ज जातो का उद्या अशी वाट पाहायला लावणार्‍या माझ्या एच.पी. किबोर्ड ने शेवटी एकदाचे अंग टाकले ,  नाही म्हणजे तसा तो  ‘गेला’ नाही , अजुन थोडी धुगधुगी उरलीय त्याच्यात पण आता तो इतका स्टीकी झाला आहे की विचारायची सोय नाही. बटने दाबून दाबून बोटे नुसती दुखायाला नाही तर चक्क ठणकायला लागली , बर्‍याच वेळा टाइप केलेली अक्षरे स्क्रीनवर उमटतच नाहीत  तर कधी  एकच अक्षर दोन दोनदा !

पण अगदी ‘काल परवा तर ठीक होता की मग असा अचानकच कसा काय गेला म्हणायचा’ असे सांत्वन करायची गरज नाही कारण हे असे होणारच होते, होतच राहील, याला कारण म्हणजे कि-बोर्ड मध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान. आजकालचे  जवळजवळ सगळेच कि-बोर्ड ‘मेमब्रेन ’ तंत्रज्ञान वापरुन बनवले जातात , हे कि-बोर्ड स्वस्त असतात, सपाट असतात, नाजुक, कमी जागा व्यापणारे, वजनाला हलके, दिसायला देखणे. पण  हा हनीमुन फार लौकर संपतो. नेहमीच्या वापरात हे कि-बोर्ड वर्षभरातच रंग दाखवायला (उधळायला ?) सुरवात करतात. जो कि-बोर्ड नवा असताना फिदर टच (म्हणजे मोरपिसा फिरवल्या सारखा अल्लाद) होता तो आता तसा राहत नाही, लग्नात चवळीच्या शेंगे सारखी असलेली कन्या , दोन वर्षात … जाऊ दे (तुम्हाला म्हैतच आहे !) … पुर्वी नुसते की वर हलकेसे बोट टेकवले तरी पुरायचे , पण हळू हळू या मेमब्रेन कि-बोर्ड चा रबर डोम कडक व्हायला सुरवात होते, त्याची लवचिकता कमी होते आणि मग ‘की’ वर जरा जास्त जोर द्यायला लागतो आणि शेवटी शेवटी तर कि-बोर्ड वर कथ्थक , भरतनाट्यम करावे लागते तेव्हा कोठे अक्षर !

जर आपला कि-बोर्डचा वापर अगदी हलका असेल किंवा धुळी पासुन मुक्त अशा ए.सी. खोलीत  वापरला जात असेल तरच असे  कि-बोर्ड जरा जास्त काळ चांगले काम देऊ शकतात. मुळात हे ‘मेमब्रेन’ तंत्रज्ञान सदोषच आहे पण त्या आगीत तेल ओतून या असल्या कि-बोर्डची (उरली सुरली) वाट लावण्यात आपल्या इथे सर्वत्र भरुन राहीलेली धूळ मोठा हातभार लावते. कि-बोर्डच कशाला अनेक इलेक्ट्रोनिक उपकरणांची वाताहात या धुळी मुळेच तर होत असते. किति ही साफसूफ करा , काळजी घ्या , बारीक धुळ या उपकरणात जातेच आणि नुकसान करते. ह्या धुळी बरोबरच ‘तापमान ‘ (हवेतला उष्मा) पण काही प्रमाणात कारणीभूत आहे.

तर सांगायचे काय , माझ्या एच.पी. कि-बोर्ड ने रंग उधळायला सुरवात केली, पार अगदी ‘एच.पी.’ ह्या कुळाला बट्टा लावला म्हणा ना ! (खानदान की इज्जत मिट्टि में मिला दी!) , आता माझा व्यवसायच असा आहे की मला रोज २० एक पाने तरी टायपिंग़ करावे लागते त्यामुळे या स्टीकी कि-बोर्डने माझी बोटे दुखायला लागली, त्याच बरोबर टायपिंग करत असताना अक्षरे उमटत नसल्या मुळे टायपिंग मध्ये होणार्‍या चुका दुरुस्त करण्यातच माझा निम्मा वेळ मोडायला लागला! टायपिंग म्हणजे एक वैतागवाडी झाली! पण न करुन सांगतो कोणाला ?

शेवटी मी निर्णय घेतला बास्स..’ बर्दाशी भी एक हद होती है , अब नहीं सह सकता ऐसे कि-बोर्ड को.’.  झालं,  माळ्यावरच्या खोक्यात या आधीच जाऊन बसलेले दोन किबोर्ड होते,  मायक्रोसॉफ्ट आणि लेनोवो या दिग्गजांनी बनवलेले त्याचा जोडीला आता हा तिसरा ..आणि हे सारे गेल्या दोन अडीच वर्षात झाले आहे. मी त्या माळ्यावरच्या खोक्याकडे पाहून पहीला आवंढा गिळला (दुसरा आवंढा केव्हा आणि का ते सांगतोच आहे, जरा दम धरा!) … मायक्रोसॉफ़्ट च्या कि-बोर्डचे काही फारसे वाटले नाही (नाहीतरी काही तरी वाटण्या सारखी मायक्रोसॉफ्ट कुंपणी आहे का हो ? मायक्रोसॉफ्ट म्हणजे ‘धरलं चावतय आणि सोडलं तर पळतय अशी गत आहे) पण त्या नाजुक सुकुमार देखण्या लेनोवो कि-बोर्डचे तरी असे (खानदान की इज्जत लक्षात आहे ना?) व्हायला नको होते राव ! इतका देखणा अगदी डोळ्याचे पारणें फेडेल असा राजस किबोर्ड होता हो तो , मोठ्या हौसेने घेतला होता मी, सुरवातीला तरी चांगला चालला होता ..

एकदम गुळगुळीत , मुलायम डीट्टो हेमामालिनीच्या गाला सारखा !

(मी अजुनही हेमामालीनीच्या युगातच वावरतो आहे , आजकालच्या नव्या झिरो फिगर वाल्या पोरींशी आमचे जमणे जरा अवघडच आहे , त्यातल्या त्यात (खडूस बाप वगळता )  सोनाक्षी सिन्हा जरा बरी आहे !)

आता नवा किबोर्ड चा शोध घेणे आलेच ! अ‍ॅमेझॉन (तेच ते आपला कोपर्‍यावरचे सदा सर्वकाळ उघडे असणारे फ्रेंडली वाण्याचे दुकान हो) बघितले , तिथे तसे शेकड्यांनी कि-बोर्ड मांडुन ठेवलेले आहेत , रग्गड चॉईस .. पण  सगळे एकजात ‘मेमब्रेन’ वाले अरविंद केजरीवाल!   माळ्यावरचे को-बोर्ड चे खोके आठवत माझी नजर आता काही वेगळेच धुंडाळत होती,  ह्या असल्या  नाजुक साजुक , सुकुमार, चिकण्या-चुपड्या मेमब्रेन तंत्रज्ञान वाल्या कि-बोर्ड नी एकादा नव्हे दोनदा नव्हे चांगले तिनदा हात पोळून घेतले आहेत  ‘अब ऐसी गलती हम कतह नहीं करेंगे’ (काय , जमला ना हिंदी डॉयलॉक !)

आता मी हुडकत होतो ‘मेकॅनिकल की ’ असलेला कि-बोर्ड ! मेकॅनिकल कि-बोर्ड  मध्ये रबर डोम वगैरे प्रकार नसतो, सरळसरळ एखाद्या दिव्याच्या बटना सारखी प्लंजर, स्प्रिंग सदृष्य रचना असते त्यामूले धुळ , तापमान , झीज यांचा फारसा परिणाम या कीज वर होत नाही. रबर डोमच्या पेक्षा खुपच कमी दाब कि वर दिला तरी काम होते , की दाबली की आपले काम करुन क्षणात पूर्ववत आपल्या जागी येते आणि हे सगळे वर्षानुवर्षे बिनतक्रार चालू राहते . असे मेकॅनिकल कि-बोर्ड दहा – पंधरा वर्षे तरी आरामात सेवा देतात.

‘मेकॅनिकल कि-बोर्ड ‘ चा शोध चालू  केला खरा पण लौकरच ‘घी देखा लेकिन बडगा नहीं देखा’ अशी अवस्था झाली माझी!

ते ‘मेकॅनिकल की’ वगैरे सर्व ठीक हो पाव्हणं पण ‘नगद नारायणा’ चे काय ? एका हाटिलात (पुण्यातल्या ! असा प्रकार दुसरी कडे कोठे?) पाटी लावली होती ‘जिभेचे लाड पुरवण्या पुर्वी खिशाचा सल्ला घ्या’ त्याची आठवण झाली.. असले मेकॅनिकल कि-बोर्ड घेण्यपूर्वी बॅक बॅलन्स तपासणे आवश्यक आहे मी तर या पुढे ही जाऊन म्हणेन ‘मेकॅनिकल कि बोर्ड घेण्या साठी कोणती बॅक कर्ज देते ‘ याची ही चौकशी करावी , इ.एम.आय किती बसेल ते पण बघावे ‘ कारण या कि-बोर्ड च्या किंमतीच तशा आहेत … मला धक्का बसला… अशा किबोर्ड च्या किमती दहा – पंधरा हजाराच्या घरात असू असतात यावर पयल्यांदा माझा विश्वासच बसला नाय हो.. मी दुसर्‍यादा आवंढा गिळला (आधीचा लक्षात आहे ना .. पहील्या आवंढ्याचे कारण माळ्यावरचे निकामी किबोर्ड चे खोके!)

जसा जसा शोधत गेलो तसा तसा मी अधिक अधिक निराश होत गेलो, एकवेळ अशी आली की मी ‘मेकॅनिकल कि-बोर्ड’ ची आशाच सोडली होती (आपण नाही का  मर्सीडीज, बी.एम.डब्लू कार ची आणि ‘अच्छे  दिन’ ची पण ‘आशा सोडून दिली आहे ना , अगदी तस्से!) पण अचानक काहीसा महाग वाटणारा पण बजेट मध्ये कसाबसा (कोंबुन) का होईना बसवता येईल असा कि-बोर्ड घावला एकदाचा !

म्हणतात ना ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा ‘ तसेच झाले इकडे मी फारीन च्या (फिरंगी) कि-बोर्ड च्या किंमती पाहून आवंढ्यावर  आंवढे गिळत होतो आणि तिकडे आपल्या चेन्नई मध्ये टी.वी.एस वाले एक अप्रतिम मेकॅनिकल कि-बोर्ड गेले तीस वर्षे बनवून राहीले आहेत आणि वाजवी भावात विकत आहेत.. हे कळले आणि ‘दिवार’ चित्रपटातला  अमिताभ चा सुप्रसिद्ध डायलॉक आठवला…

‘तुम मुझे वहाँ ढूंढ रहे हो और मै यहाँ तुम्हारा इंतजार कर रहा हू’ ..

ती टी.वी.एस वाला असेच काहीतरी म्हणत असावा असे मला उगाचच वाटुन गेले..

क्रमश:

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
+1

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.