या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो:

१)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात.

**** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत म्हणजे मला मधुमेह नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नका ! ****

२) यादीतली लक्षणें तशी पाहिली तर अगदी सामान्य (कॉमन) आहेत, मधुमेह नसला तरी सुद्धा इतर कारणां मुळे देखील अशी लक्षणें दिसू शकतात! तेव्हा मधुमेहाच्या लक्षणां सारखे काही दिसायला लागले की लगेच घाबरुन जाऊ नये आणि त्याहूनही पुढे जाऊन कोणाचे ऐकून (अगदी माझे ही !), स्वत:चे डोके चालवून , ‘गुगल’ करुन किंवा व्हॉटसॅप च्या फालतू , भंपक फॉरवर्ड्स वाचून  , यु ट्युब वरचे टिनपाट व्हिडीओज पाहून स्वत:च स्वत:वर उपचार करून घ्यायला सुरवात करू नये !!  लक्षणे दिसताच शंका जरुर घ्या आणि डॉक्टरांना भेटून योग्य त्या तपासण्या करून घेऊन मधुमेह नक्की आहे का याचे निदान करून घ्या. मधुमेह आहे का नाही याच्या तपासण्या खूप स्वस्त आहेत आणि सहजी उपलब्ध आहेत.

३) हा विषयच कमालीचा गुंतागुंतीचा आणि तांत्रिक आहे त्यामुळे तो जितका सोपा करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे थिअरी मधला काही क्लिष्ट भाग जाणिवपूर्वक वगळला आहे. लिखाणातला आयश लक्षात घ्या फार बारीक तपशीलात आत्ता तरी शिरु नका , जादा माहीती आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना विचारु शकता.

आता आपण मधुमेहाची म्हणून सांगीतल्या जाणार्‍या लक्षणां कडे वळू. ही लक्षणें कोणा विषिष्ठ क्रमाने लिहली आहेत असे नाही, मला जसे आठवेल तसे लिहीत जाणार आहे याची मात्र नोंद घ्या.

या लेखमालेतले आधीचे भाग इथे वाचा:

मधुमेहाची लक्षणें – १

मधुमेहाची लक्षणें – २

मधुमेहाची लक्षणें – ३

मधुमेहाची लक्षणें –४

 


लक्षण – ४) गुप्तांगाच्या परिसरात सतत खाज येणे व त्या भागात गळवे होणे

हे लक्षण खरोखरीच अवघड जागचे दुखणे आहे. अगदी ‘सहन ही होत नाही सांगता ही येत नाही’ या पातळी वर नेणारे. पण हा काही गुप्तरोग नाही , कृपया तसा कोणताही गैरसमज करून घेऊ नका !
ज्यांचा मधुमेह अनियंत्रीत आहे ( रक्त शर्करा २००+) अशा बर्‍याच मधुमेह्यांना हा त्रास नेहमी होताना दिसतो , खास करून स्त्रियांना हा त्रास जास्त होतो (तो का ? याचे कारण खाली दिलेल्या स्पष्टीकरणात आहे !)

या प्रकारात गुप्तांगाच्या परिसरात प्रचंड खाज सुटते काही वेळा ही खाज इतकी अनावर होते की चक्क सारी लाज-लज्जा , शरम सोडून सापडेल त्या आडोशाला जाऊन ‘खाजवावे’ लागते ! काही वेळा ( काही वेळा कशाला , चक्क बर्‍याच वेळा) याच भागात लहान – मोठी गळवे होतात. तसे पाहीले तर मधुमेह्यां मध्ये गळवें होण्याचे प्रमाण जरासे जास्त असतेच पण त्यात ‘त्या’ जागी गळवे होण्याचे प्रमाण आणखी जास्त असते , अगदी नेहमी आढळणारा प्रकार आहे आणि म्हणूनच ‘त्या’ जागी सतत असह्य अशी खाज सुटत असेल अथवा गळवें होत असली तर ते मधुमेहाचे एक ठळक लक्षण असू शकते,

खाजेवर उपाय अवश्य करा पण त्याच बरोबर मधुमेहाच्या चाचण्या पण करून घ्या! खरे तर तुमच्या खाजेवर / गळवा वर उपचार करणार्‍या डॉक्टरांनीच ह्या मधुमेहाच्या तपसण्या करवून घेतल्या पाहीजेत पण ते होताना दिसत नाही हे दुर्दैव आणि तसेही बरेच जण लाजे मुळे अशा ‘खाज / गळवा’ साठी डॉक्टरांच्या कडे जातच नाहीत घरगुती उपचार करतात मग कसल्या मधुमेहाच्या तपासण्या आणि कसले काय !

आता हे असे ‘खाजणे’ , मधुमेहाचे लक्षण का असते ते पाहूयात:

बहुतांश लोक्स (स्त्री – पुरुष दोघेही आले त्यात) ‘त्या’ भागाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्षच करतात. चेहेर्‍याला फेस पॅक लावतील , एखादी मुरमाची पुटकुळी जरी दिसली की मलमे चोपडतील, केसांना भारी भारी महागडे (इंपोर्टेड!) शांपू लावतील पण ‘त्या’ जागी साधा साबू देखील लागत नाही ही वस्तुस्थिती आहे. अंतर्वस्त्रां सहीत अंघोळ जिथे केली जाते तिथे ‘त्या’ जागी साबू लावणार कसा? अंघोळ करताना हा भाग जो काही थोडाफार (नाईलाजाने !) भिजतो हीच काय ती स्वच्छता! कहर म्हणजे अंघोळ केल्या नंतर अगदी टर्किश टुवाल ने सगळे अंग खसखसुन पुसले जाते , कोरडे केले जाते , केसांना हेअर ड्रायर ची गरम हवा लागते पण ‘त्या’ जागी काहीच नाही, ‘तो’ भाग तसाच ओलसर असताना घाईघाईने अंतर्वस्त्रे चढ्वली जातात ! आणि या वरताण म्हणजे घट्ट , तंग बसणार्‍या अंतर्वस्त्रांची एकच जोडी वर्षभर वापरली जाते (कशाला लागतात दोन जोड्या!) आणि अधून मधून ती डेटॉल किंवा तत्सम जंतुनाशकाने धुवायची असतात असे सांगीतले तर .. हॅ हॅ हॅ कैच्या कै नै का ? साहजीकच ‘तो’ भाग इतर शरीराच्या अवयवांच्या तुलनेत कायमच दमट आणि काहीसा अस्वच्छ असतो त्यात हा भाग २४ तास झाकलेला असतो, ‘चला हवा येऊ द्या’ म्हणायची काही सोयच नाही ! अशी अस्वच्छ, दमट, अंधारी जागा मग विविध प्रकारचे बॅक्टेरीया, बुरशी (फंगस) यांचा साठी एक स्वर्ग बनलेला असतो. बॅक्टेरिया तर दिसतच नाहीत पण बर्‍याच वेळा निर्माण झालेली बुरशी पण दिसत नाही. (दिसायला आधी ‘तिथे’ नीट बघितले तरी पाहीजे ना?) आणि मग ही परिस्थिती विविध त्वचा रोगांना निमंत्रण देऊ शकते.

आता तुम्ही म्हणाल, हे तर कोणाच्याही बाबतीत घडू शकते याचा मधुमेहाशी काय संबंध ?

संबंध नाही कसा , फार मोठ्ठा आणि जवळचा संबंध आहे ! याची सुरवात होते रक्तातल्या वाढलेल्या साखरे मुळे , मधुमेह झाला की रक्तातली साखर वाढते हे एव्हाना आपल्याला तोंडपाठ झाले असेल, ही साखर एका मर्यादेच्या पलीकडे वाढली की निर्वाणीचा उपाय म्हणून ही वाढीव साखर लघवी वाटे बाहेर टाकली जाते, साखर असलेली लघवी अर्थातच गोड असणार (असा आपला अंदाज, कोणी चाखून बघितली आहे म्हणा , यक्क !) आणि लघवीतली ही साखरच सगळा घोट्टाळा करते.

ब्रेड, बिस्कीट , केक, पिझ्झा बेस करताना पीठ आंबवण्यासाठी आपण ‘यीस्ट’ नामक पदार्थ वापरतो. पाकीटातून मिळणारे हे यीस्ट तसेच वापरता येत नाही , त्यासाठी ते जागृत करावे लागते , त्यासाठी आपण थोडे कोमट पाणी घेतो, त्यात चमचाभर साखर टाकतो, पाकीटातले यीस्ट त्यात मिसळतो, थोड्याच वेळात त्या यीस्ट मध्ये जान येते , ते फुलते (बुडबुडे येतात) असे तैयार यीष्ट मग पिठात मिसळले जाते. आता हे यीस्ट म्हणजे एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो आणि त्याला जागे व्हायला, फुलायला , वाढ व्हायला उबदार वातावरण आणि खाद्य लागते आणि ते खाद्य म्हणजे साखर !

आता आपण जेव्हा लघवी करतो तेव्हा कितीही काळजी घ्या , थोडीशी का होईना , एखादा थेंब का होईना , ही लघवी आपल्या ‘त्या’ जागी व परिसरात सांडते / पसरतेच . (कधी एकदा लघवी उरकतो आणि बाहेर पडतो याची कमालीची घाई सगळ्यांनाच असते, त्यामुळे लघवीचा प्रवाह पूर्ण थांबायच्या आतच… ) . लघवीतून साखर जाणार्‍या मधुमेह्याच्या बाबतीत तर त्याची लघवी शर्करायुक्त असते! त्यामुळे लघवी सोबतच ही साखर पण ‘त्या’ जागी पसरते आणि आधी पासुनच मुक्कामाला असलेल्या ‘त्या’ जागेच्या Candida Albicans नामक बॅक्टेरियांना . बुरशीला हे खाद्य (साखर) मिळते आणि त्यांना ते फार आवडते ! अशी (आयती!) साखर मिळाल्याने जाम खुष होऊन त्यांची जोमदार वाढ होते, त्यांच्या हालचाली वाढतात. त्याच वेळी रक्तातल्या वाढलेल्या साखरे मुळे ‘त्या’ जागीच्या मज्जातंतुंचा दाह व्हायला सुरवात होते आणि मग त्या जागी ‘खाज’ सुटते! स्त्रीयांच्या शरीररचनेचा विचार करता , लघवी करते वेळी ती थोडी आजूबाजूला पसरण्याची शक्यता पुरुषां पेक्षा जास्त असतेच , म्हणुनच पुरुष मधुमेह्यांच्या तुलनेत महिला मधुमेह्यांच्या बाबतीत हे ‘खाजण्याचे ‘ प्रमाण जास्त असते! मधुमेहा बरोबरच ‘त्या’ जागेच्या स्वच्छते बाबत बेफिकीर मधुमेह्यांना या ‘खाजे’ बरोबरच इतर त्वचारोग होतात , खास करून ‘गळवे’. मी ‘यीष्ट’ चे उदाहरण उगाचच दिले नाही कारण या ‘खाज – खुजली’ / गळवांना वैद्यक जगतात ‘यीष्ट इन्फेक्शन’ असेच संबोधले जाते . आता बोला !
(आता तुम्ही गर्दीच्या ठिकाणी , सार्वजनिक ठिकाणी मधुमेहाचा रुग्ण लगेच ओळखू शकाल ! हॅ हॅ हॅ ! )

अशी ‘खाज’ सुटलेल्या मधुमेह्याने रक्तातली साखर ( नब्बे ९० वाल्या बाबाचा नुस्का वापरुन ?) कमी केली की लघवीतून साखर बाहेर टाकली जाणे पण थांबते , ‘त्या’ जागी असलेल्या बॅक्टेरियांच्या फौजेला खाद्य मिळत नाही आणि मज्जातंतुंचा दाह ही शमतो आणि त्याचा परिणाम म्हणून ‘खाज – खुजली’ पण थांबते ! तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बरेच मधुमेही चक्क हा ‘खाज आली / खाज गेली’ हा प्रकार रक्तात साखर जास्त का कमी हे ठरवण्याची एक बिन खर्ची तपासणी असल्या सारखे वापरतात! ‘त्या’ जागी खाजायला लागले की ‘साखर’ वाढली रे वाढली’, खाजणे थांबले ‘साखर ठीकठाक, ऑल इज वेल!’ ———- धन्य त्यांची !!

बहुतांश वेळा ‘अस्वच्छता’ ह्या खाजखुजली ला आमंत्रण देते तेव्हा खाजखुजली / गळवे म्हणजे ‘मधुमेह’ असेच समीकरण असले पाहीजे असे नाही. अशी खाज खुजली इतरही अनेक कारणां मुळे होऊ शकते. स्त्रीयांच्या बाबतीत हा प्रकार अगदी सामान्य आहे , ४ पैकी ३ स्त्रीयांना हा प्रकाराला केव्हाना केव्हा सामोरे जावे लागतेच , इतका हा प्रकार कॉमन आहे , याला ‘व्हॅजीनल इंस्फेक्शन’ म्हणतात.

मधुमेह आणि ‘खाज – शुजली’ यांचे जवळचे नाते (सदीयों पुराना करीबी रिश्ता!) आहे , ही खाज-खुजली’ फक्त ‘त्या’ जागीच होते असे नाही, इतर जागीही होऊ शकते हे पण लक्षात ठेवा! बर्‍याच मधुमेह्यां मध्ये डोक्यात प्रचंड कोंडा (खाजणारा!) आणि खवडे आढळतात. डोळ्यांच्या पापण्याचा भाग , नखे , हाताच्या / पायाच्या बोटां मध्ये, स्त्रीयांच्या बाबतीत स्तनांच्या परिसरात, काखेत पण खाज सुटते. आणि ‘पार्श्वभागा’ तली खाज तर जगजाहीर आहे , ‘XX खाजवायला सुद्धा सवड नाही’ असे उगाच का बोलले जाते ?

ज्या व्यक्ती लठ्ठ आहेत आणि रक्तातली साखर वाढलेली आहे अशा स्थितीत एक प्रकाराची खास लक्षणें दिसतात. (खाज असतेच, त्याच्या जोडीला असू दे म्हणून आणखी एक ! तुम भी क्या याद करोगे ?) त्याला Acanthosis Nigricans असे वैद्यक्शास्त्रात संबोधले जाते , या प्रकारात मानेच्या बाजूला, काखेत, दोन्ही मांड्यांच्या मधला त्रिभुज प्रदेश (!) इथे फुगीर असे लालसर , काळसर रंगाचे चट्टे निर्माण होतात, काहीवेळा असे चट्टे हातावर , कोपरावर , गुडघ्यांवर वर देखील अवतिर्ण होतात , हे असे फुगीर चट्टे दिसले तर मधुमेह नक्की ! साधारण असाच एक प्रकार आहे त्याला Necrobiosis Lipoidica Diabeticorum (NLD) असे म्हणतात, हा प्रकार स्त्रीयां मध्येच आढळतो, पण हा काहीसा क्वचित आढळणारा प्रकार आहे. खाज खुजली बरोबरच विविध प्रकारच्या रंगीबेरंग़ी पुटकुळ्या (ब्लिस्टर्स) पण दर्शन देतात , त्यांचेही विविध प्रकार आहेत , उदाहरणार्थ : Eruptive Xanthomatosis, Bullosis Diabeticorum, Disseminated Granuloma Annulare, Digital Sclerosis इत्यादी इत्यादी.

रक्तातली वाढलेली साखर फक्त लघवी वाटेच बाहेर टाकली जाते असे नाही, म्युकस आणि घामा वाटे पण ती बाहेर जाते आणि या अन्य मार्गांनी केलेया निपटार्‍याची साधारण अशीच (खाज- हुजली , पुटकुळ्या, चट्टे !) लक्षणे दिसतात. मला वाटते फार खोलात जायला नको ना? आधीची खाज-खुजली काय कमी पडली का?

तुमच्या एव्हाना लक्षात आले असेल की रक्तातली साखर एका मर्यादेपेक्षा जास्त झाली ही लक्षणे दृगोच्चर होतात. आणि बहुतांश वेळा , आपल्याला मधुमेह झाला हे लक्षातच न आल्याने , रक्तातली साखर अशी हल्लू हल्लू वाढते आहे हे पण कळत नाही, ही साखर अशीच वाढत वाढत धोक्याच्या पातळीवर आली की मगच ही सारी लक्षणे दिसायला सुरवात होते, त्या कडे लक्ष देऊन , वेळीच मधुमेहाची तापसणी केली तर काहीतरी करण्या सारखे अजुनही हातात असते पण इथेही दुर्लक्ष झाले तर ?

अपनी तो हर आह इक तूफ़ान है , क्या करे वो जान कर अंजान है –
अब तो हँसके अपनी भी क़िस्मत को चमका दे
कानों में कुछ कह दे जो इस दिल को बहला दे
ये भी मुशकिल है तो क्या आसान है
ऊपर वाल जान कर अन्जान है …

तात्पर्य काय , तर मधुमेह असो वा नसो , खाजखुजली , गळवे, चट्टे, पुटकुळ्या होणे वाईटच ना? त्यावर तुमच्या पसंतीचा उपचार करा जरुर पण एक सावधानता म्हणून अगदी अल्प खर्चात होणारी मधुमेह निदान चाचणी करुन घा , फायदे में रहोगे !

उद्या अंघोळ करताना पाच मिनिटे जास्त घ्या , कशा साठी ? ते आता सांगायला हवे का?

लेखमालेच्या पुढच्या भागात मधुमेहाचे आणखी एक लक्षण तपासू

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+3

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. S P KAJAREKAR

  वा! अगदी तपशीलवार विवेचन. आता इतके सविस्तर वाचूनही जो काळजी घेणार नाही त्याचा देवच पाठीराखा.

  0
 2. SANDIP

  सुहासजी
  डाॅ झाला असतात तर , डाॅ + ज्योतिष
  उत्तम लेख माला. मेहनतीला सलाम

  0
  1. सुहास गोखले

   श्री संदीपजी धन्यवाद

   अहो मी खरा डॉक्टरच बनणार होतो त्यासाठीच तर अकरावी सायन्स ला बायालोजी हा विषय घेतला होता पण लक्षात आले की मला रक्त (दुसर्‍याचे कशाला अगदी माझे स्वत:चे पण ) दिसले की थरथरायला होते, कोणतिही जखम बघितली की माझ्या अंगावर शहारे येतात आता असा माणुस डॉक्टर कसा बनणार म्हणून तो नाद सोडून विंजेनेर जाहालो ! पण डॉक्टरीची खुमखुमी अशी थोडीच जाते त्याला हे असले वळण लागले बघा.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.