आमचा देवळाली कँप तसा नखा एव्हढा पिटूकला, नाशिक शहराची हद्द संपली की कँप चालू , एक सरळधोपट तीन किलोमीटर लांबीचा प्रशस्त लॅम रोड, त्याच्या दुतर्फा साधारण अर्धा किलोमीटर च्या आतबाहेर पसरलेली विरळ वस्ती.
आमच्या देवळाली कँप चे खास वैषिष्ट्य म्हणजे भरपुर झाडीत लपलेले ‘कोलोनियन स्टाईल’ चे सुंदर बंगले! या बंगल्याच्या जोडीला आहेत, दोन चार एकरांच्या जागेतली राजेशाही सॅनिटोरियम्स! एकेकाळी वैभव पाहीलेली पण आता वार्ध्यक्य अंगाखांद्यावर मिरवत , शिथील झालेली गात्रे सावरत, उन , वारा , पावसाला तोंड देत , थकलेल्या , भिजलेल्या डोळ्यात ‘वो आयेंगे ..’ अशा आशेचे नंदादिप पाजळत, मंदावलेली, सुस्तावलेली सॅनिटोरियम्स!!
इतिहासाच्या पानां मध्ये जपून ठेवावीत अशी ही वास्तु शिल्पें आपल्या दोन्ही बाजूंना मिरवत हा लॅम रोड हे तीन किलोमिटर चे अंतर अल्लाद पणे कापून एक सुबक ९० अंशाचे वळण घेतो आणि सामोरे येते ते केवळ भातुकलीच्या खेळात शोभेल असे तीन गल्ल्यांचे सुबक, ठेंगणे असे मार्केट ! जास्त फाफट पसारा नाही, बस्स्स, संपला आमचा देवळाली कँप!
सकाळचे ९ वाजले तरी तोंडावरची दुलई बाजुला न करणारा, आळसावलेला हा आमचा देवळाली कँप, उन्हें डोक्यावर आली की थोडीशी चुळबुळ करतो आणि रात्रीचे आठ – साडे आठ वाजतात न वाजतात तोच चिडीचुप्प होऊन जातो. एखादे तान्हे मुल खेळता खेळता टुपूकदिशी झोपून जावे अगदी तस्से !
देवळाली कँप मध्ये गुजराथी समाज मोठ्या प्रमाणात राहतो, त्यांच्या रो-हाऊसेच्या , बंगल्यांच्या मोठ्या कॉलनीज आहेत. बिपिन मेहता हे असेच माझ्या घराजवळच असलेल्या एका कॉलनीत राहातात. बिपीन भाईंचा आणि माझा तसा फारसा परिचय नव्हता पण त्यांचे धाकटे भाऊ धीरजभाई माझे क्लायंट , त्यांच्या जमीन – जागा खरेदी विक्री च्या व्यवसाया संदर्भात प्रश्न विचारायला ते नेहमी माझ्याकडे नेहमी येत असतात. आज ही त्यांनी फोन करुन सकाळची साडे नवाची अपॉईंटमेंट घेतली होती.
ठरल्या प्रमाणे साडे नऊ ला, ‘जय श्रीकृष्ण’ चा नारा ऐकला…..धीरजीभाई आले !
पण आज धीरजभाई एकटे नव्हते, सोबत त्यांचे मोठे भाऊ बिपीनभाई सुद्धा होते. धीरजभाईंना अस्सल मराठी खाद्यपदार्थ फार आवडतात म्हणून मी सौभाग्यवतींना सांगून त्यांच्या साठी भाजणीची खमंग थालीपीठे (लोण्या सहीत!) तयार ठेवली होती.
आधी पोटोबा मग विठोबा या न्यायाने थालीपीठें खाण्याचा कार्यक्रम झाला, अदरक वाला चहा झाला , चंची फिरली आणि धीरजभाईंनी मुद्द्याला हात घातला..
“सुहास भाई, ये बिपीनभाईं , माजे बडे भाई , तेंचा प्रोब्लेम हाये”
“जय श्रीकृष्ण बिपीनजी, आज क्या सेवा कर सकता हूँ मैं ।“
“अरे , आप तो पंडत हैं, आपसे क्या सेवा लेना..”
“फिर भी बंदा आपके लिए हाजीर है”
…
झाले होते असे…
बिपिन भाईंची चांदीची डब्बी हरवली होती, त्या डब्बीत ते त्यांच्या औषधाच्या गोळ्या ठेवत असत. तसे पाहीले ती डब्बी फार मौल्यवान नव्हती पण त्यांच्या आजोबांची आठवण म्हणून बिपीन भाईंसाठी ती अत्यंत मौल्यवान होती. ही डब्बी हरवल्या मुळे बिपींन भाई कमालीचे दु:खी झाले होते.
“डब्बी कोठे हरवली ?”
“अरे ते काय हरवला नाय, ते साला भंडारी हाय ना तेचाच समदा काम हाय”
“हा भंडारी कोण ?”
“आमचा कोलोनीचा वोचमेन, तेच चोर हाय”
“म्हणजे त्या भंडारीने तुमची चांदीची डब्बी चोरली आहे असा तुमचा संशय आहे “
“अरे बाबा खाली सौशय नाय, तेच चोर हाये मने पक्की खबर छे”
“म्हणजे भंडारीला डब्बी चोरताना कोणी पाहीले आहे का? किंवा त्याच्या कडे डब्बी आहे हे कोणी पाहीले आहे का?”
“तसा तेला चोरी करते वकत कोन नाय पायला पण ते रामशरण हाये नी , ते सांगते , साला ते भंडारी आदतसा चोर हाये .. पयले ‘XXXXX’ कोलोनीचा वोचमेन रायला था ना थिते बी असाच चोरी केला तेने … हरामखोर..”
“आता हा रामशरण कोण?”
“ते आमचे कडे रोजाना दूध घ्येऊन येते ना ते”
“म्हणजे तो रामशरण दूधवाला म्हणतो म्हणून भंडारीने चोरी केली असे मानायचे का?”
“ते रामशरण च्यांगला आदमी हाय, ते काय झूट बोलनार नाय आनी त्ये डब्बी गेला ना तवा भंडारी दोन टायमाला येऊन गेला ओफ्फीस मंदी”
”ऑफीस?”
“हां, अरे तसा ते माजा ओफ्फिस नाय, आमचे सोसायटीचा हाये, मी हमेशा तिथे बसलेले अस्ते. मार्निंग मंदी, तवाच ती डब्बी गायब झाला. भंडारी स्टोर रुम चा चाबी मागायला आला नी आधा घंटा बाद चाबी वापस देयाला आला.. दोन्ही टायमाला मी फोन पर बात मां बीजी था आनी डब्बी टेबल शी होता , माझा ध्यान नाय रायला अने तवाच भंडारीने ते जेब मंदी घातला..हरामी चोर साला”
“त्या भंडारीलाच विचारायचे ना?”
“तेला विचारला, पूछताछ काफी केला पन काय बोलते नाही, साला रोने धोने का एक्टिंग करता .. बोलते काय नाय”
“आता भंडारीने चोरी केली अशी तुमची खात्रीच असेल तर माझ्या कडे कशाला आलात, चोराला पकडणे , मुद्देमाल परत मिळवणे हे तर पोलिसांचे काम नाही का?
“अरे नाय रे नाय, ते पोलिस नाय बाबा, कशाला ते पोलिसचे लफडे मंदी जायाचे.. ना बाबा ना”
“मग मी नेमके काय करावे असे तुम्हाला वाटते”
“ते तुमी धीरज ला ते तेची होरोस्कोप बगून सांगते . येकदम एक्युरेट निगता हां समदा.. आता तसा ये केस चा बग नी.. त्ये भंडारीच चोर हाये काय ते सांग .. मग आमी तेचाकडे बगून ग्येयेल..”
“पण भंडारीने चोरी केलीच नसेल तर?”
“धीरज बोलता की तुम्हाला ते होरोस्कोप बगून समदा दिसते. ते भंडारीचा नाम येनार बघ, ते नाय तर दुसरा कोन त्ये नाम येयेल नी.”
“वस्तू हरवली असेल”
“अरे नाय , समदा ओफ्फीस छान मारा , डब्बी नाय, कोनी तरी चोरला हाये “
“भंडारी शिवाय आणखी बरेच लोक आले असतील ना त्या वेळेत”
“नाय , तसा बाहेरचा कोन नाय आला. जे आला तो समदा घरचाच लोक नायतर फ्रेंड लोग थे, त्ये नाय चोरणार”
“म्हणून तुम्हाला भंडारीनेच चोरी केली असे म्हणायचे आहे”
“ते भंडारीच साला चोर हाये, आन ते रामशरण पण बोलते ना, ते झूट कसा काय?”
“ठीक आहे, बघू या आपण नक्की काय झाले आहे ते..”
‘हरवले – सापडले’ प्रकाराच्या प्रश्नां साठी पारंपरीक आणि के.पी. पेक्षा वेस्टर्न होरारी पद्धती मला जास्त सोयिस्कार वाटते, प्रश्नाचे उत्तर अचूक मिळतेच शिवाय प्रश्ना संदर्भातले अनेक बारीक-सारीक तपशील सुद्धा उत्तम दिसतात.
क्रमश:
शुभं भवतु
- ऑन लाईन (लाईव्ह स्ट्रीमिंग) ज्योतिष क्लास - March 24, 2020
- पुण्यात क्लास सुरु ! - February 29, 2020
- Lost & Found ! - February 26, 2020
- बासरीवाला ! - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – ३ - February 6, 2020
- निशाणी बदला… भाग्य बदला – २ - February 5, 2020
- ‘निशाणी बदला… भाग्य बदला’ - February 5, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग २ - January 23, 2020
- विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती – भाग १ - January 22, 2020
- प्रश्नकुंडलीची वेळ - January 21, 2020
गावाचं वर्णन एकदम पु. ल. स्टाईल!
धन्यवाद प्राणेशजी
सुहास गोखले