मी कव्हरचे नमुने त्यांना पाठवून दिले…

लगेचच म्हणजे कव्हरची डीझाईन्स पाठवल्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांचा फोन! काय झटपट सर्व्हिस आहे नाही का!

“सु

हास, अभिनंदन! काय सुंदर डिझाईन्स केली आहेस, आमच्या आर्ट डिपार्ट्मेंट मध्ये मोठे कौतुक झालेय त्यांचे! पण सुहास, जराशी अडचण आहे. तुझे हे नमुने चांगले असले तरी ती आमच्या प्रिटींग प्रोसेसला योग्य नाहीत, अशी कव्हर्स प्रिंट करायला बर्‍याच अडचणीं येतात, खर्च वाढतो, पुस्तकाची किंमत पण वाढते. त्यापेक्षा असे करु या, म्हणजे डिझाईन्स तुझीच ठेऊयात पण ती आम्ही सुचवलेल्या फॉरमॅट मध्येच रुपांतरीत करायची. तसे झाले तर आमच्या स्टॅन्डर्ड प्रोसेस मध्ये छापता येतील , त्याने काम स्वस्तात तर होईलच शिवाय काम झटपट झाल्याने वेळेची बचत पण होईल”

“तुमचा फॉरमॅट काय आहे ? मला अडोबी फोटोशॉप, कोरेल ड्रॉ, अडोबी इल्युस्ट्रेटर चांगले माहीती आहे, तुमचा फॉरमॅट सांगीतला तर  त्या फॉरमॅट मध्ये कव्हर्स बनवून पाठवतो.”

“तिथेच तर अडचण आहे सुहास, आमच्या फॉरमॅट प्रमाणे कव्हर्स बनवण्यासाठी आमचे इन हाऊस डेवलप्ड सॉफ्टवेअरच xxxxxx हेच वापरावे लागेल, आणि दुर्दैवाने ते सॉफ्टॅवेअर आम्ही तुला देऊ शकत नाही, लायसेन्स चे इश्श्युज येतात ना !

“ मग हा तिढा सोडवायचा कसा ?”

“एकच उपाय आहे सुहास, आमची कव्हर डिझाईन सर्व्हिस ! नाही तसे तुझे डिझाईन तयारच असल्याने नव्याने काही एक करावयास लागणार नाही, काही किरकोळ बदल आणि फॉरमॅट कंव्हर्शन करायचे , बस्स्स , इतकेच काय ते काम राहीले आहे. म्हणून आम्ही तुला आमच्या नेहमीच्या कव्हर डिजाईन चार्जेस वर ५० % डिस्काऊंट देऊन फक्त १५,००० रुपयात कव्हर तयार करुन देऊ”

“हा खर्च करावाच लागेल का?”

“त्याला इलाज नाही सुहास, असे बघ, तुझे पुस्तक एका आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थे मार्फत प्रकाशीत होणार आहे , अशी संधी सहजासहजी मिळत नसते, आज आमच्या कडे शेकड्याने मॅन्युस्क्रीप्ट्स पडून आहेत. तुझे नशीब चांगले म्हणून तुला इतक्या झटपट रिस्पॉन्स मिळतोय! तेव्हा आता फारसा विचार करु नकोस. ही लाखमोलाची संधी तुझ्या हातातून कधीही निसटून जाऊ शकते.”

मी हिशेब सुरु केला , एडिटिंग चे ४५,००० , कव्हर चे १५,००० म्हणजे ६०,००० मी त्यांना द्यायचे ! एकीकडे त्या नावजालेल्या संस्थे मार्फत पुस्तक प्रकाशीत होणे हे तर मोठे भाग्यच म्हणायचे पण तरीही ६०,००० ! मी विचार करायला वेळ मागून घेतला…

यात काही काळ गेला.. त्यांचा पुन्हा फोन आला..

“सुहास, काय ठरवलेस?”

“मला हा खर्च जास्त वाटतो.. किंबहुना पुस्तकाचा विषय , अपेक्षित वाचकवर्ग आणि खपाचा अंदाज पाहता इतका खर्च करण्याची आवश्यकता नाही.”

“मला तुझे म्हणणे लक्षात येत आहे सुहास, पण कल्पना कर आमच्या सारख्या आंतरराष्टीय पातळीवरच्या दर्जेदार प्रकाशना मार्फत तुझे पुस्तक प्रकाशीत होणार आहे, मोठी प्रसिद्धी, मोठा वाचक वर्ग मिळणार आहे. तु मोठा नशिबवान आहेस सुहास, लेखन क्षेत्रात तुझे हे पहीलेच पदार्पण होतेय ते सुद्धा आमच्या सारख्या प्रकाशन संस्थे मार्फत. क्या बात हैं, आपले पुस्तक असे दिमाखात प्रकाशीत व्हावे असे तुला वाटत नाही का?”

“वाटते तर , पण खर्चाचे आकडे ऐकून मला काही सुचत नाही असे झाले आहे!”

“तुला विचार करायला वेळ लागत असेल तर आमची काही काळ थांबायची तयारी आहे. पण एखादा आठवडाच जास्तीतजास्त , आम्हाला याहुन जास्त वेळ थांबता येणार नाही, तुला कल्पना असेलच की आमची जगद्विख्यात प्रकाशन संस्था आहे, असंख्य प्रकल्प एकाच वेळी चालू असतात. आणि आम्ही देऊ करत असलेली संधी तशी पुन्हा लगेचच मिळेलच असे नाही. शेवटी तूच काय ते ठरव. वाटले तर पुढच्या आठवड्यात सविस्तर बोलू”

“हरकत नाही, आपण बोलूया , त्या आधी मी थोडा विचार करुन ठेवतो”

“साऊंड्स गुड, सुहास, पण त्या आधी मी तुला आमचे बाकीचे तपशील पाठवून देते, ते पण नजरेखालून घाल. म्हणजे पुढच्या आठवड्यातच आपण करारच करुन टाकू , काय ?”

“हरकत नाही”

दुसर्‍याच दिवशी त्यांच्या कडून मेल आली…

सुरवातच खर्चाच्या भल्या मोठ्या यादीने झाली ..

१> वेलकम ऑफर स्क्रिप्ट एडीटींग़ : ४५,०००
२> कव्हर डिझाईन फॉरमॅट कनव्हर्शन : १५,०००
३> मॅन्युस्क्रिप्ट प्रोसेसींग फी रु १०,०००
४> फाँन्ट लायसेंस फी : १०,०००
५> ऑथर – पब्लिशर एंगेजमेट अग्रीमेंट आणि लिगल चार्जेस १०,०००
६> ‘ऑथर्स क्लब’ मेंबरशीप वर्गणी १०,०००
७> ‘बुक प्रोमोशन प्लॅन’ इनरोल्मेंट चार्जेस १०,०००
८> ‘बुक ट्रेलर’ २५,०००
९> प्री लाँच प्रोसेसिंग १०,०००.

असे एकूण १,४५,००० अधिक यावर जे लागू होतील ते सरकारी कर !

पुस्तक ३०० पानांचे, ५.५ x ८.५ आकाराचे , रंगीत मुखपृष्ठ , आतला मजकूर काळ्या-पांढर्‍या छ्पाईत, कागदी बांघणी इ.

पुस्तकाची छापील किंमत त्यांनीच ठरवली होती २९.९५ डॉलर.

माझी रॉयल्टी ठरवली होती छापील किंमतीच्या ५% , म्हणजे १.४८ डॉलर (रुपये १००) त्यावर १५% टॅक्स विथहोल्डिंग केल्यानंतरची रॉयल्टी ८५ रुपये. त्यावर बँकेचे करन्सी कनव्हर्शन व इतर बँकींग चार्जेस वजा केल्यास

माझ्या बँक खात्यात शेवटी जमा होणार रुपये ८०!

पुस्तकाची पहीली एडिशन २००० प्रतींची.

म्हणजे सगळ्या २००० प्रती खपल्याच तर मला रुपये १,६०,०० मिळणार !

पुस्तकाचे पुनर्मुद्रण, भाषांतर, पुढील सर्व आवृत्त्या, किंडल किंवा तत्सम फॉरमॅट मधल्या इ-पब्लिकेशनचे हक्क असे सगळेच्या सगळे हक्क मी त्या प्रकाशन संस्थेला देऊन टाकायचे!!!

अवघ्या दोनच दिवसात त्यांचा फोन आला,

“सुहास , काय ठरले?”

“पुस्तकाची किंमत भारतीय चलनात किती असेल?”

“आम्ही २९.९५ अशी डॉलर मध्ये किंमत छापू , त्याचे भारतीय चलनात जे रुपांतर होईल ती त्याची भारतीय रुपयातली किंमत राहील”

“अहो मी भारतीय, माझे बहुतांश ग्राहक भारतातले मग किंमत डॉलर मध्ये ठेऊन कसे चालेल?”

“सुहास, त्याचे काय आहे, आम्ही लंडन, न्युयॉर्क आणि टोरांटो इथून काम चालवतो तेव्हा आम्ही प्रकाशीत केलेल्या पुस्तकांवर एकतर युरो, अमेरिकन डॉलर किंवा कॅनेडियन डॉलर मधल्याच किंमती असतात, भारतीय रुपयात किंमती आम्ही टाकू शकत नाही.”

“मग भारतातले लोक हे पुस्तक कसे विकत घेणार ?”

“अ‍ॅमेझॉम, बर्नेस नोबल!”

“म्हणजे ऑन लाईन “

“हो”

“२९.९५ डॉलर म्हणजे अंदाजे २,००० रुपये शिवाय हे पुस्तक परदेशातून, अमेरिकेतून पाठवले जाणार म्हणजे त्याचे ६ – १० डॉलर शिपिंग चार्जेस म्हणजे रु ४००- ७०० रुपये , म्हणजे भारतातल्या ग्राहकाला ते मिळणार रुपये २५०० च्या आसपास! इतके महाग पुस्तक कोण घेणार? इथे ३०० रुपये किंमत छापली तरी घेताना दहा वेळा विचार करतील लोक, शिपिंग़ घरुन २,५०० किंमत ऐकल्यावर भोवळ येऊन पडतील , कोणी घेणार नाही इतके महागडे पुस्तक. शिवाय हे असे ऑनलाईन पुस्तके मागवणे , ते ही परदेशातून , डॉलर मध्ये पेमेंट करुन , आमच्या इकडे फारसे रुजलेले नाही, माझ्या बर्‍याच वाचकांना हे असले काही जमणार नाही”

“तुझ्या भारतातल्या वाचकांना तुझे पुस्तक परदेशातून मागवावे लागणार नाही , त्यांना ते भारतातल्या अ‍ॅमेझॉन इंडीया , फ्लिपकार्ट , स्नॅपडील, रीडिफ , शॉपक्लुज, सपना यांच्याकडून ही मागवता येईल ना, भारतीय रुपयात पेमेंट करुन, फ्री शिपिंग ठेऊ आपण म्हणजे शिपिंग़ चार्जेस पण लागणार नाहीत, तेव्हढीच बचत! “

“अहो, शिपिंग चार्जेस चे काय घेऊन बसलाय , मूळ किंमतच २००० असल्याने बाकीचे विषयच संपले!”

“सुहास, पण पुस्तक फिजीकल शॉप्स मध्ये मध्ये लाँच होईल, अगदी भारतातल्या सुद्धा”

“पण भारतातल्या पुस्तकाच्या दुकानात काय किंमत असेल?”

“तिथे पण डॉलर २९.९५ द्यावे लागणार पण भारतीत रुपयां मध्ये कन्हर्ट करुन , म्हणजे अंदाजे रुपये २,०००! काही विक्रेते यावर ५% डिस्काऊंट देऊ शकतील ते धरल्यास १९०० रुपये!”

“अहो ही काहीच्या काही किंमत झाली हो !”

“आपल्याला ही किंमत आणखी कमी करता येईल ना!”

“कशी काय ?”

“तु असे कर , एक मोठा लॉट, कमीतकमी ३०० कॉपीज , आमच्याकडून डायरेक्ट ३५% डिस्कांऊट वर तुच खरेदी कर ना !म्हणजे तुला एक कॉपी १९.५० डॉलर, रुपये १,३०० प्रमाणे पडेल. आम्ही त्या स्वस्तात भारतात पाठवू, अमेरिका ते भारत खर्च एका प्रतिला साधारण पणे रुपये १५० येईल (३००+ प्रती आहेत हे गृहीत धरल्यासच) आणि आमच्या भारतातल्या वेअर हाउस पासुन तुझ्या घरापर्यंतचा खर्च रुपये ५० असे मिळून तुला एका कॉपीला रुपये २०० लागतील , म्हणजे हे शिपिंग़ धरुन ते पुस्तक तुला रुपये १५०० ला पडेल ! तू हे पुस्तक छापील किंमतीच्या (२०००) १५% डिस्काऊंट वर म्हणजेच रुपये १७०० ला विकलेस तरी तुला प्रती प्रत २०० तरी नक्कीच मिळणार बघ !”

“१७०० सुद्धा फार मोठी किंमत आहे”

“तुझे लिखाण दर्जेदार आहे ना , मग लोक घेतील ते या किंमतीला, आणि परदेशात सुद्धा विकले जाईलच ना?”

“मी परदेशातल्या खपा बद्दल आताच काही विचार करणार नाही, मुळात माझे पुस्तक हे भारतीय वाचक डोळ्यासमोर ठेऊनच लिहले आहे. पुस्तकाची मांडणी, उदाहरणे, समाजीक –आर्थिक संदर्भ , रिती रिवाजांचा उल्लेख सर्व काही इंडीया-स्पेसिफीक आहे. परदेशतल्या वाचकांना या गोष्टी समजणे काहीसे अवघड आहे. उत्सुकता म्हणुन माझे पुस्तक काहीजण वाचतील ही पण २००० प्रती खपण्या इतके त्यात पोटेंशियल नाही. माझ्या भरवसा भारतात होणार्‍या खपा वर आहे”

“सुहास, दुर्दैवाने डॉलर मधल्या किंमती बद्दल फारसे काही करु शकणार नाही. पण तरीही मी आमच्या ऑपरेशंस हेड शी बोलून बघते, बघु काही मार्ग निघतो का”

“चालेल”

आता प्रतिक्षा त्यांच्या कॉलची !….

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.