त्यानंतर नेमके काय घडले ते आम्हाला कोणालाही सांगता येणार नाही,

सगळेच्या सगळे आमच्या सगळ्यांच्या अगदी अब्दुलच्याही स्मृतीतून  कायमचे पुसले गेले आहे.

काही केल्या आता ते आठवत नाही. प्रयत्न करुन ही मला काहीही आठवत नाही, तेव्हाही आणि आजही.

मला शेवट्चे आठवते ते तो समोरचा विंड शिल्ड व्यापुन राहीलेला तो भेसुर भयानक चेहेरा….

 

ला जाग आली ती थंडगार वार्‍याच्या सपकार्‍यामुळे, डोळे उघडले पण आपण कोठे आहोत हेच पहिल्यांदा कळले नाही. डोके जबरदस्त ठणकत होते. दोन्ही हातांनी डोके गच्च दाबून धरले, थोड्या वेळात मी भानावर आलो, लक्षात आले काल आम्ही लॉक केलेल्या गाडीच्या सर्व खिडक्यांचा काचा आता खाली घेतल्या गेल्या होत्या! कोणी? अब्दुल तर माझ्या शेजारीच स्टिअरिंग व्हील वर डोके ठेऊन झोपलेला दिसत होता, मागे वळून बघितले, निरंजन आणि प्रणोतीच्या मध्ये सुधा असे तिघे ही एकमेकांचे हात गच्च पकडून अस्ताव्यस्त पसरलेल्या अवस्थेत निपचित पडले होते. मग खिडक्यांचा काचा कोणी खाली घेतल्या? पाठीच्या मणक्यातून बर्फ सरकला जणू!

बाहेर मिट्ट काळोख होता, दुरवर काही दिवे लुकलुकत होते. गांव ! कोणते? आम्ही नक्की कोठे आहोत?

किती वाजले असतील? माझा फोन कोठे गेला? शर्टच्या खिशातच तर ठेवलेला असतो, पायाखाली काही तरी लागले, फोनच होता, नशीब जोरात पाय पडला नाही, नाहीतर चुराडाच झाला असता, खाली वाकून फोन उचलला, फोन बंद होता, अब्दुलने रात्री फोन पूर्ण बंद ठेवायला सांगीतला होता! फोन चालू केला, पहाटेचे चार वाजायला पाच मिनिटे कमी होती.

मी हळूच अब्दुल ला हाक मारली, अब्दुलची काहीच हालचाल नाही, दोन हाका मारुन ही काहीच हालचाल नाही, शेवटी त्याच्या खांद्याला धरुन हलवले, अब्दुलला जाग आली!

जे माझे झाले तेच अब्दुलचे ! पण गडी बहाद्दर खरा , त्याला भानावर यायला माझ्या पेक्षा कमी वेळ लागला. समोरच्या पाण्याच्या बाटली वर त्याने अक्षरश: झडपच घातली. मिनिट भर शांततेत गेले, अब्दुल आता माझ्याशी काही बोलणार इतक्यात मीच त्याला खुणेने चुप केले आणि गाडीच्या बाहेर पडायला सांगीतले. अगदी अलगद, आवाज न करता दरवाजे उघडून आम्ही दोघेही बाहेर आलो. बाहेरच्या थंडगार वार्‍याने अंग चांगलेच शहारले. माझे सगळे अंग ठणकत होते, हाताच्या, पायाच्या प्रत्येक हालचाली मागे एक असह्य कळ आत खोलवर भिनत होती. अब्दुलचा वेडावाकडा चेहरा पाहून सहज लक्षात येत होते की त्यालाही अगदी असाच त्रास होत असणार. अब्दुलने खिसे चाचपडून विडीचे बंडल काढले, मला ही आत्ता या क्षणाला सिगरेट हवी होती, मी ही माझे खिसे चाचपडायला सुरवात केली पण माझे सिगरेट्चे पाकीट ग्लोव्ह कंपार्ट्मेंट मध्ये होते ते खिशात कसे येणार, मी काय हुडकतो आहे अब्दुलच्या लक्षात आले! अब्दुलने दिलेली विडी पेटवली, एक खोलवर झुरका मारला, काय बरे वाटले म्हणून सांगू! किति दिवसांनी विडी ओढली, पूर्वी  कॉलेजच्या दिवसांत कडकी असताना विड्या ओढत होतो ते आठवले.

“साब , आप खैरियत में तो हो ना”

“हो, मी ठिक आहे, तुला काही त्रास झाला नाही ना”

अब्दुल नुसताच हसला आणि म्हणाला…

“बालबाल बच गये, ये तो सिर्फ अल्लाह की मेहेरबानी समझो नहीं तो हमारा जिंदा बचना नामुमकिन ही था”

“हो खरे आहे “

आमचे हे हलक्या आवाजातले बोलणे चालू होते तोच गाडीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. आम्ही दोघांनी एकदमच दचकून तिकडे पाहीले , निरंजन !

मी निरंजनाच्या खांद्यावर फक्त एक आश्वासक हात ठेवला आणि अब्दुलने हातावर विडी! निरंजनने माझ्याकडे पाहिले. मी खुणेनेच त्याला ‘ओढ काही हरकत नाही’अशी परवानगी दिली, निरंजन सिगारेट ओढतो हे मला माहीती होते आणि हे मला माहीती आहे ते त्याला सुद्धा माहीती होते!

निरंजन ने क्षणभर माझ्याकडे पाहीले आणि हातातली विडी खाली टाकून दिली, शेवटी काही झाले तरी केलेले संस्कार असे वाया जाणार नाहीत! मला निरंजनचे कौतुक वाटले.

“निरंजन , तू ठीक आहेस ना?”

“हो , डॅड , आपण ठीक आहात ना?”

“हो, मला काहीही झाले नाही, थोडेसे अंग दुखतेय आणि डोकेदुखी इतकेच”

“डॅड , मला काहीच कळत नाही.”

“कळणार ही नाही बेटा, पण आत्ता त्यावर नको बोलायला, तू असे कर ..”

मी हे बोलत होतो तोच गाडीतून हालचाल जाणवली, बहुदा सुधाला जाग आली असावी..

मी आणि निरंजन पटकन गाडीत शिरलो, अब्दुल बाहेरच थांबला.

सुधा ला जाग येत होती, ती एकदम घाबरुन ओरडणार होती पण निरंजनने चपळाईने तिच्या तोंडावर हात ठेवला. काही क्षण असेच गेले, मी सुधाला काही बोलू नकोस अशा खाणाखुणा करत असतानाही ती मोठ्याने ओरडलीच..

“हे काय झाले हो?”

या आवाजाने दचकून प्रणोती पण जागी झाली, निरंजन ने चटकन तिला सावरले. तिचा पांढरा फट्ट्क , पिळवटून टाकलेला चेहेरा बघवत नव्हता, हिचे हे काय भूत झाले! भूत! मग काल पाहीले ते काय होते? माझ्या पाठीच्या मणक्यातून एक जबरदस्त कळ आली. डोके दाबत मी समोरच्या ग्लोव्ह कंपार्ट्मेंट वर डोके टेकवले.

सुधा जोरदार श्वास घेत होती त्याचा मोठ्याने होणारा आवाज सोडता सारे कसे शांत होते, काही क्षण असेच शांततेत गेले ..

“पाणी”

सुधाचा आवाज आला, मी मागे वळून पाहीले, तो पर्यंत निरंजन ने पाण्याची बाटली काढायला पायाशी ठेवलेली बॅग खेचली, बाटली बाहेर काढताना, पुजेसाठी घेतलेले तांब्याचे फुलपात्र खसकन बाहेर आले आणि खाली पडले , त्याचा ‘ठण्णं’ एक काहीसा दबलेला आवाज आला.

तो आवाज ऐकताच, इतक्या वेळ समोर एकटक बघत राहीलेली प्रणोती त्या फुलपात्रा कडे बघत ओरडली ..

“देवी मला बाळ देणार आहे , तिची पुजा करायला पाहिजे, तिची ओटी भरायची आहे मला आत्ताच्या आत्ता, काहीही करा मला देवळात घेऊन चला,  निरंजन चल आपण देवळात जाऊ या… प्लिज .. मला देवीची ओटी भरायची आहे, देवी मला बाळ देणार आहे, देवळात जायचे, आत्ता लगेच”

मी चमकलो! हे प्रणोती नाही तर तीची मातृत्वाची ओढ बोलते आहे …

मी काही बोलणार तोच निरंजन म्हणाला

“प्रणोती ठीक आहेस ना?”

सुधा एव्हाना बरीच सावरली होती. ती ही म्हणाली

”प्रणोती , शांत हो”

इतक्यात कसे काय कोण जाणे , विजेचा लोळ पडावा तसे मला लक्षात आले, अरे हो की.. दुरवर गावाचे दिवे दिसत आहेत म्हणजे जास्तीतजास्त अर्धा एक किलोमीटर लांब असेल गाव. आपण गावाच्या अगदी जवळ  पोहोचलो आहोत, ज्याच्यासाठी आलो ते देवीचे देऊळ पण काही फार लांब नसेल आणि अजून सुर्योदय व्हायचा आहे, म्हणजे पंचांगा प्रमाणे अजुनही ‘अष्टमी’ च चालू आहे, अजुनही वेळ गेलेली नाही! सुर्योदयाच्या आत देवीची ओटी भरता येणे अजुनही शक्य आहे!

मला एकदम उत्साह संचारला, मी गाडी बाहेर आलो, अब्दुल दूरवर शून्यात पाहात , विडी फुंकत होता. अब्दुलच्या खांद्यावर हलकाच हात ठेवत मी म्हणालो..

“अब्दुल, एक मदत करशील का? आम्हाला त्या देवळा कडे जायचे आहे, या वेळी देऊळ उघडे असेल तर आम्ही देवीची पूजा करु शकतो. प्लीज, तुला जमेल का? नाहीतर गाडीची चावी दे मी किंवा निरंजन चालवू  गाडी”.

“ऐसा क्यू कहते साहब, मैं जो हुँ ना, मुझे कोई दिक्कत नही, बल्कि आपको उस मंदीर तक पहुँचाना ये तो मेरा फर्ज बनता है, अब्बुने ये जिम्मेवारी मुझ पे सौपी है, वो तो मैं किसि भी हालात में निभाऊँगाही, आप फिक्र मत किजिएगा, वो दिये जो हम देख रहें है वो उसी गाँव के ही है, बैठीये गाडी में, अभी निकलते है, अब जादा देर ना हो जाये”

अब्दुलने गाडीला स्टार्टर मारला. नखा एव्हढे टीचभर गाव, भातकुलीच्या खेळातले असल्यासारखे एक देऊळ लांबूनच दिसले. जवळ जाताच एक जीर्णशीर्ण, लक्तरे झालेली पाटी हेडलाईट च्या उजेडात दिसली “XXXX देवी प्रसन्न” !  हेच ते देऊळ शंकाच नाही…

देवळात पोहोचलो, देवळाचा दरवाजा बंद असेल असे वाटले होते पण या देवळाला मुळात दरवाजाच नव्हता. या असल्या वेळी देवळात कोण असणार? देवी समोरचा रात्री लावून ठेवलेला दिवा अजुनही शांतपणे तेवत होता. सुधा कशीबशी खुरडत खुरडत देवळात आली पण प्रणोती जागची हलू सुद्धा शकत नव्हती शेवटी निरंजन ने तीला उचलून देवळात आणली आणि गाभार्‍यात भिंतीला टेकवून बसवली. त्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात आम्ही देवी समोर पूजा मांडली, बरोबर आणलेले निरांजन पेटवले, उदबत्ती लावली, सुधाने थरथरत हळद कुंकू वाहीले आणि फुलांची वेणी. प्रणोतीला कसेबसे बसते करुन तिच्या हातुन देवीची ओटी भरवून घेतली. प्रणोतीने हौसेने आणलेल्या नाजुकशा बांबुच्या टोपलीत भिजवलेले हरबरे भरुन त्याचा देवीला नैवेद्य दाखवला. सुधा थड बोलू सुद्धा शकत नव्हती, तरीही तीने कापर्‍या आवाजात कशीबशी देवीची आरती म्हणली

‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥‘

आयुष्यात पहिल्यांदा मला देवाची एकही आरती म्हणता येत नसल्याची लाज वाटली.

निरंजन ऐकणार नाही हे माहीती असले तरी सुद्धा मी निरंजनला देवीला साष्टांग नमस्कार घालायला सांगीतले ..आणि आश्चर्य म्हणजे १००%  नास्तीक अशी किर्ती असलेल्या आमच्या निरंजन ने क्षणाचाही विलंब न लावता  देवीला साष्टांग नमस्कार घातला, इतका वेळ हे सारे पाहत , कसेबसे भिंतीला टेकून बसलेल्या प्रणोतीला काय झाले कोणास ठाऊक, अंगात वीज संचारल्या सारखी तीने पण देवी पुढे लोळण घेतली, आणि कोणी सांगायच्या आतच, त्या उपाय सुचवणार्‍या व्यक्तिने सांगीतल्या प्रमाणे, निरंजन आणि प्रणोतीने अक्षरश: देवी पुढे नाक रगडले…

“एक मुल घाल पदरात आई , एक मुल घाल पदरात आई….. एक मुल घाल पदरात आई…एक मुल”

मी आणि सुधा फक्त हात जोडून उभे होते.. आमच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते…

देवळा बाहेर येऊन आम्ही बराच वेळ ओसरीवर सुन्न होऊन बसून राहीलो. आम्हाला आता कधी एकदा चिपळूण गाठतो असे झाले होते. पण आल्या वाटेने परत जाण्यास आम्हीच काय अब्दुल सुद्धा तयार नव्हता. अब्दुल ला तर चक्क ताप भरला होता. माझ्या कडे ‘कॉम्बीफ्लॅम’ च्या गोळ्या होत्या, त्यातली एक अब्दुल ला दिली, मी ही एक घेतली, निरंजन नको म्हणाला. मला एक कड्ड्क कॉफी पाहीजे होती, अगदी लग्गेच, अर्जंट पण ह्या टिचभर गावात, ते सुद्धा इतक्या भल्या पहाटे काय मिळणार!

एव्हाना दिवस उजाडला होता, सारे कसे लख्ख दिसायला लागले, दोन चार गावकरी झाड्याला निघालेले,  ते जवळ येऊन चौकशा करु लागले. त्यांना चिपळूणास जायचा मार्ग कोणता ते विचारले..

“का? येताना कसे आला होता” ……… कोकणीं तिरकस पणा!

मी आम्ही ज्या बाजुने आलो तिकडे हात केला.

“म्हणजे वडाच्या माळावरुनच, रात्रीचे आलात वाटते? बहाद्दर हो तुम्ही, मग आता त्याच वाटेने वापस जा की, दिवसा तिथे काsssय त्रास नाsssय ”

बापरे, म्हणजे गावकर्‍यांना ह्या असल्या प्रकारा बद्दल कल्पना होती म्हणायचे!

“नाही तो रस्ता नको, दुसरी कडून जाता येईल का”

एकाने दुसरा रस्ता सुचवला ..

“फार लांबचा वळसा पडेल, रस्ता पण एकदम उखडलेला आहे, दोन घंटे जास्त लागतील , कशाला त्रास घेता , त्यापेक्षा माळा वरुनच जा ना, एव्हढे घाबरायला काल माळावर काही झाले का? ”

आता याला काय आणि किती म्हणून सांगायचे !

बराच लांबचा वळसा पडला, आम्ही चिपळूणास पोहोचलो तेव्हा उन्हें डोक्यावर येत होती.

…..

…..

…..

 

“गोखले , बराच उशीर झालाय, आता आजची रात्र आमच्याकडेच मुक्काम करा, उद्या सकाळच्या एशीयाड ने जा नाशिकला”

“नाही, नको,  आता लगेच निघालो तर ‘मिरज- नाशिक’ रातराणी मिळेल मला, ती नाहीतर  पुणे –कळवण लाल डब्बा आहेच, मला चालतो”

“कशाला इतक्या रात्रीचे जाता?”

“का, त्याला काय होतेय आणि घाबरायला या मार्गावर ‘वडाचा माळ’ थोडाच आहे?”

मी, सुधाकरजी, आणि निरंजन , तिघेही एकदम हसलो!

समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

17 प्रतिक्रिया

///////////////
 1. आन्नासाहेब गलांडे

  छान लेखमाला
  वाचनसुख दिलेत
  खुप आभार.

  0
 2. मीनाक्षी पुराणिक

  खूपच उत्कंठावर्धक​ व सुंदर लेखमाला​. आयुष्यात घडलेल्या
  अतर्क्य गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारी लेखमाला.
  धन्यवाद.

  +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद मिनाक्षीताई,

   मी स्वत: याच प्रकाराचा अनुभव घेतला तो ही कोथरुड पुणे परिसरात , त्यावर मी एक लहान लेखमाला लिहली होती ‘काहीसे अमानवी’ ती आपण जरुर वाचावी.

   आपण लांबी, रुंदी, खोली अशा त्रिमितीय वास्तवात जगतो, आईंस्टाइन ने वेळ / टाइम ही चौथी मिती आहे असे सांगीतले त्याचाही पडताळा येते, आध्यात्म्य , परामानस शास्त्र या क्षेत्रतले अभ्यासक ह्या चार मितीं पेक्षा जास्त मितीं आस्तित्वात आहेत असे प्रतिपादन करतात, या मितीचा अनुभव आपण घेऊ शकत नाही कारण त्याला लागणारी ज्ञानेंद्रियें आपल्याकडे नाहीत, मात्र काही विषीष्ट बाबीं एकत्र जुळून आल्या तर मात्र आपल्याला ह्या मितींचा अनुभव येतो , जसा मला आला होता. सुधाकर आणि कुटुबियांना आला होता.

   या विषयावर मी बरेच वाचले आहेत , बर्‍याच लोकांचे अनुभव ऐकले आहेत , जसा वेळ मिळेल तसे ते आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेन.

   सुहास गोखले

   0
 3. pramod

  अनुभव खुपच छान मांड्ला आहे तुम्ही, आम्हाला शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद सर,

  0
 4. मिलिंद गायकवाड

  मस्त लेखन मज्जा आली — बाकी ते काहीसे अमानवी ची लिंक द्या –सापडत नाहीये –आपलाच भोला मिलिंद

  0
  1. सुहास गोखले

   श्री. मिलिंदजी,
   धन्यवाद

   ‘काहीसे अमानवी’ चे पहीले दोन लेख फेब्रुवारी २०१६ आणि तिसरा लेख मार्च २०१६ मध्ये प्रकाशीत केले आहेत., वेबसाईट वर जाऊन ‘अनुक्रमणिका’ नावाचे पेज उघडा त्यात फेब्रु २०१६ आणि मार्च २०१६ च्या इंडेक्स वर क्लिक केलेतर तर त्या लेखांची नावे दिसतील, त्यावर क्लिक केले की तो लेख आपल्याला वाचायला मिळेल.

   सुहास गोखले

   0
 5. मीनाक्षी पुराणिक

  खूपच उत्कंठावर्धक​ व सुंदर लेखमाला​. आयुष्यात घडलेल्या
  अतर्क्य गोष्टीवर विश्वास ठेवण्यास भाग पाडणारी लेखमाला.
  धन्यवाद.

  0
 6. संतोष

  सुहासजी,

  फारच उत्कंठावर्धक लेखमाला आहे, एकदम खिळवून ठेवणारी.

  तुमची लेखनाची गाडी एकदम सुसाट सुटली आहे, आता अजून एक नवीन लेख येऊ द्या.

  संतोष सुसवीरकर

  0
 7. Anant

  Solid !
  Speechless. Great story telling skill and ability to describe that experience close to reality.

  0
  1. सुहास गोखले

   श्री. अनंतजी,

   अभिप्राया बद्दल धन्यवाद. खरेतर भुताचे (किंवा ते जे काही होते त्याचे) दर्शन पाचव्या भागात होते आणि सहावा भाग हा जरा वेगळा लिहला होता, मातृत्वाची ओढ या अंगाने , मी हा भाग लिहायला फार वेळ घेतला होता, माझ्या काही उत्तम लिखाणातला एक ठरेल असा हा सहावा भाग होता पण मजा म्हणजे ह्या सहाव्या भागा ला उद्देशून फार कमी कॉमेंट्स मिळाल्या , मला आश्चर्य वाटले ! ती देवी कोठे आहे हे मला माहीती आहे , वाटले होते ही स्टोरी वाचल्यानंतर त्या देवीचा पता सांगा अशा विचारणां होतील पण अक्षरश: एकही विचारणा झाली नाही!!

   कोणता सिनेमा हीट होईल याचा अंदाज बांधणे जसे अशक्य आहे तसेच हे असावे, लोकांना नेमके काय आवडेल हे सांगता येत नाही. मला जे चांगले वाटते किंवा जे लिहताना मी माझे सारे लेखन कौशल्य वापरले होते ते हीट झाले नाही आणि जे मी काहीतरी लिहायचे म्हणून लिहले त्याला भरभरुन प्रतिसाद ?

   सुहास गोखले

   0
 8. koushal

  This was a nice story and it felt like really straight out of own experience. No one else can believe it unless experience it….
  Does really going to that temple gives child to the childless couple?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री. कौशलजी,

   देवळात गेल्याने किंवा एखादा उपाय तोडगा केल्याने संतती होणार नाही , मग नेमके होते काय? हे एक प्रकारचे अ‍ॅटॉ सजेशन असते… “मी हा उपाय केला / देवीची ओती भरली … आता मला संततई प्राप्ती होणार …” ह्या अ‍ॅटो सजेशन मुळे मनाची शक्ती वाढते .. शरीरात खास करुन हार्मोंस मध्ये बदल घडतात आणि बहुदा त्यामुळे हार्मोंस ची कमतरता दूर होते व गर्भधारणा सुकर होते. इथे एक लक्षात घेतले पाहीजे त्या जोडप्याच्या दृष्टीने बाकी सर्व अनूकुल असण्याची गरज असते, मोठी शारीरीक उणीव असली तर (नवरा इंपोटंट असणे, स्त्रीस गर्भाशयाच्या मोठ्या समस्या असेल इ.) या अ‍ॅटो सजेशन चा काही एक उपयोग होणार नाही, थोडक्यात हे उपाय ग्रेस मार्कस आहेत, जर ३७ मार्क असतील तर जादाचे ३ मार्क्स देऊन पास करता येते पण ज्याला भोपळाच मिळाला आहे त्याला ४० मार्क्स देऊन पास करता येत नाही, हे पण लक्षात ठेवायला हवे.

   उपाय -तोडग्यांचा विषय मोठा आहे या बद्दल मी माझा वेबसाईट वर अनेक वेळा लिहले आहे ते एकदा डॉळ्याखालून घालावे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.