सुधाने उपास तपास म्हणू नका , उपाय-तोडगे म्हणू नका करायचे काही एक शिल्लक ठेवले नव्हते, दहा-बारा ज्योतिषांचे उंबरठे झिजवून झाले,
कोणी सांगेल तो कसलाही उपाय करायचा सपाटा सुरु होता,
डोळ्यातून आसवे निघाली नाहीत असा एकही दिवस गेला नसेल. इकडे निरंजन आणि प्रणोतीचा पण धीर खचत चालला होता.
आमची इतकी खेळकर आणि हसतमुख प्रणोती पण पार कोमेजुन गेली, चेहेर्यावरची रयाच गेली तिच्या, निरंजनची ही चिडचीड वाढली होती.
आणि अचानक एके दिवशी ….
कोणाच्या तरी बोलण्यातून त्या ‘YYY’ गावच्या ‘XXXX’ देवी बद्दल कळले, अष्टमीला त्या देवीची पूजा करुन, बांबुच्या टोपलीत भिजवलेल्या हरबर्याचा नैवैद्य दाखवून, तिची हिरव्या साडी ने ओटी भरुन, नवरा-बायको जोडीने शब्दश: म्हणजे अगदी शब्दश: नाक रगडून संतती साठी साकडे घालायचे , बघा वर्षाच्या आत पाळणा हलेल घरात…
माझा ह्या असल्या गोष्टीं वर कधीच विश्वास नव्हता, निरंजन तर पक्का नास्तिक, म्हणजे तेव्हा होता आता नाही! तो नेहमी या सगळ्या व्रत वैकल्यांची, उपाय तोडग्यांची चेष्टाच करत आला होता, आता करत नाही!
कालनिर्णयचे फडफडणारे पान सांगत होते, पुढच्या आठा दिवसातच ‘अष्टमी ’आहे ! झाले, सासु सुनेत कसला उत्साह संचारला कोण जाणे, जोरात तयारी सुरु झाली. पुजा साहीत्य , भरजरी हिरवी साडी आणि बांबूची टोपली, सगळी खरेदी पण झाली ! मग आमचा म्हणजे माझा आणि निरंजन चा ही नाईलाज झाला. इतके सगळे केले तसेच आता हे पण करुन बघू !
जायची तयारी सुरु झाली खरी पण हे ‘YYY’ गाव आहे कोठे ? मी मुळचा गुहागरचा तरी मला हे गाव कोठे आहे हे माहीती नव्हते इतकेच काय ह्या नावाचे एखादे गाव आहे हे सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकत होतो. खूप चौकशी केली कोणालाच माहीती नव्हते, ज्याने हा उपाय सुचवला त्यालाही काही माहीती नव्हते, आमच्या आय.टी. वाल्या निरंजन च्या काय ते ‘गुगल बाबा’ का काय म्हणता ना त्याने पण हात टेकले ! शेवटी बरीच धडपड केल्या नंतर ‘चिपळूण – गुहागर रस्त्यावर एक फाटा आहे , तिथून पुढे तीस एक मैलावर कोठेतरी खबदाडीत आहे हे गाव’ असे आणि इतकेच कळले.
आमच्या ओळखीच्या गॅरेजवाल्याने एक ड्रायव्हर गाठून दिला, युसुफ, तो चिपळूणचाच, त्याला तो भाग चांगला माहीती होता म्हणून , पण हे गाव त्यालाही माहीती नव्हते, पण तो म्हणाला ..
“कोई बात नहीं, चिपलून तक हम ऐसे ही जा सकते हैं, वहाँ से आगे पुछते पुछते जायेंगे, ढूँढ निकालेंगे, मिलेगा वो गाँव उसमें क्या बडी चीज”
ठरले!
सकाळी सकाळीच आम्ही निघालो , आम्ही म्हणजे मी, सुधा, निरंजन , प्रणोती आणि युसुफ ड्रायव्हर !
पनवेल कधी आले ते कळले सुद्धा नाही.. वा, सुरवात तर चांगली झाली , म्हणजे वेळेत पोहोचणार तर , आम्हाला देवीची ओटी भरुन लगेच परत फिरायचे होते , रात्री कितीही उशीर झाला तरी मुंबईत परत यायचे होते. कारण निरंजन , प्रणोतीला कशीबशी एक दिवसाची रजा मिळाली होती. त्यामुळे वेळेत पोचणे, वेळेत माघारी निघणे गरजेचे होते. ………. पण असे होणार नव्हते !
पनवेल च्या पुढे येतो न येतो तोच गाडीने त्रास द्यायला सुरवात केली, सुरवातच पंक्चरने झाली…
पंक्चर काढण्यात बराच वेळ गेला, तिथुन जरा पुढे येतो, तो गाडी आचके देत बंद पडली, युसुफ ने काहीतरी खाटखुट करुन गाडी चालू केली काही अंतर काटले आणि गाडी बंद पडली , असे दोन तीनदा झाले…
“युसुफ, जरा बर्या पैकी गॅरेज बघू आणि काय असेल ते एकदाच ठाकठीक करुन घेऊ ”
“जी नहीं, ये हाय वे वाले गॅरेजोंका कुछ भरोसा नहीं, वैसे तो चिपलुन जादा दूर नहीं, ऐसे धक्क्का मार मार के पहुँचेंगे वहाँ तक, एक बार चिपलुन आन दो , बस्स’
“अरे पण आपल्याला तिथुनही पुढे जायचय गुहागरच्या बाजूला, धड रस्ताही माहीती नाही”
“साब, कोई फिक्र नहीं, चिपलुन में मेरे चाचा उस्मान भाई का खुद का बडा गॅरेज है, हमारी सारी परेशानियाँ बस वहीं खत्म होगी, मैंने अभी उनसे बात की है, बस्स किसि भी हालात में हमें चिपलुन पहुँचना हैं”
अक्षरश: दर पंचवीस – पन्नास किलोमिटर ला गाडीला काहीतरी व्हायचेच , गाडी ढकलून ढकलून आमचे म्हणजे माझे आणि निरंजनचे खांदे भरुन आले. तो युसुफ तरी काय करणार बिचारा !
गाडी चिपळूणास उस्मान भाईंच्या गॅरेज समोर कशीबशी रडत खडत पोहोचली तेव्हा पर्यंत दुपारचे चार वाजले होते.
“उस्मान चाचा”
“युसुफमियाँ ! शुकर है आप आ यहाँ तक आ पाये .. मैं भी कितना परेशाँ था , वो देख हमारा सुभान्या आपकी मदत के लिए अभी निकलने वालाही था..”
“चाचा जान , वैसे तो गुहागर जा रहे है , लेकीन देखो तो, सुबहसे काफी परेशान कर रख्खा ईस कंबख्त गाडी ने , चिपलून तक कैसा पहुँचा खुदा जाने”
“तू फिक्र मत कर, मै देखता हूँ , लगता है , आपके साथ और भी कोई है? “
“जी, चाचा जान , आप है, सुधाकरजी और साथ में आपकी फॅमीली”
माझ्या कडे वळुन उस्मान भाई अत्यंत आदबीने म्हणाले…
“आईये जनाब , आईये भाईसाब, आईये माताजी, आईये बहेनजी आप भी अंदर तश्रिफ रखिये”
“ओ अब्दुल, जरा अम्मीजान को बता दे हमारे मुंबई के मेहेमान पधारे हैं”
उस्मानभाईंनी आणि शेहेनाझ बी (उस्मान भाईंची बीबी) नी आदरातिथ्यात कोणतीच कसूर सोडली नाही. कोठले कोण आम्ही पण अगत्य असे की त्यांचा सख्खा भाऊच बर्याच वर्षांनी भेटतोय.
सकाळ पासुन भुकेजलेले आम्ही शेहेनाझ बी ने केलेल्या पदार्थांवर ताव मारत होतो तर तिकडे आमच्या कारचे बॉनेट उघडून उस्मान भाई, त्यांचा मुलगा अब्दुल आणि हेल्पर सुभान्या रिपेरी करत होते.
बघता बघता घड्याळाचा काटा साता कडे झुकला! माझी अस्वस्थता वाढली …
“उस्मान भाई काही मेजर प्रॉब्लेम दिसतोय”
“हां, वैसा ही कुछ लगता है, लेकिन हो गया समझो.. सुभान्या मार बे स्टार्टर”
पण आमचे दुर्दैव, गाडी हीव भरल्या सारखी काही काळ थरथरायची आणि पुन्हा आचके देत बंद पडायची.
उस्मान भाईंनी पुन्हा इंजिनात डोके खुपसले…
एव्हाना रात्रीचे आठ वाजले.. आमची काळजी वाढत चालली, इतक्यात घाम पुसत उस्मान चाचा आत आले..
“मुआफी सुधाकरजी, गाडी को ठीक होने मै और जादा वख्त लगेगा”
“किती?”
“कुछ बता नहीं सकता”
“अरे बापरे आता कसे करायचे?”
“परेशानी की कोई बात नहीं , हो जायेगा काम आपका , तबतक आप सब आराम फर्माईयेगा, युसुफ बोल रहा था आप गुहागर जा रहे हो?”
“नाही गुहागर च्या अलिकडे जरासे”
“कहाँ?”
मी ‘त्या’ गावचे नाव सांगीतले..
उस्मान भाई माझ्या कडे रोखून बघत राहीले,
का कोणास ठाउक मला त्यांचे ते पाहणे विचित्र वाटले.
मी म्हणालो,
“काय झाले?”
“अगर मैंने ठीक तराहसे सुना है तो आपने ‘YYY’ कहाँ ना?”
“हो, तिथेच जायचेय, आपल्याला माहीती आहे हे गाव कोठे आहे , कसे जायचे?”
‘जी , बिल्कूल , हम उस जगाँ से काफी अच्छी तरहा से वाकिब हैं”
हे बोलताना उस्मान भाईंनी ‘काफी अच्छी ‘ या शब्दांवर दिलेला जोर तेव्हा माझ्या लक्षात आला नव्हता… नंतर सगळाच खुलासा झाला म्हणा !
उस्मान भाई काहीशा काळजीच्या स्वरात म्हणाले …
“क्या आपको वहाँ आजही जाना जरुरी हैं?”
“हो”
“कल नहीं हो सकता?”
“उद्या कसे चालेल, आज अष्ट्मी आहे , आजच त्या गावातल्या xxxx देवीची ओटी भरायची असते”
“वो तो ठीक है , मगर मुझे तो ये नामुमकीन लग रहा है”
“असे कसे , आज गेलेच पाहीजे, बाकी आमचे गावात काही काम नाही, फक्त देवळात जाणार, देवीची ओटी भरणार, थोडा वेळ थांबून लगेच परत फिरणार, सगळे सुरळीत झाले असते तर आम्ही एव्हाना मुंबईच्या निम्म्या वाटेवर असतो”
क्षणभर विचार करत उस्मान भाईं म्हणाले…
“गुस्ताफी मुआफ लेकिन काफी वख्त निकल चुका है, मेरा केहेना मानो, आज वहाँ ना जाते तो अच्छा”
“नाही, आजचाच दिवस असतो या कामाला…”
“ठीक है, जैसी आपकी मर्जी, अगर आप इतनीही जिद करते हो तो मै आपके लिये कुछ कर सकता हूँ”
“काय”
“मै आपके लिए दुसरी अच्छी वाली गाडी का इंतेजाम कर सकता हूँ, इस वख्त मेरे हाथ में बस इतनाही है”
“अहो पण”
“आप आरामसे वहाँ जाकर अपना काम करियेगा और वापस यहाँ पधारे, तबतक आपकी गाडी भी दुरुस्त होगी, बोलो मंजूर ?”
आम्हीही विचार केला, आजचा ‘अष्टमी चा मुहुर्त तर चुकवायचा नसेल तर उस्मान भाई म्हणतात तसेच केले पाहीजे, कारण उद्या देवीची ओटी भरुन चालणार नव्हते आणि पुढची अष्टमी मिळणार नव्हती , निरंजन आणि प्रणोती अगदी लगेचच ऑन साईट प्रोजेक्ट वर यु.के. ला जाणार होते, म्हणजे आज नाही जमले पुढचे सहा एक महीने तरी नक्कीच जमणार नाही, कदाचित वर्ष लागेल.
“ठीक आहे उस्मान भाई , पण आपण आमच्या साठी फार त्रास घेता आहात”
“वो तो मेरा फर्ज है जनाब, और वैसे तो आप मेरे कस्ट्मर नहीं बल्की मेहेमाँ हो! हां , और एक बात केहेना भूल गया , हमारे युसुफमियाँ, सुबह से ड्रायव्हींग करते करते और इस बदतमीज गाडी से लडते लडते काफी थके हुए मालूम पडते है , तो उन्हें यहीं पे थोडा आराम करने दे, मेरा बेटा अब्दुल आपको ले जायेगा”
“ठिक आहे”
“वो देखो, अब्दुल मियाँ , आपके लिए गाडी ले के पधारे”
बाहेर बघितले तर खरेच एक पांढरी शुभ्र , प्रशस्त . रुबाबदार शेव्हर्ले उभी होती…
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
ङोळयापुढे चित्रपट चालू आहे
धन्यवाद श्री. अण्णासाहेब
सुहास गोखले
खूप छान पकड घेतली आहे
धन्यवाद श्री. अविनाशजी
सुहास गोखले