मी स्वत: एक ‘मांजर प्रेमी’ आहे त्यामुळे ‘मांजरा’ विषयी काहीही असले की माझे कान टवकारतातच!

आमच्या ‘ज्योतिष विषयक चर्चा’ ग्रुप वर एका सभासदाने ‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘ असा प्रश्न केला !

हरवलेल्या / घर सोडून गेलेल्या व्यक्तीं बद्दलचे अनेक प्रश्न मी पूर्वी हाताळले आहेत, एकदा एकाचा पाळलेला कुत्रा हरवला होता तो ही प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून हुडकून दिला होता, मांजराच्या बाबतीतली ही पहीलीच केस!

एका परदेशी जातकाने प्रश्न होता –  “‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘”

मांजर घरातून निघून गेले आहे आणि ते केव्हा परत येईल हे बघायचे आहे, थोडक्यात मांजर हरवले आहे अशा अंगानेच हा प्रश्न सोडवला पाहिजे.

हरवलेल्या व्यक्ती / वस्तू / प्राणी यांच्या बद्दल विचार करताना सर्वप्रथम ती वस्तू / व्यक्ती / प्राणी नेमका केव्हा पासुन हरवला आहे ते विचारा, काही वेळा जातक जरा खुट्ट झाले की ज्योतिषाकडे धाव घेतात इथे तसे काही झाले नाही ना हे तपासा.

हरवलेली व्यक्ती / वस्तू / प्राणी सगळ्यात शेवटी कोणी, कोठे आणि केव्हा पाहिली होती ते विचारून घ्या कारण ही ‘व्यक्ती / वस्तू / प्राणी ‘ कोणत्या दिशेला सापडेल, किती अंतरावर सापडेल याचा आपण अंदाज देतो तेव्हा  ‘ती व्यक्ती / वस्तू / प्राणी सगळ्यात शेवटी कोठे पाहिली होती’ या ठिकाणा पासूनची दिशा आणि अंतर आपण सांगत असतो

हरवलेल्या व्यक्तीचे वय बघा , लहान मूल आहे का मोठी व्यक्ती ते कळले की किती वेळा नंतर शोध कार्य चालू करायचे याचा अदाज घेता येतो. त्याच प्रमाणे अशी हरवलेली वस्तू सापडायचा अपेक्षीत कालावधी पण निश्चित करता येतो.

इथे एक पाळलेले ‘मांजर’ घरातून निघून गेले आहे त्याचा शोध घ्यायचा आहे. सामान्यात: पाळलेले मांजर सहसा घर सोडून लांब जात नाही, गेले तरी जवळपासच असते आणि त्याच्या ठरलेल्या वेळेला ते घरी परत येतेच. त्यामुळे ‘मांजर दिसत नाही कोठे ते’ अशी लगेच शोधाशोध करण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही ‘गेले असेल इकडे तिकडे कोठे तरी , येईल परत, जाते कोठे?”  असे म्हणत लोक एखादा दिवस तरी नक्की वाट पहातात. त्यानंतरही मांजर परत आले नाही तर मात्र शोधाशोध चालू होते.  सामान्यत: मांजर जखमी अथवा मृत झाले नसेल तर ते दोन तीन दिवसात परत येते / सापडतेच.

असो.

आता जातकाने प्रश्न विचारलाच आहे तर शोधू त्याचे उत्तर!

प्रश्नकर्त्याने  स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारुन एक प्रश्नकुंडली पण बनवली होती पण पुढचे अ‍ॅनालायसीस त्याने केले नाही किंवा त्याला ते जमले नसावे. खास या प्रश्ना साठी म्हणूनच एक प्रश्नकुंडली मांडली गेली असल्याने प्रश्न विचारते वेळीची नेमकी ग्रहस्थिती या प्रश्नकुंडलीत बंदिस्त आहे. प्रश्न विचारते वेळेच्या ग्रहस्थितीतच प्रश्नाचे उत्तर दडलेले असते असा आपला नेहमीचा अनुभव आहे.

पण इथे आता प्रश्न उपस्थित होतो की जातकाने या प्रश्ना साठीच म्हणून एक प्रश्नकुंडली मांडली आहे हे जरी असले तरी मी हा प्रश्न नव्याने ऐकला आहे तेव्हा मी पुन्हा एक नवीन प्रश्नकुंडली मांडायची की जातकाने तयार केलेलीच प्रश्नकुंडली वापरायची ?

याबाबत जगप्रसिद्ध होरारी तज्ञ श्री अल्फी लव्हाय काय म्हणतात पहा:

“Example: Let’s say that there are two friends. One dabbles in astrology and the other lost a ring. The dabbler sets up a horary chart for his friend but cannot come to a satisfactory solution to offer advice to recover the item. The querent then contacts you, the professional astrologer, with the same question. It is important that you find out about this previous inquiry and use that original chart for your work. This same procedure would hold true if another astrologer came to you for assistance in locating a missing article and had already drawn a chart for himself.”

जेव्हा एखाद्या प्रश्ना साठी आधीच एक प्रश्नकुंडली मांडली गेली असेल तर त्या प्रश्ना संदर्भात पुन्हा विचार करताना परत नवीन प्रश्नकुंडली मांडायची आवश्यकता नसते, जी प्रश्नकुंडली आधी मांडली गेली होती त्यावरूनच प्रश्नाचे उत्तर देता येते. मात्र मूळ प्रश्नकुंडली मांडली त्यावेळेच्या परिस्थितीत काही मोठा बदल झाला असेल किंवा प्रश्नकुंडली मांडली त्याला आता बराच काळ (काही महिने) झाला असेल तर मात्र नव्याने प्रश्नकुंडली बनवावी लागेल.

म्हणूनच जरी मी हा प्रश्न नंतर काही तासांनी वाचला असला तरी नेहमी प्रमाणे  प्रश्न वाचला ती वेळ आणि नाशिक हे स्थळ घेऊन कुंडली न बनवता मी प्रश्नकर्त्याने बनवलेलीच कुंडली वापरायचे ठरवले (आणि तेच योग्य आहे!)

जातकाने स्वत:च्याच प्रश्नासाठी स्वत:च बनवलेली प्रश्नकुंडली शेजारी दिली आहे.

(प्रश्नकुंडली ‘सायन’ पद्धतीची आहे आणि ‘रेजीओमोनटॅनस’ हाऊस सिस्टीम वापरुन बनवली आहे याची नोंद घ्या )

 

9 Jan 2020.  0:03:00 EET -02:00:00 Tel Aviv, Israel 34e45’00 32n01’00  Geocentric, Tropical. Regiomontanus  Mean Node

 

 

 

 

‘मांजर घरातून निघून गेले आहे कधी परत येईल? ‘

 

प्रश्नकर्ता लग्नस्थाना वरून पाहतात, इथे तूळ लग्न २० अंशावर उदीत आहे त्यामुळे तूळेचा स्वामी ‘शुक्र’ जातकाचे (प्रश्नकर्त्याचे) प्रतिनिधित्व करेल. लग्नात इतर कोणताही ग्रह नसल्याने एकटा शुक्रच जातकाचे प्रतिनिधित्व करेल.

सामान्यत: ‘चंद्र’ हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो पण जेव्हा प्रश्न ‘हरवले- सापडले’ अशा प्रकारातला असतो तेव्हा मात्र ‘चंद्र’ हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे इथे आपल्याला चंद्राला जातकाचे प्रतिनिधित्व देता येणार नाही.

‘मांजर’ हा लहान आकाराचा पाळीव प्राणी असल्याने तो नेहमीच षष्ठम (६) स्थाना वरुन पाहतात. इथे षष्ठम स्थानावर मीन रास २४:११ अंशावर आहे. त्यामुळे मीनेचा स्वामी गुरू या मांजराचे प्रतिनिधित्व करेल. षष्ठम स्थानात इतर कोणताही ग्रह नाही, म्हणजेच ‘गुरू’ आणि हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधी मानलेला ‘चंद्र’ असे दोघे या मांजराचे प्रतिनिधित्व करतील.

आता मांजर सापडणार म्हणजे काय होईल?

मांजर आपल्या मालका कडे म्हणजे प्रश्नकर्त्याकडे परत येणार म्हणजेच मांजराचे प्रतिनिधी ग्रह आणि जातकाचे प्रतिनिधी ग्रह यांच्यात योग व्हायला हवा.

मांजर घरी परत येणार आहे म्हणून आपण जन्मलग्न बिंदू (जातक) आणि मांजर यांच्यातला योग विचारात घेता येतील तसेच चतुर्थ भावारंभ (जातकाचे म्हणजे पर्यायाने मांजराचे घर)  आणि मांजराचे प्रतिनिधी ग्रह यांच्यातला योग देखील विचारात घेता येतील.

आता हे मांजर सध्या आहे कोठे ते तरी बघू.

मांजराचा प्रथम दर्जाचा प्रतिनिधी गुरू तृतीय स्थानात आहे, तृतीय स्थाना वरून घरा जवळचा परिसर / शेजार पाजार सुचित होतो, म्हणजे मांजर जवळपासच आहे, फार लांब गेलेले नाही. म्हणजेच मांजर लौकर घरी परत येण्याची शक्यता आहे.

अर्थात गुरू (मांजर) केतू च्या युतीतून नुकतेच बाहेर पडला आहे किंबहुना दीप्तांशाचा विचार करता हे दोघे अजूनही युतीतच आहेत असे म्हणता येईल. मांजराचा प्रतिनिधी गुरू असा केतू च्या युतीत असल्याने मांजर काही फार सुस्थितीत असेल असे वाटत नाही! पण केतू शी असलेला हा योग फारसा महत्त्वाचा नाही , एक आशंका इतकेच, पण मांजराच्या जीवाला कोणता मोठा धोका निर्माण करु शकेल इतकी ताकद या योगात निश्चितच नाही, जास्तीतजास्त मांजराला किरकोळ दुखापत या अंगाने या योगाचा विचार करता येईल. त्यामुळे मांजर सुखरुप आहे आणि म्हणूनच ते परत येण्याची शक्यता आहे.

आता हे मांजर (मग ते कशाही अवस्थेत असेना का) घरी परत येणार का?

या साठी प्रथम शुक्र (जातक) आणि गुरू (मांजर) यांच्यात योग होतो का ते तपासू.

गुरु (मांजर) ०८ मकर २९ वर आहे तर शुक्र (जातक) २४ कुंभ ०५ वर आहे , या दोघांत फक्त एका राशीचे अंतर असल्याने यांच्यात कोणताही योग होत नाही.

आता मांजराचा दुसरा प्रतिनिधी चंद्र आणि शुक्र (जातक) यांच्यात काही योग होतो आहे का ते तपासू.

शुक्र (जातक) २४ कुंभ ०५ वर आहे आणि चंद्र (मांजर) २३ मिथुन ५८ वर आहे म्हणजेच अवघ्या ७ आर्क मिनिटांत चंद्र – शुक्र नवपंचम योग होणार आहे म्हणजे मांजराची आणि जातकाची भेट होणार आहे, मांजर घरी परतणार आहे. योग ‘नव-पंचम’ असल्याने असे होणार याची खात्री आहे,

हुश्श !

पण मांजर केव्हा परत येईल?

अगदी लगेचच!

आपण पाहिले की अवघ्या ७ आर्क मिनिटात चंद्र – शुक्र नवपंचम योग होणार आहे, आपण:

१ अंश = १ तास

किंवा
१ अंश = १ दिवस

किंवा

१ अंश = १ आठवडा

किंवा

१ अंश = १ महिना

अशी युनिटस वापरू शकतो. इथे थोडा तारतम्य भाव (कॉमन सेन्स) वापरायचा! पाळलेले मांजर ते सहसा घर सोडून जात नाही आणि गेले तरीही फार लांब जात नाही, त्यामुळे त्याला परत यायला असा आठवडा, महीना वगैरे लागणार नाही. त्यामुळे आपण इथे:

१ अंश = १ तास किंवा १ अंश = १ दिवस

असाच विचार करू.

आता ही ७ आर्क मिनिट्स चे १ अंश = १ तास  च्या युनिट मध्ये रुपांतर ‘७  मिनिटे’ असे होईल. आणि जर आपण १ अंश = १ दिवस असे युनिट वापरले तर त्याचे रुपांतर ‘१६८ मिनिटें म्हणजेच २ तास ४८ मिनिटे’ असे होईल.

आता अवघ्या ७-८ मिनिटात मांजर कसले परत  येणार म्हणून  २ तास ४८ मिनिटात मांजर परत येईल असाच निष्कर्ष योग्य ठरेल, प्रश्न विचारला आहे मध्यरात्री ००:०३ AM वाजता त्यात २:४८ तास वाढवले तर वेळ येते प्रश्न विचारल्या दिवशीच  ०२:५१  AM!

म्हणजे बरोबर ०२:५१:०० AM या वेळेस मांजर घरी परत येईल.

आपण पाहिले आहे की मांजर घरी कधी परत येणार हे पाहण्या साठी जन्मलग्न बिंदू आणि मांजर यांच्यातला योग पण विचारात घेऊ शकतो किंवा चतुर्थ भावारंभ आणि मांजर यांच्यातला योग पण विचारात घेऊ शकतो.

त्या अंगाने बघितले तर:

जन्मलग्न आणि गुरू (मांजर) :
जन्मलग्न बिंदू सध्या २० तूळ ०१ वर आहे तर गुरू (मांजर) ०८ मकर २९ वर आहे. जन्मलग्न बिंदू  ०८ तूळ २९ असताना या दोघांच्यात केंद्र योग झाला होता, बहुदा ह्याच वेळी मांजर घर सोडून गेले असावे! पण आता जन्मलग्न बिंदू या केंद्र योगातून बाहेर पडलेला आहे, आत्ता त्यांच्यात कोणताही योग नाही, पण जेव्हा जन्मलग्न बिंदू  १८ अंश २८ कला पुढे सरकून, म्हणजेच त्याची सध्याची तूळ रास ओलांडून वृश्चिकेत प्रवेश करून, ०८ वृश्चिक २९ वर येईल तेव्हा जन्मलग्न बिंदू आणि गुरू (मांजर) यांच्यात लाभ योग होईल. म्हणजे मांजर व जातक (लग्नबिंदू) यांची भेट होईल. जन्मलग्न बिंदूला १ अंश पुढे सरकायला सरासरी ४ घड्याळी मिनिटे लागतात, ह्या हिशेबाने १८ अंश २८ कला पुढे सरकायला ७४ मिनिटे लागतील म्हणजे १ तास १४ मिनिटें. प्रश्न विचारला आहे मध्यरात्री ००:०३ वाजता त्यात ७४ मिनिटें वाढवली तर वेळ येते ०१:१७ म्हणजे प्रश्न विचारल्याच्या सव्वा तासात मांजर घरी परत येईल.

हा झाला तोंडी हिशेब जरा जास्त अचूकता मिळवण्या साठी मी माझ्या सॉफ्टवेअर मधले चार्ट अ‍ॅनिमेशन हे फिचर वापरले, यात चार्ट ची वेळ हळू हळू पुढे सरकवून पाहता येते, अ‍ॅनिमेशन करुन मी जन्मलग्न बिंदू पुढे सरकवत तो ०८ वृश्चिक २९ वर आणला तेव्हाचा चार्ट चा टाईम होता ०१:३०:२० !

म्हणजे बरोबर या ०१:३०:२० AM वेळेस मांजर घरी परत येईल.

जन्मलग्न आणि चंद्र (मांजर) :
जन्मलग्न बिंदू सध्या २० तूळ ०१ वर आहे, जन्मलग्न बिंदू ३ अंश ५७ कला पुढे सरकून जेव्हा २३ तूळ ५८ वर येईल तेव्हा जन्मलग्न बिंदू आणि चंद्र (मांजर) यांच्यात नव-पंचम योग होईल. म्हणजे मांजर व जातक (लग्नबिंदू) यांची भेट होईल. जन्मलग्न बिंदूला १ अंश पुढे सरकायला सरासरी ४ घड्याळी मिनिटे लागतात , ह्या हिशेबाने ३ अंश ५७ कला पुढे सरकायला १६ मिनिटे लागतील, प्रश्न विचारला आहे मध्यरात्री ००:०३ वाजता त्यात १६ मिनिटें वाढवली तर वेळ येते ००:१९ म्हणजे प्रश्न विचारल्याच्या १६ व्या मिनिटाला मांजर घरी परत येईल.

हा झाला तोंडी हिशेब जरा जास्त अचूकता मिळवण्या साठी मी माझ्या सॉफ्टवेअर मधले चार्ट अ‍ॅनिमेशन हे फिचर वापरले, यात चार्ट ची वेळ हळूहळू पुढे सरकवून पाहता येते, अ‍ॅनिमेशन करुन मी जन्मलग्न बिंदू पुढे सरकवत तो २४ तूळ ०९ वर आणला, तेव्हा चंद्र पण थोडासाच पुढे सरकून २४ मिथुन ०९ वर आला, म्हणजे दोघांत अगदी पूर्ण अंशात्मक नवपंचम झाला, तेव्हाचा चार्ट चा टाईम होता ००:२२:२३ !

म्हणजे बरोबर ००:२२:२३ AM या वेळेस मांजर घरी परत येईल.

चतुर्थ भावारंभ आणि गुरू (मांजर)

गुरू तृतीय स्थानात असल्याने चतुर्थ भावारंभ गुरूला स्पर्श करु शकणार नाही!

चतुर्थ भावारंभ आणि चंद्र (मांजर)

चंद्र नवम स्थानात २३ मिथुन ५८ वर आहे. चतुर्थ भावारंभ पुढे सरकत जेव्हा २५ कुंभ १५ वर येईल तेव्हाच त्याचा त्यावेळी २५ मिथुन १५  आलेल्या चंद्राची नव-पंचम होईल, तेव्हा चार्ट चा टाईम असेल ०२:१९:०१! पण हे होत असताना चतुर्थ भावारंभ त्या आधी शनी, प्लुटो यांना धडका देणार असल्याने असा मार खाल्लेला , प्रभावहीन असा नव-पंचम आपल्या कामाचा नाही, तेव्हा तांत्रिक दृष्ट्या योग होत असला तरी या होरारीत याला Interference समजले जाते, त्याचा विचार करता येणार नाही.

थोडक्यात आपल्या कडे आता ‘मांजर घरी परत येण्याच्या’ तीन वेळा आहेत:

अ) प्रश्न विचारल्या दिवशीच ०२:५१  AM  वाजता मांजर घरी परत येईल.

ब) प्रश्न विचारल्याच्या दीड तासात म्हणजे ०१:३०:२० AM वाजता मांजर घरी परत येईल.

क) प्रश्न विचारल्याच्या १९ व्या मिनिटाला  म्हणजेच ००:२२:२३ AM वाजता मांजर घरी परत येईल.

या तीनही पर्यांयांचा विचार करून मी 09 Jan 2020 , 01:30 AM असे उत्तर दिले!

प्रत्यक्षात ते मांजर त्याच दिवशी लगेचच घरी परत आले, जातक कळवतो: “I think it was around 00:12 AM”

माझे उत्तर (तांत्रिक दृष्ट्या) चुकले!  

मी पोष्ट मॉर्टेम अ‍ॅनालायसीस करायला घेतले.

आपण काढलेल्या ब आणि क पर्यायांच्या गृहीतकात आणि गणितात चूक दिसली नाही,  त्यातल्या त्यात ‘क’ पर्याय नुसारचे म्हणजे ‘००:२२:२३ AM’ हे उत्तर प्रत्यक्षातल्या स्थितीच्या जास्त जवळ जाणारे ठरले आहे!

‘अ’ पर्याय चे उत्तर, ०२:५१ AM, मात्र बरेच चुकले! या बाबतीत आपण चंद्र आणि शुक्र यांच्यातला नव – पंचम होण्यास किती ‘अंश-कला-विकला’ बाकी आहेत त्या मोजून, ०१ अंश = १ दिवस असा हिशेब केला होता.
त्या ऐवजी आपण १ अंश = १ तास हे युनिट वापरले असते तर आपल्याला ७ घड्याळी मिनिटे मिळाली असती , ती प्रश्न वेळेत ००:०३ मध्ये वाढवली तर उत्तर आले असते ००:१० AM !  हे प्रत्यक्षातल्या वेळेच्या (००:१२ AM) खूपच जवळ आले असते!

मला वाटते मांजर अवघ्या ७-८ मिनिटात घरी परत येऊ शकते ही शक्यताच आपण नाकारली, हीच आपली चूक ठरली!

इथे मी आणखी एक विचार केला. आपण चंद्र – शुक्र योग बघताना, अंशात्मक अंतर मोजून , १ अंश = १ तास असे युनिट वापरण्या ऐवजी सरळ एफेमेरीज मध्ये तपासून चंद्र शुक्र नवपंचम केव्हा होतो हे रियल टाईम मध्ये तपासले असते तर?

एफेमेरीज बघितल्यावर असे दिसले की प्रश्न विचारल्याच दिवशी प्रश्न वेळेच्या अवघ्या १२ व्या मिनिटाला म्हणजे ००:१५:३४ AM वाजता चंद्र  मिथुन २४:०६:०२ वर असेल आणि त्याच वेळी शुक्र कुंभ २४:०६:०२ वर असेल म्हणजे दोघांच्यात  पूर्ण अंशात्मक नव-पंचम योग!

म्हणजेच ००:१५:३४ AM वाजता मांजर घरी परत येईल.

आपली दोन सुधारित उत्तरें ००:१० AM आणि ००:१५:३४ AM, पण मांजर भलतेच हुष्षार निघाले, त्याने आपल्या पेक्षा चांगले गणित करून बरोबर या दोन्ही उत्तरांचा मध्य पकडला आणि ००:१२: ०० AM वाजता घरात प्रवेश केला!

म्यॅव!

सामान्यत: होरारी मध्ये ‘हो’ किंवा ‘नाही’ असे उत्तर देता आले तरी बास अशी परिस्थिती असते, फार तपशील किंवा फार अचूकतेचा हव्यास धरू नये असे मला वाटते.

या मांजराच्या बाबतीत जातकाला ‘मांजर फार लांब गेलेले नाही, आहे इथेच कोठेतरी शेजारी पाजारी आणि अगदी लौकरच, तास दीड तासात सुखरुप घरी पोहोचेल’  असे उत्तर पुरेसे आहे. याहून जास्त तपशील , याहून ही जास्त अचूकतेची कोणतीही आवश्यकता नाही.

“मला अपार्टमेंट विकत घेता येईल का?’  या प्रश्नाला ‘हो / नाही’ इतके उत्तर पुरेसे आहे, उगाचच ओढून ताणून ‘वन बीएचके का टू बीएचके?,  जुना / नवा?, कोथरूड मध्ये की खराडीला?’ या असल्या सुक्ष्म तपशीलात जाण्यात काही अर्थ नसतो.

‘भारत विरूद्ध पाकीस्तान क्रिकेट मॅच चा निकाल?’ या प्रश्ना साठी ‘भारत जिंकेल / हरेल’ इतके उत्तर पुरेसे आहे, एकदा ते देऊन झाल्यावर मग ‘टॉस कोण जिंकणार?, ‘पहिल्यांदा बॅटींग कोण करणार?’ ‘अशा उपप्रश्नांची उत्तरे शोधत बसू नये. बर्‍याच वेळा जातकाला हे इतकेच ‘हो / नाही ‘ उत्तर अपेक्षीत असते तेव्हा आपणही उगाचच फार चिकित्सा करत बसू नये, कोठे तरी  ‘काळ – काम – वेगा’ चा विचार करून केव्हा थांबायचे हे ठरवता आले पाहिजे.

म्यॅव, म्यॅव !

याने की

‘शुभं भवतु’ 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Santosh

  बऱ्याच दिवसांनी ब्लॉगवर केस स्टडी पहिली आणि फटाफट वाचून काढली.
  मी हि केस स्टडी सोडवायचा प्रयत्न केला होता पण ह्या मध्ये ‘चंद्र’ हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधित्व करतो, हा नियम माहित नसल्यामुळे उत्तरापर्यन्त पोहचू शकलो नाही.
  पण ह्या केस स्टडी मुळे हि एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली.
  वेळेचं calculation मधील बारकावे पण अभ्यासनीय आहेत.

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संतोषजी

   ज्योतिष हे काही लोक समजतात तसे 2+2 = 4 इतके सोपे नसते ! अनेक वर्षांची मेहेनत , तपश्चर्या त्या मागे असावी लागते आणि इतके असूनही प्रत्येक पत्रिका एक नवे आव्हान असते !

   सुहास गोखले

   +2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.