खेळातल्या या सार्‍या प्रमुख खेळाडुंचा परिचय झाल्या नंतर आता आपण प्रत्यक्ष अ‍ॅनालायसीस कडे वळू.

या लेखाचे आधीचे भाग इथे वाचा: 

मामाची इस्टेट ! भाग – १

मामाची इस्टेट ! भाग – २

 

प्रश्न कोणताही असो, प्रथम जातकाशी बोलून जातकाचा प्रश्न नेमका समजाऊन घेणे अत्यंत महत्त्वाचे असते यासाठी जातकाला बोलते करणे हे एक कौशल्य असते , प्रश्न विचारण्या साठी आलेला जातक हा काहीसा काळजीत असतो, भांबावलेला असण्याची शक्यता असते, अशा मन:स्थितीत असताना सुसुत्रपणे चपखलपणे आपला मुद्दा मांडणे भल्याभल्यांना जमणार नाही हे लक्षात ठेवून जातकाशी बोलता आले पाहीजे.

अनेक वेळा जातकाला जे विचारायचे असते ते त्याला शब्दावाटे व्यक्त करता येत नाही त्यामूळे जातकाची नक्की समस्या समजणे अवघड बनते याला मी प्रश्ना मागचा प्रश्न असे म्हणतो.

‘लग्न कधी होईल’ , ‘नोकरी कधी लागेल’ हे तसे सरघोपट प्रश्न इथे गोंधळ व्हायला फारसा वाव नसतो. पण ‘लव्ह मॅरेज का अ‍ॅरेंज्ड मॅरेज’ या प्रश्नामागे बरेच काही दडलेले असते ! खरे ना?

काही वेळा ‘नोकरी कधी लागेल?” हा प्रश्न देखील वळसेदार असू शकतो ! अशावेळी शेवटची नोकरी कधी सुटली / सोडली हा प्रश्न विचारणे आवश्यक ठरते. जर नोकरी नुकतीच गेली असेल तर प्रश्न नाही , पण हे जर मागची नोकरी नोव्हेंबर 2016 मध्ये गेली असे उत्तर मिळाले तर ‘दाल में कुछ काला है !’

‘चांगली नोकरी कधी मिळेल” असा प्रश्न असताना परिस्थिती जरासी ट्रीकी असते , कारण इथे जातका कडे नोकरी असतेच पण ती त्याला ‘चांगली’ वाटत नाही , आता इथे ‘चांगली’ नोकरी म्हणजे काय ? किंवा चांगल्या नोकरीची व्याख्या काय? किंवा’ काय असले म्हणजे ती नोकरी चांगली असे म्हणू शकाल’ असे प्रश्न जातकाला विचारणे आवश्यक असते त्याच्या उत्तरातून जातकाची नेमकी समस्या , खरी ‘सल’ काय आहे ते समजून जाते आणि मग जातकाच्या प्रश्नाची नव्याने मांडणी करून त्याचे उत्तर देता येते.

या निमित्ताने ‘होरारी’ म्हणजेच ‘प्रश्नशास्त्र/ प्रश्नकुंडली’ संदर्भात एक महत्त्वाचा पण हमखास दुर्लक्ष केल्या जाणार्‍या मुद्द्या बद्दल लिहतो !

होरारी प्रश्न ( प्रश्न कुंडलीच्या मार्फत सोडवलेला प्रश्न) समोर असतो तेव्हा मांडलेली प्रश्नकुंडली ही फक्त एका मर्यादीत काळाचा वेध घेऊ शकते. हा मर्यादीत कालखंड साधारण पणे तीन – ते सहा महीने इतकाच असतो. त्यामुळे या कालखंडा च्या पलीकडे काही घडणार असेल तर सध्याची प्रश्न कुंडली त्याबद्दल फारसे स्पष्ट पणे सांगू शकत नाही. जसे साध्या डोळ्यांनी किती लांबचे दिसू शकते याला मर्यादा असतात ना? फार लांबवर रस्त्यावर एखादी पाटी असेल तर आपल्याला कदाचित ती पाटी दिसेल पण त्या पाटीवर काय लिहले आहे हे वाचता येणार नाही , त्या साठी आपल्याला त्या पाटीच्या जवळच जावे लागेल. होरारीत असेच असते हे लक्षात ठेवा.

होरारीच्या सहाय्याने जास्त पुढचे म्हणजे एक वर्ष व त्या पलीकडचे भाकित करणे अव्यवहार्य आहे .

समजा आज 30 जून रोजी जातकाने ‘विवाह कधी होईल ‘ असा प्रश्न विचारला आणि आपण होरारीने त्याचे उत्तर शोधणार असू तर आपली कालमर्यादा डिसेंबर 2019 (सहा महीने) इतकीच असू शकेल,. जर होरारीने नकारार्थी उत्तर दिले तर त्याचा अर्थ या जातकाचा विवाह 31 डिसेंबर 2019 पर्यंत तरी नक्कीच होणार नाही पण याचा अर्थ असा ही नाही त्या जतकाचा विवाहच होणार नाही , कदाचित त्याचा विवाह 2020 सालात देखील होऊ शकेल पण सध्याचा होरारी चार्ट डिसेंबर 2019 च्या पलीकडचे पाहू शकत नाही,

याचा अर्थ असाही आहे की प्रश्नात अपेक्षीत असलेली घटना घडणे / न घडणे याचा निकाल सहा महिन्यांंनंतर लागण्याची शक्यता आहे हे आधीच माहिति असेल जातकाचा प्रश्नच मुळात गैरलागू (Invalid) आहे त्यावर आत्ताच विचार करण्यात काहीच अर्थ नाही!

समजा जातकाने विचारले की 2020 मध्ये मला प्रमोशनचे चान्सेस आहे पण नक्की प्रमोशन मिळेल का?

इथे अपेक्षीत घटना सहा महीन्यां नंतर आहे , प्रमोशन मिळाले नाही मिळाले याचा निकाल येत्या सहा महीन्यात लागणारच नाही मग त्याचे आत्ताच कशाला उत्तर हुडकत बसायचे ( हुडकले तरी ते चुकण्याची शक्यता असतेच) वाटल्यास जातकाला सांगावे की बाबा रे फार लौकर प्रश्न विचारलास, थांब जरा 2020 साल उजाडु दे मग हा प्रश्न वैध होईल आणी आपल्याला त्याचे ऊत्तर पाहता येईल, इतक्यात घाई नको.

म्हणजे असे प्रश्न ज्यांचा हो / नाही असे उत्तर येत्या सहा महिन्यात मिळणारच आहे असेच प्रश्न होरारी साठी ग्राह्य धरायचे आणि त्यावर मेहेनत घ्यायची ,अर्थात ही नियम फक्त पाश्चात्त्य होरारी साठी आहे असे मात्र नाही, तुमची पद्धती कोणतीही असो ( पारंपरीक, कृष्णमुर्ती, वेस्टर्न, युरेनियन इ ) हा नियम सगळ्यांना लागू असतो.

पण होते काय , जातकाच्या प्रश्नाचे ऊतर ‘वेळे आधीच प्रश्न विचारलास रे , इतक्यात घाई करु नकोस, काही महीन्यां नंतर येऊन हाच प्रश्न विचार त्या वेळी बघू ‘ असे स्पष्ट आणि खणखणीत शब्दात सांगून जातकाला माघारी पाठवायचे धाडस / क्षमता किती ज्योतिषांत असते? उपाय तोडग्यांचा बाजार भरवणार्या आजच्या ज्योतिषी भोंदूत सुहास गोखले हा अपवाद आहे पण बाकीचे ?

होरारी ला अशी कालमर्यादा असते हेच मुळात अनेक ज्योतिषांना माहिती नसते आणि माहीती असले तरी  (जारका कडून मिळू शकणार्‍या दक्षिणे वर नजर ठेवून !) त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते असे दिसते.

संग्रामने प्रश्न विचारला खरा पण मामंच्या इस्टेटीचा फैसला प्रश्न विचारल्याच्या सहा महिन्यांच्या आत होणारच नसेल तर संग्रामच्या प्रश्नाचे उत्तर तरी का द्यायचे ?
म्हणजे सुदैवाने मामा जिवावरच्या या दुखण्यातून बरे झाले किंवा सहा महिन्यां पेक्षा जास्त जगले तर त्यांच्या इस्ट्टी बद्दलचा कोणताच वाद निर्माण होणार नाही ना !

मामा जेव्हा जातील तेव्हा आणि तेव्हाच संग्राम आणि बकुळाबाई वा अन्य कोणी यांचा इस्टेटीवरचा दावा आस्तीत्वात येईल त्या आधी नाही !

म्हणजे मामा येत्या सहा महिन्यात गेले तरच संग्रामचा प्रश्न वैध अन्यथा नाही

म्हणजेच मामा जगतात का ? हा पहीला मुद्दा विचारात घ्यायचा जर मामंच्या अयुष्याची दोरी बळकट आहे इतक्यात काही ते जात नाहीत हे दिसले तर संग्रामच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची आवश्यकताच नाही

मी नेमके हेच सर्व प्रथम् केले आहे हे लक्षात घ्या.

हा कुट प्रश्न मी माझ्या फेसबुक वॉल वर आणि एका ज्योतिष चर्चा ग्रुप वर ठेवला होता उद्देश हा की कोणाला त्यावर काम करुन उत्तर हुडकण्याचा सराव करायचा आहे. या प्रश्नावर ज्यांनी ज्यांनी काम केले आहे त्यांच्या नजरेतून ‘मामांचे निधन’  हा महत्त्वाचा मुद्दा निसटला आहे !

हरकत नाही , सुरवातीला असे होतेच पण जितका सराव कराल तितके आपले कौशल्य वाढेल.

त्यासाठी जरा ..,.

मेष रास अश्शी असते आणि कुंभेची ही लक्षणें , घराण्याचा शाप, मातृदोष, नक्षत्रशांती असल्या भाकडां पासून स्वत:ला लांब ठेवता आले पाहीजे. फेसबुक , व्हॉट्स अप, युटूयुब मधून हे असले आंबोण रोज रोज वाढणार्‍‍‍‍या (आणि बुधा ला बुद म्हणणार्‍या  !) तथाकथित ज्योतिषाचार्य डॉक्टरांना लांब ठेवता आले पाहिजे

बाकी आपली मर्जी !

सर्वप्रथम या संग्रामच्या मामांचे काय होणार याचा अंदाज घेऊ. हे सगळ्यात आधी केले पाहीजे कारण मामांच्या संपत्तीचे काय होणार याचा निकाल मामा असे पर्यंत लागणार नाही, मामा पुढचे काही महिने जगले तर संग्रामचा प्रश्न इनव्हॅलिड ठरेल, याचे कारण म्हणजे प्रश्नकुंडलीचा आवाका साधारण तीन ते सहा महीने इतकाच असतो त्या पलीकडच्या कालावधीतल्या घटनांचा अंदाज ती देऊ शकत नाही. मामा जर ह्या तीन-सहा महीन्यांच्या मर्यादे पलीकडे जगणार असतील तर संग्रामचा प्रश्नच मूळात गैरलागू ठरेल. मामा जास्त जगणार असे दिसले तर मामांच्या इस्टेटीचा वारसदार कोण? हा प्रश्नच मुळात येत्या तीन- सहा महीन्यातच उपस्थित होणार नाही! तसे असेल तर संग्रामने विचारलेल्या प्रश्नावर विचार करण्याची आवश्यकता नाही, केस इथेच बंद करुन, संग्रामची पाठवणी करता येईल.

मामांना दीर्घायुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करत मी पत्रिकेवर नजर टाकली ,  लक्षात आले की संग्रामच्या मामांचा खेळ जवळपास आटोपल्यातच जमा आहे! हे कसे काय? जरा पहा, मामांचा प्रतिनिधी रवी हा तूळेत १८ अंश ६ कले वर आहे आणि तो मकरेतल्या ११ अंश ४६ कलेवरच्या प्लुटो शी अवघ्या ४० कलांच्या प्रवासा नंतर केंद्र योग करत आहे.

अर्थात मामा जाणार हे सगळ्यांनाच माहिती आहे पत्रिकेने त्याला दुजोरा दिला आहे इतकेच, त्यामुळे आपण इथे काही फार मोठा तीर मारत नाही आहोत. आणि ‘अमूक दिवशी , अमूक वाजता’ मामा ‘जाणार’  असेही उत्तर आपल्याला शोधायचे नाही तेव्हा मामां बद्दल याहूनही जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही.

अवघ्या ४० कलांच्या आत बाहेर मामांचा प्रतिनिधी आणि प्लुटो यांच्यात केंद्र योग होत असल्याने संग्रामचे मामा य तीन-सहा महीन्यां पेक्षा जास्त जगणार नाहीत हे पुरेसे स्पष्ट होते आहे त्यामुळे मामांच्या इस्टेटीचा वारसदार कोण? हा प्रश्न पण येत्या तीन- सहा महीन्यातच उपस्थित होणार आहे . संग्रामचा प्रश्न त्यामुळे आपल्या ‘होरारी’ च्या नैसर्गिक काल मर्यादे च्या आत असल्याने आपल्याला संग्रामच्या प्रश्नावर विचार करण्यास काहीच हरकत नाही.

संग्रामने दिलेल्या माहिती नुसार संग्राम हा मामांचा एकमेव वारस आहे त्यामुळे मामांच्या इस्टेटीचा तो लाभार्थी असू शकतो. पण बकुळाबाईंचे मामांशी असलेले संबंध लक्षात घेता (आणि कदाचित बकुळाबाईंचे मामांशी लग्न ही झाले असावे ही शक्यता विचारात घेता ) बकूळाबाई देखील मामांच्या इस्टेटीच्या लाभार्थी असू शकतात.

म्हणजे आपल्याला या दोन्ही शक्यता विचारात घ्याव्या लागतील. त्याचे साधारण असे स्वरुप असू शकेल:

१) मामांची सर्व इस्टेट संग्रामला एकट्याला

२) मामांच्या इस्टेटीतला मोठा हिस्सा संग्रामला व लहान हिस्सा बकुळाबाईंना

३) मामांच्या इस्टेटीतला मोठा हिस्सा बकुळाबाईंना व लहान हिस्सा संग्रामला

४) मामांची सर्व इस्टेट एकट्या बकुळाबाईंना

५) तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी स्थिती म्हणजे मामांची सारी इस्टेट एखाद्या संस्थेला

हे सगळेच फार गुंतागुंतीचे असले तरी न डगमगता आपण एक एक करत या सार्‍यांची उत्तरें मिळवण्याचा प्रयत्न करु. संग्राम ने प्रश्न विचारण्यासाठी निवडलेली वेळच अशी अचूक निघाली आहे की त्या क्षणाच्या ग्रहस्थिती मध्येच सगळी उतरें समाविष्ट आहेतच आपले काम ती उत्तरे. हुडकून बाहेर काढणे!

मामांच्या बाबतीत दोन शक्यता आहेत:

१) मामा असेच मृत्यू पत्र न करता जातील

असे जर असेल तर यात पुन्हा दोन फाटे फुटतील

१अ) मामांचे बकुळाबाईंशी लग्न झाले आहे आणि त्याचा कागदोपत्री (सरकार दरबारी मान्य होईल असा ) पुरावा बकुळाबाईं कडे आहे
असे असेल तर मृत्युपत्र नसले तरी सर्व मालमत्ता मामांची पत्नी म्हणुन बकुळाबाईं कडे जाईल , संग्राम किंवा इतर कोणीही त्यावर हक्क सांगू शकणार नाही

१ब) मामांचे बकुळाबाईंशी लग्न झालेले नाही (त्या तशाच मामां बरोवर संबंध ठेवून आहेत) किंवा झाले असले तरी त्याचा कागदोपत्री (सरकार दरबारी मान्य होईल असा ) पुरावा बकुळाबाईं कडे नाही
या केस मध्ये संग्राम हा मामांचा एकमेव वारस ठरतो.

(इथे स्व राजेश खन्ना आणि अनिता अडवानी ही केस आठवते ! अडवानी बाई खन्नां बरोबर राहात होत्या पण लग्न झालेले नव्हते , या अडवानीं बाईंनी खन्नांच्या इस्टेटीवर हक्क सांगीतला होता !)

२) मामांनी मृत्यूपत्र केले आहे
इथे पण दोन शक्यता आहेत

२अ) बकुळाबाईंशी त्यांचा विवाह झाला आहे आणि तसा पुरावा आहे
असे असेल तर मामांंची पत्नी म्हणून बकुळाबाईंचा 50% हिस्सा अबाधीत राहतो त्याला खुद्द मामा सुद्धा नाकारु शकत नाहीत. उरलेल्या 50% हिस्स्याची विल्हेवाट मामा त्यांच्या ईच्छे नुसार लावू शकतात

२ब) बकुळाबाईंशी त्यांचा विवाह झालेला नाहीे
असे असेल तर आपल्या सगळ्या मालमत्तेची विल्हेवात मामा त्यांच्या ईच्छे नुसार लावू शकतात

इथे संग्राम हा त्यांंचा भाचा असल्याने मामा काही भाग त्याला देऊ शकतात (पण अशी सक्ती मामांवर नाही)

बकुळाबाईंशी चांगले संबंध असल्यास मामा आपला मालमत्ता सगळी अथवा त्याताला काही हिस्सा बकुळाबाईंना देऊ शकतात (पण अशी सक्ती मामांवर नाही)

मामा आपली मालमत्ता संग्राम किंवा बकुळाबाई यां मध्ये न वाटता तिसर्याच कोणा व्यक्तीला / संस्थेला देऊ शकतात किंवा आपल्या माममत्तेचा एक ट्रस्ट करुन त्या मार्फत दानधर्म आदी कामे चालू ठेवू शकतात.

या अशा प्रश्नकुंडली वरून :

मामांनी मृत्यूपत्र केले आहे का नाही हे ठरवणे अवघड नव्हे अशक्य आहे !
मामांचे बकुळाबाईं बरोबर विवाह झालेला आहे का नाही ते ठरवणे अवघड नाही तर अशक्य आहे

असे असताना उगाचच बकुळाबाईंशी विवाह / मामांचे मृत्यूपत्र या फंदात न पडता आपण डायरेक्ट संग्राम/ बकुळाबाईंना काही मिळणार आहे का ते तपसणे जास्त सोपे आहे. शेवटी संग़्रामला मालमत्ता ( किंवा त्यातला काही हिस्स) मिळणार का नाही याचे हो / नाही असेच उत्तर द्यायचे आहे , किती हिस्सा असेल 10% , 50%, 100% इ., त्यात नेमके काय मिळणार आहे ( जमीन , फ्लॅट , फार्म हाऊस, दागीने , रोख कॅश, शेअर्स इ) हे पण ठरवायचे नाही (ते अशक्य आहे!)

‘सुरी टरबुजावर पडली काय किंवा टरबूज सुरीवर पडले काय ‘ निकाल एकच आहे ना? बस, आपण त्यावर विचार करायचा , मी तेच केले आहे

 

क्रमश: 

शुभं भवतु 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+4

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.