या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो:

१)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात.

**** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत म्हणजे मला मधुमेह नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नका ! ****

२) यादीतली लक्षणें तशी पाहिली तर अगदी सामान्य आहेत, मधुमेह नसला तरी सुद्धा इतर कारणां मुळे देखील अशी लक्षणें दिसू शकतात! तेव्हा मधुमेहाच्या लक्षणां सारखे काही दिसायला लागले की लगेच घाबरुन जाऊ नये आणि त्याहूनही पुढे जाऊन कोणाचे ऐकून (अगदी माझे ही !), स्वत:चे डोके चालवून , ‘गुगल’ करुन किंवा व्हॉटसॅप च्या फालतू , भंपक फॉरवर्ड्स वाचून  , यु ट्युब वरचे टिनपाट व्हिडीओज पाहून स्वत:च स्वत:वर उपचार करून घ्यायला सुरवात करू नये !!  लक्षणे दिसताच शंका जरुर घ्या आणि डॉक्टरांना भेटून योग्य त्या तपासण्या करून घेऊन मधुमेह नक्की आहे का याचे निदान करून घ्या. मधुमेह आहे का नाही याच्या तपासण्या खूप स्वस्त आहेत आणि सहजी उपलब्ध आहेत.

३) हा विषयच कमालीचा गुंतागुंतीचा आणि तांत्रिक आहे त्यामुळे तो जितका सोपा करता यईल तितका करण्याचा प्रयत्न केला आहे थिअरी मधला काही क्लिष्ट भाग जाणिवपूर्वक वगळला आहे. लिखाणातला आयश लक्षात घ्या फार बारीक तपशीलात आत्ता तरी शिरु नका , जादा माहीती आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांना विचारु शकता.

आता आपण मधुमेहाची म्हणून सांगीतल्या जाणार्‍या लक्षणां कडे वळू. ही लक्षणें कोणा विषिष्ठ क्रमाने लिहली आहेत असे नाही, मला जसे आठवेल तसे लिहीत जाणार आहे याची मात्र नोंद घ्या.

या लेखमालेतले आधीचे भाग इथे वाचा:

मधुमेहाची लक्षणें – १

मधुमेहाची लक्षणें – २

 


 

लक्षण – २) सारखी तहान लागणे

पाणी हे आपल्या शरीरासाठी किती अत्यावश्यक आहे हे वेगळे सांगायला नको, जेवताना , खाणे खाताना आपण पाणी पितोच पण इतर वेळी ही आपल्याला लहान लागली की पाणी प्यावे लागते.  तसे पाहीले तर बहुतांश लोक्स पाणी तसे कमीच पितात असे आढळून येते, दिवसात कमीतकमी दोन ते तीन लिटर पाणी प्यावे असे सांगीतले जाते ते खरेच आहे ( आणि हे दोन-तीन लिटर पाणी आपण दिवसभरात ढोसत असलेल्या चहा – कॉफी व इतर द्रव पदार्थांच्या व्यतीरिक्त असावे हे लक्षात ठेवा).

सामन्यत: निरोगी व्यक्ती तहान लागली की पाणी पिणारच पण असे एकदा पाणी प्यायले की त्याला लगेचच  पंधरा मिनीटांत / अर्ध्या तासात पुन्हा तहान लागत नाही. मधुमेही व्यक्ती च्या बाबतीत असे होत नाही, ही व्यक्ती सतत तहानलेली असते. त्याला सतत पाणी प्यावे असे वाटत असते, कितीही पाणी प्यायले तरी समाधान म्हणून होत नाही.  तहान भागली असे होतच नाही. आणि हेच मधुमेहाचे एक लक्षण आहे. याला वैद्यक शास्त्रात polydipsia असे म्हणतात.

हे असे का होते?

मधुमेहाचे या आधीचे लक्षण आपण बघितले : जास्त लघवीला होणे , त्यातच या तहानेचे रहस्य दडलेले आहे! रक्तात अतिरिक्त साखर वाढली की मग ती किडनीज च्या मार्फत (म्हणजेच लघवीच्या वाटे) बाहेर फेकण्याचे काम सुरू होते म्हणजेच शरीराची पाण्याची गरज कमालीची वाढते, इतकी सारी लघवी व्हायची म्हणजे तेव्हढे पाणी नको का अंगात! आपल्या शरीराला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते , आपल्या शरीराचा ५० ते ६० टक्के भाग हा पाण्याने बनलेला आहे, पाणी अत्यावश्यक असल्याने या पाण्याचे अत्यंत सुरेख नियंत्रण मेंदू द्वारे केले जाते, लघवी वाटे अथवा घामा वाटे शरीरातले पाण्याचे प्रमाण जरा जरी कमी झाले तरी मेंदू कडून ‘तहान’ लागल्याची भावना निर्माण केली जाते आणि खर्च केलेल्या पाण्याची भरपाई होई पर्यंत तहान लागत राहाते , तिव्रतेने जाणवत राहते. आता साखर लघवी वाटे सोडताना भरपूर पाण्याचा वापर करावा लागत असल्याने शरीरातले पाण्याचे प्रमाण खूप घटते आणि ते भरुन काढायला जास्त पाणी प्यावे लागते हेच मधुमेह्याच्या सततच्या तहानेचे रहस्य आहे.

इथे एक दुष्टचक्र निर्माण होते ! लघवी वाटे पाणी वाया जाते म्हणून त्याची भरपाई करण्याच्या हेतुने तहान लागून रोगी पाणी पितो, पण ते बर्‍याच वेळा आवश्यकते पेक्षा जास्त घेतले जाते त्याचे पर्यावसन अधिक लघवी ( अरे देवा!), पुन्हा तहान , पुन्हा पाणी , पुन्हा लघवी !

यातून सुटका हवी असेल तर रक्तातल्या साखरेचे प्रमाण आवाक्यात आणले पाहीजे, एकदा हे साखरेचे प्रमाण आवाक्यात ( ते किती असावे याचा विचार आपण एका स्वतंत्र लेखाच्या द्वारे करू ) आले की मग लघवी वाटे साखर बाहेत जाण्याचे थांबते आणि जादाची तहान पण थांबते कारण आता जास्त लघवी नाही म्हणजे पाण्याची नासाडी नाही म्हणुन बाहेरुन जादाचे पाणी घेण्याची आवश्यकता रहात नाही.

पण इथली ‘ग्यानबाची मेख’ अशी की जसे दिवसात आपण किती वेळा लघवी करतो (आणि प्रत्येक वेळी किती होते!) याचा अपण हिसाब ठेवत नाही अगदी तसेच या पाणी पिण्या बाबतही होते. तहान लागली की पाणी प्यायचे हेच आपण करत असतो त्यामुळे कोणती गिनती नसल्यामुळे आपल्याला सारखी तहान तहान होते आहे हे चटकन लक्षातच येत नाही आणि शिवाय अशी सारखी तहान लागणे अन्य (काही वेळा क्षुल्लक ) कारणांनी ही होत असते, त्याचा अनुभव प्रत्येकाला असतोच म्हणूनही असेल या जादाच्या तहाने कडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते असे निरिक्षण आहे.

जास्त गोडाधोडाचे खाल्ले, आइस्क्रिम सारखे गोड आणि थंड पदार्थ खाल्ले की लगेच आपल्याला तहान लागते (वाटल्यास एखादा आइस्क्रिम चा स्कूप खाऊन पाहा!) , कारण उघड आहे, असे पदार्थ जेव्हा खाल्ले जातात तेव्हा आपल्या रक्तातले साखरेचे प्रमाण जरा जास्तच वाढलेले असते (अगदी डायबेटीस नसलेल्या व्यक्तीच्या बाबतीतही), गंमत म्हणजे जादा सॉल्ट असलेले पदार्थ खाल्ले तरीही तहान तहान होते.

थोडक्यात काय आपल्याला सारखी तहान लागेत हेच मुळात लक्षात येत नाही आणि ही तहान तहान मधुमेहाने होती आहे की अन्य तात्कालीन कारणामुळे हे ठरवणे पण शक्य होत नाही.

आणि मधुमेह्याच्या इतर लक्षणां प्रमाणेच लघवी वाटे साखर जाणे ही बाब रक्तातल्या साखरेचे प्रमाण कमालीचे वाढल्या नंतर म्हणजेच मधुमेह अंगात चांगाला मुरल्या नंतरच होते , मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत (हनीमून पिरियड!) लघवी वाटे साखर जात नाही पर्यायाने तहान – तहान पण होत नाही, आणि ती जेव्हा होते तेव्हा मधुमेहाचे स्वरुप उग्र झालेले असते हे नक्कीच.

म्हणुनच सारखी तहान लागणे हे मधुमेहाचे एक लक्षण मानले गेले असले तरी ते मधुमेहाची लागण झाल्या झाल्या लगेचच दिसत नाही आणि इथेच तर आपली फसगत होते !


माझ्या फेसबुक वॉल वर माझ्या मित्राने केलेली एक कॉमेंट कमालीची बोलकी आहे!

“मला नोव्हेंबर २०१८ मध्ये सहज मी स्वतः कोणत्याही डॉ.नी सांगितले नसतांना तहान खूप लागते म्हणून ब्लड टेस्ट केली.रिपोर्ट आला ३००-५५०. ………”

यांची फास्टींग शुगर ३०० आणि जेवणा नंतर ची शुगर ५५० होती ! ही कमालीची धोकादायक पातळी होती ! आणि याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती ! नशीब त्यांना ‘जास्त तहान का लागते ?” अशी शंका आली आणि जागरुकता दाखवत वेळीच डॉक्टरांना भेटून तपासाण्या करून घेतल्या आणि खरा प्रकार काय आहे तो लक्षात आला ! अशी जागरुकता दाखवल्या मुळेच ,आणि ताबडतोब उपचार , पथ्य , व्यायाम इ सुरु केल्या मुळे आज यांची शुगर अगदी आदर्श म्हणता येईल अशा पातळी वर आहे. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !


पण ही अतिरिक्त रक्त शर्करे मुळे निर्माण झालेली तहान तहान दीर्घकाळ चालू राहीली म्हणजेच वाढलेल्या रक्त शर्करेचे निदान झाले नाही / माहिती असून त्यावर नियंत्रण मिळवण्या च्या बाबतीत हेळसांड झाली तर मात्र या जादाच्या तहानेचे दु:षपरीणाम होतात. सततची डोकेदुखी, नॉशीया , भोवळ येणे, डोके गरगरणे / बधीर / जड होणे, मुर्छा येणे.

मधुमेही व्यक्तीने लघवी वाटे जाणार्‍या या पाण्याची भरपाई वेळीच केली नाही तर त्याच्या शरीरातले पाण्याचे प्रमाण धोकादायक पातळी इतके खाली येते याला सिव्हिअर हायड्रेशन म्हणतात . याच वेळी जर रक्तातल्या साखरेचे प्रमाण जास्त (म्हणजे ३००+) असेल तर त्याला हायपर ग्लायसेमीया म्हणतात , असे झाले की लघवीतून साखर बाहेर पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढते आणि हे असे झाले की शरीरात ‘डायबेटीक किटोअ‍ॅसीडोसीस Diabetic ketoacidosis – DKA नामक प्रकार निर्माण होतो त्यामुळे शरीरात अ‍ॅसीड चे प्रमाण वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातले एकेक अवयव निकामी होण्यास सुरवात होते, प्रकरण जर मेंदू पर्यंत पोहोचले तर व्यक्ती चक्क ‘कोमा’ मध्ये जाते आणि मृत्यू देखील येऊ शकतो.

थोडक्यात काय या अतिरिक्त तहाने कडे दुर्लक्ष करु नका आणि मधुमेह असो वा नसो दिवसात भरपूर पाणी प्यायची सवय लावून घ्या !

पुढच्या भागात मधुमेहाचे आणखी एक लक्षण तपासू

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+5

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

6 प्रतिक्रिया

///////////////
 1. Prashant

  Dear Suhasji,
  Very informative article. You have explained it in layman’s terms. Unfortunately there are many people who are blissfully unaware of this metabolic disorder and besides this there are lots of myths spread around that this disease in completely curable within a matter of days. I hope your articles on diabetes get an overwhelming response. Nevertheless I request you to keep writing even if a handful of people get benefited, this would still give an immense satisfaction to you.
  Thanks and Regards,
  Awaiting more articles in this series,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   श्री प्रशांतजी
   अभिप्राया बद्दल धन्यवाद. आपल्या सारखे काही जागरुक वाचक आहेत हे मी माझे भाग्य समजतो आणि केवळ ह्याच कारणा मुळे मी माझे लेखन चालू ठेवत आहे.
   भारतात आज दर एक आड एक व्यक्ती मधुमेही असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे इतकी भयानक स्थिती असतानाही सरकार कडून , डॉक्टरां कडून याबाबतीत जनप्रबोधन करण्याचे काम म्हणावे तसे होताना दिसत नाही हे या देशाचे दुर्दैव.
   लोकांचे मधुमेहा बद्दल कमालीचे अज्ञान, दुर्लक्ष / अनास्था अंगावर शहारे आणणारी आहे, लोकांना हा आजार किती भयानक आहे याची जराशीही कल्पना नाही, श्रीमंतांचा / सुखवस्तु लोकांचा आजार / चोचले इथे पासुन ते साखरेचा आजार , देवीचा कोप , गुरु ग्रह बिघडला / नक्षत्रशांती केली पाहीजे / पितृदोष आहे इथे पर्यंत गैरसमज आहेत.
   हे झाले सामान्य जनतेचे पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वत:ला डॉक्टर म्हणवणारे MBBS / MD पदव्या लावणारे देखील या आजारा बद्दल फारशी माहीती राखून असत नाही किंबहुना ज्ञान / ट्रीटमेंट च्या बाबतीत अजूनही ते आजही 1960 सालातच वावरत आहेत असे म्हणले त्यात फार अतिशयोक्ती ठरणार नाही.
   मी गेली 20 वर्षे या मधुमेहाशी संलग्न आहे ( माझ्या आईचा 10 वर्षाचा मधुमेह आणि माझा स्वत:चा 10 वर्षाचा) भरपूर वाचले आहे , प्रयोग केले आहेत. एकेकाळी 300+ शुगर असलेला मी आज 85 या पूर्ण निरोगी शुगर वर आहे , सातत्याने आहे (केवळ एक – दोन दिवसाचे रिडींग नाही) या अनुभवाचा इतरांना लाभ व्हावा म्हणून मी काही लिहायचे ठरवले पण लोकांना ‘झटपट / एका रात्रीत बरा करणार नुस्का हवा आहे’ ते पथ्य / व्यायाम काही सांगू नका, सगळे माहीती आहे आम्हाला .(पण मग शुगर 250 का ? याला उत्तर नाही !) . तुमचे लेक्चर नक्को, फक्त तुमचा काय तो ‘नुस्का’ आहे ते झटपट सांगा (आणि आम्हाला मोकळे करा) !
   ज्योतिषात देखील हाच अनुभव येतो, काहीतरी जालीम उपाय – तोडगा सांगा !
   मी फेसबुक वर / ब्लॉग वर विविध विषयांवर पोष्ट्स करत असतो , पाणीपुरीच्या , ज्योतिषच्या पोष्ट्स ना भरपूर वाचन संख्या , लाईक्स , कॉमेंटस आणि जीव तोडून लिहलेल्या मधुमेहा वरच्या लेखांना मिळलेला तुरळक प्रतिसाद बघून जीव तुटतो !
   पाणीपुरी मधुमेहा पेक्षा जास्त जिव्हाळ्याची ?
   असो,
   मी लेखन चालुच ठेवत आहे आपल्या अमूल्य अभिप्रायांचे कायमच स्वागत असेल.
   सुहास गोखले

   +1
 2. Prashant

  Dear Suhasji,
  It is really remarkable that you have got your sugar level down to 85. It will be interesting to know how you are able to maintain it. I am a non-diabetic but do have other members in the extended family who are diabetic. I shall encourage them to read your articles.
  Thanks,
  Prashant

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री प्रशांतजी

   मधुमेह बरा होत नाही हे कटू सत्य ज्याने पचवले आहे आणि ‘एका रात्रीत मधुमेह बरा करतो’ अशा नुस्क्यांच्या मागे लागणे ज्याने थांबवले आहे केवळ अशाच व्यक्तींकडे मी काय सांगते आहे हे समजून घ्यायची मानसीकता असू शकते , पण बहुतेक मधुमेही अजूनही एखादी ‘Snake Oil remedy’ भेटेल अशा वेड्या आशेत असल्याने मी जे काही सांगतो आहे / सांगणार आहे त्यांना ऐकायचे नाही, जेव्हा मी सुचित केले की माझ्या कडे अशी कोणतेही रेमेडी / नुस्का नाही तेव्हा माझ्या आजूबाजूला जमलेली गर्दी एका क्षणात पांगते , जाताना ‘उपाय नाही / तोडगा नाही सांगणार मला कशाला तुमचे लेक्चर देत बसता?” असा उलट सल्ला मलाच देऊन जातात !

   जे आपल्या मधुमेहा बद्दल गंभीर आहेत , जे नियमीत रक्तातली साखर तपासतात , ज्यांच्या कडे गेल्या दोन महीन्यात केलेल्या HbA1C टेस्ट चा ताजा रिपोर्ट आहे अशांनाच मी काही सुचवू शकतो बाकीचे तथाकथित मधुमेही माझा वेळ बरबाद करत आहेत,

   शुभेच्छा

   सुहास गोखले

   0
 3. S P KAJAREKAR

  सुहासजी तुम्ही म्हणता तसे काही लक्षणे ही सगळ्याच मधुमेहींना असत नाहीत हे अगदी खरे आहे. आता माझेच बघा ना. मला दिवसभरात अजिबात तहान लागत नाही. मी जाणीव पूर्वक दोनेक तासाने एखाददुसरे ग्लास पाणी पितो. माझी साखर सध्या सरासरी २०० ते २१० च्या दरम्यान आहे ( मी एचबीएवन सी करतो दर तीन महिन्यांनी) मला कल्पना आहे की ही जास्त आहे . पण मुद्दा असा की एवढी साखर असूनही मला दिवसभरात साधारण तीन ते चार वेळा व लघवीला जावे लागते. संपूर्ण रात्रीत एकदाही उठावे लागत नाही.. आता याचा काही वेगळा अर्थ असेल तर तुम्ही सांगावा ही अपेक्षा आहे. धन्यवाद.

  +1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.