या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो:

१)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात.

**** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत म्हणजे मला मधुमेह नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नका ! ****

२) यादीतली लक्षणें तशी पाहिली तर अगदी सामान्य (कॉमन) आहेत, मधुमेह नसला तरी सुद्धा इतर कारणां मुळे देखील अशी लक्षणें दिसू शकतात! तेव्हा मधुमेहाच्या लक्षणां सारखे काही दिसायला लागले की लगेच घाबरुन जाऊ नये आणि त्याहूनही पुढे जाऊन कोणाचे ऐकून (अगदी माझे ही !), स्वत:चे डोके चालवून , ‘गुगल’ करुन किंवा व्हॉटसॅप च्या फालतू , भंपक फॉरवर्ड्स वाचून  , यु ट्युब वरचे टिनपाट व्हिडीओज पाहून स्वत:च स्वत:वर उपचार करून घ्यायला सुरवात करू नये !!  लक्षणे दिसताच शंका जरुर घ्या आणि डॉक्टरांना भेटून योग्य त्या तपासण्या करून घेऊन मधुमेह नक्की आहे का याचे निदान करून घ्या. मधुमेह आहे का नाही याच्या तपासण्या खूप स्वस्त आहेत आणि सहजी उपलब्ध आहेत.

३) हा विषयच कमालीचा गुंतागुंतीचा आणि तांत्रिक आहे त्यामुळे तो जितका सोपा करता येईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे थिअरी मधला काही क्लिष्ट भाग जाणिवपूर्वक वगळला आहे. लिखाणातला आयश लक्षात घ्या फार बारीक तपशीलात आत्ता तरी शिरु नका , जादा माहीती आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना विचारु शकता.

आता आपण मधुमेहाची म्हणून सांगीतल्या जाणार्‍या लक्षणां कडे वळू. ही लक्षणें कोणा विषिष्ठ क्रमाने लिहली आहेत असे नाही, मला जसे आठवेल तसे लिहीत जाणार आहे याची मात्र नोंद घ्या.

या लेखमालेतले आधीचे भाग इथे वाचा:

मधुमेहाची लक्षणें – १

मधुमेहाची लक्षणें – २

मधुमेहाची लक्षणें – ३


लक्षण – ३) सारखी भूक लागणे (खा- खा होणे)

आज काल आपण सगळेच दिवसभर काही ना काही चरत असतोच त्यामुळे आपल्याला ‘खा – खा ‘ सुटली आहे हे तसे पटकन लक्षात येणे अवघड आहे.

पण हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण हे मात्र नक्की. मधुमेहाची सुरवात झाली की लगेचच  ‘खा-खा’ सुटत नाही पण मधुमेहाच्या इतर लक्षणांच्या तुलनेत हे ‘खा-खा’ लक्षण  लौकर दिसायला सुरवात होते असे आढळून येते.

सामान्यत: भरपूर खाणे / जेवण झाले असेल तर पुढचे दोन एक तास तरी आपण खाण्याचे नाव काढणार नाही पण मधुमेहाच्या बाबतीत त्याने काहीही खाल्ले , कितीही खाल्ले अगदी पोटाला तडस लागे पर्यंत खाल्ले तरी धुतलेले हात वाळायच्या आत पुन्हा भूक लागते! ही एक प्रकाराची ‘वखवख’ म्हणता येईल !  यालाच वैद्यकशास्त्रात Polyphagia (uncontrolled food cravings ) असे संबोधतात.

आता हे का होते म्हणजेच हे मधुमेह झाल्याचे लक्षण का मानले जाते ?

आपण अन्न म्हणून जे जे काही खातो (चरतो!) त्याची ‘साखर (ग्लुकोज)’ तयार होते आणि ती रक्तात मिसळते , रक्ता मार्फत ही साखर आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना एक उर्जा ( पेट्रोल म्हणा हवे तर !) म्हणून  पुरवली जाते. ही अशी दिलेली साखर पेशी इंधन म्हणून वापरतात आणि त्यांची कामे करतात, काही वेळाने हे इंधन संपते आणि पेशींना पुन्हा इंधनाची (म्हणजेच साखरेची) गरज पडते , पेशी अशा वेळी मेंदूला संदेश पाठवायला सुरवात करतात आणि त्याला उत्तर म्हणून मेंदू ‘भुक लागल्याची ‘ भावना/ संवेदना ‘ निर्माण करतो , या साठी काही खास हार्मोंस स्त्रवतात त्यांच्या प्रभावामुळे आपल्याल भूक लागते मग आपण भूक भागवण्यासाठी काही तरी खातो, त्याची साखर होते , पेशींना नविन इंधन मिळते. हे चक्र अव्याहत फिरत असते यालाच वैद्यकशास्त्रात होमीओस्टासीस homeostasis असे संबोधतात.

आपण काही खाल्ल्या नंतर त्याची (लहान आतड्यात) साखर बनवल्या नंतर ती रक्तात मिसळली जाते, रक्तातली ही साखर रक्तवाहिन्यां मार्फत प्रत्येक पेशीच्या दारावर येऊन थांबते जरूर पण ती पेशीच्या आत जाऊ शकत नाही कारण प्रत्येक पेशीच्या भिंतीवर एक लठ्ठ कुलुप असते हे कुलुप खोलल्या शिवाय ही साखर पेशींना मिळत नाही असा बंदोबस्त निसर्गाने केलेला आहे (त्यामागे ही काही कारणें आहेत, त्याचा विचार नंतर कधीतरी करू!). जसे आपल्या गाडीच्या पेट्रोल च्या टाकीला एक कुलुप असते आणि पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी आपण टाकीचे कुलुप खोलतो तसे हे पेशींच्या भिंतीं वरचे कुलुप खोलावे लागते मगच त्यांना साखर मिळू शकते. हे कुलुप उघडायचे काम  ‘इन्शुलिन’ नामक हार्मोन (संप्रेरक) करत असतो.  ही ‘इन्शुलिन’  नामक किल्ली आपल्या शरीरातील ‘पॅन्क्रीयाज (स्वादुपिंड) ‘ ग्रंथीत तयार होत असते. आपण खायला सुरवात केली की मेंदू कडून पॅन्क्रीयाजला आदेश दिला जातो की खाणे सुरु झाले आहे , साखर तयार होणार आहे , इन्शुलीन (किल्ली) ची गरज आहे ते तयार करा, पॅन्क्रीयाज मग ऑर्डर प्रमाणे इन्शुलिन तयार करते आणि ते रक्तात सोडले जाते. रक्ता मार्फत साखरे बरोबर हे इन्शुलिन पण सर्व पेशीं पर्यंत पोहोचवले जाते. या इन्शुलीन (किल्ली) च्या साह्याने प्रत्येक पेशीच्या बाह्य आवरणावर असलेले  कुलुप खोलले जाते आणि रक्तातली साखर पेशींना मिळते आणि त्यांचे काम जोमाने चालू राहते.

निरोगी म्हणजे मधुमेह नसलेल्या व्यक्तीच्या शरीरात ही सारी यंत्रणा अत्यंत कार्यक्षमतेने आणि सुसुत्रपणे अव्याहत चालत असते , पण मधुमेह झाला की या यंत्रणेत मोठा बिघाड निर्माण होतो.

मधुमेह होतो म्हणजे नेमके काय होते?

मधुमेहाचे तसे बरेच प्रकार आहेत पण त्यात टाईप – 1 आणि टाईप – 2 हे जास्त आढळतात.

टाईप- 1 T1DM : या मधुमेहात पॅन्क्रियात झालेल्या मोठ्या बिघाडा मुळे इन्शुलीन ची निर्मीती पूर्णपणे बंद झालेली असते.

टाईप – 2 T2DM:  या मधुमेहात दोन शक्यता असतात:

१) इन्शुलीन ची निर्मीती कमी झालेली असते म्हणजे पूर्ण क्षमतेच्या 50-60% च होत असते.

किंवा

२) इन्शुलिन पुर्ण क्षमतेने म्हणजे 100% तयार होते पण पेशींचे काही तरी वांधे झाल्या मुळे इन्शुलीनला पेशीं मध्ये असलेले कुलुप खोलता येत नाही, याला पेशीं मध्ये निर्माण झालेला ‘इन्शुलिन अवरोध (Insulin Resistance) म्हणतात.

(बहुतांश वेळा ही दोन्ही कारणे एकत्र असतात !)

(या बद्दल अधिक तपशीलवार माहिती एका स्वतंत्र लेखात देत आहे),

वर दिलेल्या कोणत्याही कारणा मुळे  इन्शुलीन चा लोच्या झाल्यामुळे, म्हणजे रक्तात साखर आहे पण इन्शुलीन च्या अभावा मुळे ती पेशीं पर्यंत पोहोचू शकत नाही अथवा इन्शुलिन उपलब्ध असूनही ‘इन्शुलिन अवरोध  निर्माण झालेला असल्याने , ते वापरता येत नाही परीणामत: पेशींच्या बाह्य आवरणा वरचे कुलुप उघडत नाही, त्यामुळे रक्तात पुरेशी (काही वेळा जास्तच !) साखर उपलब्ध असूनही पेशींना साखर मिळत नाही ती नाही! अर्थात ह्या साखरे (इंधन) शिवाय पेशींना जास्त काळ कार्यरत राहाता येत नाही , पेट्रोल संपले की आपली गाडी जशी बंद पडते तसे या पेशी चक्क बंद पडू लागतात , पेशी थोडावेळ वाट पाहून आरडाओरडा करायला सुरवात करतात (साहजीकच आहे) आणि मेंदू कडे निर्वाणीचे मेसेज पाठवायला सुरवात करतात –  “भाऊ साखर संपलीय , काय झोपा काढता काय ? ताबडतोब साखरेचा पुरवठा करा ..साखर आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची… आम्हाला (टिकणारी!) साखर मिळालीच पाहीजे …  ”  आता असे खलिते आल्यामुळे मेंदू भांबावतो , अरेच्चा आत्ता तर या माणसाचे जेवण झालेय , रक्तात साखर पण आहे तरीही पेशींचा आरडाओरडा का चालू आहे ? मग मेंदू  ठरवतो की कदाचित साखर कमी पडली असेल ! आणखी खाणे पोटात गेले की पुरेशी साखर तयार होईल आणि मग आणखी  खाणे मिळावे – अधिक साखर तयार व्हावी यासाठी भूकेची संवेदना निर्माण केली जाते म्हणजेच माणसाला (मधुमेही) भूक लागते!  अगदी पंधरा मिनिटां पूर्वी भरपेट खाणे झाले असले तरी मधुमेह्याला पुन्हा अगदी कडक भूक लागते याचे त्यालाच कशाला आजबाजूच्या लोकांना सुद्धा आश्चर्य वाटू लागते! (सुरवातीला आश्चर्य आणि नंतर भिती !)

मग हे एक दुष्ट चक्र निर्माण होते !   खाणे – रक्तात साखर + इन्शुलिन – ताला खुलत नाही – पेशींना साखर नाय –  पेशींची आरडाओरड – यावर उतारा म्हणून मेंदू  भूक लागल्याची संवेदना निर्माण करतो – पुन्हा खाणे !

असे होत राहीले की काय होते , रक्तात साखर वाढत राहते (आणि पेशींचा आरडाओरडा पण वाढत राहातो!) , पुन्हा पुन्हा अगदी थोड्या अंतराने खात राहील्यामुळे रक्तात सतत नवी साखर ढकलली जात राहते तर तिकडे या साखरेचा निपटाराच होत नसल्याने रक्तात साखरेचे डोंगर साठतात, आता रक्तातली साखर जी सामान्यत: ७०  ते ९० असते ती आता झपाट्याने २००,२५०,  ३००, ३५० असे टप्पे पार करायला लागते. शेवटी जेव्हा हा मधुमेही (एकदाचा!) रात्री झोपतो तेव्हाच कोठे  (त्या झोपेच्या सात – आठ तासा पुरते) हे दुष्टचक्र थांबते. पण दुसरे दिवशी सकाळी उजाडताच मधुमेह्याला कडकडून भुक लागते (कारण पेशींना अजुनही साखर मिळालेली नाही) मग चहा बरोबर ब्रेड, खारी , टोस्ट , बिस्किट्स खाल्ली जातात आणि कालचे दुष्टचक्र आज पुन्हा नव्या जोमाने फिरायला लागते.

रक्तातली ही साखर अशी धोकादायक पातळी वर पोहोचली की त्या स्थितीला हायपरग्लायसेमीया म्हणतात त्याचे मोठे विघातक परिणाम शरीरावर व्हायला सुरवात होता, डायबेटीक कॉम्प्लिकेशन्स सुरु होतात. ( या बाबत एक सविस्तर लेख लिहणार आहे)

हे होते आहे तोच आणखी एक त्सुनामी येऊन धडकते !

सतत खात राहील्यामुळे इन्शुलीन तयार करा असा घोषा मेंदू कडून सातत्याने केला जातो त्यामुळे मधुमेह्याच्या आधीच कमकुवत असलेल्या पॅनक्रियाजवर ताण पडतो. बिचारी मग डबल – टिब्बल ड्युटी करून सारखे सारखे इन्शुलिन तयार करते आणि त्यात पुरती दमछाक होऊन , पॅन्क्रियाज आणखी कमकुवत होते, तीची इन्शुलिन तयार करण्याची क्षमताच कमी व्हायला सुरवात होते.  त्याच बरोबर सतत तयार होणार्‍या या अतिरिक्त इन्शुलीनचा भडीमार असह्य झाल्याने  पेशींचा ‘इन्शुलीन अवरोध’ आणखी वाढतो ! (अवरोध आधी पासून नसल्यास नव्याने निर्माण होतो) त्याचा परीणाम म्हणून  पेशींना आत्ता पर्यंत जी काही थोडी फार साखर मिळत होती ती पण मिळायचे बंद होते , म्हणजे पुन्हा (अधीक जोरदार) आरडाओरडा,  आगीत तेल ओतले जाते. पुन्हा पुन्हा भुक लागते पुन्हा पुन्हा साखर तयार होत राहते आणि साचून राहाते.

टाईप – 1 मधुमेह हा स्वतंत्रपणे हाताळायचा विषय असल्याने त्याबद्दल मी आत्तच सविस्तर लिहणार नाही. टाईप – 2 मधुमेहात प्रथम ‘इन्शुलिन अवरोध’  निर्माण होतो , त्यावर उतारा म्हणून अधिक अधिक इन्शुलीन निर्माण कराय्चा घाट घातला जातो आणि हा ताण असह्य झाल्याने पॅन्क्रीयाज मधल्या इन्शुलीन तयार करणार्‍या बीटा सेल्स एकतर आपली कार्यक्षमता गमवून बसतात किंवा चक्क मरतात !

ह्यामुळेच वर सांगीतलेली ‘अचाट भूक , खा- खा’ निर्माण होते आणि इतर लक्षणांच्या तुलनेत हे लक्षण मधुमेहाची लागण होताच काही महीन्यातच दिसायला लागते.

हे सारे होत असताना त्या व्यक्तीला मात्र याची कोणतीच जाणीव नसते , मुळात आपल्याला ‘खा-खा’ होते हेच त्याला समजत नाही आणि समजले तरी मान्य होत नाही. मधुमेहा मुळे हे सर्व होत आहे याची पुसटशी शंका सुद्धा त्याच्या मनात येत नाही कारण हे असे सारे त्याला कोणी समजाऊन सांगीतलेलेच नसते. खरे तर हे समजावण्याचे काम डॉक्टरांचे पण डॉ दिक्षित . डॉ अभय बंग यांच्या सारखे तुरळक अपवाद वगळता , बाकी बहुतांश डॉक्टर नोटा छापण्यात आणि ‘ऑडी  घ्यायची ‘ का ‘फॉरच्युनर ‘ का जरा ईएमआय वाढवून बीएमडब्ल्यू , या सिझनला केनयन सफारी का अ‍ॅमेझिंग ऑस्ट्रेलिया टूर याचे प्लॅनिंग करण्यात मग्न असतात ! आणि मग माझ्या सारखा वायरमन कम कुडमुड्या ज्योतिषी कम शाळा मास्तरला हे काम हाती घ्यावे लागते!

बहुतांश ‘खा-खा ’ व्यक्ती अज्ञाना पोटी –  “आताशा माझी भूक वाढलीय ‘,’पोटात जंत झाले असतील ‘  ‘गेल्या आठवड्यात कामाची दगदग झाली ना त्याची भरपाई चाललीय, ‘थंडीत जरा जास्त भूक लागते ‘ अशी काही बाही समजून स्वत:ला घालून घेत खात राहाते आणि बाल्यावस्थेत असलेला मधुमेह बळावायला कळत – नकळत सहाय्य करतो राहते!

अर्थात अशी ‘खा- खा’ होणे मधुमेहा व्यतिरीक्त अन्य तब्बेतीच्या कारणां मुळे, काही औषधांच्या प्रभावा मुळे , ताण – तणाव व तत्सम मानसीक त्रास / कारणां मुळे सुद्धा होत असते पण ‘खा- खा’ होते आहे असे लक्षात येताच त्वरीत डॉकटरांना भेटून त्या मागचे कारण हुडकणे व वेळीच त्यावर प्रतिबंधक उपाय योजना करणे यातच शहाणपण आहे ना?

पुढच्या भागात आणखी एखादे मधुमेहाचे लक्षण तपासू

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+6

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

2 प्रतिक्रिया

///////////////
 1. sandip

  Great Studious article. Waiting for the complete series. My mother in law amputated part of the right leg.

  +1
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री संदीपजी
   मधुमेहा चे अत्यंत घातक परिणाम होतात पण लोक्स हा आजार म्हणावा तितक्या गांभिर्याने घेत नाहीत

   सुहास गोखले

   +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.