या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो:

१)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात.

**** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत म्हणजे मला मधुमेह नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नका ! ****

२) यादीतली लक्षणें तशी पाहिली तर अगदी सामान्य (कॉमन) आहेत, मधुमेह नसला तरी सुद्धा इतर कारणां मुळे देखील अशी लक्षणें दिसू शकतात! तेव्हा मधुमेहाच्या लक्षणां सारखे काही दिसायला लागले की लगेच घाबरुन जाऊ नये आणि त्याहूनही पुढे जाऊन कोणाचे ऐकून (अगदी माझे ही !), स्वत:चे डोके चालवून , ‘गुगल’ करुन किंवा व्हॉटसॅप च्या फालतू , भंपक फॉरवर्ड्स वाचून  , यु ट्युब वरचे टिनपाट व्हिडीओज पाहून स्वत:च स्वत:वर उपचार करून घ्यायला सुरवात करू नये !!  लक्षणे दिसताच शंका जरुर घ्या आणि डॉक्टरांना भेटून योग्य त्या तपासण्या करून घेऊन मधुमेह नक्की आहे का याचे निदान करून घ्या. मधुमेह आहे का नाही याच्या तपासण्या खूप स्वस्त आहेत आणि सहजी उपलब्ध आहेत.

३) हा विषयच कमालीचा गुंतागुंतीचा आणि तांत्रिक आहे त्यामुळे तो जितका सोपा करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे थिअरी मधला काही क्लिष्ट भाग जाणिवपूर्वक वगळला आहे. लिखाणातला आयश लक्षात घ्या फार बारीक तपशीलात आत्ता तरी शिरु नका , जादा माहीती आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना विचारु शकता.

आता आपण मधुमेहाची म्हणून सांगीतल्या जाणार्‍या लक्षणां कडे वळू. ही लक्षणें कोणा विषिष्ठ क्रमाने लिहली आहेत असे नाही, मला जसे आठवेल तसे लिहीत जाणार आहे याची मात्र नोंद घ्या.

या लेखमाले तले आधीचे भाग इथे वाचा:

मधुमेहाची लक्षणें – १

मधुमेहाची लक्षणें – २

मधुमेहाची लक्षणें – ३

मधुमेहाची लक्षणें –४

मधुमेहाची लक्षणें –५

 


लक्षण – ५)  हल्लू हल्लू बर्‍या होणार्‍या जखमां

मधुमेहाच्या लक्षणांच्या बाबतीत दुर्दैव हेच की मधुमेहाची म्हणून सांगीतलेली सारी लक्षणें मधुमेहा मुळेच निर्माण होतात असे नाही तर इतर अनेक कारणांनी पण होत असतात आणि बरीचशी लक्षणे इतकी सामान्य / नेहमी आढळणारी आहेत की त्यांना कोणी गांभिर्याने घेतच नाही. त्यात कहर म्हणजे ही मधुमेहाची सारी लक्षणें मधुमेह शरीरात येऊन दाखल झाल्या नंतर आणि पार बळावल्या नंतरच दिसायला लागतात. ही सारी लक्षणें मधुमेहाची पूर्व सुचना नसतात तर मधुमेहाने निर्माण झालेली गुंतागुंत ( कॉम्प्लीकेशन्स) असते ! आणि ह्या वेळीही दुर्लक्ष केले तर परिस्थिती झपाट्याने हाताबाहेर जाते.

‘हल्लू हल्लू बर्‍या होणार्‍या जखमां’ हे मधुमेहाचे मानले जाणारे लक्षण आहे. मधुमेहाच्या इतर लक्षणां प्रमाणेच हे पण चटकन लक्षात येत नाही. जखमां लौकर बर्‍या न होणे हे मुळात मधुमेहाची लागण झाल्याचे नाही तर चक्क  मधुमेह बळावल्याचे लक्षण आहे,

दैनंदीन जीवनात बारीक सारीक जखमा आपल्याला होतच असतात , दाढी करताना कापणे, भाजी चिरताना कापणे , खरचटणें, भाजणे , ठेच लागणे, नख कापताना कापणे अशा अनेक लहान जखमा आपल्याला  नित्यनियमाने होत असतात, सहसा आपण त्यां कडे फारसे लक्ष देत नाही, कारण आपल्याला माहिती असते , किरकोळ आहे , होईल आपोआप बरे होईल बरे , त्यात काय एव्हढे ‘ आणि तसे होते ही, जर अगदी रक्त  वाहायला लागले , घाव मोठा असेल तर हळद दाब, अ‍ॅन्टीसेप्टीक क्रीम लाव, बँड एड डकव असे किरकोळ उपाय आपण करतो , सहसा अशा जखमां साठी आपण डॉक्टरां कडे पण जात नाही. त्याची आपल्याला आवश्यकताच भासत नाही कारण अशा किरकोळ जखमां आपोआपच दोन एक दिवसात बर्‍या होतच असतात.

पण मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत मात्र असे होत नाही! अगदी किरकोळ जखम सुद्धा बरी व्हायला उशीर होतो, म्हणजे जखम बरी होतच नाही असे नाही पण जी जखम एरव्ही दोन – तीन दिवसात पुर्ण बरी होत असते तीच जखम मधुमेहाच्या बाबतीत बरी व्हायला बराच वेळ , काही वेळा चक्क आठ एक दिवस घेते !

जसे अती तहान, अती लघवी, अती खा-खा या मधुमेहाच्या इतर लक्षणां च्या बाबतीत होते तसेच या लक्षणाच्या बाबतीत होते म्हणजे जखम बरी व्हायला नेहमी पेक्षा जास्त वेळ लागत आहे हे लक्षातच येत नाही ! गंमत अशी की जखम लहान / किरकोळ असेल तर त्याकडे आपण कधीच गांभिर्याने बघत नाही आणि मोठी जखम असेल तर जखम मोठी आहे बरी व्हायला वेळ लागणारच अशी समजूत करून घेतो. मधुमेह नसेल आणि जखमेचे स्वरूप सामान्य असेल (जंतुसंसर्ग वगैरे झाला नसेल) तर जखम विनासायास बरी होतेच त्यामुळेच जखम बरी व्हायला वेळ लागतो आहे हे लक्षात येतच नाही.

संथगतीने बर्‍या होणार्‍या जखमा हा मधुमेहाचा प्राथमिक पातळी वरचा हल्ला असतो, मधुमेहाचे रंग दिसायला सुरवात झाली असे म्हणता येईल. प्रकरण नुसते उशीरा बरे होण्या इतकेच मर्यादीत असते तर समजता आले असते पण कोणतीही जखम अशी दीर्घकाळ वाहती राहीली तर त्यात जंतू संसर्ग होऊन ती चिघळू शकते आणि मग त्यातून इतर बरेच काही त्रास होऊ शकतात अगदी गँगरीन देखील !

आणि म्हणुनच कोणतीही शस्त्रक्रिया , अगदी मोतीबिंदू सारख्या वेदना रहीत , कापाकापी रहीत शस्त्रक्रिया आणि रुट कनाल सारखी दातांची ट्रीटमेंट सुरु करण्या पूर्वी डॉक्टर रोग्याच्या रक्तातल्या साखरेची चाचणी केल्या शिवाय पुढे जात नाहीत ! आणि बर्‍याच जणांचा मधुमेह अशा शस्त्रक्रिया पूर्व रक्त शर्करा चाचणीत आढळला आहे, मोतीबिंदू , रुट कनाल करायला गेलेली व्यक्ती , मधुमेही म्हणून परत आलेली आहे.

मधुमेह्याच्या जखमां लौकर बर्‍या का होत नाहीत ?

मधुमेह म्हणजे रक्तातल्या साखरेचे प्रमाण वाढणे. तसे पाहीले तर आपण जेव्हा काही खातो तेव्हा रक्तातल्या साखरेचे प्रमाण वाढणारच यात काहीच वावगे नाही कारण खाण्याच्या माध्यमातून आपण नवीन साखर निर्माण करत असतो, ही जादाची साखर आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना इंधन म्हणूनच वापरायची असते. काही खाल्या नंतर रक्तात नवी साखर दाखल होते, या नव्या साखरे मुळे एरव्ही रक्तातली साखर जी एका स्थिर आणि सुरक्षीत पातळी वर राखलेली असते ती पातळी ओलांडली जाते आणि साखरेचे प्रमाण जास्त होते पण त्याच वेळी ही साखर पेशींना मिळावी म्हणून पुरेसे इन्शिलिन पण निर्माण केले जाते आणि पेशी पण या इन्शुलिन ला कोणताही विरोध न करता ही रक्तातली साखर स्विकारतात आणि थोड्याच वेळात , म्हणजे काही खाल्ल्या नंतर दोन – अडीच तासात रक्तातल्या ह्या वाढलेल्या साखरेचा पूर्ण निपटारा होतो आणि रक्तातल्या साखरेचे प्रमाण पुन्हा एकदा स्थिर पातळी वर येते. आणि सामसूम होते. मधुमेह नसलेल्या व्यक्ती मध्ये हे अगदी असेच बिनभोबाट होतच असते , अडचण असते ते मधुमेह्याची, कारण मधुमेहा मध्ये एकतर पुरेसे इन्शुलिन निर्माण होत नाही किंवा पुरेसे इन्शुलीन निर्माण झाले असले तरी पेशीं काही कारणां मुळे हे  इन्शुलिन  नाकारतात ( इन्शुलिन अवरोध) , याचे पर्यवसान रक्तात साखर उपलब्ध असूनही पेशींना ती मिळत नाही. रक्तातल्या या जादाच्या साखरेचा निपटारा होत नाही.

मधुमेही व्यक्तीं मध्ये साखर न मिळाल्याने पेशींची चक्क उपासमार होते, त्यांना काम करण्यासाठी आवश्यक असलेलेल इंधन व झीज भरून काढण्या साठी आवश्यक असलेली पोषकद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. याचाच परिणाम पेशींची रोगप्रतिकारक क्षमता कमी होण्यात होतो. तसेच शरीराला झालेल्या जखमा, जंतू संसर्ग बरा करणारी यंत्रणा पण विस्कळीत होते , क्षीण होते. जंतूशी लढणे, नवीन पेशी निर्माण करुन झालेली हानी भरुन काढणे ही कामे पण पुरेश्या तत्परतेने आणि क्षमतेने होत नाहीत. याचाच परीणाम म्हणून जखमा लौकर बर्‍या होत नाहीत , त्या चिघळतात, जखम जास्त काळ उघडी राहील्याने त्यात जंतू संसर्ग पण होऊ शकतो त्यामुळेही जखम बरी होण्यात मोठे अडथळे निर्माण होतात. उघड्या जखमेत बॅक्टेरिया किंवा तत्सम जीवजंतूचा प्रादुर्भाव होतो, रक्तातली प्रमाणा पेक्षा जास्त असलेली साखर या जीवजंतूना कमालीची पोषक ठरते आणि त्यांची वाढ झपाट्याने होते आणि पाहता पाहता साधी / किरकोळ वाटणारी जखम उग्र स्वरूप धारण करते.

रक्तातल्या साखरेचे प्रमाण सतत जास्त / धोकादायक पातळी वर राहीले तर रक्तवाहिन्या आणि मज्जाततूंना इजा पोहोचते, रक्तवाहीन्यात आतल्या बाजूला साखरेची पुटें चढतात त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात त्याने रक्ताभिसरण कमकुवत होते , पुरेसा रक्त पुरवठा होऊ शकत नाही त्याचा आणखी एक परिणाम म्हणजे मज्जातंतूंचे काम बिघडते , असे झाल्याने आपल्या (स्पर्श) संवेदना बधीर / बोथट  होतात. याला वैद्यकीय भाषेत पेरीफेरल न्युरोपथी Peripheral neuropathy म्हणतात. याचा परीणाम जखमा झालेल्याच कळत नाही, त्या चिघळलेल्याला पण लक्षात येत नाही आणि गँगरीन होते आणि शरीराचा तो भाग शस्त्रक्रिया करून चक्क कापून टाकावा लागतो आणि व्यक्ती आयुष्यभरासाठी दिव्यांग होते.

मधुमेह दीर्घ काळ असणार्‍यां पैकी ३० %  व्यक्तींना पेरीफेरल न्युरोपथी होतेच आणि त्यातल्या निम्म्या लोकांना दिव्यांग व्हावे लागते इतके हे सारे भयानक आहे.

साखरेची पुटे चढून अरुंद झालेल्या डोळ्यातल्या रक्तवाहीन्या आणि कमकुवत झालेल्या ऑप्टीक नर्व्हज ‘डायबेटीक रेटीनोपथी’ नामक स्थिती निर्माण करते याचे पर्यावसान डोळे जाण्यात होते ! मधुमेहा मुळे पूर्ण किंवा अंशत: अंधत्व हा प्रकारही बर्‍याच मधुमेह्यांत दिसतो.

हाच प्रकार किडनीज च्या बाबतीत होतो त्याला डायबेटीक नेफ्रोपथी म्हणतात, याचे पर्यावसान किडनीज निकामी होण्यात होते आणि डायलेसीस किंवा किडनी ट्रांसप्लँट हेच काय ते उपचार हातात उरतात.

साखरेची पुटे चढून अरुंद झालेल्या धमन्या हृदयविकारास आमंत्रण देतात! हा प्रकार तर प्रथम क्रमांकावर आहे.

हे नाही तर ते , काही तरी होणारच ! पेरीफेरल न्युरोपथी , डायबेटीक नेफ्रोपथी, हृदयविकार, रेटीनोपथी .. काय छान मेन्यू कार्ड आहे नाही? चॉईस तुमचा !

अर्थात मधुमेहाचे निदान लौकर झाले आणि त्वरीत उपाय योजना ( पथ्य , व्यायाम , औषध , तपासण्या) चालू केल्या आणि रक्तातल्या साखरे वर कावळ्या (बहीरी ससाणा मिळाला तर उत्तम!) सारखी नजर ठेवणे हे सारे केले तर यातल्या बरीचशी कॉम्प्लीकेशन्स टाळता येतात, लांबवता येतात, त्यांची तिव्रता कमी करता येते आणि वेळीच लक्षात आले तर त्या परतवता देखील येतात.

अर्थात ‘हल्लू हल्लू बर्‍या होणार्‍या जखमां’ हे फक्त मधुमेहा मुळेच होते असेही नाही , इतर कारणां मुळे देखील हे होऊ शकते, उदाहरणार्थ : शरीराच्या वाढी साठी आवश्यक असलेल्या हार्मोन्स HGH (human growth hormone) ची कमतरता, Rheumatoid arthritis, Vascular or arterial diseases ,Zinc deficiency इत्यादी.

त्यामुळे आपल्याला होणार्‍या जखमां कडे पुरेसे लक्ष द्या , त्या बर्‍या होण्यास वेळ लागतो आहे का? साधी साधी जखम काही कारण नसताना चिघळते आहे का? या कडे लक्ष द्या, जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर दुर्लक्ष करू नका किंवा काहीबाही घरगुती उपचार करत बसू नका, ताबडतोब आपल्या डॉक्टरांना भेटा , नेमके कारण काय याचा तपास करा आणि आवश्यक ती उपाय योजना करा, होशीयारी यातच आहे ना?

या लेखमालेच्या पुढच्या भागात मधुमेहाची आणखी एखादे लक्षण तपासू ..

शुभं भवतु

 


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. Prashant

  Dear Suhasji,
  You have explained it very well so that even ordinary people ( laymen in doctors’ terms) can understand. I think in general people should proactively get their blood work and physical examination done every year irrespective of any illness that way they can catch problems early. Awaiting more such articles.
  Thanks and Regards,
  Prashant

  0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.