काल परवाचीच गोष्ट, एका स्टेशनरीच्या दुकानात एक लहानसे नोटपॅड आणि बॉलपेन विकत घेतले, नोटपॅड १५ रुपयांचे आणि बॉलपेन १० रुपयांचे,  १५ + १० बरोबर २५ असा तोंडी हिशेब.

मी दहा दहाच्या च्या तीन  नोटां काढून कौंटर वर ठेवल्या तर तिकडे त्या दुकानदाराचे इकडे बघ , तिकडे बघ, हा ड्रॉवर उघड , तो ड्रॉवर उघड , या शेल्फ मध्ये  बघ असे उद्योग चालू होते,  मला गडबड होती म्हणून मीच विचारले

“काय झाले?”

“कॅलक्युलेटर सापडत नाही, मघाशीच तर वापरला होता आता एव्ह्ढ्यात कोठे गायब झाला?”

“अहो पण ‘१५ + १०’ ही बेरीज करायला तुम्हाला कॅलक्युलेटर लागतो?”

“अरेच्च्या खरेच की , एव्हढी साधी बेरीज करायला कॅलक्युलेटर लागणारच नाही, तोंडीच होईल ना बेरीज… २५ रुपये झाले ”

“कमाल आहे नाही का?”

“त्याचे काय आहे या कॅलक्युलेटरची इतकी सवय झाली आहे की आता काहीही गणित करायचे झाले की प्रथम कॅलक्युलेटर कडे हात जातो, सवयीचा परिणाम दुसरे काय?”

असे बर्‍याच वेळा अनेक बाबतीत होताना आढळते ,

पण हा नुसता सवयीचा परिणाम नाही तर चक्क दु:षपरिणाम आहे!

निसर्गाने आपल्याला पंच ज्ञानेद्रिये , हात पाय दिले आहेत आणि हो, चक्क एक मेंदू पण दिला आहे आणि दिसत नसले, कोणत्याही सोनोग्राफी / एक्स-रे/ एम आर आय मध्ये सापडत नसले तरी ‘मन’ नामक एक अवयव पण दिला आहे.

पण आपण त्या सगळ्यांचा किती वापर करतो ? (कसा वापर करतो हा एक वेगळाच गहन विषय आहे!)

उत्कांत्रीच्या सिद्धांतानुसार एखाद्या अवयवाचा वापर होत नसला तर हळुहळू  त्या आवश्यकता नसल्याने तो अवयव निकामी होतो आणि एक वेळ अशी येते की तो अवयवच गायब होतो (अर्थात ही प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी लाखो वर्षे लागत असतील) , सापांना एके काळी पाय होते, माणसाला शेपुट होते , आता ते नाही !

विज्ञानाने अनेक सुखसुविधा आपल्याला दिल्या आहेत , आपले कष्ट कमी केले आहेत, आयुष्य सुखकर केले आहे.

पण या सुखसुविधाचा अतिरेकी हव्यास धरुन आपण कळत-नकळत स्वत:चेच मोठे नुकसान करुन राहीलो आहोत.

दोन –तीन पिढ्या पूर्वीचे लोक  पाच-सहा मैलाचे अंतर अगदी सहजगत्या , हसत हसत पायी चालत पार करायचे आता आपल्याला कोपर्‍या वर जायला टू व्हिलर लागते! स्वयंपाक घरातला मिक्सर-ग्राईंडर असो किंवा टी.व्ही. चा रिमोट कंट्रोल या उपकरणांनी आपला इतका कब्जा घेतला आहे की आता आपल्याल काहीच हालचाल करावी वाटत नाही.

१९८७ मध्ये इंटरनेट , ईमेल आणि गुगलबाबाचा जन्मही झालेला नव्हता , तेव्हा ड्राईंग  बनवणे, पुस्तके वाचून , प्रयोग करुन माहीती गोळा करणे , सरळ वही-पेंसिल घेऊन अल्गोरिथम लिहणे, फ्लो-चार्ट्स काढणे अशी अनेक कामें हाताने करुन सॉफ्टवेअर – हार्डवेअर चे  किती तरी यशस्वी प्रकल्प मी पार पाडले आहेत. आजच्या पिढीतल्या नविन इंजिनियर्स ना या गुगलबाबाची इतकी सवय झालेली आहे की प्रॉब्लेम सोडवायला दिला की गुगलबाबाच आठवतो यांना, स्वत: काही प्रयत्न करावयास नकोत. सगळे आयते , रेडिमेड हवे आहे . इंटरनेट बंद असेल तर यांची अवस्था एकतर लुळ्या-पांगळ्यां सारखी होते किंवा भ्रमिष्टां सारखी !

आज आपल्या सेल फोन मध्ये आहे त्यापेक्षाही अत्यंत कमजोर , दुबळे कॉम्प्युटर वापरुन १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर जिंवंत माणूस पाठवून , त्याला सही सलामत , वन-पीस परत ही आणला होता!

घरातले केर काढणे, कपडे धुणे, भांडी घासणे, फरशी पुसणें,  उठबस करत चुलीवरचा स्वयंपाक करणे , पंगतीत वाढणे, विहीरीचे पाणी काढणे , जमीन सारवणे अशी अनेक शारीरीक श्रमाची कामे पूर्वीच्या स्त्रियां अगदी सहजगत्या करत असत,  आज ऑफीसचा एक मजला चढायचे आपण टाळतो,  त्यासाठी दहा मिनिटे लिफ्ट खाली यायची वाट पाहातो आणि दुसरीकडे महिन्याला काही हजार भरुन हेल्थ क्ल्बला जातो. टी.व्ही. चा रिमोट हुडकण्यात पंधरा मौल्यवान मिनिटें वाया घालावली जातात पण चार पावले पुढे चालून हाताने टी.व्ही. बंद करणे कष्टाचे वाटू लागले आहे.

विज्ञानाने दिलेल्या सुख-सुविधा नाकाराव्या असे मी म्हणत नाही पण त्यांच्या किती आहारी जायचे हे आपल्याला ठरवता आले पाहीजे.

आज मधुमेह , हृदयविकाराच्या रुग्णाला औषधोपचारा बरोबरच पथ्य , व्यायाम आणि ज्याला ‘चेंज ईन लाईफ स्टाईल ‘ असे बरेच काही सुचवले जाते याचे कारण काय असावे?

व्यायाम म्हणले की त्यात जोर, बैठका, सुर्यनमस्कार , पळणे, पोहणे , वजनें उचलणे पासुन ते दोरी वरच्या उड्या, एरोबिक्स , आयसोमेट्रीक ट्रेनिंग , मैदानी खेळ असे अनेक व्यायाम प्रकार  येऊ शकतात . काही व्यायाम प्रकार सर्व शरीराला एकाच वेळी व्यायाम देतात तर काही व्यायामाचे प्रकार शरीराच्या एखाद्या विषिष्ठ अवयवाला जास्त व्यायाम देण्यासाठी असतात.  एखाद्या दुखावलेल्या किंवा बराच काळ वापरात नसलेल्या स्नायुंना परत वापरात आणण्यासाठीचे अनेक व्यायाम प्रकार फिजिओ थेरपी मध्ये आहेत.

हे सगळे व्यायाम प्रकार आपण करतो तेव्हा नेमके काय होते? या व्यायामाने शरीराला म्हणजे एका स्नायुंच्या गटाला आपल्या नेहमीच्या हालचालीं पेक्षा जास्त कष्ट किंवा ताण दिला जातो, स्नायुंना असा ताण रोजचा किंवा परिचयाचा नसल्याने सुरवातीला ते स्नायु हे जादाचे कष्ट करायला / ताण सहन करायला नाखुष असतात, बरीच कुरकुर करतात, पण सातत्याने असा ताण येत राहीला तर मात्र हे स्नायु हा ताण सहन करण्यासाठी बळकट व्हायला सुरवात होते, आणि मग एके वेळ अशी  येते की हा जादाचा ताण स्नायु सहज पेलू शकतात. व्यायामाने शरीर कमावेल असे जे म्हणले जाते त्यात व्यायामाने आपले स्नायु बळकट बनवले असे असते. सर्वच व्यायाम प्रकार स्नायु बळकट करण्यासाठी नसतात , योगासनां सारखे प्रकार किंवा एरोबिक्स सारखे व्यायाम प्रकार दमसास वाढवणे, हाडांच्या सांध्यांची हालचाल सुरळीत करणे, लवचिकता आणणे अशा प्रकारे काम करतात.

छाती, हात , पाय, दंड , मांड्या, पोटर्‍या मधल्या स्नायुंचे ठीक पण शरीरातल्या आतल्या अवयवांच विषेशत: हृदय आणि मेंदूचे काय , त्यांना कसला व्यायाम आणि तो द्यायचा तरी कसा?

आपल्या जन्माच्या आधीपासुनच हृदयचे काम चालू  झालेले असते आणि संपूर्ण आयुष्यभर क्षणाचीही विश्रांती न घेता ते अविरत धडधडत असते (अपवाद फक्त आपल्याला शिंक येते तेव्हा , जेव्हा आपण शिंकतो तेव्हा अगदी क्षणभर का होईना हृदय थांबते , म्हणुनच कोणी जेव्हा शिंकताना आपण ऐकतो तेव्हा त्या व्य्क्ती साठी ‘bless you’ म्हणायची पद्धत पाश्चात्य संस्कृतीत आहे!)

मी आधी लिहले आहे तसे म्हणजे स्नायुंना त्यांच्या  नेहमीच्या रुटीन पेक्षा जास्त ताण सातत्याने देत राहावयचे, हृदयाच्या बाबतीत असा व्यायाम देणे म्हणजे हृदयाचे ठोके जलद पडतील अशा हालचाली करणे जसे जॉगिंग , दोरी वरच्या उड्या, फास्ट सायकलींग, बॅडमिंटन, टेनिस सारखे जलद गतीचे खेळ  असे अनेक व्यायम प्रकार ज्याला ‘कॉर्डिओ व्हॅस्कुलर’ प्रकारातले व्यायाम म्हणतात , असे व्यायाम हृदयाचे ठोके वाढवतात, त्यामुळे हृदयाचे स्नायु बळकट होतात.

हे झाले हृदयाचे , आता मेंदूला कसा व्यायाम द्यायचा , बाकी व्यायाम आणि मेंदू म्हणले  की ‘गुढग्यात मेंदू’ ची आठवण येते , विनोदाचा भाग सोडा पण मेंदूला व्यायाम द्यायचा म्हणजे नेमके काय करायचे  ? उत्तर सोपे आहे , मेंदूला जरा जास्त काम द्यायचे जे नेहमीपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे , मेंदूला खुराक हा शब्द प्रयोग तुम्ही  कदाचित ऐकला असेल ना , तेच !

अशा कोणत्या गोष्टी मेंदूला व्यायाम देतात ? आणि मुळात मेंदुला व्यायाम कशाला? … ते पुढच्या भागात पाहु

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+2

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. अमोल डंके

  सुहास जी मला बर्याच वर्ष्यापासून रोजचा हिशोब लिहायची सवय आहे मी रोज झोपायच्या आधी दिवसभरात काय काय खर्च केला ते आठवतो आणि मग लिहितो हा एक मेंदू ला सजग ठेवण्याचा व्यायाम आहे .तसेच आपण पत्रिकेतील काही फलादेश करताना गणित वापरतो ते सुद्धा जर कॅल्कुल्येतर न वापरता करता येण्यासारखे आहे .तसेच वेदिक गणिते जर बघितली तर कोम्पुतर पेक्षा सुद्धा चटचट उत्तरे काढताना मी बघितली आहेत .तसेच जर एखादा उजव्या हाताने काम करीत असेल तर तीच कामे डाव्या हाताने केली तरी सुद्धा मेंदू साठी छान व्यायाम होतो .

  +3
  1. सुहास गोखले

   श्री. अमोलजी,

   धन्यवाद.

   आपण लिहले आहे ते बरोबर आहे , माझ्या लेखाच्या दुसर्‍या भागात हे मुद्दे आहेतच आणखी ही काही नविन माहीती देण्याचा प्रयत्न करेन.

   कळावे,

   आपला

   सुहास गोखले

   +1
 2. प्रदीप कुलकर्णी

  मी पारंपारिक व केपी ज्योतीष शास्त्राचा थोडा अभ्यास केला आहे . मला या विषयाचे आकर्षण खूपच असून त्या त expert व्हावं अस वाटत . म्हणून मी त्या संदर्भात कुठे काही मिळेल ते शोधत असतो. आपण मराठीत ही साईट सुरु केलीत त्या बद्दल धन्यवाद व शुभेच्छा.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. प्रदीपजी,
   सप्रेम नमस्कार,
   आपण माझ्या वेबसाईट ला भेट दिलीत आणि आवर्जुन अभिप्राय दिला या बद्दल धन्यवाद.
   या वेबसाईट वर विविध विषयां वरचे २७० लेख आहेत त्यात अनेक सविस्तर केस स्ट्डीज आहेत ज्याच्या आपल्या सारख्या ज्योतिष अभ्यासकाला लाभ होईल. पुस्तकातुन / क्लास मधुन थिअरी शिकवली जाते पण हे ज्ञान कसे वापरायचे हे अभावानेच सांगीतले जाते ही उणीव भरुन काढायचा थोडा प्रयत्न मी केला आहे.

   मला आलेले ज्योतिषांचे आणि जातकांचे अनेक अनुभव मी लिहले आहेत त्याचाही आपल्याला लाभ होईल.
   इसापनिती / पंचतंत्राच्या अंगाने जात काही गोष्टी / किस्से यांचा वापर करुन घेत मी ज्योतिषशास्त्रातल्या काही अपप्रवृत्तीवर / चुकांवर भाष्य केले आहे , अशा अनेक ‘तात्पर्य कथा’ वेबसाईट वर आहेत.

   ज्योतिषशास्त्रावर हजारोंनी पुस्तके बाजारात उपलब्ध असली तरी नेमके काय वाचायचे हे कोणी सांगत नाही, श्री. व.दा.भट / श्री.सोमण यांच्या पलीकडे जाऊन ही काही उत्तमोत्तम ग्रंथ आहेत , ते प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाने वाचले पाहीजेत / संग्रहात ठेवले पाहीजेत , या हेतुने मी ‘ग्रंथ हेच गुरु’ या सदरात काही ग्रंथ परिक्षणें केली आहेत, पुस्तकांच्या याद्या दिल्या आहेत , पुस्तके कोठे मिळतील त्या ठिकाणांचे पत्ते दिले आहेत. हे सर्व एकदा नजरे खालुन घालावे.

   ज्योतिष एके ज्योतिष असे होऊ नये म्हणूण मी वेबसाईट वर अनेक विनोद, किस्से, गंमतीदार अनुभव लिहले आहेत त्यांचाही आस्वाद घ्यावा.

   आपण वेबसाईट चे सदस्यत्व (जे मोफत आहे) घेतल्यास वेबसाईट वर प्रसिद्ध होणारे नवे लेखन, न्यूज लेटर अशा अनेक बहुविध घडामोडीं बद्दल आपल्याला ईमेल द्वारा सुचना प्राप्त होतील. सदस्यत्व केव्हाही रद्द करता येते.

   आपल्या भेटीने मला आनंद झाला, आपला लोभ असाच कायम रहावा ही विनंती.
   वेबसाईट अधिक चांगली होण्यासाठी आपल्या काही सूचन असल्यास जरुर कळवा , मला ही फार मोठी मदत होईल.

   कळावे,

   आपला

   सुहास गोखले

   0
 3. दिपक चिंतामणी

  सर आपला मेंदू सरासरी 10% च काम करतो पण मेंदूची कार्यक्षमता किती आहे किंवा किती % काम करतो हे आपणांस वैद्यकीय तपासणी न करता जाणून घेऊ शकतो का ? कृपया आपले मार्गदर्शन मिळाले तर मि आभारी राहिल नाहितरी आपण दिलेल्या माहितींमुळे मि आपला आभारी आहेच………. धन्यवाद

  0
  1. सुहास गोखले

   श्री दिपकजी,

   मेंदू किती काम करतो हे ठरवण्याच्या काही पद्धती असतील पण मला त्या बद्दल फारशी माहीती नाही.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.