अमेरिकेतल्या एका महिलेने मला प्रश्न विचारला होता ..

 

प्रश्ना मागची  पार्श्वभूमी :

जातक एका युनिव्हर्सिटी मधल्या एका संशोधन प्रकल्पा मधली ‘संशोधक सहाय्यक रिसर्च असिस्टंट’ ही जागा हवी होती , त्या संदर्भातली सर्व औपचारिकता जातकाने पूर्ण केली होती , आता वाट होती ती त्या प्रकल्पाचे प्रमुख डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या ‘होकारा’ ची.

जातक डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या निर्णयाची वाट पाहत होती पण दरम्यान जातकाला एका चांगल्या नोकरीची ऑफर  मिळाली. जातकाला नोकरी पेक्षा संशोधनातच जास्त रुची असल्याने जर ही रिसर्च पोष्ट मिळाली नाही तरच जातक नोकरीची ऑफर स्वीकारणार होती, पण अडचण अशी की जर डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या कडून उत्तर मिळे तो पर्यंत थांबले तर हातात आलेली नोकरी निसटेल कारण ज्या कंपनी ने ही ऑफर दिली होती ती काही जास्त वेळ थांबू शकणार नाही.

सध्या समोर आहे ती नोकरी स्वीकारायची आणि नंतर जर रिसर्च पोष्ट मिळाली की नोकरी सोडायची असेही करता येणार नव्हते कारण या नोकरी साठी जातकाला बॉन्ड लिहून द्यावा लागणार होता त्यातल्या एका कलमान्वये जातकाला वर्षाच्या आत ती नोकरी सोडता येणार नव्हती.

आता जातका पुढे यक्ष प्रश्न उभा राहिला होता, धरलय तर चावतयं आणि सोडलं तर पळतयं  अशी परिस्थिती निर्माण झाली होती !

याच द्विधा मन:स्थितीत जातकाने विचारले:

“डॉ अ‍ॅन्डरसन कडून  उत्तर मिळणार आहे का ?  असल्यास हो असेल का?  केव्हा? “

प्रश्न वेळेचा तपशील:

जातक: स्त्री

प्रश्न वेळेची जातकाची स्थिती:

दिनांक: १९ ऑगष्ट २०१६

वेळ: २३:३५:४६ CDT

स्थळ : ओल्कहोमा सिटी Oklahoma City , OK, USA   ३५°२८’N ,  ९७°३१’W

 

 प्रश्नशास्त्राचा एक प्राथमिक नियम: प्रश्न विचारणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कोठूनही प्रश्न विचारत असली तर त्या प्रश्ना साठीची प्रश्नकुंडली मात्र ज्योतिषी ज्या ठिकाणी आहे त्या स्थळाची आणि त्या वेळी ज्योतिषाच्या घड्याळ्यात किती वाजले आहेत त्या क्षणाची मांडायची असते!  

त्या मुळे जातकाने हा प्रश्न अमेरिकेतल्या ओक्लाहोमा सिटी ,अधून १९ ऑगष्ट २०१६ रोजी तिकडचे रात्रीचे २३:३५ वाजलेले असताना विचारलेला असला तरी मी तेव्हा भारतात, नाशिक इथे होतो आणि माझ्या घड्याळात सकाळचे १०:०५: ४६ वाजले होते आणि दिवस होता  २० ऑगष्ट २०१६ !

तेव्हा आपल्याला जातकाचे स्थळ, वेळ, दिनांक न वापरता माझे भारतातले स्थळ, दिनांक आणि वेळ वापरुन प्रश्नकुंडली बनवायला पाहीजे म्हणजे आपल्या प्रश्नकुंडलीचा तपशील असा असेल:

दिनांक: २० ऑगष्ट २०१६

वेळ: १०:०५: ४६ सकाळी

स्थळ : गंगापूर रोड, नाशिक

ही माहिती वापरून तयार केलेली सायन , प्लॅसीडस, मीन नोडस पद्दतीची  प्रश्न कुंडली सोबत छापली आहे.


 

“डॉ अ‍ॅन्डरसन कडून  उत्तर मिळणार आहे का ?  असल्यास हो असेल का?  केव्हा? “

 

 

प्रश्नकुडली तर तयार झाली , आता आपण जातकाचा नेमका प्रश्न काय आहे हे समजावून घेऊ.

जातकाच्या मनात रिसर्च पोष्ट आहे आणि ती जर मिळाली नाही तर आणि तरच जातका तिच्या हातात असलेली नोकरीची ऑफर स्वीकारणार आहे.  रिसर्च पोष्ट साठी निवड झाली / नाही झाली हे केव्हा कळेल हे सांगता येत नाही आणि त्यासाठी थांबावे तर नोकरीची ऑफर हातातून निघून जाईल असा तिढा आहे. रिसर्च पोष्ट मिळाली तर उत्तमच पण नाही मिळाली तर रिसर्च पोष्ट नाही आणि नोकरीही नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते तेव्हा जातकाला रिसर्च पोष्ट साठी निवड होणार आहे का हे माहिती करून घ्यावयाचे आहे . हा निर्णय होकारार्थी असेल तर जातक थांबायला तयार आहे आणि निर्णय नकारार्थी असेल तर जातक वाट न पाहता हातातली नोकरी स्वीकारून मोकळी होईल.

चला तर मग जातकाच्या प्रश्ना साठी तयार केलेली प्रश्नकुंडली सोडवूया.

या प्रश्नात कालनिर्णया पेक्षा ही जातकाला रिसर्च पोष्ट मिळते का नाही हाच कळीचा मुद्दा आहे तेव्हा आपण त्यावर लक्ष केंद्रित करू.

या पद्धतीच्या अ‍ॅनॅलायसीस मध्ये काही प्रारंभिक तपास करावा लागतो त्यात जन्मलग्न बिंदू कोठे आहे, चंद्र किती अंशावर आहे , कसा आहे, शनी कोठे आहे इ. बाबी येतात. त्यानंतर प्रश्ना संदर्भात महत्त्वाचे भाव, प्रश्नाशी निगडित असलेल्या व्यक्तीचे आणि विषयाचे (वस्तूचे) प्रतिनिधी ठरवावे लागतात.

चला तर मग, आपल्या प्रोटोकॉल प्रमाणे एक एक फॅक्टर तपासायला सुरवात करू या.

पत्रिकेत जन्मलग्न २० तूळ असे आहे म्हणजे ‘अर्ली ( ० ते ३ डिग्रीज)  किंवा लेट असेंडंट (२७ ते २९)  ‘ नाही.

(ज्यांना या ‘अर्ली असेंडंट ‘ किंवा ‘लेट असेंडंट ‘ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग ) )

चंद्र मीनेत २१ अंशावर आहे, मीन राशी ओलांडे पर्यंत चंद्राचे बुध आणि गुरु बरोबर योग होणार असल्याने चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स ‘ नाही.

(ज्यांना चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ बद्दल माहीती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग ) )

शनी द्वितीय स्थानात असल्याने त्या बद्दलही काळजी नाही.
(ज्यांना सप्तमातल्या शनी बद्दल माहिती नाही त्यांनी कृपया या ब्लॉग वरची ‘ज्युवेल थीफ’ ही लेखमाला जरूर वाचावी ज्युवेल थीफ ! (भाग ) )


आता आपण या कथेतल्या पात्रांचा (अ‍ॅक्टर्स) आणि त्यांच्या प्रतिनिधींचा परिचय करून घेऊ.


१) जातक

जातक हा नेहमीच लग्न स्थाना वरून पाहतात , लग्नेश आणि लग्नातले ग्रह जातकाचे प्रतिनिधी असतात शिवाय चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून असतोच.

इथे जन्म लग्न २० तूळ असे असल्याने तूळेचा स्वामी ‘शुक्र’ जातकाचे प्रतिनिधित्व करेल. लग्नात कोणताही ग्रह नाही. चंद्र हा नेहमीच जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असल्याने, चंद्र आणि शुक्र असे दोघे जातकाचे प्रतिनिधित्व करतील.

शुक्रा सारखा स्त्री वाचक ग्रह (महिला) जातकाचा प्रतिनिधी येणे ही हा चार्ट रॅडीकल असल्याची एक खूण आहे.

२) डॉ अ‍ॅन्डरसन / डॉ अ‍ॅन्डरसन यांचा निरोप / युनिव्हर्सिटी / संशोधन प्रकल्प

जातक एका युनिव्हर्सिटी मधल्या संशोधन प्रकल्पात रिसर्च सहाय्यक या पदा साठी उत्सुक आहे, डॉ अ‍ॅन्डरसन हे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आहेत, जातकाला हे पद द्यायचे की नाही याचा निर्णय डॉ अ‍ॅन्डरसन घेणार आहेत आणि जातकाला या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

सर्वप्रथम आपण ‘डॉ अ‍ॅन्डरसन यांचा निरोप ‘ या बाबत विचार करू. जातकाच्या बाबतीतला निर्णय डॉ अ‍ॅन्डरसन घेणार / कळवणार असले तरी ते हा निर्णय युनिव्हर्सिटी साठी घेत आहेत.  जसे एखाद्या नोकरीचे  नेमणूक पत्र ( अपॉईंटमेंट लेटर) त्या कंपनीच्या मनुष्यबळ विकास ( एच आर / पर्सोनेल) विभागाच्या प्रमुखाच्या सहीने / संमतीने मिळत असले तरी ते केवळ एक साधन आहे,  प्रत्यक्षात आपण त्या कंपनीत नोकरी करणार असतो त्या पर्सोनल मॅनेजर ची नोकरी करणार नसतो , आपला व्यवहार त्या कंपनीशी होत असतो, इथेही तसेच आहे, निर्णय घेणे , तो जातकाला कळवणे हा भाग जरी डॉ अ‍ॅन्डरसन हाताळणार असले तरी जातकाचा व्यवहार हा एका युनिव्हर्सिटी बरोबर आहे, अंतिम नतीजा / फळ  जातकाला निव्हर्सिटी मधल्या संशोधन प्रकल्पात रिसर्च सहाय्यक पद ‘ हेच अपेक्षीत आहे.

 इथे डॉ अ‍ॅन्डरसन यांचा निरोप ही बाब फारशी महत्त्वाची नाही, जातकाला प्रकल्पात काम करायची संधी मिळते का खरा महत्त्वाचा मुद्दा आहे , अशी संधी मिळाल्याचे डॉ अ‍ॅन्डरसन कळवतील का अन्य कोणी कळवेल हा मुद्दा गौण आहे. 

युनिव्हर्सिटी मधल्या संशोधन प्रकल्पातली रिसर्च असिस्टंट ची पोष्ट आहे, ह्या पदा साठी जातकाला काही विद्यावेतन ( स्टायपेंड) मिळणार आहे पण ही काही रूढ अर्थाने मानली जाते तशी नोकरी नाही आणि जातकाला मिळणारे विद्यावेतन हा काही पगार म्हणता येणार नाही, जातक रिसर्च करणार आहे (किमान रिसर्च ला साहाय्य तरी करणार आहे) हे एक प्रकारचे उच्च शिक्षण आहे कारण या रिसर्च च्या जोरावर जातकाला उच्च पदवी (पी एच डी) मिळू शकते. या अंगाने विचार करता जातका साठी ही एक उच्च शिक्षणाची संधी आहे.

उच्च शिक्षणा साठी आपण नवम (९) भाव विचारात घेतो.

जातकाचा व्यवहार हा एका युनिव्हर्सिटीशी येणार आहे, उच्च शिक्षणाचे केंद्र, विद्यापीठ इ बाबी आपण नवम (९) स्थाना वरून पाहतो.

आता त्या डॉ अ‍ॅन्डरसन यांच्या अंगाने विचार केला तर , हे त्या प्रकल्पाचे प्रमुख आहेत , त्यांच्या मार्गदर्शना खाली हा रिसर्च प्रकल्प आहे म्हणजे त्या अर्थाने डॉ अ‍न्डरसन हे गुरु आहेत. गुरु आपण नवम (९) स्थानावरूनच पाहतो.

म्हणजे कोणत्याही अंगाने विचार केला तरी आपल्याला नवम (९) भावालाच महत्त्व दिले पाहिजे असे दिसते

(केवळ जातक डॉ अ‍न्डरसन यांच्या कडून येणार्‍या उत्तराची (मेसेज) ची प्रतीक्षा आहे म्हणून तृतीय (३) स्थान वापरणे योग्य होणार नाही.)

आपण सोयी साठी कथेतल्या या दुसर्‍या पात्राचा उल्लेख ‘प्रकल्प’ या नावाने करू.

नवम (९) स्थान १९ मिथुने वर चालू होत असल्याने मिथुनेचा स्वामी बुध या ‘प्रकल्पा’ चे प्रतिनिधित्व करेल, नवम स्थानात कोणताही ग्रह नसल्या मुळे एकटा बुधच या प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करेल.

३) नोकरीची ऑफर

या कथेत आणखी एक तिसरे पात्र आहे ते म्हणजे जातकाच्या हातात असलेली नोकरीची ऑफर.

खरेतर हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही कारण जातक रिसर्च असिस्टंट या पोष्ट साठी उत्सुक आहे आणि अशी पोष्ट मिळत असेल तर सध्या हातात असलेली नोकरीची ऑफर जातक नाकारणार आहे. असे असले तरी जर रिसर्च पोष्ट नाही मिळाली तर (नाईलाजाने का होईना) जातक नोकरी स्वीकारणार आहे, म्हणजे हा काहीसा रिसर्च पोष्ट का नोकरी असा प्रश्न देखील आहे त्यामुळे ‘नोकरी’ या तिसर्‍या पात्राचा थोडासा का होईना विचार आपल्याला केलाच पाहिजे.

जातकाच्या हातात असलेली नोकरीची ऑफर म्हणजेच नोकरी रीतसर नोकरीच आहे त्यामुळे या साठी दशम (१०) स्थानाचा विचार करायला पाहिजे. इथे दशम भाव २० कर्केत सुरू होत असल्याने कर्केचा स्वामी चंद्र नोकरीचे प्रतिनिधित्व करेल, दशमात कोणताही ग्रह नसल्याने एकटा चंद्र या नोकरीचा प्रतिनिधित्व करेल. आता चंद्र जातकाचा पण प्रतिनिधी आहे असे जेव्हा होते तेव्हा चंद्र  नेहमीच सामनेवाल्या पार्टीला ( या केस स्ट्डीत ‘नोकरी’ ला) बहाल केला जातो, म्हणजे इथे चंद्र ‘नोकरी’ चे प्रतिनिधित्व करेल.

पण या क्षणी आपण , पहिल्या टप्प्यावर, फक्त  ‘प्रकल्पा’ बद्दल विचार करू , तेव्हा चंद्र जातकालाच बहाल करू आणि जेव्हा ‘नोकरी’ बद्दल विचार करू तेव्हा चंद्र नोकरीला बहाल करू अशी थोडी मांडवली करता येईल.

असो.


कथेतली पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे ग्रह निश्चित झाल्या नंतर आपण दुसर्‍या टप्प्या कडे वळू.


सर्वप्रथम आपण या पत्रिकेचा एक प्राथमिक अभ्यास करू . यात आपले जे अ‍ॅक्टर्स आहेत ते कसे आहेत , कशा स्थितीत आहेत , त्यांचे म्हणणे काय आहे ते तपासू.

जातकाचा प्रतिनिधी शुक्र लाभस्थानात (११) कन्येत १७ अंशावर आहे , कन्येतला हा कमकुवत शुक्र जातकाची सध्याची द्विधा मन:स्थिती दाखवत आहे.

जातकाचा दुसरा प्रतिनिधी चंद्र तांत्रिक दृष्ट्या पंचमात (५) दिसत असला तरी तो षष्ठम (६) स्थानारंभा पासून अवघा अर्धा आर्क अंश मागे आहे  ( चंद्र २१ मीन १३, षष्ठम भाव २१ मीन ४८) , षष्ठम (६) भाव नोकरीचा असल्याने जातकाच्या मनात नोकरीचा विचार पण आहे (एक नोकरीची (ऑफर) हातात आहेच) याचेच ते द्योतक आहे.

प्रकल्पाचा प्रतिनिधी बुध जातकाच्या व्ययस्थानात (१२) आहे हे काही चांगले लक्षण दिसत नाही, नवम स्थाना वरुन विचार केला तर या प्रकल्पाचा प्रतिनिधी बुध हा प्रकल्पाच्या चतुर्थ स्थानात (४) (अखेर !) असणे ही काही शुभसुचक नाही.

प्रश्नकुंडलीत चंद्राला फार महत्त्व ! या चंद्राचा प्रथम अभ्यास होणे आवश्यक असते.

प्रश्नकुंडलीत चंद्र सध्या ज्या राशीत आहे त्या राशीत तो आल्या पासुन ते प्रश्नकुंंडलीतल्या सध्याच्या स्थिती पर्यंत येई पर्यंत या चंद्राने केलेले ग्रह योग सामान्यत: या प्रश्ना संदर्भात काय काय घडले आहे हे सांगतात किंबहुना जातकाच्या आयुष्यात अगदी नजिकच्या काळात काही घडले आहे का या बद्दल अंदाज येतात. (हे जे काही घडले आहे ते जातकाने विचारलेल्या प्रश्नाशी संबधीत असेलच असे नाही)  आणि खरोखरीच  चंद्रांच्या योगां नी सुचवलेल्या घटना घडलेल्या असतील तर ते ही  पत्रिका ‘रॅडीकल’ असल्याच्या दाखलाच असतो , दरवेळेला असे असेलच असे नाही पण एक अंदाज असणे महत्त्वाचे असते , त्यातूनच प्रश्ना संदर्भातली पार्श्वभूमी लक्षात येते व त्याचा उपयोग पुढे होणार्‍या ग्रहयोगांचा अंवयार्थ लावण्या साठी नक्कीच होतो.

या पत्रिकेत चंद्र सध्या २१ मीने वर आहे , चंद्र मीनेत आल्या पासुन ते २१ मीनेवर येई पर्यंत या चंद्राने कोणकोणते ग्रह योग केले आहेत ते तपासू.

चंद्र मीनेत आल्यापासुन झालेले योग:

१) चंद्र – मंगळ केंद्र योग
२) चंद्र – शनी केंद्र योग
३) चंद्र – नेपच्युन युती
४) चंद्र – प्लुटो लाभ योग
५) चंद्र – शुक्र प्रतियोग

बरेच काही घडलेले आहे असे दिसते !

चंद्र (जातक) मीनेत , पंचम (५) स्थानात असताना त्याचा द्वितीय (२) स्थानातल्या धनेतल्या मंगळ आणि शनी शी केंद्र योग झाला होता. त्या पाठोपाठ चंद्राची पंचमातल्याच (५) नेपच्यून शी युती पण झाली होती.

शनी चतुर्थेश (४) आणि पंचमेश (५) आहे तर मंगळ धनेश (२) आणि सप्तमेश (७) , नेपच्यून पंचम (५) स्थानात आणि चंद्र  पंचम (५) स्थानात स्थानातून हे सारे योग करत होता,  ७, २, ५, ४ या स्थानांची उपस्थिती , शुक्र , मंगळ, शनी , नेपच्यून सारखे ग्रह ! यावरून एक तर्क सहज करता आला आणि तो म्हणजे अगदी नुकतेच जातकाला एखाद्या प्रेम प्रकरणात अपयश आले असेल अथवा निराशा/ फसगतीला सामोरे जावे लागले असेल.

त्या पाठोपाठ चंद्राने शुक्रा शी आणि प्लुटो शी पण योग केले आहेत ! शुक्र लग्नेश (१) आणि अष्टमेश (८) ! प्लुटो वक्री !

जातकाचा प्रतिनिधी असलेल्या शुक्राने पण अगदी असेच योग मंगळ , शनी, नेपच्युन आणि प्लुटो शी केले आहेत , ही बाब नोंद घेण्या सारखीच आहे !

या सार्‍यांचा अर्थ ‘प्रेम प्रकरणात अपयश अथवा निराशा/ फसगत ‘ इतक्या पुरते हे मर्यादीत नसावे ! कदाचित या प्रेम प्रकरणाने भलतेच वळण घेतले असावे ! गर्भधारणा आणि गर्भपात !

जातकाला मी तिच्या प्रश्नाचे उत्तर कळवले तेव्हा हे मी तिला काहीसे चाचरत , चाचरत , आडवळणाने या बद्दल विचारले तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन म्हणाली:

“अगदी असेच झाले आहे पण हे तुला कसे समजले ? हे सारे पत्रिकेत दिसते ? “

(मला आता अशा जातकाने आश्चर्यचकित होऊन विचारलेल्या प्रश्नाची सवय झाली आहे! ) 

जातकाचा प्रतिनिधी चंद्र हा नेपच्यून च्या युती मधून नुकताच बाहेर पडला आहे तर जातकाचा दुसरा प्रतिनिधी शुक्र देखील नेपच्यूनशी झालेल्या प्रतियोगातून नुकताच बाहेर पडला आहे , जातकाच्या प्रतिनिधींचे नेपच्यून शी नुकतेच होऊन गेलेले हे योग जातकाचा मोठा वैचारिक गोंधळ झाला आहे हे अधोरेखित करत आहेत.

शनी द्वितीय स्थानात आहे याचा अर्थ जातकाची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे !

असो.


आता मुख्य मुद्द्या कडे वळू. जातकाला अपेक्षित असलेली रिसर्च पोष्ट मिळणार का?


असे घडायचे असेल तर जातकाचा प्रतिनिधी आणि प्रकल्पाचा प्रतिनिधी यांच्यात कोणता तरी योग होणे आवश्यक आहे.

पत्रिकेतल्या ग्रहस्थिती कडे पाहिले की लक्षात येते ,

 • २१ मीन १३ वरचा चंद्र (जातक) , २४ कन्या ३९ वरच्या बुधाशी (प्रकल्प) शी प्रतियोग करत आहे.
 • १७ कन्या ५१ वरचा शुक्र (जातक) ,  २४ कन्या ३९ वरच्या बुधाशी (प्रकल्प) शी युती योग करत आहे.

म्हणजे जातकाला ही रिसर्च पोष्ट मिळणार असा प्राथमिक कयास करायला काहीच हरकत नाही.

चंद्र – बुध प्रतियोगा बद्दल प्रश्नच नाही, पण बुध – शुक्र युती बद्दल मला शंका आली, याचे कारण बुध २४ कन्येत आहे तर शुक १७ कन्येत म्हणजे बुध शुक्राच्या पुढे आहे आणि आता शुक्राला बुधाला गाठायचे आहे. पण हे कसे जमणार ? कारण बुध हा शुक्रा पेक्षा किंचित का होईना जलद गतीचा ग्रह आहे , शुक्र बुधा ला गाठू शकेल का? शंका आहे. तेव्हा एफेमेरीज तपासून या गोष्टीचा खुलासा करून घेणे आवश्यक आहे.

 

प्रश्न विचारते वेळी शुक्र १७ कन्या ५१ वर तर बुध २४ कन्या ३९ वर आहे. जसा जसा काळ पुढे सरकेल तसा तसा हा शुक्र बुधाच्या जवळ जवळ येत राहील, दोघांतले अंतर झपाट्याने कमी होत जाईल , एरव्ही असे होताना दिसणार नाही कारण बुध हा शुक्रा पेक्षा जलद आहे पण इथे ते दिसत आहे याचे कारण म्हणजे नेमका याच वेळी बुध वक्री होण्याच्या मार्गावर असल्याने त्याची गती खूपच मंदावली आहे असे दिसते. जेव्हा एखादा ग्रह मार्गी चा वक्री होतो किंवा वक्री चा मार्गी होतो तेव्हा त्याची गती कमालीची मंदावते इतकी की वक्री / मार्गी बदल होण्याच्या आधी काही काळ तो ग्रह चक्क थांबल्या सारखा दिसतो, यालाच तो ग्रह स्तंभी अवस्थेत आहे असे म्हणतात, ग्रहाची ही स्तंभी अवस्था मोठी विस्फोटक असते , अशुभ मानली जाते त्यात ही मार्गी चा वक्री होताना जी स्तंभी अवस्था असते ती तर फारच अशुभ मानली जाते

 

 

हा मंदावलेला बुध २८ कन्ये वर असताना पाठीमागून आलेला शुक्र या बुधा ला गाठेल , त्या दोघांत युती होईल. पण या वेळे पर्यंत बुध स्तंभी (Stationary) असेल म्हणजे शुक्र स्तंभी बुधाशी युती करणार आहे !
ही युती होता क्षणीच बुध २८ कन्या ०४ अंशावर वक्री होणार आहे !

शुक्र (जातक) आणि प्रकल्प (बुध) अशा  तर्‍हेने एकत्र येणे हे  अशुभ आहे , हा  युती योग फलदायी ठरणारा नाही, या अशुभ / विस्फोटक स्थिती मुळे इथे दोन शक्यता दिसतात:

१) ग्रहयोग आहेत म्हणजे रिसर्च पोष्ट साठी जातकाची निवड होणार पण हे अगदी सरळ असणार नाही, काहीतरी वळण / वळसे यात असणार. जातकाची निवड जवळजवळ पक्की झालेली असताना काही अनपेक्षित विघ्न येऊन जातकाची निवड होणे लांबणीवर पडेल / निर्णय प्रलंबित राहील असे ही घडू शकते.

दुसरी शक्यता अशी की:

२) जातकाची निवड होईल पण नंतर हा घेतलेला निर्णय फिरवला जाईल किंवा जातकाची ही रिसर्च पोष्ट जास्त काळ टिकणार नाही त्यात खंड पडेल अथवा कोणत्या ना कोणत्या कारणा मुळे जातकाला ही पोष्ट सोडावी लागेल. 

जातकाचा प्रतिनिधी चंद्र आणि प्रकल्पाचा प्रतिनिधी बुध यांच्यातला प्रतियोग हेच सुचवत आहे. प्रतियोग असला तरी योग आहेच त्यामुळे प्रकल्प आणि जातक यांच्यात संवाद जरूर होणार आहे. पण (अशुभ) प्रतियोगा मुळे ही रिसर्च पोष्ट जातकाला मिळाली तरी ती लाभणार नाही किंबहुना ही पोष्ट स्वीकारली नसती तर बरे झाले असते असे जातकाला वाटण्याची शक्यता आहे.

म्हणजे रिसर्च पोष्ट साठी जातकाची निवड होण्याची शक्यता तर स्वच्छ दिसते आहे पण त्याच बरोबर ग्रहस्थिती असेही सांगत आहे की ही पोष्ट जातकाला लाभणार नाही.

चंद्र (जातक) आणि गुरु यांच्यात प्रतियोग पण होतो आहे . गुरु तृतीयेश (३) आणि षष्ठेश (६) आहे. तृतीय स्थान म्हणजे संवाद . निरोप, आणि षष्ठम स्थान म्हणजे नोकरी, रिसर्च पोष्ट मिळाल्याने जातक बहुदा हातात असलेली नोकरीची ऑफर नाकारेल.

या नोकरीच्या ऑफर बाबत जरा आणखी विचार करू.

नोकरी नेहमी दशम (१०) स्थाना वरून पाहिली जाते. इथे दशम स्थान २० कर्क वर सुरू होत आहे , दशमात कोणताही ग्रह नाही म्हणजे कर्केचा स्वामी चंद्र हा जातकाच्या नोकरीचा एकमेव प्रतिनिधी आहे,. वास्तविक चंद्र हा जातकाचा नैसर्गिक प्रतिनिधी असतो त्यामुळे आता चंद्र एकाच वेळी जातकाचे आणि नोकरीचे प्रतिनिधित्व कसे करणार ? अशा परिस्थितीत एकाच वेळी दोन्ही पार्टीज चे प्रतिनिधित्व करणार्‍या ग्रहाला डिस्पुटेड प्लॅनेट असे संबोधून , हा डिस्प्पुटेड प्लॅनेट नेहमीच प्रश्ना संदर्भातल्या सामनेवाली पार्टीला बहाल केला जातो,  हा नियम वापरला तर चंद्र नोकरीचा आणि शुक्र जातकाचा प्रतिनिधी असेल.

आता जातक नोकरी स्वीकारणार असेल तर चंद्र (नोकरी) आणि शुक्र  (जातक) यांच्यात कोणता तरी योग होणे आवश्यक आहे.

इथे चंद्र २१ मीने वर आहे तर शुक्र १७ कन्ये वर म्हणजे यांच्यात नुकताच प्रतियोग होऊन गेला आहे (जातकाला नोकरीची ऑफर मिळाली आहे याचेच हे द्योतक आहे) यांच्यात आता नवा योग होणार नाही,  म्हणजे जातक ही नोकरी स्वीकारणार नाही किंवा जातकाला ही नोकरी अन्य कारणां मुळे मिळणार नाही.


आता प्रश्न येतो ते हे सारे केव्हा घडणार?


मुळात अशा पद्धतीच्या प्रश्नांत कालनिर्णय हा भाग फारसा महत्त्वाचा नसतो, इथे जातकाला जातकाच्या दृष्टीने रिसर्च पोष्ट मिळणार आहे का ? हे कळणे जास्त महत्त्वाचे आहे आणि आपण त्याचे उत्तर शोधले आहे.

तरीही उत्सुकता म्हणून आपण कालनिर्णय करायचा प्रयत्न करू.

कालनिर्णया साठी सामान्यत: चंद्रा चा वापर करतात. इथे बुध (प्रकल्प) आणि चंद्र (जातक) यांच्यात ४ अंशात प्रतियोग होत आहे , या योगा वरच जातकाला रिसर्च पोष्ट बद्दल होकारार्थी उत्तर मिळेल.

या नंतर लगेचच म्हणजे चंद्र अर्ध्या अंशात (जातक) आणि संवाद – मेसेज (गुरु – तृतिय (३)  संदेश/ निरोप, करार  आणि षष्ठम (६)  नोकरी या स्थानांंचा भावेश) यांच्यात ४.५ अंशात प्रतियोग होत आहे. म्हणजे या योगावर जातक नोकरीची हातात असलेली ऑफर नाकारेल (कारण तीला रिसर्च पोष्ट मिळाली आहे!) इथे प्रतियोगा मुळे घटना घडणार असल्यामुळे हा निर्णय चुकीचा ठरेल , जातकाला ही नोकरीची हातात असलेली ऑफार नाकारल्याचा प्रश्चाताप होण्याची शक्यता आहे.

आपले स्केल चार दिवस – चार आठवडे – चार महीने असे असू शकते.

चार दिवस आणि चार महीने हे स्केल मला जरा अव्यवहार्य वाटले म्हणून मी चार आठवडे असे स्केल निवडले , प्रश्न विचारला होइता १९ ऑगष्ट ला त्या हिशेबाने जातकाला  चार आठवड्या च्या आसपास म्हणजेच सप्टेंबर च्या तिसर्‍या आठवड्यात (१५ सप्टेंबर – २१ सप्टेंबर) निर्णय कळेल.

या सार्‍या ग्रहस्थिती वरून आपले अनुमान असे असेल:

 • जातकाला प्रकल्पात काम करायची संधी मिळेल पण अगदी कमी कालावधी साठी. 
 • जातकाची ही नेमणूक कोणत्या ना कोणत्या कारणां मुळे (जातकाचा दोष असेल / नसेल) संपुष्टात येईल.
 • प्रकल्पात काम करायची संधी मिळाल्याने जातक सध्या हातात असलेली नोकरी स्वीकारणार नाही.
 • सप्टेंबर च्या तिसर्‍या आठवड्यात (१५ सप्टेंबर – २१ सप्टेंबर) निर्णय कळेल.

 


ज्योतिषशास्त्र हे आगामी काळात घडू शकणार्‍या घटनां बद्दल फक्त एक अंदाज देऊ शकते, शक्याशक्यता सांगू शकते , नेमके अमुकच घडेल (किंवा घडणार नाही) हे छातीठोकपणे सांगणे हे केवळ ब्रह्मदेवालाच शक्य होईल.

एखाद्या भविष्यकालीन घटने बद्दल अचूकपणे सांगणे , कालनिर्णय करणे हा या ज्योतिषशास्त्राचा मूळ हेतू  / प्रयोजन नाहीच,  आगामी काळातल्या उपलब्ध संधी आणि आव्हाने यांचा अंदाज देणे हेच या शास्त्राचे खरे काम आहे आणि या माहितीचा कसा आणि केव्हा वापर करून घ्यावयाचा हे सर्वस्वी जातका वर अवलंबून असते.

जातकाचे निर्णय जातकानेच घ्यायचे असतात , ते काम ज्योतिषाचे नाही !


असो,

लेख बराच मोठा झाला आहे म्हणून या लेखाच्या दुसर्‍या भागात आपण याच प्रश्नाची उकल ‘नक्षत्र पद्धती’ नुसार करायचा प्रयत्न करू तसेच या केस चे पुढे काय झाले ते पण पाहू.

क्रमश:

शुभं भवतुु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री तेजराजजी

   अहो. हे अगदी साधे सरळ सोपे अ‍ॅनालायसीस आहे . होरारीचे हेच तर वैषिष्ट्य आहे , नेमके पणा असतो, फाफटपसारा नाही, दोन तीन ग्र्ह आणि त्यांच्यातले योग इतकेच काय ते असते , तर्कशास्त्र मात्र चांगले असावे लागते हे काम काहीसे डिटेक्टीव्ह पद्धतिचे असते भरपूर साम्य आहे या दोन्हींत , ज्याला डिटेक्टीव्ह कादंबर्‍या , गेला बाजार CID सारख्या मालिका पाहायला अवाडतात त्यांना हे असले काम चांगले जमू शकेल.

   सुहास गोखले

   0
 1. Gorakshnath Kale

  aaplya jyotish shastracha zenda tumhi Europe aani America madhe fadkavala tyabaddal aamhala abhimaan aahe sir tumcha

  0
 2. Santosh

  धन्यवाद श्री सुहासजी,

  केस स्टडी खूपच अभ्यासपूर्ण आहे, ह्या निमित्ताने अभ्यासासाठी खूपच चांगले पॉईंट्स मिळाले.
  वेस्टर्न होरारी मधील अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत तुमच्या केस स्टडी मुळे बरेचसे गोष्टी क्लिअर होतात.

  संतोष सुसवीरकर

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संतोषजी

   माझ्या केस स्ट्डीज ह्या हे शास्त्र शिकवण्याच्या हेतुनेच जास्त विस्तार पूर्ववक लिहलेल्या असतात, जेणे करुन ज्यांना हे तंत्र अवगत करुन घ्यावयाचे आहे तयंना त्याचा थोडा का होईना लाभ व्हावा.

   मी नक्षत्र पद्धती आणि पाश्चात्त्य पद्धती एक साथ वापरतो, कोणती एक पद्धती चांगली / वाईट असे सिद्ध करयाचा माझा प्रयत्न नाही, काही प्रश्नांची उत्तरे (आणि कालनिर्णय हा भाग) नक्षत्र पद्धतीने चांगली मिळतात तर काही प्रश्नां साठी (आणि बारीक तपशीला साठी ) पाश्चात्त्य पद्धती जास्त योग्य वाटते , जसा प्रश्न असेल तशी पद्धती निवडता आली पाहीजे, एकाच पद्धतीचा पोकळ अभिमान बाळगण्यात चूक होते आहे असे माझे मत आहे.

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.