  यांच्यात अगदी लौकरच (१॥ अंशात) केंद्र योग होत आहे. म्हणजे पैसा मिळणार पण केंद्र योग असल्याने खूप विलंब आणि अडथळ्यांची शर्यत पार पडल्यानंतर (हाच योग जर नवपंचम असता तर हसतहसत घरबसल्या चेक हातात पड्ला असता !).

झालेच तर …

( ऐ  बास की आता,   किती पिळताय  राव ऑ !   धडधडीत दिसतेय की जातकीचे काम होणार आहे, अडकलेला पैसा मोकळा होणार ..मग आता ते केव्हा होणार ते बघायचे  सोडून बसला आपला पत्रिकेचा किस पाडत…. )

बरे…

आणखी दुसरा जबरदस्त योग या पत्रिकेत आहे तो म्हणजे गुरु – प्लुटो नवपंचम योग तोही अगदी लौकरच (१॥ अंशात)  होत आहे.  गुरु-प्लुटोचा नव-पंचम शुभ योग हा नेहमीच पैशाची खैरात करतो ! अगदी  ज्याला आपण “छप्पर  फाडके ”  म्हणतो ना तसा पैशाचा वर्षाव होतो.

चंद्र – गुरु आणि गुरु – प्लुटो हे दोन्ही योग एकदमच होत असल्याने , जातकीला तिचे पैसे परत मिळणार यात काही शंकाच नाही.

मग आता हे केव्हा होणार ?

गुरु (जातकी)  आणि चंद्र (अडकलेला पैसा)  यांच्यात अगदी लौकरच (१॥ अंशात) केंद्र योग होत आहे, याचा अर्थ  आपले स्केल  १॥ दिवस /  १॥ आठवडा  / १॥ महिना  /  १॥ वर्ष असे असू शकते. प्रश्न सरकार दरबारी अ‍डकलेल्या पैशा संदर्भात आहे त्यामुळे ‘वर्ष’  हे  स्केल मला जास्त सयुक्तिक वाटते.

थोडक्यात ‘जातकीला तिचे पैसे  बराच उशीर, त्रास, अडथळे यावर मात करत साधारण पणे दीड वर्षांनी  मिळतील!

हुश्श …  दमलात का काय,  पुरी पिक्चर अभी बाकी है भिडू…

आता याच प्रश्नाचे उत्तर कृष्णमुर्ती पद्धतीने मिळवायचा प्रयत्न करुयात.

जातकीने प्रश्न विचारते वेळेची कुंडली स्वत:च दिलेली असल्याने परत नविन कुंडली (के.पी. होरारी क्रमांक वापरुन) तयार करायला नको, जातकीने दिलेलीच कुंडली आपण वापरु फक्त ती कुंडली आपण ‘निरयन-कृष्णमुर्ती अयनांश’ मध्ये रुपांतरीत करु. कारण कृष्णमुर्ती पद्धतीत निरयन ग्रहस्थिती व कृष्णमुर्ती अयनांशच लागतात. अशी रुपांतरीत केलेली कुंडली शेजारीच छापली आहे. दिनांक, वेळ, स्थळ सर्व तेच आहे फक्त अयनांश बदलले आहेत. हा एक ‘टाइम चार्ट’ असल्याने , होरारी नंबर इ काही नाही. के.पी. ला अशी प्रश्नकुंडली  चालते. काही के.पी. वाले , होरारी नंबर वापरत नाहीत, जातकाने प्रश्न विचारला तीच वेळ घेऊन मिळणारा ‘टाईम चार्ट’ वापरतात.

 

Blocked Money chart

जातकीचा प्रश्न ‘सरकारी खात्यात अडकलेले पैसे कधी परत मिळतील?’

जातकीला अपेक्षीत असलेले पैसे ‘डिसेबिलिटी बेनेफीट’ च्या स्वरुपातले असल्याने ही काही पगाराची थकबाकी नाही किंवा पुरवलेल्या सेवेचा मोबदला नाही. हे काहीसे ‘विमा, नुकसान भरपाई, भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन’  या गटात मोडते. अशा प्रकारच्या धनप्राप्तीसाठी अष्ट्मस्थान ( ८) बघितले जाते.

जातकीचे पैसे ज्यांच्या कडून मिळणार ती (सरकारी) आस्थापना सप्तम भावावरुन ( ७ ) सुचित होणार, ती आस्थापना जेव्हा जातकीला पैसे देईल तेव्हा त्यांच्या तिजोरीतून पैसे कमी होणार म्हणजे सप्तमाचे व्ययस्थान सक्रिय होणार तेव्हा षष्ठम स्थान (६ ) महत्वाचे ठरणार त्याचा विचार करायला लागेल.

जातकीला धनलाभ होणार, जातकीच्या तिजोरीत भर पडणार त्यामुळे जातकीचे धनस्थान (२ ) बघितले पाहीजे.

पैसे परत मिळावे ही जातकीची तळमळ, तेव्हा तिच्या ईच्छापूर्तीचे स्थान म्हणजेच लाभस्थान (११ ) विचारात घेणे आवश्यक आहे.

एकंदर आपल्याला ८ , ६, २, ११ ही स्थाने बघितली पाहीजेत. त्यातही ८ व ६ ही दोन प्रमुख स्थानें मानता येतील.

चला, आता जातकीच्या प्रश्ना साठी केलेल्या प्रश्नकुंडली कडे वळूयात.

प्रश्नकुंडलीत चंद्र हा नेहमीच प्रश्न विचारते वेळीं जातकाच्या मनात नेमके काय विचार चालू होते ते दाखवतो, जातकाचा प्रश्न तळमळीचा असेल तर जातकाच्या मनात त्यावेळी ’प्रश्न..प्रश्न आणि प्रश्न’ एव्हढेच असते (किंबहुना असायला हवे) आणि चंद्र ते बरोबर दाखवतो.

आता चंद्र प्रश्न बरोबर दाखवतो म्हणजे नेमके काय ? तर प्रश्नकुंडलीतला चंद्र प्रश्नाच्या संदर्भातल्या एका –दोन भावांचा तरी कार्येश असतो. विचारलेल्या प्रश्ना ला सुसंगत असे या चंद्राचे कार्येशत्व असते.

 

blocke money significators

आता जरा प्रश्नकुंडलीतल्या चंद्राकडे पहा:

चंद्र षष्ठम (६ ) भावात आहे, चंद्र अष्टमेश आहे (८) आहे, चंद्र स्वत:च्याच नक्षत्रात आहे. म्हणजे चंद्राचे कार्येशत्व चंद्र : ८ / ६ / ८ / ८ .

चंद्र प्रश्ना संदर्भातल्या दोन प्रमुखा भावांचा प्रथम दर्जाचा कार्येश होत असल्याने चंद्राने जातकाच्या मनातले विचार आणि प्रश्नाचा रोख अगदी अचूक दाखवला हे मान्यच करावे लागेल. म्हणजेच प्रश्न अगदी तळमळीने विचाराला आहे हेच त्यातून सिद्ध होते. असे जेव्हा होते त्यावेळी प्रश्नकुंडली ‘रॅडीकल’ असते, प्रश्नाचे उत्तर मिळते व ते अचूक ठरते असा अनुभव नेहमीच येतो.

चला आता पुढचा टपा: प्रश्ना संदर्भातल्या प्रमुखा भावाचा ‘सब लॉर्ड’!

या प्रश्नासाठीचा प्रमुख भाव आहे अष्टम भाव (८). अष्टमाचा सब आहे ‘शनी’. या शनीचे कार्येशत्व काय ते पाहुया. शनी लाभात ( ११ ) आहे, शनी धनेश (२) व त्रितीयेश (३) आहे, शनी स्वत:च्याच नक्षत्रात आहे .शनी वक्री नाही. शनीचे एकंदर कार्येशत्व असे : शनी : ११ / ११ / २, ३ / २ , ३

अष्टमाचा सब शनी प्रश्ना संदर्भातल्या ११ व २ या भावांचा प्रथमदर्जाचा कार्येश होत असल्याने जातकीला तिचे पैसे परत मिळण्याची मोठी शक्यता आहे असाच त्याचा अर्थ लावता येईल.

अ‍ष्टम स्थान जरी प्रमुख मानलेले असलेले तरी पैसा देणार्‍याचे व्ययस्थान म्हणजे षष्ठ्म स्थान (६) ही तितकेच महत्वाचे , समोरच्या व्यक्तीच्या हातातून पैसे सुटल्या खेरिज का ते जातकीच्या ओंजळीत पडणार आहेत? तेव्हा या षष्ठम स्थानाच्या सब चा ही एकदा कानोसा घेऊन टाकू. षष्ठम स्थानाचा सब आहे शुक्र. शुक्र अष्टमात (८ ) आहे, शुक्र षष्ठेश ( ६ ) , सप्तमेश (७ ) , लाभेश (११) आहे. शुक्र केतुच्या नक्षत्रात आहे, केतु त्रितिय स्थानात ( ३ ) आहे . म्हणजे शुक्राचे एकंदर कार्येशत्व असे होईल शुक्र: ३ / ८ / – / ६,७,११. षष्ठम स्थानाचा सब देखील प्रश्ना संदर्भातल्या ८, ६, ११ या भावांचा कार्येश होत आहे. म्हणजे जातकीला तिचे पैसे परत मिळण्याची मोठी शक्यता आहे याला अजुन एक समर्थन मिळाले.

आवश्यकता नसली तरी केवळ एक उत्सुकता म्हणून मी लाभस्थानाचा (११) म्हणजे जातकीच्या ईच्छापुर्तीच्या स्थानाचा सब काय म्हणतोय ते बघितले. लाभाचा सब आहे ‘गुरु’ . गुरु अष्टमातच ( ८ ) आहे , गुरु चतुर्थेश ( ४ ) आहे , गुरु शुक्राच्या नक्षत्रात आहे , शुक्र अष्टमात (८ ) आहे, शुक्र षष्ठेश ( ६ ) , सप्तमेश (७ ) , लाभेश (११) आहे. म्हणजे गुरु चे कार्येशत्व गुरु: ८ / ८ / ६ , ७ , ११ / ४ . म्हणजे लाभाचा सब देखील अनुकूल आहे.

आता इतके ‘सब’ बघितले तर मग धनस्थानाच्या (२) सब ने काय घोडे मारले आहे ? या धन स्थानाचा (२) सब आहे ‘शनी’ . शनी चे कार्येशत्व या आधी तपासले आहेच ते असे आहे: शनी : ११ / ११ / २ ३ / २

या उदाहरणात मी प्रश्ना संदर्भातल्या सर्वच भावांचे सब तपासले, प्रत्यक्षात इतके बघायची आवश्यकता नाही. प्रश्ना संदर्भातल्या एका प्रमुख भावाचा सब तपासला तरी पुरेसे आहे.

‘सब’ चा कौल इतका अनुकूल मिळाला असला तरी त्यावरुन  ‘पैसे मिळणार’ असा निष्कर्ष लगेचच काढता येणार नाही. प्रत्यक्षात काय घडणार आहे हे कळण्यासाठी आपल्याला आगामी काळात येणार्‍या दशा – अंतर्दशा – विदशा तपासल्या पाहीजेत.

 

blocked Money DBAS

प्रश्न करते वेळी चंद्राची महादशा चालू आहे आणि ती १६ जून २०२१ पर्यंत चालणार आहे. या चंद्राचे कार्येशत्व आपण तपासले आहे , चंद्र : ८ / ६ / ८ / ८ .चंद्र महादशा अनुकूल आहे. चंद्राचा सब शनी आहे , शनी : ११ / ११ / २ ३ / २,  म्हणजे महादशा स्वामी चंद्राचा सब देखील अनुकूल आहे. म्हणजे या चंद्र महादशेत जातकीला तिचे पैसे परत मिळू शकतील.

पण चंद्राच्या महादशेतील सहा वर्षे अजून शिल्लक आहेत, हा फार मोठा कालावधी आहे , त्यामुळे आपल्याला चंद्र महादशेतल्या अंतर्दशा तपासल्या पाहीजेत.

चंद्र महादशेत सध्या शनी ची अंतर्दशा चालू असून ती १६ एप्रिल २०१७ पर्यंत असणार आहे. अंतर्दशा स्वामी शनीचे कार्येशत्व आपण पाहीले आहे शनी : ११ / ११ / २ ३ / २, म्हणजे अंतर्दशा स्वामी शनी अनुकूल आहे, शनी बुधाच्या सब मध्ये आहे. बुध भाग्यात ( ९ ) आहे, दशमेश ( १० ) आहे, बुध चंद्राच्या नक्षत्रात आहे , चंद्र षष्ठम (६ ) भावात आहे, चंद्र अष्टमेश आहे (८) , म्हणजे बुधाचे कार्येशत्व असे असेल बुध: ६ / ९ / ८ / १०. अंतर्दशा स्वामी शनीचा सब बुध अनुकूल आहे.

चंद्र महादशे अंतर्गत शनीच्या अंतर्दशेत घटना घडायला हवी. पण शनीची अंतर्दशा १६ एप्रिल २०१७ पर्यंत म्हणजे सुमारे दीड वर्षे चालणार आहे , त्यातला नेमका कालावधी कोणता हे ठरवायला आपल्याला शनी अंतर्दशेतली एखादी अनुकूल विदशा निवडली पाहीजे.

ही पोष्ट प्रकाशीत झाल्या झाल्या दोन वाचकांनी इमेल द्वारा शंका विचारली ती अशी की , शनीच्याच अंतर्दशेत घटना घडणार हे कसे काय ठरवले? पुढच्या बुधाच्या किंवा केतुच्या अंतर्दशेचा विचार का केला नाही?  शंका अगदी रास्त  आहे , त्यासाठी मी दोन्ही प्रश्नकर्त्यांचे (शंकासुरांचे !) अभिनंदन करतो.

बुधाची अंतर्दशा का तपासली नाही? मुळात  शनीचे कार्येशत्व बघितले तर हे लक्षात येईल की शनी  २ व ११ या स्थानांचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे. केतु  खेरिज दुसर्‍या कोणत्याही ग्रहाची अंतर्दशा पैशाच्या बाबतीत इतकी पॉवरफुल नाही. तुलनेत बुधाच्या कार्येशत्वात २ व ११ नाहीत,  दुसरा मुद्दा असा की प्रश्नकुंडलीच्या आधाराने फार दूरचे भाकित करु नये. प्रश्न कुंडली ही नजिकच्या काळात घडण्याची शक्यता असलेल्या घटनां बाबतीतच प्रभावी पणाने काम करते असा माझा अनुभव असल्याने कालनिर्णया साठी मी साधारण पणे वर्ष – दीड वर्षाच्या आत-बाहेरचा विचार करतो त्यामुळेच दीड वर्षाने येणार्‍या बुधाच्या व तब्बल तीन वर्षाने येणार्‍या केतु च्या अंतर्दशेचा विचार केला नाही.

जर शनी ची अंतर्दशा पण कमकुवत असती तर काय उत्तर द्यायचे? उत्तर असे असेल : एकतर हे पैसे मिळणार नाहीत किंवा त्याला अजून काही वर्षे  (3 वर्षे +) लागू शकतील. उत्तरा साठी काही काळा नंतर ( सहा महिने ) पुन्हा एकदा नव्याने प्रश्नकुंडली मांडुन विचार करता येईल.

त्यापूर्वी आपण जरा ट्रांसीट्स अनुकूल आहेत का ते पाहून घेऊयात म्हणजे त्यानुसार विदशा निवडणे सोपे जाईल.

आपण निवडलेल्या महादशा आणि अंतर्दशे मुळे आपली साखळी चंद्र – शनी अशी होते. अपेक्षित कालावधी वर्षापेक्षा जास्त असण्याची शक्यता असल्याने गुरुच्या भ्रमणाचा विचार करावा लागेल.

आपली साखळी चंद्र- शनी अशी असल्याने गुरु कर्केत किंवा मकरेत असतानाच ती पूर्ण होईल, गुरु कर्केत ही स्थिति आता तब्बल ११॥ वर्षांनी येणार आहे आणि गुरु मकरेत जाईल तो २०२० साली. याचा अर्थ जातकीला ५ किंवा ११ वर्षानी पैसे परत मिळणार का? असे सांगणे व्यवहार्य तर नाहीच शिवाय महादशास्वामी , अंतर्दशा स्वामी दोघांनी दिलेल्या कौला च्या ते विसंगतही ठरेल. इतक्या लांब वरच्या कालावधीत घडणार्‍या एखाद्या घटनेचा वेध प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून घेणेही काहीसे चुकीचे ठरेल.

आता काय करायचे?

कदाचित असेही असू शकेल की गुरु चे राशी भ्रमण गैर लागू असेल पण गुरुचे  नक्षत्र भ्रमण किंवा रवीचे राशी-नक्षत्र भ्रमण या द्वारे ही कौल मिळू शकेल. ह्या शक्यते साठी आपण दोन प्रकाराने ट्रॅन्सीट्स तपासू.

रवीचे राशी-नक्षत्रा तले भ्रमण
गुरुचे नक्षत्र व सब  भ्रमण (गुरु कोणत्या राशीत आहे त्याकडे लक्ष न देता)

रविच्या भ्रमणाचा विचार करायचा झाला तर आपल्याला चंद्राची रास आणि शनीचे नक्षत्र अशी जोडी बघितली पाहीजे किंवा शनीची रास  व चंद्राचे नक्षत्र अशी जोडी ही होऊ शकते. अशी संधी फक्त कर्क  आणि मकरेतच उपलब्ध आहे.

रवी  कर्केत , शनीच्या नक्षत्रात २० जुलै २०१६ ते ३ ऑगष्ट २०१६ या कालावधीत असेल. रवीचे पुढचे कर्केतले भ्रमण २० जुलै २०१७ ते ३ ऑगष्ट २०१७ या कालावधी असेल पण ते शनीच्या अंतर्दशेच्या कालावधीच्या (१६ एप्रिल २०१७ ) बाहेरचे आहे म्हणून आपल्याला चालणार नाही.

शनीच्या मकरेत चंद्राचे नक्षत्र येते , रवी मकरेत , चंद्राच्या नक्षत्रात असण्याचा कालावधी असेल २५ जानेवारी २०१६ ते ८ फेब्रुवारी २०१६ . शनीच्या अंतर्दशेच्या कालावधीत (१६ एप्रिल २०१७ ) बसू शकणारा आणखी असाच (रवी मकरेत , चंद्राच्या नक्षत्रात) एक कालावधी येईल तो २५ जानेवारी २०१७ ते ८ फेब्रुवारी २०१७. हा दुसरा कालावधीही आपल्याला विचारात घेता येईल.

गुरुच्या भ्रमणाचा विचार करायचा झाला तर , शनीच्या अंतर्दशेच्या कालावधीत (१६ एप्रिल २०१७) गुरु सिंह आणि कन्या या दोन राशीतून भ्रमण करेल. सिंहेत शनी अथवा चंद्राची नक्षत्रे नाहीत, सबब गुरुचे सिंहेतले भ्रमण उपयोगाचे नाही. गुरु नंतर बुधाच्या कन्येत ११ ऑगष्ट २०१६ ते ११ सप्टेंबर २०१७ या कालावधीत असेल कन्येत चंद्राचे नक्षत्र आहे. गुरु बुधाच्या राशीत, चंद्राच्या नक्षत्रात, शनीच्या सब मध्ये असताना देखील अपेक्षित घटना घडू शकते. हा कालावधी २५ ऑक्टोबर २०१६ ते २ नोव्हेंबर २०१६ असा असेल.

रवी भ्रमण आणि गुरु भ्रमण यांचा विचार करता आपल्याला एकंदर चार कालावधी मिळाले आहेत.

 1. २५ जानेवारी २०१६ ते ८ फेब्रुवारी २०१६ ( रवी : शनी-चंद्र )
 2. २० जुलै २०१६ ते ३ ऑगष्ट २०१६ ( रवी: चंद्र – शनी)
 3. २५ ऑक्टोबर २०१६ ते २ नोव्हेंबर २०१६ ( गुरु : चंद्र – शनी)
 4. २५ जानेवारी २०१७ ते ८ फेब्रुवारी २०१७ ( रवी : शनी-चंद्र )

आता प्रश्न पडतो यातला कोणता कालावधी निश्चित करायचा ? याचा खुलासा शनीच्या अंतर्दशेत येणार्‍या विदशा देतील.

शनीच्या अंतर्दशेत सध्या शनीची विदशा चालू आहे , ती १७ डिसेंबर २०१५ पर्यंत असेल, हा कालवधी आपल्या चार कालावधीं अंतर्गत बसत नाही. तेव्हा ही विदशा आपण सोडून देऊ (नाहीतरी हा कालवधी अगदी जवळचा असल्याने घटना –सरकारी काम , इतक्या लवकर घडायची शक्यता पण अगदीच कमी आहे.)

आपल्या चार अपेक्षित कालखंडत येणार्‍या विदशा:

२५ जानेवारी २०१६ ते ८ फेब्रुवारी २०१६ ( रवी : शनी-चंद्र )
बुध: ६ / ९ / ८ / १० सब चंद्र ८ / ६ / ८ / ८
२० जुलै २०१६ ते ३ ऑगष्ट २०१६ ( रवी: चंद्र – शनी)
रवी : ६ / ९ / ८ / ९ सब गुरु ८ / ८ / ६ , ७ , ११ / ४
२५ ऑक्टोबर २०१६ ते २ नोव्हेंबर २०१६ ( गुरु : चंद्र – शनी)
मंगळ: ३ / ८ / – /   १,१२,५ सब शनी ११ / ११ / २ ३ / २
२५ जानेवारी २०१७ ते ८ फेब्रुवारी २०१७ ( रवी : शनी-चंद्र )
२९ जानेवारी पर्यंत –
राहु: ९ \ ९ \ – \ ९ युती रवी ६ / ९ / ८ / ९   बुध ६ / ९ / ८ / १० राशीस्वामी बुध
३० जानेवारी नंतर –
गुरु: ८ / ८ / ६ , ७ , ११ / ४

या सगळ्यांचा विचार करता एक लक्षात येत ते असे की:

प्रश्ना संदर्भातला भाव समुह ८, ६, २, ११ असा आहे. महादशा स्वामी चंद्र षष्ठम (६) स्थानाचा प्रथम दर्जाचा कार्येश आहे , अंतर्दशा स्वामी शनी धन (२ ) आणि लाभस्थानाचा (११) प्रथम दर्जाचा कार्येश आहे. आता राहीले  ते  अष्टम स्थान( ८ ),   या स्थानाचा प्रथम स्थानाचा कार्येश आहे गुरु .

म्हणजे चंद्र – शनी- गुरु अशी साख़ळी तयार होते.

३० जानेवारी २०१७ ते १६ एप्रिल २०१७ या कालवधीत आपल्याला ही चंद्र – शनी- गुरु अशी महादशा –  अंतर्दशा –  विदशा  अशी साख़ळी मिळते , याच कालवधीतले , रवी चे ट्रान्सिट (रवी  शनीच्या मकरेत , चंद्राच्या नक्षत्रात) , २५ जानेवारी २०१७ ते ८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत उपलब्ध आहे. त्याचा महादशा – अंतर्दशा – विदशा यांच्या संयुक्त कालावधीशी  मेळ घातला  तर  आपला अपेक्षित कालावधी  ३० जानेवारी २०१७ ते  ८ फेब्रुवारी २०१७ असा होतो,  म्हणजे जातकाला पैसा परत मिळण्याचा कालावधी ३० जानेवारी २०१७ ते ८ फेब्रुवारी २०१७ असा असेल.

प्रश्न विचारते वेळे पासुन सुमारे दीड वर्षाने जातकीला तिचे पैसे परत मिळतील.

वेस्टर्न होरारी चार्ट ने आपल्याला हाच कालवधी दिलेला आहे!

शनीच्या अंतर्दशेत राहुची विदशा (जी गुरुच्या विदेशाच्या आधी येईल) ४ नोव्हेंबर २०१६ ते २९ जानेवारी२०१७ या कालावधीत आहे.

राहु:   ९ \ ९ \ – \ ९ युती रवी ६ / ९ / ८ / ९   बुध ६ / ९ / ८ / १० राशीस्वामी बुध. याच राहु विदशेत मंगळाची सुक्ष्मदशा २५ जानेवारी २०१७ ते २९ जानेवारी२०१७ अशी असेल.

मंगळ :   ३ / ८ / – /   १,१२,५ सब शनी ११ / ११ / २ ३ / २.

राहु आणि मंगळाचे एकत्र कार्येशत्व पाहीले तर ३ ( कागदपत्रे, करार, संदेश, तडजोड) , ९ (निवाडा) , ६ (सरकारी आस्थापनेचे व्ययस्थान) , ८ (अडकलेला पैसा) यांचे प्राबल्य दिसते, या वरुन असा तर्क करता येतो की २५ जानेवारी २०१७ ते २९ जानेवारी२०१७ या कालावधीत जातकीचा अर्जाचा निकाल लावला जाईल , धनादेश लिहला जाईल, त्यावर सक्षम अधीकार्‍यांच्या सह्या होतील, धनादेश जातकीला रवाना केला जाईल.

फेब्रुवारी२०१७ च्या पहिल्या आठवड्यात धनादेश जातकीच्या हातात पडेल आणि जातकीची कित्येक वर्षापासुनची मनोकामना पूर्ण होईल!

मी ग्रुप वर उत्तर दिले ते फक्त वेस्टर्न होरारीच्या अंदाजाने , त्या फिरंग्याना नाही कळणार आपले के.पी. आणि सबलॉर्ड . तेव्हा माझे उत्तर अगदी संक्षिप्त होते ते असे:

Suhas Gokhale: In the horary chart, ‘you’ will be represented by Jupiter (lord of 1st ) , the money that you are expecting is sort of entangled money so 8th house would represent it, means the Moon (lord of 8th) represents money due to you.
Jupiter (you) in the 8th House (entangled money) is not a good sign. But there is a hope !
The Moon is making a Square with Jupiter in one and half degrees. This could mean a tough job for you; anticipate lots of obstacles and delays. Incidentally, around the same time, Jupiter will be in Trine with Pluto in first house (1 degree 50 minutes to perfect). This is a pretty good signal for you, because good contacts between Jupiter & Pluto often indicate big financial gain if not a windfall!!
You will get your money back. Timing could be around one and half year from now

ही पोष्ट वाचून काहीजण म्हणतील,  इकडे कामाचा प्रचंड ताण  आहे  , फुकट भविष्य सांगणार नाही (जा!) असे हा माणुस म्हणतो आणि त्याच वेळी इतका वेळ खर्चुन , ह्या लष्कराच्या भाकर्‍या का भाजतोय?  पॉईंटाचा मुद्दा आहे ! पण त्याचे काय आहे, काही वेळा व्यवसाय वृद्धी साठी अशी काही पदरमोड करावी लागते , बापू !

पुंगी वाजवल्या शिवाय नाग डोलत नाही आणि ढोलकी वाजवल्या शिवाय प्रेक्षक ही जमत नाहीत ! आणि शेवटी डॉलर / युरो चा मोह कोणाला चुकलाय सांगा बरे!!

असो, वर्तवलेले भाकित खरे व्हावे असे मनापासुन वाटते , त्यासाठी आपण जातकीला मन:पूर्वक शुभेच्छा देवूया!

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

10 प्रतिक्रिया

///////////////
 1. Anant

  श्री. सुहासजी,

  अतिशय सुंदर माहिती.
  वेस्टर्न होरारी व के.पी. पद्धतीचे फार छान विश्लेषण.

  फक्त एक शंका : facebook किंवा इमेल माध्यमातून विचारला असताना – या प्रश्नाची अचूक वेळ कशी ठरविली जाते ?
  इथे जातकाने प्रश्न विचारते वेळेची कुंडली स्वत:च दिलेली असल्याने प्रश्न नाही, पण समजा network traffic किंवा server routing मुळे जर हा प्रश्न तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी काही मिनिटे लागली तर किंवा तुम्ही इमेल उशिरा बघितली तर कोणत्या वेळेनुसार कुंडली मांडली जाईल ? हा network delay कुंडली बदलेल का ?

  धन्यवाद,

  अनंत

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्रया बद्दल धन्यवाद.

   होरारी मध्ये प्रश्न ज्योतिषाला जेव्हा पूर्ण पणे स्मजतो ती वेळ महत्वाची , जातक फोन वरुन संवाद साधत असेल तर जेव्हा प्रश्नाचा पूर्ण खुलासा होतो ती वेळ धरायची, बर्‍याच वेळा फोन संभाषण सुरु झाल्यानंतर पंधरा वीस मिनीटांनी ही वेळ येते , तेव्हा फोन ची रिंग वाजली ती वेळ न घेताप्रश्ना बाबतीतसंपूर्ण खुलासा जेव्हा होतो ती वेळ घ्यायची. ईमेल द्वारा प्रश्न आला तर ती ईमेल मी जेव्हा वाचेन आणि प्रश्न जेव्हा पूर्ण समजेल ती वेळ महत्वाची, जातकाने ईमेल दोन दिवसांपूर्वी पाठवली होती , मला वाचायला वेळ झाला नाही , आज ईमेल बघितली , प्रश्न समजला , मग आजचीच वेळ घ्यायची. याच पद्धतीने आंसरिंग मशीन मध्ये ठेवलेल्या मेसेज बद्दल विचार करतात.
   मला वाटते आपल्या शंकेचे निरसन झाले असावे अजुनही काही शंका असल्यास जरुर विचारा.
   धन्यवाद

   सुहास गोखले

   0
 2. Onkar

  Namaste suhasji,
  ,very nice information about horari.
  ani tya palikade jaun ,aaj kahitari lihilele pahun khup chhan vatale.
  thanks about new information and keep it up for us ,thanks once_again

  0
 3. SHIVRAM KAJAREKAR

  वरील अनंतजींना दिलेले उत्तर छान व अचूक आहे पण जातकाला होरारी नंबरबद्दल माहिती आहे व त्याने होरारी नंबर दिला असेल तर ज्योतिषी जेव्हा प्रश्न पाहायला बसेल ती वेळ महत्त्वाची असे मानायचे की नाही?की त्यासाठी काही वेगळा नियम आहे?

  0
  1. सुहास गोखले

   श्री शिवरामजी,

   आपण होरारी क्रमांकाचा उल्लेख केला आहे म्हणजे आपल्याला के.पी, अभिप्रेत असावे

   के.पी. मध्ये ज्योतिषी ज्यावेळी प्रश्न सोडवायला घेतो त्यावेळेची वा त्या ठिकाणाची पत्रिका बनवावी लागते , जर जातकाने होरारी नंबर दिला असेल तर तो वापरावा, नंबर दिला नसल्यास एकतर बिना नंबराची पत्रिका बनवावी (टाईम चार्त) किंवा रॅन्ड्म नंबर घ्यावा ( बर्‍याच सॉफ्टवेअर मध्ये ही रॅन्डम नंबरची सोय असते ) त्यासाठी पुस्तकातले एखादे पान उघडूण त्या पाना वरचा क्रमांक वापरता येतो, 1 – 249 क्रमांचे बिल्ले एका पिशवीत ठेवून ना बघता एखाद बिला उअचलावा,, असे बरेच प्रकार आहेत.

   समजा जातक समोर आहे आणि प्रश्न सांगून नंबर देत असेल फारच उत्तम , हीच होरारी साठीची आदर्श स्थिती आहे.

   पाश्चात्य होरारीत ही नंबर ची कल्पना नसल्याने तिथे ज्योतिषाला प्रश्न पुर्ण समजतो ती वेळ वा स्थळ पत्रिकेसाठी वापरायचे असते , काही वेळा बर्‍याच ईमेल एक्सेंजीस झाल्यावर (फोना – फोनी) झाल्यावर प्रश्ना चा खुलासा होती , ती फायनल वेळ म्हत्वाची. माता गर्भ वाढवते ती प्रक्रीया 9 महीने चालते त्यानंतर बाळाचा जन्म होतो , बाळाची जन्मवेळ आपण कोणती घेतो … गर्भधारणा झाली ती का बालाने पहीले टॅःअ‍ॅ केले ती ? तसेच काहीसे आहे हे.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0
 4. SHIVRAM KAJAREKAR

  बाकी पोष्ट उत्तमच. आमच्यासारख्या अभ्यासकांना उपयुक्त खूपच सविस्तर आभार.

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्राणेशजी
   नाही ओपन फोरम्स फ़ेसबुक अशा ठिकाणी कोणी फिडब्याक देण्याची तसदी घेत नाही

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.