‘तुम मुझे वहॉ ढूढ रहे हो और मै यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हू’ ..

शेवटी सापडला एक मेकॅनिकल कि-बोर्ड, किंमत रुपये २००० फक्त!

से पाहीले तर कि-बोर्ड ला इतके पैसे देणे जिवावर आले पण शेवटी विचार केला स्वस्त स्वस्त म्हणत मेमब्रेन कि-बोर्ड घ्यायचा आणि दर आठ – दहा महिन्याला कि-बोर्ड बदलायचा असे करत बसलो तर शेवटी तो आतबट्ट्याचाच व्यवहार ठरणार आहे. कारण मेकॅनिकल कि-बोर्ड घेताना जरा महाग वाटला तरी मेकॅनिकल कि-बोर्ड दहा–पंधरा वर्षे तरी आरामात सेवा देतो. दहा वर्षात किती मेमब्रेन कि-बोर्ड बदलायला लागतील ? सात-आठ तरी नक्कीच ना , मग त्यांची एकत्रीत किंमत या एका मेकॅनिकल कि-बोर्ड पेक्षा  दुपटीहून जास्त होईल त्याचे काय?  हे झाले पैशाच्या बचतीचे , मेमब्रेन कि-बोर्ड वापरुन बोटे ठणकत राहतील त्याचे काय ? मेकॅनिकल कि-बोर्ड वर बोटे ठणकणे हा प्रकारच नाही, मेमब्रेन कि-बोर्ड जसा कालांतराने स्लो, स्लगीश , स्टीकी होत जातो तसे या मेकॅनिकल कि-बोर्ड चे नाही,  हा कि-बोर्ड नवा असताना जसा चालतो तसाच तो दहाव्या वर्षी देखिल चालतो. ही ‘हेमामालिनी’ कधीच म्हातारी होत नाही!

म्हणूनच आज जगभर सर्वत्र जिथे मोठ्या प्रमाणावर टायपिंग करावे लागते (बॅका, सरकारी कार्यालये, कोर्ट, डेटा इंट्री ) अशा सर्वच क्षेत्रात हे असले मेकॅनिकल कि-बोर्डच मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

चेन्नई स्थित ‘टी.व्ही.एस’ नामक कुंपणी (ही तीच मोटारसायकलीं पण बनवते) हा कि-बोर्ड बनवते. या कि-बोर्ड मध्ये जगप्रसिद्ध , जर्मन ‘चेरी ब्लू’ मेकॅनिकल कीज वापरल्या जातात. जगातल्या ८०% मेकॅनिकल किबोर्ड मध्ये चेरी किज वापरल्या जातात ईतका या ‘चेरी’ चा दबदबा आहे. चेरी कुंपणी अनेक प्रकारच्या कीज बनवते पण ७०% कि-बोर्ड मध्ये चेरी ब्लू हीच व्हरायटी वापरलेली दिसते , ह्या कीज सुंदर ‘क्लिक’ असा आवाज करतात , ह्या कीज चा टॅकटाईल फिडबॅक ही उत्तम आहे म्हणुनच या चेरी ब्लू कीज फार लोकप्रिय आहेत . १०,००० रुपयां हून जास्त किंमत असलेल्या कि-बोर्ड मध्येच पाहावयास मिळतील अशा अत्युच्च दर्जाच्या चेरी ब्लूज  कीज, टी.व्ही.एस वाल्यांनी वापरल्या आहेत.

काळ्या रंगातला हा कि-बोर्ड तसा अनाकर्षक आहे. कुठे तो लेनेवोचा आरसपानी सौंदर्याचा नमुना असलेला कि-बोर्ड आणि कोठे हा मद्राशी रेडा! मी  रेडा म्हणालो पण यात कोणतीही अतिशयोक्ती नाही तसा तो आहेच ! रोमणाळ , अंगापिंडाने जरा जास्तच भरलेला , ते दुहेरी हाडाचा असे काही म्हणतात ना तसा हा रेडा बहुदा तिहेरी हाडाचा असावा. किलो दीड किलो तरी वजन असणार बघा , कोणाच्या टाळक्यात घातला (काहीच्या काही कल्पना आहे नै) तर जीव जायचा एखाद्याचा.

आय.बी.एम च्या एका १९८० मधल्या डिझाईन वर आधारीत हा कि-बोर्ड खरेच १९८० सालातला वाटतो. कि- बोर्ड वर १०४ किज जुन्या पद्धतीच्या लेआऊट मध्ये आहे , नम लॉक, कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक चे एल ई डी दिवे अगदीच  बाबा आदम च्या जमान्यातले भडक , उथळ आणि बटबटीत , डोळ्यात खुपणारे (आय सोर) आहेत.  टायपिंग करणे हाच एक मुख्य हेतु डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आला असल्याने इतर महागड्या कि-बोर्ड मध्ये असतात तसे बॅक लायटींग , इल्युमिनीटेड कीज,  मल्टी मेडिया किज, मायक्रो किज, प्रोग्रॅमेबल कीज असले काही नाही, थोडक्यात हा कि-बोर्ड  अतिप्रगत व्हिडीओ गेम्स खेळणार्‍या गेमर्स साठी नाही.

कि-बोर्ड अर्थातच प्लॅस्टीकचा आहे , काही महागड्या कि-बोर्डस मध्ये अल्युमिनियम फ्रेम वापरली असते तशी इथे नाही (पण ह्या असल्या नखर्‍याची खरेच काही आवश्यकता नसते) , इथे प्लॅस्टीक चांगल्या दर्जाचे असणे महत्वाचे आणि या कि-बोर्ड मध्ये वापरलेले प्लॅस्टीक निश्चितच चांगल्या दर्जाचे आहे.  संपूर्ण बॉडीला काहीसे मॅट फिनिश दिले आहे, हे चांगले त्यामुळे कि-बोर्ड वर बोटांचे ठसे ( फिंगर प्रिंट्स)  दिसत नाहीत. कीज तेवढ्या गुळगुळीत ग्लॉसी फिनिश मध्ये आहेत. हे असेच असायला हवे , म्हणजे कीज च्या टॉपवर धुळ साचून राहणार नाही , असा ग्लॉसी पृष्ठभाग बोटां ना  पण चांगला. ते हेमामालिनी च्या गालाचे लक्षात आहे ना !

प्रत्येक कीज चा टॉप हा मेमब्रेन कि-बोर्ड मध्ये असते तसा सपाट नसून काहीसा (अस्पष्ट) अर्धवर्तुळाकार आहे (कर्व्हड सरफेस) हा किंचितसा अर्धवर्तुळाकार, अंतर्वक्र पृष्ठभाग आपल्या बोटांचा मांसल भागाच्या (पेरे) बहिर्वक्र आकाराच्या बरोबर उलट असल्याने आपली बोटे किज वर कुलुप –किल्ली सारखी चपखल बसतात, त्यामुळे बोटांवर ताण पडत नाही , टायपिंग करताना कमालीचे सुखद वाटते.

किज च्या रांगांचा लेआऊट साधारण  बशी सारखा (contoured design , सॉसर शेप) आहे, म्हणजे वरच्या रांगेतल्या कीज जराशा उंच, मधल्या रागेतल्या कीज त्याहुन खाली आणि तळातल्या रांगेतल्या  कीज पुन्हा उंच, ही रचना आपली बोटे कि-बोर्ड जशी बसतात आणि हलतात त्याला अगदी अनुरुप आहे. या रचनेचा मुख्य फायदा म्हणजे बोटे कि-बोर्ड पणे सहजपणे फिरतात आणि त्यामुळे टायपिंगचा स्पीड तर वाढतोच शिवाय टायपिंगच्या  चुकांचे प्रमाण पण बर्‍याच प्रमाणात कमी होते.  टायपिंग कमालीचे सुखकर आणि जलद होते, बोटे दुखत नाहीत. अशी रचना आजकालच्या मेमब्रेन कि-बोर्ड मध्ये क्वचितच वापरलेली दिसते , बहुदा मेमब्रेन  तंत्रज्ञानात असे करणे जमत नसावे  अशी रचना असलेले काही सेमी मेकॅनिकल (मेमब्रेनची एक व्हरायटी ) कि-बोर्ड आहेत पण ते या मेकॅनिकल कि-बोर्ड इतकेच महाग आहेत.

या कि-बोर्ड चे आणखी एक खासीयत म्हणजे नेहमी पेक्षा खूपच मोठी ‘एंटर’ की. 

आजकालच्या कि-बोर्ड वर अशा मोठ्या आकारातली एंटर की अभावानेच आढळते. याचा लाभ होतो का नाही हा वादाचा विषय होऊ शकेल, हे ज्याने त्याने अनुभवाने ठरवावे पण मला स्वत:ला अशी मोठ्या आकारातली एंटर की खूपच सोयीची वाटली. मी एंटर साठी ‘करंगळी’ वापरतो त्याला अशी मोठ्या आकारातली की जास्त सोयिस्कर पडते.

कि-बोर्ड च्या तळाशी नेहमी प्रमाणेच रबराचे पाय आहेत , हे पण बाबा आदमच्या जमान्यातले घसघशीत आहेत , एक प्रकारे ते चांगलेच आहेत , त्यामुळे कि-बोर्ड हादरत नाही , सरकत नाही. कि-बोर्ड काहीसा तिरक्या अवस्थेत ठेवण्यासाठी स्टॅन्ड आहेत. हे पण असेच घसघशीत , मजबूत आहेत, किबोर्ड बॉडी जोडून ठेवण्यासाठी चक्क मजबूत असे पितळेचे स्क्रु वापरले आहेत , इथेच या लोकांनी मजबुतीकडे किती लक्ष दिले आहे हे लक्षात येते.  हे लोक कि-बोर्ड बनवतात का रणगाडा असा प्रश्न पडावा.

किबोर्ड वर टीवीएस वाल्यांनी त्यांचे नाव असलेलला चक्क कागदी स्टीकर लावला आहे हे मात्र अगदीच चीप वाटते , प्लॅस्टीक मध्ये सुबक एनग्रेव्हीग़ केले असते किंवा एखादा उठावदार बॅज वापरला असता तर नक्कीच चांगले दिसले असते , फारतर याने कि-बोर्ड्ची किंमत काहीशी (५-१० रुपये !) वाढली असती , ते काहीही असो पण हे बॅज , स्टीकर्स कॉस्मेटीक सदरात मोडत असल्याने त्याच्याकडे लक्ष न दिले तरी चालेल.

एक सोय जी १९८० च्या कि-बोर्ड मध्ये हमखास असायची ती इथेही आहे म्हणजे कि-बोर्ड च्या वरच्या अंगाला पेन , पेंन्सील ठेवायाला खास जागा ! व्वा , क्या बात हैं,  अहो , टेबलावरचे पेन हुडकण्यात मी किती वेळ घालवला असेल याची गणती करणे अशक्य आहे. आजच्या आधुनिक कि-बोर्ड मध्ये आकार लहान करण्याच्या नादात ही सोय हटवली गेली. पण या कि-बोर्ड मध्ये ती आहे , जुने ते सोने म्हणतात ते उगाच नाही!

कि-बोर्ड्च्या दिसण्यापेक्षा तो टायपिंग कसे करतो हे महत्वाचे ना? आपण फक्त त्याच गुणांचा विचार करुन हा कि-बोर्ड घेतला आहे. नाहीतर माझ्या टेबला वरच्या सुंदर , थीन बेझेल , कमनिय (क्या बात है!) एच.पी. च्या २१ इंची मॉनिटर समोर हा रेडा म्हणजे डोल्यांवर अत्याचारच म्हणायचा पण रेडा आहे गुणाचा , घेऊ चालवून!

मुळात मेकॅनिकल कीज आहेत म्हणल्या वर टायपिंग किती मुलायम असेल हे सांगायची आवश्यकताच नाही. त्यात ह्या चेरी ब्लू कीज आहेत. प्रत्येक की दाबल्यावर ‘क्लिक’ असा आवाज येतो आणि त्याचवेळी बोटावर कि कडून एक नाजुकसा उलट आघात जाणवतो (टॅकटाईल फिडबॅक) , त्यामुळे की नक्की दाबली गेली हे तर कळतेच शिवाय कि वर अनावश्यक दाब द्यावा लागत नसल्याने बोटे दुखणे हा प्रकार जवळजवळ नाहीच , टायपिंग ची गती पण वाढते, एकंदरच हा एक कमालीचा सुखद अनुभव आहे, प्रत्येकाने एकदा तरी हे अनुभवावे  असे मी सुचवेन.

‘टायपिंग’ या अंगाने बघाल तर हा की-बोर्ड वापरणे म्हणजे बोटांना मेजवानीच आहे. गदी फुलासारखे नाजुक, हळुवार कि स्ट्रोक्स , बोटे कि-बोर्ड वर नुसती तरंगतात, एकदम मुलायम सिंग, इतका की हा एकदा  कि-बोर्ड हाताळला की सतत टाइप करत राहावे , थांबूच नये असे वाटायला लागते. मी हा अनुभव प्रत्यक्षच घेतो आहे.

माझ्या जुन्या कि-बोर्ड वर हे टायपिंग करणे केवळ सक्तमजुरी होती पण  हा टी.व्ही.एस कि-बोर्ड आला आणि आता मी टायपिंग करायला निमित्त हुडकत असतो. केव्हढा मोठा फरक म्हणायचा हा! हा कि-बोर्ड आल्या पासुन माझी टायपिंग ची गती निश्चीतच वाढली आहे, दोन कारणे , पहीले कारण आता पूर्वी सारखे जोरात की दाबायाला लागत नाही,  तसेच प्रत्येक की स्ट्रोक अचुक होत असल्याने टायपिंग च्या चुका होण्याचे प्रमाण अगदी कमी , टाईप करताना झालेल्या चुकां दुरुस्त करण्यात जो मौल्यवान वेळ वाया जात होता आता खूपच कमी झाला आहे, तसेच अगदी कमी जोर देऊन काम होत असल्याने बोटे दुखत नाहीत, जास्त वेळ सलग काम करता येते त्यामुळे बरेचसे काम वेगाने उरकता यायला मदत होते आहे..

कि- बोर्ड मेकॅनिकल असल्याने प्रत्येक की प्रेस केल्यावर ‘क्लिक क्लिक’ असा आवाज येतो जो मेम्ब्रेन कि-बोर्ड च्या तुलनेत खूपच जास्त असला तरी का ‘क्लिकक्लिकाट’ कानाला कर्कश्य न वाटता कमालीचा सुखद वाटतो , त्रास तर अजिबात होत नाही , उलट असे लयबद्ध  क्लिकक्लिक ऐकत टायपिंग करताना मजा येते .

कि-बोर्ड उत्तम असला तरी सगळ्यांनीच हा घेतला पाहीजे असे नाही.  दोन हजाराच्या घरात किंमत आहे म्हणजे तसा महागच आहे, कि-बोर्ड च्या किंमती इतक्या नसाव्यात हो ! जे लोक ईमेल चेक करणे, फेसबुक , यु-टूब चे व्हीडिओ , फोटो बघणे असा कॉम्प्युटरचा अगदी हलका उपयोग करतात त्यांच्या साठी कदाचित हा किबोर्ड नाक पेक्षा मोती जड ठरेल , पण जे ब्लॉग लिहतात, ट्रान्सलेशन  / ट्रान्सस्क्रिप्ट चे काम करतात, डेटा एंट्री , लिगल किंवा तत्सम टायपिंगचे काम रोज, मोठ्या प्रमाणात करतात , जे लोक्स दिवस दिवस सॉफ्टवेअर  लिहीत असतात त्यांना मात्र हा कि-बोर्ड एक वरदान ठरेल.

गालबोट:

जगात अगदी परफेक्ट म्हणता येईल असे काय आहे ? हा कि-बोर्ड ही त्याला कसा अपवाद असेल! याला ही काही गालबोटं लागलेलीच आहेत पण ती अगदी किरकोळ हा सदरात मोडणारी आहेत पण तरीही ज्यांना हा कि-बोर्ड घ्यावासा वाटेल त्यांना माहीती असावे म्हणून उल्लेख करत आहे.

 

  1. कि-बोर्ड अवाढव्य आहे. अजस्र आहे, काही क्षण मी सुद्धा थोडासा हकाबुक्का होऊन या कि-बोर्ड कडे पाहात राहीलो. अरे हे काय धूड येऊन बसले माझ्या टेबलावरती ! आत्ता सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या , लोकप्रिय असलेल्या लॉजीटेक, लेनेवो मेमब्रेन कि-बोर्ड च्या तुलनेत हा कि-बोर्ड बराच मोठा आहे , उंच आहे, मुळ किज लहान आहेत पण आजूबाजूला (डावी – उजवी बाजू) जरा जास्तच मोकळी  जागा सोडली आहे , त्यामुळे कि-बोर्डची लांबी रुंदी वाढली आहे , ही जागा इतर किबोर्ड मध्ये वाचवलेली असते , तसे या कि-बोर्ड्च्या बाबतीत झाले तर कि-बोर्ड जरा जास्त आटोपशीर होईल आणि देखणा पण दिसेल , अक्शी सोनाक्षी सिन्हा सारखा!
  2. कि-बोर्ड वरची अक्षरें चक्क स्क्रीन प्रिटींग केली आहेत! काय  हे कर्मदारिद्र्य म्हणायचे ! सामान्यत: आजकालच्या ३०० रुपयांच्या किबोर्ड वर सुद्धा ही अक्षरे लेझर प्रिंटींग़ केलेली असतात त्याचा विचार करताना , टी.व्ही.एस वाल्यांनी अट्टाहासाने स्क्रिन प्रिंटीग़ करणे खटकते. हे लिहायचे कारण म्हणजे ही स्क्रीन प्रिंटींग केलेली अक्षरे काही वापरानंतर अस्पष्ट होतात आणि कालांतराने दिसेनाशी होतात. अर्थात हे जिथे रोज दिवसभर कि-बोर्ड बडवला जातो अशा ठिकाणीच होईल , नार्मल ज्याला आपण मॉडरेट युज म्हणतो त्या वापरात ही शक्यता कदाचित पाच -सात वर्षां  येऊ शकेल, त्यामुळे आत्ता तरी ह्याची फिकिर करायला नको.
  3. आजकाल स्टॅन्डर्ड फिचर झाले अशा मल्टि मिडिया किज या कि-बोर्ड वर नाहीत (उदा: स्पीकर व्हॉलूम अप/ डाऊन) ‌ पण त्यांनी काही अडचण नाही, नाहीतरी ह्या जादाच्या मल्टीमिडिया कीज अभावानेच वापरल्या जातात, पण ज्यांना अशा किज वापरायची सवय आहे त्यांना कदाचित बरेच चुकल्या चुकल्या सारखे वाटेल, कोणाची गैरसोय होईल. स्पीकर व्हॉलूम अप/ डाऊन कीज नसल्याने माझी थोडी गैरसोय होते आहे हे मान्य!
  4. केबल जी कि-बोर्ड आणि कॉम्प्युटर जोडते तीची लांबी अगदीच तोकडी म्हनजे कशीबशी दीड मीटर आहे , टी.वी.एस. वाल्यांनी नको तिथे काटकसर केली आहे. कि-बोर्ड आणि कॉम्प्युटर मधले अंतर अवघ्या दोन – तिन फुटातच हवे , अर्थात बर्‍याच वेळेला तसे ते असतेच पण काही जणांचा कॉम्प्युटर डेस्क च्या दुसर्‍या टोकाला असतो त्यांना मात्र केबल ची लांबी अपुरी वाटेल, मग एक्स्टेंशन केबल वापरावी लागेल तो जादाचा खर्च  अंदाजे १०० रुपयांच्या आसपास येऊ शकेल.
  5. हा कि-बोर्ड चेरीच्या मेकॅनिकल कीज नी बनला आहे आणि मेकॅनिकल कीज आवाज करतात , अगदी आपल्या जुन्या टाइपरायटर सारखा आवाज येतो  तसा अर्थात तितका मोठा नाही. पण  जाणवण्या इतका आवाज येतो . पण हा आवाज सुंदर आहे , डोक्याला त्रास होईल असा कर्कश्य  तर अजिबात नाही, असे असले तरी ज्यांना सध्याच्या मेमब्रेन  कि-बोर्ड चा जवळजवळ आवाज विरहीत टायपिंग ची सवय झाली आहे त्यांना हा आवाज त्रासदायक वाटू शकेल तसेच तुमच्या आजुबाजुच्या लोकांना हा आवाज सतत कानावर पडल्याने त्रास होऊ शकेल विषेषत: घरात रात्रीच्या वेळी हा आवाज काहीसा जाणवण्या इतका मोठा वाटण्याची संभावना आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो हा आवाज कानाला गोड वाटतो, सवय झाली की जाणवणार सुद्धा नाही आणि मजा म्हणजे , पुढे असा आवाज आला नाही तर काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटेल हे नक्की.
  6. किज लहान आहेत , फार नाहीत पण फरक जाणवण्या इतक्य लहान आहेत , रुंद पंजा आणि जाड बोटे असलेल्या भैरु पैलवानांना ही अडचण वाटेल पण जरा सराव झाला की  टायपिंग ला कोणतीही अडचण येणार नाही. हा कि-बोर्ड नव्याने वापरताना सुरवातीला एखाद दिवस किज जवळजवळ असल्याने अंदाज चुकेल पण लौकरच याची सवय होऊन ‘मसल मेमरी’ तयार होईल आणि मग हा नगण्य फरक लक्षात सुद्धा येणार नाही.
  7. कि-बोर्डचा रेड्या सारखा आकार आणि कि-बोर्ड पासुन निघणारी ओंगळ केबल कोणाच्या चकाचक डेस्कला ठिगळ लागल्या सारखे दिसेल त्याला नाईलाज आहे. आजकाळ क्लिन डेस्क, केबल फी वर्क स्पेस आणि मिनिमलॅस्टीक डिझाईनची चलती आहे तिथे हा कि-बोर्ड शोभणार नाही. ज्यांची डेस्क स्पेस अगदी कमी आहे किंवा जे बाजारात तयार मिळणारे कॉम्प्युटर टेबल (ज्याला कि-बोर्ड चा ट्रे असतो) त्यांनी या कि-बोर्डची मापे तपासुन पाहावीत. हा कि-बोर्ड बरीच डेस्क स्पेस खातो हे लक्षात घ्या तसेच टेबलाला जोडलेला कि-बोर्ड ट्रे लांबीला लहान असेल तर कि-बोर्ड त्यात बसणार नाही अशीही शक्यता आहे , जरी कि-बोर्ड बसला तरी शेजारी माऊस ठेवायला जागा उरणार नाही असे पण होऊ शकते तेव्हा लांबी, रुंदी नीट तपासुनच मग हा कि-बोर्ड घेण्याचा निर्णय घ्यावा. 19″(483mm) in length, 7.5″(189mm) in width and maximum 2.3″ approx(56mm) in height.
  8. हा कि-बोर्ड पी.एस. टू आणि यु.एस.बी. या दोन प्रकारात मिळतो, मी मुद्दाम  पी.एस टू कनेक्शन असलेला  कि-बोर्ड घेतला,  कारण पी.एस. टू  तंत्रज्ञान काहीसे जलद रिस्पॉन्स देते असा अनुभव आहे. आताच्या लॅपटॉप आणि बराचश्या डेस्कटॉपना हे पी.एस. टू  पोर्ट नसते, तिथे फक्त  या कि-बोर्डची यु.एस.बी. वाली व्हर्शन घेणे हाच एक पर्याय. दोन्ही वर्शन सारख्याच आहे,  कि-बोर्ड तोच आहे फक्त कॉम्प्युटर ला कि-बोर्ड  कसा जोडतात ते कनेक्टर वेगवेगळे आहेत. माझा स्वत:चा अनुभव नसला तरी ज्यांनी हे दोन्ही प्रकाराचे कि-बोर्ड वापरले आहेत त्यांनी पी.एस टू व्हर्शन जास्त चांगली आहे असा निर्वाळा दिला आहे. यु.एस.बी. साठी जादाचे हार्डवेअर सॉफ्टवेअर लागते तसेच यु.एस.बी सिग्नल हाताळण्याचे तंत्र वेगळे/ संथ असल्याने , कि-बोर्ड च्या कार्यक्षमतेत किंचितसा फरक पडणे स्वाभाविक आहे. पण असा काही फरक असला(च) तरी तो अत्यंत नगण्य असाच असेल. ज्यांच्या कडे पी.एस. टू  पोर्ट आहे त्यांनी पी.एस. टू वाला कि-बोर्ड घ्यावा असे मी सुचवेन पण मग हा कि-बोर्ड पुढे मागे लॅपटॉप ला जोडता येणार हे लक्षात ठेवावे (अर्थात ही पण काही समस्या नाहीच , पी.एस. टू  ते यु.एस.बी कन्व्हरटर  अवघ्या १०० रुपयात बाजारात मिळतो , प्रश्न सुटला !)

 

आजकालच्या सगळेच  ‘मेड इन चायना’ च्या जमान्यात असे स्वदेशी ‘मेड इन इंडीया’ असे अभिमानाने म्हणावे असे एक तरी उत्पादन आज माझ्या टेबल वर आहे , याचे फार मोठे समाधान आहे.

रेड्याच्या प्रेमात कोणी कधी पडले आहे का ? पण हा रेडा प्रेमात पडावा अस्साच आहे !

समाप्त

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.