संग्रामशेठचा प्रश्न जेव्हा मला नेमका समजला, सगळा खुलासा झाला ती तारीख, वेळ आणि नाशिक हे स्थळ वापरून मी एक प्रश्नकुंडली मांडली आणि त्यावर काम करायला सुरवात केली….

या लेखाचा पहिला भाग इथे वाचा:   मामाची इस्टेट ! भाग – १

 

प्रश्न: “संग्राम ला त्याच्या मामांची इस्टेट मिळेल का?”

प्रश्न विचारला होता:

दिनांक: ११ ऑक्टोबर २०१८

वेळ: १७:१८:५३

स्थळ: नाशिक , 19 N 59 , 73 E 48

मी भारतीय पारंपरीक ज्योतिषशास्त्र, नक्षत्र पद्धती , पाश्चात्य ज्योतिषशास्त्र आणि युरेनियन अ‍ॅस्ट्रॉलॉजी असा चार शाखांचा अभ्यास केला आहे. एखादा मेकॅनिक जसा कोणता नट खोलायचा हे पाहून त्याला अनुरुप असा पाना निवडतो तसे समोरचा प्रश्न पाहून त्यासाठी पारंपरीक का नक्षत्र का पाश्चात्य का युरेनियन पद्धती वापरायची हे मी ठरवत असतो.

माझा अनुभव असा आहे की जेव्हा जातकाने विचारलेला प्रश्न गुंतागुंतीचा / वळसे – वळणे असलेला असतो किंवा त्या प्रश्नाला अनेक संभाव्य उत्तरें असू शकतात किंवा प्रश्नाचे उत्तर हुडकताना प्रश्ना संदर्भातल्या पार्श्वभूमीचा, वर्णनात्मक तपशीलाचा खुबीने वापर करुन घ्यावा लागतो, प्रश्न विचारण्याच्या आधीच्या काळात घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने उलगडणारा आगामी घटनाक्रम असतो तेव्हा पाश्चात्य होरारी किंवा युरेनियन तंत्र वापरुन मला चांगले यश मिळाले आहे.

कालनिर्णय ही पाश्चात्य होरारीची काहीही कमकुवत बाजू म्हणता येईल पण त्याने फारसे बिघडत नाही, कालनिर्णयाला किंबहुना अचूक कालनिर्णयाला अवाजवी महत्त्व असू नये असे माझे मत. सामन्यत: विवाह कधी हा प्रश्न विचारणार्‍या जातकाचे समाधान २०२० च्या पहिल्या तीन महिन्यांत विवाह होण्याची शक्यता आहे इतपत कळले तरी होते त्यासाठी अगदी २० एप्रिल २०२० रोजी , सकाळी  ११ वाजून २४ मिनिटे ५८ सेकंदावर तुझे लग्न लागेल असे सांगता आलेच पाहिजे असे नाही. बर्‍याच वेळा जातकाची पण तशी अपेक्षा नसते! ह्या अती अचूकतेच्या एकांगी अट्टाहासात एक महत्त्वाचा मुद्दा नजरेतून निसटतो आणि तो म्हणजे एखाद्या घटनेच्या कालनिर्णया पेक्षा ती घटना त्या व्यक्तीच्या जीवनावर कसा प्रभाव टाकेल हे कळणे जास्त महत्त्वाचे असते. ती व्यक्ती ती घटना कशी स्विकारेल, त्या घटने मुळे उमटणार्‍या पडसादांना ती व्यक्ति कशी प्रतिसाद देऊ शकेल (रिअ‍ॅक्ट) हे जाणणे कालनिर्णया पेक्षा जास्त महत्त्वाचे नाही का? निर्णय काय लागेल / केव्हा लागेल या पेक्षा असा निर्णय घेताना आपल्यापुढे नेमके कोणते पर्याय उपलब्ध आहे हे जर आधीच कळले तर निर्णय घेणे अधिक सोपे जाऊन , निर्णय घेतानाच्या चुकां काही प्रमाणात का होईना टाळता येणार नाहीत का?

उदाहरणेच घ्यायची तर, लग्न कधी होईल त्याची अचूक तारीख कळण्या पेक्षा ते लग्न सुखासमाधानाचे असेल का जे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे नाही का? हा विवाह यशस्वी होण्यासाठी नेमक्या काय तडजोडी केल्या पाहीजेत किंवा कोणत्या बाबतीत लवचिकता ठेवली पाहिजे हे कळणे अधिक महत्त्वाचे नाही का ? नोकरी कधी लागेल हे अगदी तारीख, वार, तास-मिनिटे-सेकंदात सांगण्यापेक्षा कोणत्या क्षेत्रात काम करणे जास्त अनुकूल राहील हे कळणे किंवा मिळणारी नोकरी लाभेल का, आयुष्यातल्या ध्येय धोरणांशी ती सुसंगत असेल का या बाबत मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे नाही का?

याचा अर्थ मी पाश्चात्य तंत्रांची तरफादारी करतो आहे असे नाही पण जे चांगले आहे त्याला चांगले म्हणण्यात काय वावगे आहे? एखाद्या चांगल्या ज्योतिषाला आपल्या भात्यात अनेक आयुधे बाळगावी लागतात पाश्चात्य होरारी तंत्र हे असेच एक उत्तम आयुध आहे असे मी समजतो. आयुष्यभर एकाच पद्धतीचा मग ती पारंपरीक असो, वा नक्षत्रपद्धती असो की पायर्‍यापायर्‍यां ची,  पोकळ अभिमान धरत, इतर तितक्याच तालेवार पद्धतींना तुच्छ लेखणे मला तरी पटत नाही. अर्थात हे माझे वैयक्तित मत आहे, माझ्या स्वत:च्या अनुभवतून बनलेले आहे, तुमचा अनुभव, तुमची मतें वेगळी असू शकतात म्हणुनच मी माझे विचार मांडले पण या विषयावर मला कोणाशीही वाद विवाद घालायचा नाही.

आत्ताचा संग्रामचा प्रश्न देखिल गुंतागुंतीचा वाटला त्यामुळे मी या प्रश्नाचा अभ्यास पाश्चात्य होरारी तंत्राने करायचे ठरवले.

संग्रामने विचारलेला प्रश्न जेव्हा मला नेमका समजला, सगळा खुलासा झाला ती तारीख, वेळ आणि नाशिक हे स्थळ वापरून मांडलेलॉ  प्रश्नकुंडली 


 


 

पाश्चात्य होरारी तंत्रात प्रश्नकुंडली तयार होताच सर्व प्रथम तपासायच्या काही बाबी असतात:

१)  जन्मलग्नाचे अंश

या पत्रिकेत जन्मलग्न १ मेष २० अंशावर आहे म्हणजे मेष लग्न अगदी नुकतेच सुरु झाले आहे, जेव्हा जन्मलग्नाचे अंश ३ पेक्षा कमी असतात (ज्याला आपण ‘अर्ली असेंडंट ‘ असे म्हणतो), तेव्हा त्याला एक वेगळा अर्थ असतो. तो म्हणजे जातकाने प्रश्न वेळे आधीच विचारला आहे, प्रश्ना संदर्भात अजून काही बरेच असे घडणार आहे ते या प्रश्ना संदर्भातले अनेक समीकरणें बदलवणारे असू शकते! बर्‍याच वेळा असा ‘अर्लि असेंडंट’ मिळतो तेव्हा हमखास ‘कहानी में ट्विस्ट’ असतो असा अनुभव आहे. काही वेळा असा अर्ली असेंडंट असताना प्रश्न विचारल्या नंतरच्या काळात अशा काही घटना घडतात की त्यांच्या प्रभावाने जातकाचा मूळ प्रश्नच गैरलागू – इन व्हॅलिड ठरतो!

इथेही जन्मलग्न १ अंशावर असल्याने आपल्याला असाच प्राथमिक निष्कर्ष काढता येईल, अर्थात असे जरी असले तरी ह्या एवढ्या तर्कावर प्रश्नकुंडली बाद ठरवणे चूकीचे ठरेल. ही पत्रिका जरा बारकाईने तपासली पाहीजे ‘कहाँनी  में जरूर कोई ट्विस्ट आनेवाला है’  तेव्हा कोणत्याही लहानश्या आणि वरकरणी कमी महत्त्वाच्या वाटणार्‍या मुद्दा कडे देखिल दुर्लक्ष करुन चालणार नाही हा त्या मागचा खरा संदेश आहे.

जन्मलग्न बर्‍याच वेळा जातकाच्या व्यक्तीमत्वा बद्दल काही सांगत असते , सूचक असते. इथे हा नियम/अडाखा बर्‍या पैकी लागू होतो आहे, मेष लग्न आहे, लग्नेश मंगळ लाभात आहे, संग्रामशेठच्या आक्रमक, राजकीय व्यक्तीमत्वाला साजेसेच आहे हे!

अर्थात हा नियम म्हणा अडाखा म्हणा दरवेळेला लागू पडेलच असे नाही हे मात्र लक्षात ठेवा, नाहीतर पढतमुर्खा सारखे हा नियम घोकत राहाल आणि तुमचा (हमखास) पोपट होईल, असे नियम तारतम्याने वापरायचे असतात आणि दुर्दैवाने हे तारतम्य बाजारात विकत मिळत नाही किंवा पुस्तकातून / क्लास मधून शिकवता येणार नाही!

२) चंद्राची स्थिती

प्रश्नकुंडलीतला चंद्र अनेक अंगाने मदतगार शाबित होत असतो, मात्र हे पाहण्यासाठी नजर तयार असावी लागते. चंद्राचे त्याच्या राशीतले अंश प्रथम तपासावे लागतात, हा चंद्र ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ आहे का हे पहावे लागते. आता ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ तपासणे म्हणजे हा चंद्र सध्या ज्या राशीत , ज्या अंशावर आहे तिथेपासून ते चंद्र ती रास ओलांडून पुढच्या राशीत जाई पर्यंत हा चंद्र इतर ग्रहां शी कोणता योग करतो आहे का हे तपासणे. आपण युती, लाभ, केंद्र, नवपंचम आणि प्रतियोग हे पाचच योग विचारात घेतो आणि रवी, बुध, शुक्र, मंगळ, शनी , गुरु युरेनस, नेपच्युन आणि प्लुटो हे ग्रह (म्हणजे राहू, केतू या साठी विचारात घेत नाही), जर चंद्र त्याच्या राशीतल्या सध्याच्या अंशापासुन ते ती रास ओलांडे पर्यंत या ग्रहांपैकी कोणाशी एखादा योग करत असेल तर तो व्हॉईड ऑफ कोर्स’ नाही !

इथे चंद्र अष्टम स्थानात, वृश्चिकेत १७ अंशावर आहे, चंद्र लगेचच वृश्चिकेतल्याच २४ अंशावरच्या गुरुशी युती करत असल्याने चंद्र  व्हॉईड ऑफ कोर्स’ नाही.

चंद्र जेव्हा ‘व्हॉईड ऑफ कोर्स’ असतो तेव्हा परिस्थिती काहीशी वेगळी असते. जातक या प्रश्ना संदर्भात, प्रश्नाच्या सोडवणूकी बाबत स्वत: काहीही करु शकणार नाही ,जातकाच्या हातात काहीही राहीले नाही , जे जे होईल ते पहात राहणे इतकेच काय ते जातक करु शकेल असा त्याचा सरळ, साधा , सोपा अर्थ असतो. इथे सुदैवाने तशी परिस्थिती नाही हे संग्रामसाठी (आणि त्याच्या ‘सेटींग’ साठी !) चांगलेच आहे.

३) शनी ची स्थिती

या प्रश्नकुंडलीत शनी दशम स्थानात आहे त्याने एक काळजी मिटली , कारण हा शनी जर प्रथम अथवा सप्तम स्थानात असता तर त्याचे वेगळे(च) अर्थ निघाले असते!  त्या बद्दल इथे लिहीत नाही, आता काय होरारीचे आख्खे पुस्तक लिहायचे का इथे?

असो.

प्रश्नकुंडलीचा हा झाला प्राथमिक अभ्यास आता आपल्याला ठरवायचे आहे ते या खेळातले खिलाडी कोण कोण आहेत ते.

इथे अर्थातच…

१)   संग्राम

२)   मामा

३)   मामांची संपत्ती

४)   बकुळा बाई

हे चार खेळाडू आहेत.

खेळाडू निश्चित झाल्यावर आता ते तपासणे आलेच.

संग्राम:

संग्राम प्रश्नकर्ता आहे, प्रश्नकुंडलीत प्रश्नकर्ता नेहमीच लग्न स्थानावरुन तपासतात, लग्नेश आणि लग्नातले ग्रह हे प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधीत्व करतात. इथे मेष लग्न असल्याने मंगळ संग्रामचे प्रतिनिधीत्व करेल. युरेनस देखील लग्नात आहे पण युरेनस , नेपच्युन, प्लुटो (आणि राहू / केतू ) यांना असे प्रतिनिधीत्व द्यायचे की नाही या बाबत वाद आहेत, काही ज्योतिर्विद मानतात काही मानत नाहीत. मी न मानणार्‍यातला आहे.

त्याच बरोबर चंद्र हा प्रश्नकर्त्याचा निसर्गदत्त सह- प्रतिनिधी (काहीसा दुय्यम दर्जाचा पण कालनिर्णयात महत्त्वाची भुमिका बजावणारा) असतोच. म्हणजे मंगळ आणि चंद्र संग्रामचे प्रतिनिधीत्व करतील.

मंगळा सारखा आक्रमक ग्रह संग्राम चा प्रतिनिधी म्हणून असणे ही  प्रश्नकुंडली ‘रॅडीकल’ असण्याची एक खूण आहे.

मामा:

संग्रामचे मामा हे संग्रामच्या आईचे सख्खे धाकटे भाऊ. धाकटा भाऊ तृतीय स्थानावरुन पाहतात. मात्र आपल्याला संग्रामचा धाकटा भाऊ पहावयाचा नाहीतर संग्रामच्या आईचा धाकटा भाऊ पहावयाचा आहे, पत्रिकेतले चतुर्थ स्थान हे ‘आई’ चे असते, म्हणजेच मामा साठी चतुर्थ स्थानापासुन चे तिसरे स्थान विचारात घ्यावे लागेल म्हणजे प्रश्नकुंडलीतले षष्ठम स्थान हे संग्रामच्या मामा बद्दल सांगेल, षष्ठमेश, षष्ठातले ग्रह सर्व मिळून संग्रामच्या मामाचे प्रतिनिधीत्व करणार. षष्टम स्थानावर रवीची सिंह रास आहे, षष्ठम स्थानात कोणताही ग्रह नाही, त्यामुळे षष्ठेश रवी हा एकमेव ग्रह मामांचे प्रतिनिधीत्व करेल. इथे एक बाब नजरेआड होऊ देता कामा नये ती म्हणजे बुधाची कन्या रास या षष्ठम स्थानात लुप्त आहे म्हणजे मामांचा विचार करताना या बुधाचे अवधान आपल्याला ठेवले पाहिजे.

संग़्राम ने त्याच्या मामां बद्दल जे काही सांगीतले त्याला अनुरूप असाच रवी सारखा ग्रह मामांचा प्रतिनिधी म्हणून असणे ही प्रश्नकुंडली ‘रॅडीकल’ असण्याची आणखी एक खूण आहे.

 

मामाची संपत्ती:

साधारणत: संपत्ती आपण द्वितीय स्थानावरुन पाहातो, इथे मामांची संपत्ती असल्याने आपल्याला षष्ठ्माचे द्वितीय म्हणजेच सप्तम स्थान विचारात घ्यावे लागेल. सप्तमावर शुक्राची तूळ रास आहे, बुध आणि रवी सप्तमात आहेत. आपण रवी ला मामांचे प्रतिनिधीत्व दिले आहे त्या शिवाय षष्ठमात बुधाची कन्या रास लुप्त आहे हे पण आपण बघितले आहे, म्हणजे या रवीचा आणि बुधाचा काही संबंध / साटेलोटे असणारच ते कसे व्यक्त झाले आहे पहा. मामाला संपत्तीचा लोभ सुटणे अवघड आहे म्हणून खुद्द मामा (रवी) बुधा सहीत सप्तमात दिसत आहे. अर्थात रवी आणि बुध सप्तमात असले तरी त्यांना आता मामांच्या संपत्तीचे प्रतिनिधी मानता येणार नाही त्यामुळे सप्तमेश शुक्राला मामांच्या संपत्तीचा एकमेव प्रतिनिधी निश्चित करू आणि हे किती समर्पक आहे पहा, शुक्र हा निसर्गत:च पैशाचा, संपत्तीचा कारक आहेच.

शुक्रा सारखा संपत्तीचा कारक ग्रह मामांच्या संपत्तीचा प्रतिनिधी म्हणून असणे ही प्रश्नकुंडली ‘रॅडीकल’ असण्याची पुन्हा एकदा खात्री पटवून देत आहे.

बकुळाबाई:

ह्या बाईं बरोबर मामांचे ‘तसले’ संबंध आहेत अशी कुजबुज आहे / संशय आहे,  मामाचे रंगेल , बेबंद वागणे , दारुचे व्यसन , अमाप पैसा हे सारे पाहता त्यात तथ्य असावे असे वाटते शिवाय या बाई मामांना भेटायला हॉस्पीटलात येत आहेत ही बाब नजरेआड करता येणार नाही. पण या बाईंचा विवाह मामांशी झाला आहे का नाही हे मात्र नक्की माहिती नाही. त्यामुळे सध्यातरी ह्या बकुळा बाईंना मामांचे प्रेमपात्र असेच मानू. प्रेमप्रकरण , प्रेयसी इ आपण पंचम स्थानावरून पाहतो, आता इथे मामांचे पंचम स्थान म्हणजेच षष्ठम स्थानाचे पंचम स्थान जे दशम स्थान ते या बकुळाबाईं बद्दल सांगेल. दशमावर शनीची मकर रास आहे, शनी स्वत:च दशमात आहे, प्लुटो पण दशमात आहे पण त्याचा विचार आपण करणार नाही. दशमेश शनी हा एकमेव ग्रह बकुळाबाईंचे प्रतिनिधीत्व करेल.

पत्रिका रॅडीकल आहे याची साक्ष एव्हाना पटली आहेच पण एखादी पत्रिका किती टोकाची रॅडीकल असू शकते ते आता पहा !

आपण बकुळाबाई मामांच्या प्रेयसी आहेत असे गृहीत धरुन पाहीले पण जर संग्रामला संशय आहे तसा या बकुळाबाईंचा मामांशी विवाह झाला असेल तर बकुळाबाई मामांच्या पत्नी होतील, आणि पत्नी ही सप्तम स्थानावरुन पाहतात, इथे मामांचे सप्तम स्थान म्हणजे पत्रिकेतले व्यय स्थान (षष्टापासून सातवे) विचारात घ्यावे लागेल, व्ययस्थानावर शनीची कुंभ रास आहे, व्ययात नेपचुन आहे पण त्याचा आपण विचार करत नाही म्हणजे व्ययेश शनी बकुळाबाईं (आता मामांच्या पत्नी म्हणून)  प्रतिनिधीत्व करेल. नेपच्युन ची सप्तमातली उपस्थिती बकुळाबाईं बद्दलचा पत्नी की प्रेयसी हा गोंधळ अधोरेखीत करत आहे!

मी आधी या बकुळाबाई मामांच्या प्रेयसी आहेत का पत्नी याचा शोध घेणार होतो,  मामांनी बकुळाबाईंशी गुपचुप विवाह केला असावा असा संशय संग़्रामच्या मनात आहे म्हणजे तशी त्याला कुणकुण लागली आहे, ही कुणकुण म्हणजेच अफवा!  त्यामुळे ही अफवा खरी की खोटी हे ठरवले की, पत्नी का प्रेयसी याचा निकाल आपोआपच लागेल. पण बकुळाबाई मामांच्या पत्नी आहेत असा कौल मिळाला तरी प्रश्न सुटत नाहीच, कारण गुपचुप केलेला विवाह तो, त्याचा कागदोपत्री पुरावा असेल का हा मोठा प्रश्न शिल्लक राहतोच आणि त्याचे उत्तर अशा प्रश्न कुंडलीतून मिळणे / मिळवणे अवघड नव्हे अशक्यच राहील.

बकुळाबाईंचा विचार आपण करत आहोत कारण या बाई  संग्रामच्या बरोबरीने मामांच्या संपत्तीच्या संभाव्य लाभार्थी आहेत. मामांच्या संपत्तीवरचा हक्क या बकुळाबाईंना प्रेयसी किंवा पत्नी अशा मार्गाने मिळू शकेल पण कसेही असले तरी बाईंना मामांची संपत्ती मिळणार का मुळ मुद्दा आहे त्यामुळे पत्नी कि प्रेयसी या खोलात जायची गरज (सध्यातरी) वाटत नाही. सुदैवाने दोन्ही बाबतीत बकुळाबाईंचा प्रतिनिधी शनी च येत असल्याने आपले काम बरेचसे सोपे झाले आहे,

असो.

खेळातल्या या सार्‍या प्रमुख खेळाडुंचा परिचय झाल्या नंतर आता आपण प्रत्यक्ष अ‍ॅनालायसीस कडे वळू.

क्रमश:

शुभं भवतु

 

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

4 प्रतिक्रिया

///////////////
 1. योगेश दैठणकर.

  सुंदर पुढच्या भागाची आतुरता आहेच.

  0
  1. Yogesh Daithankar

   लिंक ज्योतिष मार्गदर्शन ग्रुपवर दिली आहे, न विचारताच.

   0
   1. सुहास गोखले

    धन्यवाद श्री योगेशजी, काही हरकत नाही , आपल्या या मैत्रीपूर्ण सहभागामुळे काहीजणांना या केस्स्ट्डीच्या अभ्यासातून लाभ झाला तर इतकी मेहेनत घेऊन काही लिहल्याचे सार्थक झाले असे समजेन

    सुहास गोखले

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.