१२ जानेवारी २०१७ चा दिवस, समोर मनोज बसला होता, मनोज माझ्या स्नेह्यांचा मुलगा , चांगल्या आय.टी. कंपनीत नोकरी , भक्कम पगार. घरचे आता त्याच्या विवाहाचे पाहायला लागले होते. सगळे अगदी आखून दिल्या प्रमाणे चालले होते , आणखी काय हवे?

पण…

हा ‘पण’ नावाचा खलनायक यायलाच पाहीजे ना? त्या शिवाय कहाणी रंगतदार कशी होईल?

मनोज साठी हा ‘पण’ नोकरीत अनपेक्षित रित्या आलेल्या अडचणींच्या रूपात आला.
गेले चार – पाच महीने मनोज अत्यंत तणावात होता . आपली नोकरी धोक्यात आली आहे असे त्याला वाटत होते. मनोज ज्या प्रोजेक्ट वर काम करत होता तो संपला होता, आणि आय.टी. च्या परीभाषेत ‘बेंच वर येणे / बसणे’ नामक एक प्रकार असतो तो मनोज च्या बाबतीत चालू होता. दुसरे काम नाही अशा अवस्थेत आपल्याला फार काळ बेंच वर ठेवणार नाहीत आणि याचेच पर्यावसन आपल्याला एके दिवशी नारळ मिळणार ही भिती मनोजच्या मनात घर करुन राहीली होती. मनोज ने दुसर्‍या नोकरीसाठी हालचाल सुरु केली होती पण म्हणावा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता.

थोडक्यात त्याचा प्रश्न असा होता: “माझी नोकरी राहते का जाते?”

मनोजच्या या प्रश्नाचे उत्तर प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून देणे मला जास्त संयुक्तिक वाटले.

मनोज ने प्रश्न विचारला आणि तो मला पूर्ण पणे समजला ती वेळ आणि आम्ही इथे आमनेसामने बसलो होतो ते स्थळ (म्हणजे गंगापूर रोड, नासिक) हा तपशील घेऊन मी मनोजच्या प्रश्नासाठी एक प्रश्नकुंडली बनवली ती शेजारी छापली आहे.

प्रश्नकुंडलीचा तपशील:

दिनांक: १२ जानेवारी २०१७
वेळ: १९:१४: ५१
स्थळ: गंगापूर रोड, नाशिक
अयनांश: केपी न्यू अयनांश २४:००:१७

 प्रश्न : “माझी नोकरी राहते का जाते?”

प्रश्नकुंडली तयार झाली की सर्वप्रथम प्रश्नकुंडलीतला ‘चंद्र’ काय म्हणतोय, त्याचा विचार काय, त्याचा नूर काय, त्याचा डीप्पी काय सुचवतोय हे पहायचे, कारण ह्या सर्वां वरून प्रश्न विचारते वेळी जातकाच्या मनात काय काय चालू होते ते समजते, जातकाच्या मनात जे आहे तेच प्रश्नाच्या रूपात बाहेर आले आहे की नाही याचा खुलासा होतो, काही वेळा जातकाच्या मनात एक असते आणि प्रश्न भलताच विचारलेला असतो, बर्‍याच जातकांना त्यांचा प्रश्न सुसूत्रपणे, चपखल पणे मांडता येत नाही, काही वेळा एकात एक गुंतलेले अनेक प्रश्न जातकाच्या मनात असतात पण प्रश्न मुख्य मुद्दा सोडून एखाद्या कमी महत्त्वाच्या मुद्दया विषयी विचारलेला असतो.

चंद्राचा अभ्यास हा सर्व खुलासा करतो. चंद्राच्या अशा अभ्यासातून काही विसंगती दिसली तर जातकाला बोलून खुलासा करुन घेता येतो.

अर्थात चंद्राची अशी साक्ष काढताना एक लक्षात ठेवा की प्रश्नकुंडली जातकाने प्रश्न विचारला (आणि तुम्हाला तो समजला) त्याच वेळेची असावी. काही ज्योतिर्विद प्रश्न ऐकून घेतात , होरारी नंबर घेऊन ठेवतात आणि मग नंतर सवडीने केव्हा तरी प्रश्नकुंडली मांडतात, पण असे करताना प्रश्न विचारते वेळेची चंद्राची स्थिती आणि पत्रिका सोडवण्याच्या वेळेची चंद्राची स्थिती वेगळी असल्याने चंद्राची साक्ष निरूपयोगी असते.

असो.

या प्रश्नकुंडली चे ‘नक्षत्र पद्धती’ नुसार तयार केलेले ग्रहांचे कार्येशत्व आणि भावांचे कार्येश ग्रह यांचा तक्ता शेजारी छापला आहे. 

या पत्रिकेत चंद्र व्ययात (१२) आहे, चंद्राची कर्क रास लग्न (१) स्थानावर, चंद्र गुरु च्या नक्षत्रात , गुरु तृतीय (३) स्थानात, गुरु च्या राशी षष्ठम (६) आणि नवम (९) स्थानां वर.
चंद्र: ३ / १२ / ६ , ९ / १

आता पहा, मनोज च्या मनात भिती होती की त्याची नोकरी जाईल , चंद्र ही मन:स्थिती अगदी बरोबर दाखवत आहे.
३,१२ आणि ९ ही नोकरीच्या विरोधी स्थाने आहेत , ६ हे नोकरी बाबतचे एक प्रमुख स्थान आहे.

चंद्राने प्रश्नाचा रोख बरोबर दाखवला असल्याने मनोजचा प्रश्ना खरा आहे आणि अत्यंत तळमळीने विचारला आहे हे लक्षात येते.

प्रश्न ‘नोकरी’ बाबत असल्याने आपल्याला दशम (१०) स्थानाचा ‘सब’ तपासला पाहीजे. ‘नोकरी – व्यवसाय’ बाबतचा विचार करताना दशम (१०) स्थान हे प्रमुख (प्रिन्सिपल) स्थान मानले जाते.

या दशमा (१०) चा ‘सब’ आहे शनी. शनी वक्री नाही आणि आणि शनी चा नक्षत्र स्वामी बुध देखील वक्री नाही. पुढे जायला हरकत नाही. हा सब जर वक्री ग्रहाच्या नक्षत्रात असेल तर प्रश्नात अपेक्षित असलेली घटना घडत नाही. सब स्वत:च वक्री असेल तर तो मार्गी होई पर्यंत घटनेच्या बाबतीतला निर्णय लागत नाही.

दशमाचा (१०) सब शनी , पंचमात (५) आहे, शनीच्या राशी सप्तम ( ७) आणि अष्टम ( ८) स्थानांवर , शनी बुधाच्या नक्षत्रात , बुध पंचमात (५) , बुधाच्या राशी व्यय (१२) आणि तृतीय (३) स्थानांवर
शनी : ५ / ५ / ३ , १२ / ७ , ८

शनी नोकरीच्या विरोधात असलेल्या ३ , ५ , ८, १२ या भावांचा प्रबळ कार्येश असल्याने ‘मनोज ची नोकरी जाणार’ असा कल दिसतो. अर्थात हा आपला प्राथमिक अंदाज आहे, अजून दशा – अंतर्दशा व ट्रान्सीट्स तपसायचे आहेत.

या प्रश्नकुंडली साठीच्या महादशा – अंतर्दशा- विद्शा अशा आहेत:प्रश्न विचारते वेळी जातकाला गुरु महादशा , चंद्र अंतर्दशा आणि राहू विदशा चालू होती. गुरुची महादशा २४ एप्रिल २०२१ पर्यंत चालणार आहे.

महादशा स्वामी गुरु तृतीय (३) स्थानात , गुरुच्या राशी षष्ठम (६) आणि नवम (९) स्थानांवर , गुरु मंगळाच्या नक्षत्रात , मंगळ अष्टमात (८) , मंगळाच्या राशी दशम (१०) आणि पंचम (५) स्थानांवर.
गुरु: ८ / ३ / ५ , १० / ६ , ९
महादशा गुरू स्वामी ३ ,५ , ८ . ९ च्या माध्यमातून नोकरीला विरोध दर्शवत आहे.

गुरु चा सब आहे शनी , शनीचे कार्येशत्व : ५ / ५ / ३ , १२ / ७ , ८
म्हणजे गुरू चा सब शनी देखील नोकरीच्या विरोधातला पवित्रा घेऊन बसला आहे.

गुरु महादशेत सध्या चंद्राची अंतर्दशा चालू आहे , ती २४ डिसेंबर २०१७ पर्यंत आहे , प्रश्न विचारल्याच्या साधारण वर्षभराचा हा कालावधी आहे, प्रश्न कुंडलीचा आवाका या हून ही जास्त असतच नाही , त्यामुळे मनोज ची नोकरी राहणार का जाणार याचा फैसला या चंद्र अंतर्दशेतच होणार आहे.

या चंद्राचे कार्येशत्व आपण आधीच तपासले आहे. चंद्र: ३ / १२ / ६ , ९ / १ म्हणजे अंतर्दशा स्वामी चंद्र देखील नोकरीच्या विरोधात आहे, चंद्र स्वत:च्याच सब मध्ये आहे , ही चंद्र अंतर्दशा मनोजची नोकरी घालवणार असे दिसते.

चंद्राच्या अंतर्दशेत सध्या राहू ची विदशा चालू आहे आणि ती १३ जानेवारी २०१७ ला संपत आहे, अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे त्यामुळे या राहू विदशेचा विचार करण्यात काही अर्थ नाही.

पुढची अंतर्दशा गुरुची आहे , ती १९ मार्च २०१७ पर्यंत असेल.

गुरु ८ / ३ / ५ , १० / ६ , ९ , गुरु नोकरीच्या विरोधात आहेच , गुरुचा सब शनी ही नोकरीच्या विरोधात, मग या विदशेत मनोजची नोकरी जाणार? शक्यता तर तशीच आहे.
पण या गुरु विदशेवर शिक्का मोर्तब करण्या पूर्वी ट्रान्सिट्स तपासले पाहीजेत.

ट्रान्सिट्स  अनेक मार्गांनी पाहता येते पण इथे घटना तीन महिन्यात घडणार आहे तेव्हा ‘रवी’ चे भ्रमण पाहावयास पाहिजे.

आपण गुरु महादशा – चंद्र अंतर्दशा – गुरु विदशा असा विचार करत आहोत म्हणजे आपली साखळी गुरु – चंद्र किंवा चंद्र – गुरु अशी आहे ,

रवीचे भ्रमण:

गुरुची रास – चंद्राचे नक्षत्र

किंवा

चंद्राची – रास – गुरु चे नक्षत्र

असे व्हायला हवे.

गुरुची रास – चंद्राचे नक्षत्र अशी जोडी संपूर्ण राशीचक्रात उपलब्ध नाही पण चंद्राच्या कर्क राशीत गुरु चे नक्षत्र आहे.

रवी कर्केत १७ जुलै ते १६ ऑगष्ट असा असतो.

आता झाला ना घोट्टाळा !

रवी कर्केत यायच्या आधीच आपली गुरु विदशा (१९ मार्च २०१७ ) संपून जाते. आता काय करायचे? गुरु ची विदशा सोडायची आणि पुढच्या विदशा तपासायच्या, ‘सिंपल !

गुरु विदशे नंतर येते शनी ची विदशा ती ४ जुन २०१७ पर्यंत चालेल,

शनी चे कार्येशत्व ५ / ५ / ३ , १२ / ७ , ८
म्हणजे शनी विदशा देखील नोकरीला प्रतिकूल आहे , विदशा स्वामी शनीचा सब शुक्र आहे, ह्या शुक्राचे कार्येशत्व २ / ८ / — / ४, ११ असे आहे म्हणजे शुक्र काही नोकरीच्या विरोधात नाही उलट २ , ११ च्या माध्यमातुन तो नोकरीस अनुकूलच आहे.

जर शनीच्या या विदशेचा विचार करायचा तर आपली साखळी गुरु- चंद्र – शनी अशी असेल.

शनी च्या मकरेत चंद्राचे नक्षत्र आहे पण हा कालावधी २५ जानेवारीच्या सुमारास येईल, आपली शनी विदशा ४ जूण २०१७ ला संपणार असल्याने हे ट्रान्सिट जुळत नाही.

चंद्राच्या कर्केत शनीचे नक्षत्र आहे हा कालावधी २० जुलै मध्ये येईल शनी विदशा ४ जूण २०१७ ला संपणार असल्याने हे पण ट्रान्सिट जुळत नाही.

म्हणजे शनीची विदशा पण घटना घडवून आणणार नाही.

शनी नंतर बुधाची विदशा येणार ती ४ जून २०१७ ते १२ ऑगष्ट २०१७ अशी चालणार आहे.

बुध पंचमात (५) , बुधाच्या राशी व्यय (१२) आणि तृतीय (३) स्थानांवर, बुध केतू च्या नक्षत्रात , केतू अष्टमात (८) आहे.

बुध: ८ / ५ / — / ३, १२

बुध पूर्णपणे नोकरीच्या विरोधात आहे , बुध राहूच्या सब मध्ये , राहू धनस्थानात (२), राहूला राशी स्वामित्व नाही, राहू केतूच्या नक्षत्रात केतू अष्टमात (८), राहू वर शुक्र आणि मंगळ यांची दृष्टी आणि राहू रवीच्या राशीत
राहू चे कार्येशत्व ८ / २ / — /– शुक्र : २ / ८ / –/ ४ , ११ , मंगळ : ३ / ८ / ६ , ९ / ५ , १० , रवी: ६ / ६ / २ / २

बुधाच्या सब राहू काहीसे संमिश्र कार्येशत्व दाखवत आहे ,

बुध विदशा नोकरी घालवू शकते. या विदशेचा कालावधी ४ जुन २०१७ ते १२ ऑगष्ट २०१७ असा आहे.

आपण गुरु महादशा – चंद्र अंतर्दशा – बुध विदशा असा विचार करत आहोत म्हणजे आपली साखळी चंद्र – बुध अशी आहे,

रवीचे भ्रमण:

चंद्राची रास – बुधाचे नक्षत्र

किंवा

बुधाची – रास – चंद्राचे नक्षत्र

असे व्हायला हवे.

बुधाच्या कन्येत चंद्राचे नक्षत्र आहे पण तो कालावधी सप्टेंबर २०१७ मध्ये येईल आपल्या विदशेची तारीख़ ४ जून ते १२ ऑगष्ट २०१७ अशी असल्याने हे ट्रान्सीट उपयोगाचे नाही.

चंद्राच्या कर्केत बुधाचे नक्षत्र आहे , रवी कर्केत , बुधाच्या नक्षत्रात साधारणपणे ३ ते १६ ऑगष्ट असा असतो.  हे आपल्या ४ जून ते १२ ऑगष्ट २०१७ या बुधाच्या कलावधीत बसते.

रवीचे चंद्र – बुध मधल्या भ्रमण काळात जातकाची नोकरी जाईल.

जातकाला काय सांगायचे ?

“३ ऑगष्ट ते १२ ऑगष्ट २०१७ या कालावधीत तुझी नोकरी संपुष्टात येण्याची मोठी शक्यता आहे. “

पडताळा:
९ ऑगष्ट २०१७ रोजी जातकाची नोकरी गेली.
त्या दिवशी रवी कर्केत , चंद्राच्या राशीत , बुधाच्या नक्षत्रात होता आणि त्या दिवशी बुधवार होता!

शुभं भवतु


About सुहास गोखले

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.
0

सुहास गोखले administrator

मी सुहास गोखले या वेब-साईटचा निर्माता. आपल्याला ज्योतिष विषयक मार्गदर्शन हवे असल्यास किंवा आपली एखादी सुचना / तक्रार असेल तर खाली दिलेल्या 'संपर्क फॉर्म' मध्ये माहीती भरुन पाठवल्यास मी ताबडतोब आपल्याशी संपर्क साधेन.

8 प्रतिक्रिया

///////////////
 1. Sudhanva Gharpure

  सुहासजी, फारच अचूक सांगितलेत की. आपला अभ्यास व तयारी जबरदस्त आहे.

  हे प्रश्नकुंडली अभ्यास व केपी पद्धत दोन्ही जोडीने वापरले का ?

  0
  1. सुहास गोखले

   धन्यवाद श्री सुधन्वाजी,

   हो ही प्रश्नकुंडली आहे आणि कृष्णमूर्ती पद्धतीची मूलतत्वे वापरुन सोडवली आहे. प्रश्नकुंडली पारंपरीक, वेस्टर्न पद्धतीने पण सोडवता येते पण कालनिर्णया साठी केपी सरस आहे असा माझा अनुभव आहे.

   सुहास गोखले

   0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.