मी रोज जॉगिंगला जातो, तिथे नियमीत येणार्‍या अनेकांशी माझ्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. श्री जैन त्यातलेच एक. ते माझ्या कडे ज्योतिष विषयक मार्गदर्शना साठी नेहमीच येत असतात, त्यांचे, त्यांच्या धाकट्या भावाचे, मेव्हण्याचे सगळ्यांचे काम माझ्याकडे असते, एखादा फॅमिली डॉक्टर असतो ना तसा मी या जैन कुटूंबियांचा ‘फॅमिली ज्योतिषी’ आहे!

२०१९ च्या एप्रिल मध्ये हे जैन कुटंबिय राजस्थानात तीर्थयात्रेला गेले होते, तिथून त्यांचा फोन आला.

“सरजी, एक अर्जंट प्रश्न पाहायचा आहे”

“काय आहे?”

“आम्ही सध्या जयपूर जवळच्या एका लोकेशन वर आहोत, सिझन असल्याने टुरिस्ट लोकांची गर्दी आहे सगळी चांगली लॉजेस फुल्ल झालीत शेवटी एक डबडा लॉज मिळाले कसेबसे, कसल्याही सोयी नाहीत एकदम थर्ड क्लास सर्व्हिस, साधी लॉन्ड्री फॅसिलिटी नाही हो. शेवटी जवळच्या एका टपरी सारख्या ठिकाणी नाईलाजाने कपडे धुवायला दिले.”

मला कळेना हे काय पाल्हाळ लावलेय, लॉज काय, लॉन्ड्री काय … मी वैतागून विचारलेच ..

“ते ठीक पण तुमचा प्रश्न काय?’

“तोच सांगतो ना, लॉन्ड्रीवाल्याला कपडे दिले त्यात माझा एक शर्ट पण होता, शर्ट तसा जुनाच आहे पण माझा लक्की शर्ट आहे तो, लॉन्ड्रीवाल्याने बाकी सगळे कपडे धुवून इस्त्री करुन आणुन दिले फक्त तो शर्ट गायब केला. विचारले तर म्हणतो कसा, तुमचा तो शर्ट माकडाने पळवून नेला!”

“माकडाने शर्ट पळवला?”

“हो ना, आता माकड कशाला शर्ट पळवेल? खाण्यापिण्याची चीज असेल तर समजू आपण पण कपडा? तो लॉन्ड्रीवाला खोटे बोलतोय, तो शर्ट त्याच्या कडेच आहे, माकडाने पळवला असे खोटेच सांगतोय”

“त्या लॉन्ड्रीवाल्याला जरा दमात घेऊन विचारा ना”

“ते करुन झाले पण त्याचे आपले एकच म्हणणे शर्ट माकडाने पळवला”

“बरे मग आता मी काय करायचे या बाबतीत?”

“तुमची काय ती प्रश्नकुंडली का काय म्हणता ना ती मांडून बघा ना माझ्या या शर्ट च्या बाबतीत नेमके काय झाले ते”

“जाऊ द्या हो, प्रवासात अशा वस्तू हरवणे, मोडतोड होणे, भुरट्या चोर्‍या असले प्रकार होतच असतात, नाही तरी शर्ट जुनाच होता ना, त्याचे काय इतके मनाला लावून घेता?”

“असे कसे, चोर सापडलाच पाहिजे”

“आता माकडाने शर्ट पळवला असेल तर त्याला कसा पकडणार आणि शिक्षा तरी काय देणार, जाऊ दे ना, समजा हनुमानजींना नैवेद्य म्हणून आपण एक शर्ट चढवला!”

“का म्हणून, माकड असले म्हणून काय झाले, चोर सापडलाच पाहिजे, शर्ट वापस मिळालाच पाहिजे”

“मग पोलिसां कडे जा, ते काढतील त्या माकडाला हुडकून!”

“सरजी, ते पण केले, पोलिस सगळे एकजात हसायला लागले, मला चक्क हाकलूनच दिले”

खरे तर मला पण हसू आवरत नव्हते! एक जुना शर्ट तो काय, एक माकड पळवून काय नेते आणि त्या साठी हे मला जयपूर हून फोन करुन विचारतात, सगळेच हास्यास्पद होते. पण वरकरणी क्षुल्लक, टाकावू वाटणार्‍या वस्तूत देखील माणसाच्या भावना गुंतलेल्या असतात. आता माझेच बघा ना, माझ्या कडे माझ्या आजोबांचा मोडका तोडका चष्मा आहे, आजोबांची आठवण म्हणून अगदी जपून ठेवला आहे, तो मोडका चष्मा भंगारवाला देखील घेणार नाही पण माझ्या दृष्टीने त्याचे मोल अनमोल आहे. इथेही तसेच असावे असा विचार करुन मी हसू आवरले.

चोरीस गेलेल्या वस्तूं साठी मी अनेक वेळा प्रश्नकुंडल्या मांडून उत्तरे दिली आहेत, चोरीस गेलेली वस्तू कोठे असेल? सापडेल का? चोर कोण/कसा असेल? याची वर्णने केली आहेत, पण इथे चोर तर चक्क एक माकड होते हो!

शेवटी हो ना करत मी जातकाने विचारलेल्या वेळेची, नाशिक मुक्कामाची पत्रिका मांडलीच!

पत्रिका शेजारी दिली आहे ,

 

08 Apr 2019 ; 14:21:48 ; Nashik
पत्रिका सायन भावचलित आहे , Regiomontanus हाऊसेस , Mean Node

 

आता नाही म्हणले तरी गेली कित्येक वर्षे मी ज्योतिष मार्गदर्शन करतो आहे अक्षरश: हजारांच्या घरात प्रश्नकुंडल्या नजरे खालून गेल्यात त्या मुळे प्रश्नकुंडली आली की नजर सफाईने फिरते आणि बर्‍याच वेळा सगळा खुलासा काही क्षणात होतो, उत्तरा पर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागत नाही. याचा अर्थ प्रश्नकुंडली सोप्पी असते, पटापट, पाच मिनिटांत उत्तरें मिळतात असा गोड गैरसमज मात्र करून घेऊ नका, मला जमू शकते याला कारण त्या मागे माझी गेल्या २० वर्षांची तपश्चर्या आहे हे लक्षात घ्या!

या प्रश्ना बाबतही असेच झाले, अगदी चटकन खुलासे होते गेले आणि अवघ्या पाचेक मिनीटात मी उत्तर शोधले सुद्धा! पण ही एक केस स्ट्डी म्हणून मांडत असल्याने, त्यावेळी जी गणितें मी अत्यंत वेगाने केली, जे अडाखे / नियम झपाट्याने वापरले ते सर्व आता खुलासेवार, स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपल्या समोर मांडतो.

जातकाचा प्रश्न नीट समजावून घेतल्या नंतर या प्रश्नाचा कसा विचार करायचा याची मी एक स्ट्रॅटेजी म्हणजेच रणनीती ठरवतो. या प्रश्नातला कळीचा मुद्दा नेमका कोणता हे ठरवतो आणि मग त्या अनुषंगाने कोणते घटक महत्त्वाचे कोणते कमी महत्त्वाचे हे ठरवतो. ही पायरी अत्यंत मह्त्त्वाची असते यामुळे फाफट्पसारा दूर होऊन नेमक्या निवडक दोन – चार घटकां वरच लक्ष देणे सोपे जाते. यात वेळ आणि मेहेनत तर वाचतेच शिवाय कामात नेमके पणा आल्याने उत्तर अचूक मिळण्याची शक्यता वाढते.

इथे मी ठरवले की प्रथम चोरी कोणी केली? माकडाने का लॉन्ड्रीवाल्याने हे आधी ठरवावे मग चोरलेली वस्तू (शर्ट) आणि संभाव्य चोर सध्या कोठे आहेत / काय करत आहे हे बघावे आणि शेवटी चोरलेली वस्तू त्याच्या मालकाला परत मिळेल का ? कशी ? केव्हा? या बाबत विचार करावयाचा.
चला तर मग याच रणनीती नुसार या शर्ट चा आणि त्या चोराचा (माकडाचा?) शोध घेऊ…

*** या खेळात आहेत तरी कोण कोण? ***

१) जैन
२) जैनांचा शर्ट
३) लॉन्ड्रीवाला
४) माकड!

पत्रिका १५ सिंह लग्नाची आहे.
शनी षष्ठात आहे
चंद्र व्हाईड ऑफ कोर्स आहे

लग्नात कोणताही ग्रह नाही म्हणजे लग्नेश रवी, चंद्रा सह जातकाचे प्रतिनिधित्व करणार.

रवी नवम (९) स्थानात आहे , नवम स्थान हे तीर्थयात्रेचे स्थान, श्री जैन त्या साठीच तर गेले आहेत. पत्रिका रॅडीकल आहे!

जैनांचा शर्ट द्वितीय (२) स्थानावरुन (वैयक्तीक जंगम मालमत्ता), बुधाची कन्या रास या स्थानावर आहे, या स्थानात कोणताही ग्रह नाही म्हणून द्वितीयेश बुध म्हणजे ‘शर्ट’.

लॉण्ड्रीवाला एक तर परकी व्यक्ती म्हणून सप्तम (७) स्थानावरुन पाहावा लागेल किंवा कारागीर / नोकरचाकर / फुटकळ सेवा देणारी व्यक्ती म्हणून षष्ठम (६) स्थानावरूनही पाहता येईल. पत्रिकेत षष्ठम स्थानावर शनीची मकर आणि सप्तमावर शनीची कुंभ रास आहे, म्हणजे परकी व्यक्ती अथवा नोकरचाकर असा कसाही विचार केला तरी लॉन्ड्रीवाल्याचा प्रतिनिधी शनीच होणार !

*** आता माकडाचे काय? ***

माकड हा तसा लहान आकाराचा पाळीव प्राणी (माकड पाळतात म्हणे!) म्हणून तो षष्ठम (६) स्थानावरुन पहायचा का? पण हे माकड पाळीव प्राण्यात मोडत असले तरी ते काही जैनसाहेबांनी पाळलेले नाही. मग हे माकड कोणत्या स्थानावरुन पहावयाचे हा प्रश्नच पडला!

शेवटी सप्तम (७) स्थान लॉन्ड्रीवाल्याला आणि षष्ठम (६) स्थान त्या माकडाला द्यायचे ठरवले. षष्ठम स्थानात शनी आहे, दुसरा ग्रह नाही (केतू आणि प्लुटो या स्थानात असले तरी होरारीत या दोन्ही ग्रहांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रघात नाही) म्हणजे षष्ठमेश शनीच या माकडाचा प्रतिनिधि होणार!

आता माकड आणि लॉन्ड्रीवाला दोघांचाही प्रतिनिधी एकच म्हणजे शनीच आहे. आता काय करायचे? एकदा वाटले कदाचित ते माकड लॉन्ड्रीवाल्याने पाळलेले असावे आणि त्या माकडाला कपडे पळवायचे ट्रेनिंग दिले असावे! प्रशिक्षीत (?) माकडां कडून चोर्‍या करवून घेतल्या गेल्याच्या काही सुरस कथा मी वाचल्या आहेत! म्हणजे ते माकड आणि तो लॉन्ड्रीवाला एक टीम म्हणून काम करत असावेत आणि म्हणुनच त्या दोघांचा प्रतिनिधि एकच आला असावा!

पण हे काही मला पटले नाही! प्रशिक्षीत (?) माकड वगैरे असते तर या माकडा करवी एक जुना शर्ट कशाला पळवला जाईल? पळवायचा तर एखाद नवा, भारीतला कपडा पळवला गेला असता ना?

सामान्यत: चोरा साठी ‘बुध’ हा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो. पण इथे तसे करायची पण सोय नव्हती! कारण बुध हा आधीच जैनांच्या शर्ट चा प्रतिनिधी म्हणून आला आहे!

साला या माकडाचे काय करायचे ही मोठी चिंता लागून राहीली, त्या माकडाने जैनांना काय त्रास दिला असेल त्या पेक्षा जास्त त्रास ते आता मला जयपूरात बसून (कदाचित जैनांचा पळवलेला शर्ट परिधान करुन! ) देत आहे!

शेवटी मी या माकडाला जरा बाजूला ठेवायचे ठरवले कारण आपल्या रणनीती नुसार प्रथम जैनांचा शर्ट खरेच त्या माकडाने पळवला की लॉन्ड्रीवाल्याने माकडाचा बहाणा करत तो शर्ट स्वत:च गायब केला याचा फैसला करु मग गरज पडल्यास त्या माकडाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करू, कसे?

जैनांचा शर्ट गायब झाला असेल (माकडाने पळवला असेल तर) किंवा लॉन्ड्रीवाल्यानेच चोरला असेल. नेमके काय झाले असेल ते पाहण्यासाठी आपल्याला त्या लॉण्ड्रीवाल्याचीच साक्ष काढायला पाहिजे.

एकतर लॉन्ड्रीवाला खरे बोलत असेल म्हणजे खरोखरीच शर्ट त्या माकडाने पळवला असेल किंवा लॉन्ड्रीवाल्यानेच तो शर्ट स्वत: जवळ ठेवून त्या (बिचार्‍या) माकडावर आळ घेतला असावा!

म्हणजे तो लॉन्ड्रीवाला खरे बोलत आहे की खोटे याचा निवाडा करू शकलो तर आपोआपच चोर कोण आहे हे समजेल आणि शर्ट वापस मिळेल का नाही ते पण पाहता येईल.

शनी लॉन्ड्रीवाल्याचे प्रतिनिधीत्व करत आहे, शनी पापग्रह मानला जात असला तरी सत्यप्रिय, न्यायप्रिय ग्रह आहे त्याच्या हातून असे खोटे बोलणे म्हणा पापाचरण म्हणा होणार नाही. त्यात इथे शनी स्वराशीत मकरेत आहे. सप्तमावरुन लॉन्ड्रीवाला पाहणार आहोत आणि त्याचा प्रतिनिधी शनी षष्ठम (६) स्थानात म्हणजे लॉन्ड्रीवाल्याच्या व्यय स्थानात (१२) असणे हे काही चांगले लक्षण नाही. पण त्यावरुन तो खोटे बोलत आहे असा तर्क करता येत नाही, जैनांनी त्याच्यावर चोरीचा आळ घेतला आहे त्यामुळे हा लॉन्ड्रीवाला सच्चा असेल तर खोटा आळ आल्याने अपमानित होणे स्वाभाविक आहे, असा नाहक आरोप झाल्या मुळे असेल तो सध्या दडपणा खाली असण्याची शक्यता आहे (जैन या संदर्भात पोलिसांना भेटले होते) असाही याचा अर्थ निघू शकतो.

लॉण्ड्रीवाल्याचा प्रतिनिधी शनी असणे आणि तो स्वराशीत असणे ही एक बाब लॉन्ड्रीवाल्याचा पक्षात आहे हे मान्य असले तरी काही वेळा अगदी चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा दुर्बुद्धी आठवते आणि काहीतरी चुकीचे करुन बसतात! इथे तसे झाले आहे का? आता लॉन्ड्रीवाला जे सांगतो ती बातमी खरी का खोटी (अफवा!) हे पाहू,

पत्रिकेतले चारही अँगल्स (लग्न, चतुर्थ , सप्तम आणि दशम भावारंभ बिंदू) अनुक्रमे सिंह, वृश्चीक, कुंभ आणि वृषभ राशींत आहे या सार्‍या स्थीर राशीत आहेत. चंद्र पण स्थीर राशीत आहे. याचा अर्थ ‘शर्ट माकडाने पळवला’ ही बातमी खरी असण्याची शक्यता आहे. ‘बातमी/ अफवा / संवाद’ आपण तृतीय (३) स्थानावरून पाहतो, इथे तृतीय स्थानावर शुक्राची तूळ रास आहे, भावेश शुक्र या बातमीचा प्रतिनिधी आहे, शुक्रा हा जात्याच शुभ ग्रह आहे, तो अष्टमात (८) असला तरी मीनेत या उच्च राशीत असून कोणत्या पापग्रहाने दूषीत नाही. यावरूनच बातमी खरी आहे, शर्ट माकडाने पळवला असे जे लॉण्ड्रीवाला जे सांगतो आहे ते खरे आहे असे मानायला काही हरकत नाही.

*** चला एक निकाल लागला, ते माकडच चोर आहे! आता याला कसा पकडायचा? ***

माकडाच आणि लॉन्ड्रीवाल्याचा प्रतिनिधी एकच आहे, म्हणजे माकड त्या लॉन्ड्रीवाल्याच्या ओळखीचे, नेहमीच्या उठण्या बसण्यातले आहे की काय? ओळखीचे माकड? ते माकड आणि तो लॉन्ड्रीवाला संध्याकाळी आपली कामेधामे (?) संपल्या नंतर, पळवलेल्या शर्ट , साड्या आणि पॅट्स चा हिशेब लावून झाल्यावर, निवांत हँसी मजाक करत हुक्का ओढत बसलेले आहेत हे चित्र डोळ्या समोर उभे करत मी उगाचच हसून घेतले!

*** आता आपण त्या ‘शर्ट’ कडे लक्ष देऊ. ***

शर्ट ही वैयक्तीक वापरातली वस्तू असल्याने ती आपण पत्रिकेतल्या द्वीतीय स्थानावरुन पाहणार आहे, द्वितीय स्थानावर बुधाची कन्य राश आहे, द्वितीय स्थानात कोणताही ग्रह नसल्याने एकटा ‘बुध’ हा त्या शर्ट चे प्रतिनिधित्व करणार आहे.

बुध अष्टम (८) स्थानात २० मीन ५२ अंशावर आहे. बुधाचे अष्टम स्थानात असणे लक्षवेधी आहे, कारण हे स्थान जातकाच्या नुकसानीचे , मन:स्तापाचे स्थान आहे.

आता हा शर्ट माकडाने पळवला असेल तर तो त्या माकडा कडे असणार किंवा लॉन्ड्रीवाल्याने चोरला असेल तर तो त्याच्याकडे असणार. माकड आणि लॉन्ड्रीवाला यांचा प्रतिनिधि एकच आहे आणि तो म्हणजे शनी, हा शनी षष्ठम (६) , २० मकर ०८ अंशावर आहे! म्हणजे २० मीन ५२ वरचा बुध (शर्ट) आणि २० मकर ०८ वरचा शनी (लॉन्ड्रीवाला/ माकड) यांच्यात अगदी नुकताच लाभ योग होऊन गेला आहे, बुध जलद गतीचा ग्रह असल्याने तो शनीशी लाभ योग करुन जरासा म्हणजे फक्त ४४ कला पुढे सरकला आहे , हे अंतर इतके कमी आहे की हे दोन्ही ग्रह या लाभयोगाच्या दिप्तांशातच आहेत म्हणजे त्या अंगाने ते अजूनही लाभ योगातच आहेत असे समजले तर फारसे चूकीचे ठरणार नाही. याचा अर्थ शर्ट अजूनही त्या माकडाकडे किंवा लॉन्ड्रीवाल्याकडेच असणार.

लॉन्ड्रीवाला खोटे बोलत नाही हे आपण ठरवले आहेच त्यामुळे शर्ट त्या माकडा कडेच असणार! आता माकड काही तो शर्ट घालून मिरवणार नाही त्यामुळे त्याने तो शर्ट कोठेतरी फेकून दिला असणार हे नक्की!

*** आता माकडाने फेकलेला शर्ट शोधला तर सापडेल का? ***

आधी त्या माकडाने शर्ट कोठे फेकला असावा याचा एक अंदाज घेऊ.
चोरीस गेलेली वस्तू बघायची असेल तर त्या वस्तूचा प्रतिनिधी जो ग्रह असेल तो कोणत्या भावात आहे, तिथे कोणती रास आहे आणि प्रतिनिधीचा राशी स्वामी यांचा एकत्रित अभ्यास करुन निर्णय घेता येईल.

बुध चोरलेल्या वस्तू चा म्हणजे शर्ट चा प्रतिनिधी तो स्वत:चाच कन्या राशीत आहे, बुध अष्टमात आहे आणि अष्टमावर मीन रास आहे. मीन रास आणि अष्टम स्थान यांचा मेळ घातला तर असे दिसते की हा चोरलेला शर्ट:

१) पश्चिम दिशेला पण जरासे दक्षिणे कडे सरकलेला भाग, म्हणजेच ‘साऊथ वेस्ट’ दिशेला सापडेल
२) वस्तू फार लांबवर गेलेली नाही (नेण्यात आली नाही) सापडली तर जवळच/ जवळच्या परिसरातच सापडेल.

दिशा आणि जागा (लोकेशन) हे लॉन्ड्रीवाल्याची टपरी हा केंद्र बिदू धरुन मानायच्या कारण शर्ट सगळ्यात शेवटी तिथे बघितला गेला होता.

३) वस्तू फार उंचावर नसेल, बहुदा अगदी जमिनी लगतच असेल (हे स्वाभाविकच आहे, माकडाने पळवलेला शर्ट फेकून दिला असणार आणि तो जमिनीवर पडलेला असणार)
४) वस्तू साधारण अशा ठिकाणी सापडायची शक्यता आहे:
जमिनीवर
नदी काठ किंवा तलाव, नाला, ओढा, कॅनाल, मोठे पाण्याचे डबके, पोहोण्याचा तलाव यांच्या काठावर
चिखल, दलदल, ओल असलेली पाणथळ जागा
पाईप लाईन्स , मोठा दवाखाना, रसायनांचा कारखाना, सांडपाण्या वर प्रक्रिया करण्याची जागा
सिनेमा थेएटर , फोटो स्टुडीओ

या वरुन हे एक सिद्ध झाले की शर्ट त्या लॉन्ड्रीवाल्या कडे नाही, तसे असते तर ती जागा वेगळी आली असती, इस्त्री, कपडे धुण्याची भट्टी हा प्रकार उष्ण , दमट मध्ये मोडतो, चोरलेला शर्ट तो लॉन्ड्रीवाला जमिनीवर नक्कीच टाकणार नाही, तो कोठेतरी कपाटात, ट्रंकेत, इतर कपड्यांच्या ढिगार्‍यात लपवून ठेवेल. आपल्या जे जागेचे संकेत मिळालेत त्यात ही लॉन्ड्रीवाल्याची जागा बसत नाही.

म्हणजे शर्ट नक्की त्या माकडानेच पळवला आहे!

*** शर्ट आपण अंदाज केलेल्या जागी शोध घेतला तर सापडेल का? ***

शर्ट जर सापडणार असेल ना तर जातकाचे प्रतिनिधि आणि शर्ट यांच्यात कोणता तरी योग व्हायला पाहीजे. रवी म्हणजे जातक आणि बुध म्हणजे शर्ट दोघेही पाठोपाठच्या राशीत म्हणजे मीन व मेषेत असल्याने जातकाला शर्ट वापस मिळणार नाही.

*** त्या शर्ट चे शेवटी काय होणार? ***

हरवलेल्या / चोरीस गेलेल्या वस्तुं बाबत त्या वस्तुचा शेवट कसा होतो हे पाहीले तर काही सुगावा लागू शकतो.

शर्ट द्वितीय (२) स्थानावरुन त्याचे चतुर्थ (४) स्थान त्याचा शेवट म्हणजे पंचम (५) स्थान. पंचमावर गुरु ची धनु रास, पंचमेश गुरु पंचमातच आहे, २० मीन ५२ वरचा बुध (शर्ट) आणि २४ धनू २० वरचा गुरु (शर्टची अखेर) यांच्यात केंद्र योग होते आहे आणि त्याच्या जरासे आधी बुध आणि २३ मकर ०५ वरचा प्लुटो यांच्यात लाभ योग होते आहे. याचाच अर्थ शर्ट नष्ट होणार आहे म्हणजेच सापडला तरी वापरण्याच्या लायकीचा राहणार नाही!

*** हे बघत असताना मला एक ग्रहयोग दिसला. ***

१८ मेष १४ वरचा रवी (जैन) आणि २० मकर ०८ वरचा शनी (लॉन्ड्रीवाला किंवा माकड) यांच्यात अगदी २ अंशात केंद्र योग होणार आहे म्हणजे जैन आणि माकड किंवा जैन आणि लॉन्ड्रीवाला यांच्यात पुन्हा एकदा संवाद होणार म्हणजेच काहीतरी वाजणार! आता इथून तिथून सगळी माकडं दिसायला एक सारखीच तेव्हा नेमक्या कोणत्या माकडाने शर्ट पळवला हे कसे कळणार (जर ते माकड जैनांचा पळवलेला शर्ट घालून बसत असेल तर गोष्ट वेगळी!) आणि माकडाशी काय आणि कसे भांडणार हो! म्हणजे हे वाजणार आहे ते जैन आणि लॉन्ड्रीवाल्यातच.

आता शर्ट माकडानेच पळवलेला असेल तर त्या लॉन्ड्रीवाल्याशी भांडून तरी काय उपयोग, हां, पण जैनांचा स्वभाव पाहता ते त्या लॉन्ड्रीवाल्याशी हुज्जत घालून हरवलेल्या शर्टची किंमत वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

*** जैन त्या लॉन्ड्रीवाल्याशी हुज्जत घालून नुकसान भरपाई मिळवतील? ***

जैन आपण प्रथम (१) स्थानावरुन पहिले, त्यांचा पैसा त्यांच्या द्वितीय स्थानावरून म्हणजेच द्वितीय (२) स्थान , वसुळी माकडा कडून शक्यच नाही, माकड कोणते पैसे देणार फार शेपटी पिरगाळली तर एखादे केळे आणून देईल ! म्हणजे वसुली करायचीच तर ती त्या लॉन्ड्रीवाल्या कडूनच केली जाईल.

लॉन्ड्रीवाला आपण सप्तमस्थाना वरून पाहीला, म्हणजे त्याचा पैसा आपण त्याच्या द्वितिय स्थानावरून म्हणजे अष्टम (८) स्थानावरून पाहावा लागेल. अष्टम स्थानावर गुरूची मीन राशी आहे, अष्टमात बुध, शुक्र आणि नेपच्युन आहेत. या पैकी बुध आधीच शर्ट आणि जातकाचा पैशाच्या प्रतिनिधी आहे, नेपच्युन बाह्य ग्रह असल्याने त्याला प्रतिनिधीत्व मिळणार नाही, गुरू भावेश आहे आणि शुक्र हा पैशाचा नैसर्गिक प्रतिनिधी आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त प्रतिनिधी येतात तेव्हा भावेशाला प्राधान्य देण्याचा प्रघात आहे.

गुरूचा (लॉन्ड्रील्याच्या पैशाचा प्रतिनिधी) जातकाशी किंवा जताकाच्या पैशाशी योग व्हायला हवा, गुरु २४ धनू २० वर आहे आणि त्याचा १८ मेष १४ वरच्या रवी (जातक) बरोबर नवपंचम होत आहे. म्हणजे जैन काहीही करुन त्या बिचार्‍या लॉन्ड्रीवाल्या कडून आपल्या गहाळ झालेल्या शर्ट ची नुकसान भरपाई मिळवणार!

***** मी जैनांना कळवले: *****

१) लॉन्ड्रीवाला खरे बोलत आहे , आपला शर्ट खरोखरीच माकडाने पळवला आहे.
२) त्या माकडाने आपला शर्ट जरासे खेळून फेकून दिला आहे आणि मी सांगतो त्या जागी सापडण्याची शक्यता आहे (इथे मी वर दिल्या जागा व दिशा बद्दल सांगीतले)
३) शर्ट सापडला तरी तो फार फाटून गेला असेल आणि वापरण्याच्या लायकीचा सुद्धा राहीलेला नसेल.

इथे मी त्या नुकसान भरपाई बद्दल मुद्दमच बोललो नाही, त्या गरीब बिचार्‍या, एका टपरीत लॉन्ड्री करणार्‍या व्यक्तीस नाहक त्रास होऊ नये असे मला वाटले. धुवायला दिलेला शर्ट नीट सांभाळणे ही त्या लॉन्ड्रीवाल्याची एक व्यावसायिक म्हणून जबाबदारी बनते हे मान्य पण अनावधाने झालेल्या या चुकीची, खरेतर अपघाताची शिक्षा त्याला होऊ नये असे मला वाटले.

काही दिवसांनी जैन नाशकात परत आले, जॉगींग ट्रॅक वर त्यांची माझी भेट झाली, मी काही विषय काढला नाही पण त्यांनीच सांगीतले. ते असे:

***** नतिजा *****

१) शर्ट माकडानेच पळवला होता.
२) एका पाण्याच्या पाईपलाईनवर सापडला
३) माकडाने त्या शर्टच्या पार चिध्या करुन टाकल्या होत्या त्याचे दोन तुकडे कसेबसे सापडले.
४) लॉन्ड्रीवाल्याला धाक दाखवून चक्क १०० रुपये वसूल केले, खरे तर जास्तच नुकसान भरपाई मागीतली होती पण लॉन्ड्रीवाल्या कडे तेव्हढे पैसेच नव्हते म्हणून नाईलाज झाला!

मी कपाळावर हात मारुन घेतला! एका माकडाने शर्ट पळवला आणि दुसर्‍याने?

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.