सकाळी फोन वर बोलल्या प्रमाणे खरेच संग्राम साडे चार च्या सुमारास हजर पण झाला! जेव्हा संग्राम असा ठरल्या वेळेत हजर होतो तेव्हा काम नक्कीच महत्त्वाचे असते!
“बोला संग्रामशेठ आज काय अर्जंट काम काढले म्हणायचे?”
“त्याचे असे आहे, सर..”
संग्रामने सांगायला सुरवात केली…
“आनंदराव म्हणजे माझा मामा आणि माझी आई ही दोघेच भावंडे, माझी आई मामा पेक्षा दहा वर्षांनी मोठी. माझा मामा महाउपद्व्यापी माणुस, अनेक उद्योग केले, बख्खळ पैसा कमावला. सडाफटिंग माणुस, लग्न नाही, संसार नाही, असाच आयुष्यभर आपल्या मस्ती बेबंद जगतोय. माझ्या आई खेरीज त्याला कोणतेही नातेवाईक नाहीत आणि मी त्याचा एकमेव भाचा … ”
संग्रामला मध्येच थांबवत मी म्हणालो..
“संग्रामशेठ जरा आपल्या नेमक्या प्रश्नाकडे वळूया का?”
“हो तर, त्याचे काय आहे, माझा मामा आता ५४ वर्षांचा आहे, म्हणजे तसे फार काही वय नाही त्याचे पण दारूच्या व्यसनाने घात केला, लिव्हर पार कामातून गेली आहे, सध्या हॉस्पिटल मध्ये अॅडमिट आहे, डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे आता जगण्या वाचण्याच्या फार काही आशा नाहीत ..”
“संग्रामशेठ, मामां बद्दलच्या तुमच्या भावना व काळजी मी समजू शकतो पण त्याचे काय आहे आजारपण, वैद्यकीय उपचार या सारख्या विषयांत ज्योतिषशास्त्र कमालीचे तोकडे आहे, तुमच्या मामांच्या बाबतीत जिथे तज्ञ डॉक्टरांनीच हात टेकलेले दिसतात तिथे आता ज्योतिषशास्त्र काय करणार? आणि मामा जगतात का वाचतात किंवा केव्हा जाणार असे विचारणार असाल तर स्पष्ट सांगतो मी कोणाच्या मृत्यूचे भाकीत करत नाही तसे करणे नैतिकतेत बसत नाही. तेव्हा आपला प्रश्न मामांची तब्बेत, उपचार, शस्त्रक्रिया, डॉक्टर किंवा औषधोपचार बदलणे, मामा बरे व्हावेत म्हणून उपाय-तोडगे किंवा मामांच्या ‘मृत्यू’ अशा कोणत्या संदर्भात असेल तर मला माफ करा मी उत्तर देऊ शकणार नाही”
“सर, आता काहीही केले तरी मामा काही वाचत नाही हे एव्हाना कळून चुकले आहे, त्यामुळे त्याच्या तब्येती संदर्भात, उपचारा संदर्भात, मृत्यू संदर्भात मला काही विचारायचे नाही”
“मग प्रश्न नेमका काय आहे?”
“खरेतर असा प्रश्न विचारणे देखिल चुकीचे ठरेल किंवा आपल्याला असा प्रश्न विचारल्याचा राग पण येईल. पण मी ही अशा अडचणीत आहे की मला हा प्रश्न विचारणे भाग पडते आहे”
“मला कळले नाही”
“माझी आई सोडल्यास मामाला कोणीही नातेवाईक नाही. माझ्या आईचेही गेल्या वर्षी निधन झाले, मी एकटाच म्हणजे मला कोणी भाऊ – बहीण नाही तेव्हा भाचा म्हणून मी मामाचा एकमेव वारसदार ठरतो, मामाची बरीच इस्टेट आहे, पैसा अडका आहे ते सर्व मला मिळेल का असा माझा प्रश्न आहे”
मला या प्रश्नाचा कमालीचा राग आला. अरे प्रसंग काय आणि हा माणूस विचारतोय काय. इकडे ती व्यक्ती मृत्यूच्या दारात उभी आहे आणि याचा मात्र त्याच्या इस्टेटीवर डोळा! खरे तर संग्राम ऐवजी दुसर्या कोणी हा प्रश्न विचारला असता तर त्याचे उत्तर देणे तर सोडाच उलट अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना करून पार हाकलून दिले असते, पण काही वेळा मनात असले तरी आपल्याला असे करता येत नाही. अनेक अवधाने सांभाळावी लागतात, माणसे राखावी लागतात, हितसंबंध जपावे लागतात, त्यातही संग्राम सारख्या इंफ्लुएन्शीअल माणसाला, राजकारणातल्या उगवत्या तार्याला असे फटकारणे योग्य ठरले नसते!
क्षणभर विचार करून मी म्हणालो…
“संग्रामशेठ, हा प्रश्नच पडायला नको, कारण तुम्ही म्हणता तसे तुमच्या खेरीज तुमच्या मामांना इतर कोणी वारसदार नसतील तर त्यांची इस्टेट तुम्हाला मिळू शकते, फक्त तुम्हीच तुमच्या मामांचे एकमेव वारस आहात हे कोर्टात जाऊन सिद्ध करावे लागेल इतकेच, पण मी काही वकील नाही तेव्हा माझ्या बोलण्या वर जाऊ नका, या बाबतीत एखाद्या वकिलाला भेटलात तर तुम्हाला जास्त अचूक मार्गदर्शन मिळेल”
“वकिलांना भेटलो आहेच, त्यांचे पण असेच मत आहे आणि मीच मामाचा एकमेव वारस आहे हे सिद्ध करणे सहज शक्य आहे, भरपूर कागदोपत्री पुरावे आहेत त्यासाठी”
“झाले तर मग, आता कसली अडचण आहे?”
“साधे, सरळ असे काही असते तर मी आपल्याला त्रास द्यायला आलो असतो का? इथे नुसती अडचण नाही तर महाअडचण आहे! त्याचे काय आहे, माझ्या मामाचे एका ‘बकुळा’ नामक स्त्री बरोबर बरीच वर्षे ‘तसले’ संबंध आहेत इतकेच नव्हे तर त्यांनी गुपचुपपणे लग्न केले आहे असा आमचा संशय आहे”
“अरे देवा”
“तर काय, मामाने जर खरोखरीच त्या बकुळाबाईंशी लग्न केले असेल तर मामांची पत्नी म्हणून त्याच मामाच्या वारस ठरतील आणि माझा पत्ता आपोआपच कट होईल. पण जर मामाचा बकुळाबाईंशी विवाह झाला नसेल किंवा विवाह झाला असला तरी तो सिद्ध करता येत नसेल तर मात्र माझे चान्सेस वाढतात. पण त्यांचा विवाह जरी झाला नसला तरी बाईं बरोबरचे इतक्या वर्षांचे ‘तसले’ संबंध पाहता मामा मृत्यूपत्र करून आपली सारी इस्टेट बकुळाबाईंच्या नावावर करू शकतो. मामाने जे काही कमावले आहे ते सारे स्वकष्टार्जित असल्याने मामाला असा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार आहे असे वकील म्हणतात”
“आता या बाबतीतला नेमका खुलासा तुमचे मामा स्वत: किंवा त्या बकुळाबाईच करू शकतील ना?”
“हाच तर सगळा तिढा आहे ना! ही माहिती मिळवणे अवघड आहे. तशा त्या बकुळाबाई मामाला भेटायला हॉस्पीटल मध्ये येत असतात पण सध्याच्या परिस्थितीत त्यांना किंवा मामाला त्यांच्या विवाहा बद्दल कसे विचारणार? आणि मरणाच्या दारातल्या व्यक्तीला मृत्युपत्र केले आहे का, असल्यास त्यात काय लिहिले आहे असे तरी कसे विचारणार?”
“संग्रामशेठ हे फारच गुंतागुंतीचे होते आहे, मला अजूनही वाटते या बाबतीत तुम्ही वकिलाचाच सल्ला घ्यावा हे उत्तम.”
“मला कल्पना आहे पण तरीही ज्योतिषशास्त्राच्या मदतीने काही अंदाज घेता येतो का हे पाहाण्या साठीच मी मोठ्या आशेने तुमच्या कडे आलो आहे, बघा काही सांगता येते का”
“कर्म माझे …”
कपाळावर हात मारून घेऊन हे इतकेच बोलणे माझ्या हातात होते!
संग्रामचा हा प्रश्न मला अनैतिक वाटला होता खरे, पण सांगतो, विवाह कधी होणार, लव्ह मॅरेज का अॅरेंज्ड मॅरेज, नोकरी कधी लागेल, सरकारी नोकरी मिळेल का, परदेशी जाण्याचे चान्सेस आहेत का या असल्या घिस्यापिट्या प्रश्नांची उत्तरे देऊन देऊन मी आता पार कंटाळलो आहे, पार पकून गेलो आहे म्हणा ना! त्या तसल्या प्रश्नां पेक्षा संग्रामचा हा प्रश्न जरासा नवा, वेगळा (फ्रेश!) आणि बकुळाबाईंच्या उल्लेखा मुळे काहीसा आव्हानात्मक देखील वाटला. तेव्हा ‘नैतिक – अनैतिक’ हा मुद्दा जरासा बाजूला ठेवून केवळ एक अभ्यास म्हणून या प्रश्ना कडे पहायला काय हरकत आहे असा विचार मनात आला.
“संग्रामशेठ या अशा प्रश्नाचे उत्तर देणे मला नैतिक वाटत नाही पण आपला प्रश्न जरा वेगळ्या घाटणीचा वाटला म्हणूनच एक अभ्यास म्हणून मी या बाबतीत काही विचार करेन. तुमची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण अशी सर्व माहिती माझ्याकडे आहेच, आता मामांची पण अशीच माहीती लागेल आणि शक्य झाल्यास बकुळाबाईंची माहिती पण”
“मामाची जन्मवेळ तर सोडाच जन्मतारखेचाही पत्ता नाही आणि बकुळाबाईचे म्हणाल तर … हॅ हॅ हॅ ”
“ही माहिती आवश्यक असते संग्रामशेठ, त्या शिवाय कसे काम करणार?“
“मग, तुमची ती प्रश्नकुंडली का काय म्हणतात ना ती मांडून बघता येईल का? मागे नाही का माझा जमीन विक्रीचा प्रश्न तुम्ही असाच प्रश्नकुंडली मार्फत तपासला होता”
“तेच, आता प्रश्नकुंडली हाच एकमेव मार्ग दिसतो आहे, बघू या मार्गाने काही उत्तर मिळते का, पण एक सांगतो, मी फक्त ‘मामांची इस्टेट तुम्हाला मिळेल का नाही’ याचेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेन, मामांची तब्येत , मृत्यू या बद्दल पत्रिकेतून दिसले – कळले तरी एक अवाक्षर पण बोलणार नाही, समजा इस्टेट तुम्हाला मिळणार असे दिसले तरी ती कधी मिळेल हे पण सांगणार नाही कारण त्याचा कालनिर्णय करणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या मामांच्या मृत्यूचे भाकीत केले असे होईल, बरोबर ना?”
“चालतयं की, इस्टेट मला मिळेल का नाही इतके जरी कळले तरी बरे होईल, पुढचे सेटींग मी बरोबर करेन!”
“संग्रामशेठ तुम्ही धन्य आहात”
…
संग्रामशेठचा प्रश्न जेव्हा मला नेमका समजला, सगळा खुलासा झाला ती तारीख, वेळ आणि नाशिक हे स्थळ वापरून मी एक प्रश्नकुंडली मांडली आणि त्यावर काम करायला सुरवात केली….
प्रश्न: “संग्राम ला त्याच्या मामांची इस्टेट मिळेल का?”
प्रश्न विचारला होता:
दिनांक: ११ ऑक्टोबर २०१८
वेळ: १७:१८:५३
स्थळ: नाशिक , 19 N 59 , 73 E 48
प्रश्नकुंडली कमालीची रॅडीकल असल्याने संग्रामची जन्मपत्रिका तपासायची आवश्यकताच भासली नाही. फक्त या एका प्रश्नकुंडलीचाच अभ्यास करुन मी उत्तर दिले,
ते कसे? त्याचा ताळा- पडताळा काय मिळाला हे आपण या लेखाच्या पुढच्या भागांत पाहू.
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020