त्या प्रकाशकाने ‘घी’ तर दाखवले पण लगेचच ‘बडगा’ पण दाखवायला सुरवात केली. आता त्याने हळूच त्याच्या ‘टर्म्स आणि कंडीशन्स’ टाकल्या…

पुस्तक प्रकाशीत करण्यासाठी मी त्याला अपफ्रंट रुपये  ७५,००० द्यायचे! तो त्या बदल्यात , तो  ७५० प्रतींची पहीली एडिशन काढणार , ५.५ इंच x ८.५ इंच आकार, रंगीत कव्हर, काळ्या- पांढर्‍या छपाईतली साधारण ३००-३२५ पाने, साधा ट्रेड पेपर, कागदी बांधणी , पुस्तकाची छापील किंमत रु ३९५.

एकूण ७५० प्रतीं छापल्या जाणार, या पैकी लेखक म्हणून १०० प्रती मला  ‘ऑथर कॉपीज’ म्हणून मोफत मिळणार, बाकीच्या  ६५० प्रती तो प्रकाशक विकणार. जर मला १०० पेक्षा जास्त प्रती हव्या असल्यास त्या जादाच्या प्रती छापील किंमती च्या  ३०% डीस्काऊंट मध्ये म्हणजे प्रत्येकी रुपये २७६.५० ला विकत घ्याव्या लागणार.

मला दिलेल्या १०० प्रतींवर रॉयल्टी मिळणार नाही कारण त्या ‘ऑथर कॉपीज’ आहेत (म्हणे!) , उरलेल्या ६५० प्रतीं पैकी विकल्या गेलेल्या प्रत्येक प्रती वर ५% प्रमाणे, रुपये १९.७५ प्रती प्रत प्रमाणे रुपये १२,८३७ रॉयल्टी मिळणार!

आता माझा हिशेब असा:

६५० प्रतींवरची रॉयल्टी + १०० प्रतींची विक्री = १२,८३७७ + ३९, ५०० (१०० x ३९५) = ५२,३३७. मी आधीच ७५,००० खर्च केलेत म्हणजे चक्क २२,६६३ चा तोटा!हा तोटा आणखी वाढू शकतो, कारण माझ्या १०० प्रती ३९५ भावाने विकल्या जाणे अशक्यच, मी स्वत:च्या प्रयत्नाने विकायच्या म्हणले तरी मला लोकांना कमीतकमी १० % डिस्काऊंट द्यावेच लागेल , अ‍ॅमेझॉन , फ्लिपकार्ट सारख्या माध्यमातून विकले तरीही १५ ते २०% कट घ्यावा लागेलच , पुस्तकाच्या दुकानां मार्फत विकायचे तर ३०- ४०% डिस्काऊंट द्यावे लागेल. म्हणजे  विक्रीच्या अपेक्षित ३९, ५०० वर सरासरी २५% घट होणाराच, म्हणजे ९,८०० चा घाटा सहन करावा लागणार!

६५० प्रतीं वरची माझी रॉयल्टी प्रकाशक देणार ती देखील दोन वर्षानंतर जशी जशी विक्री होईल तशी, म्हणजे यात फसवणुकीला भरपुर वाव आहे, सगळीच्या सगळी रॉयल्टी मिळायची शक्यता अगदी कमी! निम्मी रॉयल्टी मिळेल असे धरले तर माझे नुकसान आणखी (अंदाजे) ६,००० ने वाढणार, म्हणजे या सर्व व्यवहारात माझे जवळ जवळ रुपये ३७,००० चे नुकसान होणार आहे!

आता समजा मीच उरलेल्या सर्व  ६५० प्रती विकत घेतल्या तर?

पहील्या १०० प्रती मला मोफत मिळणार, उरलेल्या ६५० प्रती मला ३०% डिस्काऊंट ने मिळणार म्हणजे त्यासाठी मला १,७९,७२५ मोजावे लागणार. मी प्रकाशकाला आधीच ७५,००० दिले असल्याने माझा एकूण खर्च २,५४,७२५ होणार. मला ६५० प्रतींवर रॉयल्टी म्हणून  १२,८३७. म्हणजे माझ्या फायनल खर्च  २,४१,८८८ असा होईल. आता माझ्या कडे  ज्या ७५० प्रती आहेत त्या मी छापील किंमतीला (३९५) विकल्या तरच मला ५४,३६२ चा नफा होणार,  पण प्रत्यक्षात हे कदापीही शक्य होणार नाही , काही प्रतीं १०% डिस्काऊंट देऊन विकता येतील तर काही २०% डिस्काऊंट वर विकाव्या लागतील,  शेवटी (नाविलाजाने!) बर्‍याचशा प्रतीं ४०% डिस्काऊंट ने जातील. म्हणजे सरासरी २५% डिस्काऊंट मध्ये या सर्व प्रतीं विकल्या जातील , यात मला २०,००० चा तोटा होणार! हे नुकसान आणखी वाढू शकतो ! कारण ह्या  ७५० प्रती विकल्या  जायला कदाचित तीन किंवा त्याहुनही जास्त वर्षे जातील, त्या दरम्यान माझ्या मुळ २,४१,८८८ च्या गुंतवणूकी वरचे बुडणारे व्याज (अगदी ६% दराने) गृहीत धरले तर या व्यवहारात प्रत्यक्षात ५०,००० रुपयांचा तोटा होणार!

इकडे हा प्रकाशक मात्र कोणताही गुंतवणूक न करता, कोणताही धोका न पत्करता चांगली कमाई करणार!

मुळात तो कबूल केल्याप्रमाणे ७५० प्रती छापेल का हीच मोठी शंका होती. तो जास्तीतजास्त ३०० प्रतीं छापेल, त्यातल्या १०० माझ्या तोंडावर फेकेल आणि गप्प बसेल.

पुस्तक छापायला एका प्रतीसाठी रुपये १५० प्रमाणे या हिशेबाने ३०० प्रतीं साठी जास्तीत जास्त रु. ४५,००० अधिक कव्हर डिझाइन (५,०००), एडिटींग (१०,०००) , टाइपसेटिंग़ (५,०००), ओव्हरहेड्स (५,०००) असा जादाचा खर्च २५,००० असा एकूण  ७०,००० खर्च येणार , जो मीच करणार होतो. म्हणजे एकही प्रत  खपली गेली नाही तरी त्याला घरबसल्या , आरामात रुपये ५,००० मिळणार आहेतच शिवाय मला १०० प्रती फुकट देऊन सुद्धा त्याच्याकडे २०० प्रती उरलेल्या आहेतच (त्याने ३०० प्रतीं छापल्या हे गृहीत धरले तर) त्या प्रती विकल्या गेल्याच तर त्याला फायदा होणारच आहे, तो असा:

छापील किंमत रु ३९५. उत्पादन खर्च नाही (जो मी आधीच सोसला आहे) फक्त विक्रेत्याचे कमीशन  ४० ०% दिले  , सरकारी कर, माझी रॉयल्टी ५% (प्रामाणीक पणे मला दिलीच तर!), काही ओव्हर हेड्स वजा करता त्याला एका प्रतिचे रुपये १०० तरी नक्कीच मिळणार!  म्हणजे त्याला त्याच्या कडच्या २०० प्रतींवर गेलाबाजार २५,००० तरी सुटणारच (आधीचे ५००० आहेतच ) !

समजा मी सर्वच्या सर्व ७५० प्रतीं उचलायची तयारी दाखवली तर त्याची चंगळच होणार!

७५० प्रतीं साठी त्याचा खर्च छपाई १,१२,५०० ( ७५० x १५०) , त्या शिवाय कव्हर डिझाइन (५,०००), एडिटींग (१०,०००) , टाइपसेटिंग़ (५,०००), ओव्हरहेड्स (५,०००) असा जादाचा खर्च २५,०००  एकूण  १,३७,५०० खर्च. माझ्या कडुन ७५, ००० आधीच मिळालेले आहेत, म्हणजे त्याची गुंतवणूक होणार ६२,५००. आता तो ६५० प्रती तो मला ७०% किंमतीला विकणार म्हणजे ६५० प्रतीं विकल्याचे त्याला १,७९,७२५ ( ६५० x ३९५  x ०.७०) , म्हणजे एकूण प्राप्ती १,७९,७२५ – ६२,५००= १,१७.२२५ ! त्यातुन माझी ६५० प्रतींवरची रॉयल्टी १२,८३७ वजा केल्यास त्याला त्या केस मध्ये १,०४,३८८ मिळणार , काही ओव्हरहेड्स, टॅक्सेस पकडले तरी ८०,००० ला मरण नाही !

ठीक आहे लेखक म्हणून नाव झाले , थोडा व्यवसाय वाढला , पुढच्या पुस्तका साठी अनुकूल पार्श्वभुमी तयार झाली हा अप्रत्यक्ष लाभ आहे हे मान्य! अप्रत्यक्ष मिळणारे लाभ लक्षात घेऊन मी हे सर्व कदाचीत स्विकारले पण असते पण प्रकाशकाच्या इतर अटीं जाचक होत्या:

त्यात या पुस्तकाच्या आगामी सर्व रिप्रिंट / नव्या एडीशन चे सर्वाधिकार मला त्या प्रकाशकाला द्यावयाचे होते, मला हे पुस्तक त्या प्रकाशका शिवाय दुसर्‍या कोणाकडेही प्रकाशनाला देता येणार नव्हते (कायमचे). प्रकाशनाचे , भाषांतराचे , अन्य माध्यमातून  प्रकाशनाचे ही सर्व हक्क मी त्या प्रकाशकाला कायमचे देऊन टाकायचे होते.

म्हणजे ४०, ०००+ नुकसान सोसुन ते पुस्तक सर्व हक्का सहीत विकायचे !


प्रकाशकाचे एकच म्हणणे होते…

“देखो भाई, आपका ये पेहेला बुक है, आपका नाम किसिने सुना तक नहीं, क्या गारंटी ये किताब बिकेगी? बडी रिस्क हैं.. वैसे तो अ‍ॅस्टॉलॉजी वाली किताब जादा बिकती नहीं, लेकिन आप का सबजेक्ट जरा अलग सा हैं  , बहोत कम किताबें हैं इस बारे में इसलिये हम पब्लिश कर रहें है वरना… अगर ये किताब बिकी तो अगले एडीशन के लिए हम आपसे पैसा नहीं लेगे और आपकी रॉयल्टी बढायेंगे …”

अर्थात हा असला आतबट्ट्याचा व्यवहार मला पसंत पडला नाही !आता काय करायचे … दुसरा कोणी प्रकाशक भेटतो का ते पाहावयाचे…

मी नेमका तोच शोध चालू ठेवला आणि एके दिवशी अचानक……

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
  1. pramod

    Chaan aani upyukt Mahiti Sangitali tumhi…ha formula vyavaramadhe khup thikani lagu hoto …….
    dhanyawad

    0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.