बकुळाबाईंशी विवाह / मामांचे मृत्यूपत्र या फंदात न पडता आपण डायरेक्ट संग्राम/ बकुळाबाईंना काही मिळणार आहे का ते तपसणे जास्त सोपे आहे. शेवटी संग़्रामला मालमत्ता ( किंवा त्यातला काही हिस्स) मिळणार का नाही याचे हो / नाही असेच उत्तर द्यायचे आहे , किती हिस्सा असेल 10% , 50%, 100% इ., त्यात नेमके काय मिळणार आहे ( जमीन , फ्लॅट , फार्म हाऊस, दागीने , रोख कॅश, शेअर्स इ) हे पण ठरवायचे नाही (ते अशक्य आहे!)

‘सुरी टरबुजावर पडली काय किंवा टरबूज सुरीवर पडले काय ‘ निकाल एकच आहे ना? बस, आपण त्यावर विचार करायचा , मी तेच केले आहे

या लेखाचे आधीचे भाग इथे वाचा: 

मामाची इस्टेट ! भाग – १

मामाची इस्टेट ! भाग – २

मामाची इस्टेट ! भाग – ३

 

आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे मामांची संपत्ती संग्रामला मिळणार का?

या प्रश्नाचे उत्तर आपल्याला दोन मार्गांनी तपासता येईल.

मार्ग १:

मामांची संपत्ती संग्रामला वारसाहक्काने (इनहेरीटन्स) मिळण्याची शक्यता आहे. वारसाहक्काने / मृत्यूपत्रा द्वारे मिळालेले / मृत व्यक्ती कडून मिळालेली संपत्ती असे सर्व काही आपण पत्रिकेतल्या अष्टम (८) स्थानावरुन पाहतो. अष्टमेश, अष्तमातले ग्रह आपल्याला या वारसा हक्का बद्दल सांगतील. इथे आपण संग्रामाच्या वारसाहक्का बद्दल बोलणार असल्याने प्रश्नकुंडलीतले अष्टम (८) स्थानच पहायला पाहीजे (मामांचे अष्टमस्थान नाही!)

इथे अष्टमावर मंगळाची वृश्चिक रास आहे, अष्टमात वक्री शुक्र, चंद्र आणि गुरु हे ग्रह आहेत म्हणजे अष्टमेश मंगळ, चंद्र , शुक्र आणि गुरु या वारसाहक्काचे प्रतिनिधीत्व करू शकतील. या पैकी मंगळ आणि चंद्र हे या आधीच संग़्रामचे प्रतिनिधीत्व करत आहेत त्यामुळे त्यांचा आता विचार करता येणार नाही. गुरु आणि शुक्र हे दोन दावेदार राहतात, तसे पाहीले तर गुरु आणि शुक्र दोघेही पैसा , समृद्धी, भरभराटीचे नैसर्गिक कारक ग्रह आहेतच, पत्रिका रॅडीकल असल्याचा हा आणखी एक पुरावा म्हणता येईल. पण आपल्याला या दोघां पैकी एकाची मुख्य प्रतिनिधी म्हणून निवड करावयाची आहे. जरा विचार करून मी शुक्राची निवड केली , याला तीन ठोस कारणें आहेत:

१) मामांच्या संपत्तीचा प्रतिनिधी (सप्तमेश) पण शुक्रच आहे

२) शुक्र वक्री आहे , मामांच्या संपत्ती बद्दल संदेह आहे , वाद – विवाद उपस्थित होण्याची शक्यता आहे , काहीतरी लपवले गेले असण्याची शक्यता आहे (वक्री ग्रह बर्‍याच वेळा माहिती लपवतात!), हे सारे वक्री शुक्र जास्त चपखलपणे व्यक्त करत आहे.

३) संग्रामचा पैसा जो पत्रिकेतल्या द्वीतीय स्थानावरून पाहतात त्या द्वितीय स्थानाचा भावेश पण शुक्रच आहे!

तेव्हा गुरू पेक्षा शुक्राला जास्त महत्व देत , शुक्र हा वारसाहक्काचा प्रतिनिधी म्हणून विचारात घेऊ.

ठीक आहे, आता जर संग्रामला वारसा हक्काने / मृत्यूपत्रा द्वारे मामांच्या संपत्तीचा लाभ होणार असेल तर संग्रामचे प्रतिनिधी ग्रह आणि वारसा हक्कचे प्रतिनिधी ग्रह यांच्यात कोणता तरी योग व्हायला हवा, म्हणजे मंगळ / चंद्र आणि शुक्र यांच्यात कोणता ना कोणता योग व्हायला हवा.

मार्ग २:

अष्टमस्थाना (८) वरुन वारसा हक्क ( लिगसी , इनहेरिटन्स, मृत्यू पत्रा द्वारे वा अन्य मार्गाने मृत व्यक्तीची संपत्ती) पाहणे बरोबर असले तरी हा एक सरधोपट मार्ग झाला. सामान्यत: हा मार्ग ( अष्टम स्थान पाहणे) जेव्हा वडीलांची / आजोबांची इस्टेट मिळण्याची शक्यता असल्यास किंवा अज्ञात व्यक्ती कडून  इस्टेट मिळेल का हे पहावयाचे असल्यास वापरणे इष्ट पण जेव्हा या दोन नात्यां पेक्षा वेगळ्या नातेसंबंधातून अशी इस्टेट मिळण्याची शक्यता विचारात घ्यावयाची आहे आणि तो नातेसंबंध नक्की माहिती असेल तेव्हा त्या नातेसंबंधाचा विचार करणे आवश्यक आहे , संग्राम ला मिळण्याची शक्यता असलेली इस्टेट त्याच्या मामाची आहे ही माहिती आपल्याला आहे तेव्हा त्या माहितीचा वापर का करू नये?

संग्रामला मामांच्या संपत्तीवर डोळा आहे म्हणजे मिळू शकणारी संपत्ती नक्की कोणाची आहे, त्या व्यक्तीचा संग्रामशी नेमका काय नातेसंबंध आहे हे आपल्याला माहिती आहे. तेव्हा मामांची संपत्ती संग्रामला मिळण्याची (वारसाहक्काने किंवा ‘अशीच ?’ !) शक्यता आहे का हे तपासण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे संग्रामचे प्रतिनिधी ग्रह आणि मामांच्या संपत्तीचे प्रतिनिधी ग्रह यांच्यात म्हणजेच मंगळ / चंद्र आणि शुक्र यांच्यात कोणता ना कोणता योग व्हायला हवा.

आपण पाहीले की मार्ग १ असो की मार्ग २, शेवटी आपल्याला मंगळ / चंद्र आणि शुक्र यांच्यात कोणता ना कोणता योग होणार आहे का हेच तर तपासायचे आहे, थोडक्यात मार्ग १ व २ एकच आहेत!

एखादी प्रश्नकुंडली किती रॅडीकल असू शकते याचे हे एक उत्तम उदाहरण ठरेल!

मंगळ आणि चंद्र हे संग्रामचे प्रतिनिधी आणि शुक्र हा मामांच्या संपत्तीचा प्रतिनिधी. चंद्र नुकताच शुक्राशी युती करून पुढे सरकला आहे त्यामुळे आता चंद्र आणि शुक्र यांच्यामध्ये हे दोघे आपापल्या सध्याच्या राशीत असताना दुसरा कोणताही योग होणार नाही. संग्रामचा मुख्य प्रतिनिधी मंगळ कुंभेत १० अंश २७ कलांवर आहे तर मामांच्या संपत्तीचा प्रतिनिधी शुक्र वृश्चिकेत १० अंश ११ कलेवर आहे म्हणजे अवघ्या १७ कलां मध्ये शुक्र – मंगळ केंद्र योग होईल असे दिसत आहे. शुक्र हा मंगळा पेक्षा जलद गतीचा ग्रह असल्याने त्याला हे १७ कलांचे अंतर पार करायला असा कितिसा वेळ लागेल? शुक्र – मंगळ केंद्र योग होणार म्हणजे संग्रामला मामांची संपत्ती मिळणार तर!

पण थांबा! इतक्यात फटाके फोडू नका, वरकरणी शुक्र आणि मंगळ यांच्यात केंद्र योग होईल असे दिसत असले तरी दिसते तसे नसते म्हणून जग फसते हे लक्षात घ्या.

इथे शुक्र वक्री आहे हे विसरता कामा नये, हा वक्री  शुक्र मार्गी झाल्या शिवाय तो पुढे जाऊन मंगळाशी योग करू शकणार नाही. मग शुक्र केव्हा मार्गी होतो आहे? हे तपासायला आपल्याला एफेमेरीज (पंचांग) चा आधार घेताला पाहिजे.

आण रे त्या एफेमेरीज!

शेजारी दिलेल्या एफेमेरीज पाहिल्या तर लक्षात येईल की हा वृश्चिकेतला शुक्र वक्री अवस्थेत मागे मागे जात चक्क वृश्चिकेतून तूळेत जाईल म्हणजे रास बदलेल, त्यानंतरही काही अंश तूळेत मागे मागे जात तो २५ तूळेवर मार्गी होईल आणि मग तूळ रास ओलांडून पुन्हा वृश्चिकेत येईल पण तो पर्यंत मंगळ कुंभेतून मीनेत जाईल! म्हणजे शुक्र आणि मंगळ यांच्यात सहज होईल असे वाटत असलेला केंद्र योग होणारच नाही!

संग्रामचे दोन्ही प्रतिनिधी (चंद्र आणि मंगळ), मामांच्या संपत्तीशी (शुक्र) कोणताही योग करू शकत नाहीत म्हणजे मामांची इस्टेट संग्रामला मिळणार नाही!

पण थांबा! बचेंगे तो और भी लढंगे!

आपण बघितले की मंगळ आणि शुक्र यांच्यात योग होत नाही पण हा झाला प्रत्यक्ष योगाचा विचार पण काहीवेळा अशा दोन ग्रहांत प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष योग होऊ शकतो! याला ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट्स’ असे संबोधतात ! इथे आपण विचारात घेतलेल्या दोन ग्रहांत जरी प्रत्यक्ष योग होत नसला तरी एक तिसरा ग्रहा जो या पहिल्या दोन ग्रहां पेक्षा जलद गतीचा आहे (तसा तो जलद गतीचाच असावा लागतो!) असा ग्रह मांडवली करून या दोन ग्रहांत योग घडवून आणू शकतो. हे कसे ?

हा तिसरा जलद गतीचा ग्रह प्रथम आपल्या जोडीतल्या एका ग्रहाशी योग करतो आणि नंतर जोडीतल्या दुसर्‍या ग्रहाशी योग करतो म्हणजे हा तिसरा जलद गतीचा ग्रह एका ग्रहा कडून लाईट घेतो आणि दुसर्‍या ग्रहा पर्यंत पोहोचवतो आणि प्रत्यक्ष नसला तरी असा अप्रत्यक्ष योग घडवून आणला जातो. (आपण नाही का कॉलेजात असताना ‘लाईट / करंट दे रे जरा’ असे म्हणत दुसर्‍याच्या ‘फोर-स्क्वेअर’ वरून आपली ‘विल्स’ पेटवत होतो! आठवते ना लब्बाडांनो ? तो काय झमाना होता नै ! हे तस्सेच काहीसे आहे!)

जेव्हा जेव्हा अशा दोन प्रतिनिधीं मध्ये जर प्रत्यक्ष योग होत नाही असे दिसत असेल तर अप्रत्यक्ष रित्या योग होण्याची शक्यता आहे का ते तपासलेच पाहिजे.

आपले दोन ग्रह आहेत शुक्र आणि मंगळ आता या दोघां पेक्षा जलद गतीचे ग्रह कोणते रवी, चंद्र आणि बुध! या पैकी चंद्राचा विचार आपण केलाच आहे, हा चंद्र काही अप्रत्यक्ष योग घडवून आणू शकणार नाही. रवी आणि मंगळ , रवी आणि शुक्र यांच्यात कोणतेही योग होत नाहीत त्यामुळे रवी बाद झाला.

आता राहीला बुध! बुध आणि शुक्र एकाच वृश्चिक राशीत आहेत, १० अंशावरचा वक्री शुक्र मागे मागे येतोय आणि २ अंशावरचा बुध आपल्या गतीने पुढे सरकत आहे म्हणजे लौकरच त्यांच्यात युती होणार हे नक्की. एफेमेरीज पाहील्या तर असे दिसते की शुक्र मागे येतो बुध पुढे सरकतो असे होत होत जेव्हा दोघेही  जेव्हा ८ अंश वृश्चिकेत येतील तेव्हा त्यांच्यात युती होईल! ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट्स’ चा भाग १ पूर्ण झाला !  शुक्राशी युती झाल्या नंतर बुध तसाच पुढ पुढे जात १४ वृश्चिकेवर येईल आणि एव्हाना १४  कुंभेवर आलेल्या मंगळाशी केंद्र योग करेल. म्हणजे  ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट्स’ चा भाग २ पण पूर्ण होत आहे. म्हणजे बुध शुक्र आणि मंगळ यांच्यात पद्धतीने अप्रत्यक्ष योग  घडवून आणणार आहे!

म्हणजे मामांची इस्टेट संग्रामला मिळणार का? शक्यता आहेच!!

इथे एका गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे. वर आपण बघितले की रवी ची गती मंगळ आणि शुक्रा पेक्षा जास्त असली तरीही रवी मंगळ – शुक्रात अप्रत्यक्ष योग म्हणजेच मांडवली घडवून आणू शकत नाही. आता रवी हा मामांचे प्रतिनिधीत्व करत असल्याने याचा एक अर्थ असाही निघू शकतो ते म्हणजे मामा आपली संग्राम ला इस्टेट देण्याची (मृत्यूपत्रा द्वारे) शक्यता अगदीच कमी आहे !

पण तरीही ‘ट्रान्सलेशन ऑफ लाईट्स’ ने दिलेला कौल अगदीच नाकारता येत नाही हे लक्षात ठेवून पुढे जाऊ.

संग्रामचा विचार झाला, पण मग मामांच्या संपत्तीच्या दुसर्‍या संभाव्य लाभार्थी बकुळाबाईंचे काय ? बकुळाबाईंचे काय होणार हे बघितल्या खेरीज आपल्याला कोणताही ठोस निष्कर्ष काढता येणार नाही.

तेव्हा बकुळाबाईंना मामांची संपत्ती मिळणार का नाही हे पण बघितले पाहीजे ना?

क्रमश: 

शुभं भवतुु
 

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+4

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.