या लेखमालेतून मधुमेहाची जी काही लक्षणें आपण बघणार आहोत त्या बाबतीत एक खुलासा आधीच करतो:

१)  ही सारी लक्षणें बर्‍याच वेळा मधुमेहाने तुमच्या शरीरात प्रवेश केल्या नंतर, आजार बळावल्या नंतर काही वर्षांनी दिसायला लागतात.

**** म्हणजेच यातली काहीच लक्षणें दिसत नाहीत म्हणजे मला मधुमेह नाही असा गोड गैरसमज करून घेऊ नका ! ****

२) यादीतली लक्षणें तशी पाहिली तर अगदी सामान्य आहेत, मधुमेह नसला तरी सुद्धा इतर कारणां मुळे देखील अशी लक्षणें दिसू शकतात! तेव्हा मधुमेहाच्या लक्षणां सारखे काही दिसायला लागले की लगेच घाबरुन जाऊ नये आणि त्याहूनही पुढे जाऊन कोणाचे ऐकून (अगदी माझे ही !), स्वत:चे डोके चालवून , ‘गुगल’ करुन किंवा व्हॉटसॅप च्या फालतू , भंपक फॉरवर्ड्स वाचून  , यु ट्युब वरचे टिनपाट व्हिडीओज पाहून स्वत:च स्वत:वर उपचार करून घ्यायला सुरवात करू नये !!  लक्षणे दिसताच शंका जरुर घ्या आणि डॉक्टरांना भेटून योग्य त्या तपासण्या करून घेऊन मधुमेह नक्की आहे का याचे निदान करून घ्या. मधुमेह आहे का नाही याच्या तपासण्या खूप स्वस्त आहेत आणि सहजी उपलब्ध आहेत.

आता आपण मधुमेहाची म्हणून सांगीतल्या जाणार्‍या लक्षणां कडे वळू. ही लक्षणें कोणा विषिष्ठ क्रमाने लिहली आहेत असे नाही, मला जसे आठवेल तसे लिहीत जाणार आहे याची मात्र नोंद घ्या.

या लेखमालेतला पहीला भाग इथे वाचा:

मधुमेहाची लक्षणें – १

लक्षण – १) सारखे लघवीला जावे लागणे , खास करुन रात्री झोपेत जाग येऊन लघवीची घाई होणे.   

आपण दिवसातून किती वेळा लघवीला जातो ? याचा हिशेब आपण कधी ठेवत नाही. कशाला ठेवायचा म्हणा! लघवीला लागली की जायचे हाय काय आन नाय काय ! साधारण पणे निरोगी व्यक्तीला दिवसात ४ ते ८ वेळा लघवीला लागते. अर्थात व्यक्तीचे प्रकृती मान, ती व्यक्ती पाणी किती पिते यावर ही संख्या अवलंबून असतेच. पण हे ‘जाणे’ दिवसा म्हणजे जागेपणीच असते (असावे!) , बहुतांश निरोगी व्यक्तींना रात्री एकदा झोपल्यावर मध्येच लघवी साठी उठावे लागत नाही. झोपायच्या आधी एकदा जाऊन जायचे ते पुन्हा दुसरे दिवशी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या लगेचचे पहीले काम! मध्यरात्री , पहाटे ‘त्या’ कामा साठी सहसा उठावे लागत नाही.

पण मधुमेह असेल तर मात्र हे तंत्र बिघडते. अशा व्यक्तिंना दिवसात जास्त वेळा लघवीला जावे लागतेच शिवाय बहुतेकांना रात्री एकदा झोपल्या नंतर ,साधारण रात्री २ ते ३ वाजता त्यांना एकदा टॉयलेटला भेट द्यावी लागतेच आणि गंमत म्हणजे ‘आता गेलोच आहे तर ट्रीप वाया जाऊ नये म्हणून असेल किंवा शास्त्र म्हणून ,  म्हणून थेंब थेंब’ असे ‘ते जाणे’ नसते , होते ती अगदी भरपूर होते!

याचे कारण असे आहे:

‘मधुमेह’ म्हणजे रक्तातली साखर वाढणे. आपण अन्न म्हणून जे जे काही खातो (चरतो!) त्याची ‘साखर (ग्लुकोज)’ तयार होते आणि ती रक्तात मिसळते , रक्ता मार्फत ही साखर आपल्या शरीरातल्या सर्व पेशींना ही साखर एक उर्जा ( पेट्रोल म्हणा हवे तर !) पुरवली जाते. सर्व पेशींना अशी साखर पुरवल्या नंतर देखील काही साखर रक्तात शिल्लक राहतेच पण ती अगदी नगण्य असते , एक राखीव साठा म्हणून रक्तात अशी थोडी साखर असणे अत्यावश्यक असतेच, त्यासाठी सामन्यत: ही साखर एका स्थिर पातळी वर राखली जाते. आपल्या शरीरात साधारण पणे ५ लिटर रक्त असते आणि संपुर्ण रक्तातला हा स्थिर साखरेचा साठा साधारण पणे ४ ते ५ ग्रॅम असतो ( एक चमचाभर साखर फक्त!)
काही कारणां मुळे हा साखरेचा स्थिर साठा या ४ ते ५ ग्रॅम पेक्षा कमी झाला तर मात्र आफत ओढवते इतकेच नव्हे तर हा साठा याहून खूपच कमी झाला तर मेंदूचे काम बंद पडून मृत्यू  येतो !

निरोगी व्यक्तीत साखरेचा हा समतोल अगदी छान , बिनतक्रार राखला जातो (नशिबवान आहेत बेटे!) पण मधुमेही व्यक्ती मध्ये या साखरेचे नियोजन गोंधळलेले असते. आता निरोगी असा की मधुमेही, काहीही खाल्या नंतर रक्तातले साखरचे प्रमाण वाढणे यात वावगे काहीच नाही , हे निसर्ग नियमा प्रमाणे होत असते पण ही वाढलेली साखर झटपट वितरीत करुन , झाकापाकी करुन , रक्तातली साखर पुन्हा स्थिर पातळी वर ( ४ ते ५ ग्रॅम) आणणे निरोगी व्यक्तीत अगदी सहजी होते ते मधुमेहात शक्य होत नाही, याला काही कारणे आहेत ( त्याचा विचार आपण एका स्वतंत्र लेखा द्वारे करू) , मधुमेहीं मध्ये रक्तातल्या वाढलेल्या साखरेचा काही मर्यादीत भागच वितरीत होतो आणि बाकी शिल्लक साखर , जी बरीच असते ती तशीच रक्तात एखाद्या सडक्या कांद्या सारखी साचून राहते आणि नेमके हेच धोकादायक आहे  ( ते का?  याचा विचार आपण एका स्वतंत्र लेखा द्वारे करू). अर्थात निसर्गाने आपले शरीर घडवताना ह्या सार्‍याचा विचार जरूर केलेला आहेच त्यामुळे असा ‘सडलेला कांदा’ फार काळ साठवून ठेवायचा नाही ( ठेवणे धोकादायक असते म्हणून) म्हणून आपल्या शरीरातली ‘अतिरिक्त शर्करा विल्हेवाट’ यंत्रणा कार्यांवित होते. ह्या यंत्रणे मार्फत रक्तातल्या ह्या अतिरिक्त आणि नकोशा झालेल्या साखरेची विल्हेवाट लावली जाते. त्यासाठी बरेच मार्ग आपल्या शरीराकडे उपलब्ध असतात ( ते कोणते याचा विचार आपण एका स्वतंत्र लेखा द्वारे करू) , सर्वप्रथम या अन्य मार्गांनी अतिरिक्त साखरेची विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला जातो आणि या मार्गांनीही साखर हटली नाही तर मात्र निर्वाणीचा उपाय म्हणून  आपल्या किडनीज ना (मुत्रपिंड) कामाला लावले जाते !

आपल्या मेंदूला हे माहीती असते की किडनीज अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यांना जपले पाहीजे , त्यांच्या वर अतिरिक्त ताण पडता कामा नये त्यामुळे एरव्ही जेव्हा रक्तातली साखर वाढलेली असली तरी अजून आवाक्यात तो पर्यंत आपल्या शरीरा कडून या किडनीज ना ‘साखर घोट्याळ्या’ पासून चार हात लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोच  किडनीज ना इतक्या लगेच ,जरा ‘खुट्ट’ झाले की ‘साखर हटाव’  कामाला जुंपले जात नाही, पण मग जेव्हा अगदीच गळ्याशी येते तेव्हा नाईलाजाने का होईना किडनीज कडे ही अतिरिक्त साखर बाहेर फेकायचे काम सोपवावेच लागते.

आणि मग काय , आपल्या किडनीज हे काम (आलीया भोगासी असावे सादर) इमाने इतबारे (काहीशी कुरकुर होतच असते म्हणा!) करु लागतात. किडनीज जेव्हा त्यांच्यावरचे  हे लादलेले , अतिरिक्त काम करु लागतात तेव्हा लघवीचे प्रमाण तर वाढतेच शिवाय सारखी सारखे लघवीला पण जावे लागते , जरा ‘हलके’ होऊन येतो तोच दुसरा कॉल येतो!

अर्थात इथे हे लक्षात घ्या की रक्तातली साखरेची पातळी खूपच वाढलेली असते आणि सातत्याने वाढलेली राहात असते , तेव्हा आणि तेव्हाच किडनीज ना कामाला जुंपले जाते. साधारण रक्तातली साखर जी ७० ते ९० मिलिग्रॅम / डेसिलिटर अशी असावी लागते मधुमेह झाला की ही सुरक्षीत पातळी ओलांडली जाते आणि रक्तातली साखर ९० पेक्षा जास्त रहाण्यास सुरवात होते पण म्हणून लगेच लघवी वाटे साखर बाहेर टाकली जात नाही , जेव्हा रक्तात्ली साखर २००+ अशा धोकादायक पातळीवर आली की मगच किडनीजना ही साखर बाहेर टाकायच्या कामाला जुंपले जाते आणि मगच हे ‘सारखे जावे लागणे’ हे लक्षण दिसायला लागते, याचाच अर्थ मधुमेह चांगलाच बळावला की हे होते. मधुमेहाची लागण होते तेव्हा साखरेची पातळी अशी एकदम वाढत नाही हे लक्षात घ्या, ती जराशीच जास्त असते , १४० च्या आसपास, पण या मधुमेह पूर्व स्थितीत असताना ते लक्षात आले नाही किंवा लक्षात येऊन सुद्धा त्या कडे दुर्लक्ष केले गेले तर मात्र ही साखरेची पातळी वाढत राहते १४० वरुन १५० , पुढे  १६० असे एकेक टप्पे पार करत ती २०० च्या पलीकडे झेपावते आणि २५० च्या पातळी वर येते आणि तेव्हाच मग लघवीतून साखर बाहेर फेकली जायला सुरवात होते. अर्थात ही परिस्थिती निर्माण व्हायला मधुमेहाची सुरवात झाल्या पासून काही महिने ते काही वर्षे इतका कालावधी लागू शकतो.

‘लघवीतून साखर येणे,’गोड लघवी ‘, ‘लघवी केलेल्या ठीकाणी मुंग्या जमा होणे (कडक पहिल्या धारेची असेल तर डोंगळे!) हीच अगदी सुरवातीच्या काळात मधुमेहाची लक्षणे होती, तेव्हा आजच्या सारख्या पॅथॉलॉजीकल टेस्ट्स नव्हत्या, ‘डायबेटीस मेलीट्स’ हे नावच मुळी ‘गोड लघवी’ अशा अर्थाने पडले आहे. आपल्या कडच्या प्राचीन चरक , सुश्रुत यांच्या ग्रंथात ही लघवीतली साखर असेच या रोगाचे उल्लेख आहेत.

अगदी कालपरवा म्हणजे १९८०/ ९०  च्या दशकात, सगळेच मधुमेही लोक्स ‘बेनेडिक्ट सोल्युशन’ वापरुन अथवा लघवीत ‘डायास्टीक्स’ नामक स्पेशल कोटींग असलेली कागदी पट्टी लघवीत बुडवून तिच्या बदललेल्या रंगा वरून लघवीत साखर आहे / नाही आणि असल्यास किती आहे हे तपासत असत. त्यावेळी मधुमेह तपासायचा दुसरा सहजसाध्य, अल्प खर्ची पर्याय उपलब्ध  नव्हता , रक्त चाचण्या दुर्मिळ आणि महाग होत्या. अर्थात ही टेस्ट फसवी आहे कारण लघवीत बुडवलेल्या ‘पट्टीने रंग बदलला नाही म्हणजे लघवीत  साखर नाही’ इथे पर्यंत ठीक असले तरी याचा अर्थ मधुमेह नाही किंवा तो एकदम कंट्रोल मध्ये आहे असे समजणे नुसते वेडगळ पणाचेच नाही तर आणि धोक्याचे आहे. पट्टीने दाखवले नाही म्हणून काय झाले रक्तातली साखर २०० असणे धोकादायकच आहे.

मित्रांनो, रक्तातली वाढलेली साखर ही रक्तातच मर्यादीत रहात आहे तो पर्यंत तिच्या वर नियंत्रण मिळवण्यात काही अर्थ आहे एकदा का ही साखर किडनी मार्फत लघवीतून बाहेर पडू लागली की परिस्थिती हाता बाहेर जायला फार वेळ लागत नाही, ‘साखर हटाव’ च्या या अतिरिक्त ताणा मुळे किडनीज झपाट्याने निकामी व्हायला सुरवात होते याला ‘डायबेटीक नेफ्रोपॅथी ‘ म्हणतात, यात किडन्या कठीण होतात . Glomerulosclerosis- hardening of the glomeruli in the kidney. It is a general term to describe scarring of the kidneys’ tiny blood vessels. किडनीज चा दाह सुरु होतो –pyelonephritis , हळू हळू किडनीज मधल्या रक्त वाहीन्या अरुंद होतात, लघवीतून प्रोटीन्स बाहेर पडायला सुरवात होते, याचाच परीणाम रक्तदाब वाढतो, शरीरावर सूज येते, किडनीज झपाट्याने निकामी होऊ  लागतात्, रक्तात युरीया आणि क्रिएटिनीन चे प्रमाण कमालीचे वाढते, रुग्णाला युरेमीक कोमाचा हिसका बसतो आणि एकदा का हे व्हायला सुरवात झाली की  ‘राम नाम सत्य है ‘  फारसे लांब नाही!

पुढच्या भागात मधुमेहाचे आणखी एक लक्षण तपासू

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+8

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.