ही एक सत्य घटना आहे, म्हणजे यातला नाशिक-पुणे प्रवासात घडलेला प्रसंग आणि पुढे पुण्यातले पण सर्व प्रसंग १००% सत्य असून मी स्वत: अनुभवलेले आहेत, या कथेतला कोकणातला किस्सा मात्र खरा का खोटा ते मला ठरवता आले नाही, पण सुधाकर काका – काकूंची अवस्था पाहता ती कोकणातली घटना पण खरी असावी असे वाटते. जास्त खोलात जायचे नाही म्हणून कथेतली गावांची नावे मी मुद्दाम देत नाही. मी म्हणतो, गोष्ट खरी का खोटी कशाला ठरवत बसायचे? केवळ मनोरंजन या अंगानेच ही गोष्ट वाचा आणि हो , उगाच घाबरुन जाऊ नका !
२०१० मधला हा प्रसंग आहे, व्यवसायामुळे मला नेहमीच प्रवास करावा लागतो, अशाच एका नाशिक – पुणे प्रवासात श्री. सुधाकरजी माझ्या शेजारच्या सीट वर होते. सुधाकरजी असतील पासष्ठ च्या आसपासचे , मुंबईचे, सचिवालयात नोकरी करुन सेवानिवृत्त झालेले, आधी गिरगाव नंतर काही काळ डोंबिवली आणि सध्या वास्तव्य पुणे. बाकी सुधाकरजी पेन्शनीत सुद्धा रुबाबात होते, एका वरिष्ठ सनदी अधिकार्याच्या तोंडावर अधिकार पदाचा भाव ( का माज!) असतो तो सरकारी नोकरीची झूल उतरल्या नंतरही त्यांचा चेहेर्यावर टिकून होता. त्यात नोकरीत असताना भक्कम पैसा केला (हे त्यांनीच डोळे मिचकावत सांगीतले, आता बोला!) त्याची चांगलीच तकाकी चेहेर्यावर दिसत होती, बाकी देवाने पण पदरात दान भरभरुन टाकले होते, मुलगी व जावई उसगावात (आणखी कोठे?), मुलगा (निरंजन) आणि सुन (प्रणोती) दोघेही आय.टी. वाले, घरात नातवंड (अर्णव) खेळत होते, आणि हे सर्व बघायला उत्तम, खणखणीत तब्बेत आणखी काय हवे?
बस सिन्नर पर्यंत आली, एव्हाना सगळे स्थिरस्थावर झाले होते आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या.
तुम्ही कुठले , आम्ही कुठले अशा चौकशा झाल्या,
बोलता बोलता माझ्या तोंडून श्री क्षेत्र वेळणेश्वराचे नाव निघताच सुधाकरजी खूश झाले …
“अरे वा, वेळणेश्वराचे का तुम्ही, आम्ही गुहागर जवळच्या ‘SSS SSSS’ चे..”
गप्पा रंगल्या आणि कोकणाचा विषय असा न तसा येतच राहीला, आणि कसा काय कोण जाणे माझ्या तोंडून ‘त्या’ गावाचा उल्लेख आला.. माझ्या नकळत का होईना मी एक घोडचूक करुन बसलो! अर्थात हे नंतर लक्षात आले.
“मागे मला एकदा एका गावाचा शोध घेत होतो, बरे गाव इतके टिचभर की कोणालाच ठावे नाही, बरीच शोधाशोध केल्यावर शेवटी गुहागर डेपोतल्या एका एस.टी. ड्रायव्हर ने बरोबर ठावठिकाणा सांगीतला होता , तो ड्रायव्हर तुमच्याच गावचा होता, आत्ता आठवले”
“कोणते गाव हुडकत होता? “
“YYY”
“YYY?”
”हो”
“नक्की”
“हो पण असे का विचारता?”
“’त्या’ गावात तुमचे काय काम होते?”
“त्या गावात ती XXXX देवी आहे ना , तीची हिरव्या साडीची ओटी भरली की…”
माझे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच… सुधाकरजींच्या चेहेर्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. चेहेरा ओढला गेला, डोळ्यांची बुबळे वर सरकली, सगळे अंग थरथरायला लागले, सगळ्या अंगातुन घामाच्या धारा वाहायला लागल्या, मान वाकडी झाली, दातावर दात वाजायला लागले..
ह्यांना असे अचानक काय झाले ? कसला अॅटॅक वगैरे आला की काय..
“सुधाकरजी , काय झाले “
“पाणी , जरा पाणी द्या मला, लौकर..” कसेबसे बळ आणून सुधाकरजी म्हणाले.
सिटच्या बास्केट मध्ये बिसलरी होतीच. एव्हाना आजूबाजूचे दोघे तिघे प्रवासी चौकशी करायला लागले..
“काय झाले हो”
“काही नाही, जरा त्यांना अस्वस्थ वाटतेय”
“हार्ट्चे काही आहे का?”
“ते कसे कळणार, थांबा जरा”
पाणी प्यायल्यावर सुधाकरजींना जराशी हुषारी आली.
“काही नाही , मी ठीक आहे , काही काळजी नाही”
“नाही कसे, संगमनेर येईल आत्ता इतक्यातच,आपण तिथेच एखादा डॉक्टर बघू, मी राहीन तुमच्या बरोबर”
“नाही हो गोखले, मला काहीही झाले नाही, डॉक्टर कडे जायची गरज नाही..”
“का , कशाला रिस्क घेता, ते काही नाही आपण संगमनेर ला उतरुन डॉक्टरांना भेटू”
“मी ठीक आहे, असा त्रास होतो मला अधून मधून, काही करावे लागत नाही, थोडी विश्रांती मिळाली की आपसुकच ठीक होतो”
सुधाकरजींना आता बरीच हुषारी वाटताना दिसत होती.
“ठिक आहे, पण आता बोलू नका , डोळे मिटून स्वस्थ पडून राहा”
“हो, तसेच करतो, गोखले एक काम कराल?”
“काय?”
“गाडी ‘दौलत’ ला थांबेल तेव्हा जरा कडक कॉफी आणून द्याल का , कॉफी घेतली की जरा बरे वाटेल, माझा हा नेहमीचा ऊपाय आहे”
“कॉफीच ना, देईन आणून त्यात काय, पण आता जास्त बोलू नका”
“हो”
‘दौलत’ ची कॉफी घेतल्यावर सुधाकरजी एकदम ठाकठीक झाले पण उगाच पुन्हा त्रास सुरु व्हायला नको म्हणून मीच जास्त बोलणे टाळले.
बस शिवाजीनगर ला पोहोचली.
मी सुधाकरजींना म्हणालो,
“मी तुम्हाला घरा पर्यंत सोडतो”
“अहो कशाला , नका त्रास करुन घेऊ मी एकदम ठीक आहे”
“मी तुम्हाला असे एकट्याने जाऊ देणार नाही. तुम्हाला सुखरुप घरी सोडेन मगच माझ्या कामाचे बघेन”
“नको, कशाला त्रास घेताय “
“मी काहीही ऐकणार नाही’
मी रिक्षाला हात केला….
….
….
….
“तुम्ही होतात म्हणुन बरे झाले” सुधाकर काकू म्हणजे सौ. सुधाताई.
“अहो त्यात काय, माणुसकी म्हणून हे इतके तरी करायला नको?”
“ती माणुसकीच आता औषधाला सुद्धा मिळत नाही आजकाल”
“पण काकू, असे यांना नेहमी होते?”
“….”
सुधाताई काहीच बोलल्या नाहीत.
“काकू , काहीही असो, लौकरात लौकर एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवलेच पाहीजे यांना”
यावर काकू काही बोलणार इतक्यात सुधाकरजी म्हणाले..
“अग काही नाही, आमच्या गप्पा चालल्या होत्या , हे पण वेळणेश्वराचेच बरे का, असेच बोलता बोलता त्या XXXX देवी चा विषय निघाला … तुला माहीती आहेच पुढे काय झाले असेल ते…”
सुधाकरजींचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत सुधाताईंना पण अगदी तसाच त्रास सुरु झाला …
चेहेर्यावरचे भाव क्षणार्धात बदलले. चेहेरा ओढला गेला, डोळ्यांची बुबळे वर सरकली, सगळे अंग थरथरायला लागले, सगळ्या अंगातुन घामाच्या धारा वाहायला लागल्या, मान वाकडी झाली, दातावर दात वाजायला लागले..
…
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
मस्त.. काही तरी वेगळा अनूभव वाचायला मिळणार!!
धन्यवाद श्री. भालचंद्रजी,
पुढचे सर्व भाग तैयार आहेत , एका पाठोपाठ प्रकाशीत करत आहे, खूप उत्कंठावर्धक आहे ही गोष्ट
सुहास गोखले
आम्ही अश्याच काही अनुभवांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक होतो, त्यामानाने हा भाग फारच लवकर संपला, please उत्कंठा वाढलीये, कृपया पुढचे भाग लवकरात लवकर टाका,
धन्यवाद श्री, ओमकारजी,
पुढचे सर्व भाग तैयार आहेत , पण कथा बरीच मोठी आहे त्यामुळे तुकड्या तुकड्यात द्यावी लागत आहे
सुहास गोखले
chaan…. navin kahitari…
maage aapnan swatacha anubhav sangitala hota trimitibaddal….tyachi aathvan zali..
Pramod
धन्यवाद श्री. प्रमोदजी,
हा अनुभव पण तसाच काही तरी आहे , पुढचे भाग वाचा ,
सुहास गोखले
Interesting
धन्यवाद श्री.अविनाशजी,
सुहास गोखले
मस्तच लिहाता तुम्ही. तो प्रसंग जगल्या सारखा वाटतो वाचताना.
धन्यवाद स्मृतीजी
सुहास गोखले
किती वाट पहावी लागणार..
श्री. अंकुशजी,
उद्या दुसरा भाग , परवा तिसरा भाग असे आहे.
सुहास गोखले
Now you are talking 🙂
धन्यवाद श्री हिमांशुजी
सुहास गोखले
श्री. सुहासजी,
आपलं लेखनकौशल्ल्य कमाल आहे.
कथेचं सादरीकरण अप्रतिम..
पुढील भागांची आतुरतेने वाट बघत आहोत.
धन्यवाद श्री. राहुलजी,
पुढचे सर्व भाग पूर्ण लिहून तयार आहेत्त, सगळे भाग पूर्ण आहेत याची दोन दोनदा खात्री करुन घेऊनच पहीला भाग प्रकाशीत केला आहे तेव्हा या खेपेला वाट पहायला लागणार नाही.
सुहास गोखले
उत्कंठावर्धक ।
एवढच म्हनतो।
धन्यवाद श्री आण्णासाहेब
सुहास गोखले