काही क्षणात आम्हाला सगळ्यांना अब्दुलने गाडी का थांबवली ते कळले, समोर हेड लाईट्स च्या प्रखर झोतात . हो, अगदी रस्त्याच्या मधोमध गाडी समोर दोन्ही हात पसरुन चक्क….

आमचे व्याही , म्हणजेच निरंजनचे सासरे, म्हणजेच प्रणोतीचे वडील, मनोहर पंत उभे होते!

काय होते ते कळायच्या आत प्रणोती किंचाळली ..“बाबा ? तुम्ही इथे कसे?”

प्रणोती बोलली!  घात झाला, कोणाला काय झाले हे कळायच्या आतच ते सगळे सुरु झाले…

प्रणोती पाठोपाठ निरंजनाचा आवाज ही आला

“बाबा?”

आता मला नक्की सांगता येणार नाही या दोघां पैकी पहिल्यांदा कोण बोलले ..

मला वाट्ते  त्याच वेळी अब्दुल कपाळावर हात मारुन घेत, बोलू नका , बोलू नका अशा अर्थाच्या खुणा करत असावा पण तो पर्यंत प्रणोती, निरंजन आणि पाठोपाठ सुधा ने फोडलेली किंकाळी पण कानावर आदळली खरे तर मी ही त्या पाठोपाठच ओरडणार होतो पण माझा ताणलेला जबडा तसाच आ वासुन राहीला..

दुसर्‍या क्षणी मनोहरपंत जसे आकस्मिक समोर आले तसेच ते क्षणात आमच्या डोळ्यासमोरुन विरुन गेले! त्याच क्षणी गाडी स्टॉल झाली, हे होणारच होते, ज्या तर्‍हेने ब्रेक मारला होता ते पाहता हे होणारच होते.

पण काही कळायच्या आत गाडी परत सुरु झाली आणि मला नक्की आठवतेय अब्दुल ने चावी फिरवलीच नव्हती, त्याचे दोन्ही हात स्टीअरिंग व्हील वरच थिजलेले होते. गाडी प्रचंड वेगाने पुढे जाऊ लागली, मी घाबरुन जोरात ओरडलो…

“अब्दुल”

पण अब्दुल वर त्याचा काहीच परिणाम झाला नाही, तो अजुनही थिजल्यासारखा समोर बघत होता, गाडीचा वेग सेकंदा सेकंदाला वाढत होता. त्याही अवस्थेत मला जाणवले ही गाडीच नव्हे जगातली कोणतीही गाडी इतक्या स्पीड ने कधीच जाऊ शकणार नाही. गाडी पुढे जात होती म्हणण्या पेक्षा ढकलली जात होती असेच म्हणावे लागेल. कोणीतरी गाडी ढकलत होते का? कोण?

मी चमकून मागे वळून पाहीले मात्र आणि भितीने माझी बोबडी वळली ..

ते जे काही होते ते नेमके काय होते याचे शब्दात वर्णन करणे अशक्य होते, हा अनुभवच असतो आणि तो घेतल्या शिवाय समजणारच नाही. ते जे काही होते त्याचा आकार , रंग , रचना आपल्या पृथ्वीतलावरच्या कोणत्याही रंग , आकार आणि रचने पेक्षा वेगळे होते हे नक्की…

स्त्री! ती नक्की स्त्रीच होती का आणखी काय कोणास ठाऊक? कारण मागे ‘ते’ जे काही होते त्याचा आकार क्षणाक्षणाला बदलत होता, मी पहील्यांदा पाहीले तेव्हा एखाद्या बाई चा चेहेरा होता, दुसर्‍या क्षणी तो आकार धुराचा अक्राळविक्राळ लोट यावा तसा दिसत होता.. पुन्हा चित्र बदलले आता एखाद्या मोठ्या भोपळ्याला हजार भोके असावीत आणि त्यातून एकाच वेळी काळ्या , करड्या, मातकट रंगांच्या किळसवाण्या चिळकांड्या उडताहेत असे काहीसे दिसायला लागले. .पुन्हा एक स्त्री…   स्त्री-पुरुष, नर – मादी असा भेद प्राणीमात्रांत असतो ना? ‘ते’ जे काही होत ते गाडीच्या मागे पळत होते, भयंकर होते ते…आपली नेहमीच्या लांबी-रुंदी-उंची च्या परिमाणांच्या पलीकडले होते ते… ते भयंकर मुंडके आता गाडीच्या मागच्या काचेला जवळजवळ चिकटले..

अंगातले सर्व बळ एकवटून मी ओरडलो

“‘अब्दुल गाडीच्या मागे एक बाई…”

अब्दुलला ऐकायला आले का नाही ? बहुदा नाहीच कारण त्याच्यावर माझ्या हाकेचा काहीचा परिणाम झालेला दिसत नव्हता.. मी दुसर्‍यांना हाक मरणार इतक्यात काळीज विदिर्ण करणारी प्रणोतीची किंकाळी पाठापाठ सुधाची पण..

निरंजन मागे वळून पाहात होता, मी काहीतरी ओरडतोय असे त्याला जाणवले असावे कारण मान फिरवून त्याने माझ्याकडे बघितले अगदी माझ्या नजरे समोर त्याचा चेहरा वेडावाकडा झाला, मला वाटले आता हा पण भेसुर किंकाळी फोडणार पण त्याचे फक्त ओठच हलले आवाज आलाच नाही, एखाद विजेचा धक्क बसावा तशी माझी मान खटकन फिरली , तो भेसुर चेहेरा आता गाडीच्या पुढे होता, जसे आधी मनोहरपंत दिसले होते तशी ती ऊभी होती.. या खेपेला अब्दुलने ब्रेक मारला नाही, त्याला बहुदा ते सुचलेच नसेल, त्याची नजर समोर खिळली होती पाय अ‍ॅक्सेलेटर वर आणि स्टिअरींग गच्च पकडलेले. गाडी चक्क त्या ‘बाई’ च्या शरीरातून आरपार गेली पण ती  पुन्हा गाडीच्या समोर..

“डॅड , ती मागे पण आहे आणि पुढे पण आहे!” निरंजन चा आवाज , हे निरंजन आत्ता बोलला का मघाशीचा आवाज मला आत्ता ऐकू आला कोण जाणे, घटना अशा वेगात घडत होत्या की कोणती आधी कोणती हे आजही नक्की सांगता येणार नाही.

मी पुन्हा मागे वळून पाहीले, खरेच तीच बाई आता मागे पण होती, दाणदाण पावले टाकत ती गाडीच्या मागे धावत होती, पुन्हा चटकन समोर पाहीले तर तीच बाई गाडीच्या समोर हात पसरुन उभी पण गाडी जशी पुढे जात होती तशी ती मागे मागे सरकत होती. मी गरागरा मान फिरवत होती, हो, ती बाई एकाच वेळी दोन्ही बाजूला होती, गाडीच्या पुढे आणि त्याच वेळी गाडीच्या मागे पण.

दुसर्‍या क्षणाला माझ्या लक्षात आले की ती बाई गाडीच्या उजव्या आणि डाव्या बाजुला पण दिसत होती.  कदाचित आमची गाडी तिच्या भोवती फिरत होती का ? ती एकाच वेळी आमच्या चारीही बाजूंना अक्षरश: घोंगावत होती, तो हिडिस चेहेरा गाडीच्या काचांना चिकटायचा आणि क्षणात एखादे रबर ताणावे तसा गाडी पासुन दूर जायचा. ऑक्टोपसचे वळवळणारे आठ पाय असतात तसला आकार असलेले काहीतरी गलिच्छ ,  लांबसडक आमच्या गाडी भोवती गुंडाळले जात होते.

गाडीच्या सर्व काचां वर धाड धाड असे कसले तरी प्रहार होत होते, गाडी गदागदा हलत होती. प्रणोती आणि सुधा अक्षरश: लोळागोळा होऊन वेडावाकड्या पसरल्या होत्या तर निरंजन जबडा आ वासुन फक्त समोर बघत होता. थोड्याफार जाणीवा शिल्लक असलेला फक्त मीच एकटा असावा कारण अब्दुल एखादा पुतळा बसवावा तसा काटकोनात बसला होता आणि त्याचे पाय अंधातरी लटकत होते.

पुढच्याच क्षणी एक जोरदार हादरा बसला, हादरा कसला , चालती गाडी कोणीतरी पाशवी ताकदीने वर उचलून परत रस्त्यावर आदळली असावी आणि गाडी बंद पडली,  मी अब्दुलकडे पाहीले, त्याचा हात इग्निशन की कडे वळलेला मी पाहीला पण त्याच्या आधीच गाडी सुरु सुद्धा झाली , इग्निशन न देताच गाडी सुरु झाली.. नाही मघाशी मी म्हणालो तसे घटनांचा क्रम उलट्पालट असा माझ्या मेंदुत नोंदवला गेला असणार नाहीतर असे उलटे कसे होईल? अब्दुल ने पहिल्यांदा इग्नीशन की फिरवली असणार आणि मगच गाडी सुरु झाली असणार, हो, असेच असले पाहीजे. पण मग अब्दुलचे हात वरच्या दिशेन जात गाडीच्या छताला वर चिकटलेले पण दिसले, मग चावी कोणी फिरवली हा प्रश्न उरतोच ना? आणि मुळात अब्दुलचे हात असे गाडीच्या छ्ताला चिकटलेच कसे , मला नक्कीच भास झाला असेल, का अब्दुलला चार हात होते?

क्षणभरात हे सगळे सगळे थांबले आणि दुसर्‍याच क्षणी गाडीत कमालीचा गारवा पसरला, गारवा हा कदाचित फार किरकोळ शब्द होईल, ‘रक्त गोठवून टाकणारी जीवघेणी थंडी’ असे वर्णन करतात ना तसे काही होते. हे होते न  होते तोच एक कमालीची जिवघेणी अगदी काळीज पिळवटून टाकणारी दीर्घ, आसुरी, हिडीस किंकाळी हवेत घुमली. गाडीच्या टपावर प्रचंड वेगात काही तरी पडले असे वाटले, कसले तरी अगम्य आणि विचित्र आवाज करत गाडी आचके देत बंद पडली ..

पण कसे कोणास ठाऊक अब्दुलचा हात यंत्रवत स्टार्टर कडे गेला, किल्ली देताच गाडी सुरु झाली आणि अभूतपूर्व वेगाने, अगदी १५० च्या स्पीड ने असेल कदाचित पुढे झेपावली… माझ्या डोळ्या समोर काजवे चमकले,आता मोठा अ‍ॅक्सिडेट होणार म्हणून मी डोळे बंद केले. पण तसे काहीच झाले नाही, गाडीचा स्पीड जसा वाढला तसाच कमी पण झाला. गाडी आता धावते म्हणण्या पेक्षा दरादरा ओढली जातेय असे वाटत होते.

नंतर काय झाले कोणास ठाऊक, अब्दुल ने गाडी थांबवली का गाडी आपोआपच बंद पडली सांगणे अशक्य आहे, कारण त्यानंतर नेमके काय घडले ते आम्हाला कोणालाही सांगता येणार नाही, सगळेच्या सगळे आमच्या सगळ्यांच्या अगदी अब्दुलच्याही स्मृतीतून  कायमचे पुसले गेले आहे. काही केल्या आता ते आठवत नाही. प्रयत्न करुन ही मला काहीही आठवत नाही, तेव्हाही आणि आजही.

मला शेवटचा आठवतो तो समोरची विंड शिल्ड व्यापुन राहीलेला तो भेसुर भयानक चेहेरा….


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.